जाती, धर्म, पंथाच्या पलीकडे जाऊन केवळ मानवी कल्याणाचे तत्त्वज्ञान सांगणारा धर्मविचार म. फुले यांनी सांगितला होता आणि त्याच विचारांच्या पायावर ‘सत्यशोधक समाज’ उभा होता!
ग्रंथनामा - आगामी
विश्वनाथ शिंदे
  • ‘म. फुले, सत्यशोधक समाज आणि सामाजिक प्रबोधन (भाग-२)’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 22 January 2021
  • ग्रंथनामा आगामी म. फुले सत्यशोधक समाज आणि सामाजिक प्रबोधन म. फुले रा. ना. चव्हाण

‘म. फुले, सत्यशोधक समाज आणि सामाजिक प्रबोधन (भाग-२)’ हे रा. ना. चव्हाण यांच्या लेखसंग्रहाचे ४१वे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. या पुस्तकाला प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

..................................................................................................................................................................

१.

आधुनिक भारताच्या जडणघडणीत जोतीराव फुले यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांचा विचार, कार्य आणि त्यांची चळवळ शूद्रातिशूद्र, शेतकरी आणि स्त्रीवर्ग यांच्या अभ्युदयासाठी संजीवनी ठरली. १९व्या शतकातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात फुले यांच्या विचारकार्याने क्रांती केली होती. फुले हे त्यांच्या अतुलनीय कामगिरीमुळे आधुनिक महाराष्ट्रातील प्रबोधन परंपरेचे आधारवड ठरतात.

‘महात्मा फुले, सत्यशोधक समाज व सामाजिक प्रबोधन (भाग २)’ या रमेश चव्हाण यांच्या संपादनात रा. ना. यांचे प्रामुख्याने तीन विषयांची तपशीलवार आणि सखोल चर्चा केलेले लेख आहेत. तळमळीचे समाजचिंतक, म. फुले आणि त्यांचा सत्यशोधक समाज यांचा आत्मीयतेने विचार करणारे अभ्यासक-संशोधक आणि समाजाप्रती बांधिलकी मानणारे सत्यशोधक अशी रा. ना. रांची प्रतिमा या पुस्तकातील त्यांचे लेखन पाहून निर्माण होणे स्वाभाविक आहे.

रा. ना. यांचा विपुल व्यासंग, तत्कालीन प्रश्नांची उत्तम जाण, त्यांचे नेमके आकलन, समाज वास्तव समजून घेण्याची त्यांची क्षमता या गोष्टी लेख वाचताना प्रत्ययाला येतात. त्यांचे चिंतन मूलगामी आणि विचार करायला लावून नवी दृष्टी प्रदान करणारे असते. साधारणपणे १९५० ते १९९०-९२ या काळात त्यांनी ‘राष्ट्रवीर’, ‘गावगाडा’, ‘सा. शिवनेर’, ‘दीनबंधु’, ‘कामगार जगत’, ‘सुशिंपाज’ इत्यादी मासिक-साप्ताहिक-दैनिके यांमधून केलेले लेखन या पुस्तकात आहे. तसेच त्यांच्या काही अप्रकाशित लेखांचा समावेशही आहे.

रा. ना. हे समाजनिष्ठ लेखक आहेत. भारतीय समाजव्यवस्थेचे एक स्वप्न उराशी बाळगून आयुष्यभर अखंडपणे झपाटल्यासारखे ते लिहीत राहिले. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय ही जीवनमूल्ये समाजात रुजली पाहिजेत, ही त्यांची तळमळ होती आणि याच तळमळीपोटी वेगवेगळ्या वृत्तपत्रांतून-मासिकांतून १५००हून अधिक लेख त्यांनी लिहिले. त्यांची विषयानुरूप वर्गवारी करून आतापर्यंत ४० पुस्तके त्यांचे सुपुत्र रमेश चव्हाण यांनी प्रकाशित केली आहेत.

रा. ना. चव्हाण २०व्या शतकातील लेखक आहेत आणि त्या लेखनाचे संदर्भ १९व्या शतकाशी जोडलेले आहेत. रा. ना. यांनी त्यांच्या लेखनात समाज, संस्कृती, साहित्य, शिक्षण, धर्मकारण, राजकारण अशा नाना प्रकारच्या विषयांचा ऊहापोह केला आहे. त्यामुळे आजच्या अनेक सामाजिक प्रश्नांचे, तसेच म. फुले यांच्या चरित्राचे अज्ञात पैलू त्यांच्या लेखनातून उलगडण्यास मदत होते.

..................................................................................................................................................................

आंबेडकरांना सहन करावा लागलेला विकृत व अविचारी वैरभाव या व्यंगचित्रांमधून उघड होतो. त्याचबरोबर ऐतिहासिक अन्याय सहन केलेल्या आंबेडकरांचं वास्तविक चरित्रही उजेडात येतं.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदीसाठी करण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/5282/Hasanyawari-Neu-Naka

..................................................................................................................................................................

प्रस्तुत पुस्तकात म. फुले, सत्यशोधक समाज आणि समाजप्रबोधन या अनुषंगाने लिहिलेले जवळपास ६० लेख आहेत. म. फुले हा रा. ना. चव्हाण यांच्या आदराचा, आस्थेचा आणि चिंतनाचा विषय राहिलेला आहे. फुले यांच्या जीवनचरित्रातील अनेक घटना प्रसंग ते वारंवार पुनरुक्तीचा दोष पत्करून विशद करून सांगतात.

या पुस्तकाच्या पहिल्या भागात रा. ना. दुर्मीळ कागदपत्रांच्या आधारे फुले चरित्र नव्याने उलगडून सांगण्याचा प्रयत्न करतात. आज पडद्याआड झालेली त्यांची चरित्रसामग्री आपल्यासमोर मांडतात आणि फुले यांच्या जीवनातील घटनाप्रसंगावर नवा प्रकाशझोत टाकतात. उदाहरण म्हणून सांगायचे झाले, तर ब्राह्मण विधवेपासून जन्मलेल्या मुलास फुले दाम्पत्य दत्तक घेऊन त्याचे यशवंत असे नामकरण करून आपला वारस म्हणून स्वीकारतात हे आपण जाणतो, पण त्याआधी म. फुले यांनी ब्राह्मण विधवेचा शांताराम नावाचा मुलगा सांभाळला होता, तो अकाली वारल्याने यशवंताला फुले दाम्पत्याने पुढे दत्तक घेतले ही नवी माहिती रा. ना. आपणास सांगतात.

फुले यांना समाज अमूलाग्र बदलला पाहिजे असे वाटत होते. सामाजिक, धार्मिक व आर्थिक बाबतीत तो सक्षम व्हायला हवा, असे त्यांचे मत होते म्हणून ते कुटुंबव्यवस्थेत सर्वाधिक महत्त्व स्त्रीचे आहे असे सांगतात, पुरुषांपेक्षा सर्व बाबतीत स्त्री श्रेष्ठ मानतात. म्हणून ते स्त्रीशिक्षणाला प्राधान्य देतात. १८५२ साली २०० रुपयांची शालजोडी देऊन विश्रामबागवाड्यात त्यांच्या कार्याचा गौरव केला हे आपणास माहिती असते. भिडेवाड्यात १८४८मध्ये अस्पृश्य मुलींसाठी शाळा सुरू केली हेदेखील आपण वाचलेले असते. हे काम करताना स्वकीयांबरोबरच इंग्रजांचाही त्रास त्यांना सहन करावा लागला, हा महत्त्वाचा उल्लेख रा. ना. करतात.

“यापूर्वी सन १८५२ साली विश्रामबागवाड्यात जाहीर सभा भरवून इंग्रज अधिकाऱ्यांनी स्त्रीशिक्षणार्थ केलेल्या प्रयत्नांबद्दल जोतीबांचा सत्कार केला होता. पण तेच शिक्षणखात्यातील युरोपियन अधिकारी व मिशनरी मंडळी १८५७च्या बंडापासून जोतीबांना पाहून कपाळाला आठ्या घालू लागले, म्हणून जोतीबांनी त्यांच्याकडे जे येणे-जाणे होते, जो निकटचा संबंध होता तो सोडून दिला.” स्त्रीशिक्षणाबद्दल इंग्रज अधिकाऱ्यांनी शालजोडी देऊन फुले यांचा गौरव केला, हे आपण पुन: पुन्हा ऐकतो, पण त्यांनी फुले यांना विरोधही केला होता, हे रा. ना. आपणास नव्याने सांगतात.

म. फुले समाजसुधारणेच्या विचारात शूद्र-अतिशूद्र, बलुतेदार आणि शेतकरी यांचा विकास महत्त्वाचा आहे असे सांगतात, याकडे रा. ना. आपले लक्ष वेधतात. सनातन विचारांच्या लोकांशी संघर्ष करून सुरू केलेल्या शाळा कुठल्याही प्रकारची खळखळ न करता पुणे म्युनिसिपालटीच्या शिक्षण खात्याकडे सोपवून फुले आपल्या इतर अंगीकृत कामाकडे वळतात.

अर्थात महात्मा फुले यांचे मोठेपण सांगत असताना फुले यांचे विचार पारखून घ्या, त्यांची प्रत्येक गोष्ट बरोबरच आहे असे गृहीत धरू नका, फुले यांचा काळ आणि आजचा काळ यात खूप बदल झाला आहे, असे त्यांचे मत आहे.

‘म. जोतीबा फुले यांच्या मोठेपणाचे वर्म व मर्म’ या लेखात रा. ना. लिहितात, “जोतीबांना शंभर वर्षे होऊन गेली आहेत. त्यांचे त्यावेळचे वास्तव जसेच्या तसेच आज राहिले नाही. टिकाऊ तत्त्वे व सूत्र कायम राहतात पण वास्तव बदलते, मागासलेपणाची जबाबदारी दुसऱ्यावर न लादता आत्मपरीक्षणाने स्वोन्नतीचे प्रयत्न केल्रास पुढे येता येते.”

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

तार्किकदृष्ट्या रा. ना. रांचे म्हणणे योग्य वाटत असले तरी आज इतक्या वर्षानंतरही आपण जल, जंगल, जमीन यांचे समन्यायी वाटप करू शकलो नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. त्यामुळे समाजातील उपेक्षित घटकाला केवळ स्वत:च्या बळावर आत्मोन्नती करणे आजही शक्य नाही, या वास्तवाकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही.

२.

फुले यांनी आपल्या सहकार्यांसह २४ सप्टेंबर १८७३ रोजी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. ही तारीख त्यांनी जाणीवपूर्वक निवडली असावी. छ. शिवाजी महाराज यांच्याविषयी म. फुले यांना आत्मीयता होती. महाराजांची दुर्लक्षित झालेली समाधी जोतीराव शोधून काढतात. मोडकळीस आलेल्या महाराजांच्या समाधीचा १८६८मध्ये जीर्णोधार करतात, ही बाब फार महत्त्वाची आहे. महाराजांचा पहिला राज्याभिषेक वैदिक पद्धतीने झाला होता, तो त्यांना मान्य होता किंवा नाही याविषयी मतभेद आहेत, पण त्यांनी दुसरा राजाभिषेक करून घेतला होता आणि तो तांत्रिक-शाक्त पद्धतीने २४ सप्टेंबर रोजी झाला होता, याचा उल्लेख ख्यातनाम विचारवंत शरद् पाटील यांनी केला आहे. याच तारखेला म. फुले सत्यशोधक समाजाची स्थापना करतात. यातून त्यांच्या मनात शिवाजीराजांप्रती असलेली निष्ठा जशी दिसते, त्याचप्रमाणे फुले यांचा सत्यशोधकीय दृष्टीकोनही प्रत्ययाला येतो.

रा. ना. चव्हाण यांनी १९५० ते १९९३ या काळात सत्यशोधक समाजासंबंधी वेळोवेळी विविध नियतकालिकांमध्ये लिहिलेल्या १९ लेखांचा अंतर्भाव या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात केला आहे. या लेखांमधून रा. ना. चव्हाण सत्यशोधक समाजाचे स्वरूप आणि महत्त्व विशद करून सांगतात, समाजाची उद्दिष्टे, हेतू यासंबंधी ऊहापोह करतात, सत्यशोधक चळवळीच्या उगमामागील पार्श्वभूमीची मीमांसा करतात, तसेच शंभर वर्षे उलटल्यानंतर सत्यशोधक समाजाची सांप्रतची स्थिती कशा प्रकारची आहे, याविषयीची आपली रोखठोक मते मांडतात. ती आपणास अंतर्मुख करणारी आहेत.

सत्यशोधक समाज उदयाला आल्याने शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, धार्मिक क्षेत्रात कोणते बदल झाले, याची चर्चा रा. ना. यांनी केली आहे. सत्यशोधक चळवळ शिक्षणप्रसारार्थ प्रामुख्याने स्थापन झाली. त्यानुसार अनेक मान्यवर कार्यरत झाले. या शैक्षणिक चळवळीचा फायदा पुढील पिढीला कसकसा झाला, याचा तपशील रा. ना. सांगतात. धार्मिक व सामाजिक बदल सांगताना देशी भिक्षुकशाहीचा प्रभाव कसा कमी झाला याचे विवेचन त्यांनी केले आहे. ब्राह्मणेतर चळवळीचा परिणाम राजकीय क्षेत्रावर झाला, हे सांगत असतानाच शेतकऱ्यांच्या समस्या कोणत्या होत्या, शेतकऱ्यांची पिळवणूक भटभिक्षुक, जोशी-कुलकर्णी-पुरोहित करत, कुलकर्णी हा तर ग्रामराक्षस होता. ही दंडेलशाही सत्यशोधक चळवळीने खलास केली, हे रा. ना. सडेतोडपणे सांगतात.

धम्मदीक्षा घेताना घातलेल्या दंडकांचा उल्लेख करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि म. फुले यांच्या विचारातील साम्य रा. ना. दाखवतात. फुले आणि आंबेडकर दोघेही विद्याप्रसारक होते, मागास व अतिमागास समाजात जो विद्येचा प्रसार वाढत आहे, त्याचे श्रेय फुले-आंबेडकर यांनाच जाते, असेही रा. ना. म्हणतात.

ब्राह्मणेतर चळवळीतूनच शेतकरी कामकरी पक्ष उदयाला आला, संयुक्त महाराष्ट्र लढ्यात त्याचे योगदान होते, सत्यशोधक समाज सेक्युलर (धर्मनिरपेक्षवादी) होता, धर्मनिरपेक्षता हे तत्त्व काँग्रेस पक्षाने अंगीकारले. यातून महात्मा गांधी यांच्या काँग्रेस पक्षाच्या विचारांवरही सत्यशोधक तत्त्वांचा प्रभाव दिसतो, हे रा. ना. समजावून देतात आणि सत्यशोधक समाजाचे योगदान कसे सर्वव्यापी होते, हे स्पष्ट करून सांगतात. जाती, धर्म, पंथ अशा भेदाच्या पलीकडे जाऊन केवळ मानवी कल्याणाचे तत्त्वज्ञान सांगणारा धर्मविचार म. फुले यांनी सांगितला होता आणि त्याच विचारांच्या पायावर सत्यशोधक समाज उभा होता.

..................................................................................................................................................................

‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5254/Khindit

..................................................................................................................................................................

रा. ना. हे सत्यशोधक चळवळीचे खंदे पुरस्कर्ते होते. सत्यशोधक समाजाबद्दल त्यांना जिव्हाळा वाटत होता. २४ सप्टेंबर १९७४ रोजी ‘सत्यशोधक समाजा’ची जन्मशताब्दी साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने आणि त्यानंतरही रा. ना. चव्हाणांनी प्रासंगिक स्वरूपाचे बरेच लेख लिहिले. ‘शतक उलटल्यानंतर फुले यांचे चरित्र आणि कार्य, त्यांची महानता-महात्मेपण उत्तरोत्तर प्रभावित आणि प्रकाशमान होत चालले आहे’ याविषयीची आनंदाची भावना या लेखांमधून रा. ना. प्रगट करतात. काही प्रतिगामी शक्ती त्यांचे चरित्रहनन करतात याचे त्यांना दु:ख होते. रा. नां.नी त्याचा प्रतिवाद करणारा लेखही लिहिला होता. या सनातन विचारांच्या लोकांनीही आता जोतीरावांचे मोठेपण मान्य केले आहे. पण ज्या स्तरातील लोकांसाठी, बहुजन शेतकरी-कामगारांसाठी ही चळवळ झाली, त्यांना आता या समाजाचे महत्त्व वाटत नाही, त्यांना सत्यशोधक विचारसरणीचा विसर पडला, या गोष्टीची खंत रा. ना. व्यक्त करतात.

सारा समाज गुलामगिरीतून मुक्त व्हावा, समाजात सुधारणा व्हावी, त्यांची नैतिकप्रगती घडून विवेकमूल्यांची अभिवृद्धी व्हावी, हा सत्यशोधक समाज स्थापनेमागील हेतू होता. पण समाजाचा विवेक वाढला नाही, याउलट भ्रष्टाचार, काळाबाजार, शोषण करणाऱ्या प्रवृत्ती वाढल्या. भारतीय राज्यघटनेने सर्वांना समान संधी व समान हक्क दिले, पण अस्पृश्यांवर अन्याय होतच आहे. खेड्यापाड्यांतून स्त्रियांचे शिक्षण वाढले नाही, समाजात आजही म्हणावा तसा बुद्धिवादी दृष्टिकोन निर्माण झाला नाही, त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला आत्मपरीक्षणाची गरज आहे. याचा अर्थ सत्यशोधकांचे कार्य आजही संपले नाही, अशी खंत रा. ना. व्यक्त करतात.

सत्यशोधक समाजाने तन मन धन खर्च करून अटीतटीने बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न केला, शंभर वर्षे उलटली तरी अपेक्षित यश प्राप्त झाले नाही. त्यामुळे आता सत्यशोधक समाजाने काही गोष्टींचा फेरविचार करण्याची गरज आहे, असेही ते म्हणतात. सत्यशोधक समाजाच्या भवितव्याबद्दल प्रश्न उपस्थित करून ते ‘सत्य असत्याचा विचार करून जो सत्य शोधतो तो सत्यशोधक होय’ अशी सत्यशोधकाची नवी व्याख्या सांगून सत्यशोधक समाजाच्या पुढील कार्याची नवी दिशा विशद करून सांगतात ती मूळातून समजून घेणे आवश्यक आहे. सत्य, समता, स्वावलंबन, स्वातंत्र्य, समाजवादी-निधर्मी-लोकशाही ही विचारमूल्ये म. फुले यांनी दिली होती, त्या मूल्यांचा विज्ञाननिष्ठ दृष्टीने सत्यशोधन करा, असे आवाहन रा. ना. बहुजन समाजातील तरुण वर्गाला करतात.

३.

एकोणिसावे शतक हे आधुनिक भारतातील समाजप्रबोधनाचे युग होते, या काळात उदारमतवादी ब्रिटिश सत्तेच्या आगमनामुळे व ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या संपर्कामुळे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात अनेक प्रकारच्या गोष्टींच्या चर्चा सुरू झाल्या. विशेषत: हिंदू धर्माचा पुनर्विचार सुरू झाला. लोकहितवादी, बाळशास्त्री जांभेकर, विष्णुबुवा ब्रह्मचारी, न्या. रानडे, गोपाळ गणेश आगरकर, असे अनेक समाजसुधारक हिंदू धर्मातील कालबाह्य रूढी-परंपरेबद्दल व पुरोहितशाहीच्या वर्चस्वाबद्दल, अमानुष जातीप्रथेबद्दल, स्त्रियांच्या दयनीय स्थितीविषयी त्यांच्या हलाखीविषयी लिहीत होते आणि यासारख्या सर्व प्रश्नांची उलटसुलट चर्चा सुरू होती, पण ती चर्चा मध्यमवर्गापुरतीच मर्यादित होती.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

महात्मा फुले याला अपवाद होते. त्यांनी आपल्या विचारकार्याचे केंद्र स्त्री-शूद्रातिशूद्र, शेतकऱ्यांचे दारिद्रय, धर्म, जातविचार, अस्पृश्यता, शोषणव्यवस्था आणि शिक्षण हे मानले आणि एका नव्या प्रबोधन युगाचा प्रारंभ झाला. हा प्रारंभ राजा राममोहन राय यांच्यापासून झाला हे खरे असले तरी या प्रबोधन चळवळीच्या अग्रभागी फुले होते. रा. ना. चव्हाण यांनी १९व्या शतकातील प्रबोधनपरंपरेला २०व्या शतकात आपल्या लेखनाद्वारे नवा आयाम प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

‘संकीर्ण’ या विभागात रा. ना. यांच्या आधीच्या विभागणीत न सामावणाऱ्या लेखांचा अंतर्भाव आहे. यात कामगारांचे पहिले पुढारी नारायण मेघाजी लोखंडे यांचे चरित्र व कार्य, कामगारांसाठी त्यांनी उभी केलेली चळवळ, कामगारांसाठी साप्ताहिक सुटीची केलेली कायदेशीर तरतूद अशा अनेक तऱ्हेच्या लोखंडे यांच्या ऐतिहासिक कामगिरीचा आलेख मांडणारा, कार्याचा आढावा घेणारा रा. ना. यांनी लिहिलेला लेख आहे. ‘तीन माळी’ या लेखात रा. ना. यांनी म. फुले, भालेकर आणि लोखंडे यांच्या कार्याचे महत्त्व विशद करून सांगितले आहे. भाई माधवराव बागल, दत्तो वामन पोतदार, अनिल अवचट यांच्याविषयी त्यांनी लिहिलेले लेख आहेत. त्यातून त्यांच्या कार्याचे मर्म आणि महत्त्व सांगून तो तो काळ, त्या काळातील घडामोडी यांचा परामर्श रा. ना. यांनी घेतलेला आहे. याशिवाय शेतकऱ्यांचे आचार-विचार, भारतीय शेतकरी, कामगारांच्या घराचा प्रश्न याचा वेध घेणारे लेख या विभागात आहेत.

तत्कालीन सामाजिक स्थितीगती समजून घेताना हे लेख ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरतील, अशा प्रकारचे आहेत. या लेखनातून रा. ना. यांची समाजाप्रती असणारी बांधीलकी, जिव्हाळा, कळवळा प्रगट झालेला दिसतो.

..................................................................................................................................................................

लेखक प्रा. विश्वनाथ शिंदे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘महात्मा जोतीराव फुले अध्यासना’चे प्रमुख आहेत.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......