फ्रान्झ-सोफी गेले जिवानिशी, वेळ वाया गेला कारणांनिशी...
सदर - पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
आदित्य कोरडे
  • इल्योदोर, आर्थर झिमरमन, आल्फ्रेड फॉन बेथमान-होलव्हिग, कोनराड फॉन हॉटझेनडोर्फ, निकोला पासेज, रासपुतीन, कियोना गुसेवा आणि काउंट लिओपोल्ड बर्खटोल्ड
  • Tue , 24 March 2020
  • सदर पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर पहिले महायुद्ध First World War

इतिहासात ‘जर-तर’ला अर्थ नसतो, परंतु पहिले महायुद्ध ही आधुनिक इतिहासातली इतकी मोठी घटना आहे की, अनेक इतिहासकारांनादेखील ‘जर-तर’छाप कल्पनारंजन करण्याचा मोह आवरलेला नाही. त्यातून १०० पेक्षा अधिक वर्षांपूर्वी घडलेल्या अत्यंत गुंतागुंतीच्या इतिहासातील अनेक घटना, व्यक्तीरेखांभोवती दंतकथा, अफवांचे गूढ वलय निर्माण झाले असल्याने त्यांचा नक्की परामर्श घ्यावा की, ना घ्यावा हे ठरवणे मोठे कठीण काम आहे. २८ जून याच दिवशी आणखी एक असाच खुनाचा प्रयत्न झाला अन फसला होता, पण त्यामुळे इतिहासाला विशेषत: रशियाच्या इतिहासाला पूर्णत: नाही तरी काही प्रमाणात कलाटणी मिळाली.

रशिया आणि झार यांचे नाव आले की, रासपुतीन हे व्यक्तिमत्त्व आठवणे अपरिहार्य आहे. स्वत:ला येशूचा अवतार व नंतर परमेश्वर म्हणवणारा, आपल्याकडे अतिंद्रीय शक्ती आहेत, असा दावा करणारा, पण प्रत्यक्षात अत्यंत विकृत वृत्तीचा आणि गलिच्छ चारित्र्याचा हा वेडसर साधू त्या काळी रशियाच्या झार कुटुंबाचा अत्यंत जवळचा माणूस होता. झार निकोलसचा एकुलता एक मुलगा आणि गादीचा वारस अलेक्सी हा जन्मत: हिमोफेलिया या असाध्य जनुकीय आजाराने ग्रासलेला होता. (हा रोग/व्यंग त्याला राणी व्हिक्टोरियाच्या वंशातून मिळाला होता.) हिमोफेलियामुळे शरीरात रक्तस्त्रावावेळी रक्ताची गुठळी होऊन खपली धरत नाही. त्यामुळे लहानसहान जखमांमुळे अति रक्तस्त्राव होतो आणि खपली न धरल्याने जंतूसंसर्ग होतो. त्या काळी अ‍ॅस्पिरीन हे जखमा बरे करायला प्रभावी औषध होते, पण ते रक्त पातळ करत असल्याने अलेक्सीची अवस्था नाजूक होई. तेव्हा या आजारावर प्रभावी वैद्यकीय उपाय नव्हता. 

स्वत:कडे अतिंद्रीय शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या रासपुतीनने सर्व डॉक्टर लोकांना हाकलले. त्यामुळे अ‍ॅस्पिरीनचा वापर थांबला आणि अलेक्सीची तब्येत काहीशी सुधारली. परिणामी झार दाम्पत्याचा त्याच्या अतिंद्रीय शक्तीवर विश्वास बसला आणि तो लवकरच त्यांचा विश्वासू माणूस बनला. पुढे तर राज्यकारभारातील अनेक निर्णयही त्याला विचारून घेतले जाऊ लागले.    

तर या रासपुतीनच्या वाढत्या प्रभावाने अस्वस्थ झालेले अनेक लोक होते. त्यातील एक इल्योदोर. हा खरे तर त्याचा पूर्वाश्रमीचा आध्यात्मिक गुरू होता. इल्योदोरला रासपुतीनचा उत्कर्ष(!) सहन होत नव्हता, तसेच रासपुतीन म्हणत असल्याप्रमाणे त्याच्याकडे अतींद्रिय शक्ती आहेत, पण त्या सैतानाशी त्याने केलेल्या सौद्याने त्याला मिळाल्या आहेत, असे तो मानत असे. म्हणून त्याने कियोना गुसेवा नामक एका वेश्येला त्याचा खून करायच्या कामावर पाठवले. या गुसेवालाला तिच्या एका ग्राहकाने भांडणात चेहऱ्यावर वार करून, तिचे नाक कापून विद्रूप केले होते. रासपुतीन हादेखील विकृत असल्याने त्याने अनेक वेश्यांना मारहाण केल्याच्या घटना रशियात प्रसिद्ध होत्या. त्यामुळे ती तयार झाली. तेव्हा रासपुतीन राजधानी मास्को सोडून आपल्या मूळ गावी गेला होता. त्याला तेथेच गाठून तिने त्याचा पोटात अनेक वेळा सुरा खुपसून जखमी केले. तो नक्की मरावा म्हणून तिने त्याच्या भळभळणाऱ्या जखमेत हाताची मूठ घालून आतील इंद्रियांनादेखील इजा केली, पण तरीही रासपुतीनच्या आयुष्याची दोरी बळकट म्हणून तो त्यातून वाचला. तारीख होती २८ जून १९१४. रासपुतीन गंभीर जखमी होऊन इस्पितळात पडला. तो बरा होऊन झार कुटुंबाच्या सेवेत रुजू होईपर्यंत दोन-अडीच महिन्यांचा कालावधी निघून गेला आणि मधल्या काळात राजकारणाने अकल्पनीय वळणं घेत शेवटी त्याची परिणती म्हणजे पहिले महायुद्ध भडकले. इस्पितळात उपचार घेताना त्याला ही बातमी समजली, तेव्हा त्याने झार निकोलसला पत्र लिहून कळकळीची विनंती केली की, ‘रशियाला या युद्धात गुंतवू नये. प्रचंड हानी आणि रक्तपाताबरोबरच हा निर्णय त्याच्या, त्याच्या कुटुंबाच्या आणि झारशाहीच्या अंताला कारणीभूत ठरेल.’

पण तोपर्यंत उशीर झाला होता. रासपुतीन जर झार कुटुंबाच्या जवळ असला असता तर त्या वेळी त्याचा झार आणि झारीनावरील प्रभाव पाहता त्याने त्यांना युद्धापासून नक्की दूर ठेवले असते असे मानायला जागा आहे. असो.

रासपुतीन, कियोना गुसेवा आणि इल्योदोर

फ्रान्झच्या खुनाने लगेच काही युरोपात किंवा उर्वरित जगात खळबळ माजली नाही. अनेक लोकांना, देशांना ही युरोपातल्या दूरवरच्या त्या बाल्कन भागातली नेहमीचीच खून-मारामारीची घटना वाटली.

फ्रान्झ ऑस्ट्रियन शासनात फारसा कुणाचा आवडता नसल्याने त्याच्या मृत्यूचे दु:खही फारसे कुणाला वाटले नाही. त्याची प्रेतयात्रा फक्त १५-२० मिनिटे चालली आणि श्रद्धांजली वाहायला तिथे फार मोठे नेतेही आले नाहीत. अगदी फ्रान्झचा काका आणि ऑस्ट्रियाचा सम्राट फ्रान्झ जोसेफसुद्धा शवयात्रेला आला नाही. इतकेच नाही तर फ्रान्झच्या मुलांनादेखील मातापित्यांचे अंतिम दर्शन घ्यायला हजर राहू दिले गेले नाही. राजधानी व्हिएन्नापासून दूर आर्टस्टेटन इथल्या गढीत त्यांना दफन केले गेले. एका अर्थी फ्रान्झ गेल्याने ऑस्ट्रियन राजपरिवाराला हायसेच वाटले. फ्रान्झ जोसेफ तर म्हणालादेखील की, “खरे तर माझी (एकतरी) मोठी चिंता कमी झाली आहे. जे मी थांबवू शकलो नव्हतो, ते नियतीनेच हस्तक्षेप करून केले आहे. हा दैवी संकेत आणि इच्छाच दिसते की, जुनी व्यवस्थाच ऑस्ट्रियात कायम व्हावी.”

अर्थात त्याच्या मृत्यूचे भांडवल करून ऑस्ट्रियाने आपले इप्सित साध्य केलेच. तिथे त्यांचे फर्डिनांडविषयीचे प्रतिकूल मत आड आले नाही. ऑस्ट्रियन सेनापती कोनराड फॉन हॉटझेनडोर्फने लगेचच यात सर्बियाचा हात असून याला धडा शिकवला पाहिजे असे मत व्यक्त केले. (त्यात तथ्य असले तरी त्या वेळी हॉटझेनडोर्फकडे सबळ पुरावा नव्हता.) २९ जूनपासूनच त्याने सर्बियावर लष्करी कारवाई करण्यासाठी आणि सैन्याची जमवाजमव करण्यासाठी ऑस्ट्रियन सरकारकडे लकडा लावला. ऑस्ट्रियाचा परराष्ट्रमंत्री काउंट लिओपोल्ड बर्खटोल्ड हा ऑस्ट्रियाचा चॅन्सेलर कार्ल फॉन स्टूर्ख आणि सम्राट जोसेफला भेटला आणि सेनापती कोनराडची मागणी त्याने सम्राटाच्या कानावर घातली. पण ऑस्ट्रियाची राज्यव्यवस्था म्हणजे संयुक्त-राजेशाही हंगेरीबरोबर होती. त्यांचे मत घेतल्याशिवाय असा एखादा मोठा निर्णय घेणे जोसेफला शक्य नव्हते. हंगेरीचा पंतप्रधान इस्पाहन तिशा हा सर्बियावर हल्ला करण्याच्या विरोधात होता.

याचा अर्थ असा नाही की, तो सर्बियाचा हितैषी आणि चाहता होता, उलट तो त्यांचा तिरस्कारच करत असे. पण ऑस्ट्रियाचा बोस्नियावेळचा अनुभव लक्षात घेता सर्बियावर हल्ला करून त्यांचा काही प्रांत किंवा अख्खा सर्बियाच ऑस्ट्रिया गिळंकृत करायचा प्रयत्न करेल अशी त्याला भीती वाटली. तसे झाले असते तर ऑस्ट्रो हंगेरियन साम्राज्यात स्लाव लोकसंख्या वाढून हंगेरियन लोक अल्पसंख्य झाले असते. पुढे याचा प्रतिकूल परिणाम आपल्यावर होऊ शकतो, हे ओळखून त्याने सम्राट जोसेफला शक्यतो वाटाघाटी करून सामोपचाराने काही मार्ग निघतो का बघणे जास्त योग्य राहील असा सल्ला दिला (म्हणजे लष्करी कारवाई नको असेच आडून आडून सांगितले.). तरीही जर सर्बिया बधला नाही तर लष्करी कारवाई करावी, पण सर्बियाचा मुलुख तोडून घेऊ नये फक्त युद्धात पराभव करून धडा शिकवावा, असे मत मांडले.

फक्त हंगेरीच नाही तर ऑस्ट्रियाला जर्मनीकडेही पाठिंब्यासाठी पाहणे भाग होते. मागे बोस्नियन पेचाच्या वेळी जर्मनीला विश्वासात न घेऊन त्यांनी कैसरची खप्पामर्जी ओढवून घेतली होती. त्यामुळे स्वत: सम्राट जोसेफने कैसरला पत्र लिहून आपला मनोदय जाहीर केला. बर्खटोल्डने दुसरे पत्र लिहिले, ज्यात ऑस्ट्रिया सर्बियावर कारवाई कशी करेल आणि नंतर सर्बियाचे काय करायचे याची ऑस्ट्रियन योजना अगदी तपशीलवार लिहिली. बर्लिनमधला ऑस्ट्रियाचा राजदूत आलेक्झांडर होयास याने दोन्ही खलिते कैसरला सोपवले. तारीख होती ५ जुलै १९१४.

इथून पुढे राजकीय पेच-डावपेच, शह-प्रतिशह, इशारे, निर्वाणीचे इशारे, त्याची उत्तरं यांनी भरलेला गुंतागुंतीचा इतिहास सुरू होतो  

५ जुलै १९१४ ते २८ जुलै १९१४ पर्यंत म्हणजे ऑस्ट्रियाने सर्बियावर युद्ध घोषित करण्याच्या दिवसापर्यंतच्या कालखंडाला ‘जुलै संकट’ म्हणून ओळखले जाते. यात काय आणि कसे घडले हे अगदी तपशीलवार नाही तरी थोडक्यात पाहणे मोठे उदबोधक आहे. यात विशेषत: ऑस्ट्रियासारख्या आकाराने मोठ्या पण अनेक देश, वांशिक गटांचे कडबोळे असलेल्या साम्राज्याचा भोंगळ कारभार, उतावळेपणा, निर्णय घेणे आणि त्वरेने त्याची अंमलबजावणी करणे यातली दिरंगाई हेही दिसून येते. (अनेक इतिहासकार हे प्रकरण एक-दोन परिच्छेदात गुंडाळतात, पण तसे केल्याने नक्की काय आणि का घडले त्याचे चित्र डोळ्यांसमोर येत नाही.)

खरे तर कैसर विल्हेल्म फ्रान्झच्या खुनाने संतापला होता, पण त्याच्या एकट्याच्या हातात काही नव्हते. जर्मन मंत्रीमंडळाची समजूत काढणे आणि पाठिंबा मिळवणे महत्त्वाचे होते. त्यामुळे बर्खटोल्डचे खलिते घेऊन जेव्हा होयास गेला, तेव्हा मंत्रीमंडळाशी बोलून काय ते सांगतो असे सांगून कैसरने त्याला वाट पाहायला लावले. त्याच दिवशी दुपारी होयास आर्थर झिमरमन या जर्मन परराष्ट्रमंत्र्याला भेटला आणि त्याने सर्बियावर हल्ला करून त्याच्या भूभागाचे तुकडे करून ते बल्गेरिया व रोमानियाबरोबर वाटून खायचे, असा ऑस्ट्रियाचा मनोदय जाहीर केला. दोघेजण संध्याकाळी चान्सेलर आल्फ्रेड फॉन बेथमान-हार्टव्हिगला भेटले. तेथे होयोसने ऑस्ट्रिया सर्बियावर लष्करी कारवाई करणार असून अशा प्रसंगी जर्मनी ऑस्ट्रियाच्या पाठीशी उभा राहणार का, अशी विचारणा केली. त्यावर दोघांनी आश्वासन दिले की, ते पूर्णपणे ऑस्ट्रियाच्या पाठीशी उभे असून सक्रिय मदतही करेल. काळजी करू नका, रशिया मध्ये पडला तर आम्हीदेखील ऑस्ट्रियाच्या बरोबर उभे राहू असेही सांगितले.

यालाच जर्मनीचा ‘कोरा चेक’ (विनाशर्त पाठींबा) असे इतिहासात म्हटले जाते. या आश्वासनानंतर ऑस्ट्रियाने सर्बियावर हल्ला करण्याची तयारी सुरू केली. त्यांना रशियाचे वाटणारे भय कमी झाले. आणि महायुद्धाचा भडका उडायला हा जर्मनीचा ‘कोरा चेक’ काही प्रमाणात कारणीभूत झाला असे म्हणायला वाव आहे.

आल्फ्रेड फॉन बेथमान-होलव्हिग, काउंट लिओपोल्ड बर्खटोल्ड आणि आर्थर झिमरमन

मागील पाच घटनांकडे पाहता जर ऑस्ट्रियाने तातडीने सर्बियावर हल्ला केला तर रशिया, फ्रान्सला त्यांच्या मदतीला इतक्या त्वरेने येता येणार नाही. विशेषत: जर्मनी ऑस्ट्रियाच्या पाठीशी असताना आणि दरम्यानच्या काळात सर्बियाची खोड चांगली मोडून झाल्यावर, त्यांचा पुरेसा वचपा काढून झाल्यावर नेहमीप्रमाणे आंतरराष्ट्रीय परिषद बोलावून आपल्याला सोयीस्कर असा समझोता करता येईल, म्हणजे थोडक्यात कोरा चेक दिला असला तरी तो बँकेत वटवायची वेळच येणार नाही, असे जर्मनीला वाटले असावे. पण ऑस्ट्रियाचा भोंगळ कारभार त्यांचा घात करणार होता. या भेटीनंतर कैसर लगेचच आपली अर्धवट राहिलेली सुट्टी घालवायला नॉर्वेला निघून गेला. हे एका अर्थाने बरेच होते. त्यामुळे जर्मनी आणि ऑस्ट्रिया काही खलबते करत आहेत, असा संशय त्या वेळीतरी कुणाला आला नाही.

आता फक्त सर्बियावर हल्ला करणे बाकी होते, पण गोष्टी इतक्या सोप्या नव्हत्या. विशेषत: ऑस्ट्रियासारख्या दहा भिन्न भिन्न भाषक आणि वांशिक गटांचे कडबोळे घेऊन राज्य करणाऱ्या साम्राज्यासाठी. 

७ जुलै १९१४ला परराष्ट्रमंत्री बर्खटोल्डने युद्ध समितीची बैठक बोलावून जर्मनीच्या विनाशर्त पाठिंब्याची माहिती दिली आणि बाकीचे सगळे म्हणजे रशिया, फ्रान्स आणि दस्तुरखुद्द सर्बिया बेसावध असताना त्यांच्यावर तातडीने हल्ला करावा, शक्य झाल्यास दोन दिवसांतच करावा असे सुचवले. सगळ्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. खास करून सरसेनापती कोनराड फॉन हॉटझेनडोर्फला.

पण पुन्हा एकदा इस्पाहन तिशाने खोडा घातला. तो सर्बियावर कारवाई करायच्या विरोधात होता हे मागे आलेच आहे, पण आता झिमरमन, होयास आणि कैसरशी झालेल्या चर्चेतून सर्बिया पादाक्रांत करून त्याचा मोठा लचका तोडून ऑस्ट्रिया गिळणार म्हणजेच ऑस्ट्रियन लोकसंख्येत स्लाव लोकांची भर पडणार, हे समजल्यावर तो अजून बिथरला. त्याने मुद्दा मांडला की, अचानक हल्ला केल्याने रशिया, फ्रान्स त्वरेने सर्बियाच्या मदतीला नाही आले, तरी इतर बाल्कन देश यामुळे बिथरून सर्बियाला लगेच मदत करू शकतील किंवा सीमांवर गडबड करू शकतात.

ट्रान्स सिल्वेनिया हा प्रांत हंगेरियन अंमलाखाली होता (हा इतिहासात ‘व्लाड द इम्पेलर’ म्हणजेच ‘काउंट ड्रॅक्युलाचा प्रांत’ म्हणून प्रसिद्ध आहे.) पारंपरिक आणि ऐतिहासिकरित्या हा प्रांत रोमानियाचा भाग असल्याने ऑस्ट्रियाने सर्बियावर हल्ला केला, तर रोमानिया लगेच हा प्रांत बळकावण्यासाठी गडबड करेल, अशी साधार भीती त्याला वाटत होती. म्हणून मग त्याने लगेच लष्करी कारवाई करण्याआधी सर्बियाला झाल्या प्रकाराबद्दल जाब विचारून, त्या अत्याचाराच्या निवारणार्थ काही मागण्या कराव्यात आणि जर त्या मान्य केल्या नाहीत तर मग निर्वाणीचा खलिता पाठवून हल्ला करावा, असे सुचवले.

म्हणजे जर सर्बियाने मागण्या मान्य केल्या तर तो आपला राजनैतिक विजय असेल आणि नाही मान्य केल्या तर ते कारण हल्ला करण्यासाठी पुरेसे असल्याने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ऑस्ट्रियाची बाजू भक्कम होईल, असे सुचवले. सर्बियाबरोबर हे असले दळण घालत बसणे मंत्रीमंडळात इतर कुणाला मान्य नव्हते, पण तिशा अडूनच बसला आणि त्याच्या संमतीशिवाय हल्ला करता येणे शक्य नसल्याने शेवटी अनिच्छेने का होईना त्याच्या म्हणण्याला मान्यता दिली गेली.

इकडे जर्मन सरकारचे धारणा झाली होती की, आपला इतका भक्कम आधार असल्यावर एक-दोन दिवसांत ऑस्ट्रिया सर्बियावर  हल्ला करेल, पण तशी काही हालचाल होताना दिसेना. तेव्हा ऑस्ट्रियातल्या जर्मन राजदूताने विचारणा केली की, अजून सर्बियावर हल्ला का केला नाही? त्याला सांगितले गेले की, १५ जुलैपर्यंत ऑस्ट्रिया हल्ला करेल. पण हे साफ खोटे होते.

एक तर तिशाने सांगितल्याप्रमाणे सर्बियाला जाब विचारणारा खलिता पाठवायचा म्हणजे तो तयार करायला हवा आणि तो सम्राट व मंत्रीमंडळाकडून मान्य करून घ्यायला हवा. ते करायचे तर या सर्वांची (गुप्त) बैठक बसली पाहिजे आणि ते १९ जुलैपर्यंत शक्य नव्हते. हे कमी म्हणून की काय आतापर्यंत ‘युद्ध सुरू करा, युद्ध सुरू करा’ म्हणून धोशा लावलेल्या सरसेनापती कोनराडने बॉम्ब टाकला. जुलै-ऑगस्ट या काळात ऑस्ट्रियात सुगी असल्याने बहुतांश सैनिक आपापल्या गावी शेतीची कामे करण्यासाठी सुटीवर असत. त्यांना रजा रद्द करून ताबडतोब रुजू होणे शक्य नव्हते. शिवाय तसे केले असते तर ऑस्ट्रियाच्या हेतूबद्दलही शंका आली असती अन बिंग फुटले असते. त्यामुळे २४-२५ जुलैपर्यंत अशी कोणतीही लष्करी कारवाई करता येणे ऑस्ट्रियाला शक्यच नव्हते.

निर्वाणीच्या खलित्याचा मसुदा आणि मागण्या ठरवण्यासाठी १९ जुलैला परत एकदा ऑस्ट्रो हंगेरियन मंत्रीमंडळाची बैठक जमली. स्वत: बर्खटोल्डने त्याचा खर्डा तयार केला. आता मंत्रीमंडळात आपण एकटेच पडत चाललो आहोत आणि याहून जास्त विरोध करता येणे अशक्य आहे, असे पाहून तिशाने मान तुकवली आणि सर्बियाला पाठवायचा खलिता तयार झाला. तो दुसऱ्या दिवशीच म्हणजे २० जुलै रोजी सर्बियातला ऑस्ट्रियन राजदूत गीस्लीन्जेनकडे सुपूर्द केला गेला, पण त्याला तो सर्बियाकडे कधी सुपूर्द करायचा त्याचे निर्देश येईपर्यंत वाट बघायला सांगितले. या दिरंगाईचे कारण मात्र वेगळे, खास आणि सयुक्तिक  होते.

निकोला पासेज, कोनराड फॉन हॉटझेनडोर्फ आणि गीस्लीन्जेन

१५ जुलै ते २३ जुलै फ्रेंच पंतप्रधान रेमंड प्वंकारे, राष्ट्राध्यक्ष रेने विवियानी आणि इतर फ्रेंच शिष्टमंडळ हे रशियाच्या दौऱ्यावर होते. जलमार्गाने प्रवास करत ते २० तारखेला रशियाला पोहोचले. चार दिवस राजकारणावर आणि रशिया-फ्रान्समधल्या मैत्रीकरारावर चर्चा करून २३ तारखेला संध्याकाळी ते परत फ्रान्सला निघणार होते. त्या काळी जहाजावर असताना संदेश पाठवण्याचे रेडिओ तंत्र तितके विकसित झाले नव्हते. जरी हा दौरा खूप आधीच ठरला असला तरी अचानक झालेल्या फ्रान्झच्या खुनामुळे युरोपात पुढे काय परिस्थिती उद्भवू शकेल आणि त्या वेळी आपण काय करायचे, यावर खलबतं होणार हे उघड होतं. अशात जर ऑस्ट्रियाने सर्बियाला पाठवलेल्या निर्वाणीच्या खलित्याची बातमी त्यांना समजली असती तर त्यांनी नक्कीच यावर चर्चा करून संयुक्तपणे सर्बियाला पाठिंबा जाहीर केला असता. पण जर हा खलिता मिळाल्याची बातमी शिष्टमंडळाने रशिया सोडल्यावर मिळाली असती तर कमीत कमी पुढचे ५ दिवस म्हणजे ते फ्रान्सला पोहोचेपर्यंत त्यांना काही ठरवणे/करणे शक्य नव्हते, असा विचार करून ते फ्रेंच शिष्टमंडळ रशियाहून निघाल्यानंतर साधारण १ तास होईपर्यंत म्हणजे २३ जुलै संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत वाट पहायचे ठरले. अर्थात फ्रेंच आणि रशियन मुत्सद्दी काही दुधखुळे नव्हते. फ्रान्झच्या खुनानंतर ऑस्ट्रिया दांडगाई करून सर्बियाला दमात घ्यायचा प्रयत्न करणार हे माहिती असल्याने दौऱ्यावर असतानाच त्यांनी रशियातल्या सर्बियन राजदूताला काय वाटेल ते झाले तरी घाबरू नका, वेळ पडली तर आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत असे आश्वासन दिले होते.

ठरल्याप्रमाणे २३ जुलैला संध्याकाळी ६ वाजता ऑस्ट्रियन राजदूत गीस्लीन्जेन सर्बियन परराष्ट्र मंत्रालयाच्या कचेरीत गेला आणि आपल्याला सर्बियन पंतप्रधान निकोलस पॅसेजला महत्त्वाचा आणि तातडीचा खलिता द्यायचा असून त्याकरता त्यांची भेट हवी असल्याचे सांगितले.

पण इतक्या लांबलेल्या या राजकीय नाट्याचा पहिला अंक असा सहज संपणार नव्हता. २३ जुलैला ऑस्ट्रियाकडून आपल्याला काहीतरी जाब विचारणारे पत्र मिळणार अशी कुणकुण लागलेली असल्याने सर्बियाचा पंतप्रधान निकोलस पॅसेज आणि इतर महत्त्वाचे मंत्री  आधीच सर्बियात होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचाराचे कारण करून राजधानी बेलग्रेडमधून निघून गेले होते. त्यामुळे आपण काही दिवसांनी परत येऊ शकाल काय, अशी विचारणा सर्बियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली. त्यावर भडकून गीस्लीन्जेनने तो सीलबंद लखोटा तिथल्या टेबलावर आपटला आणि ‘काय करायचे ते करा’ असे सांगून तो तिथून निघून गेला.

.............................................................................................................................................

या सदरातील आधीच्या लेखांसाठी पहा -

https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/156

.............................................................................................................................................

लेखक आदित्य कोरडे टाटा मोटर्स, पुणे इथं डिझाईन इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.

aditya.korde@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......