राहुल गांधींनी एक झेंडा खांद्यावर घेतलाय, इतर ‘व्यवहारी’ काँग्रेसी राजकारण्यांना तो पेलत नाहीये...
पडघम - देशकारण
अजित जोशी
  • राहुल गांधी, सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य सिंधिया
  • Tue , 21 July 2020
  • पडघम देशकारण ज्योतिरादित्य सिंधिया Jyotiraditya Scindia सचिन पायलट Sachin Pilot काँग्रेस Congress राहुल गांधी Rahul Gandhi भाजप BJP नरेंद्र मोदी Narendra Modi

मध्य प्रदेशातल्या ‘ज्योतिरादित्य सिंधिया नाट्या’मागोमाग राजस्थानातला ‘सचिन पायलट एपिसोड’ सुरू झाला आणि  काँग्रेसची अधोगती, नेतृत्व, गांधी परिवाराच्या त्रुटी, हे नेहमीचे मुद्दे चर्चेला आले. भाजपसमर्थकच नव्हे, तर विरोधक माध्यमांनी आणि बुद्धीवाद्यांनी काँग्रेस कशी कमी पडते आहे, राहुल गांधींना गोष्टी कशा सांभाळता येत नाहीत आणि काँग्रेसमध्ये पर्यायी नेतृत्व उदयाला येण्याची कशी गरज आहे, ही सगळी मांडणी नव्या जोमात करून दाखवली. अनेकांनी तर असे पर्याय उदयाला न येण्यामागे ‘गांधी परिवारा’लाही जबाबदार ठरवलं! 

या सगळ्या मांडणीत थोडंफार तथ्य आहे, पण पूर्ण नाही. किंबहुना या युक्तिवादात नेहमीच संपूर्ण चित्राचा एक तुकडा सोयीनं तोडून तो आपल्यासमोर मांडला जातो. संपूर्ण चित्र काय आहे? २०१३ला नरेंद्र मोदींचा केंद्रीय राजकारणात उदय झाला आणि एक वावटळ आली. त्यात काँग्रेस पक्षाची पडझड झाली, हे खरंच, पण उत्तर भारतातला (यात महाराष्ट्रही धरून चालावा!) कोणता पक्ष यात वाचला? संपूर्ण चित्र हे आहे की, २०१३ नंतर झालेल्या उलथापालथीत उत्तर भारतातल्या सगळ्याच पक्षांना जबर नुकसान सोसावं लागलं. मग कम्युनिस्ट पक्षासारखे राष्ट्रीय किंवा आरजेडी, सपा, बसपा, तृणमूल, राष्ट्रवादी यांसारखे प्रादेशिक. ते भाजपच्या विरोधी असोत किंवा शिवसेना, अकाली दलासारखे समर्थक असोत. राजकारणाची परिभाषा बदलून टाकणाऱ्या मोदींच्या धडाक्यापुढे कोणत्याही पक्षाला (आणि खरं सांगायचं तर भाजपमधल्याही बहुतांश इतर नेत्यांना! पण तो वेगळा विषय आहे...) टिकाव धरता आलेला नाही.

हे सगळे पक्ष जवळपास एक व्यक्ती आणि परिवाराभोवतीच फिरणारे आहेत. मग हा प्रश्न या पक्षांबद्दल कसा येत नाही? यावर कदाचित हा युक्तिवाद होऊ शकेल की, हे पक्ष मुळात एका व्यक्तीभोवतीच केंद्रित आहेत. त्यासाठीच ते निर्माण झालेले आहेत. पण हा युक्तिवाद पूर्णतः योग्य नाही. तो तृणमूल किंवा राष्ट्रवादीला लागू होऊ शकतो, पण आजचे समाजवादी किंवा राष्ट्रीय जनता दल, हे एकेकाळच्या समाजवादी पक्षांतून उदयाला आलेले आहेत. बसपा काही मायावतींच्या प्रभावाने नव्हे तर एक बामसेफी विचारधारा घेऊन निर्माण झाला. शिवसेना मराठी माणसाच्या अस्मितेतून जन्माला आली. पण क्षणभर हा युक्तीवाद मान्य केला, तरी एका विचारधारेशी जोडलेला पक्ष शाबूत ठेवणं अजून कठीण आहे, हेच त्यातून दिसतं. पण तरीही या सर्व पक्षांत चालणारी एकाधिकारशाही आणि तरीही येणारं निवडणुकीतलं अपयश, याची चर्चा का होत नाही?

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://bit.ly/3he3mvf

..................................................................................................................................................................

‘भाजपशिवाय लढलेल्या सेनेला ६३ जागा मिळाल्या आणि सोबत लढून ५६... तेव्हा मराठी अस्मितेचं नेतृत्त्व ठाकरे कुटुंबियांपलीकडे जायला हवं’, अशी चर्चा कधीच का ऐकिवात येत नाही? ‘२०१६ ला जागा वाढल्या तरी लोकसभेतला आकडा ३४वरून २२ वर गेला. अनेक ज्येष्ठ नेते सोडून गेले. एकेकाळी आसाम, त्रिपुरा, मणिपूर इथे प्रभाव टाकणारी तृणमूल आता बंगालमध्ये अस्तित्वासाठी धडपड करते आहे. त्यामुळे ममतांचं नेतृत्व फेल गेलेलं आहे’, अशी टीका का ऐकायला येत नाही? हे असं या सगळ्या पक्षांबद्दल मांडलं जावं, ही अपेक्षाच नाही! कारण ही मांडणीच विसंगत आहे.

सत्य हे आहे की, ‘मोदी लाटे’समोर सगळेच वाहून जात आहेत आणि भाजपव्यतिरिक्त सर्वांना स्वतःच्या पक्षाचा आणि मांडणीचा नव्याने शोध घेण्याची गरज आहे. जसं तृणमूल किंवा शिवसेनेला हे प्रश्न विचारणं चुकीचं आहे, तसंच फक्त राहुल गांधीला आणि काँग्रेसला लक्ष बनवणंही न्याय्य नाही! 

अर्थात माध्यमांतली मंडळी किंवा विचारवंत बाजूला ठेवून, ही मांडणी पक्षातून कोण करतंय, ते जरा नीट पाहायला हवं. ज्योतिरादित्य सिंधिया, मिलिंद देवरा, सचिन पायलट, प्रिया दत्त या सगळ्यांमध्ये काय साम्य आहे? राहुल गांधींप्रमाणेच यांनाही वारसाहक्काने नेतृत्व मिळालं. त्यामुळे हे राहुल गांधींना पर्याय कसे होणार? यातले बहुतेक जण सलग दोनदा, तर कोणी किमान एकदा लोकसभा निवडणूक तर हरलेले आहेत. (राहुल गांधी अमेठीतून हरले असले तरी एका संपूर्णपणे नव्या आणि दूरच्या राज्यात दणदणीत जिंकले, हेही सत्य आहे!) पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे यांचा जनाधार अतिशय मर्यादित आहे. यांची पक्षाला गरज आहे, असं कोणी फारसं म्हणताना दिसत नाही. निवडणुकात पराभव झाल्यावर ही मंडळी पक्षासाठी काम करत आहेत, रस्त्यावर उतरलीत, असा अनुभव नाही.

याला काही प्रमाणात अपवाद सचिन पायलटचा आहे, हे मान्य, पण राजस्थान विजय त्याच्यामुळे झाला, असं म्हणावं, तर निवडून आलेल्यातले २० टक्के आमदारही त्यांच्या सोबत नाहीत. संजय झा यांना तर काहीच जनाधार नाही, तर संजय निरुपम यांनी पाच वर्षं मोठी जिद्दीने काढल्यावर २०१९च्या निवडणुकीनंतर नांगी टाकली. आकड्यांच्या परिभाषेत पाहू जाता, या सगळ्या मंडळींना मिळून किती नगरसेवक, आमदार, खासदार आपल्यासोबत उभे करता येतील? पुन्हा यांनी पक्षावर केलेली टीका, ही एकतर स्वतःच्या व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेची आहे किंवा मग नुसतीच नकारात्मक आहे! यांच्यापैकी कोणीही कधी, कोणता पुढाकार घेतला, जो पक्षनेतृत्वाने सफल होऊ दिला नाही?

असो, मुद्दा हा आहे की, आज गांधी परिवारासोबत कोण आहे? मोदी लाटेत राज्य टिकवून धरणारे अमरिंदर आहेत, २०१४ पासून सतत पक्षसंघटनेत मेहनत घेणारे गेहलोत व कमलनाथ आहेत, कर्नाटकात भाजपला तोडीस तोड देऊ शकलेले शिवकुमार आहेत, महाराष्ट्रात दोन आकड्यांपर्यंत पक्ष जाईल का असं वाटत असताना ४४ वर पोचवलेले थोरात आहेत, छत्तीसगडमध्ये अनपेक्षित सत्ता आणणारे बघेल आहेत.

थोडक्यात पक्षाच्या वाईट काळातही ज्यांना जनाधार आणि राजकीय यश आहे, अशी सगळी नेतेमंडळी गांधी कुटुंबियांच्या पाठीशी आहेत. मग नेतृत्वावर हक्क कोणाचा? पक्षाची नस कोणाला कळलीय, असं मानावं? ७० दिवस गांधी परिवार नेतृत्वापासून दूर राहिला. पक्षात त्यांना पर्याय असेल, तर पुढे का आला नाही? 

सत्य हे आहे की, गांधी परिवार ही काँग्रेसची गरज आहे. आज पक्षात निवडणुका घेतल्या तर ९९ टक्के मतांनी गांधी परिवारापैकी कोणीही निवडून येईल. सत्य हेही आहे की, त्यांना विरोध करणाऱ्या कोणातही त्यांना पक्षात आव्हान देण्याएवढी ताकदच नाहीये.

एक आठवायला हवं की, गांधी परिवार अनेक वर्षं पक्षातून दूर होता. पवारांचं विरोधी पक्ष ते उद्योजक एवढं मोठं नेटवर्क होतं. आणि तरीही त्यांनी स्वतःचा पक्ष काढल्यावर महाराष्ट्रातूनही काँग्रेस संपूर्णपणे त्यांच्या सोबत गेली नाही. देशभरात प्रभाव तर नगण्यच राहिला. प्रादेशिक नेते गेल्यामुळे काँग्रेस कमकुवत झाली, यात शंका नाही. पण यांच्यातल्या कोणत्याही नेत्याकडे देशभर प्रभाव टाकेल, असं नेतृत्व नव्हतं, नाही, हेही खरंच!

यातून मग अपरिहार्यपणे पुढचा प्रश्न येतो की, काँग्रेसला अशा प्रकारे एकाच परिवाराचं नेतृत्व का लागावं? ही गोष्ट नक्की दुर्दैवी आहे. पण त्याच्यामागे प्रचार केला जातो, तशी गुलामी वृत्ती वगैरे नाही. काँग्रेस हा पक्ष मुळात हितसंबंधांच्या राजकारणाने बांधला गेलेला आहे. मात्र भारतात राष्ट्रीय नेतृत्व करायचं, तर निव्वळ हितसंबंधांचं राजकारण पुरत नाही. तर एक ठाम वैचारिक आणि तात्त्विक पाया दाखवावा लागतो. लोकसभेत बहुमत मिळेपर्यंत इतर अनेक गोष्टी लागतात. पण मुळात एका राष्ट्रीय पक्षाचा नेता होण्यासाठी, अगदी लोहियांपासून वाजपेयींपर्यंत, प्रत्येकालाच एक विचारधारा लागते, यात शंका नाही. आणि हे गांधी परिवार वगळता भारतात मोठी झालेली इतरही सगळी राष्ट्रीय नेतृत्वं पाहिली, तर स्पष्ट लक्षात येतं.

मोदींनाही भाजपमध्ये नेतृत्व मिळण्यामध्ये त्यांचा तात्त्विक पाया हेच मोठं कारण आहे. आणि इतर शंभर चुका केलेल्या असल्या, तरी राहुल गांधींना ही एक गोष्ट नीट समजलेली आहे, असं स्पष्टपणे दिसतं. गेली सहा वर्षं, ते सातत्याने एक विचारधारा घेऊन उभे आहेत. ती राजकीयच नव्हे, तर सामाजिक, आर्थिक, औद्योगिक आहे आणि या प्रत्येक आघाडीवर ती भाजपपेक्षा वेगळी आहे, हे दाखवण्यात ते यशस्वी झालेले आहेत. काँग्रेस पक्षाला त्यांची गरज वाटत राहते आणि राहील, ती त्याच्यामुळेच! या विचारांशी सहमत असा किंवा नसा, पण राहुल गांधींनी एक झेंडा खांद्यावर घेतलाय आणि इतर ‘व्यवहारी’ काँग्रेसी राजकारण्यांना तो त्यांच्या खांद्यावर पेलत नाही, हे सत्य नजरेआड करता येत नाही.

दुर्दैवाने माध्यमांचा आणि विचारवंतांचा दृष्टीकोन सवंग आहे. भाजपने उभी केलेली एक नवी राजकीय प्रणाली सर्वांना विळख्यात घेत असताना, त्यांना फक्त काँग्रेस-परिवार-राहुल यांना धडे देण्यात धन्यता वाटते. देशातली बरीचशी माध्यमं मोदींच्या बाजूनं आहे. अगदी काही थोडकी विरुद्ध असतील, पण राहुल मात्र सर्वांच्या टीकेचे धनी आहेत. आणि ते करत असलेल्या चुकांसोबत न केलेल्यांचं खापरही त्यांच्याच माथ्यावर फोडलं जातंय. सशक्त लोकशाहीसाठी विरोधी पक्षालाही धारेवर धरायलाच हवं, पण विरोधी पक्षाला न्याय दिला नाही, तर ही प्रक्रियाच कलुषित होते, याचंही भान ठेवलं जावं, हे उत्तम! 

..................................................................................................................................................................

लेखक अजित जोशी चार्टर्ड अकाउंटंट आहेत.

meeajit@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Wed , 22 July 2020

गेली सहा वर्षं, पप्पूगांधी सातत्याने एक विचारधारा घेऊन उभा आहे, हे वाचून ज्याम करमणूक झाली. लगे राहो अजित भाय!
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

बिहारमधील एसआयआर : मतदार यादीची पडताळणी की मताधिकाराची पुनर्परीक्षा? महाराष्ट्रात चाललेल्या एसआयआर प्रक्रियेत हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चिला जाणे गरजेचे आहे

प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क प्रत्यक्षात बजावता यावा याची खात्री करणे, हे निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे कार्य आहे. त्यासाठी मतदार यादी हे एक साधन आहे. अंतिम उद्दिष्ट नाही. मृत व्यक्तींची नावे वगळणे आवश्यक आहे. दुबार नोंदी काढणे आवश्यक आहे. मतदार यादी अचूक ठेवणे आवश्यक आहे. या सर्व प्रक्रियांचा अंतिम हेतू मतदाराला मतदानापासून वंचित करणे, हा नसून त्याचा मतदानाचा हक्क सुरक्षित करणे हा असतो.......

प्रिय नरेंद्रभाई, तुम्ही जणू यादवी युद्ध लढत असल्यासारखे देश चालवत आहात! हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही भले कितीही लोकप्रिय असाल, पण तुम्ही संसदेला उत्तरदायी आहात

नेहरूंचे सगळे विरोधकही त्यांचा आदर करायचे. तुमच्या बाबतीतही पहिल्या दिवसापासून विरोधकांमध्ये चर्चा आहे. फक्त एवढाच ‘किरकोळ’ फरक आहे की, मोदी-चर्चेत ‘आदरा’ऐवजी ‘अविश्वास’ आणि ‘अनादर’ भरलेला असतो! नेहरूंवर जनता प्रेम करत होती, पण त्यांच्या पक्षातले राजकारणी त्यांना घाबरत असत. या बाबतीतही तुम्ही त्यांना मागे टाकलं आहे; तुमच्या पक्षातले लोक आणि जनता — दोघंही तुम्हाला घाबरतात!.......