भाजपच्या अहंकाराला सेनेच्या वाघनखांनी शेवटी गुदगुल्याच केल्या!
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे
  • Fri , 01 November 2019
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar शिवसेना Shivsena भाजप BJP काँग्रेस Congress देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis उद्धव ठाकरे Uddhav Thackeray राष्ट्रवादी काँग्रेस NCP शरद पवार Sharad Pawar

महाराष्ट्र विधानसभेचे निकाल २४ तारखेला लागले. त्याच दिवशी हरयाणाचेही निकाल लागले. दोन्ही राज्यांत भाजप सर्वाधिक आमदार असलेला पक्ष आहे. दोन्ही राज्यांत ते पुन्हा सत्तेत बसतील, पण संख्या दोन्ही राज्यांत २०१४ पेक्षा कमी आहे. तरीही मित्रपक्ष नसताना, निकालोत्तर युती करून हरयाणात भाजप सत्तेत परतलाय. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली.

मात्र महाराष्ट्रात निवडणूकपूर्व युती असून आणि युतीला स्पष्ट बहुमत असतानाही सत्तासंपादनाचे काम पूर्ण व्हायला जवळपास आठवडा लागला. या आठवड्यात दिवाळीच्या निमित्ताने राजकीय फटाके उडवायचे काम शिवसेनेने हिरिरीने केले खरे, पण शेवटी भाजपने आपल्या खास शैलीत सेनेला आपल्यामागे फरफटत यायला लावले आणि सेनेची दिवाळी दीन दीन व हीन दीन झाली!

खरे तर सेनेसाठी सुसंधी होती. त्यांचे आमदार घटले तसेच भाजपचेही घटले. भाजपला सेनेशिवाय सत्ता स्थापन करणे अवघड होते. सेनेला वाटले भाजप आता नरमेल. पण ‘आक्रमण हाच बचाव’ ही मोदी-शहांची शिकवण फडणवीसांनी योग्य वेळी इतक्या गतिमान पद्धतीने केली की, सेनेला कळलेच नाही की आता काय करायचे!

भाजपचे पूर्ण गर्वहरण मतदारांनी केल्यावर भाजपसाठी एकच रस्ता मोकळा होता, तो म्हणजे निवडणूकपूर्व युतीने सेना बांधली गेली होती. त्यामुळे युतीचे संख्याबळ जरी कमी झाले तरी विरोधकांचे वाढले नव्हते. भाजप व युती दोघांना जो २२० पारचा दर्प होता, तो १६०च्या आसपास अडकला. म्हटले तर हा नैतिक पराभवच. पण नैतिकता नावाच्या गोष्टीचा आता निवडणुकीच्या राजकारणात विषयच होऊ द्यायचा नाही, हे धोरण भाजपने बेभानपणे व अंकित माध्यमांना हाताशी धरून देशभर राबवलेय.

आश्चर्य म्हणजे पाच वर्षे ज्या फडणवीसांची प्रतिमा अत्यंत सभ्य गॄहस्थ अशी होती, ती त्यांनी निवडणूक जाहीर झाल्यापासून इतकी झपाट्याने बदलली की, तेही आता निबर कातडीने वावरू व बोलू लागलेत. पक्षाला लागलेला अहंकाराचा वारा आता त्यांनासुद्धा लागलाय. मीच मुख्यमंत्री होणार हे ठासून सांगणं असो की, सेनेने सत्तेचे समान वाटप फॉर्म्युला चार दिवस चर्चेत ठेवल्यावर, आक्रमकपणे असा काही फॉर्म्युलाच नव्हता आणि अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री वगैरे काही नाही, पुढची पाच वर्षे मीच मुख्यमंत्री हे अधोरेखित करणे असो. फडणवीसांमध्ये सत्तेच्या आत्मविश्वासपेक्षा सत्तेचा माज, दर्पच दिसून आला. याची पुढची पायरी होती ती म्हणजे आम्ही पावसात थोडे कमी भिजलो म्हणून काही जागा कमी झाल्या असे म्हणणे! वास्तविक आता प्रचारातले मुद्दे मागे पडलेत. पवारांची पावसातली सभा पक्षीय भेदापलीकडे जाऊन सर्वांनी कौतुकास्पद ठरवली. त्यात त्यांच्या अनुभवाला व जिद्दीला सलाम होता. त्या जिद्दीने उदयनराजेंचा पाडावही झाला. त्या घटनेवर आता निकालानंतर असे भाष्य करून फडणवीसांनी आपला कद्रूपणाच दाखवला, आपली यत्ता दाखवली. हे सर्वच त्यांच्या आजवरच्या प्रतिमेशी विसंगत व विपरित आहे.

या बदलाचे कारण मोदी शहांचा असलेला वरदहस्त. तिकीट वाटपापासूनच पक्षांतर्गत विरोधकांना जागा दाखवत आणि चंद्रकांत पाटील व गिरीश महाजन या दोघांना मुक्त वावर देऊन घडवून आणलेली घाऊक पक्षांतरे यातून मोदी-शहा नीती आक्रमकपणे फडणवीसांनी वापरली. फडणवीसांमध्ये चढत चाललेला हा मोदी ज्वर त्यांना नैमित्तिक यश मिळवून देईल, पण दीर्घकालीन राजकारणात नंतर ते चावी संपलेल्या खेळण्यासारखे अडगळीत पडलेले दिसतील. त्यांच्याच पक्षातील अडवाणी ते खडसे असेच कधीकाळी धावत्या घोड्यावर तलवारबाजी करत होते. आज त्यांची अवस्था काय?

अर्थात यशासारखे दुसरे काही नसते. कमी झालेल्या संख्याबळाचा सेनेने फायदा उचलण्याआधीच फडणवीसांनी दिवाळी संपताच स्वत:ची पक्षनेतेपदी निवड करवून घेऊन पक्षांतर्गत महत्त्वाकांक्षांना वेसण तर घातलीच. पण सेनेलाही ‘गुपचूप या मागून’ असाच इशारा केला. गंमत म्हणजे फडणवीस नेतेपदी निवडून येत असताना संजय राऊत डरकाळ्या फोडत होते, सपासप वार करत होते. पण सूर्य अस्तास जाताच रातआंधळेपण यावे तसा हा सेनेचा वाघ नखे टाकून थेट सामोपचारावर आला. कसलाही आग्रह धरणार नाही म्हणायला लागला. त्यात भाजपने शेपटीवर ठेवलेल्या पायावरचा जोर वाढवत सांगून टाकले की, मुख्यमंत्रीपद, गृहमंत्री व विधानसभा अध्यक्ष यावर चर्चाच नाही होणार, ते आमच्याकडेच राहणार!

थोडक्यात शिवसेनेने पुन्हा एकदा तहात माती खाल्ली! १३ मंत्रिपदे भाजपने भिरकावलीत, त्यावर आता काय सुंदोपसुंदी होते ते लवकरच कळेल. सेनातंर्गत विधानसभा व विधानपरिषद झगडा कुठवर ताणला जातो, हेही पहावे लागेल.

सेना सत्तेच्या सारीपाटात तर हरलीच आहे, पण मागची पाच वर्षे आम्हीच सत्ताधारी नि आम्हीच विरोधी ही जी टिमकी वाजवून घेतली, ती यावेळी त्यांना वाजवता येणार नाही, कारण यावेळी विरोधक १००+ आहेत. युतीच्या घटलेल्या संख्याबळाने त्यांच्यात आता लढण्याची ऊर्जा निर्माण झालीय. विशेषत: राष्ट्रवादी आता आक्रमक राहणार. त्यांच्याकडे २५ नवे चेहरे आहेत आणि राम शिंदे, पंकजा मुंडे, जयदत्त क्षीरसागर, खडसे कन्या यांना घरी बसवल्यामुळे ते ‘किलर’ ठरलेत.

काँग्रेस या यशातून फारसे काही शिकेल असे वाटत नाही. ते दिल्लीकडे नि मतदारसंघाकडे तोंड करून बसणार. चौथी सीट मिळाल्याने ते राजकीय वंचित ठरलेत.

तरीही राष्ट्रवादीला साथ देत, त्यांनी भाजप, मोदी-शहा व फडणवीस यांच्या अहंकारी राजवटीला प्रतिकूलतेतूनही विरोध करत रहायला हवा. जनतेनेचे तसा कौल दिलाय आणि जेव्हा सेनेची वाघनखे कोथळा काढायची भाषा करत मिठी मारल्यावर गुदगुल्याच करते, तेव्हा तर ही गरज अधिक भासणार!

...............................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......