‘अस्मिता शोधाची’ संघर्ष कहाणी
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
नितीन जरंडीकर
  • किम स्कॉट आणि ‘ट्रू कंट्री’चं मुखपृष्ठ
  • Sun , 25 December 2016
  • ग्रंथनामा Booksnama किम स्कॉट Kim Scott ट्रू कंट्री True Country अॅबोरिजिन Aboriginal

‘ट्रू कंट्री’ ही किम स्कॉट (जन्म- १९५७) या ऑस्ट्रेलियन ‘अॅबोरिजिनल’ लेखकाची पहिली कादंबरी. (‘अॅबोरिजिनल’साठी ‘मूलनिवासी’/‘आदिवासी’ असे शब्द योजता येतील. परंतु ऑस्ट्रेलियन अॅबोरिजिनल समुदाय ‘अॅबोरिजिन’ या शब्दाबाबत कमालीचा आग्रही ‍‌असल्यामुळे व मूलनिवासी/आदिवासी शब्दांनी काहीशी दिशाभूल होण्याची शक्यता असल्यामुळे तोच शब्द वापरूयात.) १९६० नंतर जगभर विखुरलेल्या अॅबोरिजिनल समाजाचा राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवरचा दडपलेला आवाज तीव्रतेने ऐकू येऊ लागला. मानववंशशास्त्राने हे सिद्ध केले आहे की, उत्क्रांतीवादातून घडत गेलेला आदिमानव हा प्रथमतः आफ्रिका आणि त्यानंतर तो इतर भूप्रदेशामध्ये स्थलांतरित होत गेला. पैकी एक समूह हजारो वर्षे आपले अस्तित्व ऑस्ट्रेलिया खंडामध्ये टिकवून आहे. हा कृष्णवर्णीय समाज आपल्या रूढी-परंपरा जपत निसर्गाशी एकरूप होऊन कित्येक शतके आपले जीवन व्यतीत करत आहे.

तथापि १६व्या शतकानंतर वसाहतवादाने आपल्या राक्षसी महत्त्वाकांक्षेने सर्वच वसाहती गिळंकृत करण्याचे जे प्रयत्न चालवले, त्याला ऑस्ट्रेलिया तरी कसा अपवाद ठरणार? मूळ वसाहतीमधील संस्कृती, त्यांच्या भाषा, धर्म यांचे समूळ उच्चाटन करून आपली संस्कृती रुजवण्याचा अजेंडा ऑस्ट्रेलियातही राबवला गेला. आशिया आणि आफ्रिका येथील वसाहतींच्या बाबत युरोपियनांनी कालौघात काढता पाय घेतला. परंतु ऑस्ट्रेलिया/कॅनडासारख्या वसाहतीत त्यांनी मूळ देशात जाण्याचे नाकारले. परिणामी आजची ऑस्ट्रेलियाची क्रिकेट टीम किंवा ऑलिंपिकमधील त्यांचा चमू पाहिल्यास त्यांचे सारेच खेळाडू गौरवर्णीय दिसून येतात. आजही ऑस्ट्रेलियामध्ये अॅबोरीजिनल समूह तग धरून आहे. आजच्या ऑस्ट्रेलियन समाजव्यवस्थेला वर्णसंघर्षाचा मोठा कलंक आहे. त्यातून पुन्हा ‘गौरवर्णीय ऑस्ट्रेलियन  अॅबोरीजिनल’ समूहाची घुसमट तर अस्वस्थ करणारी आहे. (वर्णसंकरातून आपल्या संकृतीबरोबरच त्वचेचा रंगही विसरायला लावणे हा देखील वसाहतवादी अजेंड्याचाच एक भाग होता.)

किम स्कॉट हे स्वतः गौरवर्णीय ऑस्ट्रेलियन अॅबोरीजिनल लेखक आहेत. अॅबोरीजिनल समूह समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न करत असताना तिथे त्यांना करावा लागणारा संघर्ष व या संघर्षातून होणारी त्यांची ससेहोलपट हा किम स्कॉट यांच्या कादंबरी विश्वाचा विषय आहे. आजपावेतो स्कॉट यांनी ‘ट्रु कंट्री’ (१९९३) व्यतिरिक्त ‘बेनांग’ (१९९९) आणि ‘दॅट डेडमॅन डान्स’ (२०१०) या कादंबऱ्या लिहिल्या आहेत.

‘ट्रू कंट्री’ या कादंबरीचा कालावकाश हा १९८० च्या दशकातला आहे. मि. बिल स्टोरी हा या कादंबरीचा नायक. बिल हा एक शिक्षक आहे. शिक्षक म्हणून काम करण्यासाठी तो ‘कारनामा’ नामक ऑस्ट्रेलियातील अति दुर्गम भागात येतो आणि इथून कादंबरीला सुरुवात होते. कारनामा येथे अॅबोरीजीन्सना ‘संस्कारित’ करण्यासाठी ‘मिशन’ तिथे पूर्वीपासूनच काम करत आहे. निसर्गसंपन्न  कारनामामध्ये आपल्याला बिलच्या बरोबरीने त्याची पत्नी, बिलच्या शाळेचे प्राचार्य व त्यांची पत्नी, मिशनचे फादर व सिस्टर्स आदी गौरवर्णीय पात्रे आणि फातिमा, वालांगु, सेबॅस्टीअन, जिरार्ड, सॅमसन आदी कृष्णवर्णीय पात्रेही भेटतात. बिल ज्या कालखंडात पोहोचतो, त्यावेळी मिशनच्या प्रभावाला ओहोटी लागलेली दिसते. मिशनबद्दलचा आदर, दरारा आता संपलेला आहे. अॅबोरीजिनल मुलांना शिकवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. बिल आणि त्याच्या साथीदारांचे विद्यार्थ्यांना शाळेला आणण्यासाठी उठवायला जाणे हे थेट आपल्याकडच्या ८०-९०च्या दशकातील प्राथमिक शाळांची आठवण करून देणारे आहे.

बिलच्या या प्रवासात त्याला फातिमा नावाची आजी भेटते. फातिमा ही मिशनने वाढवलेली कारनामा येथील पहिली मुलगी आहे. मिशनच्या जर्नल्समध्ये तिच्याबद्दलच्या सर्व नोंदींचा तपशील आहे. फातिमाच्या तोंडून बिल तिचा भूतकाळ आणि अॅबोरीजिनल संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. फातिमा स्वतःला लहानपणीच आई-वडिलांपासून मिशनने शिक्षणासाठी म्हणून हिरावून नेल्याचे सांगते. १०-१२ वर्षानंतर ती आपल्या घरी पुन्हा कारनामा येथे परतते. परंतु आता ती आपल्या आई-वडिलांशी बोलू शकत नाही, कारण ती आपली भाषाच विसरलेली असते.

वालांगु हा फातिमाचा नवरा. वालांगुबद्दल कारनामामध्ये सर्वांना प्रचंड आदर आहे. वालांगु मिशनच्या पूर्ण विरोधात आहे. तो स्वतः ऑस्ट्रेलियन अॅबोरीजिनल संस्कृतीचा रक्षणकर्ता आहे. त्याच्या तंत्रविद्द्येबद्दल सर्वांनाच भीतीयुक्त आदर आहे. गोऱ्यांच्या विरुद्ध त्याने उघड–उघड केलेली युद्धे प्रसिद्ध आहेत. आपल्याला मात्र कादंबरीत जो वालांगु भेटतो, तो थेट मृत्युशय्येवर असलेला.

शिक्षक म्हणून रुजू झालेला बिल हळूहळू कारनामामध्ये रुळायला लागतो. मात्र मिशन व इतर संबंधित गौरवर्णीय समुदाय या भूप्रदेशाला कमालीचा कंटाळलेला आहे. अॅबोरीजीनमध्ये वाढत चाललेली गुन्हेगारी, व्यसनाधीनता यामुळे ते हताश झाले आहेत. याउलट बिलला अॅबोरीजीनबद्दल एक प्रकारचा जिव्हाळा वाटू लागला आहे. त्यांच्या रूढी-परंपरा त्याला आता उमगू लागल्या आहेत. त्यांच्या नृत्याशैलीचा पदन्यास त्याने बघता बघता आत्मसात केला आहे. आणि कादंबरीच्या याच टप्प्यावर एक रहस्यभेद होतो. बिलची आजी ही मूळची अॅबोरीजिनल आहे. बिलच्या वडलांचे बिलच्या लहानपणीच निधन झाले आहे. परिणामी बिल आपली अॅबोरीजिनल वंशाची मुळे शोधण्यासठी कारनामा येथे आला आहे. फातिमा, वालांगु यांना भेटल्यानंतर, अॅबोरीजीन बांधवांच्या बरोबर नदीकिनारी, समुद्राकाठी सफरी करताना हळूहळू बिलला आपली मूळं सापडू लागली आहेत. बिल फॅंटसी टच असणाऱ्या अनेक टिपिकल अॅबोरिजिनल अनुभवांना सामोरा जातो ते सारे मुळातून वाचण्यासारखे  आहे. पण बिलसाठी या सर्व सामान्य गोष्टीच आहेत. कारण आता त्याला यामागच्या अॅबोरीजिनल जाणीवा कळून चुकल्या आहेत.

कादंबरीत एका बाजूला हताश झालेले मिशनरी व इतर गौरवर्णीय मंडळी कारनामा सोडून जाताना दिसतात. तर दुसऱ्या बाजूला कमालीच्या दारिद्र्याने पिचलेले अॅबोरीजीन्स आर्थिक आरिष्ट संपवण्यासाठी म्हणून कारनामा सोडताना दिसतात. कादंबरीत अखेरच्या टप्प्यावरती बिल नदीच्या पुरात सापडलेला दिसतो. परंतु बिलचा शेवट हा त्याला त्याचा ‘खराखुरा प्रदेश’, खरीखुरी आयडेंटीटी सापडल्याचा एक सात्त्विक, तरल, अम्लान आनंद देऊन जाताना दिसतो.

कादंबरीमध्ये गौरवर्णीय-कृष्णवर्णीय, वसाहतवादी-वासाहतिक असे प्रत्यक्ष संदर्भ येत असले तरी वसाहतवादाविरुद्धचा ‘तीव्र आक्रोश’ असा अभिनिवेश कादंबरीत कुठेही दिसत नाही. किम स्कॉट यांनी अतिशय संयतपणे, तटस्थपणे दोन्ही व्यवस्था मांडल्या आहेत. फातिमाच्या रूपाने ‘स्टोलन जनरेशन’ या ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील काळ्याकुट्ट कालखंडावरती प्रकाश पडतो. शिक्षण/संस्कार वगैरेच्या नावाखाली कित्येक लहान मुलांना त्यांच्या घरापासून तोडण्यात आले. प्रत्यक्षात मात्र ही मुलं गोऱ्यांच्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक शोषणाची बळी ठरली. खरे तर या मुलांची अॅबोरीजिनल भाषा, रूढी-परंपरा पुरत्या पुसल्या जाव्यात हाच यामागचा अजेंडा होता. फातिमाच्या सुदैवाने तिला तिचे आई-वडील भेटले तरी. प्रत्यक्षात कित्येकांना तेही नशीब लाभले नाही. २००८ साली तत्कालीन ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी या सर्वांची जाहीर माफी मागितली होती.

बिलचे पुरात वाहून जाणे ही त्याची आत्महत्या असू शकते का? असू शकते. आजमितीस ऑस्ट्रेलियामध्ये अॅबोरीजीन्सची आत्महत्या हा एक चिंतेचा विषय आहे. ८० च्या दशकानंतर या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. ‘सुइसाईड एपिडेमिक’ म्हणूनच या प्रक्रियेचे वर्णन केले जाते. वंशभेदाचे तीव्र चटके, कमालीचे दारिद्र्य व त्यातून उद्भवणारे अनुषंगिक प्रश्न, तर गौरवर्णीय असूनही अॅबोरीजिनल संस्कृतीपासून तुटलेली मुळे यातून होणारा आत्यंतिक स्वरूपाचा ‘आयडेंटीटी क्रायसिस’ या पिढीला कमालीच्या नैराश्याच्या गर्तेत झोकून देत आहे. सुइसाईड एपिडेमिकला तोंड देण्यासाठी अनेक कौन्सिलिंग सेन्टर्स ऑस्ट्रेलियात उघडण्यात आली आहेत. शासनस्तरावरही प्रयत्न सुरू आहेत.

कादंबरी अॅबोरीजिनल रूढी-परंपरा, शब्दसंपदा यांनी संपन्न तर आहेच, पण तिची निवेदनशैली हे तिचे एक फार मोठे बलस्थान आहे. बहुआवाजी निवेदन तंत्राचा किम स्कॉट यांनी यात प्रभावशाली वापर केला आहे. कादंबरीची सुरुवात हेलिकॉप्टर व्हिजनने होते. बिल आणि इतर शिक्षक हेलिकॉप्टरमधून कारनामाकडे यायला निघाले आहेत. अवकाशातून ते खाली पाहताहेत आणि अॅबोरीजिनल समुदाय त्यांना संपूर्ण भूप्रदेशाचे वर्णन सांगतोय. हेलिकॉप्टर खाली उतरल्यावर बिल आणि इतरांच्या बरोबरीने वाचकांचेही या समुदायाकडून स्वागत होते. कादंबरीत कधी बिल वाचकांशी संवाद साधतो, तर कधी फातिमा, वालांगु, इतर अॅबोरीजिनल पात्रं, तर कधी कधी संपूर्ण समुदायच. कादंबरीचा शेवट देखील हेलिकॉप्टर व्हिजननेच होतो. परंतु यावेळी बिलचे अपार्थिव शरीर अवकाशात तरंगते आहे, सोबत वालांगु तरंगतो आहे आणि तिथून बिलला त्याची आजी, वडील दिसताहेत, कारनाम्याचा भूप्रदेश दिसतो आहे. आणि अॅबोरिजीनच्या या नव्या, खऱ्याखुऱ्या जगात “We are serious. We are grinning. Welcome to you”, असे म्हणत अॅबोरीजिनल समुदायाकडून ‘अॅबोरीजिनल’ बिलचे स्वागत होते.

कादंबरीत नाट्यात्मक कलाटणी देणारे असे काहीही घडत नाही. उत्कंठावर्धक, श्वास रोखून धरायला लावणारे असेही काही प्रसंग त्यात नाहीत. कथानक अतिशय संथ गतीने उलगडत जाते. जटील निवेदनशैलीने वाचकही बऱ्याचदा त्रस्त होतो. असे असूनही ऑस्ट्रेलियन अॅबोरीजिनल समुदायाच्या घुसमटीवर ती भेदक प्रकाश टाकते आणि खऱ्याखुऱ्या ‘अस्मिता शोधाची’ संघर्ष कहाणी बनते.

ट्रू कंट्री – किम स्कॉट, फ्रिमँटल आर्ट्स सेंटर प्रेस, नॉर्थ फ्रिमँटल (ऑस्ट्रेलिया), पाने - ३००, किंडल बुक किंमत - ६८१.४९ रुपये. 

 

लेखक इंग्रजी विषयाचे अध्यापन करतात.

nitin.jarandikar@gmail.com                                 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......