इस्लाम आणि महात्मा गांधी
सदर - गांधी @ १५०
प्रा. फकरुद्दीन बेन्नूर
  • महात्मा गांधी आणि इस्लाम
  • Tue , 02 October 2018
  • सदर गांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma Gandhi प्रा. फकरुद्दीन बेन्नूर Fakruddin Bennur इस्लाम Islam कुरआन Quran पैगंबर Paigambar हिंद स्वराज्य Hind Swaraj

ऑक्टोबर २०१९ रोजी म. गांधी यांची १५०वं जयंती वर्षं साजरं केलं जाईल. या जयंती वर्षाला आजपासून सुरुवात होत आहे. त्याचं निमित्त साधून वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमानं २१-२२ फेब्रुवारी २०१७पासून ‘गांधी १५० जयंती अभियान’ सुरू केलं आहे. (२२ फेब्रुवारी हा गांधींच्या पत्नी कस्तुरबा यांचा स्मृतिदिन असतो.) या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम केले जात आहेत. त्याला प्रतिसाद म्हणून ‘अक्षरनामा’वर दर महिन्याच्या दोन तारखेला गांधींविषयी एक लेख प्रकाशित केला जातो… या मालिकेतला हा एकतिसावा लेख...

.............................................................................................................................................

महात्मा गांधींनी ‘हिंद स्वराज्य’मध्ये बीजरूपाने इस्लाम आणि हिंदू-मुस्लिम संबंधांविषयीची सूत्रे मांडलेली आहेत. नंतरच्या काळात त्या सूत्रांचा विस्तार त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात केलेला दिसून येतो. महात्मा गांधींनी इस्लाम आणि भारतीय मुसलमान यांच्या अनुषंगाने समजून घेतलेला इतिहास यांचा परामर्श आपण थोडक्यात घेणार आहोत.

महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेतील निरनिराळ्या प्रसंगाच्या वेळी हिंदु-मुस्लिम संबंधाविषयी आपले विचार मांडलेले होते. त्यांनी भारतीय मुसलमान आणि इस्लाम याबद्दल मांडलेली मते तत्कालीन भारतातील राजकीय नेते आणि विचारवंतापेक्षा वेगळे आहेत. किंबहुना त्यांचे मुसलमान आणि अस्पृश्यतेसंबंधीचे जे विचार होते, त्यांनाच फार मोठा विरोध झाला. त्यांना १९३३-१९३४ मध्ये ठार मारण्याचेही प्रयत्न झाले. शेवटी त्याचे पर्यवसान १९४८ मध्ये त्यांच्या हत्येत झाले. गांधींच्या हत्येला ७० वर्षे होत असली तरी मुस्लिमविषयक भूमिकेविषयी त्यांचे केले जाणारे चारित्र्यहनन थांबलेले नाही. ‘बॅ. जिना हे खऱ्या अर्थाने सेक्युलर होते, राष्ट्रवादी होते. भारताची फाळणी महात्मा गांधींमुळे झाली आहे’ अशा प्रकारचे लिखाण अजूनही काही हिंदुत्ववादी मंडळी अलीकडच्या काळातही करत आहेत.

डॉ. रफीक झकेरिया यांनी फाळणीच्या संदर्भात मुस्लिम लीग आणि बॅ. जिना यांनी कोणकोणती कारस्थाने केली यावर विपुल लिखाण केले आहे. ‘द मॅन हू डिवाईड इंडिया’ अर्थात ‘भारताची फाळणी करणारे जिना’ असे शीर्षक असलेला त्यांनी मोठा ग्रंथच लिहिलेला आहे. बिपीन चंद्र, अनिता सिंग, सलील मिश्रा आणि सुचेता महाजन अशा अनेक अभ्यासकांनी फाळणीच्या इतिहासावर पुराव्यानिशी प्रकाश टाकलेला आहे. त्यामध्ये गांधींचा सहभाग किती होता? आणि होता का? यावरही लिहिले गेले आहे. असे असताना देखील गांधींना फाळणीला जबाबदार व गुन्हेगार ठरवण्याचे प्रयत्न चालूच आहेत. फाळणीचा विषय वेगळा आणि गुंतागुंतीचा आहे.  गांधींच्या मुस्लिमविषयक विचारांच्या विरुद्ध एक प्रतिक्रिया म्हणूनदेखील त्यांची बदनामी करण्याचे प्रयत्न चालूच राहिलेले आहेत.

गांधींनी ‘हिंद स्वराज्य’ या ग्रंथांतून हिंदु-मुस्लिम संबंधाविषयीचे मांडलेले विचार हे तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यवादी इतिहासकारांनी आणि हिंदु-मुस्लिम धर्ममार्तंडांनी विपर्यस्त लिखाण करून गैरसमज पसरवले होते. अशा प्रकारच्या लिखाणामुळे समाजात अजूनही नानाविध भ्रम निर्माण झाले आहेत. या विकृत आणि चुकीच्या लिखाणाला गांधीजींनी ‘हिंद स्वराज्य’मधून प्रतिवाद केलेला आहे आणि पुढे तीच सूत्रे विस्तारत नेली आहेत.

मुळात गांधी कुटुंबिय हे वैष्णव होते. त्यामुळे भजन आणि भक्तिगीते हा प्रमुख धार्मिक आचार होता. त्यांची आई प्रणामी पंथाची होती. या प्रणामी पंथाचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या धर्मग्रंथात ‘भगवद् गीता’ आणि ‘कुरआन’ यांमधील श्लोक समोरासमोर असत. त्यांच्या कुटुंबात मूर्तीपूजेचे कर्मकांड नव्हते. ‘रामायणा’प्रमाणेच गांधीजींवर कबीर आणि कबीर पंथाच्या शिकवणीचा प्रभाव होता. लहानपणापासून गांधीजींना कबीरांचे दोहे पाठ होते. त्यामुळे गांधीजींचा दृष्टिकोन व्यापक आणि समतोल बनत गेला.

वैष्णव पंथातील भक्ती-भजन परंपरा, प्रणामी पंथामधून येणारा ‘कुरआन’ आणि ‘भागवत गीते’चा समांतर वापर, कबीरांच्या विचारांचा प्रभाव, सुफी संतांचा प्रभाव हे गांधी-कुटुंबावरील अनेकविध प्रभाव होते. तसेच बाजारपेठेशी संबंधित असणारा परिसर यामुळे गांधींच्या आचार-विचारांचे स्वरूप वेगळे झाले. साहजिकच त्यांच्या घरामध्ये वातावरण मोकळे होते. याचे आणखीन एक महत्त्वाचे कारण होते, ते म्हणजे तत्कालीन गुजरातची समाजरचना होय. एक तर राजकोट, पोरबंदर किंवा एकूण काठेवाडातच बहुसंख्य हे व्यापारी म्हणजे वाणिज्यवर्गाचे होते. व्यापाराशी संबंधित बहुसंख्य लोकसमूह हे मध्यम जातीचे होते. गुजरातमधील हा व्यापारवर्ग एकाच सामाजिक संरचनेतील होता. धर्माने कोणीही असोत त्यांच्या जाणिवा, सामाजिक मानसिकता आणि व्यवहार यांचे स्वरूप जवळ-जवळ समानच होते. गुजराती समाजात धार्मिक सरमिसळ आणि सहकार्याचे वातावरण होते. उदा. व्होरा ही नावे हिंदूंत प्रचलित होती. त्याचेच कच्छी मुस्लिम रूप बोहरा हे  होते.

गांधींच्या कुटुंबात धर्म हा आध्यात्मिकता आणि वैश्विक एकात्मतेचे तत्त्वज्ञान म्हणून रुजलेला होता. धार्मिक अहंगंड किंवा न्यूनगंड त्यांच्या कुटुंबात नव्हते. वैष्णवांची भजने, सुफीची व संतांची भक्ती परंपरा, कबीरांनी हिंदु-मुस्लिम पुरोहितांवर केलेली टीका आणि त्यांच्या कर्मकांडातील उघडा केलेला दांभिकपणा या गोष्टी त्यांना कौटुंबिक पर्यावरणातून मिळालेल्या होत्या. ‘वैष्णवजन तेणे कहियो रे, तो पीड पराये जाने रे’ ही गांधींची धारणा त्याचा परिणाम होती.

महात्मा गांधींचा इस्लाम आणि मुस्लिमांसंबंधीचा दृष्टिकोन वास्तववादी असण्याची काही कारणे होती. बालपणामध्ये आणि नंतर आफ्रिकेत आणि भारतातदेखील अनेक मुसलमान व्यक्ती त्यांचे मित्र आणि सहकारी होते. आफ्रिकेत आणि भारतात त्यांनी मुस्लिम धर्मगुरूंशी अनेक वेळा चर्चा केलेली होती. त्यांनी पवित्र ‘कुरआन’बद्दल म्हटलेले आहे की, धर्मविषयक एक तटस्थ विद्यार्थी या नात्याने मी पैगंबरांच्या जीवनाचा आणि ‘कुरआन’चा अभ्यास केलेला आहे. माझ्या मनाचा असा निर्णय झालेला आहे की, ‘कुरआन’चा उपदेश मूलत: हा अहिंसेला अनुकूल असा आहे. हिंसेपेक्षा अहिंसा बरी असे ‘कुरआन’मध्ये म्हटले आहे. अहिंसा ही धर्म म्हणून सांगितली आहे हिंसेला आपद् धर्म म्हणून मुभा देण्यात आलेली आहे. (धर्माधिकारी, भाग दुसरा, पान-१५९) 

महात्मा गांधींनी इंग्लंडमध्येच सेलने संपादित केलेले ‘कुरआन’ वाचलेले होते. थॉमस कार्लाईलने इस्लामबद्दल लिहिलेले ग्रंथ काळजीपूर्वक वाचलेला होता. कार्लाईलच्या लिखाणाचा त्यांच्यावर कायमचा प्रभाव पडलेला होता. त्यांची इस्लामसंबंधीची भूमिका आफ्रिकेमध्येच पक्की झालेली होती. आफ्रिकेत मुस्लिम धर्मगुरूंकडून त्यांनी इस्लाम समजून घेतलेला होता. ‘कुरआन’, पैगंबर चरित्र, हदीस (पैगंबरांची वचने) आणि इस्लामचा इतिहास काळजीपूर्वक वाचलेला होता. ‘हिंद स्वराज्य’ लिहिताना त्यांच्यावर हे सर्व प्रभाव दिसून येतात. नंतरच्या काळातदेखील त्यांचा इस्लामविषयीचा अभ्यास चालूच होता. शिबली नोमानी, अलीबंधू, डॉ. एम. ए. अन्सारी, मौलाना आझाद यांच्याशी इस्लामसंबंधाने त्यांच्या चर्चा चालूच होत्या.

गांधींनी ‘माझे सत्याचे प्रयोग’ या आपल्या आत्मचरित्रात म्हटलेले आहे की, जोपर्यंत आपण दुसऱ्या लोकसमूहांच्या धार्मिक श्रद्धा आपल्या स्वत:च्या समजून त्यांचा आदर करत नाही, तोपर्यंत या पृथ्वीवर कायमस्वरूपी शांतता नांदू शकणार नाही. (शीला मॅकडोनो, प्रस्तावना) शीला मॅकडोनो या अभ्यासिकेने गांधी आणि इस्लामवर लिहिताना म्हटले आहे की, त्यांना कॅनडामध्ये ‘प्रेषित मुहंमदांची (स) वचने’ हे पुस्तक सापडले. त्या पुस्तकाची प्रस्तावना गांधींनी लिहिली होती. म्हणूनच त्यांनी पुढे म्हटले आहे की, इस्लामला आणि इतर धर्मांना मी माझ्या धर्माइतके सत्य मानत असल्याने इस्लामी संस्कृतीबद्दल मला प्रेम आहे (धर्माधिकारी, धर्मविचार, पान-१२४) पुढे त्यांनी म्हटले आहे की, जर आपण अपूर्ण तर आपण कल्पिलेला धर्मही अपूर्ण आहे. सर्व धर्म ईश्वरदत्त आहेत. पण ते मनुष्य कल्पित आहे मनुष्य त्यांचा प्रचार करीत असल्यामुळे ते अपूर्ण आहेत. (उपरोक्त, पान-१२७) हिंदू आणि मुस्लिम धर्ममार्तंड आपला धर्म खरा आणि श्रेष्ठ असा जो आग्रह धरत होते आणि त्यासाठी भांडत होते, त्याला गांधी त्यांच्या पद्धतीने उत्तर देतात. त्यांनी पुढे म्हटले आहे की, मी सर्व ‘कुरआन’ वाचले आहे त्याने माझा तोटा न होता लाभच झाला आहे.

‘काफिर’ या शब्दाबद्दल त्यांनी म्हटले आहे की, जेव्हा त्याबद्दल मी माझ्या मुस्लिम मित्राला विचारले त्यांनी माझी खात्री करून दिली की, ‘कुरआन’मध्ये ‘काफिर’ या शब्दाचा अर्थ ‘नास्तिक’ म्हणजे ईश्वरावर श्रद्धा न ठेवणारा असा आहे. हिंदूंचा ईश्वर एक आहे अशी श्रद्धा असल्यामुळे हिंदू हे काफिर ठरत नाहीत, असे ते (मित्र) म्हणाले. (उपरोक्त, पान-१७७) अशा प्रकारे गांधी मुस्लिम धर्ममार्तंडांनी जो हिंदूंच्या विरोधी प्रचार चालवलेला होता, त्याला मुस्लिम माणसानेच ‘काफिर’ या शब्दाचा सांगितलेला अर्थ पुढे ठेवून तो प्रचार खोडून काढला आहे.

सर्व धर्मांचे अर्थ माणसाच्या आकलनावर आधारित आहेत. त्यामुळे त्यांचा अन्वय लावताना गोंधळ निर्माण होतो. असे सुचवून गांधी एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात. ते म्हणतात, धार्मिक व्यक्ती आपापल्या धर्माचे अर्थ आपल्या कुवत आणि हितसंबंधांप्रमाणे लावतात. म्हणून गांधींनी ‘हिंद स्वराज्य’मध्ये पंडित, मुल्ला, ख्रिस्ती व पारशी धर्मगुरूंनी धर्माचा पक्षपाती अर्थ लावून अशांतता निर्माण केली आहे, असे म्हणतात. गांधींनी स्वत: जो ‘कुरआन’ आणि इस्लामचा इतिहास यांचा अभ्यास केलेला होता. ते म्हणतात की, इस्लामला मी एक ईश्वरप्रेरित धर्म मानतो आणि म्हणून कुरआन शरीफ हा ईश्वरप्रेरित ग्रंथ आणि मुहंमद (स) ईश्वरी प्रेषितांपैकी एक मानतो. त्याचपमाणे मी हिंदू धर्म, खिश्चन धर्म, पारशी धर्म; हे सर्व ईश्वरप्रेरित धर्मच मानतो. (धर्माधिकारी, खंड दुसरा, पान-११२) म्हणजे पुढे गांधीजींनी धर्ममार्तड हे ‘तुझा धर्म श्रेष्ठ की माझा धर्म श्रेष्ठ’ असा जो वाद घालत होते, त्याचे खंडन त्यांनी वरीलप्रकारे केलेले आहे.

गांधींनी म्हटलेले आहे की, ‘इस्लाम हा तलवारीच्या जोरावर पसरला नसून त्यात एका मागोमाग एक झालेल्या संत पुरुषांच्या आणि सुफी फकिरांच्या प्रार्थनायुक्त प्रेमाने तो पसरला आहे, हे मी अत्यंत थोर मुसलमान मंडळींच्या सहवासात आल्याने शिकलो.’ पुढे ते म्हणतात की, ‘इस्लाममध्ये तलवार उपसण्याला आधार नाही. परंतु त्यावर इतकी कडक बंधने आहेत की, ती प्रत्येकाला पाळणे शक्य होणार नाही. जिहाद फर्मावू शकेल असा अप्रमादशील सेनापती आहे कुठे?’ (उपरोक्त, पान-१११) येथे गांधीजी इस्लामचा मूळ आशय सांगतात. तलवारीच्या जोरावर इस्लाम पसरला या प्रचाराचे ते खंडन करतात आणि जिहादवरून हिंदू आणि मुसलमान धर्ममार्तंडंनी जी भांडणे लावली होती, त्याला उत्तर देऊन त्यांचे प्रतिपादन खोडून काढतात. पण त्याचबरोबर मुस्लिमांनीदेखील इस्लाम समजून घेतलेला नाही आणि इस्लामला तलवारीशी जोडले, यावरही टीका करतात.

गांधी म्हणतात की, इस्लामचे अनुयायी तलवारीबाबत सढळ हाताचे आहेत, असे माझे मत मी दिलेच आहे, पण ‘कुरआन’मध्ये तशी शिकवण असल्याचा तो परिणाम नाही माझ्या मताने इस्लाम ज्या परिस्थितीत जन्माला आला त्याचा तो परिणाम आहे. (उपरोक्त, पान-११०) म्हणजे तलवारीच्या गैरवापराबद्दल ते मुसलमानावर टीका करतात. परंतु ते कसे घडले याची कारणमीमांसाही ते देतात. गांधी हिंदू आणि मुस्लिम धर्ममार्तंडाच्या एकमेकांवर आरोपांवरदेखील टीका करतात. ते म्हणतात की, ‘खिश्चन, बौद्ध आणि हिंदू धर्म हे ज्याअर्थाने शांततेचे धर्म आहेत, त्याअर्थाने इस्लामसुद्धा शांतीधर्म आहे. पुढे म्हणतात की, ‘कुरआन’मधून याला विरोधी असे उतारे दाखवता येतील, हे मला माहीत आहे. पण तसे ते वेदातूनही काढून दाखवता येतील. अन्यायाच्या विरुद्ध उच्चारलेली शापवचने वेदात आहेत. त्यांचा अर्थ काय? आपण हिंदूंकडून अस्पृश्यांना जी वागणूक मिळते, तिचा अर्थ काय होतो? कोळशाने डांबराला हसू नये.’ (उपरोक्त, १०९-११०)

इस्लामची मूळ भूमिका सांगून त्यांच्यात ‘कुरआन’विरोधी गोष्टी का आल्या याचेही गांधी स्पष्टीकरण देतात. ते म्हणतात की, ‘इस्लामच्या ज्यावेळी चढता काळ होता, त्या काळात तो धर्म असहिष्णू नव्हता. जगाच्या गौरवाचे तो स्थान बनला होता. ज्या वेळी पश्चिमेकडील राष्ट्रे अंधारात बुडालेली होती, ज्या वेळी एक तेजस्वी तारा पूर्वेकडच्या आकाशांत उदयाला आला आणि दु:खाने कण्हणाऱ्या जगाला त्याने शांती व प्रकाश दिला. इस्लाम हा खोटा धर्म नाही. हिंदूंनी त्याचा पूज्य भावनेने अभ्यास करावा.’ (उपरोक्त, पान-११०) 

पुढे गांधीजी म्हणतात की, हारून-अल्-रशीद आणि मामून यांच्या काळी इस्लाम हा जगातील सर्व धर्मात अत्यंत सहिष्णू असा धर्म होता. हे सांगून गांधीजी इस्लाममध्ये असहिष्णूता का आली याचे स्पष्टीकरणही देतात. ते म्हणतात की, ‘पण त्याकाळच्या मार्गदर्शक आचार्यांच्या उदारमताला प्रतिगामी लोकांचा विरोध सुरू झाला. या प्रतिगामी लोकांत अनेक विद्वान, समर्थ आणि प्रभावशाली माणसे होती. त्यांनी इस्लामच्या उदारमतवादी सहिष्णू आचार्यांना आणि तत्त्ववेत्त्यांना जवळ-जवळ दडपूनच टाकले. या प्रतिगामी क्रियेचा परिणाम आज अजूनही आपण भारतात भोगत आहोत.’ (उपरोक्त, पान-१११) 

म्हणजे भारतातील इस्लाम प्रतिगामी का झाला आहे, हेही गांधीजी येथे सांगतात आणि शुद्ध होण्याचे सामर्थ्य इस्लाममध्ये आहे, असेही गांधी सांगतात. म्हणूनच संपूर्ण स्वातंत्र आंदोलनाच्या काळात गांधीजी मूळ इस्लामची भूमिका सांगून जमातवादी मुस्लिम नेते यांच्या अलगतावादी राजकारणाला विरोध करत राहिले होते. सर्वसामान्य मुसलमानांसमोर मूळ इस्लामची भूमिका सतत मांडत राहिले होते.

महात्मा गांधी प्रेषित मुहंमद (स) साहेबांची मूळ भूमिका आणि कार्य हे सर्वांसमोर ठेवतात. ते म्हणत की, प्रेषित मुहंमद (स) यांचे मोठेपण त्यांनी अहिंसात्मक मार्गाने सत्यशोधनाचे जे प्रयत्न केले त्यामध्ये आहे. त्यांच्या मते त्या काळात इस्लाम तलवारीमुळे पसरला नाही, तर प्रेषितांचा साधेपणा आणि कमालीची नम्रता, घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे धाडस, मित्र आणि अनुयायाप्रती त्यांची बांधीलकी, निर्भयपणा, परमेश्वरावर नितांत आणि अढळ श्रद्धा हे त्यांच्या जीवनाचे सूत्र होते. तलवार बाळगल्यामुळे त्यांना प्रेषितत्व आलेले नव्हते, तर सत्य जाणून घेण्यासाठी केलेली कडक साधना आणि परमेश्वर भक्ती यामुळे आलेले होते. त्यांच्या जीवनांतून या गोष्टी काढून टाकल्या तर त्यांच्यातील प्रेषितत्वच संपते. त्यांच्यातील प्रयत्न आणि या प्रकारच्या संघर्षामुळे ते प्रषित म्हणून ओळखले गेले. (अमलेन्दू मिश्रा, पान-८२) येथे गांधींनी पैगंबर (स) साहेबासंबंधीचे केलेले विवेचन महत्त्वाचे आहे. त्यांच्या आकलनाच्या आधारे त्यांनी हिंदू-मुस्लिम संबंधांचे राजकारण केले आणि जमातवादी मुस्लिम नेते आणि धर्ममार्तंड यांच्याशा वाद घातला.

गांधींच्या टीकाकारांना इस्लाम आणि प्रेषित मुहंमद (स) साहेबांचे मूळ आणि वास्तव स्वरूप माहीत नव्हते. कारण त्यांचा अभ्यास वसाहतवादी इतिहासकारांच्या लिखाणाआधारे केला गेला होता. म्हणून ते महात्मा गांधींच्या मुस्लिम आणि इस्लामच्या भूमिकेवर टीका करत राहिले. ते मुस्लिमधार्जिणे असल्याचा शिक्का त्यांच्यावर मारला गेला. यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गांधीजी ‘कुरआन’प्रणीत इस्लाम आणि नंतर इस्लामच्या नावाने निर्माण झालेल्या प्रथा यामध्ये फरक करतात. ‘कुरआन’प्रणीत इस्लाम हा शांतीचा पुरस्कार करणारा आणि सहिष्णूच होता यावर भर देतात.

‘भारतातला इस्लाम हा सुफी संतांनी आणि फकीर साधूंनी विकसित केलेला इस्लाम आहे,’ असे ते सांगतात. म्हणजे जगातील सर्व इस्लाम एकसाची आणि समधात आहे. त्यात काही बदल नाही हे मुस्लिम धर्ममार्तंड आणि वसाहतवादी इतिहासकारांनी निर्माण केलेले हे इस्लामचे मोनोलिथ खोडून काढतात. म्हणजेच एका अर्थाने पॅन-इस्लामवादाचा सिद्धान्तही नाकारतात. ते म्हणतात की, इस्लामी संस्कृती ही अरबस्थान, तुर्कस्थान, हिंदुस्थान व इजिप्तमध्ये एकच नाही. तिच्यावर त्या-त्या देशांच्या भौगोलिक परिस्थितीची छाप पडलेली आहे. म्हणून भारतीय संस्कृती ही भारतीय आहे. ती केवळ हिंदू नाही, इस्लामी नाही किंवा दुसरी कोणतीही नाही, ती सर्व संस्कृतींचा मिलाफ आहे. (धर्माधिकारी, खंड पहिला, पान-१९०) 

म्हणजेच येथे त्यांनी हिंदू आणि मुस्लिम जमातवाद्यांचे मत खोडून काढले आहे आणि मूलतत्त्ववादी मुस्लिम धर्ममार्तंडांना स्पष्टपणे सांगितले आहे की, भारतातला इस्लाम हा भारतीय संस्कृतीने घडवला आहे म्हणून तर त्यांचा इस्लामविषयक दृष्टिकोन इतर सर्वांपेक्षा निराळा होता.

उदाहरणार्थ, हिंदूंच्या मूर्ती पूजेवर टीका करून हिंदू धर्माचे खंडन करण्याचा जो सततचा प्रयत्न मुस्लिम धर्ममार्तंड करत होते, त्या प्रचाराला उद्देशून महात्मा गांधी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्ममार्तंडांना सुनावतात. ते प्रथम हिंदूंना विचारतात की, ‘भारतातील बहुसंख्य मुसलमान एकेकाळी धर्मातरीत हिंदूच असल्याने ते भारतीय आहेत. त्यांनी वेगळी उपासना पद्धती स्वीकारली म्हणून ते वेगळे कसे झाले? इस्लाममध्ये असलेला निर्गुण निराकाराचा सिद्धान्त वेद आणि उपनिषदांतदेखील आहे. ईश्वराला सर्वव्यापी शक्ती मानून मूर्तिपूजेऐवजी प्रार्थनारूपी उपासना पद्धती स्वीकारणारे मुसलमान हे वेगळे नाहीत.’

मूर्तिपूजेवर टीका करणाऱ्यांना ते उत्तर देतात की, ‘ज्याला ईश्वर जसा भावला तशी त्याची तो भक्ती करणार. मूर्तीमध्ये ईश्वर पाहण्यात चूक काय आहे? मूर्तिपूजा ही तर मानवी अंत:करणातच रुजलेली वस्तू आहे. मूर्ती हा शब्द केवळ मानवी आकृतीलाच लागतो असे नाही. डोळ्यांना जे दिसते ती मूर्ती होय. नमाज अदा करताना मक्केकडे तोंड करण्याची पद्धत ही एक प्रकारे मूर्ती पूजाच आहे.’ 

अशा प्रकारे मुस्लिम धर्ममार्तंडांवरदेखील गांधीजींनी कडक शब्दात टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, हिंदू धर्मात मूर्तिपूजा जेव्हा एखाद्या दिव्य ध्येयाचे साधन बनते, तेव्हा ती इष्ट मानली जाते. जेव्हा मूर्तीच खुद्द दिव्य ध्येयस्वरूप बनते, तेव्हा ती जडपूजा होते, ती पापमय आहे. मी मूर्तीपूजेचा समर्थकही आहे आणि विरोधकही आहे. मूर्तीपूजेमुळे जे भ्रम निर्माण होतात, त्यांचे खंडन किंवा त्यांना विरोध करणे आवश्यक आहे. मूर्तीपूजा मनुष्य कोणात्या ना कोणत्या स्वरूपात करीतच असतो. पुस्तकपूजा ही सुद्धा मूर्तीपूजा होय. (धर्माधिकारी, खंड पहिला, पान-६६-६७) 

अशा प्रकारे गांधीजींनी धर्ममार्तंड भांडणे कशी लावतात धार्मिक अभिनिवेषामुळे अशांतता निर्माण करतात हिंदु-मुस्लिम प्रश्न त्यामुळे चिघळलेला आहे, हे स्पष्टपणे दाखवून दिले आहे.

संदर्भ

१) वसंत पळशीकर, हिंद स्वराज्य पुनर्प्रकाशन, दत्ता शिंदे, कोल्हापूर,  २००६.

२) भाऊ धर्माधिकारी, गांधी विचारदर्शन, ग्रामस्वराज्य, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी प्रकाशन, कोथरुड, पुणे, १९९५.

(‘इस्लामी तत्त्वज्ञान आणि मुस्लिम’ या फकरुद्दीन बेन्नूर लिखित आगामी ग्रंथातील एक संपादित प्रकरण)

.............................................................................................................................................

गांधींविषयीच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_list

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......