करोना या एकाच आजारातून आज समाजात नवेच आजार तयार झालेत. आणि या सर्व आजारांवर एकाच वेळी नियंत्रण मिळवू शकेल, असा एकच एक सूत्रधार मिळणे, ही आजची निकड आहे.
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • छायाचित्र - दिल्लीतील इंडिया गेट समोरील रस्ता, रेखाचित्र - संजय पवार
  • Thu , 02 April 2020
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar करोना विषाणू Corona virus कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस लॉकडाउन Lockdown

करोनाने संपूर्ण जगच रुग्णाईत झालेय. महासत्ता असो, की विकसित, की विकसनशील देश असोत, सर्वच हतबल, हवालदिल झालेत. इतक्या मोठ्या संख्येने भूतलावर मानव वंश रोजच्या रोज नष्ट होत चाललाय आणि शत्रूने खिंडीत गाठलेल्या सैन्यासारखी हतबलता जगभर पसरलीय.

त्या हतबलतेत आपला १३० कोटींचा देश आणि १२ कोटी लोकसंख्येचे महाराष्ट्र राज्यही आहे.

इतिहासात आपण टीबी, प्लेग यांसारख्या रोगांच्या फैलावाचा सामना केलाय. प्लेगच्या काळात तर अशी अवस्था होती की, एकाची चिता पेटवून घरी पोहचेस्तवर घरात दुसरा बळी पडलेला असे. टीबी साथीसारखा पसरत नसे, पण अनेकांना बाधा होई व खंगून खंगून माणसं मरत. विलगीकरण हे प्लेग व टीबी दोन्हीत आपण अनुभवलेय. प्लेगचा रोगी महारोग्यासारखा शेतात वगैरे स्वतंत्र ठेवला जाई, तर टीबीसाठी थंड हवेची ठिकाणे अनुकूल ठरत असल्याने सॅनिटोरियमची संकत्पना त्याच काळात जन्मली. त्यातली आजही काही ठिकाणी अस्तित्वात आहेत.

काळ बदलला की, संज्ञा बदलतात. आता विलगीकरणाला ‘क्वारंटाईन’ हा शब्द आलाय. करोनाचे संक्रमण गुणाकार पद्धतीने पसरत असल्याने लोकांच्या सामाजिक वावरावर सुरुवातीस जमावबंदी या पोलिसी व्यवस्थेतील संज्ञेने बंदी आणली. जमावबंदीत पाचपेक्षा अधिक जणांनी एकत्र न येणे असे अपेक्षित असते. त्याची पुढची पायरी संचारबंदी किंवा कर्फ्यू. यात खरे तर अतिअत्यावश्यक सेवेसह कुणालाच संचार करता येत नाही. कुणी केलाच तर दिसताक्षणी गोळी घालण्याचे अधिकार पोलीस/सैन्य दलाला असतात. लोकांना जीवनावश्यक गोष्टी घेता याव्यात म्हणून काही तास संचारबंदी शिथिल केली जाते. साधारण दंगल, युद्धकाळात ही स्थिती असते.

करोना साथीच्या या हाहाकारात या सर्वच संज्ञेच्या बाबतीत गोंधळ उडालाय वा शासन वा पोलिसांनाही नेमकं काय करायचं याची स्पष्टता नाही. कारण या रोगाने यंत्रणांची अशी अवस्था केलीय की, धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं.

जमावबंदी, संचारबंदी यांच्या अधिक काटेकोर अंमलबजावणीसह ‘टोटल लॉकडाऊन’ ही नवी संज्ञा या करोनाने सुपरिचित केली. लॉकडाऊन म्हणजे संपूर्ण बंद. अतिअत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद. आणि या बंदचा कालावधी एक दिवसाचा नाही तर चार, आठ, पंधरा ते एकवीस असा चढत्या भाजणीतला.

इथेही शासनाची गोची झाली. शासनाने वाहतूक, कार्यालये, व्यवसाय, मनोरंजनाची ठिकाणे असं क्रमाक्रमाने सर्व बंद केलं. या लॉकडाऊनमध्ये पण त्यातून औषधं, किराणा, बेकरी, भाजीपाला, फळे यांची विक्री चालू ठेवली. तीही पूर्ण वेळ. त्यातून व्यापाऱ्यांसह नागरिकही साठेबाजी करू लागले व संसर्ग फैलावू नये म्हणून केलेली संचारबंदी फोल ठरू लागली. गर्दी कमी व्हावी म्हणून या व्यवस्था २४ तास चालू ठेवल्या जाऊ लागल्या. यात गोंधळ असा झाला की, इतक्या गोष्टी उघड्या आहेत म्हटल्यावर तिथे जाणाऱ्या लोकांवर पोलीस संचारबंदी नियमाने लाठीमार करू लागले. यातून काही ठिकाणी पोलिसांना जनतेचा मार खावा लागला.

यातून झालं असं की, सरकार व व्यवस्थांनी एका समस्येचे निराकारण करून हुश्श म्हणावं तर त्यातून किंवा एकुणातच रोज एक नवी समस्या उभी राहू लागली!

लॉकडाऊनमुळे पगारदारांना घरी बसूनही वेतन मिळणार; त्यांना कर्ज, बिल फेडीत सवलती वगैरे दिल्या जाणार. पण जे रोजंदारीवर, मजुरीवर काम करणारे, दैनंदिन वा साप्ताहिक मजुरी मिळवणारे करोडो असंघटित क्षेत्रातील लोक वा छोटे स्वयंरोजगार करणारे कुशल-अकुशल कारागीर यांचे काय? पुन्हा यात स्थलांतरितांची संख्या जवळपास ८० टक्क्यांच्या पुढे! ज्याच्यासाठी स्थलांतर केले ते कामच बंद, तर मग इथे राहून राहणार कुठे? खाणार काय? परिणामी त्यांचे लोंढे रेल्वे, बस, खाजगी वाहने यांनी ओसंडून जाऊ लागले व संचारबंदीसह रोग संक्रमणाच्या खबरदारीचे तीन तेरा वाजले.

ते रोखण्यासाठी सर्व प्रकारची वाहतूक बंद केली व घरातच रहा असे सांगितले. हे सर्व चार आठ दिवस असेल या विचाराने बरेचसे राहिले होते तिथेच. फार तर महिनाखेर म्हणजे आठ दिवस काढायचे. थोडी निश्चिंतता सरकार व जनतेत पसरली, तोच साहसी प्रधानसेवकांनी एक दिवस रात्री ८ वाजता, आज रात्री १२ पासून पुढचे २१ दिवस लॉकडाऊन, बसा घरातच असे जाहीर केले आणि मधमाशांचे पोळे फुटावे तसे देशभर अभूतपूर्व गोंधळ उडाला. त्याची परिणती लोक कसलाही विचार न करता कच्च्याबच्च्यांसह पायीच ५० ते २०० मैलावरचे गाव गाठायला निघाले. पुन्हा संचारबंदी, विलगीकरण सगळ्या व्यवस्था कोलमडून पडल्या. 

आज घडीला देशात वरवर शांतता नांदत असली तरी जनता पूर्ण संभ्रमात आहे. रोजची वाढती आकडेवारी, तज्ज्ञांची विविध मते, निरीक्षणे, प्रसारमाध्यमांतल्या काहींचा अतिउत्साह तर सोशल माध्यमांवरचा उच्छाद याला केंद्र व काही राज्यप्रमुखांची बेबंद कारभाराची जोड, यामुळे काय खरं, काय खोटं, काय वस्तुस्थिती हे कळतच नाहीए. अशिक्षित जनता तर सैरावैरा झालीय, पण सुविद्य जनांचीही मती कुंठीत झालीय.

आश्चर्य म्हणजे साथीला बळी पडलेल्या, त्यातून बरे झालेल्या रुग्णांना अशिक्षित व शिक्षित सारखीच सामाजिक अस्पृश्यतेची वागणूक देऊन, व्यवस्थेसमोर नवी समस्या तयार करून, व्यवस्थेवरचा ताण वाढवताहेत!

करोना या एकाच आजारातून आज समाजात नवेच आजार तयार झालेत. आणि या सर्व आजारांवर एकाच वेळी नियंत्रण मिळवू शकेल, असा एकच एक सूत्रधार मिळणे, ही आजची निकड आहे.

आपण सर्वच करोनासह इतर सर्व आजाराचे वाहक आहोत. त्यामुळे स्वयंशिस्तीने सूत्रधाराची भूमिका आपण प्रत्येकाने निभावली, तरच या भांबावलेल्या स्थितीतून काही निभाव लागेल. अन्यथा विविध प्रकारचे जे नवनवे बळी जाताहेत, त्यातल्या कुठल्या तरी यादीत आपले नाव नक्कीच असेल.

...............................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......