लोकशाहीची मूल्ये तळातून मजबूत होत वरपर्यंत पसरायला हवीत. त्यातूनच प्रतिष्ठित जीवन, भयमुक्त मन आणि एकसंध समान प्रगतीची फळे अनुभवता येतील
ग्रंथनामा - लोकशाही समजून घेताना
इब्राहीम अफगाण
  • ‘लोकशाही समजून घेताना’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Mon , 14 February 2022
  • ग्रंथनामा झलक लोकशाही समजून घेताना Lokshahi Samjun Ghetana दीपक पवार Deepak Pawar लोकशाही Democracy

२५ जानेवारी हा ‘राष्ट्रीय मतदार दिन’. त्यानिमित्ताने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांच्यातर्फे ‘लोकशाही समजून घेताना’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. डॉ. दीपक पवार यांनी संपादित केलेल्या या पुस्तकात महाराष्ट्रातील ३३ मान्यवर लेखकांच्या लोकशाहीच्या विविध पैलूंचा आढावा घेणाऱ्या लेखांचा समावेश आहे. या पुस्तकातील लेख ‘अक्षरनामा’वर २ फेब्रुवारीपासून क्रमश: प्रकाशित करत आहोत...

..................................................................................................................................................................

‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या उक्तीनुसार बहुजनांच्या हिताचा आणि त्यांच्या सुखाचा अंतिम निर्णय त्यांच्याच हाती असावा, या विचारातून घडलेली लोकशाही ही मानवजातीच्या सांस्कृतिक इतिहासाच्या उत्क्रांतीतून विकसित झालेली आणि जगातील अनेक ठिकाणी प्रस्थापित झालेली व्यवस्था आहे. यात अब्राहम लिंकन यांनी केलेली व्याख्या सर्वत्र सांगितली जाते – ‘लोकांचे, लोकांसाठी, लोकांनी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही’. 

काही हजार वर्षांच्या तुलनेत अब्राहम लिंकन हे खूप अलीकडचे ठरतात. त्यामुळे ही संकल्पनाही आधुनिक आहे. मात्र या संकल्पनेवर छोटे समूह काही हजार वर्षांपूर्वीदेखील नांदत होते, हे आता मानववंशशास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. ‘डेमोक्रसी’ हा शब्द ज्या मूळ ‘डेमोस’ या ग्रीक शब्दावरून आला आहे, त्याचा अर्थ ‘लोक’ असा आहे. ‘डेमोक्रसी’ या शब्दाचा दुसरा भाग ‘क्रेटिया’, याचा अर्थ ‘सत्ता’ असा आहे. हा शब्द जेथून आला, त्या मूळ ग्रीक संस्कृतीत बहुमताने निर्णय होत होता. शिवाजी महाराजांच्या मंत्रीमंडळात अष्टप्रधान होते, तसे अकबराकडेही नवरत्न होते; पण अकबराचा शब्द अंतिम असे. म्हणजे बहुमताने निर्णय होत असला, तरी या व्यवस्थेवर कोणा एकाचे मत निर्णायक असायचे. तसेच, हे कथित बहुमत व्यक्त करणारे सगळेच समाजाच्या सर्व स्तरांतील असायचे असेही नाही; किंवा ते मूठभर लोक सगळ्यांचेच प्रतिनिधित्व करत होते असेही नाही. त्यामुळे चांगल्या राजाच्या कहाण्या तुरळक आहेत. राजा विक्रमादित्याच्या कहाण्यांतही तो त्याचे प्रधान, सल्लागार वगैरे स्तर ओलांडून थेट जनतेत जाऊन, तेही रूप पालटून, वस्तुस्थिती जाणून घ्यायचा. हारून अल रशीद या आठव्या शतकातील बगदादच्या खलिफाच्या, अशा रूप पालटून जनतेच्या दु:खाचा, वस्तुस्थितीचा प्रत्यक्ष पुरावा पाहण्याच्या कहाण्या तर असंख्य आहेत. मात्र अशी राजा-सुलतानाची उदाहरणे तुरळक आहेत.

याचा अर्थ, जनतेचे कल्याण ज्यांच्या हाती आहे ते आणि सर्वसामान्य जनता यांच्या दरम्यान कोणत्या तरी दऱ्या, अडथळे असायचे. हे अडथळे अनेकदा अधिकारी, सल्लागार अथवा प्रधान यांच्या स्वरूपातील असायचे. ‘प्रधानजी, राज्याची काय हालहवाल?’ असा प्रश्न विचारला जाणाऱ्या प्रधानाला आपली नोकरी ज्याच्या मर्जीवर अवलंबून आहे, त्या राजाच्या आवडीनिवडी आणि चौकशी करतेवेळी त्याच्या असलेल्या मूडचा अंदाज घेऊन उत्तर द्यावे लागायचे. तो बहुतांश वेळा ‘पोपट मेला आहे’, असे थेट न सांगता, ‘त्याने मान खाली घातली आहे, तो खात-पीत नाही,’ अशा प्रकारे उत्तर द्यायचा.

अशा प्रकारच्या व्यवस्थेकडून आपण देश म्हणून इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळवले, तेव्हा लोकशाहीचा मार्ग स्वीकारला, जेणेकरून हे मधले अडथळे दूर होतील आणि राज्यकर्ते व जनता यांचा थेट संपर्क निर्माण होईल. लोकशाही ही व्यवस्था म्हणून आपण स्वीकारली. जो आपले कल्याण करेल असे जनतेला वाटते, त्याला ते अधिकार देण्याची व्यवस्था लोकशाहीत आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

भारतात लोकशाही आल्याला पाऊणशे वर्षे झाली. अमेरिकेत त्याहून अधिक वर्षे झाली, इंग्लंडमध्ये त्याहून अधिक. लोकशाहीच्या उत्क्रांतीत कल्याणकारी राज्यकर्ते निवडून येण्याची आणि राज्यकर्ते व जनता यांच्यातील अडथळ्यांची दरी कमी झाली आहे, मात्र दोष राहिलेले आहेत. कारण, सर्व स्तरांतील लोकप्रतिनिधी निवडून येऊनही त्यातून बहुजनहिताय आणि बहुजनसुखाय निर्णय होतील, याची शाश्वती नाही. साधनसंपत्तीला चिकटून राहण्यासाठी, शक्ती मिळवण्यासाठी, टिकवण्यासाठी व्यक्तिगत आणि सामूहिक स्वार्थ इतर मूल्यांवर प्रभावी ठरला आहे.

ही दिवा आणि तुफान यांच्यातील लढाई नाही, तर ज्ञान आणि अज्ञान यांच्यातील लढाई आहे. आपल्या हाती असलेली सत्ता जनतेच्या हाती जाता कामा नये, अशी एक प्रतिगामी बाजू आहे; आणि दुसरीकडे, प्रत्येक नागरिकाच्या हाती बळ आले, तर सगळ्यांचेच कल्याण होईल, अशी पुढे नेणारी आशावादी दृष्टी आहे. या रस्सीखेचीमुळे नागरिकांना त्यांच्या हाती लोकशाहीने दिलेली सत्तेची सूत्रे ओळखता आली नाहीत आणि ती कमकुवत ठरली.

इतक्या वर्षांत आणि विविध परिस्थितीत आपल्या देशातील या लोकशाही प्रकाराच्या राजकीय व्यवस्थेला आकार आला, तो आपल्या देशातील स्थिती, पद्धतीनुसार बदलला. मात्र त्याकडे केवळ राजकीय व्यवस्था म्हणून पाहिले, तर या संकल्पनेचाच तो पराभव ठरू शकतो. कारण, राजकीय व्यवस्थेशी लोकांचा संपर्क हा ठरावीक वेळीच, निवडणुका आदी विशिष्ट परिस्थितीतच होतो. त्याच वेळी या राज्यकर्त्यांकडून, पक्ष व्यवस्थेकडून आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी असलेल्या निवडणूक आयोगाकडून जनतेशी संपर्क होतो. परंतु, लोकशाही हा क्षणोक्षणी, हरेक दिवशी प्रत्यक्ष व्यवहारात जगण्याचा प्रकार आहे; पण रोजच्या जगण्यात लोकशाही आपल्याला जाणवत मात्र नाही. 

‘लोकशाही’ हा शब्द केवळ वादविवादात किंवा मंचांवरून केल्या जाणाऱ्या भाषणांतच वापरला जातो. काही प्रसंगी आपसात बोलत असताना किंवा कुटुंबात जेव्हा आपल्या व्यक्तिगत निर्णयावर अथवा मतांवर इतर बंधने आणू पाहतात, मर्यादा घालू इच्छितात किंवा बदल करण्यास दडपण आणले जाते; तेव्हा लोक ‘इथे लोकशाही आहे आणि मला तुम्ही असे जबरदस्तीने काम करायला भाग पाडू शकत नाही’ असे म्हणतात. अशा प्रकारे ‘लोकशाही’ या शब्दाचा प्रयोग केला जातो, तेव्हा त्यामध्ये स्वत:भोवती असलेला संदर्भ ओलांडून त्या पलीकडे असलेल्या दुसऱ्यांचा विचार क्वचितच असतो. मात्र रोजच्या जगण्यात असलेली लोकशाही ही जितकी आपली असते, तितकीच ती इतरांसंबंधीही असते. राजकीय प्रक्रियेत सामील होण्यासाठी, राजकीय व्यवहार करण्यासाठी निवडणूक हा ठळक आणि प्रासंगिक प्रकार आहे.

स्वातंत्र्योत्तर भारतात लोकशाही संकल्पनेभोवती जनजीवन रचले गेल्याने त्याचा मोठा फायदाही झाला. यात कळत-नकळत इतरांचीही उपस्थिती, अस्तित्व लोकांना दिसू लागले. ‘लोक’ या शब्दात ‘बहु’ आणि ‘अनेक’ हे शब्द सामावलेले आहेत. आणि लोकशाहीसोबत आपण घटनेने जोडलो गेल्यामुळे त्यात अभिव्यक्ती आली. ती एका वर्गाला जशी प्राप्त झाली, तशी ती सर्वांनाच झाली. जितके एका समूहाचे, धर्माचे आणि जातीचे अस्तित्व आहे; तितकेच ते इतरांनाही कळू लागले. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया, कल्याणकारी योजना, आरक्षण या विविध घटकांचा समावेश आहे. त्यात त्रुटी आणि मर्यादा आहेतच. सामाजिक न्याय, सर्वांचे कल्याण हे अजेंडे अपूर्णच आहेत. तरी सर्वांचे अस्तित्व सर्वांना कळण्याची व्यवस्था लोकशाही पद्धतीने आणली.

रोजच्या जगण्यात लोकशाही रसरशीत ठेवण्यासाठी काही गोष्टी नित्यनेमाने ताज्यातवान्या ठेवाव्या लागतील. एक म्हणजे सजगता, भान-आत्मभान, तसेच बाह्य जगाचे भान. दुसरी गोष्ट म्हणजे, वैज्ञानिक दृष्टीकोनाची जोपासना. तिसरी गोष्ट आहे - चिकित्सक प्रवृत्ती. तसेच चौथी म्हणजे माणूस आणि पशू यांच्यातील भेद. (पशू म्हणून जगणे सोपे असते, कारण झुंडीत राहून सुरक्षित वाटून घेतले की पुरेसे ठरते.)

पहिली गोष्ट आत्मभान आहे, याचे कारण माणूस हा जगातील एकमेव प्राणी आहे, ज्याच्यात आत्मभानाची क्षमता आहे. आत्मभान म्हणजे तुम्ही हा लेख वाचत आहात आणि त्याच वेळी तुम्हांला हेही भान आहे की, तुम्ही तो वाचत आहात. एक प्रकारे आपल्यामध्ये आणखी एक व्यक्ती आहे, जी आपण जे करत आहोत, ते पाहू शकते. अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतके नर-वानर सोडले, तर अन्य कोणतेही प्राणी आरशातील प्रतिबिंबदेखील ओळखू शकत नाहीत.

आत्मभानाच्या या क्षमता माणसासाठी अमाप शक्यता निर्माण करतात. उदा. त्याला आपल्या मनात विचार सुरू आहेत याचे भान असू शकते आणि त्याचबरोबर ते विचार आहेत आणि सत्य नाही, याचेही भान असू शकते. तसेच, या आत्मभानाने त्याच्यात सगळ्या गोष्टी आपल्या एकट्याच्या भोवती रचल्या गेलेल्या नाहीत, तर आपल्याइतकेच महत्त्वाचे अन्य लोक, प्राणी, वृक्ष हेही आहेत याची जाणीव होते. तसेच अनुकंपा हा गुण या आत्मभानातून विस्तारू शकतो. तथापि, या आत्मभानाची समस्या अशी की, रोजच्या जगण्यात आपण इतक्या सजगपणाने जगत नाही.

गेल्या शतकात हायडेग्गर या जर्मन तत्त्वज्ञाने अवघी मानवजात कशी सुन्नावस्थेत जगत असते, हे दाखवून दिले होते. म्हणूनच फॅक्टरीमध्ये एखाद्या वस्तूचे उत्पादन करावे, त्याप्रमाणे लाखो ज्यू नागरिकांची जिवंत शरीरे कच्चा माल म्हणून पुरवून त्यातून मृतदेह निर्माण करण्याचे काम अनेक वर्षे सुरू असताना, बाकीचे सगळे लोक असेच सुन्नपणे पाहत होते. कारण, मृत्यू आपले दार ठोठावत नाही, तोवर आपल्या अनेक वर्षांच्या शेजारच्या संपूर्ण कुटुंबाला कधीही परत न आणण्यासाठी नेले जात असले, तरी आपल्याला काहीही फरक न पडणे, याला दुसरे काय कारण असू शकते? 

एका गाईला कसाई पकडून नेत असताना इतर गायी अशाच आत्मभानविरहित सुन्नावस्थेत असतात. आत्मभानाविना माणूस आणि पशू यांच्यात फरक करणे कठीण आहे. मात्र माणूस सतत आत्मभानात नसतो, याचे एक कारण ते जागृत ठेवण्यासाठी ऊर्जा खर्ची घालावी लागते. आणि आपला प्रागैतिहासिक काळापासूनचा प्रवास पाहिल्यास ऊर्जेचा प्रचंड तुटवडा असल्याने ती खर्ची घालण्यासाठी मेंदूला अद्याप खूप पटवून द्यावे लागते. सुन्नावस्थेत आयुष्य सहज निघून जाते आणि काही वेळा ते वरदानात्मक ठरते.

आपले रोजचे जगणे हे केवळ लोकशाही मूल्यांनी बनलेले नाही. उलट, ही गेल्या दोन-तीन पिढ्यांत अंगीकारलेली मूल्ये आहेत. मात्र आपला इतिहास त्याहून प्राचीन असल्याने त्यात हजारो वर्षांच्या धार्मिक संस्कारांची मूल्येही समाविष्ट आहेत. त्यांचा काही वेळा संघर्षही होतो. आता तर लोकशाहीची व्याख्या बहुसंख्य हिंदूंच्या धर्माच्या अभिव्यक्तीसाठी आणि अल्पसंख्याकांचा धार्मिक अवकाश संकुचित करण्यापुरती जोरकसपणे वापरली जाते. त्यात लोकशाही मूल्यांचाच पराभव होतो, हे ते करणाऱ्यांच्या लक्षात येत नाही.

भारतासारख्या बहुधार्मिक देशात जसा केवळ एका व्यक्तीचा विजय हा समाजाचा, समुदायाचा पराभव असू शकतो; तसाच केवळ एका धर्माचा विजय हा देशाचा पराभवच असतो. मात्र अस्मिता ही केवळ धर्मापुरती मर्यादित केली जात असल्याच्या काळात आत्मभान अधिक जागृत ठेवणे महत्त्वाचे असते. तसे असेल तर या धार्मिक अस्मितांच्या लढ्यात नेहमीच समुदायाच्या नावाखाली आत्मभानाचा अवकाश दडपला जातो, हे लक्षात येते. उदाहरणार्थ, अनेक हिंदू लोक मुस्लिमांच्या मशिदीमध्ये लाऊड स्पीकरवरून दिल्या जात असलेल्या अजानमुळे हैराण होतात आणि त्यांना त्याचा त्रास होतो, अशी तक्रार करतात. ते साहजिक आहे. मिश्र वस्तीत सगळ्यांनीच पहाटे पाच-साडेपाचला उठण्याची गरज नसते. तसेच, शुक्रवारचे वाज (प्रवचन) लाऊड स्पीकरवरून सगळ्यांसाठी प्रसारित करण्याचीही गरज नाही. कारण, एकतर नीट ऐकू न आल्याने त्यातून काही कळत नाही आणि दुसरे, ते ऐकण्याची तसदीही कोणी घेत नाही. अगदी मशिदीत बसलेलाही ती कितपत ऐकतो याबद्दल शंका आहे, कारण ते त्याने नीट ऐकले असते तर त्याचे आयुष्य कायमस्वरूपी पालटले असते. असो. त्यामुळे अशा प्रकाराने बिगर मुस्लीम म्हणजे बहुसंख्य हिंदूंना त्रास होत असेल तर ते समजण्यासारखे आहे.

मात्र अशा प्रकारे त्रास होतो हे माहीत असूनही, मंदिरात वा परिसरात उच्चरवाने तासन्-तास लाऊड स्पीकरवरून गाणी लावल्याने त्रास होऊ शकतो, याचा विचार ते करत नाहीत. आरत्या आणि उत्सव यांच्यानिमित्ताने विविध गाणी मोठ्या म्युझिक सिस्टीमवरून वाजवल्याने अनेक वृद्ध, लहान बाळे, विद्यार्थी, आजारी माणसे; जी लोकसंख्येच्या प्रमाणाचा विचार केल्यास बहुतेक हिंदूच असण्याची शक्यता आहे, त्यांना त्रास होऊ शकतो याचेही भान ठेवले जात नाही. आणि ही गाणी ती लावणाराही ऐकत नाही, याचा लख्ख पुरावा म्हणजे गणपती उत्सवात साईबाबांची गाणी आणि साईबाबांच्या मंदिरात ‘हे भोळ्या शंकरा’सारखी गाणी सर्रास वाजवली जातात आणि त्यात कोणाला काहीच आक्षेपार्ह वाटत नाही. कारण, ‘सबका मालिक एक’. लाऊड स्पीकरवरून गाणी वाजवण्याचे कंत्राट घेणारा कोणी एकच असतो आणि तो सगळ्या गाण्यांचा पेनड्राईव्ह लावून मोबाइलवर गप्पा मारत बसतो.

मात्र हे मुद्दे जनतेच्या धार्मिक भावनांना हात घालून, त्याला अस्मितेचे रूप देऊन, इतर धर्मीयांच्या विरोधात भडकवण्यासाठी वापरले जातात. दोन्ही प्रकार बंद व्हायला हवेत. मुस्लीम धर्मात बँड वाजवण्याचे कोणतेच प्रसंग नसतात, उलट त्याला मनाईच असते. मात्र हिंदू अनेक सण-समारंभात बँड वाजवतात. मुस्लीम समाजाला हिंदू धर्माचे हे बँड वाजवणे, फटाके फोडणे ही वैशिष्ट्ये माहीत नाहीत, असे नाही. तसेच हिंदूंना मुस्लिमांत पाचही वेळच्या नमाजाच्या वेळी अजान दिली जाते हे माहिती नसते, असेही नाही. दोन्ही समाजांना हे माहिती आहे म्हणून कितीही दंगे झाले तरी कालांतराने सहअस्तित्वाने जगणे सुरू होते, कारण दोघेही कुठे जाऊ शकत नाहीत. जे जाऊ शकतात ते जातात आणि घेटो (विशिष्ट जाती-धर्मांच्या वस्त्या) वाढतात.

बहुसंख्य हिंदूंना मुस्लीम इतरत्र गेले म्हणून आनंद होणे म्हणजे आत्मभान नसल्याचे लक्षण आहे. कारण, देश म्हणून आपण अपयशी ठरतो, याची त्यांना कल्पना नसते. विचार करणे हेही लोकशाहीचे एक महत्त्वाचे अंग आहे, हे दुर्लक्षिले गेले आहे, कारण ते गैरसोयीचे आहे. त्यातून धार्मिक या आदीम ओळखीच्या दबावाखाली आत्मभान चिरडून टाकले जाते. त्यासोबत  चिरडला जातो तो चिकित्सकपणा आणि प्रश्न पडायला लावणारा वैज्ञानिक दृष्टीकोनही. म्हणूनच जेव्हा आपल्याला कोणी भारतीय व्यक्ती परदेशात मोठ्या पदावर पोहोचली किंवा तिने महत्त्वाचे संशोधन केले असे कळते, तेव्हा देश म्हणून आपल्या भावना आनंदाने अनावर होतात. मात्र त्याचबरोबर आत्मभानाचे, चिकित्सेचे दार बंद केले गेल्याने अशी व्यवस्था आपण आपल्या देशात अजून निर्माण करू शकलो नाही, याची लाज वाटत नाही.  

म्हणूनच कदाचित आपल्या देशाच्या लोकशाहीची चौकट धर्मनिरपेक्ष या वैशिष्ट्याभोवती प्रामुख्याने रचली गेली. सरकार हे कोणत्याही एका धर्माचे असणार नाही, तर ते धर्माचा कोणताही आधार न घेता कामकाज करेल. त्याच्यापुढे धर्माऐवजी कर्तव्याची चौकट असेल आणि समोर येणारी व्यक्ती ही देशाची नागरिक असेल. त्यामुळे न्यायालय, प्रशासन, संसद हे लोकशाहीचे स्तंभ धर्मनिरपेक्ष पद्धतीने काम करतील, अशी व्यवस्था आखली गेली.

मात्र गेली असंख्य वर्षे सरकारी कार्यालयांत हिंदू धर्माचे कार्यक्रम होताना आपण पाहतो. सरकारी कार्यालय ही जागा धर्मनिरपेक्ष असायला हवी, मात्र ती बहुतांशी केवळ एकाच एका धर्माच्या कार्यक्रमासाठी वापरली जाताना दिसते. महाराष्ट्राचा विचार केल्यास सत्यनारायणाची पूजा आणि गणपतीची प्रतिष्ठापना जवळपास सगळ्याच कार्यालयांत होते. त्या दिवशी सुट्टीचे वातावरण असते आणि तेथे जनतेची कामे करण्यासाठी नोकरी करणारे आणि त्या कामासाठी येणारे नागरिक त्या दिवशी काम होणार नाही, हे गृहीत धरूनच चालतात.

यात धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा बासनात गुंडाळला जातो. शिवाय, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या घटनेतील कलमाचाही भंग होत असतो. मात्र यातला मुद्दा असा आहे की, त्याबद्दल कोणी कधी आक्षेप घेत नाही. कारण, देशात बहुसंख्य हिंदू आहेत हे जसे हिंदू जाणतात, तसेच मुसलमानांनाही त्याची जाणीव आहे. अशा काही सांस्कृतिक आणि धार्मिक कारणास्तव काही गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते आणि त्याचा इश्यू बनवला जात नाही. अशी ही समंजसपणाची भूमिका अनेक संघर्ष टाळण्यासाठी उपयोगी पडलेली आहे.

बहुसंख्य हिंदू आणि मुस्लीम अशाच प्रकारे आवश्यक तेथे या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आपल्या आयुष्याकडे लक्ष देतात. असे असले तरी त्यामुळे लोकशाहीच्या काही अंगांचा भंग होतो आणि ती संकुचित होते, हे लक्षात घ्यायलाच हवे. लोकशाहीमध्ये धार्मिक अभिव्यक्तीची मुभा आहे, मात्र ती कुठे आणि किती याचे तारतम्य त्या-त्या समाजाच्या जाणिवेची पातळी ठरवते. मुसलमान मुल्ला-मौलवीच्या नादी लागला आहे आणि हिंदू कर्मकांड आणि अंधश्रद्धेच्या.

चिकित्सा करणे, प्रश्न विचारणे किंवा शंका व्यक्त करणे म्हणजे प्रगतीकडे जाणे नाही, तर अधोगती आहे असा समज आत्मभान नसले की होतो. शंका व्यक्त करणारा (स्केप्टिक) हा निराशावादी नसतो, तसेच प्रश्न विचारणारा विरोधक नसतो.

वैचारिक भूमिकेत शिरल्यानंतर एक मोठा पेच निर्माण होतो, तो म्हणजे मिळालेला मोकळा वेळ कसा भरून काढायचा? रोजच्या जगण्यात कर्मकांडे इतकी असतात, त्याचे कारणच ते आहे. ते करू नका असे सांगणे सोपे आहे; मात्र काय करा, हे कसे सांगणार? कारण वैचारिक भूमिका तुम्हांला कर्मकांडांपासून दूर नेते, रोजच्या दोन-चार तास भरून काढणाऱ्या या गोष्टींनी आयुष्याला अर्थ आल्याचा भास होतो. आणि ही भावना महत्त्वाची असते. कारण, आपल्या आयुष्यातील अर्थ संपला असे वाटल्यास व्यक्ती नैराश्याकडे जाते. त्यातून बाहेर येण्यासाठी कोणत्या तरी रीतीरिवाजाला वाहून घ्यावे लागते. हे रीतीरिवाज आणि कर्मकांडे वैचारिकदृष्ट्या कितीही निरर्थक असली, तरी त्यांतून अर्थप्राप्तीचा भास होतो. तो जगण्यासाठी पुरेसा ठरतो. उलट, वैचारिकपणा तुम्हांला उदास करणारा आणि सगळे काही निरर्थक असल्याच्या वैराण वाळवंटात आणून सोडणारा असतो. त्यावर उद्देशपूर्ण जगणे, एकट्याने आणि समूहासोबत आयुष्यात अर्थ निर्माण करणे, हे जीवनाचे मार्ग त्याच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. कर्मकांड आणि धर्माचे कवच हे माणसाला; जसे पशूला त्याच्या टोळक्यात असल्यावर वाटते, तशी सुरक्षा प्रदान करते.

तरी घटनाकारांनी वैज्ञानिक दृष्टीकोनाचा आग्रह धरला, जो मुळात धार्मिक प्रवृत्तीच्या विरोधात असतो. याचे कारण मला असे वाटते की, देशाची प्रगती ही वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्यात आहे, यावर तेव्हाच्या नेत्यांचा ठाम विश्वास असला पाहिजे. कोणताही दृष्टीकोन आपल्या वाणीत आणि आचरणात आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे नागरिक वेळोवेळी प्रश्न करतात. अभिव्यक्ती ही मुळात कुतूहल-प्रवृत्तीचा भाग आहे. प्रश्न पडायला लागले की, या अभिव्यक्तीला आकार येतो.

घटनाकारांना हेही माहिती असणार की, देशातील बहुसंख्य लोक धार्मिक असल्याने ते अंधत्वाकडेच जाऊ शकतील. अभिव्यक्तीचा अधिकार हा केवळ धार्मिक अंगातूनच व्यक्त होईल, अशी भीती त्यांना होती, असे असू शकेल. उदा. महाराष्ट्रात गाडगेमहाराज यांच्यासारखेही संत झाले. मात्र त्यांना किती अनुयायी होते वा आहेत हा संशोधनाचा विषय आहे. त्यांचे नाव सरकारी योजनेला देऊन त्यांना जिवंत ठेवावे लागते. मात्र निरर्थक वाक्ये आणि गांजेकसपणा, भणंगपणा या पलीकडे न गेलेल्या, जनतेसाठी काडीचेही काम न केलेल्या असंख्य बाबा-बुवांच्या नादी हजारो-लाखो लोक लागले आहेत आणि ते स्वत:ला अनुयायी म्हणवतात. वेगवेगळे दिवस वाटून घेऊन प्रवचने देत राहतात. साहजिक आहे, कारण गाडगेमहाराजांचे अनुयायी होणे म्हणजे स्वत: मैदानात उतरणे आहे, हातात झाडू उचलणे आहे. बाकीच्या ठिकाणी दानपेटीत पैसे टाकले की झाले, बाकी जबाबदारी काही नाही! डोकेही वापरावे लागत नाही. प्रश्न पडणे, विचारणे तर दूरच. याच मतदारांसाठी लोकप्रतिनिधी फुकट यात्रा ठेवतात, यात सगळे आले. अशाच प्रकारच्या पिरांच्या दर्ग्यावर मुसलमान गर्दी करतात. असे करणे धर्माच्या विरोधातील कृती आहे, हे माहीत असूनही ते धर्माच्याच नावाखाली ते करतात.    

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

गेल्या काही वर्षांत अभिव्यक्तीचा संकोच होत आहे असे म्हटले जाते, ते खरेच आहे. मात्र त्याला केवळ नवीन सरकार कारणीभूत आहे, हे मात्र खरे नाही. नागरिकांनी आधीच आपल्या अभिव्यक्तीचा परीघ संकुचित करून घ्यायला सुरुवात केली होती आणि सातत्याने करत आहेत. सरकारने त्याचा राजकीय फायदा उठवण्यासाठी या संकोचाला वेग दिला आहे. गाय ही माणसापेक्षा श्रेष्ठ आहे, हे सरकारने नाही ठरवले. तर लोकांच्या या आधीच जोपासलेल्या अडाणीपणाला राजकीय लाभासाठी वापरले गेले आणि देशात मुसलमानांचे ठेचून खून झाले तरी ते योग्य आहेत, असे मानण्याचे वातावरण निर्माण केले गेले. मात्र त्याची मानसिकता या वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या अभावामुळे आधीच निर्माण झालेली होती व आहे, आणि ही बाब रोजच्या जगण्याशी येऊन ठेपली आहे. यात होणारे नुकसान कोणालाही दिसत नाही. मुस्लीम मारले जात असल्याने ते निदान कळतात तरी, मात्र यात अनेक हिंदूंचे हळूहळू होणारे मृत्यू (स्लो डेथ) कोणीही नोंदवत नाही.

अलीकडेच मानसशास्त्रज्ञांनी आजच्या घडीला जगाला सावरण्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट कोणती, तर ‘बोलले गेले पाहिजे’ असे म्हटले आहे. आज समूहाच्या विरोधात बोलले जात नाही आणि कुरूप असले तरी ते आहे तसे जतन करण्याचे प्रयत्न सगळीकडे सुरू असताना बोलणे, व्यक्त होणे आवश्यक आहे. अनेक प्रकारच्या अभिव्यक्तीवर मर्यादा येण्याचे कारण, आपण अनेक विषय अवघड वाटल्याने बाजूला टाकले आहेत हे आहे. धर्माला लोकशाही संवादातून वजा केले गेले, त्यामुळे तो अधिक साचलेपणात कुजू लागला. अनेकांसाठी आपली सत्ता आणि सामाजिक वर्चस्व राखण्यास ही बाब महत्त्वाची वाटणे साहजिक आहे. मात्र त्यामुळे काही गोष्टींबद्दल कधीच बोलले जाऊ शकत नाही, याचे कारण आत्मभानाचा अभाव हे आहे.

आत्मभान असल्यास हे कळू शकते की, आपण आदिम काळात, जंगलात, गुहेत राहत नाही. आजचे जग वेगळे आहे आणि त्याच्या वेगळ्या व्यवस्था आहेत. हजारो वर्षांपूर्वी जो धर्म, समाज, समूह असेल; त्याच्याशी मतभेद असणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण होते. काही शतकांपूर्वी समाजमान्यतेनुसार व्यवहार नसणे म्हणजे बहिष्कृत आयुष्य जगणे होते. आता तसे नाही. आता कोणता व्यवसाय कोणी करावा, कोणी कसे राहावे, कोणते कपडे घालावेत, कोणत्या ठिकाणी राहावे, कसे आणि कोणाबरोबर,  कोणत्या जाती-धर्माच्या आणि लिंगाच्या व्यक्तीसोबत  राहावे या सगळ्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत. मात्र गावपातळीवर, वस्तीपातळीवर अजूनही समुदाय, धर्म, जात यांची जुनी ओळख जपण्यासाठीचा दबाव आहे. त्यातून आत्मभान, अभिव्यक्ती चिरडली जात आहे. सरकारपातळीवर काय खावे, काय खाऊ नये; काय पाहावे, काय पाहू नये, कोणी कोणाशी लग्न करावे असे निर्बंध आणून व्यक्तिगत अवकाश आकुंचित केला जात आहे.

कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा वाजल्याने समाजकंटक समूह; कोणी कुठे राहावे आणि राहू नये याचे नियम ठरवत असल्याने  प्रतिष्ठेने,  आत्मसन्मानाने आणि मनाजोगते जगण्याचे संकेतच बदलून टाकत आहेत. त्यातून, हे विषय रोजच्या जगण्यातील लोकशाहीशी संबंधित आहेत. लोकशाहीने आणि घटनेने याचीच हमी दिली होती, त्यामुळेच आपण स्वतंत्र झालो असे आपण जाहीर केले होते. मात्र त्याच मूल्यांचा गळा आवळला जात असल्याने हे स्वातंत्र्य मरतुकडे होऊ लागले आहे. 

अमेरिकेसारख्या प्रगत लोकशाही राष्ट्राकडे पाहिले तरी अजून लोकशाही आश्वासित करत असलेले समानतेचे तत्त्व पाळले जात नाही, असे दिसते. नॅथेनियल वूड्सला ठोठावलेला मृत्युदंड ही अलीकडची घटना आहे. तीन गोऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या गोळ्या झाडून झालेल्या हत्येला त्याला जबाबदार धरले गेले. मात्र त्याने बंदुकीचा ट्रिगरही ओढला नव्हता, गोळी झाडणे तर दूरच! अमेरिकेत जसे कृष्णवर्णीय, तसे भारतात मुस्लीम आणि दलित असतात. तेथे निदान त्यांच्यावर सिनेमे निघतात, प्रसारमाध्यमांतून चर्चा होते, येथे तेही नाही. तुरुंगात खटल्याविना डांबलेले सर्वाधिक कच्चे कैदी मुस्लीम आणि दलित आहेत. त्यांच्यावरील आरोप पाहिले तर, त्यांना खरोखरीच शिक्षा झाली असती, तर ते खूप आधी मुक्त झाले असते, हे लक्षात येते. परंतु प्रशासकीय लाचखोरीच्या व्यवस्था कोणतेही प्रश्न न विचारल्याने पुढे चालू राहिल्या आहेत, त्यात हीदेखील आहे. या लोकांना, त्यांच्या कुटुंबीयांना आणि ते जेथे राहत होते त्या वस्त्यांतील लोकांना लोकशाहीबद्दल काय वाटत असेल, हे अभ्यासून पाहायला हरकत नाही.  

आज जगभरातील दोनशेहून अधिक देश लोकशाहीच्या एका दृष्टीकोनातून पाहिल्यास असमानता, अप्रतिष्ठा यांनी भरलेले दिसतात. तसेच, अतार्किक अशा सीमारेषांनी ही जगे विभागलेली दिसतात. काही ठिकाणी अत्यंत पशुवत जीवन आहे, तर काही ठिकाणी जवळपास अत्यंत आदर्शवत, स्वर्गीय व्यवस्था आहेत. यात साधनांची असमानता निर्णायक आहेच, शिवाय साधनासोबत कोण किती व्यक्तिगत आणि सामूहिक मोकळीक देतात व कोण किती प्रगतीच्या दिशेने पाहतात, यातूनही भेदांचे जग निर्माण झाले आहे. आपण सगळे; साधने, प्रगतिशील दृष्टिकोन आणि व्यक्तिगत व सामूहिक स्वातंत्र्य या सगळ्या स्तरांवर एकत्र आणि एका समान पातळीवर येण्यासाठी अजून काहीशे वर्षे लागू शकतात. कारण, आपल्यात पशूचे अंश अजून आहेत आणि फक्त माणसात असलेल्या मेंदूच्या पेशी (निओ कॉर्टेक्स) अजून पुरेशा वापरल्या जात नाहीत. काही मानववंशशास्त्रज्ञांनी दाखवून दिल्यानुसार, देश ही संकल्पना प्राण्यांनी आखलेल्या क्षेत्रानुसारच आहे आणि सीमे-अलीकडील आणि पलीकडील यांच्यात शत्रुत्व असते. चिंपांझींची युद्धेही चार-चार वर्षे चालतात.    

रोजच्या जगण्यात लोकशाही अधिकाधिक आली तर ती अधिक मजबूत होईल, याची कल्पना नवीन व्यवस्थेत जुन्या पद्धतीचीच रचना करू पाहणाऱ्या सत्ताधीश,  समाजनेते यांना आहे. राजा आणि जनता यांच्यामध्ये त्यांनी जुन्या पद्धतीनेच  प्रधानजीची दरी आणली आहे. आणि जनतेच्या हाती असलेली ताकद कधीच मजबूत होऊ नये, अशी या राजाची इच्छा आहे. कारण, जनतेच्या हाती बळ आले तर ते हात आपल्या गळ्यापर्यंत नक्कीच येतील, याची त्यांना कल्पना असल्याने हे हात बळकट होऊ नयेत, अशीच त्यांची इच्छा आहे. म्हणूनच सर्वसामान्यांच्या रोजच्या जगण्यात ते विषय येऊ नयेत, असेच सगळे प्रयत्न असल्याने आत्मभानविरहित, शंकावादापलीकडील आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाबाहेरील गोष्टींत ते गुंतवून ठेवतात. अतिरेकी धर्म आणि संस्कृती यांचे विचार, डोळे, कान आणि मेंदू बंद करतात. 

मात्र आत्मभानाने भारलेल्या, शंकाप्रवृत्तीने बलवत्तर बनलेल्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने सक्षम झालेल्यांना एका चाबकाने नियंत्रणाखाली ठेवणे अशक्य असते. लोकशाहीची अभिव्यक्ती, आत्मप्रतिष्ठेसाठीचा सजगपणा, इतरांच्या अस्तित्वाची दखल घेणाऱ्या आत्मभानातून मिळणारे समाजभान हे जनतेला मुळातून मजबूत करणारे असते. लोकशाहीची मूल्ये एके काळी नेत्यांकडून खाली जनतेपर्यंत पाझरत. आता तशी आशा ठेवणे फोल आहे. त्यामुळे ती तळातून मजबूत होत वरपर्यंत पसरायला हवीत. त्यातूनच लोकशाही आश्वासित करत असलेले प्रतिष्ठित जीवन, भयमुक्त मन आणि एकसंध समान प्रगतीची फळे अनुभवता येतील.

..................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................

 

लेखक इब्राहीम अफगाण ‘कृषीवल’ दैनिकाचे संपादक आहेत.

ibrahim.afghan@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......