‘आरपारावलोकिता’ : उत्तरं मागणारा कथनाचा वेगळा प्रयोग
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • ‘आरपारावलोकिता’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ. रेखाचित्र - संजय पवार
  • Thu , 16 January 2020
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar आरपारावलोकिता Aarparavlokita विद्युत भागवत Vidyut Bhagvat

डॉ. विद्युत भागवत या स्त्री अभ्यासक म्हणून महाराष्ट्रातच नव्हे, तर देशा-परदेशातही परिचित आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्त्री अभ्यास केंद्राच्या त्या पहिल्या संचालक. आज या केंद्राचे जे काही स्वरूप आहे, ते उभारण्यात त्यांचा वाटा मोठा आहे.

डॉ. विद्युत भागवत विविध स्त्री संघटनांसह परिवर्तनवादी चळवळीशी जोडून घेत आल्यात. त्यात शेतकरी, दलित, संघटनांशी त्यांचा विविध पातळीवर सहभाग व संवादही राहिलेला आहे. याशिवाय पुण्याच्या सांस्कृतिक विश्वात ज्यात गीत, संगीत, नाटक, चित्रपट यांसह इतर कलाक्षेत्रांतही त्यांचा वावर राहिलाय. मात्र त्यांची प्रतिमा अधिकतर अभ्यासक व सोशल एलिट अशीच राहिलीय

डॉ. विद्युत भागवतांनी आजवर कविता व कथालेखनासह भरपूर वैचारिक लेखन केलंय.

‘आरापारावलोकिता’ ही त्यांची पहिलीच कादंबरी. वयाच्या सत्तरीत त्यांनी काहीशा चिकाटीने (मधली आजारपणं सांभाळत) ती पूर्ण केली. पुण्याच्या हरिती प्रकाशनाने ती प्रकाशित केलीय.

रूढार्थाने ‘आरपारावलोकिता’ ही कादंबरी म्हणता येणार नाही. कारण कथानायिका जानकीच्याच मनात द्वंद्व आहे की, आपण कादंबरी लिहावी की आत्मकथन?

कदाचित हेच व्दंद्व डॉ. विद्युत भागवतांच्या मनातही असावं आणि नाटकात जसे नाटक असते किंवा चित्रपटात चित्रपट तसं या कथनात कादंबरीत आत्मकथन किंवा आत्मकथन कादंबरीसारखे लिहिण्याचा प्रयोग विद्युत भागवत जानकी म्हणून करतात. पण अंतिमत: ते ना कादंबरी होते, ना आत्मकथन, तर नुस्तेच कथन म्हणून वाचता येते (किंवा वाचावे लागते).

याला दस्ताऐवजही म्हणता येणार नाही, कारण यात व्यक्ती व स्थळे यांचीही नावे बदलली आहेत. स्थळांची नावे तर काल्पनिक, पौराणिक, वा दोहोंचे मिश्रण. उदा. पंचवटी, बलीस्थान, शूर्पारक. कुरू इ.इ.

अनेकांना हा फसलेला प्रयोग वाटू शकतो. हाती काहीच लागत नाही असे वाटू शकते. लेखिकेला कादंबरी लिहायची नव्हती, पण आत्मकथनही नाही लिहायचे, पण सांगायचे तर आहे खूप. त्यातून काही प्रश्न उपस्थितही करायचे आहेत. अनुभव मांडायचेत. घटना, प्रसंग व व्यक्तीही विशद करायच्यात. पण हे एका विशिष्ट आकृतीबंधात न बांधता.

हे करताना हे कथन एकरेषीय होत गेलेय. या कथनात स्मरण आहे. काळ आहे. व्यक्ती आहेत व विचारही आहेत. हे सर्व कधी एकामागोमाग येतात, कधी पुसटसे स्पर्श करून जातात. कधी तिथेच थबकतात, तर कधी एकमेकांना ओलांडून पुढे जातात.

या क्रियेत कथनाची नायिका कधी भेलकांडते. कधी अस्वस्थ होते. कधी अपराधी तर अनेकदा पाय रोवून उभी राहते.

जानकीच्या समांतरच वाचकाचाही प्रवास होतो. डॉ. विद्युत भागवत जानकीचा सगळा प्रवास म्हटलं तर एकरेषीय म्हटलं तर अधले मधले टप्पे गाळत पुढे नेतात.

डॉ. विद्युत भागवत आणि जानकी या अद्वैतासारख्या कथनभर आपल्याला भेटतात. त्या ज्या पर्यावरणात वाढल्या, वावरल्या. सहभागी झाल्या, तुटून बाहेर पडल्या त्यातली स्थळे, व्यक्ती व घटना यांची मांडामांड करत त्या सतत प्रश्न विचारताहेत अथवा उत्तरे मागतात.

एखादी भूमिका वठवून वा जगून झाल्यावर बुद्धिमान नट जसा त्या व्यक्तिरेखेच्या गाभ्यात शिरतो. कथानक मूळातून समजून घेत, सुटलेल्या जागा जशा शोधत राहतो तशा डॉ. विद्युत भागवत जानकीच्या माध्यमातून मराठी सवर्ण मध्यमवर्ग, तिथली पुरुषप्रधानता, बायकांनी स्वीकारलेल्या भूमिका, त्यानंतर शिक्षण आणि मग त्यातून स्त्री अभ्यास करतानाच परिवर्तनवादी संघटना, राजकीय पक्ष, बिगर संसदीय गट ते एनजीओ असा चौफेर संचार करतात. बहुतांश वेळा अभ्यासक, विश्लेषक, मार्गदर्शक तर अगदी थोडा काळ कार्यकर्त्याच्या भूमिकेत त्या शिरतात.

हा सगळा काळ, त्यावेळची सामाजिक राजकीय, कौटुंबिक स्थिती आणि साठोत्तरी चळवळीने निर्माण केलेले वातावरण, विचारकलह याचं दर्शन घडवत त्या त्यांच्या मनातले प्रश्न जानकीच्या माध्यमातून उपस्थित करतात.

या सर्वाच्या मुळाशी एक अपराध गंड असा आहे की, परिवर्तनाच्या चळवळीतील स्त्री-पुरुषांनी आपल्या जातजाणीवा समूळ नष्ट न करता त्या फक्त खुल्या केल्या. पुढच्या स्त्रीवादी चळवळींवीही तोच कित्ता गिरवला. त्यामुळे जानकीची विद्यार्थिनी मुक्ता खोब्रागडे जानकीला जेव्हा विचारते- दलितांची, दलित स्त्रियांची आत्मकथने उचलून धरणाऱ्या तुम्ही, त्यावर विश्लेषण करत दलित जीवनाचा जो उभा आडवा छेद घेता, त्यातल्या उघड्या नागड्या वर्णनांना धिटाई म्हणत थोपटता, पण तुम्ही तुमची आत्मकथने लिहीत नाहीत. केशवपन, विधवांचे गर्भपात, घरातला, समाजातला जातीवाद, घरातली पुरुषसत्ता, अविचार, व्यभिचार मांडत नाही. तुम्ही कधी आपले आयुष्य स्कॅनरखाली आणणार? तेव्हा जानकी (पर्यायाने डॉ. विद्युत भागवतही?) मूळापासून हादरते आणि विचार करायला प्रवॄत्त होते आणि आत्मकथन लिहायचे ठरवते व लिहिते ते म्हणजेच आरपारावलोकिता!

कादंबरी की आत्मकथन या गोंधळातूनही आरपारावलोकितातून जात या विषयाच्या अनुषंगाने जे काही मांडलेय, लिहिलेय, प्रश्न विचारलेत आणि हे सर्व करत असताना सवर्ण-दलित हा भेद प्रत्यक्ष कार्य ते विचारवेध घेताना आजही कसा प्राथमिक पातळीवर आहे, हे या कथनातून उजागर होते.

या कथनातून सर्व चळवळी, वाद, अभ्यासक यांच्यापुढे आरसा धरण्याची धिटाई दाखवलीय. ती कदाचित अनुल्लेखाने मारली जायची शक्यता आहे. कारण साचेबंद आकृतिबंध नाही की पुस्तक गाजवणारा प्रकाशक नाही. त्यामुळे डॉ. विद्युत भागवतांनी केलेला हा प्रयोग जमला नाही असं म्हणत त्यातल्या प्रतिपादनाला सतरंजीखाली ढकलण्याचा चलाख प्रयत्न नक्कीच केला जाईल. कादंबरी प्रकाशित होऊन बरेच महिने झाले तरी साहित्य वा चळवळीशी संबंधित पर्यावरणात याची पुसटशीही दखल घेतली गेलेली दिसत नाही.

‘आरपारावलोकिता’ची वर्गवारी कशात करायची या प्रश्नात गुंतून पडून त्यातल्या प्रतिपादनाकडे दुर्लक्ष होणे हे चांगले नाही.

हरिती प्रकाशनाने त्याकडे अधिक लक्ष देऊन ही कलाकृती सर्वत्र सहज उपलब्ध करून द्यायला हवी.

...............................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......