अनंत भालेराव यांच्यामुळे मराठवाड्याचे सांस्कृतिक जीवन समृद्ध झाले!
ग्रंथनामा - आगामी
नरेन्द्र चपळगावकर
  • ‘अनंत भालेराव : काळ आणि कर्तृत्व’ या चरित्राचे मुखपृष्ठ
  • Mon , 12 August 2019
  • ग्रंथनामा Granthnama आगामी अनंत भालेराव Anant Bhalerao मराठवाडा Marathwada नरेन्द्र चपळगावकर Narendra Chapalgaonkar

झुंजार स्वातंत्र्यसेनानी, स्वातंत्र्योत्तर काळातील ध्येयवादी संपादक अनंतराव भालेराव यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत माजी न्यायमूर्ती नरेन्द्र चपळगावकर यांनी लिहिलेल्या ‘अनंत भालेराव : काळ आणि कर्तृत्व’ या चरित्राचे प्रकाशन उद्या, मंगळवार, १३ ऑगस्ट २०१९ रोजी औरंगाबाद येथे होत आहे. अभंग प्रकाशन, नांदेड यांनी प्रकाशित केलेल्या या चरित्राला चपळगावकर यांनी लिहिलेल्या दीर्घ प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

‘मराठवाडा’ वृत्तपत्र व त्याचे संपादक अनंत भालेराव यांचे मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासात एक महत्त्वाचे स्थान आहे. या वृत्तपत्राचे नाव व त्याला प्रारंभ काळात अस्तित्वासाठी द्यावा लागलेला झगडा याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्याबरोबर ज्या काळात हे वृत्तपत्र जन्माला आले, त्या काळात चालू असलेला भारताचा स्वातंत्र्यसंग्राम आणि त्यातून निर्माण झालेली मूल्ये यांचाही संदर्भ हे वृत्तपत्र आणि त्याचे दीर्घकाळ संपादक असलेले अनंत भालेराव यांना समजून घेण्यासाठी आवश्यक आहे. 

ब्रिटिश सरकारने वृत्तपत्रांवर अधूनमधून निर्बंध घातले असले व राजद्रोहासारख्या गुन्ह्याचा आरोप करून काही संपादकांना तुरुंगात पाठवले असले, तरी ब्रिटिश मुलखात वृत्तपत्रांना संपूर्ण व सर्वकाळ बंदी नव्हती. निजामाच्या हैदराबाद संस्थानात धार्मिक स्वातंत्र्य तर नव्हतेच; परंतु मूलभूत नागरी स्वातंत्र्यसुद्धा अस्तित्वात नव्हते. संस्थानात वृत्तपत्रे काढण्यास, मुद्रणालये काढण्यास, सभा घेण्यास आणि मिरवणुका काढण्यास सरसकट बंदी होती. या सर्व गोष्टींसाठी सरकारी परवानगी आवश्यक असे व ती मिळणे जवळजवळ अशक्य असे.

अशा काळात वृत्तपत्रे चालवणे हे एक दिव्य असे. तुलनेने दीर्घकाळ चाललेले एकच मराठी साप्ताहिक निजामी राज्यात टिकले ते म्हणजे ‘निजाम विजय’. राज्यकर्त्यांच्या दृष्टीने अगदीच निरुपद्रवी असलेल्या बातम्या व इतर मजकूर छापत या वृत्तपत्राने दिवस काढले. १९३६-३७च्या सुमाराला प्रांतिक स्वायतत्तेचा फायदा ब्रिटिशशासित प्रांतांना काही दिवस मिळाला, तेव्हा हैदराबाद संस्थानातल्या जनतेला आपल्यालासुद्धा जबाबदार राज्यपद्धतीचा लाभ मिळावा, असे वाटू लागणे स्वाभाविक होते. परंतु लोकशाही म्हणजे बहुसंख्याकांचे राज्य येईल व आपण आजवर केवळ मुस्लिमांना प्राधान्य देणारी हुकूमशाही राजवट टिकवून ठेवली, ती संपुष्टात येईल हे सत्य निजामाला माहीत होते. वृत्तपत्र हे लोकजागृतीचे प्रभावी साधन लोकभाषेत शक्यतो प्रसिद्ध होऊ द्यायचे नाही, हे त्याचे धोरण कायम होते. अशा स्थितीत आनंद कृष्ण वाघमार्‍यांनी पुण्यात ‘मराठवाडा’ साप्ताहिकाचा प्रारंभ केला व अनेक अडचणी सोसून ते काही दिवस प्रसिद्ध केले. स्वातंत्र्यानंतर ते मुंबईत काही दिवस प्रसिद्ध झाले व नंतर त्याचा संसार अगोदर हैदराबादेत आणि नंतर औरंगाबादेत सुरू झाला. 

एखादा राजकीय पक्ष पक्षाच्या विचारांच्या प्रसारार्थ नियतकालिक काढतो, तेव्हा त्यात काम करण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनाच सांगितले जाते. ‘मराठवाडा’ वृत्तपत्र आनंद कृष्ण वाघमार्‍यांनी प्रारंभ केले असले व तांत्रिकदृष्ट्या तेच त्याचे एकटे मालक असले तरी हे वृत्तपत्र स्वातंत्र्यचळवळ चालवणार्‍या कार्यकर्त्यांचे आहे, हीच भावना त्यांच्या मनात होती. म्हणूनच संस्थापक - संपादक वाघमार्‍यांना लढ्याच्या शेवटच्या पर्वात मुंबईत स्टेट काँग्रेसचे कार्यालय सांभाळावे लागले आणि ‘मराठवाडा’ साप्ताहिकाचे संपादनही करावे लागले.

या काळातच अनंत भालेराव स्टेट काँग्रेसच्या मुंबई कार्यालयात वाघमार्‍यांचे सहकारी होते. तेच ‘मराठवाडा’च्या कामातही मदत करू लागले. तेव्हा मुंबईच्या एखाद्या मुद्रणालयात ‘मराठवाडा’ छापून घेतला जात असल्यामुळे फार जास्त कर्मचार्‍यांची आवश्यकता नव्हती. स्वातंत्र्यानंतर जेव्हा स्वतःचे मुद्रणालय सुरू करून त्यात साप्ताहिक छापावयास प्रारंभ झाला, तेव्हा अधिक माणसे लागू लागली. स्वातंत्र्यलढा संपला होता व त्यात जी माणसे सहकारी होती, त्यांच्यामधूनच ‘मराठवाडा’साठी  माणसे निवडण्यात आली. विशिष्ट कामासाठी प्रशिक्षित तर कोणीच नव्हते. ज्याला जे जमू शकेल असे वाटले, त्याला ते काम सांगण्यात आले आणि हळूहळू त्या कामातही माणसे तरबेज झाली. सत्याग्रही कार्यकर्त्यातूनच जुळारी तयार झाले, मुद्रितशोधक तयार झाले. कोणी मशीन चालवू लागले, तर काहींनी वितरणाची जबाबदारी घेतली. चळवळीच्या निमित्ताने दांडगा जनसंपर्क असल्यामुळे बातमीदारी तर फारच सोपी गेली. अशा नवशिक्षितांच्या पण श्रद्धावान सहकार्‍यांच्या नेतृत्वपदी वाघमार्‍यांनी अनंतरावांना बसवले होते. 

स्वातंत्र्यानंतर ‘मराठवाडा’ चालू ठेवावे असे विश्वस्तांना वाटले याची कारणे उघड आहेत. स्वातंत्र्यानंतर झालेले सत्तांतर जर सुरळीत झाले असते व त्यात लढ्यातील प्रमुख नेते सत्तेत आले असते, तर त्यांचा सर्व वेळ नव्या राज्याची घडी मांडण्यातच गेला असता. प्रत्यक्षात असे झाले नाही. जी मंडळी लढ्यात आघाडीवर होती, त्यांना काँग्रेसमध्येच रस उरला नाही. समतेच्या लढ्याचे जागतिक संदर्भ ते शोधत राहिले आणि सत्तेच्या भरल्या ताटाकडे दुर्लक्ष करून त्यांनी नवा मार्ग चोखाळला. देशात कम्युनिस्टांच्या सशस्त्र बंडाळीची भीती केंद्रीय नेतृत्वाला वाटत असताना मराठवाड्यातील लढ्याचे मार्गदर्शक मात्र कम्युनिस्टांच्या बरोबर राहण्याचा आग्रह धरू लागले. याचा बरोबर फायदा लढ्याच्या काळात कुंपणावर बसलेल्या मवाळांनी घेतला आणि सत्तेतली मोक्याची स्थाने काबीज केली. काँग्रेसच्या बाहेर पडून राजकीय आणि आर्थिक परिवर्तनाची चळवळ चालवावी, असा विचार गोविंदभाई श्रॉफ आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केला. चळवळ पुन्हा चालवावयाची असेल तर त्यासाठी वृत्तपत्र लागणारच होते. मात्र त्यातही एक अडचण होती. स्वामी रामांनद तीर्थांसारखे सर्वोच्च नेते अजून काँग्रेसमध्येच होते. त्यामुळे काँग्रेसला सरसकट विरोध करायचा नाही, त्यातल्या  पुरोगामी गटाला पाठिंबा द्यायचा आणि काँग्रेसविरोधात नव्याने संघटित होऊ लागलेल्या मार्क्सवादी, समाजवादी कार्यकर्त्यांची पाठराखण करावयाची अशी तारेवरची कसरत ‘मराठवाडा’ वृत्तपत्राला करावी लागली.

नंतरच्या काळात विरोधी पक्ष हळूहळू क्षीण होत गेले. त्यांच्या पाठिंब्याला व्यावहारिक दृष्टीने मोजमापाने फारसे महत्त्व उरले नाही. काँग्रेसमधला स्वामीजींचा गट हळूहळू  राजकारणाबाहेर गेला आणि ‘मराठवाडा’ला आपला लढा एकाकीपणे चालवावा लागला. स्वातंत्र्यानंतरची पहिली दोन दशके वगळली, तर मराठवाड्याच्या जनतेचे नेतृत्वच मुळी ‘मराठवाडा’ वृत्तपत्र व त्याचे संपादक अनंत भालेराव यांना करावे लागले. आपल्या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी लोक त्यांच्याचकडे येऊ लागले. फक्त जोड होती ती मराठवाड्याच्या विकास प्रश्‍नाबाबत एकांडी शिलेदारी करणार्‍या गोविंदभाई श्रॉफांची. राजकारणात पोकळी राहत नाही. एखादी राजकीय शक्ती अस्तंगत झाली, म्हणजे तिची जागा घेण्यासाठी दुसरी शक्ती आपोआप निर्माण होते. राजकीय पक्ष किंवा गट त्यासाठी उपलब्ध नसले, तर एखाद्या व्यक्तीलाच काळ ती जबाबदारी सोपवतो. गोविंदभाई श्रॉफ आणि अनंत भालेराव हे दोघे दीर्घकाळपर्यंत विरोधी पक्षाचे काम करत राहिले.

आपल्या स्वतःच्या आवडीनिवडीपेक्षा चळवळीची गरज काय आहे, हे पाहून पडेल ते काम करण्याची तयारी ठेवावयाची अशा सर्वोपयोगी कार्यकर्त्याचे जीवन अनंतराव जगले. नियोजित सत्याग्रही आला नाही, म्हणून त्यांनी स्वतःच सत्याग्रह केला. खासगी शाळा हा आंदोलनाचा भाग असल्यामुळे ते शिक्षक झाले. नंतर संघटनेसाठी पूर्णवेळ कार्यकर्ते हवे होते, म्हणून त्यांनी महाराष्ट्र परिषदेचे काम केले. जंगल सत्याग्रहासारख्या मोठ्या सत्याग्रहांचे संघटन केले. भूमिगत राहून लोकसंपर्क ठेवला. सरहद्दीवर प्रतिकार शिबिरे सुरू झाली, तेव्हा प्रसंगविशेषी हातात शस्त्रही घेतले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राजकीय लाभाची अपेक्षा न करता पुन्हा सहसंपादकाच्या भूमिकेत गेले. वाघमार्‍यांनी पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर टाकली, तेव्हा जवळपास आयुष्याच्या शेवटपर्यंत ते संपादकाची भूमिका करत राहिले.

आर्थिक परिस्थिती कधीच फारशी चांगली झाली नाही. ओढगस्तीची जोड आयुष्यभर राहिली, तरीही अशी वेगवेगळी कामे करण्यासाठी त्यांना ऊर्जा त्यांना मिळत होती ती सामान्य जनतेतून. आपल्या आयुष्याची सगळीच कामे अप्रत्यक्षरीत्या लोकांनीच आपल्याला शिकवली आहेत, अशी त्यांची नम्र भावना होती. त्यांची विचारपद्धती, त्यांची भाषा आणि त्यांची वागणूक सगळेच लोकांशी बांधिलकी सांगणारे होते. लोकमान्य टिळक ज्या काळात ‘केसरी’चे संपादक होते, तो काळ आणि या प्रकारच्या लोकांत ते वावरत होते, तो लोकसमूह अनंतरावांचा काळ आणि त्यांच्या भोवतालचा जनसमूह फार भिन्न होता. टिळकांच्या मोठेपणाशी तुलना करण्याचा हेतू अजिबातच नाही, परंतु एक साम्य मात्र दिसते- दोघांचाही जीवनस्त्रोत सामान्य माणसांतून ऊर्जा घेत होता.

अनंतरावांचे बालपण एका वारकरी कुटुंबात गेले. त्यांचे वडीलच फडाचे प्रमुख होते. घरात नित्यकर्म म्हणून आणि आजूबाजूला वावरणारांच्या तोंडून सतत संतवाणी कानावर पडत होती. अनंतरावांसाठी हे फक्त कर्मकांड नव्हते. आपल्या वडलांचे प्रत्यक्ष जीवन ते पाहत होते. संतवचनांनी जीवनाला प्रत्यक्ष आधार कसा दिला आहे, हेही ते अनुभवत होते. विविध जातीजमातींच्या वारकर्‍यांना सामावून घेत कुटुंब कसे मोठे होते हेही ते पाहत होते. त्यांच्या विचारपद्धतीला आणि मनालाही जी एक व्यापकता आली, त्यात या वारकरी संस्काराचा मोठा भाग आहे. घरचे दारिद्रय आणि त्यामुळे पडणार्‍या मर्यादा या माहीत असूनही एकाक्षणी शासकीय नोकरी मिळण्याचा दोर कापून टाकत ते सत्याग्रही बनले. हा सर्वसंगपरित्याग करण्याची मनोभूमिका वारकरी संस्कारानेच केली होती. विठ्ठलाचा गजर करता करता सामान्य माणसांच्या आत्म्यातला विठ्ठल पाहावयाचा होता. आता अन्यायाविरुद्ध लढून मिळवावयाच्या  स्वातंत्र्यालाच विठ्ठलाचे रूप आले होते. 

अनंतरावांची भाषा ही सोपी असे. तिचे कृत्रिम अलंकरण झालेले नसे. अनंतरावांचे फारसे शिक्षण झाले नव्हते. ही गोष्ट त्यांची भाषा शुद्ध राखण्याला उपकारकच ठरली होती. लोकभाषेतल्या म्हणी आणि वाक्प्रचार, लोकभाषेतले शब्द, लोकभाषेची शैली त्यांच्या लेखणीतून आपोआप स्रवू लागे. लिहिता लिहिता दृष्टान्त येत ते संतवचनांचे. अर्थात ते अलंकरण नसे. त्यांच्या मनातला आशय त्या वचनातूनच प्रगट होणे स्वाभाविक होते. 

‘मराठवाडा’ वृत्तपत्राच्या चालकांत (विश्वस्त मंडळात) भिन्न भिन्न छटा असलेल्या राजकीय विचारांची मंडळी होती. गोविंदभाई मार्क्सवादाला चिकटून होते. फक्त त्यातल्या कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यपद्धतीला आणि हिंसक मार्गाला त्यांचा पाठिंबा नव्हता. बाबासाहेब परांजपे आणि अनंतराव भालेराव लोकशाही समाजवाद मानत होते. साहजिकच त्यांना समाजवाद्यांविषयी ममत्व वाटत होते. अर्थात यापैकी कुणीही कोणत्याही राजकीय पक्षाचे सभासद नव्हते. ‘मराठवाडा’ वृत्तपत्र हे  पुरोगामी विचाराचे व लोकचळवळींना पाठिंबा देणारे वृत्तपत्र असावे एवढीच ढोबळमानाने विश्वस्तांची अपेक्षा होती. अनंतरावांनी ही अपेक्षा लक्षात ठेवली आणि कोणत्याही राजकीय पक्षाची बांधिलकी स्वीकारली नाही. ‘मराठवाडा’ वृत्तपत्राला डाव्या चळवळींविषयी सहानुभूती होती व ती त्याच्या पानापानांतून व्यक्त होत असे. 

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि मराठवाडा विकास आंदोलन या दोन्हींचे ‘मराठवाडा’ हे मुखपत्रच झाले होते. अनंतरावांनी राजकीय पक्षाची बांधणी करण्यात कधी भाग घेतला नसला, तरी त्यांनी सांस्कृतिक संस्थांची बांधणी केली. त्यांच्यामुळे मराठवाड्याचे सांस्कृतिक जीवन समृद्ध झाले, यात शंका नाही. हैदराबाद मुक्त झाल्यानंतर येथल्या सांस्कृतिक संस्थांना ‘मराठवाडा’ची सतत मदत असे. मराठवाडा साहित्य परिषदेचे तर ते संवर्धकच होते. नांदेडच्या वसेकरांच्या अभिनव चित्रशाळेचे पूर्ण निकाल ‘मराठवाडा’त प्रसिद्ध होत. शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम, हौशी मंडळींनी बसवलेली नाटके, व्यासंगी विद्वानांची मराठवाड्यात होणारी भाषणे, सांस्कृतिक व राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असणार्‍या परिषदा आणि संमेलने यांचे विस्तृत वृत्तान्त अनंतराव प्रसिद्ध करत. ‘मराठवाडा’चे वाचक वैचारिक व सांस्कृतिक दृष्टीने मागे असू नयेत, ही दृष्टी त्यामागे होती.

............................................................................................................................................................

'अनंत भालेराव : काळ आणि कर्तृत्व' हे पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5015/Anant-Bhalerao

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......