इकडे योगी-मोदी-शहा, तिकडे ट्रम्प!
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • नरेंद्र मोदी, अमित शहा, रेखाचित्र - संजय पवार आणि योगी आदित्यनाथ
  • Wed , 08 January 2020
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar भाजप BJP नरेंद्र मोदी Narendra Modi अमित शहा Amit Shah योगी आदित्यनाथ Yogi Adityanath इंदिरा गांधी Indira Gandhi सीएए CAA देशद्रोही Deshdrohi जेएनयू JNU तुकडे तुकडे गँग Tukde Tukde Gang

आपल्या विरोधकांना निव्वळ राजकीयदॄष्ट्या संपवायचे नाही तर पूर्ण नेस्तनाबूतच करायचे, अशा विचारांचे राज्यकर्ते जगभरच उदयाला आलेत. ही कदाचित २१ व्या शतकाची देणगी असावी.

कारण खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणानंतर जगभरच राजकारणाचा पोत बदललाय. तो विचारधारांऐवजी सत्ताकेंद्री, अनिर्बंध सत्ता व पैसा हेच मुख्य ध्येय राहिलेय. विरोधी पक्षांकडे एक पक्ष(विचार) म्हणून न बघता त्यांना शत्रू समजायचे आणि सत्तेच्या माध्यमातून त्यांचे चित्रण ‘देशद्रोही’ असे करून त्यांना तुरुंगात टाकायचे किंवा बळाचा वापर करून जायबंदी करायचे वा सरळ सुनियोजित खटला भरून फासावर लटकवायचे. सध्या जगभर हीच पद्धत दिसतेय - मग ते ट्रम्प असो, पुतीन असो, सौदी राजा असो की जगभरातले लष्करी हुकूमशहा.

आपल्याकडे ही नीती प्रथम इंदिरा गांधींनंतर मोदी आणि आता मोदी-शहा यांच्या जोडीने योगी अवलंबताहेत. इंदिरा गांधींच्या काळात समाजमाध्यमे व अंकित माध्यमे नसल्याने आणि तोवर राजकारणाचा पोत आजच्यासारखा सुडावर गेलेला नसल्याने अवघ्या १९ महिन्यांत इंदिरा गांधींना लोकशाहीची पुनर्स्थापना करावी लागली!

मात्र मोदी-शहा पहिल्या पाच वर्षांच्या राजवटीनंतर पुन्हा सत्तेत आले आणि त्यांना वाटू लागले की, जनतेने आपल्या गुणाअवगुणांसह परत सत्तेत बसवलेय, म्हणजे आपले प्रत्येक धोरण, कृती याला लोकांनी स्वीकृती दिलीय- भले ती फसली असली तरी!

मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून त्यांच्या एकाधिकारशाहीसाठी ओळखले जातात. एकाधिकारशाहीचा एक फायदा असतो, लोकांना निर्णय फटाफट होताना दिसतात, प्रशासनात दहशत बसते आणि मनमानी पद्धतीने काही निर्णय घेतले जातात. ज्याचे कधीच कसलेही मूल्यमापन केले जात नाही. टीका परस्पर दाबली जाते.

त्यातून भ्रामक चित्र उभे करता येते.

आपली हीच गुजरात शैली मोदींनी पंतप्रधान झाल्यावर देश पातळीवर राबवली. मोदींना घोषणा करायला आवडतात, रात्रीत निर्णय घ्यायला वा फिरवायला आवडतात. निर्णय घेताना लोकशाहीचा देखावा ते तयार करतात, पण प्रत्यक्षात माध्यमांसह सर्व सरकारी यंत्रणांचा वापर विरोधी विचाराच्या दमनासाठी करतात. मग तो निर्णय ट्रिपल तलाकचा असो, कलम ३७०चा असो की सीएएचा. आपण जीएसटी कमी केला तर ती देशसेवा, मातृभूमीसेवा आणि विरोधकांनी त्यावर प्रश्न विचारला वा दुरुस्ती सुचवली की, ते सरळ ‘देशद्रोही’ असं म्हणून त्यांना झुंडींच्या तोंडी द्यायचं.

आज देशभर विद्यार्थ्यांचा जो असंतोष प्रकट होतोय, त्याकडे प्रश्न म्हणून न बघता मोदी-शहा-योगी उपद्रव म्हणून बघताहेत आणि ते आपल्या देशाचे नागरिक नसून कुणी दहशतवादी, अराजकवादी आहेत, असं ठसवून हा असंतोष अत्यंत रानटीपणाने मोडून काढला जातोय. त्यासाठी पोलिसी बळाचा अश्लाघ्य वापर केला जातोय. उत्तर प्रदेशात तर मुख्यमंत्री योगींनी २०००च्या गुजरातचीच पुनरावृत्ती करायचं ठरवलेलं दिसतं. त्यांच्या या अरेरावीला मोदी-शहा-योगी या अंतर्गत राजकारणाचा चौथा कोन आहे असे म्हणतात. पण जनतेच्या मढ्यावर सिंहासन स्थापनेची ही लालसा असंसदीय, लोकशाहीविरोधी व अमानवी आहे.

यात त्यातल्या त्यात जमेची बाजू अशी की, ज्या पद्धतीने हा नागरिक व विद्यार्थ्यांचा असंतोष लोकशाही पद्धतीने देशभर पसरतोय आणि त्याला समाजाच्या सर्व अंगातून मिळणारा वाढता पाठिंबा बघता पूर्ण अंकित दूरचित्रवाणी माध्यमे व त्यांची भोजनभाऊ मुद्रितमाध्यमे यांनासुद्धा झाकपाक करणे जमेना आणि वृत्ते द्यावी लागली.

ज्या समाजमाध्यमांचा वापर करून मोदी-शहा यांनी ‘पर्व एक’मध्ये झुंडींचे हिंसक राजकारण केले, तीच समाजमाध्यमे सकारात्मक वापरून विरोधकांनी मोदी-शहांना घेरलंय. त्यातून धडा घेण्यापेक्षा ते विरोधकांना ‘तुकडे तुकडे गॅंग’ म्हणून हिणवायला पियुष गोयलांसारखे मंत्री व फडणवीसांसारखे माजी मुख्यमंत्री, चापलूस-दरबापी भाट व चमचे गॅंग घेऊन मैदानात उतरलेत. मुळातच सत्ता पाहून वळचणीला आलेले चमचे बिनकण्याचे नि परप्रकाशी. त्यांना या स्वयंस्फूर्त आंदोलनांसमोर उभे राहण्याची धमक कुठून येणार? त्यामुळे प्रश्नाला भिडण्याऐवजी, अंगावर चालून जायची ही चाल हास्यास्पद व सपशेल अपयशी ठरतेय.

यातून वातावरण शांत होण्याऐवजी अधिक पेटतेय, हे परवाच्या जेएनयूतल्या हिंसक हल्ल्याने अधोरेखित केलेय.

ट्रम्पनी इराणी सेनाधिकारी मारणे आणि जेएनयूत बुरखाधारींनी अंधारात हल्ला करणे, याचे तपशील व संदर्भ वेगळे असले तरी प्रतवारी तीच आहे.

भाजपने एक राजकीय पक्ष म्हणून मोदा-शहा-योगी यांना ‘गो अहेड’ म्हणणे म्हणजे स्वत:च्याच पायावर धोंडा पाडून घेणे!

भाजपमधल्या काहींना तरी ‘अंधेरे में एक प्रकाश’ या घोषणेने पेटवलेला वणवा आठवत असेल, तर त्यांनी वेळीच हस्तक्षेप करून ही कीड आपल्या लोकशाहीला लागणार नाही हे पहावे. अन्यथा लोक वाजपेयींचेच ‘आओ फिरसे दिया जलाये’ ही ओळ घेऊन नव्या मशाली पेटवतील...

...............................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......