भारतीय एकजिनसतेला उदध्वस्त करणाऱ्या राजवटीचा हिशेब चुकता करण्याचे ‘वर्ष’ आले!
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार
  • Thu , 27 December 2018
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar राहुल गांधी Rahul Gandhi काँग्रेस Congress भाजप BJP नरेंद्र मोदी Narendra Modi

स्वतंत्र भारताच्या प्रगतीबाबत गेल्या ७० वर्षांत विविध मतमतांतरं राजकीय तसंच विविध पटलांवर मांडली गेली. तशी ती मांडली जाणं, सत्ताधाऱ्यांनी ती ऐकणं, प्रतिवाद करणं, ही लोकशाही प्रक्रिया या ७० वर्षांत देशात चालूच होती. या काळात विविध पक्षांची, आघाड्यांची सरकारं आली आणि गेली. मत, मुद्दा मांडू न देणं, सत्तेला अभेद्य कवच तयार करण्याचं काम जेव्हा आणीबाणी लादून इंदिरा गांधींनी केलं, तेव्हा जनतेनं या एकेकाळी प्रचंड लोकप्रिय नेतृत्वास पक्षासह पदच्युत केलं. हा इतिहासही ७० वर्षांतील या देशातील मजबूत लोकशाहीचा.

२०१४ साली स्पष्ट बहुमतानं सत्तेवर आलेल्या मोदी सरकारनं या देशाचा ७० वर्षांचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक अशा सर्वच क्षेत्रांतला भलाबुरा विकास नाकारण्याचा, पुसून टाकण्याचा घमेंडखोर मार्ग अनुसरला.

जनतेनं दिलेलं बहुमत मला आहे, पक्षाला नाही. त्यामुळे हे भाजप किंवा मित्र पक्षांचं सरकार नव्हे, तर मोदी सरकार आहे, अशी अत्यंत आत्मकेंद्री भूमिका या नेतृत्वानं घेतली आणि त्याच्यामागे मित्रपक्ष आणि केडरबेस राजकीय पक्षही फरफटत गेला.

या देशानं जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांसारखे स्पष्ट बहुमतातले लोकप्रिय पंतप्रधान अनेक दशकं पाहिले. मात्र त्यांची सरकारं काँग्रेसची सरकारं होती. जवाहर किंवा इंदिरा सरकार नव्हे. एवढंच कशाला, देशातलं पहिलं गैरकाँग्रेसी सरकार असलेलं एनडीएचं सरकार कधीही वाजपेयी सरकार म्हणून बिंबवलं अथवा प्रसिद्धीमाध्यमांत नाचवलं गेलं नाही. विनम्रता आणि समंजसपणा गुंडाळून ठेवतच मोदी सरकार सत्तेवर आलं.

जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, (काही प्रमाणात) राजीव गांधी यांनी जशी लोकप्रियता व बहुमत लाभलं होतं, तसंच ते नरेंद्र मोदींना लाभलं. पण हे यश खूपच लवकर त्यांच्या मस्तकात गेलं. त्यामुळे लोकसभेत प्रथम प्रवेश करताना पायऱ्यांवर नतमस्तक होण्याची ‘नौटंकी’ ब्रेकिंग न्यूज पुरतीच राहिली.

गेली साडेचार वर्षं मोदींनी ना संसद जुमानली, ना मंत्रीमंडळ, ना विरोधी पक्षांसोबतच्या संसदीय परंपरा पाळल्या, ना कुठलं उत्तरदायित्व जनतेसमोर येऊन घेतलं. ते जनतेसमोर आले, पण फक्त निवडणूक प्रचारसभा, भूमिपूजन अथवा लोकार्पण सोहळे किंवा मग स्वत:कडेच एक प्रभूपद घेत ‘आकाशवाणी’ करत राहिले. इतका स्वमग्न व स्वप्रतिमा धन्य असलेला नेता ७० वर्षांत भारतानं पाहिला नव्हता. मोदींसमोर त्या जगप्रसिद्ध नीरोनंही फिडेल खाली ठेवलं असतं!

जयललिता, मायावती अथवा ममता, उमा भारती यांच्या स्त्रीहट्टाबाबत खूप लिहिलं-बोललं गेलं. बालहट्ट म्हणून त्याची टिंगलही करण्यात आली. पण मोदींनी या सगळ्या जणींना मागे टाकलं आहे. पण मणके गहाण टाकून बसलेले भाजपीय आणि प्रमुख माध्यमं यामुळे टीकेचा एक स्वर चार-साडेचार वर्षांत ऐकू आला नाही. परवाच्या तीन राज्यांतल्या पराभवानंतर आता काहींना कोंब फुटू लागलेत. माध्यमांची घाऊक खरेदी केलेले भांडवलदारही आता हवा बघून तंबू बदलतील, तेव्हा पत्रकार बिरुदाखाली दरबारी श्वान झालेल्यांच्या शेपट्या नव्या सत्तेपुढे हलू लागतील. मोदी सरकारनं भारताची ७० वर्षांची जी एकजिनसता होती, तीच उदध्वस्त केली. आणीबाणीनंतर आलेल्या जनता पार्टी सरकारनंही केला नाही, इतका द्वेष मोदी काँग्रेस व त्यांच्या नेतृत्वाचा सातत्यानं करत आले. त्यांच्या हाती असतं तर त्यांनी नेहरू-गांधी ही आडनावंच बाद केली असती इतका विद्वेष!

मोदी ज्या संघ परिवाराचे आहेत, त्या परिवाराला गांधी-नेहरू घराणं, त्यांचा प्रभाव, त्यांचं कर्तृत्व आणि त्यांची लोकप्रियता याबद्दल कायम असूया वाटत आलेली आहे. जवाहरलाल नेहरू हे देशातले पहिले (कदाचित जगातलेही) पंतप्रधान होते, ज्यांनी जवळपास तीन-चार दशकं या देशातील मुलांनी ‘चाचा नेहरू’ म्हणून संबोधलं. त्यांचा जन्मदिन ‘बालदिन’ म्हणून गौरवला गेला. त्यासाठी त्यांच्या सरकारनं अथवा पक्षानं पुस्तकं काढून माथी मारली नाहीत, तर तेव्हा चौदा भाषांत प्रकाशित होणाऱ्या लोकप्रिय ‘चांदोबा’ मासिकात चाचा नेहरूंची छबी आणि मजकूर प्रसिद्ध होत असे. ‘चांदोबा’ला सरकारी जाहिरातीची गरजही नव्हती.

नेहरूंची लोकप्रियता फक्त मुलांमध्ये नव्हती, तर ‘नियतीशी करार’ या जगप्रसिद्ध भाषणातून आणि पुढे रशियाशी जुळवून घेत डावीकडे किंचित झुकलेलं धोरण, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातला खानदानीपणा, शांतीदूत कबुतर आणि गुलाब ही त्यांना चिकटलेली प्रतीकं यातून ‘नेहरूप्रणीत रोमँटिसिझम’ अशी व्याख्याच राजकारणापासून साहित्य-कला यात तयार झाली. राज कपूर, के. ए. अब्बास याशिवाय प्रगतीशील लेखक संघानं नव्या भारताची स्वप्नं पाहताना ‘नेहरूप्रणीत रोमँटिसिझम’ची त्यावर छाया होती. त्यामुळेच नारायण सुर्वेसारखा लाल बावट्याचा कवीही ‘नेहरू गेले तेव्हाची गोष्ट’ नावाची कविता लिहितो. आणि एका सार्वत्रिक संवेदनेचं चित्रण करतो. ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ किंवा ‘इंदिरेस पत्र’ लिहिणारे नेहरू बाप-लेकीचं समृद्ध नातं निर्माण करणारे विचारी, प्रागतिक व विज्ञानवादी व्यक्ती होते. आपल्या व्यक्तिगत जीवनाचे तपशील सोयीनं भरणाऱ्या, अहंगंडानं भरलेल्यांना नेहरू कळायला सात जन्म घ्यावे लागतील. एकदा विद्वेषाच्या विचारधारेचेच स्वयंसेवक झाल्यावर मग हे असंच होणार!

संघ परिवारातून येणाऱ्यांचा गांधी-नेहरू द्वेष इतका असतो की, मागे एनडीए सरकार असताना एका प्रश्नाला उत्तर देताना प्रमोद महाजन किंचित चिडून म्हणाले होते, ‘राष्ट्राला राष्ट्रपिता वगैरे असा कुणी नसतो!’ आता संघ परिवार किंवा भाजप किंवा मोदी कितीही गांधीप्रेम दाखवत असले तरी गांधी त्यांना पचायला जडच आहे. याला उतारा म्हणून मोदींनी वल्लभभाई पटेल आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाचा, कर्तृत्वाचा दुरुपयोग करायला सुरुवात केली. त्यातून नाही म्हणायला गुजरात पुतळा एवढीच काय ती उपलब्धी. बाकी ‘नेताजी’बार ममतांनी निकालात काढला. तरीही मोदींचा नेहरू, गांधीद्वेष ‘काँग्रेस की विधवा’ या स्तरावर येऊन पोहचला. आजही काँग्रेस, गांधी परिवार यांना दूषणं दिल्याशिवाय मोदींचा दिवस ना सुरू होत, ना संपत.

हे झालं राजकीय मैदानातलं. पण प्रत्यक्ष कारभारातही मोदींचा हडेलहप्पी स्वभाव, भूमिकांची अदलाबदल, सोयीस्कर विस्मृती आकडेवारींचं जंजाळ याच्यापलीकडे काहीही हाताशी लागत नाही.

मुख्यमंत्री असताना मोदींनी ज्या एफडीए, आधार, जीएसटी या धोरणांना तीव्र विरोध केला, तीच धोरणं पंतप्रधान झाल्यावर जणू काही आपलीच धोरणं आहेत, या मिजाशीत सादर केली. काँग्रेस, गांधी-परिवाराबद्दल त्यांचा द्वेष पाहता, या योजनांचं श्रेय त्यांना देणं शक्यच नव्हतं, पण मनमोहन सिंग किंवा नरसिंहरावांची दखल घेण्याची परिपक्वता ते दाखवतील ही अपेक्षाही नव्हतीच. याउलट देशाला गर्तेत घालणाऱ्या नोटबंदीवर संसदेत अभ्यासपूर्ण भाषण करणाऱ्या मनमोहन सिंगांना पाकिस्तान सोबत कटकारस्थानाच्या आरोपात गोवून समाजमाध्यमांतून त्यांना ‘देशद्रोही’ ठरवण्याचं कंत्राट पगारी बिगारी नेमून भाजपनं केलं. पुढे सर्व आकडेवाऱ्या प्रसिद्ध झाल्यावर सरकारला झाकपाक करता करता नाकी नऊ आले, पण प्रधानसेवकांचा टेंभा वरच!

२०१४पासून मोदींना पर्याय कोण? अशी सहेतूक चर्चा घडवण्यात येऊ लागली. आणि ‘राहुल गांधी का?’ असं विचारत मोदींना कसा पर्याय नाही असं बिंबवलं जाऊ लागलं. असल्या चर्चांना रात्रीत संसार बदलणारे नीतीशकुमारांसारखे समाजवादी ‘२० वर्षं मोदींना कुणी हरवू शकत नाही’ असं म्हणत खमंग फोडणी देऊ लागले. एकेकाळी हेच नीतिशकुमार मोदींसोबत जायचं सोडा, एकत्र फोटो काढायला तयार नव्हते. त्यांनी मोदींचा मदतीचा चेक परत केला होता. मोदींप्रमाणेच नीतीशकुमारांनाही सोयीस्कर स्मृतीभ्रंशाचा आजार मोदींच्या संगतीनं जडलाय. माध्यमांद्वारे संपूर्ण राजकीय जीवन हास्यास्पद ठरवून अनेक खटल्यांत जन्मभरासाठी जायबंद करूनही लालूप्रसाद मोदी-नीतीशना पुरून उरले. तरीही लालूंनी दोन पावलं मागे घेत नीतीशकुमारांना सत्ता दिली, त्यांनी तिचा लिलाव केला! मोदी-शहांचे हे थैलीबाज राजकारण म्हणजे ‘सत्तातुराणाम ना भयं ना लज्जा’चा हातखंडा प्रयोग.

अशा या मोदींना पर्याय हवाच कशाला? मोदी ही व्यक्ती नाही तर एक प्रवृत्ती झालीय. सर्व संसदीय शस्त्राचं संरक्षण घेत, हुकूमशहा पद्धतीनं पक्ष व सरकार चालवण्याची प्रवृत्ती. ही प्रवृत्ती इंदिरा गांधींमध्ये होती, जयललिता-मायावतीतही दिसली. ही एकाधिकारशाही पक्ष बिनकण्यानं स्वीकारत असतील, पण जनता स्वीकारत नाही. तीन राज्यांतला पराभव हा स्थानिक नेतृत्वाचा नाही तर राष्ट्रीय नेतृत्वाचा आहे. गडकरींसारखा ज्येष्ठ मंत्री तो संदेश विविध विधानांतून पोहचवत आहे. परिणामी बिहार जागा वाटपात शहा चक्क पाच जागांची (त्याही निवडून आलेल्या!) आहुती देऊन आले. ही मित्रपक्षांबाबत मित्रता की भाजपची हतबलता? आता तर अपना दलसारखा छोटा पक्षही बोलू लागलाय.

त्यामुळे मोदींना पर्याय शोधण्यापेक्षा मोदींना पायउतार करणं हाच देशाची विस्कटलेली घडी नीट बसवण्यासाठीचा तरणोपाय आहे. कुणीही चालेल, पण मोदी सरकार नको, अशी तीव्र गरज आज देशाला आहे.

रिझर्व्ह बँक, सीबीआय, सर्वोच्च न्यायालय, विद्यापीठं, युजीसी, सांस्कृतिक क्षेत्र, सर्वच ठिकाणी अत्यंत निर्बुद्धपणे सुमारांची चलती करत मोदी सरकारनं ७० वर्षांत या देशानं बसवलेली घडी बेमुर्वतपणे उदध्वस्त केलीय. त्याचे दूरगामी परिणाम, त्यातली अंदर की बात, देवाणघेवाण हे सर्व हे सरकार पायउतार करून जेव्हा चौकशा सुरू होतील, तेव्हाच बाहेर येईल. सज्जनकुमारांच्या उदाहरणावरून मोदी-शहांनी योग्य तो धडा घेतलाच असेल. पण या दोघांच्या मनमानीनं देशाच्या एकजिनसीपणावर जो आघात झालाय, त्याची भरपाई सर्वांत प्रथम यांना मतपेटीतून पदच्युत करूनच सुरू करावी लागेल.

२०१४भले मोदी-शहांचं होतं, पण २०१९ मात्र १२५ कोटी सुजाण भारतीयांचं असेल. याच नववर्षाच्या शुभेच्छा!

...............................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

vishal pawar

Tue , 01 January 2019


Gamma Pailvan

Sat , 29 December 2018

संजय पवार, एका उत्कृष्ट लेखाबद्दल तुमचं अभिनंदन. असाच मोदींचा प्रचार करीत राहा. धन्यवाद! :-) आपला नम्र, -गामा पैलवान


Pravin Lanke

Thu , 27 December 2018

Monday, November 18, 2013 वेडगळपणाची परिसीमा Insanity: doing the same thing over and over again and expecting different results...........Albert Einstein पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका करीत रहाणे आणि नव्याने काही वेगळे घडेल अशी अपेक्षा बाळगणे; हा शुद्ध वेडगळपणा असतो, असे विख्यात वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाईन म्हणतो. भारतीय राजकारणात तरी निदान त्याचा अलिकडे वारंवार अनुभव येऊ लागला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, यांच्यावर विविध आरोप करण्यात आणि त्यांना गुजरातच्या सत्तेतून पदभ्रष्ट करण्यासाठी मागली दहा वर्षे अखंड प्रयास झाले आहेत. पण गुजरातमध्ये झालेल्या दंगली वा अन्य कुठल्याही बारीकसारीक प्रकरणात त्यांना गुंतवण्याचे अक्षरश: हजारो प्रयास निकामी झालेले आहेत. उलट त्यातूनच त्यांची आज देशव्यापी प्रतिमा उभी राहिली आहे. माध्यमे व त्यातील सेक्युलर पत्रकारांसह सेक्युलर पक्षांनी, मोदींना याप्रकारे आरोप ठेवून बदनाम करण्याचा उद्योग केलाच नसता, तर आज त्यांना गुजरातबाहेरच्या लाख दोन लाख लोकांनी तरी ओळखले असते किंवा नाही; याचीच शंका आहे. हा एक मुख्यमंत्री सोडून देशातील अन्य कुठल्या राज्यातील मुख्यमंत्री अन्य भागात इतका परिचित आहे का? नसेल तर कशाला परिचित नाही? मोदींच्या कारभाराचे बरेवाईट कौतुक होते, तसे अन्य कुणा मुख्यमंत्र्याचे का होत नाही? भाजपाचेच डॉ. रमण सिंग, शिवराज चौहान याही मुख्यमंत्र्यांचे काम मोदींच्या इतकेच कौतुकास्पद आहे, असे दावे करून त्यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार का केले नाही; असा सवाल मोठे पत्रकार भाजपाला विचारत असतात. मग त्यांनीच आधी उत्तर द्यावे, की त्या अन्य मुख्यमंत्र्यांबद्दल याच माध्यमांनी, अभ्यासकांनी, व विरोधकांनी आजवर मौन कशाला धारण केलेले आहे? त्या अन्य मुख्यमंत्र्यांवर आरोप वा त्यांचे कौतुक कशाला झाले नाही? उत्तर सोपे आहे. गुजरातच्या दंगलीचे निमित्त करून भाजपाला लक्ष्य करण्यासाठी माध्यमातून सेक्युलर मोहिम राबवली गेली. त्यातून मोदींवर खरेखोटे आरोप करण्यात आले. आज खोटे दाखले व घटना सांगितल्याचा मोदींवर सर्रास आरोप होतो. पण मागल्या दहा वर्षात मोदींवर खोटेनाटे आरोप झाले त्याचे काय? त्याचा खरेखोटेपणा कोणी कधी तपासला आहे काय? मोदींच्या भाषणाचा तपशील तपासणार्‍यांनी मोदींच्या विरोधात तपास चालू असताना, कुठला तरी सज्जड पुरावा का सादर केला नाही? म्हणजेच त्यांना प्रत्येक तपासानंतर क्लिन चीट देणार्‍या कोर्टांनी मोदींवर आरोप करणार्‍यांना साफ़ खोटे पाडलेले आहे ना? यातून मोदींवरचे आरोप नुसते खोटे पडले नाहीत किंवा त्यांनाच कोर्टाकडून निर्दोष असण्याचे प्रमाणपत्र लाभलेले नाही; तर पर्यायाने मोदींवर होत असलेले आरोप निव्वळ खोटारडेपणा असतो, हेच सिद्ध झालेले आहे. त्याचा परिणाम ‘लांडगा आला रे आला’ या गोष्टीसारखा झालेला आहे. आता मोदींवर कोणी खोटेपणाचा आरोप केला; मग तो ऐकणार्‍या सामान्य माणसाला तोच मोदींचा खरेपणा वाटू लागला आहे. त्यासाठी इतिहास वा साक्षीपुरावे देण्याचा कुठला उपयोग राहिलेला नाही. सतत तेच तेच खोटे आरोप करण्याच्या वेडगळपणाने मोदींना आज लोकप्रियतेच्या शिखरावर आणून बसवले आहे. मात्र त्या जुन्या व फ़सलेल्या डावपेचातून त्यांचे विरोधक व शत्रू बाहेर पडायला तयार नाहीत. बदनामीतून मोदी यांना रोखता येणार नाही, पराभूत करता येणार नाही, की संपवता येणार नाही, हेच दशकातला अनुभव सांगतो आहे. साक्षीदाराची विश्वासार्हता त्याने दिलेल्या पुराव्यापेक्षा अधिक महत्वाची असते. ती विश्वासार्हता गमावलेल्या मोदी विरोधकांना आपले डावपेच व रणनिती बदलल्याखेरीज मोदींचा अश्वमेध रोखता येणार नाही. चाणाक्ष राजकारणी असल्याने मोदी हे नेमके जाणून आहेत. म्हणूनच आपल्या भाषणात राहिलेली त्रुटी वा जाणूनबुजून घुसडलेले चुकीचे संदर्भ सुधारण्याचा प्रयासही मोदी करीत नाहीत. शेवटी त्यांना आपल्या विरोधकांचे समाधान करायचे नसून, मते मिळवण्यासाठी सर्वसामान्य जनतेची मने जिंकायची आहेत आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कलाने मोदी बोलतात, मुद्दे मांडतात. त्यातला खोटेपणा सांगण्यापेक्षा त्यांच्या विरोधकांनी जनमानसातून आपणच गमावलेला स्वत:चा खरेपणा पुन्हा नव्याने प्रस्थापित करण्याची गरज आहे. नुकतेच एक कुणा मुलीचे फ़ोन चोरून ऐकणे वा तिच्यावर पाळत ठेवण्याचे गुजरात पोलिस खात्याचे प्रकरण बाहेर आणले गेले आहे. त्यावर मोठाच गदारोळ चालू आहे. तसे हे प्रकरण क्षुल्लक आहे. याच प्रकारचे आरोप मनमोहन सरकारवर त्यांच्या अर्थमंत्री प्रणब मुखर्जी, दिग्विजय सिंग, मित्रपक्षाचे नेते प्रकाश करात किंवा विरोधी नेते अरूण जेटली यांनीही केलेले होते. तेव्हा कॉग्रेस पक्षाने आपल्याच सरकारच्या पापाची कुठली चौकशी केली व कोणाला शिक्षा दिलेली आहे? कुठलाही सत्ताधारी अशा किरकोळ चुका करतो किंवा गडबडी करीत असतो. स्त्रियांची सुरक्षा धोक्यात आल्याच्या गप्पा कॉग्रेसच्या महिला नेत्या मारत होत्या. त्यापैकी कितीजणी अकरा महिन्यांपुर्वी दिल्लीत सामुहिक बलात्काराची घटना घडल्यावर पिडीत मुलगी वा तिच्या कुटुंबाच्या मदतीला धावल्या होत्या? तिथेच त्यांची विश्वासार्हता रसातळाला गेलेली असते. त्यांनी मोदींवर असले शिळेपाके आरोप केल्याने मोदींना रोखता येणार नाही. उलट त्या फ़सलेल्या वेडगळपणातून बाहेर पडून आपण उत्तम कारभार करू शकतो आणि गुजरात व मोदींपेक्षा आपल्या पक्षाने व सरकारने उत्तम कारभार केला आहे; हे लोकांना पटवून देण्यात भले होईल. Posted by Bhau Torsekar


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......