म. गांधी : अपप्रचार आणि गैरसमज
सदर - गांधी @ १५०
डॉ. कुमार सप्तर्षी
  • महात्मा गांधी
  • Thu , 02 March 2017
  • गांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma gandhi कस्तुरबा गांधी Kasturba Gandhi सेवाग्राम आश्रम Sevagram Aashram

२ ऑक्टोबर २०१९ रोजी म. गांधी यांची १५०वं जयंती वर्षं साजरं केलं जाईल. त्याचं निमित्त साधून वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमानं २१-२२ फेब्रुवारीपासून ‘गांधी १५० जयंती अभियान’ सुरू केलं आहे. (२२ फेब्रुवारी हा गांधींच्या पत्नी कस्तुरबा यांचा स्मृतिदिन असतो.) या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम केले जाणार आहेत. त्याला प्रतिसाद म्हणून ‘अक्षरनामा’वर यापुढे दर महिन्याच्या दोन तारखेला गांधींविषयी एक लेख प्रकाशित केला जाईल… हा दुसरा लेख...

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

म. महात्मा गांधींमुळे भारताची फाळणी झाली…

- फाळणी अपरिहार्य होती. खरं तर भारतात हिंदू-मुस्लिमांचे मतभेद १९०५-०६पासून (बंगालची फाळणी) बाहेर येऊ लागले होते. बंगालच्या फाळणीपासूनच हे गृहीत धरलं जात होतं की, जेव्हा भारत स्वतंत्र होईल तेव्हा मुस्लिमांसाठी वेगळं राष्ट्र असेल. १९१४-१५पासून पुढची ३० वर्षं मुस्लिमांचं स्वतंत्र राष्ट्र व्हायला हवं असा मतप्रवाह भारतात होता. तो सुरुवातीला फारसा प्रबळ नव्हता. कारण ब्रिटिशांना भारतातून घालवणं ही सर्वांची प्राथमिकता होती. त्यामुळे भारतातल्या हिंदूंनी आणि मुस्लिम नेत्यांनीही या मागणीला फारसं पुढे येऊ दिलं नाही. ब्रिटिशांच्या तावडीतून स्वतंत्र व्हायचंय म्हणून ती मागणी सतत मागे मागे ढकलली जात होती. १९३९ला दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि आता ब्रिटिश साम्राज्य लयाला जाणार हे स्पष्ट झालं. त्यामुळे महायुद्ध संपायच्या आधीच १९४०-४१ पासून परत पाकिस्तानच्या मागणीनं जोर धरला.

म. गांधींनी पाकिस्तानला ५५ कोटी रुपये दिले वा द्यायला लावले…

- फाळणीनंतर काही काळ लॉर्ड माउंटबॅटन हेच भारत आणि पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल होते. या दोन्ही देशांची रिझर्व्ह बँकही एकच होती आणि तिच्याबद्दलचे धोरणात्मक निर्णय लंडनहूनच घेतले जात. त्यामुळे असं ठरलं की, रिझर्व्ह बँकेत ब्रिटिश इंडियाचे जे २२५ कोटी रुपये आहेत, ते लोकसंख्येच्या प्रमाणानुसार दोन्ही देशांना द्यायचे. हा जो करार झाला तो भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय करार. त्यात कुणी अडचण उभी करायचा प्रयत्न केला की, माउंटबॅटन त्यांना समज द्यायचे की, तुम्ही आंतरराष्ट्रीय कराराचा भंग करत आहात. भारताच्या मंत्रिमंडळाचाही हाच निर्णय होता की, पाकला त्यांच्या वाटणीचे पैसे द्यावेत… पण नंतर पाकने काश्मीरवर हल्ला केला. खरं तेव्हा काश्मीर भारतात नव्हतं... ते स्वतंत्र होतं. काश्मीरच्या राजाने स्वतंत्र राहायचं ठरवलं होतं. पण काश्मीरवर पाकने हल्ला केल्यावर काश्मीरच्या राजाने भारताची मदत मागितली आणि भारतात विलिन होण्याची तयारी दाखवली. तोवर पाकला त्यांच्या ७५ कोटींपैकी २० कोटी देऊन झाले होते, आता त्यांच्या वाटणीचे ५५ कोटी रुपये शिल्लक होते. तेव्हा काही लोकांनी हे ५५ कोटी देण्याचा निर्णय रद्द करण्यासाठी म. गांधींनी मंत्रिमंडळावर दबाव आणावा अशी मागणी केली, तेव्हा गांधींनी ‘झालेला निर्णयच बरोबर आहे’ असं जाहीरपणे सांगितलं. यात गांधींची भूमिका असलीच तर कुटुंबप्रमुखाची होती. कुठलाही कुटुंबप्रमुख आपल्या कुटुंबातल्या कुणावरच अन्याय होणार नाही हे पाहतो, तेच गांधींनी केलं. दुसरं म्हणजे ५५ कोटींचा प्रश्न आणि गांधींचं उपोषण यांची सांगड घातली जाते, ती बरोबर नाही. त्यासाठी गांधींनी उपोषण केलेलं नव्हतं, हे ‘महात्म्याची अखेर’ या जगन फडणीस यांच्या पुस्तकात विस्तारानं सांगितलेलं आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

म. गांधींनी मुस्लिमांचा फार अनुनय केला. त्यांना नेहमीच झुकतं माप दिलं…

- म. गांधी नैतिक प्रेशर वापरत होते. नैतिक प्रेशर हे कधीही हिंदू-मुस्लिम नसतं, ते वैश्विक असतं. गांधींबाबतचा हा गैरसमज खिलाफत चळवळीपासून पसरला आहे. तुर्कस्थानच्या खलिफाला हटवण्यासाठी तिकडे चळवळ चालली होती. भारतातल्या मुस्लिमांचा या खलिफाला पाठिंबा होता. तेव्हा काँग्रेसने वा गांधींनी त्याविरोधात भूमिका घेणं म्हणजे इथल्या मुस्लिमांना दुखावण्यासारखं झालं असतं आणि ते भारताच्या अखंड एकात्मतेच्या दृष्टीनं घातक होतं. भारताच्या दृष्टीनं हिंदू-मुस्लिम ऐक्य आवश्यक होतं, त्यामुळे त्याच्याशी सुसंगत भूमिका गांधींनी घेतली. फाळणीपूर्व भारतातल्या मुस्लिमांची संख्या ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत होती. एवढ्या मोठ्या समूहाला दुखावून चालणार नव्हतं. ब्रिटिशांच्या विरोधात लढण्यासाठी टिळकांनीही मुस्लिमांशी जुळवून घेण्याची भूमिका घेतली होती. गांधींनी एका अर्थानं टिळकांचंच राजकारण पुढे चालवलं. कारण तिथं संकुचित भूमिका घेतल्यानं तोटा झाला असता.

म. गांधींनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर अन्याय केला. त्यांना काँग्रेसचं अध्यक्षपद सोडायला लावलं…

- म. गांधी आणि सुभाषबाबू यांच्यात वैचारिक पातळीवर मुख्य मतभेद होते. सुभाषबाबूंचा सशस्र लढ्यावर विश्वास होता, तर गांधींचा अहिंसेवर विश्वास होता. अगदी टोकाची श्रद्धा होती. त्यासाठी कितीही किंमत चुकवावी लागली तरी हरकत नाही, पण भारताला अहिंसेच्या मार्गानेच स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, असं गाधींचं मत होतं. त्यांना पटलेला तो एकमेव मार्ग होता. सुभाषबाबूंचा मात्र त्यावर अजिबात विश्वास नव्हता. १९३९मध्ये सुभाषबाबू काँग्रेसचे अध्यक्ष झाले, तेव्हा नुकतीच दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली होती. तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की, ‘ब्रिटन आता अडचणीत आला आहे. त्याचा फायदा घ्यावा. तेव्हा ब्रिटनचा मुख्य शत्रू जर्मनी आणि जपानची मदत घेतली पाहिजे.’ पण शत्रूचा शत्रू तो आपला मित्र ही चाणक्यनीती गांधींना मान्य नव्हती आणि सशस्र लढाही मान्य नव्हता. सुभाषबाबू तर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची ही भूमिका कार्यकारिणीपुढे मांडत होते, पण त्यात बहुसंख्य लोक गांधींना मानणारे असल्याने सुभाषबाबूंचा सल्ला मानला जात नसे. काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सुभाषबाबू दुसऱ्यांदा उभे राहिले, तेव्हा गांधी आणि सुभाषबाबू यांच्यातले मतभेद स्पष्ट झाले होते. त्यामुळे गांधी त्यांना म्हणाले की, ‘माझा तुला पाठिंबा नाही. तू उभा राहू नकोस.’ तरीही सुभाषबाबू उभे राहिले आणि निवडूनही आले. त्या वेळी गांधी म्हणाले होते, ‘सुभाष, दुसऱ्यांदा निवडून आला हा माझा पराभव आहे.’ गांधींच्या विचारांचा तो पराभव होता.

म. गांधींनी कुठलंही आंदोलन पूर्ण काळ चालवलं नाही किंवा मधूनच माघार घेतली. विशेषत: चौरीचौराचं आंदोलन…

- चौरीचौराच्या आंदोलनात आंदोलनकांनी ब्रिटिशांवरचा राग सामान्य पोलिसांवर काढला. त्यांना कोंडून जिवंत जाळलं. सत्यनिष्ठा, अहिंसा जास्त महत्त्वाची मानणाऱ्या म. गांधींना हे पटण्यासारखं नव्हतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे २१ पोलिस मारले गेले, त्यातले बहुसंख्य भारतीय होते. काही दलित समाजातले होते. हे आपल्याच समाजात दुफळी माजवण्यासारखं होतं. म्हणून गांधींनी आंदोलन मागे घेतलं. तेव्हा ते म्हणाले, ‘माझ्या कार्यकर्त्यांची पुरेशी तयारी झालेली नसताना मी आंदोलन केलं ही माझी चूक झाली. अक्षम्य गुन्हा झाला.’ न्यायालयापुढे गांधींनी स्वत: सांगितलं की, ‘ही माझी चूक आहे. मला मोठी शिक्षा करा.’ ब्रिटिश सरकारने त्यांना सहा वर्षांची शिक्षा केली. तेव्हा गांधी म्हणाले, ‘ही शिक्षा कमी झाली.’ गांधींचं हे नैतिकतेचं टोकाचं आदर्श उदाहरण आहे.

यात आणखी एका गोष्टीकडे फारसं लक्ष गेलेलं नाही. ब्रिटिश अशा एखाद-दुसऱ्या आंदोलनांनी जाणार नाहीत, हे गांधी जाणून होते. ब्रिटिश ओपिनियन फिरेल तेव्हाच ते जातील हे गांधींना माहीत होतं. गांधींच्या निर्णयामुळे ब्रिटिश ओपिनियन काही प्रमाणात भारताच्या बाजूनं झुकण्यात मदत झाली, हेही विसरून चालणार नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

म. गांधींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर अन्याय केला. पुणे कराराच्या बाबतीत तर आंबेडकरांना इमोशनल ब्लॅकमेल केलं…

- दुसऱ्या गोलमेज परिषदेत ब्रिटिशांनी स्वतंत्र मतदारसंघाची घोषणा केली होती. म्हणजे हिंदू हिंदूंना मतदान करतील, मुस्लिम मुस्लिमांना मतदान करतील आणि दलित दलितांना मतदान करतील. देशाच्या एकात्मेसाठी ही मानसिक फाळणी गांधींना नको होती. त्यांचं म्हणणं होतं की, ‘राखीव मतदारसंघातून दलित उमेदवार उभे करा, पण त्यांना सर्वच जण मतदान करतील.’ त्यामुळे त्यांनी ‘पुणे करारा’द्वारे ७२च्या दुप्पट जागा दलितांना राखीव देण्याची तयारी दाखवली. त्या वेळी आंबेडकरांसाठी दलितांचं हित राखणं हा प्राधान्यक्रम होता, तर गांधींचा देशाची अखंडता राखणं हा प्राधान्यक्रम होता. त्यामुळे आंबेडकरांचा गांधींवरचा राग स्वाभाविक आहे.

पटेल-नेहरू यांच्यापैकी म. गांधींनी नेहमी नेहरूंना झुकतं माप दिलं. पटेलांना पंतप्रधान होऊ दिलं नाही…

 - पटेल हेही म. गांधींप्रमाणे गुजरातमधलेच. पटेलांचंही नेहरूंप्रमाणे गांधींवर खूप प्रेम होतं. पटेलांची काँग्रेस पक्षावर विलक्षण पकड होती. पण एकूण देश पुढे घेऊन जाण्याची व्हिजन, लोकशाहीवर निष्ठा, सर्वसमावेशक चेहरा या गोष्टी पटेलांपेक्षा नेहरूंकडे होत्या. तर पटेलांकडे पक्ष चालवण्यासाठी, तो एकत्र बांधून ठेवण्यासाठी आवश्यक असलेली शिस्त आणि कठोरपणा जास्त प्रमाणात होता. त्यामुळे गांधींना पटेलांची गुणवत्ता देश चालवण्यासाठी योग्य वाटत होती. नेहरू भारतातल्या सर्वसामान्य जनतेला ‘आपला नेता’ वाटत होते. त्यामुळे गांधींनी नेहरूंना गुणवत्ता आणि समाजमानसातली प्रतिमा यामुळे पंतप्रधान केलं.

सावरकरांना म. गांधींनी जाणीवपूर्वक बाजूला ठेवलं. ते राष्ट्रीय पातळीवर पुढे येणार नाहीत, याची काळजी घेतली…

- सावरकर मूलत: क्रांतिकारी होते. सशस्र मार्गानेच ब्रिटिशांना या देशातून घालवणं शक्य आहे, असं त्यांना वाटत होतं आणि त्यांनी तसे प्रयत्नही केले. म. गांधींना हे मुळात मान्य नव्हतं. त्यांचा अहिंसेवर विश्वास होता. हा सावरकर आणि गांधी यांच्यातला मूलभूत फरक होता. सावरकरांच्या आयुष्याचे एकंदर तीन टप्पे पडतात. पहिला त्यांचं क्रांतिकारी असणं, दुसरा समाजसुधारणा (भाषाशुद्धी, अस्पृश्यता निर्मूलन, विज्ञानवादी दृष्टिकोन इ.) आणि तिसरा हिंदू राष्ट्र घडवणं. यातला पहिला आणि तिसरा टप्पा गांधींना मान्य नव्हता. दुसरा टप्पा त्यांना मान्य होता. गांधी म्हणत, ‘तरुणांनो सरकारी नोकऱ्या सोडा.’ त्यावर सावरकर म्हणत, ‘तरुणांनो सरकारी नोकऱ्या करा. उद्या हिंदू राष्ट्र झाल्यावर आपल्याला सरकारी नोकर लागणार आहेत.’ गांधी म्हणत, ‘सैन्यातून बाहेर पडा.’ त्यावर सावरकर म्हणत, ‘सैन्यात सामील व्हा.’ प्रमुख गोष्टींवरून ज्यांच्याशी मतभेद आहेत, त्यांच्याशी गांधींचं कसं काय पटेल?

म. गांधी हुकूमशहा होते…

- असा गैरसमज असणाऱ्यांचा एक छोटासा पण बुद्धिवंतांचा गट आहे. याचं साधं उत्तर असं आहे की, म. गांधींसोबत जितक्या टॉवरिंग व्यक्ती होत्या की, त्याच्या एक शतांशही इतर कुणाही सोबत नव्हत्या. समाजकारण, अर्थकारण या क्षेत्रातल्या अनेक व्यक्ती त्यांच्यासोबत होत्या. बरं, हे लोक गांधींसोबत असले तरी काही बाबतीत त्यांचे गांधीजींशी मतभेद होते. ते जाहीरपणे गांधींना ऐकवलेही जात. गांधी हुकूमशहा असते तर या व्यक्ती त्यांच्यासोबत राहिल्या असत्या का? जगातल्या कुठल्या हुकूमशहासोबत एवढे लोक होते? उलट गांधी हे खऱ्या अर्थानं लोकशाहीवादी होते. त्यांच्यामुळेच या देशात लोकशाही रुजली.

(हा लेख दै. ‘प्रहार’च्या ‘कोलाज’ या रविवार पुरवणीमध्ये २६ सप्टेंबर २०१० रोजी प्रकाशित झाला होता.)

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

Dhiraj Patil

Mon , 01 January 2018

लगे रहो मुन्नाभाई।


Dhiraj Patil

Mon , 01 January 2018

गांधींचा अनादर करणार्या लोकांनो आता बोला.


Shivaji Gaikwad

Thu , 16 March 2017

महात्मा गांधींच्या विरोधात केल्या जाणारया खोट्यानाट्या व विखारी प्रचाराला झकास उत्तर


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......