जहाल हिंदूराष्ट्रवादी विचारांपासून देशातील मतदारांचं डी-रॅडिकलायझेशन करण्याची गरज आहे!
पडघम - देशकारण
सुनील तांबे
  • भारतीय सैन्यदलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत
  • Mon , 20 January 2020
  • पडघम देशकारण बिपिन रावत Bipin Rawat रायसीना डायलॉग Raisina Dialogue डी-रॅडिकलायझेशन De-radicalisation

शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं व धर्मस्थळांचा वापर तरुण-तरुणींमध्ये जहाल विचारांची रुजवात करण्यासाठी केला जातो, त्यांचं डी-रॅडिकलायझेशन करण्यासाठी शिबिरं गरजेची आहेत आणि आपल्या देशात अशी केंद्रं चालवली जातात, अशी माहिती भारतीय सैन्यदलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने नवी दिल्लीत आयोजित केलेल्या ‘रायसीना डायलॉग’ या कार्यक्रमातील चर्चेत सैन्यदल प्रमुखांनी ही माहिती दिली.

जनरल रावत यांचा रोख बहुधा काश्मीरमधील परिस्थितीवर असावा. पाकिस्तानलाही अशा केंद्रांची गरज भासू लागली आहे, कारण आपण उभा केलेला दहशतवादाचा भस्मासूर आपल्याच देशावर उलटू शकतो, याची जाणीव पाकिस्तानी लष्कराला झाली आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

जनरल रावत यांच्या मताशी देशातील कोणताही सुजाण माणूस सहमत होईल. मात्र जनरल रावत यांनी केवळ पाकिस्तान आणि काश्मीर यांच्यावर नजर ठेवली आहे. अखलाखच्या घरात गोमांस आहे, त्याला धडा शिकवण्यात यावा, असं आवाहन गावातल्या मंदिरातून लाऊडस्पीकरवरून करण्यात आलं आणि पिसाट जमावाने शिवणयंत्राने ठेचून अखलाखला ठार केलं. राजस्थानातील एका शेतकर्‍याने मुसलमान शेतमजुरावर कुर्‍हाडीने घाव घातले आणि त्यानंतर त्याला जिवंत जाळला आणि त्याचं चित्रण सोशल मीडियावर टाकलं. या खुन्याच्या समर्थनार्थ राजस्थानात मोर्चे निघाले, न्यायालयावर भगवा ध्वज फडकवण्यात आला. गांधीजींच्या खुन्याचं जाहीर समर्थन करणार्‍या, दहशतवादी कृत्यांत सहभागी असलेल्या एका महिलेला भाजपने उमेदवारी दिली आणि लोकांनी तिला प्रचंड मतांनी विजयीही केलं.

बिहार असो की पश्चिम बंगाल, तलवारी नाचवत देवदेवतांच्या नावाने मिरवणुका काढण्यात येतात. कव्वाली हा कलाप्रकार हिंदूविरोधी आहे म्हणून उत्तर प्रदेश सरकार त्यावर बंदी घालतं, सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आंदोलन करणार्‍यांना आमच्या सरकारने कुत्र्यासारख्या गोळ्या घातल्या, असं जाहीर विधान पश्चिम बंगाल राज्याचे भाजप प्रमुख करतात. सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणारे देशद्रोही आहेत असा आरोपही ते करतात. प्रा. एम. एम. कलबुर्गी, डॉ. नरेंद्र दाभोलकर, गौरी लंकेश यांच्या हत्या हिंदुधर्माभिमानी करतात, त्यासाठी त्यांना रितसर प्रशिक्षण देण्यात येतं. या खुन्यांचा संबंध सनातन संस्थेशी आहे, हे स्पष्ट झाल्यावर राज्य वा केंद्र सरकार त्या संस्थेवर कारवाई करत नाही. भारतीय सायन्स काँग्रेसमध्ये ‘प्राचीन भारतातील विमानविद्या’ असा बोगस निबंध वाचला जातो. डार्विनचा सिद्धान्त चुकीचा आहे, मानवाची उत्पत्ती प्राण्यांपासून झालेली नाही, असा दावा केंद्रीय मंत्री करतो. अर्जुनच्या बाणामध्ये अण्वस्त्रांची शक्ती होती, असं विधान एका राज्याचा राज्यपाल करतो. मशिदीची जागा रामलल्लाच्या नावावर करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय देतं. भाजपचा आयटी सेल आणि संघ परिवाराचे शेकडो गट राष्ट्रवादाच्या नावाने विषारी प्रचार करत असतात. जहाल विचाराची रुजवात करणार्‍या संघ परिवारातील संस्था, त्यांना बळ देणारे राज्यांचे प्रमुख, पक्षनेते, तरुणांना दंगेखोर बनवणार्‍या संस्था, संघटना यांचंही डी-रॅडिकलायझेशन करण्याची गरज आहे. मात्र हा विषय सैन्यदल प्रमुखांच्या कार्यकक्षेत येत नाही. म्हणून ते केवळ सीमापार दहशतवाद, पाकिस्तान आणि काश्मीरवर बोलतात. परंतु त्यांची मांडणी गांभीर्याने घ्यायला हवी. हिंसाचाराला चिथावणी देऊन हिंदूराष्ट्रवादाचा पुरस्कार करणार्‍या संस्था, संघटना, नेते यांचं डी-रॅडिकलायझेशन कसं करायचं? त्यांच्यासाठी किती शिबिरं उघडायला लागतील?

पंजाबमधील दहशतवादाचा बंदोबस्त करण्यासाठी जे. एफ. रिबेलो या कर्तबगार अधिकार्‍याची निवड राजीव गांधींनी पंतप्रधान असताना केली होती. केंद्रीय गृहमंत्रालयात सचिवपदी मिळणारी बढती नाकारून पंजाबातील पोलीस महासंचालक म्हणून रिबेलो यांनी जबाबदारी स्वीकारली. खालिस्तानी दहशतवाद्यांनी रा. स्व. संघाच्या शाखेवर गोळीबार करून स्वयंसेवकांच्या हत्या केल्या. रिबेलो त्यांना भेटायला गेले. हिंदूराष्ट्रवादाचा पुरस्कार करणार्‍या या हिंदू कुटुंबांना एका ख्रिश्चन पोलीस अधिकार्‍याचा आधार वाटला होता. वयाच्या ८६ व्या वर्षी लिहिलेल्या एका लेखात रिबेलो म्हणतात, ‘आज मी माझ्याच देशात परका ठरलो आहे.’ २०१४ नंतर देशातील हिंदुत्व विचाराचा जहालपणा जनमानसात किती भिनला आहे हे रिबेलो अधोरेखित करतात. तालिबान, अल कायदा, लष्कर ए तय्यबा, हिजबुल मुजाहिदीन इत्यादी इस्लामी दहशतवादी संघटना पाकिस्तान आणि काश्मीरात किंवा बांग्ला देश आणि अफगाणिस्तानात वा मध्यपूर्वेत जहाल विचारांची पेरणी तेथील वा अन्य देशांतील सरकारांच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहकार्याने करत असतात. पण त्यामुळे आपल्या देशातील परिस्थितीचं गांभीर्य कमी होत नाही.

जहाल हिंदूराष्ट्रवादी विचारांपासून देशातील मतदारांचं डी-रॅडिकलायझेशन करणं, भारतीय राज्यघटनेच्या विचाराची रुजवात प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणात करण्याची गरज आहे. केरळ सरकारने या कामी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रासह अन्य बिगर-भाजप शासित राज्यांनी त्याचं अनुकरण करायला हवं.

.............................................................................................................................................

लेखक सुनील तांबे मुक्त पत्रकार आहेत. 

suniltambe07@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......