मालिका कडक, वेशभूषा भडक आणि वेशभूषा भडक, बाकी सगळा खडक?
सदर - सिनेपंचनामा
सायली राजाध्यक्ष
  • मालिकांमधील काही दृश्यं
  • Sat , 28 January 2017
  • सिनेपंचनामा सायली राजाध्यक्ष टीव्ही सिरिअल्स TV Serials

‘झी मराठी’वर सध्या सुरू असलेल्या ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतली नायिका शिक्षिका आहे. तीही एका लहानशा गावात. असं असतानाही ती सतत ब्लो ड्राय केलेल्या केसांमध्ये वावरत असते. हे मी फेसबुकवर एका पोस्टमध्ये लिहिलं, तेव्हा अनेकांना ते खटकलं. त्यावरून अनेकांनी कमेंट्सही केल्या की, खेड्यात राहणाऱ्या बाईनं केस ब्लो ड्राय करू नयेत की काय. पण माझ्या म्हणण्याचा उद्देश वेगळाच होता. तो इतकाच की आपल्याकडे एकूण पात्राचा विचार करताना वास्तववादी विचार केलाच जात नाही. म्हणजे खेड्यातलीच काय पण शहरातलीही वर्किंग वुमन, शिक्षिकाही रोज केस ब्लो ड्राय करत नाही. केस ब्लो ड्राय करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे! पण प्रत्यक्षात तसं नसतं, इतकंच मला म्हणायचं होतं.

मालिका आणि चित्रपट या दोन्हींमध्येही कॉश्चूम्स हा खरं तर महत्त्वाचा विषय. पण कॉश्चूम्सचा तितक्या गांभीर्यानं विचार करावा असं आपल्याकडे वाटत नाही. मुळात एखाद्या मालिकेत किंवा चित्रपटात वातावरण उभं करण्यासाठी कॉश्चूम्सही फार महत्त्वाची भूमिका बजावत असतात. पण बरेचदा आपल्याकडे निर्मात्याची बायको आहे म्हणून, कुणीतरी ओळखीचं आहे म्हणून त्या व्यक्तीला वेशभूषेची जबाबदारी दिली जाते किंवा त्याबद्दल गांभीर्यानं विचारच केला जात नाही, आणि अर्थातच बरेचदा त्याची वाट लावली जाते.

भारतात मालिकांची निर्मिती सुरू झाली ती ‘हमलोग’पासून. त्यानंतरची ‘बुनियाद’ ही तितकीच गाजलेली मालिका. या दोन्ही मालिका डोळ्यासमोर आणल्या तर या मालिकांची वेशभूषा किती खरी वाटायची ते लक्षात येईल. ‘हमलोग’मधले दादा-दादी, सगळी भावंडं, आई-वडील, नन्हे-कामया हे सगळे आपापल्या भूमिकेत फिट्ट बसले होते. ‘बुनियाद’ ही फाळणीच्या पार्श्वभूमीवरची मालिका, यातही आलोक नाथ, अनिता कंवल, विजयेंद्र हे सगळे आपापल्या भूमिकेत फार चांगले शोभायचे आणि यात इतर गोष्टींबरोबरच त्यांच्या कॉश्चूमचा भाग मोठा आहे.

मला इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो ‘भारत एक खोज’ या मालिकेचा. जवाहरलाल नेहरूंच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकावर आधारित ही मालिका श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केली होती. या मालिकेतल्या पात्रांची वेशभूषा काय अफलातून होती! अगदी आर्य भारतात येतात तिथपासून महाभारतातल्या व्यक्तिरेखा जणू काही आपल्यासमोर खऱ्याखुऱ्या उभ्या आहेत असं वाटायचं. याचं कारण पात्रांना साजेसे पोशाख आणि रंगभूषा. कौरव-पांडव हे काळ्याच रंगाचे होते. त्यांना मेकअपची पुटं चढवून पांढरंफेक केलेलं नव्हतं. त्यांना खोटे वाटणारे सोनेरी मुकुट घातलेले नव्हते तर कापडी साफे बांधलेले होते. स्त्रीपात्रंसुद्धा भयाण मेकअप आणि भयानक दागिने घातलेली नव्हती. या मालिकेचं प्रॉडक्शन डिझाइन होतं नितीश रॉय यांचं तर वेशभूषा होती सलीम आरिफ यांची. अतिशय अभ्यासपूर्ण अशी निर्मिती होती या मालिकेची.

जसजशी मालिकांची संख्या वाढायला लागली तसतसे त्यांचे रतीबही वाढायला लागले. आठवड्यात सहादा मालिका दाखवायची असेल तर त्याची गुणवत्ता किती टिकणार? आणि वर म्हटलं तसं निर्मात्याची बायको जर कॉश्चूम्स करणार असेल तर मग बघायलाच नको. अर्थात जर ती त्या कामात पारंगत असेल तर हरकत नाही. मराठी काय आणि हिंदी काय, अत्यंत लाउड अशी रंगभूषा आणि वेशभूषा केली म्हणजे ते पात्र प्रेक्षकांच्या मनावर ठसतं असा समज आहे. पण खरोखर एखादं पात्र लक्षात राहण्यासाठी अशी अंगावर येणारी वेशभूषा करण्याची खरोखर गरज असते का? की अशी वेशभूषा असली की मग कथा, पटकथा, संवाद उत्तम असण्याची गरज भासत नाही?

चित्रविचित्र कुंकू किंवा टिकली याला तर मालिकांमध्ये फारच महत्त्व आहे. मला मालिकेचं नाव आठवत नाहीये पण सुधा चंद्रन मुख्य स्त्रीपात्राचं काम करत असे. तिच्या टिकल्या इतक्या भीषण होत्या की, डोळे मिटावेसे वाटत (खरोखर!). ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतलं अक्कासाहेब हे पात्र. कितीही श्रीमंत मराठी घर असलं तरी अशा प्रकारचे कपडे, दागिने, टिकल्या हे कुणी लावेल का, किंबहुना लावतं का? गळ्यात सर्व प्रकारच्या माळा, ठुशा, साज, मंगळसूत्रं सारं सारं. कानावर जणू द्राक्षांचे घड लगडलेले. नाकात मोरणी, कपाळावर टिळासदृश टिकली, त्यावरही नक्षीकाम आहेच. म्हणजे सिनेमॅटिक लिबर्टी मान्यच आहे, पण इतकी घ्यावी की, वास्तवाशी संपूर्ण नातं तोडायचं? म्हणजे एक प्रकारची फँटसीच झाली की ही.

सध्या झीवर सुरू असलेली ‘काहे दिया परदेस’ ही मालिका बघा. यातली नायिका गौरी ही मुंबईत राहणारी, नोकरी करणारी नायिका आहे. लग्नाआधी ती ऑफिसला घालते ते कपडे भयाण आहेत. अगदी निम्न मध्यमवर्गीय कुटुंब असलं तरी हल्ली असे कपडे कुणी घालत नाही. मुंबईत धुणंभांड्याची कामं करणाऱ्या बायकाही याहून उत्तम कपडे घालतात आणि घातलेच पाहिजेत. रंगसंगती तर नाहीच त्या कपड्यांना, पण त्यांचे केवळ ४ सेट्स! आमच्याकडे काम करणाऱ्या मुली नवरात्रात ९ दिवस उत्तम साड्या नेसतात. शिवाय रोजही उत्तम कपड्यांमध्ये असतात. मग ही नोकरी करणारी मुलगी इतके घाणेरडे कपडे का बरं घालत असेल? आता तिचं लग्न होऊन ती बनारसला गेली आहे. हे कुटुंब अत्यंत श्रीमंत, बनारसी साड्यांचा व्यापार करणारं. बनारसी साड्या म्हणून कुटुंबातल्या बायकांना ज्या काही साड्या दिल्या आहेत, त्या साड्या बनारसीच्या जवळपासही जाणाऱ्या नाहीत. कुठलं तरी स्वस्तातलं कापड उचलून त्याला भयानक डिझाइनच्या बॉर्डर लावून केलेल्या अत्यंत चीप अशा साड्या आहेत त्या.

‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतलं कुटुंब हे श्रीमंत उद्योजक कुटुंब. पण एकाला तरी बघून असं वाटायचं का? त्यातल्या सहा आया आणि त्यांना दिलेली वेशभूषा हा तर थिसिसचा विषय व्हावा. इतक्या श्रीमंत घरातल्या आया मोजून तीन-चार साड्या नेसतात, त्याही स्वस्तातल्या हे खरं तरी वाटेल का? जान्हवी ही नायिका निम्न मध्यमवर्गातून आलेली. नंतर ती यांच्या घरात सून म्हणून येते. तरी कपड्यांची तऱ्हा तीच. मोजून चार ड्रेस, अत्यंत स्वस्त कपड्यातून शिवलेले. घाणेरड्या कापडाच्या ओढण्या, कानातलं रस्त्यावर मिळणारं चीप मेटलचं, रस्त्यावरच मिळणारी अत्यंत हलकी पर्स. आता रस्त्यावर मिळणाऱ्या गोष्टी वापरू नयेत असं माझं मत अजिबात नाहीये. हिल रोड आणि लिंकिंग रोडला रस्त्यावर उत्तम गोष्टी मिळतात. पण तुम्ही नेमकं काय निवडता याला महत्त्व आहेच. उद्योजकांच्या घरातल्या बायका असे कपडे घालतील का?

मालिकांची निर्मिती करताना वातावरण निर्मिती आणि कॉश्चूम्स या दोन गोष्टींवरचा खर्च विचारातच घेतला जात नाही का, असा प्रश्न पडावा इतकी मराठी मालिकांची स्थिती केविलवाणी आहे. तालेवार घरात प्लॅस्टिकच्या फुलदाण्या, प्लॅस्टिकचं फर्निचर, चीप कापडाचे पडदे, मेलॅमाइनची भांडी हे सगळं का? खूप जास्त पैसे खर्च न करताही हे सगळं चांगलं आणि वास्तववादी करता येऊ शकतं. की या गोष्टीवर फारसा विचारच करावासा वाटत नाही निर्मात्यांना आणि चॅनेलवाल्यांनाही?

हिंदीतली स्थिती यापेक्षा बरी आहे. सध्या मी बघते ती ‘कुछ रंग प्यार के...’ ही मालिका याचं उत्तम उदाहरण आहे. या मालिकेतलं प्रमुख पात्र देव दीक्षित हा मोठा उद्योगपती आहे. मालिकेच्या पहिल्या भागांमध्ये त्याला उत्तम सूट्स, पोलोचे शर्ट्स, चांगले शूज दिले होते. त्याची आई रॉ सिल्कच्या साड्यांमध्ये होती. नायिका ही मध्यमवर्गीय घरातली आहे. ती न्युट्रीशनिस्ट आहे. तिला पहिल्या काही भागांमध्ये कॉटनचे साधेच, पण सुरेख रंगसंगती असलेले कॉटनचे कुडते दिलेले होते, कानात सिरॅमिकचे झुमके, छानशी कॉटनचीच रंगीबेरंगी पर्स. आता मालिकेनं लीप घेतलीय, नायिका स्वतः उद्योजक झाली आहे. तिला सिल्कचे शर्ट्स, टॉप्स आणि लाँग कुडते दिले आहेत. तिचे दागिनेही शोभेलसे.

 

उत्तम कॉश्चूम्सचं सध्याचं उदाहरण म्हणजे ‘क्राइम पेट्रोल’ ही मालिका. या गुन्हेगारी मालिकेत कॉश्चूमचं काय काम असं कुणाच्या मनात आलं तर वावगं नाही. पण हीच तर खासियत आहे. ही मालिका सत्य घटनांवर आधारित आहे. गुन्हे घडतात त्यात गुंतलेली माणसं सर्वसामान्य माणसं असतात. या मालिकेतली ही माणसं खरीखुरी वाटतात. ती तुमच्या-आमच्यातली वाटतात. ती ज्या जात धर्माची किंवा वर्गाची असतात, त्यानुसार त्यांची वेशभूषा आणि रंगभूषा असते. मला वाटतं संगीता सारंग याचे कॉश्चूम्स करतात.

शेवटी काय तर ही काही उदाहरणं आहेत. या विषयावर लिहावं तितकं कमीच आहे. मला सगळ्यात वाईट वाटतं ते या मालिकांमध्ये काम करणाऱ्यांचं. त्यांना हे कळत नसेल असं थोडंच आहे? त्यांना ते पसंत आहे असंही नाही. पण त्यांच्या कामाचा भाग म्हणून त्यांना ते करावं लागतं. मराठी मालिकांच्या निर्माता-दिग्दर्शकांनी तर यावर विचार करण्याची खूप गरज आहे. लोकांना आवडतं म्हणून आम्ही असं करतो असं उत्तर अपेक्षित नाहीये.

लेखिका ‘डिटीजल कट्टा’ या ऑनलाइन नियतकालिकाच्या संस्थापक संपादक आहेत.

sayali.rajadhyaksha@gmail.com

Post Comment

pallavi akolkar

Fri , 03 February 2017

अतिशय छान आहे लेख. खूप आवडला. अलीकडेच अभिराम भडकमकरांचं ’ऍट एनी कॉस्ट’ नावाचं एक अफलातून पुस्तक वाचलं होतं, त्यात त्यांनी या अशा सर्व गोष्टींमागची मानसिकता एका कथेतून दाखवली आहे. त्याचीच आठवण झाली. मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे.


Deepti Khandekar

Tue , 31 January 2017

@Ashutosh Rajwade yanchya malikanpaiki 'eka lagnachi dusari gosht' cha kapde pat ani rangbhusha apratim hoti.


Deepti Khandekar

Tue , 31 January 2017

uttam lekh!! prekshakanna khatakalele mudde agadi thos pane mandalele ahet.


Ashutosh

Sat , 28 January 2017

गांधी चित्रपटाला जेंव्हा सर्वोत्कृष्ट वेशभूषेचा पुरस्कार भानू अथीयांना मिळाला होता तेंव्हापासून हे चित्र बदलायला हवं होतं. बाकी लेखामध्ये खुलता कळी खुलेना या ग्रेट सिरीयल चा उल्लेख हवा होता. म्हणजे नायक, नायिका, त्याची आत्या हे तिघे डॉक्टर असून कोणीही एकदाही ऍपरन घालत नाही म्हणजे काय ? मराठी मध्ये काही चांगल्या सिरीयल चा उल्लेख हवा होता ज्यांचे मेकप costume सेन्सिबल आहेत. उदा. राजवाडे आणि लव्हेकर यांच्या आत्ता पर्यंतच्या सर्व मालिका.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......