सज्जन समाजाचे स्थैर्य आणि सामर्थ्य त्यांच्या एकोप्यात आहे, हे आपण महाराष्ट्रीय धर्म पाळणाऱ्यांनी कधीही विसरता नये!
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
जीवन तळेगावकर
  • समर्थ रामदास
  • Fri , 25 September 2020
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो समर्थ रामदास Samarth Ramdas दासबोध Dasbodh

श्री के. वि. बेलसरे मुंबईच्या ‘सिद्धार्थ महाविद्यालया’मध्ये तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे त्यांचे गुरू. त्यामुळे त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाला अनुभवाची जोड लाभली. त्यांच्या अनेक ग्रंथांबरोबरच त्यांनी समर्थांच्या ‘सार्थ श्रीदासबोधा’चे एक हजार पृष्ठांत विवेकी संपादन केले आहे. कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे यांनी १९७५ मध्ये हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. त्याला या वर्षी ४५ वर्षे पूर्ण झाली.

या ग्रंथाची मांडणी आकर्षक व सुलभ आहे. यात वीस ‘दशक’ आहेत. प्रत्येक ‘दशका’त दहा ‘समास' आहेत’ म्हणून त्यांना अंतर्भूत करणारे ते ‘दशक’. प्रत्येक ‘समासा’त एक विचार. दासबोधाचे ‘पूर्वार्ध’ आणि ‘उत्तरार्ध’ असे दोन भाग आहेत. पूर्वार्धात १० ‘दशक’ आणि उत्तरार्धात १० ‘दशक’ आहेत. ‘दासबोधा’च्या पूर्वार्धात ‘सिद्धान्त’ आहे आणि उत्तरार्धात ‘व्यवहार’.

‘दासबोध’ उपनिषदांचा मराठी अवतार आहे, असे साधार दाखवता येते’, असे श्री बेलसरेंचे मत आहे. उदा. ‘जे पिंडी तेचि ब्रह्मांडी’, हे विचार ‘छांदोग्य’ उपनिषदाच्या ‘तत् त्वं असि’ या वाक्यातून स्फुरले आहेत. श्री बेलसरे स्वतः इंग्रजीचे प्राध्यापक असल्यामुळे समर्पक शब्द योजतात. जसे ‘पिंड-ब्रह्मांड’ म्हणजे ‘Microcosm-Macrocosm’. एकेका ‘दशका’त १० ‘समास’ आहेत, म्हणजे एकूण २०० ‘समास’ आहेत. ‘समासा’त उद्भवणाऱ्या विचाराच्या अनुषंगाने त्याचा अर्थ परिचय ‘समासा’रंभी गद्य स्वरूपात आहे. त्यातून संपादक त्यामागील तत्त्वज्ञानाची व अध्यात्माची बैठक स्पष्ट करून देतात. तसेच ‘समासा’तील समर्थांच्या विचारांचा अर्थ पुढच्या पृष्ठावर प्रत्येक ‘ओवी’ संख्येच्या अनुक्रमानुसार मराठीत करून देतात. क्वचित मूळ विचार स्पष्ट करण्यासाठी इतर मूलभूत औपनिषदिक संदर्भ देतात. मूळ ‘समासा’त एखाद्या वेळी संस्कृत श्लोक डोकावतो, अन त्यापाठी समर्थांचे ओवीरूप विवेचन येते, त्यामागाहून संपादकांचे अर्थ-निरूपण.

‘श्री समर्थ रामदास व्यक्ती आणि तत्वज्ञान’ या ‘प्रास्ताविका’त श्री के. वि. बेलसरे यांनी समर्थ चरित्राचा आणि तत्त्वज्ञानाचा विविध अंगांनी वेध घेतला आहे. त्यात- श्री समर्थ चरित्राची रूपरेषा, व्यक्ती आणि गुणविशेष, श्री समर्थकालीन लोकस्थिती, श्रीसमर्थ संप्रदाय, श्री समर्थांचे वाङ्मय, श्रीदासबोध, श्रीसमर्थांचे तत्त्वज्ञान, परमश्रेष्ठ जीवनध्येय, मानवदेहाचे मोठे महत्त्व, परब्रह्मस्वरूप, मूळमाया, गुणमाया, विश्वमन, अज्ञान, ज्ञान आणि विज्ञान, आत्मज्ञानाची साधना, मला देव हवा, साधकावस्था, सिद्धावस्था, लोकसंग्रह, श्रीसमर्थांचा महंत, श्रीदासबोधाचा संदेश, प्रस्तुतचा अनुवाद, अशी चर्चा आहे.

पहिल्या दशकातील पहिल्याच समासात ग्रंथाचे ‘अॅबस्ट्रॅक्ट’ आहे. अगदी आपण हल्ली ‘रिसर्च पेपर’साठी देतो तसा, म्हणजे तुम्हाला यातून काय पावेल, हे आधीच सांगून समर्थ मोकळे होतात. ‘भक्तिचेन योगें देव । निश्चयें पावती मानव । ऐसा आहे अभिप्राव । ईये ग्रंथीं ॥’ किंवा ‘नासे अज्ञान दुःख भ्रांती । शीघ्रचि येथें ज्ञानप्राप्ती । ऐसी आहे फळश्रुती । ईये ग्रंथीं ॥’ सुरुवातीलाच समर्थ वाचकावर आपल्या विचारांच्या स्पष्टतेची व नेटकेपणाची मोहिनी घालतात.

समर्थ एकेका विषयावर मार्गदर्शन करताहेत. आपण त्यांच्या समोर बसून संपादित मराठी अर्थांतून ते ग्रहण करतोय, असा भाव जपून ‘सार्थ श्रीदासबोधा’चे वाचन, चिंतन, मनन करावे. ‘रामदासी’ परंपरेत या ग्रंथाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण तो नित्यपथदर्शी, समर्थस्वरूपच मानला जातो.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

‘दासबोध’ हा ‘श्रीज्ञानेश्वरी’सारखा श्रोत्यांसमोर बसून सांगितलेला ग्रंथ नाही, तो एकान्तसेवन करून जगताची चिंता वाहत घडवलेला आहे. म्हणून त्यात जीवनाविषयीचे प्रतिपादन आहे, अनेक विषय आहेत, एकच प्रतिपाद्य विषय असा नाही. त्यांच्या आयुष्यातील उन्हं उतरणीला लागल्यावर त्यांनी तो अनुभवातून सिद्ध केला आहे. म्हणून त्यांना जे सांगायचे होते, जे लोककल्याणाचे होते, ते त्यांनी रोकडेपणाने सांगितले.

‘साहित्य आणि समाज’ याबद्दल आजवर मराठी साहित्य-समीक्षेत खूप लिहिलं गेलंय. ‘साहित्य समाजाचा आरसा असतं’, ‘साहित्य आणि समाज वेगळे नांदू शकत नाहीत’ किंवा ‘ते परस्पराश्रयी; परस्परसंमिश्र असतात’ किंवा ‘एकमेकांशिवाय सफल सफल अस्तित्वदायी असत नाहीत’ इ. संत-साहित्यावर पण बदलत्या राजकीय सामाजिक स्थित्यंतराचे पडसाद उमटणे, या अर्थाने स्वाभाविक होते. ते ‘दासबोधा’तील आणि ‘गाथे’तील भाषेच्या सौन्दर्य-संदर्भाने प्रत्ययास येते. कारण एकूणच समाज ज्ञानेश्वरकालीन भाषेपासून ढळला होता. त्याला त्याच्या रूढ भाषेत कळेल असा संदेश देणे संतांसाठी क्रमप्राप्त होऊन राहिले होते. आज आपल्याला संत-साहित्य समजून घेताना, आजच्या संदर्भांना पेरावं लागतं, यामागे हीच प्रेरणा कार्यरत असते. 

सामान्यतः एखादा व्यक्ती-समष्टी जीवनाला दिशा देणारा जो कोणता महद्ग्रंथ असतो, त्याच्या सारखीच या ग्रंथाची पण सुरुवात आहे- मंगलाचरण, गणेशस्तवन, शारदास्तवन, सद्गुरुस्तवन, संतस्तवन इ. पण कर्त्याच्या अनुभवसिद्धतेचा ठसा जसा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा दिसतो, तसे इथेही आहे.

‘मी आत्माच आहे’ या भूमिकेवर जो आरूढ होतो, त्याला ‘महात्मा’ म्हटलंय. मूळ औपनिषदिक भूमिका ‘अहं ब्रह्मास्मि’ अशी आहे. शिवाय ‘दासबोधा’चा संपादकांनी लावलेला अर्थ फार समाधानकारक आहे. ‘दासाला झालेले ज्ञान’ असा.  इथे ‘दास’ आहेत ‘समर्थ’ आणि बोध करणारे व ‘श्री राम जय राम जयजय राम’ हा ‘तेरा अक्षरी’ मंत्र देणारे आहेत त्यांचे प्रभू प्रत्यक्ष ‘श्रीराम’. समर्थांनी ‘संत आनंदाचे स्थळ, संत विश्रांतीची विश्रांती, संत विवेकाचे भांडार’ असं म्हटलंय, कारण ते सामान्य माणसाला त्याच्यातील ‘आत्माराम’ शोधण्यात मदत करणारे ‘वाटाडे’ आहेत. मूळ विचार मात्र ‘आत्माराम’ समजून देण्याचा आहे. त्यासाठी जे जे ‘बरे’ करावे लागते, ‘वाईट’ टाळावे लागते, त्याचा स्पष्ट संदेश म्हणजे ‘दासबोध’ आहे.    

श्रोत्यांना (वाचकांना या अर्थी पण घेता येईल) समर्थांनी ‘तुम्ही श्रोतें जगदीशमूर्ति’ म्हटलंय. थोडक्यात सांगणाऱ्याने ऐकणाऱ्यांचा सन्मान करायचा असतो. आजकाल नेमके हेच विसरले जाते. याचा अन्वय आपल्याला ‘कठोपनिषदा’त मिळतो- ‘तेजस्वि नावधीतमस्तु’, अशी आपली गुरुशिष्य परंपरा आहे. म्हणजे यात दोघांच्याही बुद्धीचे तेज वाढो, हे अध्याहृत आहे. भारतीय औपनिषदिक परंपरेत एकाने शिकायचे आणि एकाने शिकवायचे असे नाही, तर दोघांनी मिळून ज्ञान आणि तेज ग्रहण करायचे आहे. म्हणून समर्थांनी ‘सलगी करितों’ असं म्हटलंय. ही संतांच्या ठायीची विनम्रता असते. शिवाय ‘न्यून ते पुरतें’ असे जिथे श्री ज्ञानेश्वर विनयाने म्हणतात, तिथे समर्थ ‘न्यून ते पूर्ण करावें’ असे म्हणतात. ‘विनय’ हा सामान्य गुण आहे.

काही ‘समास’ हे गृह्य / गूढ आध्यात्मिक विचारांचे आहेत, ज्यास प्रचिती नाही, त्यास ते कळणार नाहीत, असेही स्पष्ट सांगितले आहे. जसे- ‘पादसेवनभक्ती’ (दशक ४, समास ४) उदा. ‘अनुभव घेतां संतत्याग नसे, संतत्यागें अनुभव न दिसे, हें अनुभवी यासीच भासे, येरा गाथागोवी’ किंवा ‘सत्य पाहतां नाहीं असत्य, असत्य पाहतां नाहीं सत्य, सत्याअसत्याचें कृत्य, पाहणारापासीं’. ‘अजपानिरूपण’सारखा अनुभवोत्पन्न श्वास-प्रश्वासाचे वर्णन करणाराही समास आहे. यासाठी ‘तें गे तेचि आपण व्हावें’, असे झाल्यास ज्ञात्यास ज्ञेय कळते, असे समर्थ म्हणतात. समर्थ प्रयोगशील आहेत. मूर्तातून अमूर्तात कसे रमावे, याचा प्रयोग ‘अर्चनभक्ती’ या समासात आहे. यातील भाषा आधीच्या सामासांच्या तुलनेत अवघड आहे. ‘शब्दसंधी’ अधिक आहेत. ‘दासबोध’ शब्दज्ञान नाही, अनुभवज्ञान आहे, असे समर्थच सांगतात. त्याचा प्रत्यय येत राहतो.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

भारतीय परंपरेत ‘कवी’ला महत्त्व आहे, तो ‘व्हिजनरी’ असतो, असे मानले आहे, पण त्यासोबत त्याच्या अंगी ‘विवेक’ असला पाहिजे, अशी अपेक्षा उपनिषदे एकाच शब्दात व्यक्त करतात. म्हणून ते ‘ब्रह्म’ लक्षणात ‘कविर्मनीषी’ असा शब्द वापरतात. तद्वतच समर्थ- ‘आतां वंदू कवेश्वर’, ‘कीं हे कल्पनेचे कल्पतरू’, अशी कवींची वाखाणणी करतात. पण त्यांनी संतांसारखी आपली प्रतिभा अखंड जागी ठेवली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करतात. यात एकूणच परंपरेतील सृजनाचे, नाविन्याचे, प्रबोधनाचे महत्त्व अधोरेखित होते.

‘कवित्वकलानिरूपण’ या समासात ‘जेणें देहबुद्धी तुटे | जेणें भवसिंधु आटे | जेणें भगवंत प्रगटे | या नाव कवित्व ||’ असे समर्थ म्हणतात. ‘धीट’, ‘धीटपाठ’ आणि ‘प्रासादिक’ असे कवितेचे तीन प्रकार त्यांनी सांगितले आहेत, अशी नेमकी माहिती ‘मराठी विश्वकोशा’त मिळते. मनाला येईल ते बळेच धीटपणे लिहिणे हा ‘धीट’ कवित्वाचा प्रकार. जे दृष्टीस पडले तेच भक्तीवाचून वर्णिले तर त्याला ‘धीटपाठ’ म्हणावयाचे. हे दोन्ही प्रकार हीन होत. कवित्व ‘प्रासादिक’ असावे आणि देवकृपेने मुखातून निघणारे बोल ‘प्रासादिक’ ठरतात, असे ते म्हणतात. अशाच कवींना त्यांनी ‘शब्दसृष्टीचे ईश्वर’ म्हणून संबोधिले आहे.

‘सभास्तवना’मध्ये, जिथे माझे भक्त मला आळवतात, तिथे मी असतो, असे भगवंताचे मत समर्थ मांडतात. ‘माझे भक्त गाती ठाईं ठाईं, तिथें मी तिष्ठतु नारदा’. एखादेवेळी ‘समासा’त संस्कृत श्लोक येतो आणि त्याचा ‘ओवी’रूपी अनुवाद समर्थ करतात. ‘परमार्थस्तवना’मध्ये ‘जेणें परमार्थ वोळखिला, तेणें जन्म सार्थक केला’, अशी समज दिली आहे. साधारणतः परेमश्वराचे गायन जिथे होते, तिथे तो असतो, हा संदेश त्यांना द्यायचा असतो. परमेश्वराच्या ठायी खरी ‘लोकशाही’ आहे, म्हणजे त्याच्या तुम्ही किती जवळ आहात यापाठी गणित आहे, अस्ताव्यस्तपणा नाही, त्याच्या भोवती चार मंडलं आहेत, तुमची भक्ती आणि एकरूपभाव यावरून आपण कोणत्या मंडलात आहोत हे ठरतं- ‘सलोकता समीपता स्वरूपता सायोज्यता, या चत्वार मुक्ती तत्वतां’. पुढे ‘नरदेह हा स्वाधेन, कीर्तिरूपे उरवावा’, असे मार्गदर्शन आहे.

समर्थांचा विशेष म्हणजे ते ‘मूर्खलक्षण’, सारख्या समासात आडपडदा न ठेवता संदेश देतात, जसे, ‘घरीं विवेक उमजे आणि सभेमध्यें लाजे, शब्द बोलतां निर्बुजे, तो एक मूर्ख’ किंवा ‘धारीष्ट नाही जयापासीं, तो एक मूर्ख’. यालाच आपण आज ‘Courage’ किंवा ‘सभाधीट’पणा म्हणतो. आपल्यापाशी अजून काय गुण आहेत, हे लोकांना कळणार कसं, जर आपण मुखदुर्बळ राहिलो तर? याचा अर्थ, अघळपघळ बोलावे असे नव्हे, व्यक्त कोणी व्हावे याचे पण काटेकोर नियम आहेत त्यांच्याकडे.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : ‘ज्ञानेश्वरीपाठीं । जो ओंवी करील मऱ्हाठी । तेणें अमृताचे ताटीं । जाण नरोटी ठेविली॥'

..................................................................................................................................................................

लक्ष्मी चंचल आहे हे दर्शवणारी ‘लक्ष्मीचा भर्वसा धरी, तो एक मूर्ख’, ही ओवी व्यावहारिक आहे. तसेच ‘अनीतीनें द्रव्य जोडी… तो एक मूर्ख’, ‘सर्वकाळ चिंता वाहे... तो एक मूर्ख’, ‘निघा न करी पुस्तकाची... तो एक मूर्ख’, ‘जैसें जैसें करावें, तैसें तैसें पावावें’, ‘पुढिलांचें कार्य न करी... तो एक मूर्ख’, ‘शोधल्याविण करूं नये, कुळहीन कांता’, ‘विचारेंविण बोलों नये’, ‘अति क्रोध करूं नये’, ‘केल्याविण सांगो नये, आपला पराक्रमु’, ‘बहुत अन्न खाऊं नये’, ‘अल्पधनें माजों नये, हरिभक्तीस लाजों नये’, ‘कामेंविण राहों नये’, ‘सत्वगुणें भगवद्भक्ती, रजोगुणें पुनरावृत्ती, तमोगुणें अधोगती, पावति प्राणी’ या ओव्या व्यावहारिक मार्गदर्शक आहेत. रामदास स्वामींच्या ओव्या ‘आर्ष’ आहेत, वनवासी संन्यस्त ऋषीला शोभाव्यात अशा. उलटपक्षी ‘सद्विद्यानिरूपणा’त माणसाने कसे असावे याचा अर्क एका ओवीत आला आहे – ‘सावध साक्षेपी साधक । आगम निगम शोधक । ज्ञानविज्ञान बोधक । निश्चयात्मक ॥’.

समर्थांचा स्वतःचा ‘पढतमूर्ख’ असा एक शब्द आहे. त्याला संपादक ‘शहाणा म्हणवितो, आणि मूर्खपणाने वागतो, तो’, असे म्हणतात, हे अवगुण आहेत. ते प्रयत्नाने सोडता येतात. ‘न मनी तीर्थ न मनी क्षेत्र । न मनी वेद न मनी शास्त्र ।पवित्रकुळीं जो अपवित्र । तो येक पढतमूर्ख ॥’, यांचीच संख्या आज वाढली आहे, असे हा ‘समास’ वाचल्यावर लक्षात येते.

‘सत्वगुणपरीक्षा’ या ‘दशका’त माणसाला ‘मी’ पणाची जाणीव आहे, काळाचे भान आहे आणि भगवंताची जिज्ञासा आहे, असे मानले आहे. पण कोणत्या वेळी तो कसे वागतो यावर तो काय होतो, हे ठरते. या दशकात समर्थांच्या वेळच्या सामाजिक परिस्थितीचे चित्र दिसते. मग ते माणसाला छळणाऱ्या, आधिभौतिक (माणसाला माणसाकडून होणारे), आधिदैविक (देवतांमुळे होणारे), आध्यात्मिक (बाह्य संयोगावाचून होणारे), तापांचे वर्णन करतात.

समर्थांचे काही विशेष शब्द आहेत, ते त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे- खटखट, लटपट, चटपट, अविस्वासी, गाठ्याळ, लच्याळ, लौन्द, चर्फडावें, भर्वसा, क्ष्मा, चिणचिण, उपंढर, रुणानबंध, मुळारंभ, स्वयंभ, मांदुस, अनळ, सर्वारंभ, विघडे, सुन्याकार, अनुर्वाच्य, शैन्य, युगधर्म, वोळखण, चळाळ, खळाळ, भळाळ, जोजार, धगडीचा, गधडीचा, कर्णथापा, लवथवित, धुधूकार, दुल्लभ, सुल्लभ, गौल्यता, तश्कर इत्यादी.

अजून काही वैशिष्ट्ये श्री ज्ञानेश्वर ‘आघवा’ हा शब्द नित्य वापरतात. समर्थ क्वचित- ‘जाला कर्दमुचि आघवा’ असे म्हणतात. समर्थ बिघडले म्हणजे काय शब्द वापरतील सांगता येत नाही, त्याबाबतीत ते तुकारामांच्या अधिक जवळ जातात. जसे ‘भेद ईश्वर करून गेला, त्याच्या बाचेन न वचे मोडिला, मुखामध्ये घांस घातला, तो अपानीं घालावा’.   

..................................................................................................................................................................

हेही वाचा : ‘नकारात्मक’ विचाराकडून ‘सकारात्मक’ विचाराकडे जाण्याचा एक प्रयोग… करून तर पहा!

..................................................................................................................................................................

भारतीय संस्कृती मृत्यूचा सम्यक विचार करणारी आहे. ‘मृत्युनिरूपण’ या समासात ते व्यक्त झाले आहेत. ‘सरतां संचिताचें शेष । नाहीं क्षणाचा अवकाश ।’, ‘भरतां न भरतां निमिष्य । जाणें लागे ”, ‘मृत्यू न म्हणे हा हयपती । मृत्यू न म्हणे गजपती । मृत्यू न म्हणे नरपती । विख्यात राजा ॥’ पंडित नेहरूंच्या निधनानंतर पु. भा. भावे यांनी केलेले या ओवीचे विडंबन प्रसिद्ध आहे- ‘मृत्यू न म्हणे हा नेहरू, मृत्यू न म्हणे हा डेंगरु, मृत्यू न म्हणे हा कांगरू, ऑस्ट्रेलिया देशचा’. या विचाराला उपनिषदांत ‘भस्मन्तं शरीरं’ असं म्हटलंच आहे.

‘वैराग्यनिरूपणा’त ‘भगवंत भावाचा भुकेला’ असं म्हटलंय. शाहिरांनी ‘भगवन्त भुकेला भक्तीचा पाहुणा’ म्हटलंय. परंपरेत ‘भावेन देव:’ असं म्हटलंय. समर्थ पुढे ‘भावें परामार्थाचिया वाटा । वाहाती भक्तीचिया पेंठा।’, ‘आयुष्य हेचि रत्नपेटी । माजीं भजनरत्नें गोमटीं।’ फक्त या ‘रत्नपेटी’चा सदुपयोग करा, असे निसंदिग्ध सुचवतात. देवाला भाव वाहण्यासाठी या नरतनूचा उपयोग झाला पाहिजे, कारण हेच एक शस्त्र आपल्याकडे आहे, याचा कसा उपयोग करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण उचित-अनुचित तेवढे त्यांनी प्रतिपादले.

‘श्रवणभक्ती’चे महत्त्व सांगताना सगळ्या विषयांचे श्रवण असावे असे त्यांचे सांगणे. थोडक्यात बहुश्रुत असावे- ‘चौदा विद्या चौसष्टी कळा । सामुद्रिक लक्षणें सकळ कळा । बत्तीस लक्षणें नाना कळा । कैशा त्या ऐकाव्या ॥’ आजही आपण व्यवस्थापन शास्त्रात ‘Listening’ एक सद्गुण मानतोच ना!

‘कीर्तनलक्षण’ या समासात ‘क-क्ष’ या प्रत्येक व्यंजनाने सुरू होणारी ओवी आहे. ‘कीर्तनभक्ती’ हा निरूपणकारांसाठी मार्गदर्शक ‘समास’ आहे. ‘सगुण हरिकथा करावी । भगवत्कीर्ती वाढवावी । अक्षंड वैखरी वदवावी । येथायोग्य॥’, ‘बहुत करावें पाठांतर । कंठीं धरावें ग्रन्थांतर । भगवत्कथा निरंतर । करीत जावी ॥’, ‘पूर्वपक्ष त्यागून, सिद्धांत- । निरूपण करावें नेमस्त ”, ‘बहुधा बोलणें अव्यावेस्त । बोलोंचि नये ॥’, ‘सत्य पाहातां नाहीं असत्य । असत्य पाहातां नाहीं सत्य । सत्याअसत्याचें कृत्य । पाहाणारापासीं ”, ‘आपुलें आवघेंचि जावें । परी देवासी सख्य राहावें । ऐसी प्रीती जिवें भावें । भगवंतीं लागावी ” अशा हरदासाचा ‘योगक्षेम’ परमेश्वर वाहतो, असा अध्याहृत भाव आहे.

‘हरिकथालक्षणा’त ‘या नाव हरिदास | जयासि नामीं विश्वास |’, तर ‘चातुर्यलक्षणा’त ‘म्हणोन दुसऱ्यास सुखी करावें | तेणें आपण सुखी व्हावें |’, ‘समजले आणी वर्तले | तेचि भाग्यपुरुष जाले |’, ‘जितुका व्याप तितुकें वैभव |’, ‘आळसें कार्येभाग नासतो | साक्षेप होत होत होतो |’, ‘बहुतांचे मुखी उरावें | बहुतांचे अंतरीं भरावें |’, ‘शाहाणे करावे जन | पतित करावे पावन | सृष्टिमधें भगवद्‍भजन | वाढवावें ||’, असा सल्ला आहे.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : ‘गणशत्रू’ : माणसाच्या आशावादी दृष्टीकोनाची, त्याच्या जिद्दीची गोष्ट सांगणारा सिनेमा

..................................................................................................................................................................

एक लक्षात घेतले पाहिजे – ‘वर्णाश्रम’ संतांना मान्य होता. समर्थ रामदास ‘गुरु तों सकळांसी ब्राह्मण | जऱ्हीं तो जाला क्रियाहीन | तरी तयासीच शरण | अनन्यभावें असावें ||’ असं म्हणतात यात आजकाल लोकांना विशेष वाटणार नाही, पण तुकाराम महाराज- ‘ब्राह्मण जरी झाला भ्रष्ट। तरी तिन्ही लोकी असे तो श्रेष्ठ’ म्हणतात, हे विशेष ध्यानात घेतले पाहिजे. म. गांधींना जातीव्यवस्था मान्य नव्हती, पण ‘वर्णाश्रम’ मान्य होता, हे आपण सोयीस्करपणे विसरतो. याविषयी ऊहापोह स्वतंत्रपणे व्हायला हवा, एवढा हा विषय आजकाल राजकीयदृष्ट्या मोठा आहे. समर्थांच्या दृष्टीने ज्याला ‘ज्ञान’ प्राप्त होते, तो या ‘हवे-नको’ पल्याड जातो. ‘याकारणें ज्ञानासमान | पवित्र उत्तम न दिसे अन्न | म्हणौन आधीं आत्मज्ञान | साधिलें पाहिजे ||’, आत्मज्ञान साधण्यावर समर्थांचा कटाक्ष आहे. अज्ञान ते ज्ञान, नेणीव ते जाणीव या प्रवासात समर्थ ४ गट मानतात. प्रत्येक ठिकाणी समर्थांनी वर्गीकरण केले आहे. बद्ध, मुमुक्षू, साधक आणि सिद्ध असे ते उच्चतेकडे जाणारे सोपान आहेत. पुढे एकेका ‘समासा’त त्यांची लक्षणं पण ते सांगतात. अंडज, जारज, स्वेदज, उद्भिज, हे प्राणिमात्रांचे वर्गीकरण, पण एका ‘समासा’चा विषय आहे. पृष्ठ ८७८ वर ५ कोष्टके दिली आहेत. त्यात सूक्ष्म देहाची २५ तत्त्वे कोणती, स्थूलदेहाची २५ तत्त्वे कोणती, ‘तनुचतुष्टयनिरूपण’, पंचमहाभूतांसंबंधी विषय, चार वाणी व त्यांची स्थाने, चार देह व त्यांचे स्वरूप, पिंडीतील ३२ तत्त्वे, याची माहिती आहे.   

‘मायोद्भवनिरूपण’ आणि ‘मायाब्रह्मनिरुपण’ या दोन समासातून ‘माया’वादाबद्धल भाष्य केले आहे. ‘माया’ मान्य केली आहे, पण ‘ब्रह्म’ अंतिम सत्य आहे, याचा ऊहापोह केला आहे. हा आदी शंकराचार्यांचाच ‘केवलाद्वैत’ विचार आहे. ‘ब्रह्म तें अप्रत्यक्ष असे | माया ते प्रत्यक्ष दिसे | ब्रह्म तें समचि असे | माया ते विषमरूपी ||’ किंवा ‘एवं सृष्टि मिथ्या जाण | जाणोनि रक्षावें सगुण | ऐसी हे अनुभवाची खूण | अनुभवी जाणती ||’, ब्रह्मनिरुपण ‘ईशावास्य’ उपनिषदात ‘पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते’ अशा स्वरूपात येते, तर ‘माया’- ‘सा च माया न विद्यते’, अशी येते.  

वर सांगितल्याप्रमाणे समर्थांना बोलघेवडेपणा मान्य नाही, त्याला अनुभवाची दृष्टी पाहिजे, तर ते श्रोत्यांपर्यंत पोचते. ‘जेथें निरूपणाचे बोल | आणी अनुभवाची वोल | ते संस्कृतापरीस खोल | अध्यात्मश्रवण ||’ किंवा ‘ज्ञानेंविण निरूपण बोलोंचि नये’. तसेच समर्थांना गबाळेपणाचा तिटकारा आहे. अध्यात्म समजून घेण्यासाठी अनुभवी संत असावा, इतरांचे कंटाळवाणे ‘सुने’ बोल ऐकूच नयेत, असे ते स्पष्ट सांगतात. ‘प्रचितीविण जें बोलणें, ते अवघेंचि कंटाळवाणें’. कारण ते स्वतः अनुभवाशिवाय बोलत नाहीतच – ‘हें प्रचितीचें बोलिलें | आधीं केलें मग सांगितलें |’.

‘लेखनक्रियानिरूपण’ या समासात शुद्धाक्षराबद्दल ऊहापोह आहे. ‘जनासी पडे मोहन, ऐसे करावें’, असे म्हटले आहे. समर्थांना त्यांचा ‘महंत’ पण शुद्ध चारित्र्य असलेला, गोमटे अक्षर असलेला, अभ्यास, निदिध्यास करणारा, धैर्यशील, आलस्य टाकून कार्यरत विवेकाने राष्ट्रनिर्माण करणारा अपेक्षित आहे.

एक लक्षात ठेवावं, संघर्ष हा कायम माणसाच्या सोबतीला असतो, त्याला धीटपणे तोंड देत परमार्थ साधायचा असतो. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही व्यवस्थित करणे गरजेचे आहे, एक टाकून दुसरे कर, असे समर्थ सांगत नाहीत. ‘प्रपंच करावा नेमक | पाहावा परमार्थविवेक | जेणेंकरितां उभय लोक | संतुष्ट होती ||’, ‘आधीं प्रपंच करावा नेटका | मग घ्यावें परमार्थविवेका | येथें आळस करूं नका | विवेकी हो ||’

लोकसंग्रह करणाऱ्याने कसे वागावे, हे ‘राजकारणनिरूपण’ या समासात आले आहे. ‘उपाधीसी विस्तारावें, उपाधींत न संपडावें’, ‘राजकारण बहुत करावें, परंतु कळोंच नेदावें’. पुढे ‘उत्तमपुरुषनिरूपणात’ हेच आले आहे – ‘कीर्ती पाहों जातां सुख नाहीं | सुख पाहातां कीर्ती नाहीं |’, म्हणजे कष्टाला पर्याय नाही. ‘जें जें जनास मानेना | तें तें जनहि मानीना |’, ‘याकारणें बहुतांला | राजी राखावें ||’. लोकसंग्रह करणाऱ्याला ‘विवरणनिरूपणात’ अगदी व्यावहारिक सल्ला आहे. म्हणून ‘दासबोध’ अशांनी वाचला पाहिजे – ‘जगामधें जगमित्र | जिव्हेपासीं आहे सूत्र | कोठें तरी सत्पात्र | शोधून काढावें ||’, ‘सकळामधें विशेष श्रवण | श्रवणाहून थोर मनन | मननें होय समाधान | बहुत जनाचें ||’. दशक १९, समास १ शिकवण', लोकसंग्रह करू इच्छिणाऱ्या नेत्याची ‘भगवद्गीता’ आहे, असे म्हटले आहे.

‘उत्तमपुरुषनिरूपणा’त ‘अति सर्वत्र वर्जावें | प्रसंग पाहोन चालावें |’, असं म्हटलंय. ‘जनस्वभावनिरूपणा’त ‘कष्टेंविण फळ नाहीं | कष्टेंविण राज्य नाहीं | केल्याविण होत नाहीं | साध्य जनीं ||’ म्हणून समर्थांनी ‘प्रयत्नवादा’चे बाळकडू दिले, असे म्हणावे लागते, त्यांनी विवेकही शिकवला, ‘विचारें नित्यानित्य विवेक | पाहिला पाहिजे ||’.

‘करंटलक्षणनिरूपणा’त असेच सूत्र आहे, ‘राखावीं बहुतांची अंतरें | भाग्य येतें तदनंतरें |’, ‘झिजल्यावांचुनी कीर्ति कैंची | मान्यता नव्हे कीं फुकाची |’, असं म्हटलंय, हे किती प्रॅक्टिकल आहे! म्हणून ‘सदेवलक्षणनिरूपणा’त ‘नाना उत्तम गुण सत्पात्र | तेचि मनुष्य जगमित्र | प्रगट कीर्ती स्वतंत्र | पराधेन नाहीं ||’, म्हटलंय.   

‘सूर्यस्तवननिरूपणा’त सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगितले आहे. ते स्वतः नियमित १००० सूर्यनमस्कार घालीत.  ‘सकळ दोषाचा परिहार | करितां सूर्यास नमस्कार | स्फूर्ति वाढे निरंतर | सूर्यदर्शन घेतां ||’

..................................................................................................................................................................

हेही वाचा : आम्हा पती-पत्नीला या महाभयानक रोगाची लागण होऊन आम्ही सुखरूपपणे त्यातून बाहेर पडलो…

..................................................................................................................................................................

भूगोलाच्या अभ्यासकाला सुखावणाऱ्या ओव्या आहेत. त्या भारतभ्रमण करणाऱ्या समर्थांच्या आहेत. ‘पृथ्वीस्तवननिरूपण’ वाचले पाहिजे. ‘ऐसा त्या भूगोळाचा पार | कोण जाणे ||’, ‘अवघी पृथ्वी फिरोन पाहे | ऐसा प्राणी कोण आहे |’, ‘नाना वल्ली नाना पिकें | देशोदेशी अनेकें | पाहों जातां सारिख्या सारिखें | येकहि नाहीं ||’, ‘नाना वल्ली बीजांची खाणी | ते हे विशाळ धरणी | अभिनव कर्त्याची करणी | होऊन गेली ||’,    

‘बुद्धिवादनिरूपणा’त ‘उत्कट भव्य तेंचि घ्यावें | मळमळीत अवघेंचि टाकावें | निस्पृहपणें विख्यात व्हावें | भूमंडळीं ||’, असा सल्ला आहे. ‘येकांती विवेक करावा | आत्माराम वोळखावा | येथून तेथवरी गोवा | कांहींच नाहीं ||’

‘येत्ननिरूपणा’त झाकली मूठ बद्धल सांगितले आहे. ‘अभ्यासें प्रगट व्हावें | नाहीं तरी झांकोन असावें | प्रगट होऊन नासावें | हें बरें नव्हे ||’ त्यांना विस्कळीतपणा मान्य नाही.

पुन्हा ‘राजकारणनिरूपण’ आहे. यात मोलाचा संदेश आहे- ‘ज्ञानी आणी उदास | समुदायाचा हव्यास | तेणें अखंड सावकास | येकांत सेवावा ||’, ‘अखंड राहातां सलगी होते | अतिपरिचयें अवज्ञा घडते | याकारणें विश्रांती ते | घेतां नये ||’, ‘आळसें आळस केला | तरी मग कारबारचि बुडाला | अंतरहेत चुकत गेला | समुदायाचा ||’, ‘जो दुसऱ्यावरी विश्वासला | त्याचा कार्यभाग बुडाला | जो आपणचि कष्टत गेला | तोचि भला ||’. खरी गंमत तर पुढे आहे –‘हुंब्यास हुंबा लाऊन द्यावा | टोणप्यास टोणपा आणावा | लौंदास पुढें उभा करावा | दुसरा लौंद ||’ किंवा ‘धटासी आणावा धट | उद्धटासी पाहिजे उद्धट | खटनटासी खटनट | अगत्य करी ||’, ‘जैशास तैसा जेव्हां भेटे | तेव्हां मज्यालसी थाटे | इतुकें होतें परी धनी कोठें | दृष्टीस न पडे ||’

राजकारणी माणसाने सगळे घडवून आणावे, पण स्वतः त्यात गुरफटू नये, हा किती व्यावहारिक संदेश आहे पहा. कारण चांगल्या राजकारण्यांचा मूळ उद्देश व्यापक असला पाहिजे, त्याने उपाधीत स्वतःला बांधून घेऊ नये. ‘उपाधींत सांपडों नये | उपाधीस कंटाळों नये | निसुगपण कामा नये | कोणीयेकविषीं ||’ कारण ‘संसार मुळींच नासका | विवेकें करावा नेटका | नेटका करितां फिका | होत जातो ||’

‘पूर्णनामदशका’त ‘सामर्थ्य आहे चळवळेचें | जो जो करील तयाचें | परंतु येथें भगवंताचें | अधिष्ठान पाहिजे ||’ असा विश्वास समर्थ देतात.

‘वरकड देहे हें काबाड | नरदेह मोठें घबाड | परंतु पाहिजे जाड | विवेकरचना ||’ समर्थ नरदेहाला ‘घबाड’ म्हणतात. शाहीर रामजोशी ‘भला जन्म हा तुला लाभला’, म्हणतात तेव्हा त्यांना ८४ योनींच्या फेऱ्यांतून प्राप्त होणाऱ्या दुर्लभ नरदेहाविषयीच सांगायचे असते. समर्थ पुढे म्हणतात, पण ‘आळस’ हा वैरी, तो टाकून माणसाने आपल्यातील ‘राम’, ‘आत्माराम’ ओळखला पाहिजे. ‘येथें जेणें आळस केला | तो सर्वस्वें बुडाला | देव नाहीं वोळखिला | विवेकबळें ||’, ‘नर तोचि नारायण’, म्हणण्यामागे जी भूमिका आहे, ती ‘ईशावास्या’तील मंत्राप्रमाणे ‘तदन्तरस्य सर्वस्य’, अशीच आहे.      

‘देहक्षेत्रनिरूपणा’त सगळ्या पंचेंद्रियांचे वर्णन येते. ‘श्रोत्रइंद्रिये शब्द पडिला… त्वचेइंद्रिये सीतोष्ण भासे… चक्षुइंद्रिये सकळ दिसे… जिव्हेमध्ये रस चाखणे… घ्राणामध्ये परिमळ घेणे इ. आता हे वर्णन आधुनिक विज्ञानापेक्षा वेगळे काही सांगत नाही, तसेच शोधू जाता अनेक दाखले देता येतील, म्हणून संत साहित्य आधुनिकांच्या संशोधनाचा विषय होत राहते, आपण जी दृष्टी ठेवून शोधू, त्या नुसार सार गवसत राहते.       

‘दासबोधा’च्या अनुषंगाने इतर संबंधित साहित्य वाचण्यात आलं, काही ऐकण्यात आलं, पाहण्यात आलं. प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या ओघवत्या वाणीतून ‘समर्थ रामदास’ हे व्याख्यान चार भागांत ‘यू-ट्यूब’वर उपलब्ध आहे, विद्यार्थ्यांनी व अभ्यासकांनी अवश्य ऐकावे असे - 

लोकांच्या मनाला सोप्या शब्दांत साद घालतात ती ‘कीर्तनं’, महाराष्ट्राला याची मोठी परंपरा आहे, पण काळाच्या ओघात हरीकथाच कीर्तनात दुय्यम ठरत असताना किंवा त्यातील ‘समाज-प्रबोधन’ हे प्रयोजन लोप पावत असताना त्याचे पुनरुत्थान आवश्यक होऊन राहिले होते, ते केले संतकवी दासगणूंनी. दोन लाखपेक्षा अधिक पद्यरचना त्यांच्या एकूण साहित्यात आहे. ‘संतांची चरित्रं’ हाच मुळी त्यांच्या साहित्य पूजेचा गाभा राहिला. ती चरित्र ऐकणाऱ्याच्या वैचारिक पातळीवर नेऊन ठेवायची की, ऐकणाऱ्याला कीर्तनकाराच्या अभिरुचीच्या पातळीवर घेऊन यायचे, या द्वंद्वातून त्यांनी ती ‘पूर्वरंग आणि आख्यान’ अशा घाटदार मार्गाने सोडवली. ‘पूर्वरंगा’चा गाभा नेहमीच वैचारिक राहिला आणि आख्यानाचा भगवद्भक्ती-प्रधान. याच लोक-प्रबोधनाच्या भावनेतून दासगणूंनी वैसायिक वा हरदासी कीर्तनपरंपरा जीवित ठेवली, ती पुढे प्रा. अनंतराव आठवले (स्वामी वरदानंद भारती) यांच्या व्यासंगी व प्रासादिक वाणीतून वाहती राहिली. या परंपरेतील ‘श्रीरामदास स्वामी चरित्र’ या आख्यानाचा पूर्वरंग पुढे पाहता येईल-

समर्थांच्या मनाच्या श्लोकांवरील ‘मनोबोध’ हे प्रा अनंतराव आठवले यांचे ५६० पृष्ठांचे पुस्तक पाहिल्यास समर्थांच्या भाषेचे नेमके विश्लेषण आढळते. त्यांनी यासाठी उपयोजिलेला, ‘नातिसंक्षेपविस्तरम्’ हा शब्द अतिशय समर्पक वाटतो. या ग्रंथाला श्री चं. प. भिशीकर यांची प्रस्तावना आहे.

‘आत्माराम दासबोध, माझे स्वरूप स्वतः सिद्ध’ ही समर्थांची ‘दासबोधा’कडे पाहण्याची दृष्टी होती, तद्वतच ब्रह्मलीन स्वामी वरदानंद भारतींनी ‘मी म्हणजे ना शरीर, मी मद् ग्रंथाचा संभार’, असे म्हटले आहे. प्रतिमा, अवतार, अंतरात्मा आणि निर्विकारी, ‘ऐसे हे चत्वार देव’ समर्थांनी मानलेले आहेत, असाही ‘मराठी विश्वकोशा’त उल्लेख आहे. आपल्याकडे ‘दासबोधा’ला उपनिषदांचा अर्क मानणारी परंपरा आहे, तद्वतच स्वामी वरदानंद भारतींनी ‘उपनिषदर्थ कौमुदी या आपल्या उपनिषदांवरील ‘मांडूक्य’ भाष्यामध्ये ‘वैश्वानर तैजस, प्राज्ञ आणि तुरीय, असे आत्म्याचे चतुःपाद आहेत’, असे विवेचन केले आहे. आता हाच विचार आणि त्यातील स्पष्टता ‘पातंजल-योग’ सूत्रात आहे, असे ‘Inner Engineering’ या पुस्तकात श्री सद्गुरुंनी मांडले आहे. तेव्हा भारतीय वैदिक संस्कृतीत आत्म्याच्या चार अवस्थांचा झालेला विचार, आधुनिक म्हणवणाऱ्या ‘Personality Development’च्या कोणत्याही कोर्समध्ये ‘External Self’ आणि ‘Inner Self’च्या पलीकडे झालेला नाही, हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्यापुढे ‘Subconscious Self’ आणि ‘Selflessness’ हा विचार होणे आता आवश्यक आहे.

समर्थांचे शेकडो अभंग आहेत, पण ते थोडे, दुर्लक्षित होते. ‘श्रीसमर्थ रामदास स्वामी यांच्या अभंगांचा गाथा’, हे साक्षेपी संपादन श्री चन्द्रशेखर आठवले यांनी केले आहे. या ६०० पृष्ठाच्या ग्रंथात समर्थांच्या २०८३ अभंगांचे ५ प्रकरणांत एकत्रीकरण केले आहे. आज महाराष्ट्रीय संतांच्या  मांदियाळीत समर्थांचे नाव सहजपणे येत नाही, हे खेदाने नमूद करताना संपादकीयात समर्थांवर स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या असहिष्णू महाराष्ट्रात होणाऱ्या हेत्वारोपातील लांगडेपणा स्पष्टपणे दाखवून दिला आहे. या पुस्तकाचे जे नाविन्यपूर्ण ‘बुकमार्क’ आहे, त्यावर संतकवी दासगणू महाराजांनीं लिहिलेले प्रासादिक ‘श्रीसमर्थाष्टक’ आहे. आज या अष्टकातील एका पंक्तीचा संदर्भ अपरिहार्य बनून राहतो- ‘उदेला असे जातिजातीत द्वेष, करावा झणी तो तुम्ही नामशेष, जुटीवाचुनी यत्न होतील वाया, गणूची विनंती असे हीच पाया’, निर्मल अंतःकरणाने ‘संत-चरणरज’ लोकांना जाती विद्वेष टाकून कायम एकत्र येण्याचे मार्गदर्शन करत असतात, हेच दिसते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

‘महाराष्ट्र सारस्वत’कार श्री वि. ल. भावे यांनी समर्थ रामदास आणि संत तुकाराम यांची तुलना केली आहे, ती अप्रशस्त वाटते हे खरे आहे, पण त्यावर असभ्य; अर्वाच्य भाषेत स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या लोकांकडून टीका झाली, होते. ज्या जातीपातीचे राजकारण आज उभे केले आहे, ते संतांच्या अंतरंगी कधीच नव्हते, हे ज्यांना कळत नाही त्यांना फक्त वापरले जाते. समर्थांचे म्हणणे आहे- ‘साधु दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले’, तसेच तुकाराम महाराज म्हणतात-‘यातायातीधर्म नाही विष्णुदासा’. तेव्हा सज्जन समाजाचे स्थैर्य आणि सामर्थ्य त्यांच्या एकोप्यात आहे, हे आपण महाराष्ट्रीय धर्म पाळणाऱ्यांनी कधीही विसरता नये. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होत. परमार्थाचा अधिकार पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही आहे, असे रामदास मानत. या समावेशक संताला संत मांदियाळीत महाराष्ट्राने समाविष्ट करून घेतले पाहिजे.       

सार्वजनिकरित्या आता मोठ्या प्रमाणावर आपण देशभर व परदेशात श्री गणेशाची पूजा करतो, तेव्हा चतुर्थीला ‘आवाहान’ आणि चतुर्दशीला ‘विसर्जन’ करतो. ‘आवाहन विसर्जन, हेंचि भजनाचें लक्षण’, असं समर्थांनी म्हटलंय. याचा साक्षेपी अर्थ श्री बेलसरे सांगतात – ‘विसर्जन म्हणजे देवाला स्वस्थानी पोचवणे’, हे गणेशभक्तांना माहीत होणे आवश्यक आहे, कारण बऱ्याच वेळा आपण असे का करतो याचे समाधानकारक उत्तर आपल्याकडे नसते, ते अशा ग्रंथांतून लाभते.

‘दासबोधा’सारखा ग्रंथराज आपण वाचला पाहिजे. आता ‘डिजिटलायझेशन’मुळे बरीच सोय झाली आहे, पुढील लिंक वर संपूर्ण ग्रंथ उपलब्ध आहे-

http://www.dasbodh.com/2018/02/blog-post_48.html

ज्यांना ऐकायचे आहे त्यांची पण सोय आहे- ‘राज्य मराठी विकास संस्थे’ने पं. संजीव अभ्यंकर यांच्या आवाजात सुश्राव्य दासबोधाचे प्रकाशन केले आहे-

https://rmvs.marathi.gov.in/163

..................................................................................................................................................................

लेखक जीवन तळेगावकर व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून काम करतात.

jeevan.talegaonkar@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Sun , 27 September 2020

जबरदस्त ओळख. प्रणाम घ्यावा, जीवनराव!
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......