आईनस्टाईनच्या मेंदूत असं होतं तरी काय?
ग्रंथनामा - झलक
चैताली भोगले
  • ‘अल्बर्ट आईनस्टाईन : काळाचं रहस्य भेदणारा कालातीत प्रतिभावंत’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 23 August 2019
  • ग्रंथनामा Granthnama झलक अल्बर्ट आईनस्टाईन Albert Einstein चैताली भोगले Chaitali Bhogle

मुक्त पत्रकार चैताली भोगले यांनी ‘अल्बर्ट आईनस्टाईन : काळाचं रहस्य भेदणारा कालातीत प्रतिभावंत’ हे कुमारांसाठी लिहिलेलं चरित्र नुकतंच डायमंड पब्लिकेशन्सनं प्रकाशित केलं आहे. या चरित्रातील हे शेवटचं प्रकरण...

.............................................................................................................................................

११२, मर्सर स्ट्रीटपासून प्रिन्स्टन अ‍ॅकॅडीपर्यंतची आपली रोजची वाट आईनस्टाईन अजूनही नेमानं चालत होता. खरंतर १९४५ सालीच त्यानं अ‍ॅकॅडीमधून निवृत्ती घेतली होती; पण विज्ञानाच्या जगातलं त्याचं अढळपद अजूनही कायम होतं. त्यानं लावलेले अनेक शोध आता विज्ञानाच्या जगातले मूलभूत नियम होऊन गेले होते; अगदी न्यूटनच्या नियमांसारखेच. त्या शोधांनी कित्येक नव्या शोधांचा, तंत्रज्ञानांचा पाया तयार केला होता. आता मात्र तो या नव्या शोधांच्या जगापासून फार दूर गेला होता. तरीही अजूनही रोज ठरलेल्या वेळी तो अ‍ॅकॅडीचं ग्रंथालय गाठायचा आणि आपल्या राहून गेलेल्या संशोधनाची जुळवाजुळव करण्यात गढून जायचा. घरी परतताना कधीमधी कुणी होतकरू विद्यार्थी त्याची सोबत करायचा; तर कधी तो एकटाच रमतगमत घरी पोहोचायचा. घरी हेलन ड्यूकास आणि मार्गो यांच्याबरोबर गप्पागोष्टी करण्यात त्याचा वेळ छान जायचा. त्याची लाडकी बहीण मायासुद्धा युद्धानं पोळलेल्या इटलीमधून निघून त्याच्या घरी राहायला आली होती. मनातलं सारं काही निर्धास्तपणे सांगावं अशी एक जिवलग व्यक्ती मायाच्या रूपानं त्याच्या सोबतीला आली होती हे छान झालं होतं. शिवाय चिको आणि टायगर नावाची कुत्र्या-मांजराची दुक्कलसुद्धा त्याच्या आवतीभोवती सतत वावरत असायची.

घरापासून अ‍ॅकॅडीपर्यंतची ती वाट चालताना अलीकडे त्याचे खांदे मात्र नेहमीपेक्षा अधिक झुकलेले दिसायला लागले होते. खरंच किती मोठा प्रवास केला होता त्यानं. दोन महायुद्धं, नाझींची अमानुष राजवट, अमेरिकी अणुबॉम्बनं केलेला विध्वंस, सगळं काही त्यानं फार जवळून पाहिलं होतं. त्याचं स्वतःचं आयुष्यसुद्धा अनेक संघर्षांनी भरलेलं होतं. त्याच्या या वाटचालीत त्याच्या सोबत असलेली मिलेव्हा, बेस्सो, ग्रॉसमन, सोलोव्हिन, एल्सा अशी सगळीच जिवाभावाची मित्रमंडळी एक एक करून दूर निघून गेली होती. झ्युरिकच्या स्वच्छ अवकाशात भविष्याची स्वप्नं बघताना अनुभवलेलं स्वातंत्र्य, बर्नच्या पेटंट ऑफिसमध्ये उलगडलेली विेशाची रहस्यं, प्राग बर्लिनमध्ये संशोधनाच्या कार्यात अखंड बुडून जाताना अनुभवलेली अपार शांतता हे सगळं खूप खूप मागे राहून गेलं होतं. सत्तेसाठी आपापसांत झगडणाऱ्या माणसांनी जगाचं किती मोठं नुकसान करून ठेवलं होतं. त्यात ती शांतता कायमची भंग होऊन गेली होती.

‘नाझींच्या हाती अणुबॉम्ब सापडेल,’ या भीतीनं अमेरिकेनं घाईघाईनं अणुबॉम्ब तयार केला होता; पण प्रत्यक्षात ही भीती निराधार असल्याचंच नंतर सिद्ध झालं होतं. जर्मनीतल्या शास्त्रज्ञांना या बाबतीत फारशी मजल गाठताच आली नव्हती. अमेरिकेनं मात्र त्याच शोधाचा वापर करून अमानुषपणे निरपराध माणसांचा बळी घेतला होता आणि आता जगभरात अण्वस्त्रं तयार करण्याची स्पर्धा सुरू झाली होती. त्याला वाटणारी भीती खरी ठरली होती. हिरोशिमा नागासाकीवरच्या हल्ल्यानंतर सगळेच शास्त्रज्ञ अणुबॉम्बचा वापर करण्याच्या विरोधात उघडपणे बोलायला लागले. ‘आणखी युद्धं होऊ नयेत यासाठी आता सगळ्यांनीच मिळून प्रयत्न करायला हवेत. युद्धाची शक्यता नष्ट करण्यासाठी सर्व देशांचं मिळून एक सरकार व्हायला हवं,’ या आपल्या जुन्याच विचारांशी आईनस्टाईनसुद्धा पुन्हा एकदा येऊन ठेपला. आपल्या बोलण्यातून, भाषणांधून तो सतत या गोष्टीची मागणी करत होता. ‘वाहत्या नदीला बांध घालण्यासाठी धरण बांधावं लागतं; तसंच अण्वस्त्रांच्या निर्मितीचा हा प्रवाह रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनेच्या ठोस कायद्यांचा बांध हवा,’ असं तो सांगत होता. अमेरिकेनं हायड्रोजन बॉम्ब तयार करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं कळताच या गोष्टीला विरोध करण्यासाठी त्यानं ओपनहायमरच्या साथीनं एक शांतता समितीही स्थापन केली. सगळीकडेच हिंसेची नवीनवी रूपं त्याला दिसत होती. एके काळी अमेरिका ही त्याला स्वातंत्र्याची भूमी वाटली होती; पण तिथेसुद्धा कृष्णवर्णीयांवर अजूनही खूप अन्याय सुरू होते.

त्याच्या ज्यू बांधवांसाठी १९४८ साली पॅलेस्टाइनच्या भूीवर ‘इस्त्राइल’ नावाचा नवा देश उभा राहिला खरा; पण तिथेही स्थानिक अरब आणि ज्यू यांच्यात सीमारेषेवरून लगेचच लढाया सुरू झाल्या. आईनस्टाईननं पाहिलेलं ज्यूंसाठीच्या हक्काच्या भूमीचं स्वप्नं असं लढायांनी बरबटलेलं नक्कीच नव्हतं. ‘बलाढ्य सेना तयार करणं, सीमेसाठी लढाया करणं, आपली सत्ता बळकट करत राहणं या गोष्टी ज्यू धर्माच्या मूळ शिकवणीमध्ये बसत नाहीत,’ असं त्याला वाटायचं; पण ज्यूंचा नवा देश त्याच मार्गानं जात असल्याचं त्याला दिसत होतं. जेरुसले मधल्या विद्यापीठाच्या उभारणीचा निधी जमवायला आईनस्टाईनला अमेरिकेच्या पहिल्याच दौऱ्यावर घेऊन जाणारे शाये वाइझमन इस्त्राइलचे पहिले पंतप्रधान होते. १९५० साली वाइझमन यांचा मृत्यू झाला. त्या वेळी इस्त्राइलचे तेव्हाचे पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन यांनी हे अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती आईनस्टाईनला केली होती; पण ‘आपला पिंड राजकारणाचा नाही’ असं सांगत आईनस्टाईननं या विनंतीला नम्र नकार दिला होता. आईनस्टाईननं हा प्रस्ताव स्वीकारला असता; तर मात्र विज्ञानाच्या क्षेत्रातली एक व्यक्ती एखाद्या देशाचा अध्यक्ष होण्याची ती पहिलीच घटना ठरली असती!

हिंसा, असमानता, अन्याय, युद्धखोरी अशा सगळ्याच प्रश्‍नांबद्दल आईनस्टाईन अखेरपर्यंत आपलं म्हणणं मांडत राहिला. त्यानं आपल्या मनामध्ये जपलेलं, अखंड कुतूहलानं भारलेलं जग मात्र या सगळ्या गदारोळापासून दूर होतं. या जगामध्ये त्याला निसर्गाच्या अजून नव्यानव्या गुपितांचा शोध घेण्यात रमून जाता येत होतं, व्हायोलिनच्या सुरांध्ये हरवून जाता येत होतं, खुसखुशीत विनोदांवर दिलखुलास हसता येत होतं, आपली नाव घेऊन नदीच्या प्रवाहाबरोबर शांत विहरता येत होतं, मुलांत मूल होऊन त्यांच्याशी गप्पा मारता येत होत्या. आपल्या आयुष्याची अखेरची काही वर्षं आईनस्टाईननं त्याच्या या अत्यंत आवडत्या गोष्टी करण्यामध्येच घालवली.

१९५५ सालच्या सुरुवातीला आईनस्टाईनची तब्येत ढासळायला लागली. त्याच्या पोटाचं दुखणं पुन्हा बळावायला लागलं; पण शस्त्रक्रिया करून घ्यायला त्यानं ठाम नकार दिला. कृत्रिम उपायांनी आयुष्य लांबवणं त्याला नामंजूर होतं. तब्येत खूपच खालावली; तेव्हा त्याला प्रिन्स्टनच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथेच १८ एप्रिलच्या पहाटे अल्बर्ट आईनस्टाईननं या जगाचा निरोप घेतला. त्याच्या देहावर अंत्यसंस्कार होण्यापूर्वी हॉस्पिटलमधल्या पॅथॉलॉजिस्टनं आईनस्टाईनचा मेंदू चक्क काढून घेतला. आईनस्टाईनच्या असामान्य प्रतिभेचं नेमकं कारण म्हणे त्याला शोधून काढायचं होतं. किती वेडगळ कल्पना होती ही! ‘आपल्यामध्ये असामान्य असं काही नाही; आपल्या मनात फक्त खूप कुतूहल आहे,’ असं आईनस्टाईननं स्वतःच तर सांगून ठेवलं होतं; पण तरीही अल्बर्ट आईनस्टाईन म्हणजे जगासाठी कायम एक कोडंच होऊन राहिला.

खरोखरच कोण होता अल्बर्ट आईनस्टाईन? आपल्या अफाट कल्पनेच्या बळावर सृष्टीची रहस्यं शोधणारा वैज्ञानिक? अवकाश आणि काळ यांची चादर विणणारा कलाकार? ‘युद्ध नको’ म्हणून हिरिरीनं प्रयत्न करणारा शांततावादी? की नाझींना अणुबॉम्ब सापडण्याच्या भीतीनं हतबल झालेला ज्येष्ठ शास्त्रज्ञ? ‘टाइम’ साप्ताहिकानं तर ‘अवघ्या विसाव्या शतकावर प्रभाव टाकणारा माणूस’ म्हणून आईनस्टाईनचा गौरव केला; पण खरं सांगायचं तर ‘निसर्गाच्या भव्य आणि अद्भुत पसाऱ्याकडे आश्चर्यानं पाहणारं लहान मूल’ हीच आपली ओळख त्याला सर्वाधिक प्रिय असावी.

अगदी लहान असताना मोझार्टच्या सुरांध्ये, युक्लिडच्या भूमितीमध्ये, फिजिक्सच्या अदृश्य नियमांमध्ये त्याला विश्वाच्या एकतानतेचं दर्शन घडलं होतं. ‘निसर्गातल्या भव्यतेध्ये दडलेल्या आणि त्याच्या सूक्ष्माहूनही सूक्ष्म व्यवहारांध्ये दडलेल्या दिव्यत्वाचा अनुभव घेणं हीच सर्वांत सुंदर गोष्ट आहे,’ असं त्याचं म्हणणं होतं. याच अद्भुत गोष्टींचा शोध घेण्यासाठी त्यानं आपलं संपूर्ण आयुष्य खर्च केलं. अवघं विश्व एका गणिती सूत्रात बांधण्याची आस त्यानं अखेरपर्यंत मनात सतत जपली. त्यानं पाहिलेलं हे ‘भव्यदिव्य स्वप्न’ आणि ‘अपार कुतूहलानं भारलेलं मन’ हाच त्यानं आपल्यासाठी मागे ठेवलेला सर्वांत मोठा वारसा आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5074/Albert-Einstein

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......