‘न्हांगूळ आदार ईला!’ : भटक्यांना आत्मभान देणारी कविता
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
हंसराज जाधव
  • ‘न्हांगूळ आदार ईला!’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Fri , 27 August 2021
  • ग्रंथनामा शिफारस न्हांगूळ आदार ईला! संजय बालाघाटे Sanjay Balaghate भटके विमुक्त Bhatke Vimukta

ब्रिटिश काळापासून दैन्य, दारिद्रय वाट्याला आलेल्या भटक्या-विमुक्तांच्या अनेक जाती स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही खितपत पडल्या आहेत. त्यांच्या माथी मारलेले चोर, लुटारूचे शिक्के आणि त्यांच्या पुढ्यात वाढून ठेवलेले भिकारपण आजच्या ग्लोबल दुनियेतही गळून पडलेले नाही. त्या भिकारपणाला लाथाडत समतेचा नवा सूर्य हाती घेण्याची हाळी देणारी कविता म्हणजे प्रा. संजय बालाघाटे यांचा ‘न्हांगूळ आदार ईला’ हा कवितासंग्रह.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

बालाघाटे हे मराठवाड्यात भटक्या-विमुक्तांची चळवळ नेटाने चालवणारे क्रियाशील कार्यकर्ते आहेत. पारधी, वडार, मसनजोगी, गोंधळी, वासुदेव, शिकलकरी, वैदू, कैकाडी, घिसाडी, माकडवाले, जोशी इत्यादींच्या प्रश्नांना उजागर करत त्यांच्या समस्या जाणून घेणे, प्रत्यक्ष पालावर जाऊन त्यांच्या व्यथा, अडचणी समजून घेणे, त्यासाठी आंदोलने करणे, मोर्चे काढणे, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जाहीरपणे निषेध नोंदवणे, पत्रके काढणे, चाबकाने फटकारे ओढून घेत शासनाचे लक्ष्य वेधून घेणे, असे संवैधानिक कृती-कार्यक्रम राबवून भटक्यांची मोट बांधण्याचा यशस्वी प्रयत्न बालाघाटे गेल्या दहा वर्षांपासून करताहेत. त्या सगळ्या प्रत्यक्ष कृतीला आधारभूत असलेल्या तत्त्वचिंतनाचे दस्ताऐवजीकरण म्हणजे ही कविता होय.

स्वातंत्र्य कोणाचे

‘न्हांगूळ आदार ईला’ म्हणजे ‘आम्हाला आधार नाही’. ही कविता ‘स्वातंत्र्य कोणाचे?’, असा प्रश्न विचारते. भटके ना एका ठिकाणाचे असतात, ना एका गावाचे. त्यांना ना सातबारा आहे, ना आधार, ना मसनवटा आहे, ना रेशनकार्ड. आपण या देशातले रहिवासी आहोत, असा कुठलाही पुरावा त्याच्याकडे नाही. त्यामुळे त्याची उद्विग्नता बाहेर येते. देशाला मिळालेलं स्वातंत्र्य आणि घटना ही आमच्यासाठी नाहीच, हा त्याचा होरा अनाठायी वाटत नाही. ब्रिटिश गेल्यानंतर मिळालेल्या तथाकथित स्वातंत्र्याला तो ‘भोंगळे स्वातंत्र्य’ आणि ‘चारित्र्यहिनांनाही पवित्रता बहाल करणारे स्वातंत्र्य’ असे म्हणतो.

स्वातंत्र्याविषयी म्हणूनच तो परभाव व्यक्त करतो-

१५ ऑगस्ट १९४७

आमच्यासाठी नाहीच!

आम्हाला वगळून दिलं स्वातंत्र्य

गावांना, गावकुसांना अन् जंगलांनाही

शेतकरी, दलित, आदिवासी यांना ज्या स्वातंत्र्यात स्थान आहे, त्यात भटक्यांना मात्र न वर्ण करून बेदखल केलं गेलंय. म्हणूनच तो ओरडून पुन्हा पुन्हा सांगतोय,

स्वातंत्र्याचं झालं काय?

आमच्यापर्यंत आलंच नाय!

स्वातंत्र्यानंतरही आम्हाला नाकारणारे अनेक स्टिफन होतेच. जे आजही रूतून बसलेत काळजात.

पालातल्या लोकांच्या वाट्याला येणारे रोजचे मरण कवीला अस्वस्थ करते. दिवसभर कष्टाची कामं करून रातच्याला मिळंल ते खाऊन भुईला अंग टाकू म्हटलं की, पोलीस चोर म्हणून फुकट मारतात. धड जगूही देत नाहीत, ना मरूही देत नाहीत.

देश नावावर करण्याची विजिगिषू वृत्ती

व्यवस्थेने आपल्याला नाकारले असले तरी त्या सगळ्यांना ठोकरून परिवर्तन करण्याचा एक दुर्दम्य आशावाद कवीच्या ठाई भरून उरलाय. ज्या देशाच्या सातबाऱ्यावरच आपली नोंद नाही, तो देशच आपल्या नावावर करण्याची भाषा तो करतो. हे करत असताना तो चळवळीतल्या कार्यकर्त्याला, पर्यायाने भटक्याला त्याच्या सामर्थ्याची जाणीव करून देतो-

अरे माझ्या दोस्ता

तू नि:शस्त्र नाहीस!

फक्त हातांच्या बोटांची मूठ कर

एका सुरात रणभेदी आवाज दे

अन् हा देश अर्धा नावाने कर.

तो वारंवार दडपलेल्या लोकांमध्ये, पिचलेल्या वंचितामध्ये हवा भरण्याचं काम करतो. माणसासारख्या माणसाला षंड बनवणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध बंड करण्यासाठी चेतावणी देतो.

दोस्ता!

आता तुला पण आरशात

पाहायला शिकावे लागेल

अस्तित्वाला पुन्हा नव्याने

इथे तासावे लागेल...!

व्यवस्थेविरुद्ध बंड

ज्या समाजव्यवस्थेने भटक्यांच्या जगण्यात अंधार पेरला, युगानुयुगे आम्हाला गलिच्छ ठरवलं, त्या व्यवस्थेला कवी जाब विचारतो, प्रश्न विचारतो.

आम्हाला तुझ्या चौऱ्यांऐंशी लक्ष

योनीतून मुक्तता नाही का कधी?

हा भिकार जन्म कशामुळे?

ही काळोखातली पालं बिऱ्हाडं

कशामुळे आमच्याच वाट्याला?

ही सर्वंकष नग्नता

का लादलीस माझ्या जिंदगीत?

त्याचा हा टाहो भेदरट नि याचक स्वरातला नाही. तर तो व्यवस्थेला घाम फोडणारा, छिन्नीचे घाव घालणारा आहे. या व्यवस्थेने भटक्यांना जणू नामर्दच बनवून टाकल्याची तक्रार तो करतो.

सर्जन निर्माणाचे सोहळे

साजरे करणारे मर्दच

ठेवले नाहीस तू पालात.

कवीला ठाऊक आहे ही काळोखाची गुफा आहे, तरी तो मोठ्या हिमतीने ती खोदत आहे.

महापुरुषांच्या विचाराचा नि कार्याचा भक्कम पाठिंबा

ही काळोखाची गुफा खोदण्याचं बळ त्याच्या अंगी कुणाच्या बळावर येतं? अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे आणि वंचितांना हक्क मिळवून देण्यासाठी स्वतःचं आख्खं आयुष्य पणाला लावणारे महापुरुष आणि त्यांचे कार्य अशा वेळी त्याच्या मदतीला धावून येते. बालाघाटेची कविता डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छ. शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, उमाजी नाईक, डॉ.दाभोळकर यांच्याशी संवाद साधत त्यांच्या कार्याशी तादात्म पावते. नव्हे त्यांचे कार्य नि शिकवण हाच आधार मानते.

नवा गोंधळ

या कवितासंग्रहातून कवी ज्या भटक्यांचे जगणे चित्रित करतो, त्यांचे पारंपरिक रचनाप्रकारही हाताळतो. वासुदेवाचे गाणे, गोंधळ्यांचा गोंधळ तो नव्याने घेऊन येतो. हा गोंधळ देवीचा नसून तो जागतिकीकरणाचा आहे, खाजगीकरणाचा आहे, स्वातंत्र्याचा आहे. लोकशाहीत सर्वदूर चाललेला गोंधळ कुणालाच खपणारा नाहीय. त्या गोंधळाविरुद्धची सर्वसामान्यांच्या मनातली चीड कवीने या आधुनिक गोंधळातून मुखर केली आहे. ग्लोबल राजाचा गोंधळ तो अशा पद्धतीने मांडतो-

ठोकशाही माते गोंधळा ये

मतदार राजा गोंधळा ये....

समता रांडं गोंधळा ये....

छिनाल बंधुता गोंधळा ये.....

खाजगीकरणाचं आख्यान पारंपरिक ‘जांभुळाख्याना’पेक्षा लई भारी असल्याचं कवी उपरोधिकपणे मांडतो.

चळवळ म्हणजे हत्यार

पुरातन काळापासून लादलेली गुलामी, चोर असल्याचा ठपका, कुठल्याच प्रकारचा नसलेला स्थायी आसरा, यातून बाहेर पडत नव्या युगाची सुरूवात करायची असेल तर चळवळ हेच मोठे हत्यार आहे. चळवळ हीच वंचितांचे हक्क मिळवून देऊ शकते, याची कवीला कल्पना असल्यानेच चळवळीला तो ‘नितळ झरा’ असे म्हणतो.

चळवळ म्हणजे असतो नितळ झरा

मुक्या व्यथा, वेदना, वंचना

दुःख आणि प्रष्नांना

आत्मस्वर देत प्रवाहित करणारा

आपल्या व्यथा, वेदनांना मुखर करणारी चळवळ म्हणूनच त्याने जिवापाड जपली आहे. ती त्याने कुणापुढे अनाठाई झुकवली नाही. कोणतीही चळवळ घ्या, ती पोफावत असताना नाही म्हटले तरी ती चळवळ मोडून काढणाऱ्यांची एक लॉबी समांतरपणे काम करत असते. पण कवी भटक्यांची चळवळ चालवताना ती कुणापुढे झुकणार नाही, याची काळजी घेत असल्याचे आवर्जून नोंदवतो. त्याला आपण भटके असल्याचा ना खेद आहे, ना दुःख. त्यामुळे बिनदिक्कतपणे तो रस्त्यावर उतरतो, आंदोलन करतो. एकार्थाने कायदेभंग करतो. परंतु त्या गुन्ह्यांची कबुलीही देतो.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

सूर्याची पिल्ले पकडण्याची भाषा

त्याची चळवळीवर ठाम निष्ठा आहे. आपले ध्येय साध्य करण्यासाठी सगळी संकटं झेलावी लागतील, जीव संकटात टाकून उड्डान मारावी लागेल, याची जाणीव असल्यामुळेच सूर्याची पिल्लं पकडण्याची, सूर्यालाच उजेड देण्याची भाषा तो करतो.

सूर्याची पिल्लं पकडताना

अंग भाजणारच आहे....!

आपल्या हाती असलेल्या उजेडाचे दान तो थेट सूर्यालाच देण्याची भाषा करतो आहे-

हातामधी माझ्या

सूर्याची ही पिल्ले

अखंड ही किल्ले

फोडू या रे

अंग पोळून निघाले तरी चालेल, परंतु सूर्य हातावर घेऊन काळोखाला भेदण्याची त्याची दुर्दम्य इच्छाशक्ती अफलातूनच म्हणावी लागेल.

ग्रंथ आणि शस्त्र हाती

या लढाईत तो प्रचंड आत्मविश्वासानं उतरला आहे. त्याला माहीत आहे ही लढाई सोपी नाही. नवं घर बांधायचं असेल तर लढावे लागेल, स्वतःसोबत इतरांनाही सांधावं लागेल याची त्याला जाणीव आहे. हे सर्व करत असताना त्याच्या एका हाती शस्त्र असले तरी दुसऱ्या हाती ग्रंथ घेण्याचे भान त्याला आहे. जोपर्यत कोणत्याही चळवळीला शिक्षणाचा, ज्ञानाचा आणि पुस्तकाचा संदर्भ असणार नाही, तोपर्यंत ती चळवळ योग्य मार्गावर असणार नाही. आणि म्हणूनच तो समतेचा अभंग गाताना-

एका हाती ग्रंथ

दुजा हाती शस्त्र

समतेचे वस्त्र

विणतो मी

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

सगळ्या भटक्यांनी एक होण्याचे आवाहन

या सगळ्या लढाईत भटक्या विमुक्तामध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्वच म्हणजे सरकार दफ्तरी नोंद असलेल्या मूळ बेचाळीस जमातींनी एकत्र येण्याचे आवाहन तो संग्रहाच्या शेवटी करताना दिसतो-

बेचाळीस तुकड्यांना जोडून

तुला अन् मला

गोधडी शिवली पाहीजे!

कारण बेईमान ऋतुत

तिच्या उबेचा आधार होईल!

या जमातींनी एकत्र आल्यावर जी उब निर्माण होईल, तिचा येणाऱ्या बेईमान ऋतुच्या काळात मोठा उपयोग होईल. म्हणून सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारला पाहिजे, अशी आशा तो व्यक्त करतो.

‘न्हांगूळ आदार ईला!’ – संजय बालाघाटे,

काव्याग्रह प्रकाशन,

मूल्य १४० रुपये.

..................................................................................................................................................................

लेखक हंसराज जाधव पैठणच्या ‘प्रतिष्ठान महाविद्यालया’मध्ये सहाय्यक प्राध्यापक आहेत.

hansvajirgonkar@gmail.com      

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......