मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ‘निवडक’ भाषा वैभव!
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. रेखाचित्र - संजय पवार
  • Tue , 05 February 2019
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar काँग्रेस Congress भाजप BJP नरेंद्र मोदी Narendra Modi देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis राष्ट्रवादी काँग्रेस NCP

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या पर्वात आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि पुढे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता यांचा कालावधी बघता, त्यांच्या हातात चार ते पाच महिने शिल्लक आहेत.

तुलनाच करायची झाली तर मोदींपेक्षा फडणवीसांनी शांतपणे पाच वर्षं पूर्ण करत आणलीत. मोदी जेवढे स्वत:चे ढोल पिटतात (जाहिरातीतून आणि काही वेळा कार्यक्रमांतून प्रत्यक्ष ‘ढोल’ वाजवून) तेवढे फडणवीसांनी पिटले नाहीत. देशातल्या कुठल्याही भाजप मुख्यमंत्र्यापेक्षा त्यांनी आपली प्रतिमा जास्तीत जास्त स्वच्छ, आश्वासक आणि ठाम अशी सातत्यानं ठेवलीय.

खरं तर मोदींच्या तुलनेत फडणवीसांच्या मस्तकी काटेरी मुकूटच आला. मोदींना सुस्पष्ट बहुमत, पसंतीचा पक्षाध्यक्ष, अनुभवी मंत्री व पक्ष पदाधिकारी मिळाले. मित्र पक्षांचं जोखड खांद्यावर नव्हतं. याउलट फडणीवस स्पष्ट बहुमतापासून अगदी थोडक्यात दूर राहिले. पण संसदीय लोकशाहीत एक आमदार\खासदार कमी असणं म्हणजे परावलंबित्वच.

लोकसभेला असलेली युती सहा महिन्यांतच विधानसभेला फुटली (का तोडली?). पंचवीस वर्षांची अभेद्य युती तुटली. मोदींचं झंझावती आगमन झालं होतं आणि बाळासाहेब जाऊन जवळपास दोन वर्षं झाली होती. मोदींच्या विजयानं भाजपअंतर्गतही अनेक समीकरणं बदलली. अटल-अडवाणी युगाचा अस्त झालाच होता, पण महाजनानंतर एकटे पडलेले मुंढे आपलं स्थान टिकवण्याची पराकाष्ठा करत होते. थेट केंद्रात मंत्रीपद मिळालं. ‘महाराष्ट्रात परतणार का’, हा प्रश्न चर्चाविश्वात येण्याआधीच त्यांचं अपघाती निधन झालं. आणि युतीचे सर्वच मूळ शिल्पकार काळाच्या पडद्याआड गेले (पैकी अडवाणी सदेह आहेत, पण अस्तित्व बेदखल केलेलं).

अशा पार्श्वभूमीवर भाजपच्या नव्या नेतृत्वानं सेनेपुढे मान तुकवणं नाकारलं आणि युती तुटली. याची प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीही तुटली (किंवा तोडली). शेवटी भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे असे पाच पक्ष स्वतंत्र लढले आणि भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा, पण स्पष्ट बहुमतापासून दूर राहिलेला पक्ष ठरला.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4716/RAW---Bharatiya-Guptcharsansthechi-Gudhgatha

.............................................................................................................................................

गोपीनाथ मुंढे यांच्या पश्चात नितीन गडकरींना महाराष्ट्रात पाठवलं जाईल किंवा पाठवावं अशा व्यूहरचना, दबावगट कार्यरत झाले. पण निवडणूक प्रचारातच मोदींनी फडणवीसांबद्दल काही संकेत देऊन ठेवले होते. ते सुस्पष्ट नव्हते, पण पुरेसे होते. मोदी-शहांनी राज्याराज्यातील ठराविक गणितं मोडली होती. त्याचीच पुनरावृत्ती करत महाराष्ट्रात मराठा अथवा ओबीसी मुख्यमंत्री (पर्यायानं एकनाथ खडसे, विनोद तावडे इत्यादींच्या चर्चा रंगल्या. अगदी महिला मुख्यमंत्री म्हणून पंकजा मुंढेही!) असावा या गृहितकाला छेद देत गडकरी नाही, पण फडणवीसांना पसंती देत ब्राह्मण मुख्यमंत्री निवडला.

भाजप स्पष्ट बहुमतापासून दूर असताना आता सेनेच्या हाता-पाया पडावं लागतं की काय? मुख्यमंत्रीपद जातं की काय? वगैरे विचार चालू असतानाच द्रौपदी वस्त्रहरणात कृष्ण धावून आला, तशी राष्ट्रवादी धावून आली आणि पूर्ण निकाल लागण्याआधीच विचारणाही केली नसताना त्यांनी सरकारला बाहेरून बिनशर्त पाठिंबा देऊन टाकला. आणि भाजपची मातोश्रीवरची ओवाळणी वाचवली. फडणवीसांनी इथूनच ‘पीच’वर पाच रोवले. आपादधर्म आणि शाश्वतधर्म समजावत राष्ट्रवादीचा पाठिंबा स्वीकारत आवाजी बहुमतानं सरकार स्थापन करत सेनेला बाहेरचा रस्ता दाखवला! सेनेनं केंद्रात मंत्रीपदं स्वीकारली, पण महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारून राजकीय दिवाळखोरी सिद्ध केली. सत्तेविना १०-१५ काढलेले व साठीला टेकलेले वा पार केलेले ताठ बाण्याचे शिवसेना आमदार मंत्रीपदाचा तोंडचा घास जातो म्हटल्यावर कासावीस झाले. मग यूटर्न मारत सेना विरोधी पक्ष (नेतेपदासह) सोडून सत्ताधारी झाली!

हा फडणवीसांचा दुसरा राजकीय विजय होता. अन्नछत्रात वाढावीत तशी काही किरकोळ मंत्रीपदं सेनेला देऊन त्यांनी सेनेतंर्गत धुसफूस चालू राहिल याची सोय केली. काँग्रेस-राष्ट्रवादी आता विरोधक झाले. त्यांच्याकडे ‘तालमी’तले खेळाडू, त्यांच्यापुढे फडणवीस ‘मॅट’वरचे. पण इथंही फडणवीसांनी त्यांना मातीतून उचलून ‘मॅट’वर यायला भाग पाडलं ते आजतागायत!

केवळ आमदारकीचा अनुभव असलेला हा पोरसवदा देवेंद्र सेनेसह विरोधी पक्षांचा गिऱ्हाईक होईल आणि लवकरच आपली दखल घ्यावी लागेल, यासाठी भाजपताच मांडे खाल्ले जात होते. तर सेना-भाजपच्या भांडणात सरकार अल्पमतात जाईल व आपल्याला पुन्हा संधी मिळेल, अशा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आशा पालवल्या. पण इथंही फडणवीस पुरून उरले. पहिल्या दहा षटकातच त्यांनी खडसेंची विकेट काढून आपला मारा सुनिश्चित केला. त्यांच्या या धडाडीला मोदी-शहांचा भरभक्कम पाठिंबा असल्यानं - विशेषत: मोदींचा-  फडणवीस निर्धास्त झाले. त्यांनी चांगलीच मांड ठोकली.

फडणवीसांनी मोदी शैलीप्रमाणे मंत्रीमंडळ एकहाती चालवायला घेतलं. दिल्लीच्या पाठिंब्यानं ते त्यात यशस्वीही झाले. पण या सर्व प्रवासात त्यांची देहबोली, कार्यशैली मोदींप्रमाणे मनमर्जी, अहंकारी, दर्प व दहशत दर्शवणारी राहिली नाही. समन्वयवादाचा सूर राखतानाच काही पत्ते त्यांनी हातात ठेवले. गडकरींप्रमाणेच फडणवीस हे आधी कट्टर स्वयंसेवक असल्यानं आपली ती ओळख त्यांनी भीमा कोरेगाव प्रकरण, भिडे गुरुजी, शहरी नक्षलवाद यातून अधोरेखित केली. संविधानाच्या चौकटीत संघ अजेंडा कसा पुढे रेटायचा, हे काम त्यांनी मोदींपेक्षा अधिक ठळकपणे पण योगींपेक्षा कमी प्रदर्शनीय पद्धतीनं केलं.

मोदींची भाषा जाहीर भाषणात अनेकदा आक्षेपार्ह ठरलीय किंवा तपशीलात गोंधळ, चुकीचे संदर्भ याचे व्हिडिओ आजही पहायला मिळतात. याबाबतीत फडणवीस उजवे ठरतात. हे असले गोंधळ त्यांनी केले नाहीत. मात्र एरवी संयमी, समन्वयवादी, शांत वाटणारे फडणवीस पक्षीय मेळाव्यात, पक्षाच्या विविध संघटनांच्या कार्यक्रमात वरील सर्व गोष्टींना फाटा देत आक्रमक होतात, प्रसंगी कर्कश्श होतात. काल-परवाचं ‘कुत्ते भौकते है’ हे विधान याच प्रकारातलं.

मागे मुंबईतच पक्षाध्यक्ष अमित शहांनी विरोधकांना कुत्र्या-मांजरांची उपमा दिली होती. फडणवीसांनी आता त्यांचीच री ओढलीय. हा त्यांचा दुणावलेला आत्मविश्वास म्हणायचा का देशभर बदलत चाललेल्या वातावरणातून निर्माण होणारी अस्वस्थता समजायची? या अशा आक्रमक किंवा शेलक्या विशेषणावर नंतर ते खास वैदर्भीय सारवासारव करतात. म्हणजे ते म्हणतात- ‘आमच्याकडे लोक रोजच्या गप्पात सहज म्हणतात, अबे वाघ चालून राहिला त कुत्ते भौंकते ना भौ, उसमें क्या!’ वगैरे.

फडणवीसांचं हे निवडक भाषावैभव पक्षीय मेळाव्यातच बहराला येतं. यातून ते पक्ष कार्यकर्त्यांत ‘माझ्यातही आक्रमकता आहे आणि एरवी मृदू बोलणारा मी प्रसंगी थोडा खालीही उतरू शकतो’ असा संदेश देतात. जो नेतृत्वाच्या शर्यतीतील योग्य लोकांपर्यंत योग्य पद्धतीनं पोहचतो. मागेही त्यांनी एका शब्दाबद्दल असाच वैदर्भीय दाखला दिला होता. (संदर्भ वेगळा आहे, पण मुख्यमंत्री वैदर्भीय बोली म्हणून सुटतात आणि कोकणातले महेश मांजरेकर चित्रपटाच्या शीर्षकात ‘आयचा घो’ समाविष्ट केला म्हणून टीकचे धनी होतात. शिवराळ ठरवले जातात!)

फडणवीसांच्या निवडक भाषावैभवाप्रमाणेच त्यांचा ‘निवडक आक्रमक पवित्रा’ही वैशिष्ट्यपूर्ण असतो. अनेकदा विधानसभा अथवा विधानपरिषदेत त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादींच्या नेत्यांची नावं घेऊन त्यांच्यावर आरोप करत त्यांना खिंडीत गाठलंय.

आणखी एक प्रसंग. बीकेसीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत काही शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरू केली. क्षणभर मंडप विचलित झाला. पोलीस सरसावले. कुणीतरी वक्ता बोलत होता. मागे बसलेले फडणवीस तीरासारखे उठले आणि माईक ताब्यात घेत घोषणाबाजांच्या दुप्पट आवेशात ‘जय जय जय शिवाजी’ अशी घोषणा ते देत राहिले. दरम्यान पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणली.

आता ‘जय जय जय, जय जय जय शिवाजी’ अशी घोषणा स्वयंसेवकांपर्यंत नीट पोहचली असणार. कारण प्रचलित घोषणा ‘जय शिवाजी जय भवानी’, ‘हर हर महादेव’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा आपण ऐकतो, पण ‘जय जय जय, जय जय जय शिवाजी’ हे प्रकरण नवीन होतं.कुळवाडीभूषण, रयतेचा राजा शिवछत्रपतींना गोब्राह्मण प्रतिपालक हिंदूपदपतशहा करणाऱ्यांना ही घोषणा समजू शकते. फडणवीसांनी शांततेचं वा कुठलंही आवाहन आर्जव अथवा गडकरींसारखे ‘वो काँग्रेसवालोंने भेजे हे, मालूम है, उसे ध्यान मत दो’ असं तुच्छतादर्शक न बोलता जो आवेश दाखवला त्यातून त्यांनी स्पष्ट संदेश दिला- शिवाजीमहाराज हा कुणा एकाचा कॉपीराईट नाही. या घटनेला पार्श्वभूमी होती. भाजपनेत्यांच्या घटत्या मातोश्री भेटी आणि सभेत बाळासाहेबांचं स्मरण न करणं. या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी सैनिकांना स्वयंसेवक म्हणून उत्तर दिलं!

फडणवीसांचे हे निवडक भाषावैभव कदाचित पुढच्या सहा महिन्यांत अधिकदा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पुन्हा ते वाघाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजू शकतात!

भाजपसाठी पुढच्या विधानसभेआधी लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे. तीन मोठी राज्यं गमावली. आणि राहुल गांधींसोबत आता प्रियांका गांधींचा अधिकृत प्रवेश झाला. विरोधी पक्षात राज्याराज्यांत होणाऱ्या आघाड्या आणि ममता बॅनर्जींनी गोळा केलेली सहानुभूती नि एकी यामुळे प्रचारात भाजपच्या वाचाळ तोफांप्रमाणे निवडक भाषावैभव दाखवणारे फडणवीसही किती वाहवत जातात, ते लवकरच कळले. तूर्तास त्यांनी विरोधकांना जी उपमा दिली, त्यातून ते आता मोदींच्या अधिक प्रभावात आले म्हणता येईल. ते चांगलं की वाईट हे कळेलच या वर्षांत!

...............................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................