कानावर हात ठेवून विटलेला नथुराम आणि भोवतीनं गिरक्या घालणारी गांधी फलटण!
ग्रंथनामा - आगामी
विनायक होगाडे
  • ‘ओह माय गोडसे’ या कादंबरीचं मुखपृष्ठ
  • Fri , 19 July 2019
  • ग्रंथनामा Granthnama आगामी ओह माय गोडसे Oh My Godse विनायक होगाडे Vinayak Hogade महात्मा गांधी Mahatma Gandhi नथुराम गोडसे Nathuram Godse

दोन प्रवृत्तींमधील द्वंद्व अधोरेखित करणारी ‘ओह माय गोडसे’ ही तरुण कादंबरीकार विनायक होगाडे यांची कादंबरी उद्या पुण्यात (स्थळ- एसेम जोशी सोशॅलिस्ट फाउंडेशनचे सभागृह) समारंभपूर्वक प्रकाशित होत आहे. सामाजिक कार्यकर्त्या रझिया पटेल, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि सुभाष वारे यांच्या हस्ते या कादंबरीचा लोकार्पण सोहळा होतो आहे. त्यानिमित्ताने या कादंबरीच्या एका प्रकरणाचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

“नथुराम! अरे बाळ नथुराम...!” कुठून तरी एक अनोळखी पण प्रेमळ साद त्याच्या कानी पडली.

तो अग्रणीसाठी लेख लिहिण्यात व्यस्त होता. आवाज कानावर पडताच भास झाला की काय, असं त्याला वाटलं. म्हणून तो  पुन्हा आपल्यात लिहिण्यात व्यस्त झाला.

“नथुराम...” पुन्हा साद ऐकू आली. आणि आता मात्र नक्की कुणीतरी हाक मारतंय, याची खात्री त्याला झाली. तो खोलीच्या बाहेर आला. त्याने काळजीपूर्वक ऐकलं तर त्याच्या लक्षात आलं की, बापू कुटीच्या दिशेकडून ही साद ऐकू येतीय.

आता या सुमारास गांधींनी का बोलवलं असेल? हा प्रश्न त्याच्या मनात उभा राहणार, इतक्यातच त्याला जाणवलं की, हा आवाज तर गांधींचा नाहींचय. तो कोड्यात पडला. बापू कुटीच्या व्हरांड्यासमोर जाऊन उभा राहतो न राहतो तोच, त्याला पुन्हा ती साद ऐकू आली.

“नथुराम... अरे मी... मी चरखा बोलतोय...!” बोलणारा चरखा पाहून नथुराम जागच्या जागी गोठून गेला.

“घाबरू नकोस मित्रा. मी नवनिर्मितीचं विधायक साधन आहे. बंदूक वा तोफ नाही. कुणाचं काही वाईट मी नाही करणार. भलेही बापूंच्या खुनास तुझे हात कारणीभूत ठरले असावेत. पण सर्वांवर प्रेम करायला आम्हाला बापूंनी शिकवलंय.” आपोआपच गोल गोल फिरणारा चरखा म्हणाला. चरखा बोलतोय, हे त्याला सुरुवातीला पटलंच नाही. आश्चर्यचकित होऊन तो दोन्ही डोळे चोळू लागला.

“हे काय होते आहे मला...!” असं मोठ्याने म्हणाला.

“शूsss... अरे ओरडू नकोस. बापू झोपलेत ना? तुला तरी आवडेल का तुझी अशी झोपमोड करायला.” बाजूच्या कोपऱ्यातील काठी जमिनीपासून फूटभर वर तरंगत हळुवार आवाजात त्याला गप्प करू लागली. गांधींची आधाराची काठीदेखील बोलतेय हे पाहून आधीच उडालेला नथुराम थेट ढगात गेला.

हळूहळू एकामागून एक अशा सगळ्या वस्तू त्याला साद घालू लागल्या. तो जाम गोंधळात पडला. इकडे तिकडे नुसताच पाहू लागला. त्याच्या कानावर एकच एक नुसता बोलणाऱ्या वस्तूंचा गलगलाट ऐकू येऊ लागला.

“नथुराम अरे ये ना. मला चालवून तर बघ. तुझ्या डोळ्यासमोर घडणाऱ्या नवनिर्मितीचा आनंद मिळेल तुला.” चरखा पुन्हा म्हणाला!

“नथुरामा... अरे मला माहितीय की मला तू तुझ्या डोक्यावर घेणार नाहीसच. कारण तू ठरलास त्या काळ्या टोपीचा वारसदार. पण मित्रा, मी डोक्यावर असलेली असंख्य डोकी स्वातंत्र्यलढ्यात होती बरं का!” नथुरामच्या अगदी चेहऱ्यासमोरून तरंगत जाऊन गांधी टोपी त्याच्या डोक्यावर बसली.

“नथुरामा... बापू हा मनुष्य माणसाच्या ‘माणुसकीचा शास्त्रज्ञ’ होता. ‘कर के देखो’ म्हणत आयुष्यभर निरनिराळे प्रयोग करत राहिला हा मनुष्य. कधीतरी मला वाचून त्याचे हे प्रयोग होते तरी काय? हे जाणून घेशील?” सत्याचे प्रयोग हे पुस्तक स्वतःची पाने फडफडवत हवेत तरंगून जाऊन नथुरामच्या हातात जाऊन बसलं.

“नथुरामा... तुझ्या हातात देखील लेखणी होती आणि तू तुझं मत तुझ्या वर्तमानपत्रातून मांडायचास हे माहितीय मला. पण मित्रा... माणसाला माणसाशी जोडायचं काम जी करते, तीच खरी लेखणी. मी बापूंच्या हातातून आयुष्यभर हे काम करत राहिले. मला हातात घेऊन तर बघशील?” लेखणी पटकन जाऊन नथुरामच्या खिशात बसली.

“नथुरामा... अरे मला तू तुझ्या शाखेत फिरवलीस की नाही माहीत नाही. पण माझ्यासारख्याला हातात घेऊन कधी गरिबांचा आधार होशील?” त्याच्या अगदी समोर उभी राहून तरंगणारी काठी म्हणाली.

गांधी माझा सखा गं | ओवी त्याला गाईन |

ओव्या गाऊ कौतुके | तू येरे बा विठ्ठला ||

मोहन माझा धीराचा | वीर तो छातीचा |

काटा काढी सोजीराचा | येरे बा विठ्ठला ||

“नथुरामा... कुठल्याच कामाची लाज न बाळगणारे बापू. माझ्या सहाय्याने धान्य दळायचे. आया-बायांच्या मुखातील ओव्यांपर्यंत बापू जाऊन पोहोचले ते उगीच नाही काही. कधीतरी त्या मागचं इंगित समजून घेशील?” जातं अगदी गरगर असा मोठा आवाज करत म्हणालं.

चरखा, काठी, गांधी टोपी, लेखणी, खादीचा धागा, सत्याचे प्रयोग, धान्य दळायचं जातं या आणि अशा साऱ्या वस्तू त्याच्याशी बोलू लागल्या होत्या. ही सारी बोलणारी गांधी फलटण पाहून एव्हाना त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती. या वस्तू त्याच्याशी करत असलेला संवाद त्याला अक्षरशः सहनच होत नव्हता. वस्तूंचं असं बोलणं नथुरामसाठी जणू वाकुल्या दाखवल्यासारखं होतं.

“गप्प बसा सगळे...!” डोळे झाकून, दोन्ही हात कानावर ठेऊन तो उन्मळून आल्यासारखं असहाय्य होऊन जोरात किंचाळला.

एकासुरात गलगलाट करणाऱ्या वस्तू अचानकच गप्प झाल्या. क्षणभर नुसतीच शांतता पसरली. नथुराम मात्र त्याच स्थितीत. डोळे बंद आणि हात तसेच कानावर. पण वस्तू मात्र थांबायचं नाव घेत नव्हत्या. त्यांनी पुन्हा आपलं गांधीपुराण सुरू केलं. आपल्या असहाय्य किंचाळण्यानेदेखील शांत न बसणाऱ्या या वस्तू पाहून तो पुरताच गोंधळला. या छळणाऱ्या वस्तू पाहून आता मात्र नथुरामाची अवस्था अगदी केविलवाणी झाली.

चरख्याने पुन्हा बोलायला सुरुवात केली. “वेळ जात नव्हता म्हणून गांधींनी मला सांभाळलं नव्हतं. मी सत्य आणि अहिंसेचं प्रतीक बनलो. त्या काळातलं माझं महत्त्व इतकं अनन्यसाधारण होतं की बस्स. भारताच्या राष्ट्रध्वजावर पोहोचण्याइतपत माझा मान होता. काय रे धाग्या? खरंय ना?” बाजूच्या खादीच्या धाग्याकडे पाहत चरखा म्हणाला.

“खरंय चरखादादा...!” चरख्याच्या बाजूला असणारा फूटभर खादीचा धागा हवेतून वाहत येऊन नथुरामच्या समोर वळवळ करू लागला. त्यानंतर नथुरामच्या मनगटावर स्वतःला बांधून घेऊन तो बोलू लागला.

“खरं तर माझं अस्तित्वच ते केवढं? पण तरीही या साऱ्या प्रक्रियेत माझा सहभाग होता, यातच मला समाधान आहे. हा चरखादादा मला निर्माण करायचा आणि लोक माझ्या नवनिर्मितीचा केवढा तो आनंद घ्यायचे. माझं जाडंभरडं अस्तित्व ही त्या काळी स्वातंत्र्यप्रेरणेची खूण होती.  गांधी निव्वळ सूत कातत नव्हते. त्याबरोबर ते भारतीय समाजाचं मन कातत होते. त्याला मूल्यांची जोड देत होते. समाजातील हरेक वर्गातल्या हरेक प्रकारच्या धाग्याला राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचं ते राजकारण होतं. गांधी चरखा फिरवत राहिले. आणि असंख्य धागे आपोआप जुळत राहिले. याला कारण होतं, ते सत्य, अहिंसा आणि प्रामाणिक प्रयत्नाची जोड यांची.

नथुराम! तू कधी चरखादादाला चालवलेला नसावंस. पण कधीतरी चालवून बघ. माझी निर्मिती होताना पाहून तुलाही आकाश ठेंगणं होईल. चरखादादाला चालवताना जर मी मध्येच तुटलो तर मला पुन्हा दुसऱ्या धाग्याशी जोडावं लागतं. हा अलग झालेला धागा जोडण्याची रित लोकांना निराळी आणि आश्चर्यकारक वाटायची. मी तुटल्यावर जर तू मला पुन्हा कापसावर ठेवलास आणि चरखा फिरवायला लागलास की, आपोआप मी सुताशी जोडला जातो. सुतातील रेषा आपोआप माझ्याशी जोडून घेतात. माझ्यासारख्या धाग्याभोवती त्या आपोआप जमा होतात. गांधींदेखील लोकांना प्रामाणिक हाक द्यायचे आणि लोक आपोआप जमत जायचे. सत्याग्रह करायचे. मार खायचे. तुरुंगात जायचे. विनयपूर्वक कायदे तोडायचे खरे, पण तुरुंगात कायदे तितक्याच सचोटीने पाळायचे. लहान शाळकरी मुलं, घराबाहेर न पडलेल्या बाया, अस्पृश्य, कामगार, शेतकरी, आदिवासी सगळेच बाहेर पडले आणि गांधीभोवती जमा झाले. गांधी खऱ्या अर्थाने भारतीय राजकारणातला तो महत्त्वाचा धागा बनला.”

धाग्याच्या म्हणण्याला दुजोरा देत पुन्हा चरखा बोलू लागला. “धागा म्हणतोय ते खरंय. मला चालवताना तुम्ही जरा जास्तच ताण दिलात किंवा हिसका दिलात तर धागा तुटतो. चरखा चालवताना महत्त्वाची गोष्ट आहे ती निघणाऱ्या धाग्याच्या अनुषंगाने सातत्यपूर्ण हाताच्या हालचालींची. त्यासाठी चरखा काही वेळा मागेही फिरवावा लागतो. हिंसेच्या हिसक्याने मिळणारे स्वातंत्र्य हे अधार्मिक स्वातंत्र्य ठरेल. ते धाग्यांना धाग्यांपासून तोडणारे ठरेल. आणि असे अधार्मिक स्वातंत्र्य हे पुन्हा अराजक आणि हिंसेलाच निमंत्रण देतं. म्हणून गांधी साध्य-साधन विवेक महत्त्वाचा मानायचे. आणि म्हणून गांधी चौरीचौराच्या हिंसेनंतर ऐन भरात आलेलं असहकार आंदोलन मागे घेतात.”

“हो ना चरखादादा...! अगदी खरंय...!” नथुरामच्या डोक्यावर जाऊन बसलेली पांढरी टोपी तिथूनच मोठ्या दिमाखात बोलू लागली. “आणि काय सांगू माझ्याबद्दल? मी जाड्या भरड्या खादीच्या धाग्यांनी बनले होते. पण जिथे तिथे, ज्याला म्हणून या देशाच्या स्वातंत्र्यासाठी झगडायचं होतं, त्याला मला डोक्यावर घेतल्याशिवाय या कामात त्याचा सहभाग व्हायचाच नाही. माझा शोध तर स्वतः बापूंनी लावला होता. त्यांनी स्वतःहून मला तयार केलं होतं. हा माणूस भलताच प्रयोगक्षम होता. इतकी शतके दिमाखात डोलणाऱ्या अनेक भलत्यासलत्या प्रकारच्या पगड्यांना मागे टाकून आज मी भारतातल्या सनदशीर डोक्याचा ताबा घेणारी बनली आहे. बापूंनी मला डोक्यावर परिधान केलं आणि अक्षरशः माझ्या येण्याने हलकल्लोळ झाला. गांधींचं नेतृत्व स्वीकारायचं म्हटल्यावर मला डोक्यावर परिधान करणं, ही जणू काही अलिखित अटच बनून गेली. मी ज्याच्या डोक्यावर विराजमान, त्या माणसाकडून नीतिमान वर्तनाची शंभर टक्के हमी असायचीच. बापूंनी मला मिळवून दिलेला मान आजतागायत तसाच आहे. आजदेखील मी देशातील खेडोपाड्यातील गरीब, सामान्य आणि नीतिमान आयुष्य जगू पाहणाऱ्याच्या डोक्यावर विराजमान आहे.”  गांधी टोपीने तिचं म्हणणं पूर्ण केलं.

“होय टोपीताई...! गांधी भलताच प्रयोगशील माणूस होता. त्याने आपल्या आयुष्यात अनेक प्रयोग केले. ते नेहमीच म्हणायचे. ‘कर के देखो...!’ प्रयोग चुकला तर चुकूदे. पण निर्भयतेने आणि आत्मविश्वासपूर्वक प्रयोग करणं महत्त्वाचं. माणसाच्या आयुष्याला स्पर्श करणारं असं एकही क्षेत्र नाही, ज्यात बापूंनी प्रयोग करून आपले निष्कर्ष काढले नाहीत. भलेही स्थळ काळानुसार प्रयोग फसले असतील वा आता ते निष्कर्ष चुकीचे ठरतील. पण आहारापासून ते ब्रह्मचर्यापर्यंत प्रयोग करून मानवी आयुष्याच्या साऱ्या अंगांना स्पर्श करत आपला ठसा उमटवणारा हा एकमेव मनुष्य होता. म्हणूनच तो महात्मा ठरला. ‘हाडामांसाचा असा एक मनुष्य या पृथ्वीतलावर होऊन गेलाय, यावर येणाऱ्या भावी पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत..!’ बापूंच्या जाण्यानंतर असं आइन्स्टाइन म्हणाला ते उगीच नाही. मला ते भाग्य मिळाले की, मी बापूंच्या या सत्याच्या प्रयोगांना एकत्र करणारा ग्रंथ ठरलो, नव्हे त्यांचं आत्मचरित्र ठरलो.”

“त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात मी अनेक प्रवास त्यांच्यासोबत केले. अगदी सायंकाळी फिरायला जाणं असो वा गोलमेज परिषदेसाठी लंडनला जाणं असो. मी त्यांचा कायमच आधार ठरलो. पण अगदी खरं सांगायचं तर, बापू झपाटेबंद पावले टाकत चालायला लागले की, माझीसुद्धा दमछाक व्हायची. बापूंची गतीच अनोखी होती. गांधींसोबत मी गाव न गाव, शहरं नि शहरं पालथी घातली. दांडी यात्रा तर माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय असा प्रवास. तो दिवस होता १२ मार्च! मिठावरील कराच्या विरोधातील सत्याग्रहासाठी बापू साबरमती आश्रमातून आपल्या मोजक्या ७८ सत्याग्रहींसोबत निघाले. आणि काय सांगू नथुराम?  बघता बघता, या यात्रेत हजारो लोक सामील झाले. असंख्य गावातून, शहरातून टप्प्याटप्प्याने हा तब्बल ४०० किमी पायी प्रवास झाला. आणि बापूंनी अगदी चिमूटभर मीठ उचलून दांडी येथे मिठाचा कायदा मोडला. दिसायला एकदम क्षुल्लक कृती होती ती. पण त्याने इंग्रज सरकारचं धाबं दणाणलं. हा...हा म्हणता म्हणता सारा देश रस्त्यावर आला. तो ‘सविनय कायदेभंग’ करू लागला. न घाबरता... न डरता... इंग्रजांचा मार सहन करत लोकांनी लढाई सुरू केली. नथुराम, कुणीही चिमूटभर मीठ उचलल्यानं अशी देशव्यापी आंदोलनं उभी राहत नसतात. कुणाच्याही मुखातील ‘चले जाव’ हा शब्द मंत्र बनत नसतो. कुणीही उठून ‘करेंगे या मरेंगे’ म्हटल्यावर लोक मरायला तयार होत नाहीत. गांधीच तो मनुष्य होता, ज्याच्या आदेशासरशी लोक पेटून उठायचे. ही ताकद होती त्याच्या वाणीत. आणि हजारो लोक एका हडकुळ्या म्हाताऱ्याच्या नुसत्या एका शब्दावर रस्त्यावर लढा द्यायला उतरतात. तो पण चक्क अहिंसक लढा. हेच इंग्रजांसाठी मोठं आव्हान होतं. आणि म्हणून ब्रिटिश शासन याला पाहून थरथर थरथर कापताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय.” गांधीच्या आधाराच्या काठीनं आपलं म्हणणं पूर्ण केलं.

साऱ्यांची स्वगतं ऐकून नथुरामच्या नाकपुड्या फेंदारल्या. एव्हाना तो फणफणू लागला होता. त्याचा चेहरा पुरा लालबुंद झाला होता. दात दातावर विचकत त्याने गांधीपलटणीचं हे आक्रमण चिडीचूपपणे ऐकून घेतलं होतं. बोलणाऱ्या वस्तू पाहून आधीच भ्रमित झालेल्या नथुरामला बोलणाऱ्या वस्तूंना उत्तरंही देता येत नव्हतं.

इतक्यात... चरख्यानं बसल्या ठिकाणी सुरेल आवाजात भजन म्हणायला सुरुवात केली. तशा सगळ्या वस्तू नथुरामभोवती गोल गोल गिरक्या घालू लागल्या. चरख्याच्या सुरात सूर मिसळून एकसाथ भजन म्हणू लागल्या. मध्ये कानावर हात ठेवून विटलेला नथुराम आणि भोवतीनं गिरक्या घालणारी गांधी फलटण.

रघुपती राघव राजाराम...

पतित पावन सीताराम...

ईश्वर अल्लाह... तेरो नाम...

नथुराम को सन्मती दे भगवान...!

रघुपती राघव राजाराम...

पतित पावन सीताराम...

तो पुन्हा बेंबीच्या देठापासून जोरात ओरडला. “बास करा हे गांधीपुराण...!”

“नथुराम... काय होतंय...?” बाजूला बसलेला नारायण उठून त्याच्या पलंगावर गेला. आजूबाजूला पाहतो तर तो त्याच्या खोलीत पलंगावर झोपला होता.

“ठिक आहेस ना...? काही भयानक स्वप्न पडलं होतं का?” टेबलावरील पाण्याचा ग्लास पुढे करत नारायणनं विचारलं.

“हो...” स्वतः ला सावरत तो म्हणाला.

.............................................................................................................................................

या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5010/Oh-My-Godse

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......