तांबोळी शवविच्छेदन करावं, तसा एकेक मुखवटा उतरवण्यास सुरुवात करतात, तेव्हा वरवर आलबेल भासणारी जीवनपद्धती आतून किती पोकळ झाली आहे, याची जाणीव होते!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
जीवन तळेगावकर
  • ‘गिरकी’, ‘उसंतवाणी’ आणि ‘थट्टा मस्करी’ या पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Fri , 11 June 2021
  • ग्रंथनामा शिफारस रवींद्र तांबोळी Ravindra Tamboli गिरकी Giraki उसंतवाणी Usantvani थट्टा मस्करी Thatta Maskari

डॉ. रवींद्र तांबोळी यांचे आजवर तीन विनोदी लेखसंग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘गिरकी’ आणि ‘उसंतवाणी’ हे डिंपल पब्लिकेशनने प्रकाशित केले आहेत आणि ‘थट्टा मस्करी’ हा पद्मगंधा प्रकाशनाने.

एक विनोदी लेखक ही त्यांची प्रतिमा मराठी साहित्यजगतात आहे. वेगवेगळ्या दर्जेदार दिवाळी अंकांतून आणि वर्तमानपत्रांच्या स्तंभलेखनातून त्यांचे लेख वाचकांसमोर येत असतात. त्यांना विनोदाचा बहिरंगी स्पर्श असतो, पण त्यांचं अंतरंग गंभीर असतं.

मराठी साहित्याला विनोदी लेखकांची समृद्ध परंपरा आहे. आपल्याला त्यातील अग्रगण्य नावं ठाऊक असतात. १९९०नंतर दूरदर्शनच्या चढत्या-वाढत्या प्रभावामुळे साहित्यातला विनोद छोट्या पडद्यावर आला आणि त्यात आमूलाग्र बदल झाला. त्याच वेळी मराठी सिनेमांतून उथळ-वावदूक विनोद प्रेक्षकांसमोर येत राहिला. मराठी रंगमंचदेखील याला अपवाद राहिलेला नाही. सगळीकडे ‘फार्स’ ओसंडत राहिलाय. मराठी माणसू वाचू कमी आणि पाहू जास्त लागला. एकूणच समर्थांनी म्हटल्याप्रमाणे ‘टवाळा आवडे विनोद’ या पातळीपर्यंत तो संक्रांत झाला.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

तांबोळींचा विनोद वेगळ्या जातकुळीचा, वाचकाला अंतर्मुख करणारा आहे. तो उत्प्रेरक (कॅटॅलिस्ट) आहे. गंगाधर गाडगीळांच्या ‘खडक आणि पाणी’मधील भाषेचा संदर्भ घेऊन सांगायचं तर, तांबोळी यांचा विनोद साधा आहे, पण सोपा नाही. सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, न्यायिक, प्रशासनिक व राजकीय संदर्भांची प्रगल्भ अभिव्यक्ती त्यांच्या लेखनाचा स्थायीभाव आहे. ‘गिरकी’ या त्यांच्या लेखसंग्रहाला डॉ. महेश केळुसकर यांची प्रस्तावना आहे.

मी इंजिनीअरिंगला शिकत असताना काही हिंदी भाषक मित्र मराठी वाचण्याचा प्रयत्न करत हौशी वाचक झाले होते. त्याचं मला कौतुक वाटायचं; कारण ज्या जिज्ञासेनं त्यांनी मराठी वाचन केलं, त्या जिज्ञासेनं त्या काळात आम्ही हिंदी वाचन केलं नाही. त्यामुळे त्यांच्या नव-शिक्षित मराठीला नावं ठेवण्याचा आम्हाला काहीही नैतिक अधिकार नव्हता. पण आमचे मराठी मित्र त्यांना ‘पुलं’ची पुस्तकं भेट द्यायचे. तेव्हा मात्र वाटायचं- ‘यांना यातील खरंच काही कळत असेल का?’

विनोद अभिधार्थापेक्षा लक्षणा व व्यंजना या शब्दांच्या द्विविधा शक्तींच्या आश्रयानं अधिक राहतो. तेच मला ‘गिरकी’त गवसलं.

तांबोळी यांचं वाचन अफाट आहे. एका परिच्छेदात ते कितीतरी संदर्भ देऊन जातात. त्यांचा परीघही मोठा असतो. अगदी याज्ञवल्क्यांच्या ‘शतपथ ब्राह्मणा’पासून स्पेक्ट्रम घोटाळ्यापर्यंत किंवा तत्सम. विनोदी साहित्य वाचत असताना आपल्याला एका साच्याची सवय जडलेली असते, तो इथं सापडत नाही. ‘लाईफ इज नॉट अ स्ट्रेट लाईन’ म्हणतात, त्याचं प्रामाणिक प्रकटीकरण करताना हा लेखक वाचकाला कायम हिंदोळत ठेवतो. वाचक एखाद्या ‘बंजी जंपर’सारखा वेगवेगळ्या उंचीवरून दिसणारे संदर्भ शोधण्यात व्यग्र राहतो. क्वचित बरीच वाक्यं त्यातील मेख पकडण्यासाठी दुसऱ्यांदा वाचावी लागतात. त्यापुढचा प्रवास उपरोधिक अन्वय शोधण्याचा. तो तर ‘आस्वादक समीक्षा : एका काव्यसंग्रहाची’, ‘सारस्वतांनो, आता ग्लोबल व्हा’, ‘आमचे इंद्रव्रत’ वगैरे लेखांतून कायम करावा लागतो. त्यांच्यातला कवीदेखील जागोजागी ‘कमी शब्दांत मोठा अर्थ भरण्याची’ किमया दाखवून जातो. विशेषतः लेखांचं शीर्षक हे त्यांचं मर्मस्थान.

सामाजिक वास्तवावर आधारित भाषितं आणि त्यांची परिवर्तनात्मक विनोदी संस्करणं ही तांबोळी यांच्या लेखणीची शक्तीस्थानं आहेत. विनोदाच्या लेपातूनही ठसठशीतपणे बाहेर डोकावणारे वळ त्यांच्या लेखणीची ताकद दर्शवून जातात.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

‘उसंतवाणी’ या संग्रहात उपाख्य शे.भ.प. (शेती भक्ती परायण) थंडा महाराज देगलूरकर या टोपणनावानं तांबोळी विनोदी निरुपण करणारी संहिता घेऊन आले आहेत. यात त्यांच्या लेखणीचे फटकारे हसवणारे व रुसवणारे आहेत. कारण ते व्यंगबदाद्दर आहेत. व्यंग आहे म्हणून हसणारा माणूस, ते जर उजागर झालं तर रुसतो. व्यंग्यार्थ शोधणं सोपं नाही. आणि ते गवसल्यावर ‘हे व्यंग एक माणूस म्हणून आपलंच हसं करणारं आहे’, याची जाणीव होऊन ते पचवणंही सोपं नसतं. पण जेव्हा तांबोळींसारखा लेखक शवविच्छेदन करावं तसा एक एक मुखवटा उतरवण्यास सुरुवात करतो, तेव्हा वर-वर आलबेल भासणारी जीवनपद्धती आतून किती पोकळ झाली आहे, याची अप्रतीत जाणीव होते.

हाच अनुभव प्रशासकीय यंत्रणा किती पोखरली गेली आहे, याचीही जाणीव करून देतो. विचारवंतांच्या सामाजिक मनातील दाह दृगोचर करणारा हा लेखसंग्रह आहे. त्याला विनोदाचं पॅकेजिंग आहे. मुखवट्यामागचा विद्रूप चेहरा पोळणाऱ्या वास्तवाच्या रूपानं समोर येतो. विनोद व गांभीर्य या ‘बायपोलर कंटिन्यूअम’मधील मानवीय आंतरनाद मला एक वाचक म्हणून भावला. म्हणून ‘हसवणं व रुसवणं या दोन्ही ध्रुवांना समर्थपणे अभिव्यक्त करणारी लेखणी’, असा उल्लेख करावसा वाटला.

कोणताही लेख वाचा, अवतरणांच्या तळाशी किती सूक्ष्मपणे एकेका गोष्टीचा विचार केला आहे, हे स्पष्ट दिसतं. त्याला विचारपटाच्या दृष्टीनं गोष्टीचा कॅनव्हास तयार करणं म्हणू हवं तर… ‘बॉटम्स-अप अप्रोच टू स्टोरीटेलिंग’ असं मी व्यवस्थापनशास्त्राच्या भाषेत म्हणेन. असं डिझाईन सर्जनशीलतेच्या पातळीवर नेऊन बसवणं अवघड काम असतं. तो पिंड असावा व पोसावाच लागतो, उसणवार मिळत नाही.

अनेक दिवाळी अंकांत तांबोळी यांचे लेख असतात. ते वाचताना दंभदर्शी विनोदी पिंडाची जाणीव होते म्हणून हा विचार येतो. ते सहजपणे लिहिणारे लेखक नाहीत. त्यांच्या लिखाणास वैचारिक बैठक आहे. त्यामुळे विनोदाचं वेष्टण बाजूला सारून वैचारिक बैठक समजून घेणं हे आक्रोड खाण्यासारखं आहे, पहिल्यांदाच खाणाऱ्यानं ‘वा!’ म्हणून तोंडात टाकावा व अडून बसावा! मग अनुभवी माणसानं त्याला ‘अरे, गंमत तर आतच आहे, थोडे प्रयत्न करून पहा’ असं सांगावं, असा एकंदर प्रकार!

‘दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं’, असं म्हणतात, तेच होतं ग्रामीण शेती जीवनाच्या बाबतीत. आज शासकीय योजनांचं वेष्टण बाजूला सारून दिसते ती रौद्र आकांक्षा- ‘माया’ गोळा करण्याची! शेतकरी केवळ एक मतदार म्हणून तर उरला नाही ना, असा प्रश्न वाचकास पडल्यास नवल नाही, एवढा ‘परिस्थितीजन्य उवाच’ म्हणजे – ‘उसंतवाणी’.

हा विनोद कृषी या विषयाला वाहिलेलाय. हे सामाजिक भान जागवणारं लिखाण आहे. वर विनोदाचं वेष्टण, आत क्लान्त सामाजिक मन. हे वैचारिक काबाडकष्टाचं काम; म्हणून शारीरिक काबाडकष्टाचं प्रतीक असलेला ग्रामीण शेतकरी व शेतीजीवन हा विषय निरुपणासाठी निवडणं हे ‘येथे पाहिजे जातीचे’ या सम-विचारातून आलं असावं.

तांबोळींच्या विनोदाचं मर्मस्थान ‘बुद्धीगम्यता’ हे आहे, कारण हा विचारप्रवण, बुद्धीला आवाहन करणारा विनोद आहे. विनोदाचा लेप उतरताच जाणवतं ते विचारविश्व - सुधारणेच्या प्रतीक्षेत असलेलं, स्वल्पविरामांना विटलेलं, आश्वासनांवर रुसलेलं. हा विनोदाचा ‘व्हेनेशियन मास्क’ बाजूला सारून अंतर्मनात डोकावणारे डोळे केवळ ग्रामीण जीवनातील शेतकऱ्यांच्या वेदनेचा हुंकार भरतात, रोध दर्शवतात. कारण त्यांनी अनुभवलेलं असतं बदलांचं फोलपण, प्रलोभनांच्या सावल्या! मात्र त्यांना भीक घालणारी मानसिकता आता सरलेली असते, मुखवटा केव्हाच गळून पडलेला असतो, उरतो तो केवळ भीषण वास्तववाद!

या प्रकाराला मी ‘वस्तुदर्शी/ वस्तुनिष्ठ’ विनोदासोबत केलेला प्रयोग म्हणतो. ‘डेव्हिल इज इन डिटेल्स’ म्हणतात, तसे डिटेल्स पुरवले आहेत प्रत्येक लेखात. कुणी आध्यात्मिक तत्त्वज्ञानावर भक्तीचं आवरण चढवतो, इथं वास्तवावर विनोदाचं आहे. हे शब्दशिल्पाचं ‘बॉटम्स अप’ लेणं आहे.

‘मध्यस्थ महाव्याख्यान’ किंवा ‘सोडा लोकपाल करा प्रतिपाल’ या आणि जवळजवळ प्रत्येकच लेखात केलेली कवितेची पेरणी शब्दांतून उपरोध व्यक्त करणारी आहे, व्यथा मांडणारी आहे. ‘नभाच्या कल्याणा द्रविडी विभूती’ यातील ‘कन्या मोरीss वो नहीं स्पेक्ट्रम खायो!!’ ही तर आम्हा टेलिकॉमवासियांच्या जिव्हारी उठणारी कळ आहे. यामुळे मंदीची किती लाट उसळली आणि किती नोकऱ्या गेल्या, पर्यायानं कुटुंबांना चटके बसले, हे ‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे’ अशा पठडीतले वळ आहेत. थोडक्यात सद्यपरिस्थितीवरचं बिनतोड भाष्य म्हणजे ‘उसंतवाणी’.

एखादं सत्य रोकठोकपणे सांगितलं तर ते बोचतं, पण परोक्षतेतून सांगितलं तर दाह कमी होतो, मात्र परिणाम तोच. म्हणून ‘परोक्षप्रियता’ हा विनोदाचा स्थायीभाव ठरतो. ‘बृहदारण्यकोपनिषदा’त वाक् ब्रह्म, नेत्र ब्रह्म आणि कर्ण ब्रह्म (४-१-२ म्हणजे चतुर्थ अध्याय, प्रथम ब्राह्मण, २ रा पाठ) याविषयी भाष्य आहे. त्यात वाक् ब्रह्माच्या अंतर्गत विनोदशक्तीचा समावेश होतो, म्हणून ‘अप्रिय बोलण्यापेक्षा प्रिय:अप्रिय बोलावं’ असं सूचित केलं जातं. त्यामुळेच तर शब्दाच्या त्रिविधा शक्तींना (ध्वनि, लक्षणा, व्यंजना) अर्थ प्राप्त होतो. ‘इट अपियर्स लेस व्हेनमस व्हेन द ट्रूथ इज प्रेसेंटेड इन द कॅप्स्यूल ऑफ लाईटहूड, दॅट इज कॉमेडी, विच कॅन डू द मॅजिक एट टाइम्स टू पुट द मेसेज अक्रोस टू द रेसिपियंट एफेक्टिव्हली, विच अ सिरियस नॅरेशन मे मिस’.   

‘थट्टा मस्करी’ हा दोन वर्षांपूर्वी प्रकाशित झालेला आणि दुसऱ्या आवृत्तीत असलेला तिसरा संग्रह. स्वतःच प्रस्तावना लिहून सुरुवातीलाच पुस्तकासंबंधी वाचकांना जबरदस्त विश्वास देणारी ‘रुजुवात’ तांबोळींनी या पुस्तकारंभी लावली आहे. त्यांचं लिखाण मी फार लक्षपूर्वक वाचत आलो आहे. एकदा वाचून ढोबळ अर्थानं समजणारा, गुदगुल्या करणारा हा विनोद नाही, तर परिस्थितीचं व्यंग साखर-मिठाच्या; खट्या-मिठ्या चवीनं वाचकांसमोर मांडणारा आहे. विनोदाच्या आवरणातून समाजातील अस्वस्थतेवर गांभीर्यानं आसूड ओढणारा आहे. ‘जोर का धक्का धीरे से’ देणारा आहे. या अभिव्यक्तीसाठी त्यांनी निवडलेला फॉर्म ही त्यांची स्वनिर्मित नाममुद्रा आहे. म्हणून मला ती मराठी साहित्यात स्वतःचा वेगळा प्रांत वसवणारी वाटते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

‘मेकिंग ऑफ हाय टेक बाबा : संत तांबूलनाथ’ या लेखात आलेलं एक वाक्य पाहू- ‘मराठवाडा ही जशी संतांची भूमी आहे, तशी ती अतिसंथांची भूमीही मानली जाते’. यात केवळ मार्मिकता नाही, तर ‘गुणवाचक’ वर्णन आहे. अठरा वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेला हा आवर्जून वाचावा असा संग्रह आहे.

लेखकांना आपलं मत शब्दांच्या पलीकडे जाऊन व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य असत नाही, जे नटाला असतं. म्हणून साहित्याला ‘द्विमिती’ असू शकतात, पण ‘त्रिमिती’ शोधणं शक्य होत नाही! पण त्या साहित्याला मंच लाभला तर तिसरा आयाम प्राप्त होण्यास अडथळा येत नाही. हे आजकाल काही दर्जेदार विनोदी कार्यक्रमांतून छोट्या पडद्यावर आणि रंगमंचांवर आपण अनुभवतो आहोत. उदा. ‘चला हवा येऊ द्या’. रंगमंचाला हवी असणारी दर्जेदार विनोदी संहिता ‘गिरकी’, ‘उसंतवाणी’ आणि ‘थट्टा-मस्करी’ या तीन संग्रहांच्या मूर्तरूपात तयार आहे. आणि यापुढेही अशा सकस संहिता तांबोळी आपल्या लेखणीतून आश्वासकपणे पुरवत राहतील, असा विश्वास वाटतो.    

..................................................................................................................................................................

डॉ. तांबोळी यांच्या ‘थट्टा-मस्करी’ या लेखसंग्रहाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4971/Thatta-Maskari

..................................................................................................................................................................

लेखक जीवन तळेगावकर व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून काम करतात.

jeevan.talegaonkar@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......