…मला बाई जायाचं नांदायला!
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार
  • Tue , 07 February 2017
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray शिवसेना Shiv Sena प्रबोधनकार ठाकरे Prabodhankar Thackeray उद्धव ठाकरे Udhhav Thackeray राज ठाकरे Raj Thackeray

राज्यात सर्वत्र महानगरपालिका, जिल्हा परिषदा यांच्या निवडणुकांची धूम सुरू झाली आहे. केंद्रात व राज्यात भाजप सत्तेत आहे. त्यांना आता मुंबई महानगरपालिका ताब्यात घ्यायचीय. यासाठी शिवसेनेबरोबर विधानसभेच्या वेळी जशी युती मोडली, तशीच आताही मोडली. विधानसभेच्या वेळी भाजपकडे लोकसभेचा महाविजय होता. तर सेनेचं म्हणणं बाळासाहेबांचा आशीर्वाद होता. भाजपने लोकसभेचाच स्ट्राईक रेट ठेवत विधानसभेत सव्वाशेच्या आसपास मजल मारली तर, सेना ६०-६५मध्ये थबकली.

या वाढीव आत्मविश्वासाला नोटाबंदीनंतरही मोदींची उरलेली लोकप्रियता व नगरपालिकातील वाढते संख्याबळ यांची रसद आहे. त्यामुळे सेनेला शिंगावर घ्यायची रणनीती भाजपने ठरवून आखली आहे, हे कुणाही कुडमुड्या राजकीय भाष्यकारालाही कळावं. स्वत: केंद्रात, राज्यात सत्तेत असताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी बृहन्मुंबई महापालिका निवडणुका कधी गांभीर्याने घेतल्या नाहीत. आता तर या दोन्ही पक्षांची आठवण मुंबईत त्यांची नेते मंडळी, तुरळक उमेदवार वगळता कुणाला नाही.

या सर्व गदारोळात, भाजपने युती तोडल्याने मुंबईतल्या मराठी माणसांवर मोठीच संक्रांत येणार असून त्याने जागरूक होऊन, एकजूट दाखवणं गरजेचं आहे. आपण २८ टक्के उरलो आहोत आणि भाजप मुंबई गिळंकृत करून गुजरातला जोडेल की काय या भयस्वप्नाने अखिल महाराष्ट्रात फक्त एकाच माणसाला जाग आली! तो घामाघूम झाला, घाबराघुबरा झाला. आणि जुन्या स्वभावाला धरून थेट मातोश्रीवर गेला. त्याने ६६ साली बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली ‘मराठी माणसा जागा हो, न्याय हक्कासाठी एक हो’ ही घोषणा परत दिली. मातोश्रीवर क्षणभर हालचाल झाली बास. तो गृहस्थ अस्वस्थ मनानं परतला. आणि वाट बघत बसला प्रतिसादाची!

कोण होता हा आधुनिक शेलारमामा अथवा बाजीप्रभू? तर हा मनुष्य होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या संस्थापनेतील एक भक्कम बुरुज माझगाव केसरी मा. बाळा नांदगावकर!

मा. बाळा नांदगावकर यांची एवढीच ओळख अपुरी आहे. शिवसेनेचे एक जाएंट व व्हायब्रंट नेते, ज्यांनी सेना मुंबई-ठाण्याबाहेर पार मराठवाडा, विदर्भ, खान्देशात नेली. छगनराव भुजबळांनी १३ आमदारांसह काँग्रेसचा रस्ता धरला आणि सेनेला पहिलं भगदाड पाडलं, त्या छगन उर्फ लखोबाला पुढच्याच निवडणुकीत पाणी पाजणारा माझगावचा सामान्य रस्त्यावरचा शिवसैनिक बाळा नांदगावकर हा त्या वर्षीच्या निवडणुकीतला जाएंट किलर ठरला. इतका की पुढच्या  वेळेला भुजबळांनी बोऱ्याबिस्तरा गुंडाळून थेट येवला गाठलं!

भुजबळानंतर गणेश नाईक, नारायण राणे असे रथी-महारती बाहेर पडले, तेव्हाही जाएंट किलर मा. बाळा नांदगावकर बाळासाहेब व सेनेसोबत होते. पण नंतर बडव्यांना बोल लावत साक्षात राज ठाकरे सेनेतून बाहेर पडले आणि बाबासाहेब पुरंदरेंच्या भाषेत भूमंडळ हलले. राज ठाकरेंच्या सोबत सेनेतून कुणी बाहेर पडलं नाही, पण विद्यार्थी सेनेतील काही सोबती, काही नेत्यांची दुसरी-तिसरी पिढी त्यांच्यासोबत गेली. पण सेनेची आमदारकी न सोडता मातोश्रीकडे पाठ फिरवून कृष्णभुवनवर तोरण लावण्यात आघाडीवर होते जाएंट किलर मा. बाळा नांदगावकर! आश्चर्य म्हणजे सेनेनंही त्यांनी बडतर्फ केलं नाही. म्हणजे जाएंट किलर मा. बाळा नांदगावकर देहानं शिवसेनेत तर मनानं मनसेत!

पुढे राज ठाकरे नामक झंझावातानं पहिल्या फटक्यात १३ आमदार निवडून आणले, त्यात अर्थातच बाळा नांदगावकर होते. बाळासाहेबांच्या हयातीतच दादरला आमदार व सेनाभवन परिसरात ७ नगरसेवक निवडून आणून आडनाव तेच पण नाव बदललंय हे दाखवून दिलं. बाळासाहेबांना शेवटी (नाईलाजानं) ‘माझी प्रतिमा वापरायची नाही’ असा कॉपीराईट युक्त दम कम सल्ला कम सूचना करावी लागली. त्यानंतरही राज ठाकरे, त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना व निवडणूक चिन्ह रेल्वे इंजिन सुसाट धावू लागलं.

बाळासाहेबांना (मनातल्या मनात!) अभिमान वाटाव्यात आणि उद्धव ठाकरेंना थेट न्यूनगंड तयार व्हावा अशा लाखांच्या सभा, प्रति बाळासाहेब ही माध्यमांनी रंगवलेली प्रतिमा, छोट्या पडद्यावरचा सर्वांत जास्त टीआरपी खेचणारा तरुण नेता अशी राज ठाकरेंची घोडदौड सुरूच होती. उत्तम नकला, ठाकरी भाषेतले दम आणि अफाट स्वप्नरंजन. सर्वांना वाटलं उद्धव ठाकरेंची सेना जाते आता व्हेंटिलेटरवर. बाळासाहेबांचाच आक्रमक वसा, समोर तशाच पद्धतीने नवं आव्हान घेऊन उभं राहिल्यावरही उद्धव ठाकरेंनी आपला संयमी बाज व दरबारी राजकारणाचा बाज काही बदलला नाही.

पण इकडे परिस्तिती झपाट्यानं बदलत गेली. धाडकन एंट्री घेऊन, गुंडांना लोळवून टाळ्या नि शिट्ट्या घेतलेल्या हिरोनं नंतर हिरोईनच्या सोबत गाणं गात स्थिरावावं, तसं मनसेचं झालं! १३ आमदार, अनेक महापालिकांत नंबर दोन वर, नाशिकमध्ये सत्तेत असं असतानाही प्रगती पुस्तक पुढे सरकेना!

कुणी काही विचारलं की, पाच वर्षांनी भेटा! असं दमवजा उत्तर! ब्ल्यू प्रिंट? पूर्ण सत्ता द्या, मग दाखवतो! नंतर मोदींची स्तुतिसुमने, गुजरातचा राजकीय पाहुणचार! बाकी शांतता. विधानसभेत अबू आझमींना आणि एका पीएसआयला मारहाण यात चार आमदार निलंबित. पुढे मग विधान परिषद निवडणुकीत तुमचं बी राहू द्या, आमंच बी राहू द्या म्हणत सत्ताधाऱ्यांकडून निलंबन मागे…विधानसभेतील लक्षणीय कामगिरी एवढीच! पक्षाचे प्रवक्ते सुरुवातीला तावातावाने भांडताना दिसायचे आणि आदरणीय राजसाहेब असं पालूपद गिरवत बसायचे. पुढे प्रवक्तेही गायब झाले. ते आता अलीकडे अलीकडे पुन्हा अवतरले!

दरम्यान १० वर्षं सत्तेबाहेर काढलेल्या भाजप-सेनेला पुढच्या निवडणुका खुणवू लागल्या होत्या.

मनसेला काँग्रेस पाठीवर हात ठेवून लढ म्हणा म्हणते की, सेनेचे बाण वाकून भाजप युतीत घेते, या चर्चा सुरू झाल्या. तशी राज ठाकरेंची भाषणं रंगू लागली. हा डोळा मारतोय, तो इशारा करतोय, सेना-मनसे एकत्र येतील का? यावर उद्धवनी टाळी एका हाताने वाजत नाही असं म्हणताच अंगार फुलला! जाता येता कसली टाळी मागता?

बघता बघता लोकसभा निवडणूक झाली. भाजप-सेना युती झाली. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली. मोदी प्रेमाने भारावलेल्या राज ठाकरेंनी निवडणूक स्वतंत्र लढवणार पण निवडून आलो तर पाठिंबा मोदींना म्हणत सेनेच्या विरोधातच निवडक उमेदवार उभे केले! दरम्यान भूकंप झाला आणि मोदीनामक लाव्हा रसात सर्वच राजकीय पक्षांच्या शिळा झाल्या. राष्ट्रीय काँग्रेस ४४ वर आली. महाराष्ट्रात युतीने ४८ पैकी ४२ जागा जिंकल्या! मोदींना एनडीएची गरजच पडली नाही. सेना नॉन प्लस झाली तिथं मनसे तर थेट भूगर्भात!

मग पराभवानंतर मला काही सांगायचंय म्हणून ही मोठी सभा. पुन्हा लाखांचा जनसमुदाय. सांगितलं काय? तर मी स्वत: विधानसभा लढवणार! बातमी झाली. सभा संपली. कालांतराने घोषणाही विरली. ठाकरे कभी चुनाव नहीं लडते! विधानसभेत युती मोडली, लागलीच आघाडी मोडली. पंचरंगी लढतीत, सेना कशीबशी वाचली. मनसे तर आगातून फुफाट्यात! दहा वर्षांत झंझावात निमाला. नाही चिरा, नाही पणती अशी अवस्था झाली. फाटाफूट सुरू झाली. श्वेता परुळेकर, राम कदम, प्रवीण दरेकर, नाशिकचे गीतेंसह ३ आमदार सन्नाटा पसरला. सभा संपल्या. टीआरपी घसरला. सोशल मीडियावर विनोद पसरू लागले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष आहे हेच विसरून गेले लोक. आता बात मोदींवर, फडणवीस, उद्धव ठाकरे, सेनेवर उडू लागले. पण त्यावर पिंकी नाचली, आम्ही नाही पाहिली अशी अवस्था!

पंधरवड्यापूर्वी घामाघूम, घाबरेघुबरे होऊन जवळपास सर्व मराठी न्यूज चॅनेलवर त्याच प्रश्नांना तीच उत्तरं देताना जाएंट किलर मा. बाळा नांदगावकर यांचा स्वर अनेकदा गहिवरला. क्वचित तापला, पण बहुतांशी वेळ मी नांदायचे म्हणते, पण ते दादच देत नाहीत असाच सूर होता. मी काहीच म्हणत नाही. मुकाट रहा, मुकाट राहते, वर्षाला दोन पातळं, एक दांडीवर, एक गांडीवर, पोटाला अन्न, तुमची इच्छा झाली तर म्हणाल तेवढी पोरं. रांधेन, वाढेन, उष्टं काढेन, हू करणार नाही की चूं करणार नाही. मान्य मी अरेला कारे केलं. आता तसं केलं तर उठता लाथ, बसता बुक्की घाला, पण मला नांदवा! माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी नांदवा. माझं नाही, तुमचं भलं आहे. ती सटवी तुम्हाला लुटूनच जाणार होती. माहीत होतं मला. मागच्या वेळीही तिने असंच केलं, म्हणून यावेळी मी कान देऊन होते, फाटकापलीकडेच घुटमळत होते. सटवी मंगळसूत्र तोडून बाहेर पडली आणि मी आत आलेय बघा. फाटकाबाहेरूनही किती निरोप दिले. शूक शूक केलं, टाळी वाजवली. बारके खडे मारले, पण तुम्ही तिच्याच नादात! शेवटी गेली ना? पण मी आहे ना. आपण एकत्र नांदावं, ही गावाची विच्छा! सगळं गाव वाट बघतंय. एकत्र नांदू आणि मोडलेला डाव नव्यानं मांडू.

एकटीने मला ही जड जाणार, तुम्हालाही. शेवटी धनी हवा, घरधणीन हवी, तर घराला शोभा. बरं मामंजींना वचन दिलं होतं, आता जातेय पण पुन्हा नक्की येईन. आले की नाही? आज सगळे दीर भेटले. सगळे विचारात पडले. म्हटलं वेळ लावू नका, आत सांगा मी आलेय. मी. मी स्वत:, स्वत:च्या पायाने, विनाअट…नांदगावकर स्वगत म्हणत होते. एका राजकीय महानाट्यातलं सम्राटाच्या अध:पतनानंतरचं स्वगत!

का आली ही वेळ, मला बाई जायाचं नांदायला हे गाणं म्हणायची?

अलीकडे तर असं वाटायला लागलंय महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना नावाचा पक्ष आहे, त्याची मनसे म्हणून राजकीय शाखा आहे, जिथे अमेय खोपकरांच्या नेतृत्वाखाली राज ठाकरे सरचिणीस आहेत!

बाळा नांदगावकरांनी हो नाही करत बऱ्याच चुका मान्य केल्या, अपराध पोटात घ्या म्हणाले, सुधारतो, चुका दुरुस्त करतो, जे सांगाल ते करता म्हणत दंडवत घालायचं बाकी होतं.

मा. बाळा नांदगावकरांनी कृष्णभुवनसाठी एकच निरोप द्यावा. निरोप म्हणजे प्रसंग आहे, पण तो प्रसंग हे तत्त्व आहे.

सेनेची स्थापना होत असताना, दादरच्या घरात हळूहळू गर्दी वाढत गेली. एकदा अशीच बैठक चालू असताना प्रबोधनकार आत आले आणि म्हणाले, ‘बाळ, जरा एक मिनिट बाहेर ये!’ तेव्हाचे बाळ ठाकरे उठून बाहेर आले. दाराबाहेरच्या चपलांच्या ढिगांकडे बोट दाखवून प्रबोधनकार म्हणाले, या वहाणा, जोडे नाहीत, हीच तुझी संपत्ता आहे. ही सांभाळ. ही ज्या दिवशी गमावशील तेव्हा तू संपशील…

८५व्या वर्षी बाळ ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, हिंदूहृदयसम्राट होऊन शिवतीर्थावरच गेले, तेव्हाही वहाणा, जोडे तेवढेच होते. बाळा, काही लक्षात येतंय का?

 

लेखक प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

Post Comment

GANESH Patil

Thu , 07 February 2019

सर, मा. नांदगावकराना तुम्हाला काय सांगायचं आहे या लेखातून? मला समजलं नाही म्हणून मी विचारत आहे. धन्यवाद!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......