जिथे झुंड असते, तिथे हिटलरचा जर्मनी असतो!
ग्रंथनामा - झलक
रवीश कुमार
  • रवीश कुमार आणि त्यांच्या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचं मुखपृष्ठ
  • Fri , 12 October 2018
  • ग्रंथनामा झलक रविश कुमार Ravish Kumar द फ्री व्हाइस The Free Voice सुनील तांबे Sunil Tambe

निर्भीड आणि नि:पक्षपाती पत्रकार रविश कुमार यांच्या ‘द फ्री व्हॉइस’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा पत्रकार सुनील तांबे यांनी मराठी अनुवाद केला आहे. मधुश्री प्रकाशनातर्फे हा अनुवाद प्रकाशित केला आहे. त्यातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

दिनांक ४ जुलै २०१७ रोजी पंतप्रधान मोदी यांनी इस्त्रायलच्या दौऱ्यावर असताना यॅदवाशेम या हॉलोकास्ट संग्रहालयाला भेट दिली. ही भेट दिल्याबद्दल आपण त्यांचे आभारच मानायला हवेत. त्या दुर्दैवी काळातील हत्याकांडामध्ये मरण पावलेल्या ज्यूंना त्यांनी श्रद्धांजली वाहिली आणि क्रूरकर्मा हिटलरच्या वारशाचा धिक्कार केला. त्यानंतर लगोलग मी हा निबंध लिहिला.

जेव्हा कुणी राष्ट्रप्रमुख अन्य राष्ट्रांना भेट देतात, तेव्हा या भेटी केवळ त्यांच्यापुरत्या नसतात. नागरिकांनाही त्यातून शिकण्याची संधी मिळते. मला स्वतःला तर त्यांचे विशेष आभार मानले पाहिजेत, कारण या त्यांच्या भेटीनंतर, मी मानवी इतिहासातील महत्त्लाच्या कालखंडाबाबत वाचन करण्याची संधी घेतली, विशेषतः त्यातील एका विशिष्ट घटनेबाबत वाचून मला वाटले की, यातून आजच्या भारताला आणि जगालाही शिकण्यासारखं खूप काही आहे. हे प्रकरण वाचणे आणि समजून घेणे हे तरुणाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचे आहे असे मी म्हणेन, कारण या घटना घडल्या त्यावेळी त्यांचा जन्मही झाला नव्हता. म्हणूनच त्यांनी आणि आपण सर्वांनीच हे जाणून घ्यायला हवं की, इतिहासातून काहीच न शिकलेले लोक, भविष्यातील अद्याप न लिहिल्या गेलेल्या इतिहासाचे मारेकरी बनतील.

९ आणि १० नोव्हेंबर १९३८ ची रात्र जर्मनीमधील सर्व काळरात्रीहूनही अधिक भयानक होती. त्या रात्रीला अजूनही ‘क्रिस्टल नाईट’ किंवा ‘नाइट ऑफ द ब्रोकन ग्लास’ (‘फुटक्या काचांची रात्र’) असंही म्हणतात. त्या रात्री ज्यूंच्या छळाचा नियोजनबद्ध कार्यक्रम – त्यांच्या कत्तली आणि त्यांची स्थावर-जंगम मालमत्ता हिरावून घेणं, त्यांना देशाबाहेर हद्दपार करणं, अंमलात आणण्यास सुरुवात झाली. 

१९३८ च्या अगोदरपासून ज्यू व्यापारी, उद्योजक यांना जर्मनीबाहेर हाकलण्याचा सुनियोजित कार्यक्रम सुरू झाला. ज्यू डॉक्टर्स, वकील यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला. पासपोर्टवर ‘ग’ हे इंग्रजी अक्षर लिहिण्याची सक्ती ज्यूंवर करण्यात आली. ज्यू पुरुषांनी ‘इस्त्रायल’ तर महिलांनी ‘सारा’ हे शब्द आपल्या नावापुढे जोडणं अनिवार्य करण्यात आलं, जेणेकरून ते ज्यू आहेत हे विनासायास कळावं. ज्यू लोकांच्या द्वेषाची साथ पसरवण्यात जर्मन विद्यापीठातील प्राध्यापकांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. ज्यूंचं चारित्र्य आणि मनोविश्लेषण वर्गामध्ये शिकवताना त्यांनी ज्यू लोक सैतानी वृत्तीचे आहेत असं विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवलं.  ज्यू लोकांना हुडकून त्यांचे मानवी अधिकार दडपून टाकण्याच्या कामात नोकरशाही व्यस्त होती. ज्यू लोकांची बाजू घेणाऱ्यांना पोलीस गजाआड करू लागले. सार्वजनिक उद्यानात ज्यूंना प्रवेश बंदी करण्यात आली. ज्यूंच्या दुकानात लोक खरेदी करेनासे झाले. दुकानाच्या पाटीवर, ‘ज्यू’ असं लिहिण्याची सक्ती ज्यू दुकानदारांना करण्यात आली होती. ट्रेनमध्येही ज्यू आणि जर्मन लोकांचे डबे वेगळे करण्यात आले. जर्मनीमध्ये पूर्वापार ज्यू आणि जर्मन एकत्र राहात होते. ज्यूंना वेगळं काढून त्यांच्या वेगळ्या वस्त्या शहराबाहेर उभारण्यात आल्या. त्याचा खर्च श्रीमंत ज्यू लोकांकडून वसूल करण्यात आला. ज्यूंच्या मालमत्तेचं-दुकानं, घरं, नुकसान झाल्यास त्यांना विमा कंपन्यांनी भरपाई देऊ नये, असे आदेश देण्यात आले. ज्यूंना समाजापासून अलग करण्याचे सर्व मार्ग चोखाळण्यात आले, जेणेकरून रस्त्यावरच्या झुंडींना त्यांना शोधणं सहज सोपं जावं.

अशा विविध प्रकारच्या हिंसेच्या गंभीर स्वरूपाच्या पण सुट्या सुट्या घटना १९३९ पर्यंत घडत होत्या. काही लोक या घटनांचे समर्थक होते तर काही विरोध करत होते. पण या काळातच हिंसक घटनांबाबत लोक बधीर झाले होते. भविष्यातील मारेकरी होण्यासाठी मानसिकदृष्ट्या त्यांची तयारी झाली होती. त्यांच्यावर थोपण्यात प्रचाराची उद्दिष्टं साध्य करण्यासाठी ते सिद्ध झाले होते. तोपर्यंत कोणत्या ना कोणत्या सैन्यदलात वा संघटनांमध्ये सामील होऊन हिटलरचा जयघोष करण्यामध्ये जर्मन तरुणांना अभिमान वाटू लागला होता. ते हिटलरचे भक्त बनले होते आणि हिटलरने हिंसेचं विष त्यांच्या मनांमध्ये भिनवलं होतं. हिटलरला पछाडणारा द्वेष त्यांचा झाला होता. त्यासाठी हिटलरला काहीही करावं लागलं नव्हतं. जर्मन लोकच सर्व काही करणार होते. जर्मन लोकांना काय हवं ते करण्यासाठी मुभा देणं एवढंच काम हिटलर आणि त्याच्या शासनाने करायचं होतं.

‘पुढच्या दशकात आपल्याला एका कमालीच्या संवेदनशील संघर्षाला सामोरं जावं लागणार आहे, हे आपण नीटपणे ध्यानी घ्यायला हवं. आजवर कुणीही ऐकलेला नाही असा तो संघर्ष असेल. हा केवळ देशांमधला संघर्ष नसेल तर त्यांच्यासोबत ज्यू, फ्रीमॅसन्स, मार्क्सवादी आणि चर्च यांच्या विचारधारांच्या विरोधातलाही लढा असेल. या सर्व शक्तींचा आत्मा ज्यूंमध्ये आहे, असा माझा विश्वास आहे. सर्व अभावग्रस्ततेचं मूळ ज्यू आहेत. जर्मनी आणि इटलीचा सर्वनाश झाला नाही तर आपला समूळ उच्छेद होईल असं ज्यूंना वाटतं. हा प्रश्न गेली काही वर्षं आपल्यापुढे आहे. ज्यूंना आपण जर्मनीबाहेर हद्दपार करू. कोणी कल्पनाही करणार नाही असा क्रौर्याचा अनुभव आपण त्यांना देणार आहोत.’ एसएसचा नेता, हाइन्रिश हिमलरने ९-१० नोव्हेंबर १९३८ च्या काही दिवस आधी संघटनेच्या इतर नेत्यांसमोर केलेल्या भाषणात हे जाहीर केलं, जेणेकरून ज्यूविरोधी हिंसाचारात ते हिरीरीने उतरावेत.

हिटलरचा प्रचारमंत्री जोसेफ गोबेल्स, अत्यंत विखारी आणि खुनी प्रवृत्तीचा होता. हिंसाचाराच्या बातम्या हिटलरला देण्याचे काम त्याचे होते. हिटलरचं मौन किंवा कधी मोहिमेची तीव्रता वाढवण्याचे तोंडी आदेश यामुळे कत्तल जारी ठेवण्याचे निर्देश सरकारी यंत्रणेला आपोआपच मिळत. अंमलबजावणी करण्यात जमाव आणि एसएस-शुस्टाफेल, या संघटनेचं युवक दल सामील होतं, ज्यांना महान जर्मनी, महासत्ता जर्मनी, युरोपीय सम्राट बनलेल्या बलशाली जर्मनीचं स्वप्न दाखवण्यात आलं होतं.

७  नोव्हेंबर १९३८ रोजी, जर्मनीचा एक राजनैतिक अधिकारी, अर्न्स्ट फॉमराथ याची पॅरिसमध्ये हत्या करण्यात आली. मारेकरी होता एक मूळ पोलिश ज्यू- हर्षेल ग्रीन्झ्पॅन. आपली प्रार्थना स्वर्गातील देवांनी ऐकली असा आनंद गोबेल्सला झाला. आग अनेक दिवस धुमसत होती, गरज होती तिला हवा देणाऱ्या वाऱ्याची... आणि तो मिळाला.

गोबेल्स नेत्याच्या डायरीमध्ये त्या रात्री केलेली नोंद अशी होती- ‘जुन्या टाऊन हॉलमधील पक्षाच्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. खूप गर्दी होती. हिटलरचे सर्व विचार मी त्यांना समजावून सांगितले. ज्यूंच्या विरोधातील निदर्शनं चालू राहावीत असा हिटलरचा निर्णय आहे. पोलिसांनी आणि पक्षानेही त्यात हस्तक्षेप करू नये असे आदेश देण्यात यावेत असंही त्याने म्हटलंय. ज्यूंना लोकक्षोभाचा झटका कळू दे.  मी पोलिसांना आणि पक्षाला तातडीने तसे आदेश दिले. त्यानंतर मी पक्षाच्या कार्यक्रमाबाबत थोडंफार बोललो. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. मी ताबडतोब फोन उचलला. आता लोक कामाला लागतील.’

झुंडींना बेलगाम करण्यात आलं. पोलिसांना केवळ दूर राहण्याचे आदेश देण्यात आले होते असे नव्हेतर अनेक प्रसंगात पोलिसांनी हत्याकांडाचे दलाल म्हणूनही भूमिका निभावली. ज्यूंची दुकानं जाळण्याआधी पोलीस दुकान मालकांना संरक्षण देण्यासाठी म्हणून ताब्यात घेत, जेणेकरून मालमत्ता निर्विघ्नपणे जाळता यावी. ज्यूंच्या घरांना लावलेल्या आगींकडे दुर्लक्ष करा, मात्र शेजारच्या आर्यवंशीय लोकांच्या घरांवर पाण्याचा मारा करून ती सुरक्षित राहतील असं पहा, असे आदेश अग्निशमन दलाला देण्यात आले होते.

सर्व काही अशा प्रकारे नियोजित करण्यात आलं होतं की, कुणालाही वाटावं लोकांच्या संतापाचा हा उत्स्फूर्त उद्रेक आहे. जेणेकरून पोलीस वा सरकारवर कुणालाही ठपका ठेवता येणार नाही. लोकांच्या रोषाला जबाबदार ठरवून केलेल्या होळीने इतिहासाचा चेहऱ्यावर पडलेले रक्ताचे ते डाग आजही धुतले गेलेले नाहीत. आणि हे घडलं युरोपात- जेव्हा आधुनिकतेचे युग भर ज्वानीत होते आणि लोकशाही संकल्पनेचा उदोउदो चालला होता... तेव्हा हे घडलं.

त्या रात्री शेकडो ज्यूंना कंठस्नान घालण्यात आलं. महिला आणि बालकांना गंभीर दुखापती झाल्या. शंभराच्यावर प्रार्थनागृहे उद्ध्वस्त करण्यात आली. ९ नोव्हेंबरला म्युनिकमधले सिनॅगॉग नाझी फौजेने जाळून टाकलं. सिनॅगॉगमुळे वाहतुकीला अडथळा होत होता असं कारण देण्यात आलं. एकट्या बर्लिनमध्ये १५ सिनेगॉग्ज जाळण्यात आली. कबरस्तानांवर हल्ले करण्यात आले. हजारो दुकानं आणि स्टोर्सची राखरांगोळी करण्यात आली. अगणित घरे पाडून टाकली गेली, केवळ ढिगारे राहिले. जर्मनीतील मोठ्या शहरांमधील रस्त्यांवर फुटक्या काचांचा सडा पडला. तीच स्थिती दुकानांसमोरच्या रस्त्यांवर होती. ज्यूंच्या स्मृतींशी संबंधित प्रत्येक वस्तू न वस्तू नष्ट करण्यात आली. त्यांचे खाजगी फोटोग्राफ्सही. अनेक स्त्री, पुरुषांनी आत्महत्या केल्या. अनेक जखमी झालेले लोकनंतर मृत्यू पावले. पोलिसांनी तीस हजार ज्यू पुरुषांना देशातून हद्दपार केलं आणि नंतर छळछावण्यांत डांबलं. तिथे पुरेशी जागा नव्हती म्हणून फक्त पुरुष आणि श्रीमंत ज्यूंना डांबण्यात आलं होतं. त्या रात्री गोबेल्स हॉटेलमध्ये परतला तेव्हा त्याला खिडक्यांच्या हादरण्याचे आवाज ऐकू येत होते. त्याने आपल्या डायरीत नोंद केली- ‘अत्युत्कृष्ट कार्य! अत्युत्कृष्ट कार्य!’ त्याने पुढे लिहिलं - ‘जर्मन राजनैतिक अधिकाऱ्याची हत्या करण्याचा अर्थ काय होतो हे जर्मन लोक कधीही विसरणार नाहीत.’

सत्ताधार्यांनी आदेश दिलेले नव्हते तेही करण्यात आलं आणि जे काही करण्यात आलं त्या संबंधात कोणीही काहीही बोलत नव्हतं. घुसमटून टाकणाऱ्या मौनाचं ब्लँकेट जणू देशावर अंथरलं गेलं होतं. त्यासाठी प्रसारमाध्यमांना दावणीला बांधण्यात आलं होतं. जणू अलिखित करार झाला होता की, पत्रकार हिटलरला कुठेही ज्यूंच्या विरोधातील हिंसाचाराबाबत प्रश्न करणार नाहीत. हिटलरही या विषयावर गप्पच होता, त्यामुळे जगातील त्याच्या प्रतिमेला धक्का बसणार नव्हता.

हिटलर जर्मन झुंडीच्या प्रेमात पडला होता. त्याच्या गरजांच्या मापात झुंडीचा बांधणी झाली होती. झुंडीपासून प्रेरणा घेऊन हिटलरने एक अद्वितीय असा कायदा संमत केला-ज्यूंच्या मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई ज्यूंनीच केली पाहीजे. जणू काही ज्यूंनी स्वतःच आपल्या घरांना आणि दुकानांना आगी लावल्या होत्या. जेव्हा झुंडीचं साम्राज्य निर्माण होतं तेव्हा सैतानी मूल्यं हृदयावर आणि मनावर अंमल गाजवू लागतात.

नाझी सरकारच्या रक्तरंजित मोहिमेचं यश मोठ्या प्रमाणावर प्रचारात होतं. एकाच प्रकारची मांडणी सतत मांडली जात होती, प्रसारित केली जात होती. सर्व मार्गांनी. दुसऱ्या कोणत्याही मांडणीला स्थान देण्यात आलं नाही. प्रचाराच्या मुशीत लोकांना ओतण्यात आलं आणि त्यांचं त्यांनाही कळलं नाही की आपलं शस्त्रामध्ये कधी रुपांतर झालं. झुंडीची निर्मिती हेच प्रचाराचं एकमेव प्रयोजन असतं. हा जमाव खूनखराबा करत सुटतो, आणि रक्ताचे डाग फक्त त्यांच्याच कपड्यांवर दिसतात. सरकार आणि नेते दोषमुक्त दिसतात. झुंडीला भडकावण्यात प्रचाराची भूमिका काय याबाबत कोणीही प्रश्न विचारत नाही. झुंडीतील लोकांच्या मनात भरलेले विष नेमके कुठून कसे आले याचा कोणीही शोध घेत नाही.

‘या कट्टरवादाचा मुकाबला करू शकेल अशा ताकदीचा विरोधच उभा राहिला नव्हता,’ हे आशयगर्भ आणि अंगावर काटा उभा करणारं विधान क्रिस्टल नाईटची कहाणी जाणून घेताना, एका पुस्तकात मी वाचलं. अंगावर काटा उभा करणारं असं म्हटलं कारण इतिहासाची पुनरावृत्ती होते हे सत्य सांगण्याचा हाही एक प्रकार आहे. हिटलरच्या झुंडींचा कोणीही कोणत्याही प्रकारे विरोध केला नाही. सामान्य माणसांना लाज वाटली पण आमचा निरुपाय होता असं सांगत ते दिलगिरी व्यक्त करतात. जे बोलू शकत होते ते शांत राहिले. शेजार्यावर प्रेम करा अशी शिकवण देणारं चर्चही शांत होतं. जगातील अनेक देशांनी ज्यूंना आश्रय देण्याचं नाकारलं. आजही हेच घडत नाहीये का सर्वत्र?

थोडं थांबून हिंसेच्या स्वरूपाचा विचार करा असं कळकळीचं आवाहन म्हणूनच मी करतो. अत्यंत क्रूर आणि कत्तली करणारं राष्ट्र अशी इस्त्रायलची प्रतिमा पॅलेस्टिनींमध्ये आहे, तरीही, आजचा इस्राएल काहीही करत असला तरीही, तेव्हा ज्यूंना जे काही भोगावं लागलं त्यात जगाचा दोष होताच. ज्या समाजाला भीषण अत्याचार सहन करावे लागले तो समाज त्याहीपेक्षा भयंकर स्वरुपाचे अत्याचार अन्य समाजावर का करतो, या प्रश्नाचं उत्तर कदाचित आपल्याला विचाराअंती मिळू शकेल. आणि आपल्या हेही ध्यानी येईल की महात्मा गांधींनी अहिंसेवर विशेष भर का दिला होता. द्वेषाच्या दुष्टचक्रातून बाहेर येण्यासाठी अहिंसा हा एकमेव मार्ग आहे. केवळ त्याच मार्गाने आपण जगाकडे पाहिलं तर सर्व जग प्रेमाच्या एकमेव रंगात रंगलेलं दिसेल.

झुंडीचं स्वरूप जाणून घेण्यासाठीही आपण प्रयास करायला हवेत. झुंडीचे स्वतःचे कायदे असते, झुंडीचं स्वतःचंच एक राष्ट्र असतं. झुंड स्वतःचे आदेश, निर्देश आखते आणि आपलं सावजही तीच ठरवते. झुंडीचं हे स्वरूप ध्यानी घेऊन आपण निर्धाराने खबरदारी घ्यायली हवी की शासनकर्त्या संस्थांना त्यांची ठरलेली चौकशीची आणि उत्तरदायित्वाची कर्तव्ये नीटपणे पार पाडता यायलाच हवीत. ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांची चौकशी होईल आणि त्यांना शासनही होईल, ही बाब आपण निष्ठेने आणि संयमाने स्वीकारायला हवी. कुठेही आणि कोणत्याही काळात आपण जमाव वा झुंड होणे, म्हणजे हिटलरचा जर्मनी होणे.

.............................................................................................................................................

रवीश कुमार यांच्या या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

लेखक रवीश कुमार एनडीटीव्हीचे कार्यकारी संपादक आहेत.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Sat , 13 October 2018

अत्यंत बाळबोध लेखन आहे. झुंडी तर हिटलरपूर्व वायमर रिपब्लिक मध्येही होत्या. त्या झुंडी ज्यू लोकं ऑपरेट करीत. हिटलर लोकशाही मार्गाने शिस्तीत निवडणुका लढवून सत्तेत आला. असो. उपरोक्त ज्यूंवरील हल्ल्यांची वर्णनं काल्पनिक आहेत. ज्यूंच्या खऱ्या शिरकाणाला (ऑशवित्झ वगैरे) १९४३ नंतर सुरुवात झाली हे साधारणत: मान्य आहे. जर १९३८ - १९३९ मध्ये जर्मन ज्यूंवर इतके भीषण हल्ले होत असतील तर १९४३ पर्यंत मोठ्या प्रमाणावर ज्यू लोकं जर्मनीत राहिलेच नसते. उगीच काहीतरी ठोकून देण्यात येतंय. -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......