‘झुंड’ : आतून-बाहेरून खरवडणारं नाटक आहे, म्हणून ते (तिकीट काढून) पहावे!
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • ‘झुंड’ या नाटकाचे पोस्टर
  • Mon , 03 February 2020
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar झुंड Jhund समर खडस Samar Khadas

मराठी व्यावसायिक रंगभूमीवर डिसेंबरमध्ये मंचित झालेलं ‘झुंड’ हे नाटक तीन वैशिष्ट्यांनी आपली उत्सुकता वाढवते.

यातले पहिले वैशिष्ट्य वा वेगळेपण हे की, या नाटकाचे लेखन पत्रकार व कथाकार समर खडस यांनी केलेय. खडस यांच्या कथा एका विशिष्ट वर्गात माहीत असण्याची शक्यता जास्त. मात्र पत्रकार व राजकीय विश्लेषक म्हणून मराठी वृत्तवाहिन्यांच्या खिडकी चर्चा दंगलीत एक थेट, स्पष्ट, प्रसंगी आक्रमक असा वक्ता म्हणून अनेकदा अनेकांनी त्यांना पाहिले असेल. कथा लेखनानंतर त्यांनी आता नाटक माध्यमात लेखक म्हणून पदार्पण केलेय. हे त्यांचे पहिलेच नाटक.

या नाटकाचे दुसरे वेगळेपण, तसे पहिलेपणाचे नाही. नेपथ्य, प्रकाश योजनाकार प्रदिप मुळ्ये यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केलेय. मुळ्ये यांनी याआधी ‘पोपटपंची’ (शफाअत खान), ‘सारे प्रवासी घडीचे’, तसेच अलिकडे पुनरुज्जिवित केलेले ‘कुसुम मनोहर लेले’ ही नाटके दिग्दर्शित केली आहेत. अशा मुळ्येंनी समर खडस यांचे हे नाटक दिग्दर्शित करण्यात वेगळेपण असे आहे की, एका थेट विषयावरचे संवादनाट्य व्यावसायिक रंगमंचावर आजच्या माहौलमध्ये दिग्दर्शन/नेपथ्य/प्रकाश या जबाबदाऱ्यांसह मंचित करण्यात पुढाकार घेणे.

तिसरे वेगळेपण संतोष कणेकर यांनी त्यांच्या अथर्व नाट्यसंस्थेतर्फे याची निर्मिती केलीय. संतोष कणेकर यांनी याआधी ज्यांना पूर्ण व्यावसायिक म्हणता येतील, अशी नाट्यनिर्मिती केलीय, तसेच ‘रात्रीस खेळ चाले’, ‘गावाकडच्या गजाली’ अशा मालिकांची निर्मिती केलीय. ‘झुंड’ या नाटकाला त्यांच्यासारख्या व्यावसायिक निर्मात्याने मंचावर आणणे हा एक विशेष आहे. व्यावसायिक नाटकाची अघोषित वैशिष्ट्ये अजिबात नसलेल्या या नाटकाची निर्मिती करणे हे व्यावसायिक धाडसच.

आता या सर्व नाट्यबाह्य वैशिष्ट्यासाठी (केवळ) हे नाटक बघावे का? तर नाही. ‘झुंड’ आपल्याला आतून बाहेरून खरवडते. म्हणून ते पहावे.

ही या नाटकाची समीक्षा नाही, तर ‘झुंड’सारखा विषय रंगमंचावर येणे, यासारख्या संवादनाट्यांची आजच्या सत्ताशरण व सत्तादबावाच्या वातावरणात मंचित होण्याची गरज आहे. त्याबद्दलचे हे प्रतिपादन आहे. कारण ‘झुंड’ची नाट्यसमीक्षा प्रमुख वर्तमानपत्रांत करून झालेली आहे. ती जिज्ञासूंनी त्या त्या वर्तमानपत्रांच्या वेबसाईटवर वाचावी.

आधी म्हटल्याप्रमाणे हे एक प्रखर संवाद नाट्य आहे. त्याचा विषय राजकीय सामाजिक पर्यायाने सांस्कॄतिकही आहे. अशा प्रकारच्या नाटकाची सुरुवात आपल्याकडे गो.पु. देशपांडे यांच्या ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’पासून सुरू झाली. गोपुंची पुढची सर्वच नाटके ही वैचारिक, मुख्यत: राजकीय चर्चानाट्ये होती. ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ वगळता त्यांची इतर नाटके त्या प्रमाणात मंचित झाली नाहीत.

‘झुंड’ हे  नाटक ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’, ‘अँटिगनी’, ‘जुलूस’, ‘एक और द्रोणाचार्य’, ‘पोस्टर’, ‘अंधायुग’, ‘राहिले दूर घर माझे’, ‘ढोलताशे’, ‘पोपटपंची’, ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकांच्या परंपरेतले नाटक म्हणता येईल. समर खडस यांचे पहिलेच नाटक असल्यामुळे नाटक माध्यमाला आवश्यक अशा काही गोष्टींची उणीव नक्कीच आहे. मात्र त्यांना जे म्हणायचेय म्हणजे नाटकाच्या परिभाषेत नाट्यात्म विधान म्हणतात ते त्यांनी थेट कुठलाही आडपडदा न ठेवता ठोसपणे म्हटलेय. लेखक म्हणून हे गुण ते वसूल करतात.

रेखाचित्र - संजय पवार

नाटक घडते वर्तमानपत्राच्या कचेरीत. ‘दोन स्पेशल’नंतर प्रदिप मुळ्येंनी ते पुन्हा एकदा तितक्याच प्रत्ययकारी पद्धतीने मांडलेय. आपल्या आजच्या प्रेक्षक, दर्शकांना जेवढे वॄत्तवाहिन्यांचे स्टुडिओ परिचित आहेत, तेवढे मुद्रित माध्यामांच्या कचेऱ्यांशी परिचित नाहीत. पण यानिमित्ताने ते पुन्हा एकदा पाहता येईल.

वर्तमानपत्राचे संपादक, उपसंपादक, पत्रकार (सर्वसाधारण लोकांना महाविद्यालयामध्ये जो शिकवतो तो प्रोफेसर वाटतो, तसाच वर्तमानपत्रात काम करणारा तो पत्रकार असा सार्वत्रिक समज असतो), याशिवाय एचआर डिपार्टमेंटची प्रतिनिधी द्रोपदी अशी पात्र रचना आहे. द्रोपदी हे या नाटकातले एकमेव स्त्री पात्र, जे मॅनेजमेंटचे प्रतिनिधीत्व करते. नाटक सुरू होऊन पुढे सरकते तसे वर्तमानपत्राचे आतले जग उलगडत जाते. संपादक या भारदस्त पदाचे वेगवेगळे पैलू जसे कळतात, तसेच कुठल्याही कार्यालयात आढळणारे उच्चपदस्थांचे, व्यवस्थापनाचे लांगूलचालन करणारे इथेही आहेत, तसेच नेमाडेंच्या कादंबऱ्यात आढळणारे मानेवर जू घेऊन मान मोडून काम करणारे, पण अंतरंगी अस्वस्थ असणारे नोकरदार इथे पत्रकारांच्या रूपात दिसतात.

खडस यांनी पात्रांची नावे मंदबुद्धे (संपादक), ठसन (आक्रमक, सडेतोड पत्रकार), अष्टकोने (स्थिती, परंपरावादी), द्रोपदी (एचआर विभाग) अशी योजली आहेत. समर खडस यांच्या पत्रकारितेतील व कथांमधील स्पष्टवक्तेपणा व फटकारे या योजनेत स्पष्ट दिसतात. याबद्दल उपहास, उपरोध म्हणून पसंती न मिळता प्रेक्षक, समीक्षक यांना ते अनावश्यकही वाटतेय. त्यातून लेखक व्यक्तिरेखेविषयीच्या ग्रह/पूर्वग्रहाचे सूचन अगोदरच अधोरेखित करतो, अशी टीकाही नोंदवली जातेय.

हा झाला नाटकाचा अवकाश. या अवकाशात जे नाट्य घडते, त्यात नाटकाचा आशय आहे. घटना घडते ती साधी वा शुल्लक म्हणता येईल. पण त्यातून जे घडते वा घडवले जाते, त्यावरची वादळी चर्चा हा ‘झुंड’चा आशय आहे. घटना काय घडते हे प्रत्यक्ष नाटक बघूनच पाहावी. जी घटना घडते ती व्यक्तिरेखेच्या कार्यालयीन जबाबदारी वा बेजबाबदारीबद्दल, असभ्य वर्तन अथवा पदाचा गैरवापर अशी व्यवसाय अथवा जबाबदारीसंदर्भातील नाही. ती प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणीही नाही. मात्र लांबवर दिसलेल्या धूरातून आगीची शक्यता व अशी आगलावी प्रखरता कुणात? अशा पद्धतीने व्यवस्थापन ठसनवर आरोपपत्र ठेवून त्याची चौकशी सुरू करते. आणि नाट्य सुरू होते. नाटकाचा दुसरा अंक ही चौकशी आणि त्याचा निकाल व त्याचे उमटलेले पडसाद, यावर आहे व त्यातल्याच एका क्षणी हे नाटक संपते.

वरवर पाहता या नाटकात अनेकांना काहीच सापडणार नाही. काहींना केवळ तो एकांगी प्रतिवाद वाटेल. काहींना यापलीकडे आणखी काही हवे होते असे वाटेल. पण नाटककाराने सर्वांना आतून बाहेरून खरवडणारे विधान नाटकाच्या शेवटास केले असून सुजाण, विवेकवादी प्रेक्षकास ते अंतर्मुख करणारे आहे.

या शेवटाकडे येण्यापर्यंतच्या प्रवासात एक मोठा प्रबोधनाचा पाठ ठसन चौकशी दरम्यान घेतो. तो चौकशी आयोगासाठी आहे तसाच प्रेक्षकांसाठीही. मात्र आपल्या या सुसूत्र, ससंदर्भ विवेचनाचा उपयोग शून्य असून कुत्रा पिसाळलाय हे गृहितक पक्के करून त्याला गोळी घालावीच लागेल, हा निर्णय आधीच घेतलाय हे ठसनला माहीत आहे. त्यामुळे या चौकशीचा निकाल आरोपपत्रातच निश्चित केलाय, हे तो सहकाऱ्यांना समजावून सांगतो व त्याच वेळी पोटभरू पत्रकार नोकरी टिकवण्यासाठी राजापेक्षा राजनिष्ठा दाखवण्याची केविलवाणी धडपड करतात, ती ही तो उघड करतो.

पण सगळ्यात महत्त्वाचे आहे ते या सर्व आरोप, चौकशी दरम्यान, त्याच्या मागे उभे असणारे, हळहळणारे, प्रसंगी संतापणारे व ठसनच्या निर्णयानंतर आक्रंदन करणारे त्याचे सहकारी यांना तो काहीही न बोलता कॄतीतून जो संदेश देतो, तो त्या सहकाऱ्यांना आहे, तसाच प्रेक्षक, पर्यायाने समाजाला आहे. काय आहे तो संदेश? तर घटना घडताना पुढे न होता सेल्फीमग्न लोकांप्रमाणेच निव्वळ चर्चा, सहानुभूती, पत्रकबाजी किंवा आपण काय करणार? आपली ताकद ती काय? इथपासून भौतिक गरजांच्या अनिवार्यतेतून निष्क्रियतेला तटस्थ असे भारदस्त संबोधन लावून हतोत्साही अथवा हतबल होणाऱ्या साऱ्यांसाठी तो संदेश आहे.

घटना घडताना, घडवताना जे दोन गट अथवा झुंडी एकमेकांना भिडून जख्मी करताना, होताना. त्याकडे मूक साक्षीदार म्हणून केवळ पाहत राहणाऱ्यांची झुंड या पहिल्या दोन झुंडींपेक्षा अधिक दोषी व गुन्हेगार आहे हा तो संदेश. झुंडशाहीचा निषेध करताना आपणही नकळत एका निष्क्रिय झुंडीचा भाग होतो, हे आपल्याला या नाटकातून आतून बाहेरून खरवडणारे आहे.

संवाद नाट्य, त्यातूनही ते ठोस राजकीय सामाजिक सांस्कॄतिक भाष्य करणारे असेल तर त्या व्यक्तिरेखा उभ्या करणे हे नट नट्यांसाठी मोठे आव्हान असते. कारण व्यक्तिरेखेआड दडलेला लेखक उघड होऊ न देण्याची कसरत त्याला करावी लागते. नट ‘अॅथलिट फिलॉसाफर’ असावा असे डॉ.लागूंनी म्हणून ठेवलेय. संवाद नाटकात ‘अॅथलिट’ऐवजी फिलॉसॉफरला कष्ट अधिक असतात. त्याचे एकुणच वाचन व बहुश्रुतता याचे कसब इथे पणाला लागते. इथे खेदाने म्हणावेसे वाटते, किरकोळ अपवाद वगळता अनेक  मराठी नट नट्यांचे वाचन व बहुश्रुतता ही निरक्षर माणसाच्या समकक्ष आहे.

या पार्श्वभूमीवर ‘झुंड’मधील अभिनेत्यांनी हे आवाहन बऱ्यापैकी पेलले आहे. यात विशेष उल्लेखनीय अक्षर कोठारी, किरण माने व नंदू गाडगीळ. नंदू गाडगीळांची व्यक्तिरेखा कणा नसलेली आहे. पण ती संवाद व देहबोलीतून दाखवणे इनोदी अथवा अर्कचित्रात्मक होण्याची शक्यता असते. गाडगीळांनी ती लेखकांनी दिलेल्या मापात बिनचूक वठवलीय. किरण मानेंनी उत्तरोत्तर अभिनयातून नाटकाचा आशय ठोसपणे पोहचवण्यासाठी घेतलेले कष्ट शेवटाला अधिक उठून दिसतात. अक्षर कोठारींनी ठसन ठसक्यात केलाय, पण जे समर खडसांना ओळखतात, त्यांना त्यांचाच भास अक्षरमध्ये होतो. हे चांगले की वाईट ठरवता येत नाही, इतके ते एकजीव झालेत चेक्सच्या शर्टासह!

प्रदिप मुळ्येंनी हे संवाद नाट्य रंगमंचावर तीन भागात घडवून ही चर्चा फिरती ठेवलीय. संपूर्ण प्रयोगालाच एक गती देऊन चर्चानाट्यात प्रेक्षक खुर्चीत सैलावणार नाही, याची खबरदारी जशी घेतलीय तशीच वेगाच्या नादात चर्चा नाट्याचे प्राण असलेले शब्द गुंडाळले, गाळले वा एकमेकात गुंतणार नाहीत, अशा पद्धतीने खणखणीत वाचिक अभिनय त्यांनी करून घेतलाय. नटमंडळींनीही हे आव्हान पेललंय.

‘झुंड’सारख्या नाटकाचं व्यावसायिक यश दर्जेदार विचारप्रवण कलाकॄती म्हणून विचारात घेऊन दुर्लक्षित करण्याचा धोका असतो. आणि वर्तमानपत्र असो की नाटक ते चालू ठेवायचे तर खप हवाच. त्यामुळे अशा नाटकांचा प्रेक्षक वाढला तर कणेकरांचे धाडस सार्थकी लागून, अशा लेखनासाठी व्यावसायिक मार्ग खुला होऊ शकतो. म्हणून ‘झुंड’ (तिकीट काढून) पहायला हवे.

...............................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......