गुलामी त्रासदायक होती, तशीच ती न्यूनत्वाची व कमीपणाचीही खूण होती!
ग्रंथनामा - झलक
बुकर टी. वॉॅॅॅशिंग्टन
  • ‘दास्यातून मुक्ती’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 25 January 2019
  • ग्रंथनामा झलक दास्यातून मुक्ती Dasyatun Mukti बुकर टी. वॉॅॅॅशिंग्टन Booker T. Washington अप फ्रॉॅॅम स्लॅॅॅॅव्हेरी Up From Slavery

बुकर टी. वॉॅॅॅशिंग्टन ‘Up From Slavery’ या इंग्रजीमध्ये गाजलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद शरद प्रभूदेसाई यांनी केला असून नुकताच तो डायमंड पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित झालाय. त्यातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

१.

व्हर्जिनियामधील फ्रँकलिन काऊंटी यांच्या वाडीत मी गुलाम म्हणूनच जन्म घेतला. माझा जन्म निश्चित कोठे व केव्हा झाला, हे मला माहीत नाही. पोस्ट ऑफिसजवळ हेले फोर्टमध्ये १८५८ ते १८५९च्या दरम्यान मी जन्मलो. मला माझी जन्मतारीख नक्की ठाऊक नाही. मात्र, मला वाडी व गुलामांच्या चाळी स्पष्ट आठवतात. गुलामांच्या चाळी वाडीचाच एक भाग होता.

मी लहानपणी राहात होतो, तेथील वातावरण गलिच्छ, बकाल व निरुत्साही होते. या परिस्थितीला आमचे मालक कारणीभूत नव्हते. १४ ते १६ फूट बंधिस्त खोलीत मी जन्मलो. या खोलीत मी, आई, बहीण व भाऊ यादवी युद्धानंतरही रहात होतो. या युद्धानंतर आम्हाला ‘स्वतंत्र’ घोषित करण्यात आले.

माझ्या पूर्वजांसंबंधी मला काहीच माहीत नाही. काळे लोक आपापसात गुलामांच्या छळांच्या गोष्टी बोलत. माझ्या आई-वडिलांना, नातलगांना आफ्रिकेतून अमेरिकेत आणताना छळ सहन करावा लागला. माझी ‘आई’ सोडून कोणत्याही नातेवाइकाविषयी मला काहीच माहिती नाही. आईला एक सावत्र भाऊ व एक सावत्र बहीण होती. गुलामांच्या कौटुंबिक माहितीकडे कोणी लक्ष देत नसे. आईकडे एका ग्राहकाचे लक्ष गेले, तोच माझा व आईचा मालक. गुलामांच्या कळपात आईची भर पडली. खरेदी केलेल्या घोडा व गाई इतकीच आईची किंमत होती. माझ्या वडिलांविषयी मला फारशी माहिती नाही, मात्र जवळच्या वाडीत राहणारे ते एक गोरे गृहस्थ होते, इतकेच मला त्यांच्याविषयीचे ज्ञान! त्यामुळे त्यांचा-माझा फारसा संबंध नसल्यामुळे त्यांचे प्रेम कोठून मिळणार?

ज्या खोलीत आम्ही रहात होतो तेथेच संपूर्ण वाडीचा स्वयंपाक केला जायचा. माझी आईच त्या सर्वांचे जेवण बनवत असे. खोलीला खिडक्या नव्हत्याच. खोलीला असलेल्या झरोक्यातून उन्हाळ्यात उजेड व थंडीत गार हवा आत येई. खोलीला एकच दरवाजा होता. तो खूपच मोठा असल्याने खोली फारच गैरसोयीची झाली होती. खोलीच्या उजव्या कोपऱ्यात भिंतीला एक छिद्र होते. यादवी युद्धापूर्वी भिंतीला असे भोक ठेवण्याची पद्धत होती. या छिद्रातून मांजराला रात्रीच्या वेळी घरातून आत-बाहेर करणे शक्य होत असे. वास्तविक मांजराला रहायला आमच्या घरात भरपूर जागा होती. त्यामुळे या छिद्राची गरज काय, हे मला कधीच कळले नाही. जमिनीवरही लाकडांचे आच्छादन नव्हते. या जमिनीत मध्येच एक खड्डा होता. या खड्ड्यात हिवाळ्यात रताळी साठविली जात. या खड्ड्याचे तोंड फळ्या घालून बंद केले जाई. हा खड्डा माझ्या चांगलाच लक्षात आहे. रताळी काढताना किंवा ठेवताना मला दोन-चार रताळी मिळत. ती मी छान भाजून खात असे. वाडीवर अन्न शिजवून खाण्यासाठी स्टोव्ह नव्हता. माझी आई गोऱ्या लोकांचे व गुलामांचे अन्न घमेल्यात घालून चुलीवर शिजवी. अशा या बकाल खोलीत हिवाळ्यात थंडीचा व उन्हाळ्यात उष्म्याचा भयंकर त्रास होई.

बालपणातील माझे त्या खोलीतील दिवस इतर गुलामांपेक्षा वेगळे नव्हते. मुलांकडे लक्ष द्यायला आईपाशी वेळच नसे. सकाळी काम सुरू करण्यापूर्वी व रात्री सर्व काम संपल्यानंतर ती आमच्याकडे थोडेफार लक्ष द्यायची. रात्री उशिरा आई कोंबडी शिजवायची व खायला उठवायची. हे मला पक्के आठवतंय; पण ही कोंबडी ती कुठून कशी मिळवायची हे बाकी मला कळत नसे. आमच्या मालकाच्या वाडीतून ती आणत असावी असं मला वाटतं. याला काही जण ‘चोरी’ म्हणतील आणि आता मला ती चोरीच आहे असं वाटतंय. हे तिचे वागणे त्यावेळेच्या गुलाम प्रथेप्रमाणे होते. आम्हाला ‘स्वतंत्र’ घोषित करेपर्यंत मी गादीवर झोपल्याचे आठवत नाही. माझा मोठा भाऊ जोन, माझी बहीण अमांडा आणि मी जमिनीवर टाकलेल्या गलिच्छ फटकुरावर झोपत असू. घाणेरड्या जमिनीवर टाकलेल्या चिंध्या हीच आमची गादी!

तरुणपणी फावल्या वेळात खेळ खेळल्याचे मला आठवतच नाही. मला आठवते तेव्हापासून माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस काही ना काही काम करण्यातच गेला. थोडंसं जरी खेळायला मिळालं असतं तरी बरं झालं असतं.

लहानपणापासूनच मी आवार साफ करणे, शेतावरील माणसांना पाणी देणे, गिरणीवरून आठवड्यातून एकदा धान्य दळण्यासाठी नेणे अशी कामे करत असे. गिरणी वाडीपासून तीन मैलांवर असल्यामुळे तेथे जायला मला भीती वाटत असे. धान्याने भरलेल्या जड गोणी घोड्यावर दोन्ही बाजूला सारख्या रहातील अशा ठेवलेल्या असत. बऱ्याच वेळा एकाच बाजूला वजन पडल्यामुळे गोणी माझ्यासकट घोड्यावरून खाली पडायच्या. मी दुबळा असल्याने पडलेल्या गोणी परत घोड्यावर चढवणे मला शक्य नसे. मग मी मदतीसाठी वाट पहात बसे. वाट पहाता पहाता मी थकून जाई व रडत बसे. त्यामुळे मला गिरणीवर पोहोचायला उशीर होई. मग धान्य दळून घरी पोहोचायला बरीच रात्र होई. घरी जाण्याचा रस्ता निर्जन व जंगलातून होता. या जंगलात सैनिक असतात आणि ते एकट्या भेटलेल्या निग्रो मुलाचे कान कापतात असं मला सांगितलेलं होतं. त्यामुळे माझी आणखीनच घाबरगुंडी उडे. शिवाय घरी उशिरा पोहोचल्यामुळे ओरडून घ्यावे लागे किंवा फटकेही बसत असत, ते निराळेच!

गुलामीत असेपर्यंत मी शाळेत गेलो नाहीच. पण बऱ्याचदा मी माझ्या छोट्या मालकिणीबरोबर तिची पुस्तके घेऊन शाळेच्या दरवाजापर्यंत गेल्याचे आठवते. शाळेत शिकत असलेल्या मुला-मुलींना पाहून आपणही शाळेत जाण्याचा आनंद अनुभवावा असे मला वाटू लागले.

२.

सकाळची वेळ होती आणि आई गुडघे टेकून प्रार्थना करीत होती की, ‘लिंकन व त्याचे सैन्य यशस्वी होऊ दे. मला आणि माझ्या मुलांना स्वातंत्र्य मिळू दे.’ तिची प्रार्थना ऐकून मी जागा झालो आणि त्याचवेळी आपण ‘गुलाम’ आहोत याची जाणीव मला झाली, हे मला स्पष्टपणे आठवतंय. पुस्तके व वर्तमानपत्रे वाचता न येणाऱ्या निरक्षर, अडाणी अशा गुलामांना देशात चाललेल्या चळवळीविषयी, महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रश्नांविषयी कशी माहिती मिळत होती, हे मला कधीच कळले नाही. गॅरिसन व लव्हजॉय यांनी मुक्तिसंग्रामाची चळवळ सुरू केल्यापासून दक्षिणेतील गुलाम त्याविषयी माहिती करून घेत. यादवी युद्धाच्या तयारीच्या वेळी व युद्ध सुरू असताना मी लहान होतो; पण रात्री उशिरापर्यंत आई व वाडीतील इतर गुलामांच्यात याविषयी चालू असलेली कुजबुज मला चांगलीच आठवतेय. त्यांना या परिस्थितीची जाण होती आणि ते वाइन पिता पिता, गप्पा मारताना एकमेकांना त्या चळवळीविषयी सांगत असत.

लिंकन राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून उभे होते. त्या वेळी मोठ्या शहरांपासून दूर आणि वर्तमानपत्रे मिळत नसलेल्या गावांमध्येही गुलामांना निवडणुकीची माहिती असे. दक्षिण व उत्तर अमेरिका यांच्यामध्ये युद्ध होण्याच्या इतर कारणांबरोबर मुख्य कारण ‘गुलामी’ हेच होते आणि हे सर्व गुलाम जाणून होते. उत्तरेकडील लोक जर जिंकले तरच आपली गुलामीतून मुक्तता होईल हे वाडीतील अगदी अडाणी माणसालाही समजून चुकले होते. फेडरल गटाच्या प्रत्येक विजयाचे व को-फेडरल गटाच्या प्रत्येक पराभवाचे अत्यंत बारकाईने निरीक्षण केले जाई. लढाईतील निकालाच्या बातम्या गोऱ्या माणसांच्या आधी, टपाल आणण्यासाठी पोस्टात पाठवलेल्या काळ्या माणसांना कळायच्या. आमचे डाकघर वाडीपासून तीन मैलांवर होते आणि टपाल आठवड्यातून दोनदा यायचे. गोरे लोक टपाल घेतल्यानंतर युद्धातील बातम्यांविषयी डाकघराबाहेर चर्चा करीत. टपाल आणण्यासाठी गेलेला माणूस गोऱ्यांचे संभाषण ऐकण्यासाठी तेथेच रेंगाळत असे. आमचा माणूस टपाल आणल्यावर गुलामांना त्याला कळलेल्या बातम्या सांगायचा.

३.

आमच्या लहानपणी आम्ही कधीही घरंदाज माणसांप्रमाणे एकत्र प्रार्थना केल्याचे वा एकत्र जेवल्याचे मला आठवत नाही. व्हर्जिनियातील वाडीत मुकी जनावरे जशी खाणे खात, तसेच आम्ही लहान मुले जेवत असू. जेवण म्हणजे कधी भाकरीचा तुकडा व उरलेले मटण किंवा एक कप दूध आणि थोडे बटाटे. काही वेळा आमच्या घरातील माणसे एकाच पसरट भांड्यात जेवत. काही जण कथलाची थाळी पायावर ठेवून जेवत, तर काही जण हातातच भाकरी व मटण घेऊन खात असत. मी मोठा झाल्यावर मला जेवणाच्या वेळी मोठ्या घरात पंखा फिरवून माशा हाकलायला जावे लागे. त्या वेळी गोऱ्यांमध्ये स्वातंत्र्य व लढाईवर चर्चा होत असे आणि ती मला बऱ्यापैकी समजत असे. एकदा काही स्त्रिया सुंठीचा केक खात असताना मी पाहिले. तो केक ही माझी अतिशय आवडीची व हवीहवीशी वाटणारी गोष्ट. मी लगेच ठरविले की, मी मुक्त झालो, की त्या स्त्रियांप्रमाणे सुंठीच्या केकचा आस्वाद घेईन.

युद्ध लांबत चालल्यामुळे गोऱ्या माणसांनाही अन्न मिळणे मुश्कील होऊ लागले. गुलामांचे अन्न मक्याची भाकरी व डुकराचे मटण इतकेच असल्याने त्यांना अन्नाची कमतरता पडत नसे; कारण या वाडीत पैदा होणाऱ्या गोष्टी होत्या. परंतु, गोऱ्यांना लागणारा चहा, कॉफी, साखर इ. वाडीत तयार होत नसल्याने व युद्धामुळे त्यांना मिळणे दुरापास्त होई. गोऱ्यांना ते संकटच वाटे. भाजलेले मके कॉफी पावडरसाठी व काळी काकवी साखर म्हणून वापरावी लागे. बऱ्याच वेळा चहा व कॉफी अगोडच प्यावी लागे.

४.

मी वापरलेली पहिली चप्पल लाकडाची होती. वरचे चामडे खडबडीत व जोड्याचा तळ एक इंच जाड लाकडाचा बनवलेला होता. हे जोडे घालून चालताना भयानक आवाज यायचाच, पण त्याहीपेक्षा त्याच्या वजनामुळे चालणे फारच त्यासदायक होत असे. त्या चपला पायात घातल्यावर माझं ध्यान वेगळचं दिसायचं. तागाचा शर्ट घालायला लागणे हा गुलामांच्या आयुष्यातील सर्वांत वाईट अनुभव! व्हर्जिनियात गुलामांनी तागाचे कपडे घालणे नित्याचेच होते. आमचे कपडे ज्या तागापासून बनवत ते टाकाऊ, स्वस्त व जाडेभरडे असे. तागाचा नवीन शर्ट घालायचा म्हणजे दात उपटण्याइतके वेदनादायक असे. शरीरात शेकडो टाचण्या टोचाव्यात असे वाटे. त्या शर्टामुळे होणारा त्रास मला आजही आठवतो. माझे शरीर मऊ व नाजूक असल्यामुळे अधिक त्रास होई. माझ्यापुढे तागाचे कपडे घालणे किंवा उघडे रहाणे एवढाच पर्याय असता, तर मी ते कपडे न घालता उघडे रहाणेच पसंत केले असते. मात्र, माझा भाऊ जोन माझा नवीन शर्ट आधी वापरायचा, त्याचे काटे मोडल्यावर बरेच दिवस मी तो शर्ट वापरत असे. माझ्या भावाने माझ्यासाठी केलेली ही फारच चांगली गोष्ट होती.

५.

जर गोऱ्यांच्या युद्धात दक्षिणेला विजय मिळाला असता तर निग्रोंना गुलामीतच खितपत पडावे लागले असते. त्यामुळे आमच्या जातीत गोऱ्यांविषयी आत्यंतिक द्वेष होता. मात्र, आमच्याकडील व दक्षिणेकडील निग्रोंना त्यामानाने चांगली वागणूक मिळत असे. त्यामुळे त्यांच्याबाबतीत हे फारसे खरे नव्हते. यादवी युद्धात आमचा एक मालक मरण पावला आणि दोघे जण भीषण जखमी झाले तेव्हा व मार्स बिली वारला तेव्हा सर्व गुलाम अतिशय शोकाकुल झाले होते. हे दु:ख अगदी खरेखुरे होते. मार्स बिलीचे काहींनी संगोपन केले होते, तर काही तो लहान असताना त्याच्याबरोबर खेळले होते. मालक व मुकादम जेव्हा गुलामांना मारत तेव्हा मार्स त्यांच्यासाठी दयायाचना करी.

६.

दोन तरुण मालकांना जेव्हा जखमी अवस्थेत घरी आणले, तेव्हा त्यांच्याविषयी गुलामांनी सहानुभूतीच दाखवली. त्यांच्या नातलगांप्रमाणेच त्यांनी त्यांची शुश्रूषा केली. काहींनी रात्री त्यांच्याजवळ राहून त्यांची सेवा करण्याची तयारी दर्शवली. मालकांना व गुलामांना एकमेकांविषयी सहानुभूती वाटत होती. गोरे लोक युद्धावर गेले असता वाडीवर त्यांच्या बायका-मुलांचे रक्षण गुलाम प्राणपणाने करत. मोठ्या घरात पुरुष युद्धावर गेल्यावर झोपण्यासाठी ज्या गुलामाची निवड होई, तो स्वत:ला धन्य समजे. रात्री धाकट्या किंवा मोठ्या मालकिणीला कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास त्याला त्या गुलामाशी दोन हात करावे लागत. काही वेळा माझे जातभाई विश्वासघातही करत, पण फारच क्वचित!

माझ्या वंशातील लोकांना युद्धापूर्वी किंवा युद्धानंतर गोऱ्यांविषयी कडवेपणा नव्हता. बऱ्याच वेळा युद्धात जखमी झालेल्या त्यांच्या मालकांची निग्रोंनी चांगल्या प्रकारे काळजी घेतली. आपल्या पूर्वीच्या मालकांच्या कुटुंबीयांना पैशांची आणि शिक्षणासाठी मदत केल्याचे मला माहिती आहे. व्यसनाधीनतेमुळे दक्षिणेकडील मोठ्या वाडीच्या गोऱ्या मालकाचा मुलगा दरिद्री झाला व आपला आत्मविश्वास गमावून बसला. निग्रो लोकांनी स्वत:च्या दारिद्रयाची पर्वा न करता त्याच्या खाण्यापिण्याची सोय केली. खरं तर त्यांच्याकडील कोणतीच गोष्ट त्याच्या लायकीची नव्हती. मालकाला ओळखत होते ते सर्व आपल्याकडील चीजवस्तू संपेपर्यंत त्याला मदत करत.

अलीकडेच मला व्हर्जिनियात गुलाम असलेला माणूस ओहायो राज्यातील एका शहरात भेटला. त्याने आपल्या मालकाबरोबर स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यापूर्वी एक करार केला होता. त्यानुसार मालकाला दरवर्षी ठरावीक रक्कम द्यायची व आवडेल तेथे मजुरी करायची. ओहायोमध्ये चांगली मजुरी मिळत असल्यामुळे तो तेथे गेला. जेव्हा स्वातंत्र्याची घोषणा झाली, तेव्हा तो मालकाचे ३०० डॉलर देणे लागत होता. स्वातंत्र्य मिळाल्यामुळे खरं म्हणजे तो आता काहीच देणे लागत नव्हता; पण तरीही तो दूरवर असलेल्या व्हर्जिनियाला गेला व व्याजासह सर्व रक्कम त्याने जुन्या मालकाला दिली. वास्तविक ती रक्कम देण्याची आवश्यकता नव्हती, तरीही मालकाला दिलेला शब्द त्याने पाळला. दिलेले वचन पाळूनच स्वातंत्र्य चांगल्या प्रकारे उपभोगू असे त्याला वाटत होते.

यावरून आपला असा समज होईल, की गुलामांना स्वातंत्र्य नकोच होते आणि गुलामीतच खितपत पडायचं होतं, हे खरं नाही. गुलाम असलेल्या माझ्या देशाविषयी मला मनापासून कणव वाटते. आम्हाला गुलामीत ठेवणाऱ्या दक्षिणेकडील गोऱ्यांबद्दल माझ्या मनात आकस नाही. सरकारनेच गुलामी प्रथेला खतपाणी घातले. एकदा ही प्रथा देशाच्या आर्थिक व सामाजिक जीवनात घट्ट रुतून बसली, की ती उपटून काढणे सोपे नाही हे माझ्या लक्षात आले. गुलामी ही क्रूर व अनैतिक होती यात शंकाच नाही. तरीही गुलामीत खितपत पडलेल्या अमेरिकेतील एक कोटी निग्रो माणसांची ऐहिक, बौद्धिक, नैतिक आणि धार्मिक स्थिती जगातील इतर काळ्या लोकांपेक्षा बरीच चांगली व आशादायी आहे. ज्यांनी पूर्वी गुलामी सहन केली असे निग्रोच आता त्यांच्या जन्मभूमीत, आफ्रिका खंडात आपल्या बांधवांचे जीवन सुधारण्यासाठी जातात. गुलामीचे समर्थन करण्याचा माझा मानस नाही. मी तर गुलामी दोषास्पदच मानतो. अमेरिकेत या प्रथेची सुरुवात आर्थिक व स्वार्थी हेतूनेच झाली. त्यामध्ये उदात्त हेतू नव्हताच. तर या गोष्टी पाळायला लावण्यात देवाचाच काहीतरी हेतू असावा असे मला वाटते. इतकी हलाखीची परिस्थिती असूनही आपल्या जातीचे भवितव्य उज्ज्वल आहे असे आपल्याला कसे वाटते, असा प्रश्न मला वरचेवर विचारला जातो. तेव्हा या रानटी अवस्थेतून ईश्वरानेच आम्हाला बाहेर काढले असावे याचे मी त्यांना स्मरण करून देत असतो.

७.

काळ्या लोकांना गुलामीमुळे भरपूर हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. आज मात्र गोऱ्या माणसांप्रमाणे सर्व काही त्यांना मिळाले, हाच विचार माझ्या मनात वारंवार येतो. या हालअपेष्टा निग्रोंनाच सहन कराव्या लागल्या असे नाही तर वाडीवर राहणाऱ्या गोऱ्यांनासुद्धा त्याचा त्रास भोगावा लागला. गुलामी ही जशी त्रासदायक प्रथा होती, तशीच ती एक प्रकारच्या न्यूनत्वाची व कमीपणाची खूण होती. वाडीवरील दोनही जातीतील लोक कष्टातून सुटका मिळवण्याचे मार्ग शोधत. आमच्या वाडीवरील बरेचसे गुलाम गोऱ्यांकडून आत्मविश्वास व स्वावलंबन शिकत. माझ्या जुन्या मालकाला बरीच मुले होती; पण त्यांपैकी कोणीही उत्पादन केंद्रातील कामात विशेष प्रावीण्य मिळवलेले नव्हते. मुलींना स्वयंपाक करणे, शिवण काम किंवा घरकाम यातील काहीच जमत नव्हते. त्यामुळे ही सर्व कामे गुलामच करत. गुलामांना वाडीवरील जीवनात भाग घेता येत नसे. त्यातच त्यांच्या अज्ञानामुळे ते कुशलतेने कामे करू शकत नसत. त्यामुळे कुंपणे दुरुस्त करायची राहात, दरवाजे बिजागऱ्यांतून निसटून अर्धवट लोंबकळत, दरवाजे मोडलेले, खिडक्यांची झडपे पडलेल्या अवस्थेत असत आणि शेतात सगळीकडे गवत माजलेले असे.

काळ्या व गोऱ्या लोकांना अन्नाची ददात नव्हती; पण घरे सुंदर, आकर्षक व आरामदायी बांधण्याची दृष्टी त्यांच्याकडे नव्हती. अन्न व इतर गोष्टी वाया जात असत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गुलाम मालकासारखेच जीवन जगू लागले होते; पण ना ते मालमत्तेचे धनी बनले, ना त्यांनी शिकण्यामध्ये आणि उद्योग धंद्यांमध्ये रस घेतला. कष्टाची कामे करण्यातही त्यांना कमीपणा वाटे. अर्थात, त्याला काही अपवाद होतेच. शेवटी यादवी युद्ध एकदाचे संपले आणि आम्ही स्वतंत्र झालो. वाडीवरील सर्वांसाठी तो अत्यंत आनंदाचा दिवस होता.

‘स्वातंत्र्य मिळणार’ अशा वावड्या गेले काही महिने निघत होत्या. युद्धावरून माघारी आलेले सैनिक दररोज त्यांच्या घरी परत जात होते. ज्यांना मुक्त केले होते व ज्यांनी प्रतिज्ञापत्र मान्य केले होते असे सैनिक आमच्या वाडीवरून जात. ग्रेपवाइन तारयंत्र (द्राक्षबागेतील मजुरांची कुजबुज) अहोरात्र चालू होती. वाडीवाडीत बातम्या गुपचूप पोहचवल्या जात. मूळ रहिवाशी चोरून नेतील या भीतीने मोठ्या घरातून मौल्यवान चिजा मातीत पुरून ठेवल्या जात आणि विश्वासू गुलामांना त्यावर पाळत ठेवण्यास नेमले जाई. जो कोणी पुरलेला ऐवज शोधण्याचा प्रयत्न करी, त्याचा छळ होत असे. गुलाम, लुटारू सैनिकांना खायला देत असत, पण पुरलेल्या खजिन्याचा थांगपत्ता लागू देत नसत.

स्वातंत्र्य मिळणार या कल्पनेने गुलामांच्या वसाहतीत जोरात गाणी ऐकू येऊ लागली. गाण्यांचा आवाज रात्री उशिरापर्यंत मोठमोठ्याने येत असे. ही गाणी स्वातंत्र्यावर आधारित होती. अशी गाणी पूर्वीही म्हटली जात. आता त्यांची भीती संपली होती आणि या गाण्यातील स्वातंत्र्य त्यांच्यासाठीच होते.

स्वातंत्र्य मिळण्याच्या आदल्या रात्री मोठ्या घरात सकाळी काहीतरी अघटित घडणार आहे, अशी बातमी गुलामांच्या वसाहतीत पसरली. त्या रात्री कोणाचाही डोळ्याला डोळा लागला नाही. सर्वत्र आशादायी व उत्साही वातावरण होते. दुसऱ्या दिवशी सकाळी तरुण व म्हाताऱ्या गुलामांना मोठ्या घरासमोर जमण्याचा आदेश आला. आई-भाऊ-बहीण व इतर गुलामांबरोबर मी मालकाच्या घरी गेलो. मालकाच्या घरातील सर्व कुटुंबीय घराच्या व्हरांड्यात जमले होते. तेथून समोर काय चाललंय ते स्पष्ट दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता व थोडे दु:खही दिसत होते; पण कडवेपणा मात्र दिसत नव्हता. ते मालमत्ता जाणार म्हणून नव्हे तर इतकी वर्षे जवळ राहिलेले लोक दूर जाणार म्हणून ते दु:खी होते. तेथे सरकारी अधिकाऱ्यांनी भाषण केले व स्वातंत्र्याचा जाहीरनामा वाचून दाखवला. आता आम्ही आपापल्या मर्जीनुसार कधीही व कोठेही जाऊ शकणार होतो, हे जेव्हा माझ्या आईला समजले तेव्हा तिने सर्व मुलांचे पापे घेतले व तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. हे सर्व तिने आम्हाला समजावून सांगितले. हा दिवस आपल्याला पहायला मिळेल याची मात्र तिला खात्री नव्हती.

सर्वांनी आनंदाने एकमेकांना मिठ्या मारल्या. सगळे अगदी खूश होते. मालकांविषयी कडवटपणा नव्हता. गुलामांना खरे तर त्यांच्याविषयी सहानुभूतीच होती. मुक्त झालेल्या निग्रोंचा हा आनंद फारच थोडा वेळ टिकला. ते जेव्हा त्यांच्या खोलीत आले तेव्हा त्यांना वास्तविकतेची जाणीव झाली. अचानक पडलेल्या जबाबदारीने आणि मुलांच्या भविष्याच्या काळजीने ते अस्वस्थ झाले. घर, राहणीमान, मुलांचे संगोपन, शिक्षण, नागरिकत्व व चर्चची स्थापना हे सर्व प्रश्न त्यांच्यासमोर ‘आ’ वासून उभे राहिले. त्यामुळे गुलामांच्या वसाहतीत उदासीनता पसरली. आता ही सर्व जबाबदारी आपल्यावर पडणार म्हणून स्वातंत्र्य फारच गंभीर वाटत होते.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4714/Dasyatun-Mukti

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pilawanachaa Baap Mumbaikar

Fri , 08 February 2019

गाम्या, बाळा, व्हॉट्सऍपवरचा इतिहास एवढा सिरीयसली नसतो घ्यायचा. जा, काहीतरी कामधंदा कर.


???? ????????? ??? ???????

Fri , 08 February 2019

गाम्या, बाळा, व्हॉट्सऍपवरचा इतिहास एवढा सिरीयसली नसतो घ्यायचा. जा, काहीतरी कामधंदा कर.


Gamma Pailvan

Fri , 25 January 2019

वाचकहो, अमेरिकी गुलामी काळ्यापांढऱ्या रंगात रंगवता येत नाही हे उपरोक्त उताऱ्यावरनं दिसतं. गोरा मालक काळी बाई विकत घेऊन तिच्यापासनं संतती उत्पन्न करीत असे. त्या काळी काळ्या गुलामापेक्षा अर्धकाळ्या किंवा निमगोऱ्या गुलामास अधिक किंमत मिळे. पूर्ण काळे गुलाम फक्त अंगमेहनत करण्यापुरते असंत. त्यांना खायलाही अधिक लागे. तसेच त्यांना इतर कामे जमंत नसंत. त्यामानाने निमगोरे गुलाम चटकन प्रशिक्षित होत. ते मालकाच्या आजूबाजूस राहून त्यांचे स्वीय चाकर बनंत. उपरोक्त बुकरचं अंग नाजूक होतं ते त्याच्या गोऱ्या बापामुळे. त्यानं स्वीय चाकरीची कामं शिकून घ्यावी अशी अपेक्षा असणार. मात्र आईला त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष न देता आल्यामुळे त्याची आबाळ झाली. गुलामी असली तरी खाण्यापिण्याची ददात नसे. भंपक कम्युनिस्ट विचार नसल्याने काळ्यांनी गोऱ्यांची सरसकट कत्तल उडवली नाही. एकंदरीत मूल्यमापन करता युरोपातल्या गोऱ्या कामगाराची वा वेठबिगाराची जशी परिस्थिती होती तशीच किंवा जरा बरी परिस्थिती काळ्या गुलामांची होती. पुढे युरोपात हे संबंध भांडवलशाही मालक व कष्टकरी कामगार असे रुपांतरीत झाले. त्यासाठी युरोपीय प्रबोधनाने ( = renaissance ने ) हातभार लावला. मात्र तसं प्रबोधन काळ्यांमध्ये घडून आलं नाही. नाही म्हणायला काही काळ्या विचारवंतांनी Back to Africa अशी चळवळ सुरू केली, पण तिला प्रतिसाद मिळाला नाही. असो. सर्वात पहिले गुलाम झाले ते काळे नव्हते. ते अमेरिकेत जबरदस्तीने नेलेले आयरिश कॅथलिक गोरे गुलाम होते. पुढे काळे गुलाम पकडून नेणं सोयीचं वाटल्याने गोरी गुलामी कमी होत गेली. काळ्या लोकांची गुलामी कमी होत गेली कारण ईस्ट इंडिया कंपनीस भारतीय गुलाम मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ लागले. एकोणिसाव्या शतकात काळू गुलामांच्या जागी भारतीय गुलाम दिसू लागले. मॉरिशस, कॅरेबियन बेटे (व जवळचा दक्षिण अमेरिकेचा किनारा), दक्षिण आफ्रिका, इत्यादि ठिकाणी भारतीय गुलामांच्या मोठ्या वसाहती वसवल्या गेल्या. एका अर्थी अमेरिकी काळी गुलामी संपावयास भारतीय गुलामांची उपलब्धी कारणीभूत झाली. असो. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......