मुखपृष्ठ म्हणजे साहित्यकृतीकडे नेणारी चित्रवाट… माझी भूमिका समन्वयाची असते
ग्रंथनामा - आगामी
शिरीष घाटे
  • ‘पुस्तकांच्या चित्रवाटा’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Mon , 30 May 2022
  • ग्रंथनामा आगामी पुस्तकांच्या चित्रवाटा Pustakanchya Chitravata शिरीष घाटे Shrish Ghate

प्रसिद्ध मुखपृष्ठकार व चित्रकार शिरीष घाटे यांनी गेल्या ४० वर्षांत मराठीतल्या अनेक पुस्तकांची मुखपृष्ठं केली आहेत. त्यात अनेक नामवंत प्रकाशनसंस्था आणि नामवंत लेखकांचा समावेश आहे. या मुखपृष्ठांपैकी काही निवडक मुखपृष्ठांचे ‘पुस्तकांच्या चित्रवाटा’ हे संपूर्ण रंगीत पुस्तक नुकतेच ग्रंथालीने प्रकाशित केले आहे. येत्या चार जून रोजी सोलापुरात भगवान चव्हाण आणि गिरीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन होतेय. त्यानिमित्ताने या पुस्तकाला घाटे यांनी लिहिलेलं हे मनोगत…

..................................................................................................................................................................

गेल्या दोन वर्षांच्या काळात लॉकडाऊनमुळे स्टुडिओ बंद होता, काम बंद होतं. अशा या कंटाळवाण्या व अनिश्चिततेच्या काळात या पुस्तकाची सुरुवात झाली. मी पुस्तक वगैरे करेन असे कोणी यापूर्वी म्हटलं असतं, तर मी त्याला वेड्यात काढलं असतं, कारण बोलणं आणि लिहिणं हे दोन्हीही माझे प्रांत नाहीत, हे मला पूर्वीच समजून चुकलं होतं. त्यामुळे मी त्या वाटेला जाणार नाही, याची खात्री होती. काही मित्रांच्या गप्पांमधून निघालेल्या विषयावरून, त्यांनी केलेल्या अति आग्रहाला शेवटी मी बळी पडलो. मी केलेल्या मुखपृष्ठांसंबंधाने काही लिहावे, असा तो आग्रह होता. बाकी दुसरा काही उद्योग नसल्याने मी थोडी फार हडकाहडकी करायला सुरुवात केली.

माझा प्रचंड आळशी स्वभाव व मी ज्या काळात व ज्या ठिकाणी जगलो, त्यात ‘डॉक्युमेंटेशन’ या शब्दाशी काडीचाही संबंध आला नव्हता व आजही येत नाही. चिकाटीने आपल्या कामाची नोंद ठेवणे, फाइलिंग, हिशोब अशा गोष्टींचा मला प्रचंड आळस. माझा अशा कोणत्याही गोष्टीतला रस लवकरच आटतो आणि दुसऱ्या कशाच्या तरी मागे लागतो. तरीही मित्रांचा प्रेमळ तगादा आणि थोडा रिकामा वेळ असल्याने सुरुवात तरी करू पुढे तेही विसरतील आणि आपणही विसरून जाऊ असा विचार केला होता, पण अक्षरश: वेताळासारखं पाठीवर बसून त्यांनी मला कामाला लावले. शेवटी जमतील तेवढ्या चित्रांतून काही निवडक चित्रे घेऊन त्यावर काम सुरू केले. अशी ही या पुस्तकनिर्मितीची पार्श्वभूमी.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

१९८० मध्ये भरलेल्या बार्शी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापासून माझी कलाप्रांतातील मुशाफिरी सरू झाली. मी बार्शीतच राहत होतो, बेकार होतो. साहित्याची आवड आणि कला-क्षेत्रातील तुटपुंजे ज्ञान, यामुळे संमेलनाचा संपूर्ण कलाविभाग सांभाळला होता. या संमेलनातच मी ‘ज्ञानेश्वर ते ढसाळ’ अशी कविताचित्रे केली होती. मोठ्या आकारातील ती काव्यचित्रे की, चित्रकाव्य हा मराठीत प्रथमच आणलेला कलाप्रकार होता. अर्थातच मी जे काही केलं होतं, त्याची योग्यता कळण्याइतका अनुभवही माझ्याकडे नव्हता. पण या प्रदर्शनाला पुण्या-मुंबईच्या रसिकांनी खूप गांभीर्याने घेतले आणि मुंबई, पुणे, सोलापूर अशा ठिकाणी प्रदर्शने वगैरे झाली.

कौतुक वगैरे ठीक होतं, पण माझी गरज नोकरीची होती. र.कृं.नी ती देखील देऊ केली होती, पण तिथं मुंबईत राहू शकलो नाही. याच वेळी कवी व ‘मिल’चे व्यवस्थापक श्री. हिमांशु कुलकर्णी यांनी सोलापूरला टेक्स्टाइल मिल ‘लक्ष्मी-विष्णू’मध्ये नोकरी देऊ केली आणि घरापासून खूप दूरच्या गावी जाण्याऐवजी सोलापूर जवळ असल्याने मी ती स्वीकारली व कविताचित्रांऐवजी साड्यांवर नक्षी काढू लागलो.

पण त्याशिवाय वेगळे काही करायची ऊर्मी असल्याने मी रेखाचित्रे वगैरे करायचो, स्वत:साठी आवडणाऱ्या कवितांवर चित्रे काढायचो. यातूनच साहित्य आणि कला यांना एकत्र आणणारा मुखपृष्ठ चित्रांचा सिलसिला सुरू झाला. सुरुवातीला मोठे प्रकाशक मिळाले, पण प्रकाशक पुण्यात व मी सोलापूरमध्ये नोकरीत. त्यामुळे कामात गती नव्हती व सातत्यही नव्हते, बाकी तंत्रज्ञानही उपलब्ध नसल्याने एकूणच हा प्रवास खूपच गतिशून्य होता. पुढे कालांतराने गिरणी बंद पडली आणि आपसूकच चित्रकला हा माझ्या जगण्याचा मुख्य रस्ता झाला.

केवळ मुखपृष्ठांच्या कामावर कोणताही कलाकार आपली उपजीविका भागवू शकणार नाही, अशीच तेव्हाची परिस्थिती होती. आजही ती फारशी बदलली नाहीय. त्यामुळे व्यावसायिक कामे करता करता मुखपृष्ठाची कामे करत राहिलो. मुखपृष्ठं आणि रेखाचित्रे (इलेस्ट्रेशन्स) करता करता चार दशकांचा काळ उलटून गेला. किती काम केलं याच्या संख्येत मला फारसा रस नाही, पण सातत्यानं काम करत गेलो. इतकी वर्षे गेली, पण प्रकाशनगृहांचा केंद्रबिंदू मोठ्या शहरांकडून छोट्या शहरांकडे सरकत नाहीये. त्यामुळे कामाच्या वाढीत काहीच बदल होत नाही. तंत्रज्ञानातही आता खूप बदल झाला आहे. झटपट काम करणारे तंत्रस्नेही कलावंत झाले आहेत. हा बदल इथपर्यंत अजूनही झिरपत नाही.

पूर्ण पुस्तकाचे वाचन ही माझी अट असते, आजवर ती पाळली आहे. पुस्तकवाचनानंतर माझी चित्रनिर्मितीची प्रोसेस सुरू होते, ती अनिश्चित काळ चालते. कधी अचानक लगेचच कल्पना सुचते, तर कधी ती जीव खाते. मला मिळालेल्या प्रकाशकांनी ही अडचण सोसूनही मला कामं दिली. अनेक साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतीसाठी माझ्यावर विश्वास ठेवला.

मुखपृष्ठ तयार करणे हा एक स्वतंत्र कलाप्रकार आहे असे मी मानतो. किमान साहित्याचे वाचन/ आकलन आवश्यक आहे. मुखपृष्ठ म्हणजे साहित्यकृतीकडे नेणारी चित्रवाट असते. मुखपृष्ठ ही संपूर्णपणे चित्रकाराची जबाबदारी आहे की लेखकाच्या सूचनेप्रमाणे चित्रकाराने चित्र काढावे वा प्रकाशकाला हवे तसे चित्र करावे? हा सारा वेगवेगळ्या मतांचा गलबला आहे, पण माझी भूमिका समन्वयाची असते. लेखकाने साहित्यकृती लिहून झाल्यावर बाजूला व्हावे, कारण आता ती कलाकृती रसिकांसाठी, वाचकांची होते. पुस्तकरूप घेऊन अनेक वाचकांपर्यंत ती जाणार असते. त्यामुळे त्याच्या मुखपृष्ठावर काय असावे, याचा निर्णय कलाकार व प्रकाशक यांच्यावर सोपवून द्यावा. ज्या चित्रकाराला प्रकाशकाने मुखपृष्ठाचं काम दिलं असेल त्याच्या आकलनाच्या पातळीवर शंका घेऊ नये, कारण तो त्याच्या पद्धतीने त्या साहित्यकृतीचा अर्थ लावतो व त्याप्रमाणे चित्ररचना करतो. आपल्या प्रतिभेच्या स्पर्शाने तो त्या साहित्यकृतीला उजळवीत असतो. शेवटी प्रकाशकाला हे पुस्तक एक 'प्रॉडक्ट' म्हणून बाजारात विकायचे असते. त्याची दृष्टी त्यातून काम करत असते.

मुखपृष्ठ चित्रकाराला साहित्यकृतीमधील आशय, प्रकाशकासाठी विक्रीयोग्यता आणि चित्रकलेतील तत्त्वांचा तोल अशा तिहेरी बिकट पेचामधून चित्रनिर्मिती करायची असते. यासाठी लेखकाने आपला हट्ट बाजूला ठेवून चित्रकारास स्वातंत्र्य द्यायला हवे. माझ्या सुदैवाने काही अपवादात्मक प्रसंग सोडले, तर बहुतेकांनी माझ्या मताचा आदरच केला. त्यामुळे मला मनासारखी चित्रनिर्मिती करता आली.

या चित्रांमध्ये मी माध्यमाचे बरेच प्रयोग केले. पेन, पेन्सिल, पेस्टल्स, जलरंग, तैलरंग, कोलाज अशा विविध माध्यमांतून चित्रनिर्मिती केली. साहित्यकृतीमधील आशयाच्या अधिकाधिक जवळ पोहोचण्यासाठी हे माध्यमबदल केले. काही वेळी वास्तववादी शैली, तर कधी प्रतीकात्मक. कधी सुलेखनातून तर काही वेळा अमूर्तशैलीमधून व्यक्त झालो. स्वतंत्रपणे प्रत्येक कलाकृती निर्माण केल्यामुळे एक विशिष्ट अशी चित्रशैली निर्माण झाली नाही, पण हीच गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची होती. एकाच विशिष्ट पद्धतीने सारे विषय हाताळण्यापेक्षा विषयानुरूप शैलीत, चित्रमांडणीत बदल करणे, मी पसंत करेन. कुठल्या एका साच्यात मला बांधून घ्यायचं नव्हतं.

माझी मुखपृष्ठं कदाचित चित्रकलेच्या अंगाने खूपशी दर्जेदार वगैरे नसतील, पण ती आशयाशी अधिक प्रामाणिक असतील, हे नि:संशय. शिवाय ती माझी स्वत:ची निर्मिती आहे, माझ्या आकलनामधून निर्माण झालेली आहेत, त्यांचा हेतू साहित्यकृतीशी जास्तीत जास्त प्रामाणिक असेल, असा प्रयत्न मी केला आहे. साहित्याशी किमान समांतर जाण्याचा माझ्या जाणिवांचा हा प्रवास आहे. काही लोक जुन्या प्रसिद्ध चित्रकारांची चित्रे आंतरजालावरून घेऊन मुखपृष्ठासाठी वापरतात किंवा साहित्यकृतीला थोडीफार समांतर जाणारी पेटिंग्ज छापतात वा अमूर्त चित्रांचा अंश घेतात. यामधून स्वतंत्रपणे काम करणाऱ्या कलाकारांवर अन्याय होतो, असे माझे मत आहे. कारण मुखपृष्ठ निर्मिती ही स्वतंत्र कला आहे असे मी मानतो. वरील प्रकारच्या कामामधून साहित्यकृतीचे दर्शन होते का? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

माझ्या मुखपृष्ठनिर्मितीपैकी खूपच थोडा भाग पुस्तकाच्या मर्यादेमुळे घ्यावा लागला. याशिवाय वृत्तपत्रे, दिवाळी अंक यांतील कवितांसाठी, लेखांसाठी केलेली रेखाचित्रे आता शोधूनही सापडत नाहीत. आजवर रेखाटलेली हजारो रेखाचित्रे, ही माझी संपत्ती आहे. कविताचित्रांसोबत तर आजही मी चालतोच आहे.

हा माझ्या मुखपृष्ठनिर्मितीचा लेखाजोखा आपणासारख्या रसिकांपुढे मांडण्यासाठी श्री. संजय पाठक यांनी जो माझ्यामागे प्रेमळ लकडा लावला होता, त्याची ही फलश्रुती. याशिवायही इतर अनेक मित्र, जिवलग व आप्तांचे ऋण माझ्यावर आहे, जे मी अभिमानाने वागवेन.

या पुस्तकामध्ये काही कमतरता राहिली असेल तर ती माझ्याच दोषामुळे असेल याची मला जाणीव आहे. तरीही आपण प्रेमाने याचा स्वीकार कराल अशी अपेक्षा आहे.

‘पुस्तकांच्या चित्रवाटा’ - शिरीष घाटे

ग्रंथाली, मुंबई

पाने – १९८

मूल्य – ७५० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Jayant Raleraskar

Mon , 30 May 2022

अप्रतिम...तुमच्या चित्रांचे हे कथन गरजेचे होते. समजेल तोपर्यंत पहा...हे तुमचे शब्द मला आजून आठवतात. हुबेहुब डोळ्यांना दिसते त्यापेक्षा अधिक तुमच्या चित्रात दिसावे असे मला नेहमी वाटायचे. ते दिसणे अधिक स्पष्ट करणाऱ्या तुमच्या पुस्तकाचे कुतूहल आहेच..


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......