‘गॅस चेंबर’: भयप्रद भविष्याचे चित्रण करणाऱ्या ‘अनर्थकथा’ 
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
अक्षय शेलार
  • ‘गॅस चेंबर’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Wed , 29 September 2021
  • ग्रंथनामा शिफारस गॅस चेंबर Gas Chamber रत्नाकर मतकरी Ratnakar Matkari

“Hell is empty and all the devils are here.” — William Shakespeare

(“नरक रिक्त आहे आणि सर्व राक्षस येथे आहेत.” — विल्यम शेक्सपिअर)  

रत्नाकर मतकरी यांच्या मृत्यूपश्चात प्रकाशित झालेल्या ‘गॅस चेंबर’ या नवीन कथासंग्रहातील कथांमध्ये मृत्यूचे सावट, राजकीय-सामाजिक दडपशाही, नागरिकांवर पाळत ठेवणारी (सर्वेलन्स) सरकारे व खाजगी कंपन्या, अशा बऱ्याचशा गडद संकल्पनांचे अस्तित्व आहे. या कथासंग्रहातील जवळपास सर्वच कथा या ‘डिस्टोपियन’ (जेथील सर्व गोष्टी अत्यंत वाईट असतात अशी एक काल्पनिक जागा) म्हणाव्यात, अशा आहेत. त्या ज्या काळात घडतात, तो काळ काहीएक प्रमाणात पुढेमागे होत असला तरीही प्रत्येक कथेतील विश्वनिर्मिती आणि कथेत घडणाऱ्या गडद छटा असणाऱ्या घटना या डिस्टोपियाकडे सूचना करणाऱ्या आहेत. ज्यात नजीकच्या भविष्यकाळातील गडद कथानके पाहायला मिळतात. 

‘गॅस चेंबर’ ही शीर्षक कथा, ‘अलीकडे त्यांच्या हत्या नाही करत!’ आणि ‘ना बजेगी बाँसुरी’ या कथांमध्ये काही समान धागे आहेत. या कथा सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक दडपशाही असणाऱ्या काळात घडतात. आणि अशा अस्थिर काळात साहित्य आणि वृत्तपत्रांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होत असते. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक अधिकारशाही गाजवू पाहणाऱ्या सत्ताकेंद्रांना आणि सर्वशक्तिमान व्यक्तींना साहित्य, वृत्तपत्रे यांसारख्या माध्यमांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे वाटते. या कथा साधारणतः अशाच वातावरणात घडतात.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

‘गॅस चेंबर’ या कथेमध्ये भारतातील सरकार गेल्या काही वर्षांत इतिहासाची सोयीस्कररीत्या मांडणी करत आहे. जुनी ऐतिहासिक पुस्तके आणि दस्तावेज नष्ट करून नवीन इतिहास रचणे, नव्याने रचलेला इतिहास क्रमिक पुस्तकांमध्ये समाविष्ट करणे यासारख्या घटना या कथेतील विश्वात (खुद्द सरकारी यंत्रणेकडून) घडवून आणल्या जात आहेत. त्यासाठी ‘भारतीय इतिहास संस्करण संस्थान’ या नावाची वेगळी संस्थाच उभारण्यात आलेली आहे! या कथेतील मध्यवर्ती पात्रं अशा जाचक वातावरणात आपले स्वातंत्र्य आणि मुख्य म्हणजे इतिहासाच्या पाऊलखुणा टिकवण्याची धडपड करताना दिसतात.

‘अलीकडे त्यांच्या हत्या नाही करत!’ या कथेमध्येही पुस्तकांवर बंदी आणणे, ती नष्ट करणे; नाटकासारख्या कलाकृतींवर (विशेषतः त्यातील कलाकारांवर) नियंत्रण ठेवणे, सामाजिक-राजकीय लेखक आणि विचारवंतांवर दडपण ठेवणे यांसारख्या घटना घडतात.

तर, ‘ना बजेगी बाँसुरी’मध्ये माहिती अधिकार कायद्याचा वापर करणाऱ्या एका पत्रकारावर त्याने मोठा घोटाळा उघडकीस आणू नये, यासाठी राजकीय दबाव आणण्याचे प्रयत्न होत असतात. या तिन्ही कथांमध्ये घडणाऱ्या घटनांमध्ये सत्ताधिशांना आणि त्यांचं साटंलोटं असणाऱ्या खाजगी व्यावसायिकांना छापील मजकुराची वाटणारी भीती प्रतिबिंबित होते. 

‘रश्शीवाला’ या कथेत वास्तवातील खरेखुरे संदर्भ आणि अद्भुताची गुंफण केली जाते. एका विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या छोट्या, सहजासहजी सोडवता येईल, अशा समस्येला राजकीय व धार्मिक रंग दिला जातो. राजकीय पक्ष (विद्यार्थी संघटनांना हाताशी घेऊन) राष्ट्रवाद आणि देशप्रेमाच्या नावाखाली राजकीय व जातीय तेढ वाढवण्यात जी धन्यता मानतात, त्यावर या कथेचा डोलारा उभा राहतो. तर, ‘सुरक्षित’ या कथेमधील विश्वात दहा-बारा वर्षांपूर्वी समाजात बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यानंतर सरकारने बलात्कारांच्या प्रमाणात घट व्हावी, यासाठी स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर बंधने आणली, जी आजतागायत कायम आहेत. स्त्रियांनी नोकऱ्या करण्यावर निर्बंध लादणे, संध्याकाळी सहानंतर स्त्रियांना रस्त्यावर फिरण्यास मज्जाव, इत्यादी अनेक नियम या जगात अस्तित्वात आहेत. मात्र, अशा निर्णयांमुळे स्त्रियांचे आयुष्य अधिक सुखकर झाले की, स्त्री-पुरुषांमधील दरी अधिकच वाढत गेली, हा प्रश्न कायम आहे. 

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा.  खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

..................................................................................................................................................................

‘सर्वेसर्वा’ आणि ‘डोरोथीची गोष्ट’ या कथांची मांडणी रूपककथेच्या प्रकारात मोडणारी आहे. ‘सर्वेसर्वा’ या कथेचं नाव सुचवतं त्याप्रमाणे ही कथा एका सर्वशक्तिमान नेत्याबाबत आहे. सर्वेसर्वाचा पक्ष हा देशातील एकमेव पक्ष उरलेला असून गेल्या काही वर्षांत त्याने व त्याचा उजवा हात असणाऱ्या व्यक्तीने देशाला प्रगतीपथावर नेऊन ठेवले आहे. मात्र, हे करत असताना त्यांना अनेक लोकांचे शिव्याशाप लाभले आहेत. या कथेत साधारणतः अशाच लोकांच्या आठवणी सर्वेसर्वाला हॉन्ट करत आहेत. लोकशाही ते एकाधिकारशाही असा प्रवास, नैतिक मूल्यांचा ऱ्हास, सर्वेसर्वाचा आपण काहीतरी महान कार्य करत आहोत हा भ्रम, असे अनेक मुद्दे या कथेतून समोर येतात.

‘डोरोथीची गोष्ट’मध्ये खरे तर ‘द विझार्ड ऑफ ओझ’ या प्रचलित कथेची पुनर्मांडणी केली जाते. या दोन्ही कथा वास्तवाऐवजी रुपकं व प्रतीकात्मक मांडणीवर अधिक लक्ष केंद्रित करणाऱ्या आहेत. प्रतीकात्मक मांडणी ही ‘रश्शीवाला’ या कथेतही असली तरी तिथले कथाविश्व वास्तववादी तऱ्हेचे आहे. याउलट ‘सर्वेसर्वा’ आणि ‘डोरोथीची गोष्ट’ या कथांमधील विश्वं कल्पनारम्यता आणि अद्भुतावर अधिक भर देणारी आहेत. वास्तववादी मांडणीपासून फारकत घेतल्याने असेल, पण या दोन कथा संग्रहातील इतर कथांच्या तुलनेत काहीशा कमी प्रभावी वाटतात. 

या संग्रहातील कथांमधील वातावरण निर्मिती फारच उद्बोधक आहे. कथांमधील वर्णनातून कथेच्या विश्वातील सामाजिक-राजकीय अस्थैर्य, पात्रांच्या मनातील अस्वस्थतेची भावना यासारख्या बाबी ठळकपणे चितारल्या जातात. उदाहरणार्थ, ‘अलीकडे त्यांच्या हत्या नाही करत!’सारख्या कथेमध्ये मध्यवर्ती पात्राच्या सभोवतालात वाढत असलेल्या मंदिरांचा केलेला वापर फारच सूचक आहे. ही सूचकता गेल्या काही वर्षांत वाढलेली देवळांची संख्या, जागोजागी दिसणाऱ्या देवळांतून येणारा आवाज, लोकांनी नोकरीवरून घरी न जाता थेट मंदिरात जमण्याच्या घटना अशा अनेक तपशिलांतून येते.

शिवाय, या आणि इतरही कथांमध्ये धार्मिक असहिष्णूता, धार्मिक व जातीय तेढ या संकल्पना अस्तित्वात आहेत. या पार्श्वभूमीवर या कथेतील देवळांच्या वाढत्या संख्येचा आणि त्यानुषंगाने येणाऱ्या इतरही घटनांचा उल्लेख फारच महत्त्वाचा ठरतो. कथा डिस्टोपियन असल्याने समकालीन जगापासून संदर्भ घेणारे, तरीही बऱ्याच अंशी वेगळे असणारे कथाविश्व निर्माण करण्यात, या वर्णनांचा आणि तपशिलांचा महत्त्वाचा वाटा आहे. 

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

.................................................................................................................................................................

या सर्व कथांमध्ये वर्तमानकाळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ या तिन्हींचा एक संबंध जोडता येतो. कारण, बहुतांशी कथांची सुरुवात होते तेव्हा भूतकाळात बऱ्याच गोष्टी घडून गेलेल्या दिसतात. ज्यात हुकूमशाही, एकाधिकारशाही गाजवणारी सरकारे, खाजगी व्यावसायिकांचे सत्ताधीशांशी असलेल्या संबंधांमुळे घडून येणाऱ्या अनैतिक गोष्टी, सांस्कृतिक-धार्मिक स्तरावरील असहिष्णू वातावरण अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो.

याखेरीज हा आंतरसंबंध केवळ लिखाणातील विश्वापुरता मर्यादित नसून पुस्तकाबाहेरील जगाशीही नाते सांगणारा आहे. कारण, पुस्तकांवरील बंदी आणि ती जाळण्याच्या घटना, सिनेमा-नाटकांवरील बंदी, विचारवंतांना राजकीय कैदी म्हणून डांबून ठेवणे, यांसारख्या घटना सदर पुस्तकाबाहेरील विश्वातही घडल्याचे आपण वेळोवेळी पाहिलेले आहे. इतिहासात आणि वर्तमानातही अनेक देशांतील सरकारांनी इतिहासाचे पुनर्लेखन केल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादाच्या नावाखाली देशाच्या कौतुकाचे पोवाडे गाण्याच्या आविर्भावात खरे तर सत्य आणि असत्यामधील रेषा पुसट करण्याचे प्रयत्न केले जाणे आपल्याला नवीन नाही. त्यामुळे अशा घटनांभोवती कथानके विणत रत्नाकर मतकरी सामाजिक-राजकीय आशय मांडताना दिसतात. कथासंग्रहातील कथा या नजीकच्या भविष्यकाळात घडत असल्या तरी त्यात वर्तमानाचे प्रतिबिंब पाहता येणेही सहज शक्य आहे. ज्यात या कथांमध्ये कुणाही विवेकी व्यक्तीच्या मनातील दुःस्वप्ने प्रत्यक्षात उतरताना दिसतात. 

‘गॅस चेंबर’ या कथासंग्रहातील सातही कथा लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या शेक्सपिअरच्या वाक्याची प्रचिती देणाऱ्या आहेत. राजकीय, सामाजिकदृष्ट्या येणाऱ्या काळात समाज म्हणून आपण कुठल्या दिशेने प्रवास करत आहोत, हे मांडणाऱ्या या कथा वैश्विक स्वरूपाच्या आहेत. (असे असले तरी त्यांतील स्थानिक व देशपातळीवरील संदर्भांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.) इंग्रजी साहित्यात ‘डिस्टोपियन साहित्य’ आणि चित्रपटांची मोठी परंपरा आहे. भारतात मात्र या दोन्ही कलांमध्ये अशा प्रकारच्या कलाकृतींची कमतरता आहे. तशी ती कमतरता मराठी साहित्यातही जाणवते. या संग्रहात समाविष्ट असलेल्या कथा रत्नाकर मतकरींनी अलीकडील काळात (२०१५ ते २०१९ दरम्यान) लिहिलेल्या आहेत. त्यामुळे ‘गॅस चेंबर’ या कथासंग्रहात या कथा एकत्रितपणे प्रकाशित होणे, हे समयोचित तर आहेच, पण त्याचबरोबर मराठी साहित्यातील ‘डिस्टोपियन’ कलाकृतींच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. 

‘गॅस चेंबर’ - रत्नाकर मतकरी

समकालीन प्रकाशन, पुणे

मूल्य - २०० रुपये

..................................................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार चित्रपट अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......