‘गांधी’ : गांधीजींवरचा सर्वश्रेष्ठ आणि जगात सर्वांत जास्त बघितला गेलेला एक चित्रपट
सदर - गांधी @ १५०
संदीप गिऱ्हे
  • ‘गांधी’ या रिचर्ड अॅटनबरो यांच्या चित्रपटाचे पोस्टर
  • Wed , 02 October 2019
  • सदर गांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma Gandhi

आज महात्मा गांधी यांची १५०वी जयंती. त्यानिमित्तान ‘अक्षरनामा’वर प्रकाशित होत असलेल्या विशेषांकातील हा एक लेख.

............................................................................................................................................

गांधींसारखा एक हाडामासाचा चालताबोलता माणूस या पृथ्वीवर होऊन गेला यावर येणाऱ्या पिढ्यांना विश्वास ठेवणे अवघड जाईल किंवा यावर येणाऱ्या पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत, अशा आशयाचे अल्बर्ट आईनस्टाईन यांचे गांधीजींबद्दलचे एक विधान प्रसिद्ध आहे. आपण सर्वांना सर्वसाधारणपणे हे विधान वाचून वा ऐकून माहीत असते. परंतु, अल्बर्ट आईनस्टाईनसारख्या व्यक्तीला असे का म्हणावेसे वाटले असेल याचा विचार आपण करत नाही. दुसऱ्या बाजूने गांधी हे अनुल्लेखाने मारता येईल असेही व्यक्तिमत्त्व नाही. विशेष म्हणजे गांधीजींबद्दल एकच एक असा मतप्रवाह किंवा विचारप्रवाह आज या देशात अस्तित्वात नाही. अनेक मतमतांतरांमधून आणि विचारांमधून गांधी आपल्या समोर येत असतात. यात प्रामुख्याने साहित्यिक आणि लिखित माध्यमाचा वाटा खूप मोठा आहे. चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी मालिका असा इतर माध्यमाचा वाटा फार कमी आहे. तर यातील चित्रपट माध्यमाबद्दल आपण आढावा घेऊ.

मोहनदास करमचंद गांधी ऊर्फ बापू ऊर्फ राष्ट्रपिता महात्मा गांधी हे सर्वार्थाने एक ‘लार्जर दॅन लाइफ’ व्यक्तिमत्त्व. तरीही आजपर्यंत जेमतेम दहा चित्रपट गांधीजींच्या जीवनकार्यांवर तयार केले गेले आहेत. त्यातही पहिले दोन मुख्य चित्रपट ब्रिटिश दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी तयार केले आहेत. या सर्व चित्रपट निर्मितीचा काळ आहे १९६३ ते २०११ पर्यंतचा. यातही स्वातंत्र्यानंतरची जवळपास ५० वर्षे एकाही भारतीयाने गांधीजींवर चित्रपट निर्मित किंवा दिग्दर्शित करण्याचा प्रयत्न केला नाही. गांधीजींच्या मृत्यूनंतर १६ वर्षांनी ‘नाईन अवर्स टू रामा’ हा १९६३ मध्ये मार्क रॉबसन यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट होता. त्यानंतर पुढे १९ वर्षांनी रिचर्ड अ‍ॅटनबरो यांचा ‘गांधी’ हा निर्मिती आणि दिग्दर्शन केलेला दुसरा चित्रपट प्रदर्शित झाला, जो खऱ्या अर्थाने गांधीजींवरचा सर्वश्रेष्ठ चित्रपट मानला जातो.

१९६२मध्ये एका सामाजिक उपक्रमात लंडनमधील भारतीय नागरी सेवेचे अधिकारी मोतीलाल कोठारी यांची रिचर्ड अ‍ॅटनबरो यांच्याशी भेट झाली. मोतीलाल यांनी अ‍ॅटनबरो यांच्याकडे गांधीजींवर चित्रपट बनवण्याचा आग्रह धरला. अ‍ॅटनबरो यांनी गांधीजींबद्दल अगदी जुजबी, शाळेच्या मुलाएवढी माहिती आहे असे म्हणून टाळले. मोतीलाल यांनी अ‍ॅटनबरो यांना गांधीजींबद्दलची अनेक पुस्तके वाचायला दिली. त्या वाचनाने अॅटनबरो प्रभावित झाले आणि त्यांनी चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. मात्र पुढचे काम एवढे सोपे नव्हते. अ‍ॅटनबरो यांच्या ओळखीतले कुणीही पैसे गुंतवायला तयार नव्हते. सामाजिक उपक्रमांना भरघोस देणगी देऊन देऊन अ‍ॅटनबरो यांचाही खिसा रिकामा झाला होता. मात्र गांधीजींच्या जीवनकार्य आणि विचाराने रिचर्ड एवढे प्रभावित झाले होते की, त्यांना चित्रपटाचा निर्मितीखर्च कमी करण्याची निर्मात्याची अट मान्य नव्हती. त्यांनी हार मानली नाही. प्रयत्न सुरू ठेवले. तब्बल २० वर्षे रिचर्ड हे स्वप्न साकार करण्यासाठी झटत होते.

चित्रपट करण्याचे ठरवल्यानंतर त्यांनी स्वत: गांधीजींबद्दलचे वाचन सुरू केले. डी. जी. तेंडुलकर यांचे ‘महात्मा : मोहनदास करमचंद गांधी यांचे जीवनकार्य’ या पुस्तकाचे आठ भाग वाचून काढले. लुईस फिशर यांचे ‘लाइफ ऑफ महात्मा गांधी’ हे पुस्तक वाचले. याच फिशर यांच्या पुस्तकावर ‘गांधी’ या चित्रपटाची मूळ कथा आधारित आहे. फिशर यांचे पत्रकार म्हणून एक पात्रही चित्रपटात आहे. जे गांधी या व्यक्तिमत्त्वाच्या ‘Sprit’चा अनुभव आपल्याला देतं.

हे काम आपल्या आवाक्याबाहेर जातंय असं लक्षात आल्यावर अ‍ॅटनबरो यांनी तीन पटकथा लेखक चित्रपटाची कथा लिहिण्यासाठी नेमले. यासाठी ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हा महाकाय चित्रपट लिहिणाऱ्या पटकथालेखकाची निवड केली. १९६४मधील पहिला ड्राफ्ट वाचल्यानंतर पंडित नेहरूंनी स्वतः खूप मोठ्या प्रमाणावर अ‍ॅटनबरो यांना मदत करण्याची व्यवस्था केली. पुढे अनेक ड्राफ्ट होत राहिले. इंदिरा गांधींनी आपल्या वडिलांचे स्वप्न म्हणून चित्रपटाचे भारतात चित्रीकरण करण्यासाठी पूर्ण मदत केली. आर्थिक बाजू अजूनही भक्कम नव्हती. गोल्डक्रेस्ट फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी काही आर्थिक पाठबळ दिले. अ‍ॅटनबरो यांच्या मागणीनुसार भारतात प्रत्यक्ष स्थळांवर शुटिंग करण्याची परवानगी दिली. भारतात इंदिरा गांधींनी सर्व शक्ती पणाला लावली. २२ मिलियन डॉलर चित्रपटाचे पूर्ण बजेट होते, त्यातील ६.५ मिलियन डॉलर इंदिराजींनी एनएफडीसीमधून मिळून दिले. महात्मा गांधीजींच्या अंत्ययात्रेच्या सीनच्या शूटिंगसाठी चार लाख लोकांची एक्स्ट्रा कलाकारांची फौज इंदिराजींनी जमा करून दिली. त्या वेळेतील संसदेच्या अधिवेशनात या खर्चाबद्दल आणि मदतीबद्दल खूप वादळी चर्चा होत होती. परंतु  इंदिराजींनी विरोधांकडे दुर्लक्ष करून मदत केली.

पुढे चित्रपट पूर्ण झाला. पाच खंडांतील वेगवेगळ्या देशांतील अभिनेते. वेगवेगळ्या देशांतील शूटिंग आणि आर्थिक पाठबळ. ७० एमएमची निर्मिती. सहा साऊंड ट्रॅक. खूप मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष स्थळांवर केलेले चित्रीकरण. निर्विवादपणे ‘गांधी’ चित्रपट म्हणून एक अजस्त्र कलानिर्मिती होती. हे एक महाकाव्याचं चित्रण होतं.

या चित्रपटाला प्रतिसादही तेवढ्याच प्रमाणावर मिळाला. अकरा ऑस्कर पुरस्कारासाठी या चित्रपटाचे नामनिर्देशन झाले. त्यापैकी आठ ऑस्कर पुरस्कार या चित्रपटाने मिळवले. इतर लहान-मोठ्या पुरस्कारांची तर गणतीच नाही. संपूर्ण जगभरात या चित्रपटाने १०० मिलियन डॉलरपेक्षा जास्त व्यवसाय केला. डीव्हीडी आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर अजूनही हा चित्रपट व्यवसाय करतोच आहे. नि:शंकपणे हा जगात सर्वांत जास्त बघितलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. दिल्लीला मोठ्या थाटामाटात चित्रपटाचा पहिला शो दाखवला गेला. चित्रपटाची तीन तास अकरा मिनिटांची लांबी लक्षात घेता आंतरराष्ट्रीय स्तरावर हा चित्रपट एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाहिला गेला, हे गांधी या नावाभोवतीच्या वलयामुळेच झाले.

गांधीजी हे व्यक्तिमत्त्व जिवंत करणारा अनुभव दिला, तो गांधींची भूमिका साकारणारे अभिनेते बेन किंग्जले यांनी. त्यांच्याशिवाय या चित्रपटाची कल्पनाही करता येणार नाही. बेन हे गांधीजींची भूमिका करण्यासाठीच जन्माला आले असंही त्यांच्याबद्दल नंतर बोललं गेलं. यातील अतिशयोक्ती सोडली तर चित्रपट पाहिल्यावर हे नक्कीच पटतं. बेन गांधीजींच्या रूपात आपल्या स्मरणात कायम राहतात.

‘गांधी’ हा एक आगळावेगळा दृश्यानुभव आहे. अ‍ॅटनबरो यांनी दिग्दर्शन करताना जे कौशल्य वापरले ते वादातीत आहे. कथानक मांडण्याची शांत संयमी लय, गांधीजींची व्यक्ती आणि विचार चित्रित करताना केलेला फ्रेम्सचा वापर. महत्त्वाच्या ठिकाणी केलेला वाईड शॉटचा उपयोग. तीन तासांच्या कथानकाची गती टिकवण्यासाठी कॅमेरा अँगल आणि मोमेंट्सचा केलेला वापर. कथानक उलगडत जाण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे घटनाक्रम.

हे सर्व अ‍ॅटनबरो यांची २० वर्षांची मेहनत आणि हा चित्रपट पूर्ण करण्याचा ध्यास याचा परिणाम आहे. अ‍ॅटनबरो यांनी गांधी चित्रित करण्याआधी व्यक्ती म्हणून  समजून घेतले. चित्रपटामध्येही त्यांनी गांधी व्यक्ती म्हणून सहज सादर केले. गांधींच्या ‘लार्जर दॅन लाइफ’ व्यक्तिमत्त्व सादर करण्याचा मोह त्यांनी टाळला. गांधीचा प्रभाव आणि करिश्मा सांगण्याऐवजी त्यांनी गांधींजींच्या लहान लहान कृती दाखवून त्याचा सहज परिणाम साधण्यावर भर दिला. ‘गांधी’ हे रसायन तयार होण्याचा संपूर्ण प्रवास त्यांनी रेखाटला. त्याची सुरुवात त्यांनी आफ्रिकेतून केली. गांधी तयार होण्याची पहिली ठिणगी इथेच पडली होती. सुटाबुटातले गांधी इथपासून हा प्रवास सुरू होतो. तेथील लढा सुरू करून गांधी भारतात येतात. येथील रस्त्यावरच्या भारतीयांची अवस्था पाहून अस्वस्थ होतात. त्यांचे राजकीय गुरू गोपाळ कृष्ण गोखल्यांनी देशभर फिरण्याचा दिलेला सल्ला अमलात आणतात. हा भारतभर फिरण्याचा प्रवास चित्रपटात फार सूक्ष्मपणे मांडला आहे.

हाच गांधींजीच्या वैचारिक जडणघडणीचा पाया आहे असे अ‍ॅटनबरो दाखवतात. या प्रवासातून परत आल्यावर पहिल्यांदा गांधींना एका राजकीय सभेत भाषण करण्याची संधी मिळते हा प्रसंग चित्रपटात विस्तृतपणे दाखवलेला आहे. गांधींना भाषण सुरू करण्याची विनंती केली जाते. गांधीला ओळखत नसलेले आणि आधीच्या कंटाळवाण्या भाषणांनी लोक जागेवरून उठून जाऊ लागतात. गांधी मात्र आपले विचार ठामपणे मांडायला सुरूवात करतात. उठून जाणाऱ्या लोकांना लक्षात येतं की, हा माणूस काही वेगळं बोलतोय. हा आपल्याबद्दलच बोलतोय. लोक पुन्हा येऊन बसतात. कान देऊन ऐकतात. त्या सामान्य माणसांची एका क्षणात गांधींशी नाळ जोडली गेली, ती कायमचीच.

पण हे सहज घडलं नाही. ते घडण्याची प्रक्रिया अ‍ॅटनबरो उलगडून दाखवतात. अशा एकेक प्रसंगातून अ‍ॅटनबरोंनी गांधींचे नेतृत्व कसे घडत गेले आणि त्यांना जनतेचा पाठिंबा कसा मिळत गेला हे क्रमाने दाखवत गेले आहेत. या सोबतच अध्येमध्ये गांधी व्यक्ती म्हणून किंवा त्यांचे माणूसपण दाखवणारे प्रसंग चित्रित केलेले आहेत. अशा काही प्रसंगांमध्ये गांधीजी स्वत:बद्दल बोलत आहेत. हे प्रसंग लुई फिशर यांच्या पुस्तकातून घेतलेले आहेत. ते तसेच चित्रपटात चित्रित केलेले आहेत. गांधी आणि अमेरिकन पत्रकार यांच्या भेटीचे हे प्रसंग.

अशाच एका प्रसंगात गांधीजी या पत्रकारासोबत संध्याकाळी पोरबंदरच्या समुद्रकिनाऱ्यावर बसून आपल्या लहानपणाबद्दल बोलत आहेत. गांधीजी सांगतात की, त्यांची हिंदू म्हणून वाढ झाली असली तरी त्यांच्या गावातील मंदिरातील पुजारी कुराणही वाचून दाखवत होते याचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला. याच संदर्भाने एके ठिकाणी लोकांना सांगतात, ‘मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे, ख्रिश्चन आणि ज्यूही आहे, मी तुम्ही सर्वच आहे.’

याच संदर्भाने फाळणीच्या वेळेला गांधी जिनांना म्हणतात, हिंदू आणि मुस्लीम हे या देशाचे डावा आणि उजवा डोळा आहेत, कुणी गुलाम नाही, कुणी मालक नाही. त्यावर जिना उत्तर देतात की, हे जग म्हणजे महात्मा गांधी नाही, मी सर्वसामान्य माणसांबद्दल बोलतोय. हा गांधी आणि इतर नेत्यांमधील विचारांचा फरकही तुलनात्मक पद्धतीने समोर येतो.

आंदोलनाच्या काळातील एका टप्प्यावर जीनांच्याच घरी सुरू असलेल्या देशातील सर्व महत्त्वाच्या नेत्यांमधील बैठकीत गांधी आपल्या देशात कोणीही मोठा किंवा लहान नाही सर्व समान आहेत व त्याबद्दल ते आठाही भूमिका मांडतात. आपल्या कृतीतून पटवून देण्यासाठी ते बैठकीकडे चहाचे कप घेऊन उभ्या असणाऱ्या जिनांच्या घरातील नोकराला अडवतात, त्याच्या हातातील कप घेतात व सर्वांना स्वत: चहा वाटतात. असे गांधींच्या मोठेपणातले सहज पदर आणि विचारातला प्रामाणिकपणा अनेक प्रसंगात चित्रित केलेला आहे. सोबतच व्यक्ती म्हणूनही काही प्रसंग चित्रित केलेले आहेत. जसे की कस्तुरबा स्वतः स्वच्छतागृहाची साफसफाई करण्यास नकार देतात, तेव्हा गांधीजी त्यांच्यावर रागावतात आणि हे काम त्यांना करावेच लागेल हे ठामपणे सांगतात. म्हणजे गांधींना रागही येतो इथपर्यंतच हा प्रसंग मर्यादित नाही. गांधी व्यक्ती, विचार आणि काळ या संदर्भाने हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

गांधी चित्रपट १९८२मध्ये प्रदर्शित झाला. तोपर्यंत वेगवेगळ्या प्रोपगंडामधून वेगवेगळे गांधी जनमानसाच्या मानगुटीवर बसलेले होते. टकल्या गांधी, देशाची फाळणी करणारा गांधी, भगतसिंगांना मदत न करणारा गांधी, ५५ कोटींचे दान देणारा गांधी असे कितीतरी गांधीजी समाजजीवनात होते. स्वातंत्र्यानंतरच्या या पिढीला अ‍ॅटनबरो यांनी हे खरे वास्तववादी गांधी दाखवले. ते लोकांना भावले आणि या चित्रपटाला जगात सर्वत्र भरभरून प्रतिसाद मिळाला.

मी जेव्हा हा चित्रपट पहिल्यांदा पाहिला, तेव्हा त्याच्या अवाढव्य रूपाने भारावून गेलो होतो. हळूहळू तो प्रभाव थोडा कमी झाला. मात्र चित्रपट पाहून पहिल्या वेळेस पडलेला प्रश्न अजून गंभीर झाला. २० वर्षे गांधी चितारण्याचा ध्यास केलेल्या माणसाला गांधींची चित्रकथा सांगण्याची सुरुवात आणि शेवट गांधींना गोळी घालून मारणाऱ्या माणसापासून का करावीशी वाटली असेल? ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’बद्दल मी एकूण होतो मात्र कधी पाहण्या -  वाचण्याचा संबंध आला नाही. गांधी चित्रपट पाहिल्यानंतर तशी इच्छा आणि गरजही राहिली नाही. त्या गोळीने गांधी शरीराने मेले, ते अ‍ॅटनबरो आणि बेन यांनी माझ्यासाठी शरीराने आणि सोबत विचाराने पुन्हा जिवंत केले. मात्र आज माझा वर्तमान पुन्हा गांधी संदर्भ घेऊन उभा आहे. भारतीय स्वातंत्रलढ्याचे भाग म्हणून जनमानसातील गांधींची प्रतिमा पुसून टाकण्यासाठी आजच्या काळात खूप जोरकस राजकीय प्रोपगंडा राबवला जात आहे. गांधी म्हणजे फक्त स्वच्छतेचे पुजारी एवढीच फक्त प्रतिमा निर्मिती केली जातेय. ७० वर्षापूर्वी जे शरीर गोळीने मारले त्याचे विचार आता १५०व्या जयंती पर्वावर झाडूने साफ करण्याची स्वच्छता मोहीम देशभर राबवली जात आहे.

दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्यलढ्यातील इतर काही निष्प्रभ व्यक्तिमत्त्वांना स्वातंत्रयोद्धे व स्वातंत्र्यवीर म्हणून समोर आणले जात आहे. गांधींच्या आश्रमात जाऊन सूत कातून त्याच सुताने गांधी विचारांचा गळा घोटला जातोय. एका शाळकरी मुलीला गांधींच्या चष्म्याचे बोधचिन्ह सुचते आणि ते तीन रंग मिसळून या स्वच्छता मोहिमेचे बोधचिन्ह बनवते, हा वाटायला सहज सोपा भाग. पण अगदी सामान्य माणसालाही काही वावगं वाटणार नाही आणि सर्व काही सहज सोपे वाटेल असे असणे हेच प्रोपगंडाचे पहिले उद्दिष्ट असते. या प्रोपोगंडाचे परिणाम लगेच दिसणार नाहीत कदाचित पण ते दूरगामी असतील. यातील गांभीर्य आज लक्षात येत नसेलही. पण लक्षात येईल तेव्हा वेळ गेलेली असेल.

आज माझा मुलगा अडीच वर्षांचा आहे. त्याला मी अजून २० वर्षांनी त्याच्या जाणत्या वयात विचारेल की, गांधीजी कोण होते? तर माझ्या मुलाला गांधीजी कसे माहिती असतील हाच मोठा प्रश्न आहे. त्याला दाखवायला माझ्याकडे अ‍ॅटनबरोचे ‘गांधी’ आहेत एवढाच काय तो दिलासा!

‘वाङ्मय वृत्त’च्या सप्टेंबर २०१९च्या अंकातून साभार

............................................................................................................................................................

रामचंद्र गुहा यांच्या 'गांधी : भारतात येण्यापूर्वी' या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/5018/Gandhi-Before-India

............................................................................................................................................................

लुई फिशर यांच्या ‘महात्मा गांधी : जीवन आणि कार्यकाळ’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5073/Mahatma-Gandhi

.............................................................................................................................................

गांधींविषयीच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_list

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......