राज ठाकरेंच्या तोफा आणि माध्यमांची ‘मोदी बचाव’ चौकीदारी!
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • राज ठाकरे. रेखाचित्र - संजय पवार
  • Wed , 10 April 2019
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar राज ठाकरे Raj Thackeray मनसे MNS राहुल गांधी Rahul Gandhi काँग्रेस Congress भाजप BJP नरेंद्र मोदी Narendra Modi चौकीदार Chaukidar

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला पाच दिवस उरलेले असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दसऱ्याचं निमित्त साधून स्वत:चा पक्ष न लढवत असलेल्या निवडणूक प्रचाराची सुरुवात केली. देशातील सर्वांत पहिला मोदी स्तुतीपाठक आणि २०१४ला युतीविरोधात उमेदवार उभे करूनही मोदींच्या पंतप्रधानकीला पाठिंबा देणारे ते देशातले एकमेव नेते होते!

आज २०१९ साली ते देशातले सर्वांत कडवे व नंबर दोनचे विरोधक आहेत मोदींचे! नंबर एकवर आहेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी. त्यांचा काँग्रेस पक्ष देशातला सर्वांत जुना राष्ट्रीय पक्ष आहे, तर महाराष्ट्राबाहेरच्या राजकारणात, सत्ताकारणात राज ठाकरेंना रस नाही. त्या अर्थाने ते प्रादेशिक नेते. असे ते तांत्रिकदृष्ट्या नंबर दोनवर आहेत. पण त्यांच्या विरोधाची पद्धत पाहिली तर ते नंबर एकचे कडवे विरोधक ठरतात.

त्याची कारणं स्पष्ट आहेत. त्यांचा पक्ष लोकसभा निवडणुका लढवत नाहीए. त्यांनी विशिष्ट आघाडी, युती, पक्ष यांना आधिकृत पाठिंबा जाहीर केलेला नाही. राहुल गांधी-काँग्रेस मोदी आणि मोदी सरकारवर संसदेत, संसदेबाहेर टीका करतात. मोदींनी काय जुमलेबाजी केली, उद्योगपतींना कशी मदत केली, त्यांनी अनेक संस्था कशा उदध्वस्त केल्या, अनेक संकेत कसे बाजूला ठेवले, ते प्रश्नांना उत्तरं कशी देत नाहीत, असे अनेक आरोप सातत्याने करत ‘चौकीदार चौर है’ हा नाराही देशभर केला राहुल गांधींनी.

राज ठाकरेंचा विरोध सबळ पुरावे देत चालू आहे. विविध संदर्भ, आकडेवारी, त्याचे स्त्रोत, त्यांचे तपशील देत, एखाद्या खटल्यात निष्णात वकिलाने आरोपाच्या पुष्ट्यर्थ रास उभी करावी, त्या पद्धतीने ते मोदी व अमित शहा यांचे वाभाडे काढताहेत. आजघडीला निवडणूक लढवत नसताना केवळ मोदी-शहा या हुकूमशहांच्या पराभवासाठी आठ ते दहा जाहीर सभा घेणारा मनसे हा एकमेव पक्ष आणि राज ठाकरे हे एकमेव नेते असावेत!

खरं तर मागच्या पाडवा सभेतच त्यांनी मोदी-शहा यांचा धुडगूस याच पद्धतीने सांगत सर्व राजकीय पक्षांना भाजपविरोधात एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. आणीबाणीनंतर जसे सर्व राजकीय पक्ष इंदिरा गांधी, पर्यायानं काँग्रेसविरोधात एकवटले होते, तशी फळी उभी करून हे लोकशाहीवरील संकट पदच्युत करण्याची गरज आहे असं सांगितलं होतं.

परंतु प्रस्थापित राजकीय पक्षांना आपापली राजकीय दुकानदारी राज्यवार सांभाळायची असल्यानं राष्ट्रीय स्तरावर चंद्राबाबू नायडू, शरद पवार यांनी केलेले प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. परंतु त्या सर्व गाठीभेटी, आदानप्रदानाचा उपयोग निकालोत्तर आघाडी करायला नक्कीच मदत करेल, असं शरद पवारांनी नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं.

आपल्या आवाहनाला कोण प्रतिसाद देतोय, नाही देत याची वाट न बघता किंवा वृत्तवाहिन्यांना रोजचा कडबा म्हणून भेटीगाठीचं सत्र सुरू न करता राज ठाकरेंनी स्वत:पुरता एक मार्ग ठरवून घेतला आणि परवा पाडव्याला तो जाहीर केला.

राज ठाकरेंनी वर्षभरापूर्वी जसं राजकीय पक्षांना आवाहन केलं होतं, तसंच माध्यमांनाही केलं होतं. पत्रकारांच्या गळचेपीची उदाहरणं देत नोकरी सांभाळत जमेल तेवढा, जमेल तिथं या प्रवृत्ती विरोधात उभं रहा, असं आवाहन केलं होतं. पण एरवी बाणेदारपणा दाखवणारी छापील व इलेक्ट्रॉनिक माध्यमं निवडणुकीच्या मोसमात अधिकच लालची आणि गुलाम झाली!

भारतात संसदीय लोकशाहीत जी दोन मोठी सत्ता परिवर्तनं झाली, त्या परिवर्तनांत माध्यमांचा वाटा मोठा होता.

पहिलं परिवर्तन १९७७ साली झालं. आणीबाणीनंतरची निवडणूक ही दुसऱ्या स्वातंत्र्याची म्हणून एक परिवर्तनाची लढाई ठरली. तोवरच्या अजिंक्य काँग्रेसचा पराभव झाला. खुद्द पंतप्रधान इंदिरा गांधींचा पराभव झाला. तेव्हा देशात छापील (वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके) आणि रेडिओ ही दोनच प्रसारमाध्यमं होती. दूरदर्शन सुरू झालं होतं. पण तेवढा प्रसार नव्हता. वर्तमानपत्रंही कृष्णधवल होती. अक्षरजुळणी आणि रोटरी प्रिंटिंग होतं. फोटोसाठी ब्लॉक तयार करावे लागत. तरीही वृत्तपत्रात बातमी येणं ही मोठी गोष्ट होती. काळ्या शाईला महत्त्व होतं आणि पाणी पडलं तरी फाटू शकेल, अशा न्यूजप्रिंटवर छापल्या जाणाऱ्या बातम्यांना लेटर बॉम्बचं महत्त्व होतं. ७७च्या निवडणुकीत इंदिरा गांधी विरोधात एकवटलेल्या सर्व विरोधी पक्षांनी मिळून स्थापलेल्या जनता पार्टीला तेव्हा कुठल्याच माध्यमानं ‘तुमचा पंतप्रधान कोण?’ असा पूर्ण लोकशाहीविरोधी, अशिक्षित प्रश्न केला नव्हता. निवडून येणारे खासदार पंतप्रधान निवडतात, ही संविधानिक प्रक्रिया आहे. आपल्याकडे राष्ट्रपतीपदासारखी पंतप्रधानपदासाठी निवडणूक होत नाही.

त्यामुळे त्यावेळच्या माध्यमांनी जनता पार्टीमागे आपली ताकद उभी केली. आणीबाणीतील सर्व गैरकृत्यं, चव्हाट्यावर आणली. बंदी उठल्यानंतर त्या १९ महिन्यांत कशा पद्धतीनं लोकशाहीचा खून करण्यात आला होता, याबाबतीतलं प्रबोधन बातम्यांमधून वर्तमानपत्रांनी केलं. कुणीही न सांगता ती मुखपत्रं बनली होती. त्यात त्या वेळी राजकीय पक्षांसोबत सामाजिक संघटना, साहित्यिक, कलाकारही हुकूमशाहीविरोधात प्रचारात उतरले होते. लोकांच्या लढाईला माध्यमांची साथ होती. माध्यमांची ताकद सत्ताधाऱ्यांना कळली!

त्यानंतर माध्यमांनी वेळोवेळी सरकारांचा भ्रष्ट कारभार जनतेसमोर आणला. त्यात ८४ साली चारशेच्यावर खासदार निवडून आणणाऱ्या राजीव गांधींच्या सरकारला पाच वर्षांतच पराभवाला सामोरं जावं लागलं, तेव्हा विरोधी पक्षांना माध्यमांची साथ लाभल्यानंच बोफोर्स घोटाळा गाजला, सरकार गेलं.

मधल्या काळात सरकारं आली-गेली, पण २०१४ची निवडणूक दुसरी अशी निवडणूक होती ७७ नंतरची, जिने ऐतिहासिक परिवर्तन घडवलं. दहा वर्षं सत्तेत असलेलं काँग्रेसप्रणीत युपीए सरकार भ्रष्टाचार व घोटाळेग्रस्त ठरलेलं. ७७पेक्षा माध्यमांचा विस्तार १०० पटीनं झालेला. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडिया, न्यूज चॅनेल्स, सोशल मीडिया, सर्वच माध्यमांनी सरकारची लक्तरं वेशीवर टांगली.

लोकपालसाठी अण्णा हजारेंनी केलेल्या आंदोलनाला माध्यमांनी एवढी प्रसिद्धी दिली की, तिथंच त्या सरकारच्या कबरीचं खोदकाम सुरू झालं. माध्यमांनी तयार केलेल्या या सरकारविरोधी वातावरणाचा भाजप आणि विशेषत: मोदी यांनी इतका सुनियोजित, प्रचंड खर्च आणि मनुष्यबळ वापरून काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांचा पाचोळा केला. भाजप स्वबळावर सत्तेत आला. हा ३० वर्षांनी घडणारा मोठा बदल होता. पुढे लोकसभेचाच कित्ता गिरवत भाजप जवळपास २० राज्यांत स्वबळ व मित्रपक्षांसह सत्तेत आला. पूर्ण गैरकाँग्रेसी एकपक्षीय सरकार!

मोदींनी निवडणूक प्रचारापासूनच सर्व प्रसिद्धी स्वत:भोवती केंद्रीत केली आणि नंतर भाजपचं, एनडीएचं नाही तर ‘मोदी सरकार’ हीच प्रतिमा पाच वर्षं ठसवून आता २०१९लाही ‘फिर एक बार मोदी सरकार’ अशी स्वकेंद्री निवडणूक केलीय. मोदींचा पाच वर्षांचा कारभार हा मंत्रीमंडळाचा न राहता मोदींचा राहिला. भाजप पक्षच हायजॅक केला नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी.

मोदींना जनतेनं दिलेलं बळ हे मोदींना पुढे स्वत:चंच कर्तृत्व वाटू लागलं. त्यांनी पक्षाध्यक्षपदी हनुमानसदृश अमित शहांची निवड करून एकाच वेळी सरकार व पक्ष अक्षरक्ष: आपल्या मुठीत ठेवला. पाच वर्षांतल्या मोदींचा कारभार हुकूमशहासारखाच राहिला. ना त्यांनी मंत्रीमंडळ जुमानलं, ना संसद, ना आरबीआय, ना सीबीआय, ना निवडणूक आयोग. सर्वच ठिकाणी मी व मी म्हणेन ते! सतत दौरे, सतत भाषणं, सतत स्वनाम गजर, सतत विरोधकांना देशद्रोही ठरवणं एवढाच कार्यक्रम! कोट्यवधींच्या योजना त्यांच्या तेवढ्याच कोटींच्या जाहिराती. स्वत:च्या छबीची हौस इतकी की, जाहिरात विमानतळाची की शौचालयाची फोटो हवाच. जोडीला थापा. अवैज्ञानिक विधानं, जुमलेबाजी असं सर्वच.

ज्या माध्यमांच्या कल्लोळामुळे आपण सत्ता मिळवली, ती माध्यमं आपली सत्ता घालवूही शकतात, याची पूर्ण कल्पना असणाऱ्या मोदींनी सत्तेत येताच सरकार, पक्ष याप्रमाणे माध्यमंही ताब्यात घेतली. विरोधाचा सूर म्हणजे बेसूर मुळातूनच त्यांनी दाबून टाकला. इतका दाब प्रत्यक्ष आणीबाणीनंतरही नव्हता. आणि जागतिकीकरणातील, उदारीकरणातील, नव्या भांडवलशाहीतील माध्यमांनी तसाही ध्येयवाद, निष्पक्षता वगैरे सुरनळी करून बाजारकेंद्री व्यवसाय सुरू केलाच होता. त्यामुळे स्वखुशीनं पावर लिपस्टिक लावून विक्रीमूल्य घेऊन बाजारात आलेल्या सेक्सवर्करप्रमाणे माध्यमं विविध किमतीला उपलब्ध झाली. मोदींच्या भांडवलदार मित्रांनी ते काम सहज पार पाडलं. सरकारी जाहिरातींशिवाय सरकारी योजनेवर कसलंच सर्वेक्षण, विश्लेषण येणार नाही, याची तजवीज केली गेली. पाच वर्षांत माध्यमं सरकारची अंगवस्त्र झाली! त्यामुळे ना छंद बाहेर आले, ना गैरव्यवहार, ना व्यभिचार की व्यवस्थेची मोडतोड! गावगुंडांची दहशत असावी तसला प्रकार! खरं तर ही शोकांतिका! पण स्वखुशीच्या मामल्याला अन्याय तरी कसा म्हणावा? मोदीशेठची बटिक माध्यमं आज त्यांना कामी येताहेत.

आणि त्यामुळे राहुल गांधी असोत की राज ठाकरे, ते जे काही बोलतात, सांगतात, दाखवतात, त्याला बातमीमूल्य दिलं जात नाही. वास्तविक राज ठाकरे हे खरं तर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे डार्लिंग. त्यांच्या लाइव्ह सभा (आजही) दाखवून टीआरपी वाढवणाऱ्या वाहिन्या मोदींचं मीठ खाऊन गुळणी धरून गप्प आहेत.

जे काम माध्यमांनी करायला हवं, जे प्रश्न त्यांनी विचारायला हवे, जे फुटेज त्यांनी दाखवायला हवं, ते राज ठाकरे दाखवताहेत आणि माध्यमं सभेची बातमी देऊन शेपट्या घालून बसलीत. मोदींनी ज्या पद्धतीनं लोकशाहीचा गळा घोटलाय, थापेबाजी केलीय, भूमिका बदलल्यात, शब्द फिरवलेत, ते सप्रमाण दाखवूनही माध्यमं त्याकडे दुर्लक्ष करत प्रश्न विचारतात ‘मोदी नाही तर कोण?’

मोदी, फडणवीस, भाजप राज ठाकरेंना बारामतीचा पोपट, खालसा झालेला राजा, नकलाकार, मनोरंजन वगैरे विशेषणं लावतात. माध्यमं त्याला प्रसिद्धी देतात. पण कुणीही मोदी-फडणवीसांना ‘त्यांच्या प्रश्नांना उत्तर काय?’ असा प्रतिप्रश्न करत नाहीत.

अलीकडे सर्व वाहिन्यांवर ‘वायरल सत्य’ नावाचा कार्यक्रम दाखवतात. मग ही माध्यमं राज ठाकरेंनी दाखवलेले व्हिडिओ तपासायचं धैर्य दाखवतील? ते खोटे आहेत हे सिद्ध करतील? नाही होणार ते. कारण एरव्ही भारत-पाक मानवाधिकार कार्यकर्त्यांना ‘बिर्याणी बहाद्दर’ म्हणून हेटाळणारे संपादक गडकरी वाड्यावर जाऊन ‘भोजनभाऊ’ होतात, तेव्हा ते कसे काय ‘नमकहराम’ होणार? गडकरींनी तर बहुतेक एक टेबल संपादकांसाठी राखीव ठेवलेलं दिसतंय! मंत्र्यांच्या घरी निवडणूक काळात जाऊन पोटं भरणारी पत्रकारिता, कशी काय राज ठाकरेंच्या बाजूनं उभी राहणार?

पत्रकारांची एक पिढी होती, जी सत्ताधाऱ्यांच्या चहाही घ्यायची नाही. आता तर रांगा लावून पंक्तीला बसताहेत! वर तारीफ कामाची, गप्पांची का भोजनाची करायची, असा इनकॅमेरा सवालही करतात. ही अशी दोन्ही करांनी, सर्व प्रकारची खवय्येगिरी करणारी पत्रकारिता राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना, पुराव्यांना, तपशिलांना दाखवण्याऐवजी कॉलर उडवणारे उदयनराजे, गाणं म्हणणारे उदयनराजे, डायलॉग मारणारे उदयनराजे दाखवणार! अर्धशिक्षित, लाचार पत्रकारांपैकी कुणीही उदयनराजेंना तुमची लोकसभेतील उपस्थिती किती? प्रश्न किती विचारले? मतदारसंघात किती (नेमकी) कामं मार्गी लावली? वगैरे प्रश्न विचारले नाहीत. ना त्यांच्या पूर्ण झालेल्या एखाद्या कामाचा प्रत्यक्ष व्हिडिओ वगैरे न दाखवला. हा असा हसत-खिदळत वैचारिक दारिद्रय दाखवणारा आणि नेत्यांचं प्रमोशन करणारा मीडिया (एकाच दिवशी, एका मागोमाग सर्व मराठी वाहिन्यांवर त्या दिवशी उदयनराजे होते! तेच प्रश्न, तेच डायलॉग, तीच कॉलर!) राज ठाकरे किंवा राहुल गांधींचं धैर्य कसं दाखवणार?

थेट चॅनेलला धमकी देणारा पंतप्रधान, वृत्तवाहिनी मुकाट स्वीकारते, तेव्हा दारुड्या नवऱ्याचा मार मुकाट खाणारी महिला डोळ्यासमोर येते! राज ठाकरेंनी दारूगोळा ठासून भरून तोफा मैदानात आणल्यात. पण ‘मोदी बचाव’ म्हणून चौकीदारी करणारा पगारी मीडिया तो दारूगोळा वाया घालवणार! आता जनतेनेच मोदी आणि लाचार मीडिया यांना त्यांची ‘जागा’ दाखवायला हवी. राज ठाकरेंना साथ द्यायला हवी.

...............................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......