थरार, रहस्य, विनोदाची अफलातून भेळ
सदर - न-क्लासिक
चिंतामणी भिडे
  • ‘स्टॅलाग 17’चं पोस्टर
  • Sun , 12 February 2017
  • इंग्रजी सिनेमा न-क्लासिक Stalag 17 स्टॅलाग 17 विल्यम होल्डन William Holden डॉन टेलर Don Taylor ओटो प्रेमिंजर Otto Preminger

युद्धकैद्यांवर आधारित चित्रपट असेल तर तो कसा असेल, त्यातलं वातावरण कसं असेल? युद्धकैद्यांचा कॅम्प म्हटलं की, आपल्या नजरेसमोर एक विशिष्ट चित्र उभं राहतं. मनातल्या मनात आपण काही निश्चित आडाखे बांधू लागतो. जेवणा-खाण्याच्या आणि राहण्याच्या किमान बऱ्या सुविधांपासूनही वंचित असलेले, आतल्या आत धुमसणारे, अनंत हालअपेष्टा सोसणारे युद्धकैदी आणि त्या कॅम्पमधलं एकूणच हतोत्साहित करणारं वातावरण असं सर्वसाधारण चित्र आपल्यासमोर उभं राहतं. या सर्वांना आरपार छेद देण्याचं काम ‘स्टॅलाग 17’ हा चित्रपट करतो. बिली वाइल्डरचा हा भन्नाट सिनेमा कमाल आहे. म्हटलं तर तो युद्धकैद्यांचं आयुष्य दाखवणारा, त्यांची कुतरओढ, घालमेल दाखवणारा चित्रपट आहे, म्हटलं तर कॉमेडी आहे, म्हटलं तर सस्पेन्स देखील आहे. ‘स्टॅलाग 17’ला कुठल्याच एका मापात बसवता येत नाही. मुळात युद्धकैद्यांवर आधारित इतका तुफान हास्यस्फोटक सिनेमा करण्याची कल्पनाच भारी आहे आणि त्या कल्पनेला रूपेरी पडद्यावर चारचांद लावायचे, तर तिथे दिग्दर्शक बिली वाइल्डरसारखा कसबी, मुरब्बी दिग्दर्शकच हवा.

वाइल्ड इतकं वैविध्य आणि त्याच्याएवढे तगडे सिनेमे क्वचितच कुणी दिले असतील. विनोदी, न्वार, थ्रिलर, अडव्हेंचर, बायोग्राफी, ड्रामा, रोमान्स... कुठला म्हणून चित्रप्रकार त्याला वर्ज्य नाही आणि हे सगळेच प्रकार त्याने ताकदीने हाताळताना त्यांना खास असा ‘बिली वाइल्डर टच’ दिला. ‘स्टॅलाग 17’च्या विषयात विनोदाला वाव नसतानाही वाइल्डर हा आपल्या लिखाणातून आणि दिग्दर्शनातून धमाल उडवून देतो.

डॅन्युब नदीच्या काठी कुठेतरी नाझी जर्मनीच्या ताब्यातील युद्धकैद्यांच्या कॅम्पवर या चित्रपटाची कथा उलगडते. सार्जंट सेफ्टन, सार्जंट कुझावा ऊर्फ अॅनिमल, प्राइस ऊर्फ सिक्युरिटी, सार्जंट हॅरी, सार्जंट हॉफी, सार्जंट शुल्झ, सार्जंट श्करबाख, लेफ्ट. डनबार, जोई, सार्जंट क्लॅरेन्स हार्वी कूक ऊर्फ कुकी अशी विविध पात्रं यात आहेत. कुकीच्या निवेदनाने कथेला सुरुवात होते. या कॅम्पवरील चार क्रमांकाच्या बरॅकमधील युद्धकैद्यांची ही गोष्ट आहे. कथेच्या सुरुवातीलाच मॅनफ्रिडी आणि जॉन्सन हे दोन युद्धकैदी तळावरून निसटण्याच्या प्रयत्नात मारले जातात. जर्मन सैनिकांना या दोघांच्या निसटण्याची खबर कोणीतरी दिली असली पाहिजे आणि तो कोणीतरी आपल्यातलाच एक आहे, याची सगळ्यांना खात्री पटते. हे दोघे निसटू शकणार नाहीत, अशी पैज लावणाऱ्या आणि त्या पैजेच्या बदल्यात सगळ्यांकडून असंख्य सिगरेटी जिंकणाऱ्या सार्जंट सेफ्टनवर (विल्यम होल्डन) संशयाची सुई जाते. सेफ्टनचं इतरांशी फटकून वागणं आणि जर्मन सैनिकांशी सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टींचा सौदा करून विविध प्रकारच्या सोयीसुविधा पदरात पाडून घेणं, यामुळे सेफ्टन तसाही इतरांमध्ये अप्रिय असतो. त्यातच हे दोघे निसटून जाऊच शकणार नाहीत, हे इतकं छातीठोकपणे ज्याअर्थी तो सांगत होता, त्याअर्थी तोच खबरी असला पाहिजे, अशी सगळ्यांची खात्री पटते. सेफ्टनला जवळपास वाळीत टाकलं जातं. त्याचा खंदा विश्वासू सहायक कुकीदेखील एका क्षणी त्याच्याकडे पाठ फिरवतो. तेवढ्यात लेफ्ट. डनबार आणि त्याच्या आणखी एका सहायकाचं युद्धकैदी म्हणून तळावर आगमन होतं. जर्मन सैनिकांसाठी रसद घेऊन जाणाऱ्या रेल्वेगाडीला टाइम बॉम्बच्या साहाय्याने उडवून देण्याचं काम डनबारनेच केल्याचा या कॅम्पचा प्रमुख श्करबाख (ओटो प्रेमिंगर) याला संशय असतो. आपल्या खबऱ्याच्या मदतीने सत्य जाणून घ्यायचं आणि मग डनबारची रवानगी बर्लिनला करायची, अशी योजना श्करबाख आखतो. बराक चारमधल्या इतर युद्धकैद्यांना या योजनेचा अंदाज येतो आणि ते डनबारला या कॅम्पवरून हलवण्याचा कट आखतात.

कथेत फारशी चमक नाही. एका वाक्यात कथा सांगायची तर युद्धकैद्यांच्या तळावरून पळून जायच्या प्रयत्नांची गोष्ट असं म्हणता येईल. पण तेवढ्यावरून या चित्रपटात काय धमाल आहे, याचा पुसटसाही अंदाज येणार नाही. बिली वाइल्डर आणि त्याचा सहलेखक एडविल ब्लम यांनी पटकथेत गहिरे रंग भरले आहेत. चित्रपटाच्या सुरुवातीलाच कुकी आपल्या निवेदनात म्हणतो, “युद्धावर आधारित चित्रपट बघताना माझ्या डोक्यात तिडिक जाते. युद्धात लढणाऱ्या सैनिकांचं शौर्य आणि त्यांच्या वेदनांवरच सगळे चित्रपट बनवतात. युद्धकैद्यांवर मात्र कधीच कोणी चित्रपट बनवलेला नाही.” कुकीच्या या निवेदनातूनच चित्रपटाचं वेगळेपण सेट होतं. ४० हजारच्या आसपास युद्धकैदी या तळावर आहेत. त्यात चेक, रशियन, पोलिश, अमेरिकन सर्व प्रकारचे आहेत. बराक चारमधले कैदी हे अमेरिकन. लढाईत प्रत्यक्ष लढणारे नव्हे, तर अभियंते, रेडिओ ऑपरेटर्स असे सेवा देणारे. त्यामुळेच सर्वसाधारणपणे लष्करी जवान किंवा अधिकारी म्हटल्यावर त्याच्या वागण्या-बोलण्या-राहण्यात जी शिस्त, जो कडकपणा दिसला पाहिजे, तो या युद्धकैद्यांमध्ये दिसत नाही. काहीजण तर पार गबाळे आहेत. उदा. अॅनिमल (रॉबर्ट स्ट्रॉस) आणि त्याचा सहकारी सार्जंट हॅरी (हार्वी लेम्बेक). विनोदनिर्मितीची जबाबदारी प्रामुख्याने या दोघांवर आहे. त्यातही रॉबर्ट स्ट्रॉसने कमाल केली आहे. मुद्राभिनय, विशिष्ट पद्धतीची संवादफेक आणि भोळसट इरसालपणा यांच्या जोरावर त्याने अॅनिमल निव्वळ अविस्मरणीय करून सोडलाय. इतका की, चित्रपटाचा शेवटही स्ट्रॉसवरच करण्चाचा मोह वाइल्डरला आवरला नाही.

सैनिकांचं शौर्य दाखवणं किंवा युद्धकैद्यांचा होणारा छळ दाखवणं हा या चित्रपटाचा हेतू नाही. युद्धकैद्यांच्या तळावरचं दैनंदिन आयुष्य, त्यात येणारा एकसाचीपणा, त्यातही शोधले जाणारे विरंगुळ्याचे क्षण, दुःखात सुख शोधणारे युद्धकैदी, एकमेकांच्या साथीने अखेरपर्यंत टिकाव धरून राहण्याचे युद्धकैद्यांचे त्यांचे, हा खरं तर या चित्रपटाचा गाभा आहे. त्यात वाइल्डर आणि ब्लम यांनी युद्धकैद्यांचं पलायन आणि जर्मन अधिकाऱ्यांचा खबरी कोण या दोन घटकांच्या माध्यमातून थरार आणि रहस्याची फोडणी दिली आहे. त्यामुळे एक अफलातून भेळ चाखल्याचा आनंद प्रेक्षकांना मिळतो.

डोनाल्ड बेवन आणि एडमंड त्रझिन्स्की यांच्या ‘स्टॅलाग 17’ या नाटकावरून वाइल्डरने हा चित्रपट बनवला. या दोघा लेखकद्वयांना ऑस्ट्रियामधील ‘स्टॅलाग 17 बी’ या जर्मन युद्धकैदीतळावरील वास्तव्याचा प्रत्यक्ष अनुभव होता आणि या अनुभवावरूनच त्यांनी हे नाटक लिहिलं होतं. सेफ्टनची व्यक्तिरेखाही त्यांनी त्यांच्या तळावरील जो पॅलॅझो या युद्धकैद्यावरच बेतली होती. वाइल्डर आणि ब्लम यांनी नाटकाच्या संहितेचं चित्रपटाच्या पटकथेत रूपांतर करताना काही बदल केले. सेफ्टनची व्यक्तिरेखा साकारणारा विल्यम होल्डन आपल्या व्यक्तिरेखेविषयी काहीसा साशंक होता. क्रूरकर्मा म्हणून ओळखले गेलेल्या नाझी जर्मन सैन्याशी सेफ्टन छोट्या छोट्या सोयीसुविधांसाठी वस्तूंच्या देवाणघेवाणीचा व्यवहार करतो, हे प्रेक्षकांना कितपत रुचेल, या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांची सहानुभूती मिळेल का, अशी शंका त्याला भेडसावत होती. त्याने वाइल्डरला विनंती केली की, सेफ्टनच्या मनातही जर्मन सैनिकांविषयी तिटकारा आहे, अशा अर्थाचे किमान एक दोन संवाद द्यावेत. पण वाइल्डरने त्याची विनंती साफ धुडकावून लावली. “सेफ्टन हा कुठल्याही भावभावना नसलेला संधीसाधू आहे. त्याशिवाय तो पैजा लावून आपल्या सहकाऱ्यांना आणि जर्मन सैनिकांनाही इतक्या सहजासहजी फसवूच शकणार नाही,” वाइल्डरने त्याला समजावलं आणि त्यानंतर होल्डनला या व्यक्तिरेखेची नस अचूक सापडली.

बहुतांशी चित्रपट एका बराकीत घडत असूनही तो रेंगाळत नाही, संथ होत नाही. त्यामागे छायालेखक अर्नेस्ट लॅसझ्लो आणि संकलक जॉर्ज टोमासिनी. आल्फ्रेड हिचकॉकच्या सायको, व्हर्टिगो, रिअर विंडो अशा अनेक अजरामर चित्रपटांचा हा संकलक... वाइल्डरसोबत त्याने या एकाच चित्रपटावर काम केलं, पण चित्रपटाला चारचांद लावून गेला. चित्रपटाला संकलनातून वेगवान करण्याचं काम त्याने चोख बजावलं. बहुतांश प्रसंगात केवळ तालवाद्यांचा वापर करायचा, अशा वाइल्डरच्या संगीतकार फ्रांझ वॅक्समनला सख्त सूचना होत्या. त्यानुसार वॅक्समनने ड्रम्सचा अधिकाधिक वापर केला. युद्धकैद्यांच्या तळावरचं चित्रण करणाऱ्या चित्रपटासाठी आवश्यक असलेला काळीज गोठवणारा, भयप्रद, मनावर अशुभाचं सावट पसरवणारा करणारा साउंड निर्माण करण्यासाठी अशी वाद्ये बरोबर कामी येतात, अशी वाइल्डर आणि वॅक्समनची धारणा होती.

वाइल्डरने चित्रपटात छोट्या छोट्या जागा अफलातून काढल्या आहेत. सेफ्टन आपली नेहमीची ट्रिक वापरून जर्मन सैनिकाकडून काही वस्तूंच्या बदल्यात नाश्त्यासाठी अंडी पदरात पाडून घेतो. बराकीतल्या स्टोव्हवर तो ऑम्लेट शिजवत असताना अॅनिमल आणि हॅरी त्याच्याकडे अधाशीपणे बघत असतात. स्टोव्हच्या बाजूला ठेवलेल्या अंड्याच्या कवचाकडे बोट दाखवून हॅरी सॅफ्टनला विचारतो, ‘हे कवच तर तुला नकोच असेल.’ सॅफ्टन त्याला उदारमनाने अंड्याचं कवच घेऊ देतो. हॅरी ते लगेच उचलतो. आपल्याला कवच मिळालं नाही म्हणून अॅनिमलचा चेहरा पडतो. हॅरी त्यालाही अर्ध कवच देतो, त्यासरशी त्याचा चेहरा उजळतो. पण तेवढ्यात त्याच्या लक्षात येतं, या कवचाचं करायचं तरी काय? एकूण कथेच्या दृष्टीने या प्रसंगाला फारसा अर्थ नाही. पण तळावरच्या रोजच्या नीरस आणि साचेबद्ध अशा प्रकारे दोन घटका विरंगुळा शोधला नाही तर युद्धकैद्यांच्या तळावर राहणारा सैनिक मानसिक संतुलन गमावून बसेल, ही बाब यातून अधोरेखित होते.

दुसऱ्या एका प्रसंगात लेफ्टनंट डनबारविषयी बर्लिनला उच्चाधिकाऱ्यांकडे रिपोर्ट करण्यासाठी श्करबाख बर्लिनला फोन जोडून देण्यास सांगतो. फोन जोडला जात असतानाच्या वेळेत त्याचा ऑर्डर्ली भिंतीपाशी ठेवलेले त्याचे मोठे सैनिकी बूट आणून त्याच्या पायात घालतो. तेवढ्यात फोन लागतो, पलिकडच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोलताना श्करबाख त्याला एक दोन वेळा सैनिकी शिस्तीची सलामी देत बुटाचा खणखणीत आवाज करतो आणि फोनवरचं संभाषण संपता क्षणीच पुन्हा पायातले बुट उतरवतो. अतिशय मासलेवाईक असा हा प्रसंग आहे.

अशी असंख्य उदाहरणं देता येतील. खास वाइल्डर टच तो हाच. विल्यम होल्डनला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं ऑस्कर मिळालं. स्वतः वाइल्डरला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचं नामांकन होतं. त्याचबरोबर अॅनिमलची अफलातून भूमिका साकारणाऱ्या रॉबर्ट स्ट्रॉसला सहायक अभिनेत्यासाठी नामांकन होतं. स्ट्रॉसला हा पुरस्कार मिळायला हवा होता. विलक्षण लोभसपणे त्याने अॅनिमल रंगवला होता. स्वतः वाइल्डर त्याच्या इतक्या प्रेमात पडला होता की, त्याने चित्रपटाचा शेवटही अॅनिमलवरच केला. योजनेबरहुकूम सेफ्टन डनबारसह वायर कटरच्या साहाय्याने काटेरी कुंपण कापून तळावरून पलायन करण्यात यशस्वी झाल्यानंतर अखेरच्या प्रसंगात एक कैदी विचारतो, “पण इतकी धोकादायक जबाबदारी सेफ्टनने स्वतःकडे घेण्याचं कारण काय कोणास ठाऊक?” त्यावर अॅनिमल म्हणतो, “कदाचित त्याला आपला वायर कटर चोरायचा होता. याचा कधी विचार केलाय?” चित्रपटाचा शेवटही वाइल्डरने अशा प्रकारे विनोदावरच केलाय.

‘स्टॅलाग 17’ने वाइल्डरला घवघवीत व्यावसायिक यश दिलं. त्याला या यशाची नितांत आवश्यकता होती. ‘सनसेट बुलेवार्ड’च्या अद्वितीय यशानंतर बिली वाइल्डरने पॅरामाउंट पिक्चर्सपासून फारकत घेत स्वतः निर्माता होत ‘एस इन द होल’ची निर्मिती केली होती. आज ‘एस इन द होल’ वाइल्डरचा एक मास्टरपीस मानला जातो. पण त्यावेळी व्यावसायिक स्तरावर तो अपयशी ठरला होता. त्यामुळे वाइल्डरला एका खणखणीत यशाची नितांत आवश्यकता होती. ही गरज ‘स्टॅलाग 17’ने पूर्ण केली आणि त्यानंतर वाइल्डरने अनेक अजरामर चित्रपट दिले. ‘स्टॅलाग 17’च्या सुरुवातीला कुकी म्हणतो त्याप्रमाणे युद्धकैद्यांवर इतका बहारदार चित्रपट पुन्हा वाइल्डरच काय, पण कोणीच करू शकलेलं नाही.

लेखक मुक्त पत्रकार आहेत.

chintamani.bhide@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......