‘पहिल्या रात्री’चा ‘सिने’मॅटिक फंडा!
सदर - सिनेपंचनामा
सायली राजाध्यक्ष
  • ‘जिंदगी गुलज़ार है’ या मालिकेतला पहिल्या रात्रीच्या प्रसंगातलं एक दृश्य
  • Sat , 14 January 2017
  • सिनेपंचनामा सायली परांजपे पहिली रात्र Wedding Night शिकलेली बायको Shikleli Baiko कभी कभी Kabhi Kabhi खानदान Khandan दिल एक मंदिर Dil Ek Mandir जिंदगी गुलज़ार है zindagi gulzar hai हम दिल दे चुके सनम Hum Dil De Chuke Sanam जुळून येती रेशीमगाठी Julun Yeti Reshimgathi

‘सुहाग रात’ किंवा ‘लग्नानंतरची पहिली रात्र’ हा खास भारतीय फंडा आहे. म्हणजे जगात इतरत्र कुठे लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीचा इतका गाजावाजा होत असेल असं वाटत नाही. विशेषतः आपल्याकडचे चित्रपट आणि मालिकांमधून ‘सुहाग रात’ हे फारच महत्त्वाचं प्रकरण बनलं. इतकं की प्रत्यक्ष आयुष्यातही पहिली रात्र साजरी करण्यावर चित्रपटांमधल्या तद्दन फिल्मी ‘सुहाग रात’ प्रकरणाचा पगडा दिसून येतो.

लैंगिक शुचितेला आपल्या देशात फारच महत्त्व आहे, अर्थातच बाईच्या लैंगिक शुचितेला. शिवाय विवाहपूर्व लैंगिक संबंध आपल्या समाजात उघडउघड अमान्यच आहेत. आता परिस्थितीत थोडा बदल होत असला तरीही तो अति उच्चभ्रू वर्गात किंवा अति निम्न वर्गात. पांढरपेशा मध्यमवर्गात अजूनही विवाहपूर्व लैंगिक संबंध गैरच समजले जातात. या सगळ्यातून या पहिली रात्र प्रकरणाचा उगम झाला असावा. वधू नक्की कुमारिका आहे ना हे तपासण्यासाठी.

पहिल्या रात्रीचे अनेक प्रसंग हिंदी चित्रपटांमध्ये आहेत. झगमगीत उजेडाची बेडरूम, त्यातला झगमगीत पलंग, त्याला सगळ्या बाजूंनी लावलेल्या फुलांच्या माळा (अनेकदा त्या प्लॅस्टिकच्या असतात), हल्लीच्या चित्रपटांमध्ये हल्लीच्या प्रथेप्रमाणे कँडल्सही असतात. मद्रासला तयार झालेल्या चित्रपटांमध्ये भव्य सेट्सच्या बेडरूम्स, त्यातलं चकचकीत डेकोर. ही पूर्वतयारी झाली की, मग पलंगावर हातभर घुंगट ओढून बसलेली नायिका, जी लाजेनं चूर झालेली आहे. लग्नाआधी नायकाबरोबर झाडांभोवती फिरताना तिला काही वाटत नाही, पण लग्न झालं की नायकाला भेटताना मात्र तिला लाज वाटते! नायकाची चेष्टा करणारं त्याचं मित्रमंडळ किंवा भोचक करवल्या. सगळ्यांची चेष्टामस्करी झाल्यावर नायकाला बेडरूममध्ये ढकललं जातं. मग तो हळूवार हातांनी बेडरूमच्या दाराला कडी घालतो. पलंगावर येऊन बसतो आणि नायिकेचा घुंगट उचलतो. घुंगटमधली नायिका आता मी कुठं जाऊन तोंड लपवूच्याच पवित्र्यात. तरीही ती स्वतःला कसंबसं सावरून बाजूच्या टेबलावरचा केशरी दुधाचा ग्लास नायकाच्या हातात देते. मला एक प्रश्न नेहमी पडतो की, पहिल्या रात्रीसाठी सगळी शक्ती नायकालाच का बरं यावी? नायिकेसाठी दुधाचा ग्लास का नाही?

पहिल्या रात्रीच्या प्रसंगावर चित्रपटांमध्ये अनेक गाणी चित्रीत झालेली आहेत. त्यातलं सगळ्यात गोड गाणं मला वाटतं ते ‘शिकलेली बायको’ या चित्रपटातलं, ‘आली हासत पहिली रात’. त्याकाळी नवरा कमी शिकलेला आणि बायको त्याच्याहून जास्त शिकलेली ही थीमच वेगळी होती. त्यात ती शिकलेली बायको लग्नाच्या पहिल्या रात्री गाणं म्हणतेय हेही अजूनच वेगळं. ‘आली हासत पहिली रात’ म्हणताना ही शिकलेली बायको शेवटी ‘पतिचरणाशी प्रीत अर्पिता’ म्हणतेच. नवरा हा देवासमान आहे ही भावना या पहिल्या रात्रीशी जवळून निगडीत आहे.

‘कभी कभी’ या चित्रपटात राखी आणि शशी कपूरच्या लग्नानंतरची पहिली रात्र. राखीनं तिच्या मनाविरुद्ध शशी कपूरशी लग्न केलेलं आहे. लग्नानंतर ते पहिल्यांदाच भेटतात. फुल यश चोप्रा स्टाइल भडक मेकअप, खूप दागिने, झगमगीत घागराचोली. ती अवघडली असेल याचा विचार न करता तो तिला गाणं म्हणायला सांगतो. अर्थातच तिच्या प्रियकरानंच लिहिलेलं. ती गायला लागते. ती गातेय आणि हा तिचा एक एक दागिना उतरवतोय. बरं मला एक कळत नाही की, इतके मोठे मोठे कानातले घातलेत आणि ते सहज, मागच्या फिरक्या न काढता कसे काय काढता येतात? असो. तर तो दागिने उतरवतोय. ती गाताना रडतेय आणि ते त्याला दिसतच नाही, हे कसं? किंवा त्याला दिसतंय, पण तो त्याची पर्वा करत नाही. लता मंगेशकरांनी गायलेलं अतिशय सुंदर गाणं, साहिर लुधियानवीचे अप्रतिम शब्द. पण बायकोची पर्वा न करणारा शशी कपूर मात्र आवडत नाही.

‘खानदान’ चित्रपटातलं असंच अजून एक गाणं, ‘तुम्ही मेरे मंदिर, तुम्ही मेरी पूजा, तुम्ही देवता हो.’ इथंही पुन्हा तेच. एकतर मद्रासचा चित्रपट. एकूण डोळ्यांना सगळंच भडक दिसतं. पण नवऱ्याला बायकोने ‘देवता’ म्हणणं, तेही लग्नानंतरच्या पहिल्या रात्री, नाही म्हटलं तरी खटकतंच. सगळ्यात विनोदी म्हणजे शेवटचं कडवं – ‘बहोत रात बीती, चलो मैं सुला दू, पवन छेडे सरगम, मैं लोरी सुना दूं!’ आता बोला. एरवी अत्यंत सुरेख दिसणाऱ्या नूतनला भडक मेकअपनं वाईट दिसायला लावलंय आणि सुनील दत्तबद्दल न बोललेलंच बरं.

आता एक सुरेख गाणं. खरं तर ते त्या अर्थानं पहिल्या रात्रीशी निगडीत नाहीये, पण पहिल्या रात्रीची आठवण करून देणारं. ‘दिल एक मंदिर’ चित्रपटातलं. नायिकेच्या नवऱ्याला कॅन्सर झालाय. त्याचं एक अवघड ऑपरेशन आहे. अर्थातच ते ऑपरेशन नायिकेचा पूर्वाश्रमीचा प्रियकर करणार आहे (सिनेमॅटिक लिबर्टी किती म्हणजे किती घ्यायची!) ऑपरेशनच्या आधी नवरा नायिकेला ‘सुहाग रात’च्या पेहरावात बघण्याची इच्छा व्यक्त करतो. आता ते वेगळ्या गावी एका दवाखान्यात राहताहेत. तिथं तिचा पहिल्या रात्रीचा पोशाख, दागिने कुठून आले हा प्रश्न विचारायचा नाही, सिनेमॅटिक लिबर्टी! तर ते असो. ती ते घालून एक अतिशय सुरेख गाणं म्हणते – ‘रूक जा रात, ठहर जा रे चंदा, बीते ना मिलन की बेला’.

‘जिंदगी गुलज़ार है’ या पाकिस्तानी मालिकेतला पहिल्या रात्रीचा प्रसंग फार मस्त शूट केलाय. अगदी नॉर्मल. यातल्या नायक-नायिकेच्या सामाजिक परिस्थितीत जमीन-अस्मानाचा फरक आहे. पण एका विशिष्ट काळानंतर त्यांचा सामाजिक दर्जा आता एका पातळीला आला आहे. दोघेही पाकिस्तानी सिव्हिल सर्व्हिसमध्ये काम करताहेत. नायक हळूहळू नायिकेच्या प्रेमात पडलाय आणि तो तिच्या मागे लागून तिला लग्नाला भाग पाडतो. लग्नानंतर दोघं आपल्या खोलीत भेटतात. नॉर्मल खोली. मुख्य म्हणजे पलंग फुलांच्या माळा लावून सजवलेला नाहीये. नायिका घुंगट घेऊन बसलेली नाहीये. नायक खोलीत येतो. तोच अतिशय नर्व्हस झालाय. उलट नायिका मस्त, मजेत आहे, त्याची मजा बघतेय. आधी तो नायिकेसाठी भेट म्हणून आणलेली अंगठी कुठे ठेवली आहे ते शोधतो. त्यानंतर वेंधळ्यासारखी ती पुन्हा हरवतो. शेवटी नायिकेच्या हातात घालतो. या पूर्ण प्रसंगात नायक आणि नायिकेच्या मनात चाललेली स्वगतं लाजवाब आहेत. त्यासाठी तरी हा प्रसंग बघायलाच हवा. सगळ्यात गंमत म्हणजे एरवी फ्लर्ट असणारा नायक नायिकेला म्हणतो – ‘लडकियों से बात करना कितना मुश्किल होता है ना!’ नर्मविनोदातून एखादा प्रसंग कसा फुलवता येतो आणि तोही अलवारपणे हे या प्रसंगात ठळकपणे जाणवतं.

हिंदी-मराठी चित्रपट आणि मालिकांमधून पहिल्या रात्रीचं अजून एक वैशिष्टय जाणवतं, ते म्हणजे पहिल्या रात्रीच नायक किंवा नायिकेनं एकमेकांना आपलं दुसऱ्याच व्यक्तीवर प्रेम आहे हे सांगणं. हेही खास भारतीय मनोरंजन जगाचं वैशिष्ट्यच. ‘हम दिल दे चुके सनम’मध्ये ऐश्वर्या राय आपल्या नवऱ्याला पहिल्या रात्रीच आपलं त्याच्यावर प्रेम नाहीये, आपल्या मनाविरुद्ध हे लग्न झालंय याची जाणीव करून देते.

‘जुळून येती रेशीमगाठी’ या मराठी मालिकेत लग्नाच्या पहिल्या रात्रीचा प्रसंग. अर्थातच वर लिहिल्याप्रमाणे सगळ्यांच्या चेष्टा-मस्करीनंतर नवपरिणीत जोडपं आपल्या खोलीत येतं. घाणेरड्या प्लॅस्टिकच्या माळांनी सजवलेला पलंग. मराठी मालिका या बाबतीत अत्यंत दरिद्री असतात. हिंदी मालिकांमध्ये निदान चांगला सेट तरी असतो. तर असो. प्लॅस्टिकच्या माळांनी सजवलेला पलंग. बेडवर डोकं टेकायला कुशन्स. आता इतका तरी दरिद्रीपणा करू नये ना. यांना साध्या उशा का मिळत नाहीत देवच जाणे! बेडवर गुलाबाच्या पाकळ्यांचा कचरा. अर्थातच नायिका नायकाला आपलं दुसऱ्या कुणावर तरी प्रेम असल्याचं सांगते. नायक अतिशय उदार मनाचा असल्यानं तो हे फारच समजुतदारपणे घेतो. इतकंच नव्हे तर ‘हम दिल दे चुके सनम’ आणि ‘जुळून येती रेशीमगाठी’ या दोन्हीतले नायक, नायिकेला तिचं पहिलं प्रेम मिळवून देण्याचा प्रयत्न करतात.

तर अशी ही ‘सुहाग रात’. खास भारतीय गोष्टींच्या याद्या जेव्हा केल्या जातील, तेव्हा खास भारतीय गोष्ट म्हणून ‘सुहाग रात’ किंवा ‘पहिल्या रात्री’चा समावेश करायला अजिबातच हरकत नाही!

 

लेखिका ‘डिटीजल कट्टा’ या ऑनलाइन नियतकालिकाच्या संस्थापक संपादक आहेत.

sayali.rajadhyaksha@gmail.com

Post Comment

Arti Patil

Sun , 15 January 2017

Eka movie Madhye sanjiv kumar ka farukh shekh ghunghat uthwaychya tayarine yeto Aani Vidya Sinha mast Sasha sadit khidkipashi ubha aste...khup sudar aahe to scene and movie pan Naav nahi aathwatey movie che