रूढ आणि क्लिशे समजुतींना ‘मायलेकी-बापलेकी’तले अनुभव जोरदार धक्के देतात!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
संध्या टाकसाळे
  • ‘मायलेकी-बापलेकी’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 11 September 2020
  • ग्रंथनामा शिफारस मायलेकी-बापलेकी Maayleki-Baapleki सोनाली कुलकर्णी Sonali Kulkarni दासू वैद्य Dasoo Vaidya ऋषीकेश गुप्ते Rushikesh Gupte आशुतोष जावडेकर Ashutosh Javadekar

बाळाचा जन्म हे मानवजातीच्या इतिहासातलं आद्य पान. कितीही वर्षांचं झालं तरी त्या घटनेभोवती असलेलं जादुई वलय, विस्मय, कुतूहल आणि उत्सुकता तेवढीच ताजी आणि टवटवीत. साधा ‘निसर्ग नियम’ किंवा वर्षानुवर्षं चालत आलेलं सृष्टीचं चक्र म्हणून नाही निकालात काढता येत त्याला. स्वतःच्याच शरीरातून आपल्याच रूपा-गुणाचं कुणीतरी या भूतलावर अवतरणं, या आश्चर्याला सर्वोच्च प्रकारची ‘आनंददायी सर्जनशीलता’ नाही तर दुसरं काय म्हणायचं?

मात्र, सगळ्या संवेदना जाग्या ठेवून हा अनुभव घ्यायला हवा. या अनुभवातल्या सजगपणाविषयी मी बोलते आहे. मातृत्वाच्या तथाकथित आणि घिस्यापिट्या गोडव्याबद्दल नाही किंवा पारंपरिक समाजरचनेनं सक्तीच्या केलेल्या जबाबदारीविषयीही नाही. कोणत्याही प्रकारात लादलेपण आलं की, त्यातला आनंद संपला. निवडीचं आणि निर्णयाचं स्वातंत्र्य या दोन्ही गोष्टी अगदी कळीच्या आहेत.

पूर्वी तर बाळाचा जन्म आणि संगोपन ही बहुतांशी आईचीच जबाबदारी असल्यानं पुरुष या आनंदाला पारखे व्हायचे. मुळातच गरोदरपण अनुभवण्याचा आणि जन्म देण्याचा आनंद फक्त स्त्रियांना देऊन निसर्गानं पुरुषाला थोडं उपरं केलंच आहे. वर संगोपन ही ‘कमी अकले’ची, ‘पुरुषार्था’ला बाधा आणणारी गोष्ट मानली जायची. मुलांना फक्त रागावण्याचा आणि बदडण्याचा अधिकार आपल्याकडे ठेवून पुरुषांनी जो अमाप आनंद गमावलाय, त्या पुरुषांना तेवढी शिक्षा पुरेशी आहे, असं म्हणायला हवं.

त्यामुळे काळ बदलला तरी, बापांनी मूल विशेषतः मुलगी वाढवताना त्याबद्दल लिहिणं याला अजूनही महत्त्व आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे मुलीला ‘बाय-प्रॉडक्ट’ म्हणून वागवण्याची जुनी प्रथा. प्रेमापासून ते खाण्यापिण्यापर्यंत सगळं काही मुलासाठी. मुलीच्या जातीनं असं... मुलीच्या जातीनं तसं, एवढंच मुलींच्या वाट्याला. पण पुन्हा तेच... काळ बदलला आणि मुली डोक्यावर मिऱ्या वाटायला लागल्या तरी मुलगी वाढताना लिहिणं याला ऐतिहासिक महत्त्व आहेच.

त्यामुळेच, ‘मायलेकी-बापलेकी’ या ‘अक्षरनामा’ आणि ‘डायमंड पब्लिकेशन्स’नं प्रकाशित केलेल्या ताज्या पुस्तकाविषयी बोलायला हवं.

‘बापलेकी’ या विषयावर २००४ मध्ये एक सुंदर पुस्तक मौजेनं काढलं होतं. पद्मजा फाटक, दीपा गोवारीकर आणि विद्या विद्वांस यांनी त्याचं संपादन केलं होतं. त्यात गौरी देशपांडे, सई परांजपे, प्रिया तेंडुलकर अशा अनेक नामवंत मुलींनी आपल्या वडिलांविषयी आणि मे. पुं. रेगे, विजय तेंडुलकर, वसंत गोवारीकर अशा बापमाणसांनी त्यांच्या मुलींविषयी लिहिलं होतं. या पुस्तकाची प्रेरणा ताज्या ‘मायलेकी-बापलेकी’ पुस्तकामागे आहे.

संपादकीय मनोगतात राम जगताप यांनी म्हटलं आहे की, “ ‘बापलेकी’ आणि ‘एकच मुलगी’ या पुस्तकांनी माझा दृष्टीकोन घडवला. ‘बापलेकी’मध्ये एकाही आईचा लेख नाही, कारण तो त्या पुस्तकाचा विषयच नव्हता. ‘एकच मुलगी’मध्ये (संपादक - अरुण शेवते) मात्र सहा आयांनी आपापल्या लेकींवर लिहिले आहे. पण या दोन्ही पुस्तकांचा उद्देश मायलेकी-बापलेकी नात्याचा वेध घेणं हा नव्हता. मायलेकी-बापलेकी या नात्याकडे आजचे पालक कसे पाहतात, ते समजून घ्यावं हा आमचा मुख्य उद्देश्य या पुस्तकामागे आहे.”

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

एकूणच, हा विषय इतका सदाबहार आहे की, या नव्या पुस्तकाचं स्वागत करायला हवं. संपादक द्व्याला या विषयाची मनापासून आस्था आहे आणि पुस्तकातून अनेक पैलू समोर यावेत, यासाठी  त्यांनी प्रयत्नही केले आहेत, हे जाणवत राहतं. ‘मायलेकी’ विभागात नऊ आयांनी मुलीवर लिहिलं आहे, तर ‘बाप-लेकी’मध्ये आठ बापांनी! यातले बरेच आई-बाबा लेखन, पत्रकारिता अशा क्षेत्रांशी संबधित आहेत. त्यामुळेच की काय, त्यांचे अनुभव अगदी वाचनीय शब्दांत आणि शैलीत उतरले आहेत.

पहिलाच लेख आहे सोनाली कुलकर्णी यांचा. त्या नुसत्याच अभिनेत्री नाहीत तर उत्तम वाचक आणि लेखक आहेत. त्यांच्या मुलीबरोबरच्या नात्यात ही संवेदना जाणवते. मुलीचं खाणं-पिणं, खेळणं, वाचन, शाळा, समाजातलं वावरणं, फिल्मी विश्व याविषयी त्या बोलत असताना त्यांनी निश्चितच काही एक विचार ठेवला आहे, हे जाणवतं. मुलीला वाढवताना आपण स्वतः कशा बदललो, परिपक्व होत गेलो, हे त्या अनेक उदाहरणांतून सांगतात. मुलीमुळे नवरा-बायकोचं सहजीवन अधिक संपन्न आणि समृद्ध होत जातं, हा त्यांचा मुद्दा कुणालाही पटावा असाच आहे.

या पुस्तकातली एक गोष्ट मला खूप आवडली. रूढ आणि क्लिशे समजुतींना यातले अनुभव जोरदार धक्के देतात. उदाहरणार्थ, मुलगा आणि मुलगी याबाबत काही ठाम समजुती अनेक घरांमध्ये अजूनही असतात. मुलगा म्हणजे खोडकर, खूप दांडगाई करणारा, स्वतःला हवं तेच करणारा, आक्रमक आणि बिनधास्त. तर मुलगी म्हणजे शांत, सांगू ते चटकन ऐकणारी, गोंधळ न घालणारी. थोडक्यात समजूतदार आणि सांभाळायला अगदी सोपी. गमतीचा भाग असा की, अनेक लेख ही गृहितकं उधळून लावतात. सख्ख्या बहीण-भावंडामध्ये मुलगा शांत समजूतदार, तर मुलगी महा ढालगज. भक्ती चपळगावकर आणि ममता क्षेमकल्याणी या दोघींनीही खुमासदार शैलीत ते लिहिलंय. दोघींनाही पहिला मुलगा आणि दुसरी मुलगी. मुलगा स्वभावानं शांत, शिस्तशीर, त्यामुळे आता मुलगीही तशीच असेल या त्यांच्या कल्पनेला सुरुंग लागतो. मुली दंगा, खोड्या यात माहीर, स्वतःचंच खरं करणाऱ्या, चंट, दमात घेणाऱ्या. मग आयांची त्या सगळ्याशी जुळवून घेताना उडालेली त्रेधा. मुलींविषयी त्या हे सांगत असताना पालक म्हणून आपल्या ज्या काही ठोस कल्पना असतात, त्या तपासायला त्या भाग पडतात. प्रत्येक मूल वेगळं असतं आणि त्यानुसार पालकांना त्यांना वाढवण्याच्या कल्पना बदलाव्या लागतात. “दोन भिन्न स्वभावाच्या मुलांबरोबर वाढत आणि घडत जाण्याचा अनुभव संपन्न करणारा आहे,’’ हेही त्या आवर्जून सांगतात.

ममता क्षेमकल्याणी यांच्या अनुभवाला आणखी एक वेगळं परिमाण आहे, वेगळा धागा आहे. आपलं स्वतःचं बालपण आणि आता मुलीचं बालपण यामध्ये पडलेला फरक त्यांनी नेमका, हळूवारपणे आणि त्रागा न करता पकडला आहे. घरातलं चौथं अपत्य असण्याचा ममता यांचा स्वतःचा अनुभव. त्या म्हणतात, “अशा (मध्यमवर्गीय) घरांमधले जवळपास सगळेच पालक ‘आम्हाला आमची सगळीच मुलं सारखी’ असं म्हणून येता-जाता आपल्या लेकरांची उगाच समजूत काढताना मी पाहिले आहेत आणि अनुभवलेलेदेखील आहेत.” हा धागा शेवटी जुळवताना त्या लिहितात, “खूप लाजरं-बुजरं असलेलं माझं बालपण आणि अनेक वर्ष स्वतःच्या आवडीचा रंगही माहीत नसलेलं माझं लहानपण मला माझ्या लेकीमुळे पुन्हा पुन्हा आठवत राहतं. तिचा ठामपणा, तिचा कणखरपणा जपत मी रोजच माझ्या बालपणात डोकावत असते.”

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

..................................................................................................................................................................

तर अशा कणखर आणि निर्भरपणे वाढणाऱ्या लेकींची प्रतिबिंब पुस्तकात जागोजागी आढळतात. आईपण अनुभवणं, त्यातली मजा लुटणं, मुलीबरोबर फुलत जाणारं नातं निरखणं हे जवळ-जवळ सगळ्यांनी लिहिलं आहे. मात्र, मुलगी वेगळ्या पद्धतीनं वाढते आहे म्हटल्यावर आईपणाच्या या प्रवासात अपरिहार्यपणे काही प्रश्न, अडचणी, शंका-कुशंका आणि अनामिक भीती येणारच. हेही इथं अगदी मोकळेपणाने व्यक्त झालं आहे. मोठ्या सोसायटीत गणपती किवा इतर समारंभांच्या निमित्तानं मुली एकट्या खाली गेल्या की, यांना कुणी फसवून तर नाही नेणार? असे भीतीदायक आणि नाही नाही ते विचार मनात येतात, असं अमिता दरेकर म्हणतात. अनोळखी माणसांबरोबरचं आपल्या मुलीचं बिनधास्त वागणं-बोलणं कीर्ती परचुरे यांना काळजीत टाकतं. प्रिया सुशील म्हणतात, “एक आई म्हणून मला तिचा जेवढा अभिमान वाटतो, तेवढीच तिची काळजीही वाटते. आमच्या घरात मुलीचं स्थान खास आहे. मुली उच्चशिक्षित, स्वावलंबी आहेत आणि मुलं नि:संकोचपणे स्वयंपाकघरात मदत करतात. त्यामुळे स्त्री-पुरुष समानता बघतच ती मोठी होते आहे. पण उद्या समाजात वावरताना हे भेद बघून तिला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मी देऊ शकेन की नाही, याची मला खात्री देता येत नाही.”

पालक म्हणून झालेला आपला प्रवास टिपताना सीमा शेख-देसाई यांनी एक मुद्दा मांडला आहे, तो बहुतेक पालकांना पटावा. त्यांची मुलगी समंजस आणि मदतीला तत्पर आहे. ती भरपूर दंगाही करते. त्या म्हणतात, “ती टॉम बॉय आहे असं तिच्या शिक्षकांनी सांगितलं. मग म्हटलं, ‘काय हरकत आहे! असू दे’. आता मुलींना असंच राहावं लागतं. ती थोडी अग्रेसिव्ह आहे, शाळेत ती मुलींची लीडर असते. तिच्या बेस्ट- फ्रेंड्सना कुणी त्रास दिला तर हीच त्रास देणाऱ्या मुलांशी पंगा घेते. तिच्या गुंडगिरीला आम्ही खतपाणी नक्कीच घातलं नाही, पण तिच्या या स्वभावाला मुरडही घातली नाही. कारण आज अशा अॅटिट्यूडची गरज आहे असं आम्हाला वाटतं.”

आजच्या काळाचे पडसाद या सगळ्या जणींच्या लेखनात असे सहज येतात.

‘मायलेकी’ विभागातले दोन लेख वेगळे आहेत. नयना जाधव आणि अश्विनी काळे यांचे. कारण मातृत्व निभावण्यासाठी त्यांच्यासमोरची आव्हानं भली मोठी आणि अवघड होती.

नयना या सहाय्यक पोलीस निरीक्षक. १२ तास आणि त्याहूनही अधिक काळाची तणावाची ड्युटी. विशेषतः निवडणुकांचे प्रचार, गणपती विसर्जन मिरवणूक, व्हीव्हीआयपी दौरे अशा वेळी काही वेळा घरी यायला रात्रीचे दोन–तीन हमखास व्हायचे. त्याचा परिणाम काहीसा गंभीर झाला. “आईची आठवण येते आहे, मला घरी जायचंय असं म्हणून ‘परी (मुलगी) शाळेत खूप रडते म्हणून  शाळेत भेटायला बोलावलंय’ असा निरोप आला. उत्स्फूर्तपणे कर्तव्य बजावत असताना, अनावधानानं का होईना मुलीकडे दुर्लक्ष होत होतं याचं खूप वाईट वाटलं.” पण कुटुंबाच्या खंबीर पाठिंब्यामुळे त्या सर्व जबाबदाऱ्या पार पडू शकल्या.

अश्विनी काळे याचं आईपण तर सर्वांपेक्षा अवघड. वयाच्या दुसऱ्याच वर्षी त्यांना पोलिओनं गाठल्यामुळे व्हिलचेअरवरचं आयुष्य वाट्याला आलं होतं. लग्न आणि त्याहूनही मातृत्व या खूपच  दूरच्या गोष्टी होत्या. पण त्या आयुष्यात आल्या! आईपण त्या कसं निभावत आहेत, हे मुळातूनच वाचण्यासारखं आहे. दोन-अडीच वर्षांच्या मुलीला सकाळी बाबा शाळेत सोडत असे आणि शाळा सुटल्यावर तिला घरी आणणं हे दिव्य त्या स्वतः पार पाडत. व्हिलचेअरवर बसून घरून निघालं, तर शाळेत पोचायला २०-२५ मिनिटे लागत. मग मुलीला मांडीवर घेऊन, अत्यंत गजबजलेले रस्ते पार करत व्हिलचेअरवरून घरी येणं, हे दिव्य त्यांनी केलं. केवळ नवऱ्याचाच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचा आधार आणि सहकार्य मोलाचं ठरल्याचं नयना आणि अश्विनी दोघींनी म्हटलं आहे.

मात्र मुलीला वाढवताना आपण किती शिकत आणि बदलत गेलो, हे पुस्तकाचे म्हणावे असे सूत्र या दोघींच्याही निवेदनात आहे. अडथळ्यांच्या शर्यतीचा पण खूप शिकवणारा हा प्रवास आहे.

पुरुषपणाच्या कल्पनांना हादरे

बाप मुलींबाबत चांगलेच हळवे असतात. बाप होण्याचा क्षण, त्या मऊ मऊ गोळ्याला पहिल्यांदा हातात घेतलं, तो स्पर्श त्यांच्या दृष्टीनं अप्रूपाचा असतो. सगळ्याच बाबा मंडळींच्या लेखनात तो आला आहे. मुलीनं बाप म्हणून ओळखणं, ती आपल्यासारखी दिसतेय, बापावर गेलीय असं कुणी म्हणणं हे तर विलक्षण सुखावणारं. लेखक हृषीकेश गुप्ते यांच्या मते तो क्षण ‘युरेका’पेक्षा तसूभरही कमी नसतो. मुली बापांना खूप बदलवतातही. कवी दासू वैद्य म्हणतात, “मुलगी झाली की बापाच्या सगळ्या संवेदना जागृत होतात; हुरहूर, रुखरुख, हळवेपणा असं सगळं उगवून येतं. मुख्य म्हणजे, बापाला घर लहान वाटतं आणि मुलीला अंगण कमी पडतं.”

कसं बोलून आणि कसं वागून बाबा या प्राण्याला वश करायचं, त्याच्याकडून हवं ते वसूल करून घ्यायचं, हे वर्षा-दोन वर्षांच्या मुलीलाही अचूक समजतं. एरवी कसाही असला तरी मुलीसमोर बाबा सुतासारखा सरळ येतो. मुलीमुळे सुंदर आणि आनंदी बनलेलं जगणं किशोर रक्ताटे, किरण केंद्रे, यांनी रसाळपणे सांगितलं आहे, तर परंपरा आणि बंडखोरी यामध्ये येणाऱ्या ताणांचा पट योगेश गायकवाड यांनी उलगडला आहे.

..................................................................................................................................................................

‘मायलेकी-बापलेकी’ या पुस्तकाच्या ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

मुलीनं आपल्याला कसं बदलवलं हे जवळजवळ प्रत्येकानं लिहिलं आहे. तसे वरवरचे बदल होत राहतात, पण अमूलाग्र बदल ही खूप अवघड गोष्ट असते. सरफराज अहमद यांच्यात ती झालेली दिसते. सरफराज सोलापुरातले. कापड गिरण्या बंद होऊन जी कुटुंबं देशोधडीला लागली, त्यातले ते एक. त्यामुळे नंतरचं बालपण खूप हलाखीचं गेलं. पुढे सावत्र आईचा जाच झाला. लग्नानंतर त्यांना मोठं आजारपण आलं, त्या वेळी पत्नी गरोदर होती. सरफराज यांना वाटायचं, ‘मुलगा’ होईल. आजारानं आपल्याला नेलं तरी माझ्या निराधार पत्नीला मुलगा सांभाळेल. ते लिहितात, “पण मारियानं जन्म घेतला. निराशा बायकोसमोर दाखवायची नाही म्हणून आनंदाचं उसनं अवसान आणलं...” पण आता मात्र मारिया त्यांच्यात खोलवर रुतून बसली आहे. “माझ्यापेक्षा माझ्यातल्या बापाने तिच्यासाठी जगणं आवश्यक होतं. आयुष्यानं केलेली परतफेड मी विसरू शकत नाही. माझं जगणं माझ्या मुलीनं सुंदर केलं आहे.” किती धारदार आहे हा अनुभव! आपण कुणावर तरी जीवापाड प्रेम करू शकतो, हा साक्षात्कार त्यांचं जगणं असं अमूलाग्र बदलवून टाकणारा ठरला!

जगणं बदलवून टाकण्याचा साक्षात्कार राम जगताप यांच्याही लेखात तरलपणे येतो. भारतीय पुरुषाला नीट ‘माणसाळवण्याची’ गरज असते, असं एक नेमकं विधान त्यांनी केलं आहे. कृषी संस्कृतीतल्या ‘पुरुषी परंपरे’पासून स्वतःला काही प्रमाणात तोडून घेतलं असलं तरी गेल्या काही वर्षांत माझ्यातल्या ‘साचेबद्ध भारतीय पुरुषाला’ बायको आणि मुलगी यांनी छान माणसाळवलेलं आहे, असं ते म्हणतात. एक अगदी हृद्य उल्लेख त्यांच्या लेखात आहे. पुण्याला आल्यावर नुकतीच ओळख झालेला एक मित्र त्यांना म्हणतो की, ‘तू हसताना रडल्यासारखा दिसतोस’. आपल्याला निर्भेळ हसताच येत नाही, हे त्यांच्या हळूहळू लक्षात येतं. “मात्र लेक झाल्यापासून ‘निर्भेळ आणि निर्व्याज हसू’ ही गोष्ट मी दिवसभरात इतक्यांदा अनुभवतो आहे की, आता मलाही रडल्यासारखा चेहरा न करता हसता यायला लागलं आहे,” असं ते म्हणतात, तेव्हा केवढं मोठं सत्य जाता जाता उलगडतात!

हिंदू-मुस्लीम अशा आंतरधर्मीय लग्नामुळे आसिफ बागवान यांच्या निवेदनाला एक वेगळी किनार आहे आणि मुलीला वाढवताना झालेली तारांबळही आहे. ‘बाप होणं’ ही केवळ एका नात्याची सुरुवात नसते, तर आपल्या जीवाचा एक अंश जन्माला आल्यानंतर होणारा तो नवनिर्मितीचा साक्षात्कार असतो, असं त्यांना वाटतं.

ही सगळी निवेदनं वाचली की, आशुतोष जावडेकर यांनी या पुस्तकाला लिहिलेल्या ‘अनुषंगा’तलं एक वाक्य अधोरेखित करावंसं वाटतं – “चांगल्या घरात बाप ‘अर्धा आई’ असतो आणि आई ‘अर्धी बाप’ असते. त्यामुळे मुलगी मुलग्यांच्या जगालाही आनंदानं भिडू शकते.” किती खरं आहे ते!

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

पुस्तकात काही समान सूत्रं नक्कीच दिसतात. आत्ताच्या बापांची पिढी किती वेगळी आहे, हे लक्षात येतं. बाप होण्यातला तरलपणा अनुभवण्यापासून ते संगोपनात थेट हातभार लावण्यापर्यंत बराच मोठा मानसिक प्रवास या ‘बाबा’ लोकांनी केलेला दिसतो.

दुसरी गोष्ट जाणवते ती अशी की, ‘मुलीलाच मुलगा मानणे’, ‘हा आमचा मुलगाच आहे’ असं म्हणणं वगैरे प्रकार बंद झाले ते फारच उत्तम. मुलीला तिचा स्वतंत्र अवकाश मिळाला. चांगलं माणूस म्हणून आम्हाला तिला वाढवायचं आहे. प्रत्येक मूल आपला स्वतंत्र स्वभाव, पिंड घेऊन येतं. आपल्याला हवा तसाच घडवावा, असा काही तो मातीचा गोळा नव्हे, असे वेगळे विचार इथे येतात.  

आई-बाबा म्हणून अनुभवत असलेल्या अथांग आनंदाबरोबरच पालक म्हणून आम्ही अधिक परिपक्व होत आहोत. मुलीच आम्हाला खूप शिकवतायत असं सगळ्याना वाटतंय. मुलींना वाढवतानाचा हा खुलेपणा आणि मोकळी दृष्टी सुखावून जाते.

‘मायलेकी’ विभागात उतरलेली नाती ‘बापलेकी’ विभागापेक्षा थोडी अधिक सरस आहेत. या अर्थानं की, मुलगी वाढवण्याची जाण वेगळी आहे. सर्व बाजूनं बघण्याची दृष्टी आहे. बाप कौतुकात अधिक बुडालेत. अर्थात ते स्वाभाविकच आहे म्हणा!

आणि हे ही जाणवतं की-

गेल्या पिढ्यांमधल्या किती मुली केवळ ‘कंडिशनिंग’मुळे समजूतदार, आज्ञाधारक वगैरे वगैरे झाल्या असणार? मोकळं आकाश आणि पंखांना बळ देणारं घर असेल तर त्या कुठल्या कुठे पोचतील!

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

एक गोष्ट मात्र जरूर सुचवाविशी वाटते. जन्मापासून पाच ते सहा वर्षाचं वय म्हणजे अखंड कौतुक काळ असतो. तो या पुस्तकात प्रामुख्यानं येणं स्वाभाविक आहे. खरं तर या मुली जेव्हा टीनएजर होतील, तारुण्यात प्रवेश करतील, तेव्हा या सगळ्या मंडळींना परत लिहितं करायला हवं. कारण त्या वेळी मुलगी आणि आई-बाबा यांच्यातली समीकरणं अगदीच वेगळी होतात. कौतुक अंक संपून अनेक समरप्रसंग पुढे ठाकतात. शिवाय आपल्याला जगातलं यच्चयावत कळतं, असा मुलींचा ठाम समज असतो. एवढंच नाही तर आपले आई-बाबा बरेच अजाण आणि काही प्रसंगी बावळटही आहेत, असे केवळ भासच नव्हे तर खात्री पटायला लागते त्यांना. म्हणून या काळातला नात्यांचा प्रवास सजगपणानं आणि खुलेपणानं टिपायला हवा. हे आव्हानात्मक तर असेलच, पण ते तितकंच समृद्ध करणारं, माणूस म्हणून आपली समज वाढवणारं असेल यात शंका नाही.

शेवटी, पुस्तकाचं मुखपृष्ठ, मांडणी आणि रेखाचित्रं यांचा आवर्जून उल्लेख करायला हवा. संदीप देशपांडे यांनी दाद द्यावी असं काम केलं आहे. अलीकडे अनेक पुस्तकांमध्ये मांडणी हा प्रकारच गायब असतो. इथं मात्र ‘मायलेकी’ आणि ‘बापलेकी’ यांच्यासाठी बनवलेली चित्रं-प्रतीकं, प्रत्येक लेखाच्या सुरुवातीला फोटोच्या वर त्यांनी केलेली विशिष्ट मांडणी आणि प्रत्येक पानाच्या रचनेचा केलेला विचार पुस्तकाला देखणं बनवतो.

..................................................................................................................................................................

लेखिका संध्या टाकसाळे ‘साप्ताहिक सकाळ’च्या माजी संपादक आणि सध्या ‘प्रथम बुक्स’ या प्रकाशनसंस्थेत ज्येष्ठ संपादक आहेत.

sandhyataksale@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......