एक जीव, एक संकुल : नवी आपातकालीन महानगरी योजना!
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार
  • Wed , 31 July 2019
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar पाऊस PAUS Rain मोदी सरकार Modi government

सध्या देशात दोन मौसम जोरात आहेत. एक नैसर्गिक ‘पावसाचा’ आणि दुसरा मानवनिर्मित ‘राजकारणाचा’!

पावसानं राज्यासह देशभर जोर पकडलाय. अनेक राज्यांत, महानगरांत पूरस्थिती ओढवली आहे. अनेक ठिकाणी पोलीस, अग्निशमन दलं यांसह निमलष्करी व लष्करी मदत घ्यावी लागलीय.

याला समांतर जो राजकीय मोसम आहे, त्यात केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी एकामागोमाग एक बिलं संसदेत व राज्यसभेत मंजूर करायचा सपाटा लावलाय. मागच्या पाच वर्षांत राज्यसभेत बहुमत नसल्यानं सरकारचे अनेक इरादे अपूर्ण राहिले होते. या नव्या पर्वातही सरकारकडे राज्यसभेत बहुमत नाही. तरी या वेळी विरोधकांमध्ये फूट पाडून सत्ताधारी बिलं पास करवून घेण्यात यशस्वी होताहेत!

याच्या जोडीला जिथं काठावरच्या बहुमताची गैरभाजप सरकारं आहेत, त्यांना अस्थिर करण्यासाठी आमिषं, दबाव यांचा अत्यंत सावधपणे वापर केला जात आहे. तर ज्या राज्यांत नजीकच्या काळात विधानसभा निवडणुका आहेत, तिथं भाजपेतर पक्षातून घाऊक प्रमाणात भाजपमध्ये ‘भरती मोहीम’ सुरू आहे! आणि त्याला यशही चांगलं मिळत आहे.

तर अशा प्रकारे अस्मानी आणि सुलतानी दोन्ही राजे आपआपल्या कामात अतिशय व्यग्र असल्यानं हाहाकार उडूनही, प्रचंड गैरसोय होऊनही, जिवीतहानी होऊनही, कुठेही मोठा आक्रोश नाही, आंदोलन नाही, राज्यकर्त्यांना उत्तर विचारणं नाही. खूपच विचारणा झाली, आडवेतिडवे प्रश्न आले की, राज्यकर्ते स्थितप्रज्ञ चेहऱ्यानं एवढंच म्हणतात, ‘एकाच दिवशी अमूक अमूक सें.मी. पाऊस पडला. निसर्गाची अवकृपा झाली. यावर कोण काय करणार?’ लोकांनाही सरकारचं हे उत्तर पटतं आणि निसर्गाच्या अवकृपनंही जे वाचले, ते त्या अगाध शक्तीपुढे नतमस्तक होतात. जे लुटले गेले, ज्यांनी काही गमावलं, ते सरकारचं दातृत्व सविनय स्वीकारून शांत बसतात!

यावर उपाय म्हणून मुंबईसह महामुंबई, विस्तारित अपर लोअर मुंबई (कारण सरकारनं विविध प्राधिकरणांद्वारे मुंबई पालघर, पनवलेपर्यंत विस्तारीत केलीय.) इथं राहणाऱ्या नागरिकांनी आता स्वयंसहाय उपक्रमांतून नैसर्गिक आपत्तीतून वाचण्यासाठी पुढीलप्रमाणे खबरदारीचे उपाय व्यक्तिगत व सामूहिकरीत्या करावेत.

.............................................................................................................................................

सोशल मीडियासंबंधी नवी दृष्टी व नवं भान देणाऱ्या मराठीतल्या या पहिल्याच पुस्तकाचं मन:पूर्वक स्वागत - प्रा. संजय तांबट, रानडे इन्स्टिट्यूट, पुणे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4986/Social-Media?fbclid=IwAR1Fa3_2jO7gy5f-tvrrrGJupZCxtsVVHc_uhdIS608hrd2ufcEtxCP3nK0

.............................................................................................................................................

हेल्मेट हे आत्तापर्यंत वाहनचालकांसाठी अनिवार्य केलंय. पण यापुढे वाहन न चालवणाऱ्यांनीही हेल्मेट वापरावं. कारण कधी इमारत कोसळेल, कधी दरड कोसळेल, कधी झाड पडेल सांगता येत नाही. काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणत अशा अपघातांतून वाचलो तर ठीकच. पण काळ आणि वेळाची गाठ पडलीच तर खबरदारीचा उपाय म्हणून हेल्मेट जवळ बाळगावं.

पावसाळ्यात रेनकोट, छत्रीप्रमाणे लाईफ जॅकेट किंवा सेफ्टी टायर जवळ बाळगावा. तो परवडत नसेल तर भोपळा सोबत ठेवावा. पाणी तुंबून पायाचा घोटा अथवा गुडघा पाण्यात जाण्याचे दिवस मागे पडलेत. आता थेट मानेपर्यंत पाण्यात जाण्याचे प्रवाही दिवस आहेत. त्यामुळे वरील साधनं जवळ बाळगावीत. एनडीआरएफ ईश्वरासारखी एकाच वेळी अनेक ठिकाणी जाऊ शकत नाही. जेव्हा जीवरक्षक साधनं सज्ज असणं ही नवी महानगरी गरज झालीय!

कुस्तीप्रवण, मोडकळीस आलेल्या इमारतीत राहणाऱ्यांनी शक्यतो घरात न थांबता घरासमोरील गल्लीत, रस्त्यावर थांबावं, जेवावं, झोपावं. झोपताना सशस्त्र दलातील जवान जशी संरक्षक जाळी हाती ठेवतात, तशी जाळी अंगावर ठेवावी. कुठूनही, काहीही पडल्यास किमान संरक्षण होईल, अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी शक्यतो मृत्युपत्र, अवयवदान फॉर्म, वारस नोंदी, रक्तगट, जवळचे नातेवाईक, अशा गोष्टी लॅमिनेटेड स्वरूपात गळ्यात अडकवूनच ठेवाव्यात.

अलीकडे टॉवर जीवनशैली महानगरात चांगलीच फैलावली आहे. दहीहंडीचे थर, गणपती मूर्ती आणि टॉवर्स यांच्यात उंचीवरून निकोप स्पर्धा सुरूच आहे! या अशा टॉवरमध्ये अग्निशमन यंत्रणा असतात, पण त्या शोभेच्या वस्तू ठरतात ऐनवेळी!!

तर टॉवरधारकांनी ऐपतीप्रमाणे स्वयंचलित शिड्या खरेदी करून ठेवाव्यात. अधिक श्रीमंतांनी खाजगी बंब व कर्मचाराही ठेवावेत. (या खाजगीकरणास सरकार पटकन मान्यता देईल!) आगाऊ रक्कम भरून पाण्याचे टँकर्स रिझर्व्ह करून ठेवता येतील. याच खाजगीकरणाचा पुढचा भाग म्हणून हे टँकर्स वेळेत पोहचण्यासाठी अधिक पैसे वाहतूक शाखेत भरून खाजगी ग्रीन कॉरिडॉर बनवता येईल. खाजगी ट्रफिक कंट्रोलही मंजूर करून घ्यावा. लोखंडी वर्तुळाकार जिने, मजबूत रोप हे भाड्यानं मिळणाऱ्या व त्वरित असेंबल करून देणाऱ्या सेवा उपलब्ध असाव्यात.

टॉ‌वरमध्ये दर पाच-दहा मजल्यानंतर मोकळी जागा ठेवलेली असते. पण आपातकालात तिथं पाण्यासह (पिण्याचे) इतर अल्पोपहार मिळावा, यासाठी कॉम्पॅक्ट पॅन्ट्रीची सोय असावी.

याप्रमाणेच खाजगी व सरकारी कार्यालयं यांच्या टेरेसवर मजबूत दोर, खाण्यापिण्याच्या सोयी, चार्जिंगच्या सोयी, वीज गेल्यास जनरेटर, बॅटरी सेवा उपलब्ध असावी.

या सर्व ठिकाणी पोहण्याचं शिक्षण, क्लायबिंग, रोप क्लायबिंग शिक्षण सक्तीचं करावं. विविध आजार बीपी, डायबेटीस असलेल्यांना शक्यतो घरून कामाची सक्ती करावी. यामुळे रेल्वे-बससेवेवरचा ताण कमी होईल. रूळ पाण्यात बुडतात यावर उपाय म्हणून ‘रोप वे रेल्वे’ सुरू कराव्यात अथवा रूळाशिवाय धावणारी रेल्वे विकसित करण्यासाठी खास गडकरी मंत्रालय स्थापावं.

नागरिकांना जगण्यापेक्षा मरणातून कसं वाचावं, याचं शिक्षण महानगरात सक्तीचं करावं. यशस्वी अग्नि, जल, वारा यांतून सुटका करून घेणाऱ्यांना विशेष पुरस्कार द्यावेत. छोट्या गाड्यांसह मोठ्या मानलेल्या एसयुव्ही गाड्याही थोड्याशा पाण्यात बुडतात. त्यामुळे यापुढे पावसात गाड्यांना मोठी चाकं लावण्यासाठी विस्तारीत चासी मिळण्याची सोय व्हावी.

छोट्या नावा, गलबतांना महानगरात परवानगी द्यावी. त्यासाठी ‘मेक इन इंडिया’ व ‘मुद्रा लोन’ या योजनांचे लाभार्थी वाढवावेत. कोस्टल रोडऐवजी जलमार्गच तयार करावा. एक्सप्रेस हायवेसारखा एक्सप्रेस कालवा बांधावा. आणि त्यात छोट्या-मोठ्या नावांना, गलबतांना परवाने द्यावेत. भरपूर टोल घ्यावा. कालव्याचे कठडे रूंद बांधावेत. म्हणजे त्यावर उभं राहून कोळी बांधवांना मासेमारी करता येईल. कालव्यात डिव्हायडर म्हणून मॅनग्रोव्हज वापरावेत.

याशिवाय पॅराजंपिंग, पॅराशूट प्रवास, बलून प्रवास अधिकृत करावा. पायी चालणाऱ्या माणसांच्या जिवाची कोणतीही हमी सरकारनं न घेता, ती खाजगी विमा कंपन्यांवर सोपवावी!

लोक घराबाहेर पडू नयेत यासाठी घरातच काम, थिएटर, खाद्यान्न यांचा पुरवठा करावा. मोठ्या संकुलातच दहन व दफन यांची सोय असावी. ‘एक जीव, एक संकुल’ या जीवनशैलीला प्रोत्साहन देऊन ‘सदर इसम या संकुलात अमूक दिवशी, अमूक साली जन्मला. इथेच वाढला, शिकला, कमावता झाला, संसारी झाला. कुटुंब वाढलं. त्यातच वृद्ध होऊन अमूक दिवशी इथंच दफन झाला. त्यानं या पृथ्वीचा फक्त एवढे चौरस फूटच वापर केला.’ अशी पाटी लावावी!

सध्याच्या सरकारलाही आवडेल अशीच ही योजना आहे. विचार करा.

...............................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Shashank

Wed , 31 July 2019

Bhannat lekh!!!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......