महात्मा गांधी आणि विन्स्टन चर्चिल
सदर - गांधी @ १५०
ग. प्र. प्रधान
  • महात्मा गांधी आणि विन्स्टन चर्चिल
  • Tue , 02 October 2018
  • सदर गांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma Gandhi विन्स्टन चर्चिल Winston Churchill

 ऑक्टोबर २०१९ रोजी म. गांधी यांची १५०वं जयंती वर्षं साजरं केलं जाईल. या जयंती वर्षाला आजपासून सुरुवात होत आहे. त्याचं निमित्त साधून वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमानं २१-२२ फेब्रुवारी २०१७पासून ‘गांधी १५० जयंती अभियान’ सुरू केलं आहे. (२२ फेब्रुवारी हा गांधींच्या पत्नी कस्तुरबा यांचा स्मृतिदिन असतो.) या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम केले जात आहेत. त्याला प्रतिसाद म्हणून ‘अक्षरनामा’वर दर महिन्याच्या दोन तारखेला गांधींविषयी एक लेख प्रकाशित केला जातो… प्रधान मास्तरांच्या एका जुन्या लेखाचं हे पुनर्प्रकाशन. या मालिकेतला हा एकोणतिसावा लेख...

.............................................................................................................................................

महात्मा गांधी आणि विन्स्टन चर्चिल हे परस्परांचे कडवे विरोधक होते. महात्मा गांधी हे कट्टर स्वराज्यवादी तर चर्चिल हे कट्टर साम्राज्यवादी. गांधीजींची स्वराज्यवादी भूमिका ही नैतिक होती. सर्व राष्ट्रे स्वतंत्र असली पाहिजेत आणि त्यांनी आपापले भवितव्य घडवण्याचा अधिकार असला पाहिजे असे मानत.

एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करणे, शस्त्रबळाच्या जोरावर प्रबळ राष्ट्राने अन्य राष्ट्रांना जिंकून त्यांच्यावर राज्य करणे हे अनैतिक आहे आणि म्हणून स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणे हे प्रत्येक भारतीयाचे पवित्र कर्तव्य आहे, अशी गांधीजींची शिकवण होती. याच्या उलट गौरवर्णीय युरोपियन श्रेष्ठ असून, कृष्णवर्णीय आशियाई व आफ्रिकेतील लोकांवर राज्य करण्याचा त्यांना अधिकारच आहे असे चर्चिल मानत असत. सुधारलेल्या पाश्चात्त्य राष्ट्रांच्या अमलाखाली राहण्यानेच  मागासलेल्या भारतीयांची सुधारणा होईल, अशी उद्धट आणि आक्रमक भूमिका चर्चिल मांडत असत.

दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर चर्चिल हे ब्रिटनचे पंतप्रधान झाले आणि इंग्लंड-फ्रान्स-अमेरिका- रशिया या युतीचे एक प्रमुख नेते म्हणून त्यांनी हिटलर-मुसोलिनी यांच्या फॅसिस्ट आघाडी विरुद्ध निकराने युद्ध चालवले होते. भारत हा इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याच्या साम्राज्यवादी भूमिकेला गांधीजींनी तीव्र विरोध केला आणि स्वतंत्र भारतच परकीय आक्रमणापासून स्वत:चे संरक्षण करेल, अशी भूमिका मांडली. क्रिस यांच्या शिष्टमंडळाने भारताला युद्धानंतर वसाहतीतील स्वराज्य (डोमिनिअन स्टेट्स) दिले जाईल, असा प्रस्ताव मांडला तेव्हा गांधीजींनी ‘हा दिवाळे निघालेल्या बँकेवरील पुढील तारखेचा चेक आहे’ असे म्हणून तो प्रस्ताव ठोकरला.

पुढे गांधीजींनी बिटिशांनी येथून चालते व्हावे म्हणून आदेश देऊन देशव्यापी चळवळीसाठी वातावरण तापवण्यास सुरुवात केली. ८ ऑगस्ट १९४२ ला काँग्रेसने मुंबईच्या अधिवेशनात ‘चले जाव’ ठराव संमत केला आणि महात्मा गांधींनी भारतीयांना ‘करेंगे या मरेंगे’ असा आदेश देऊन लढ्याचे रणशिंग फुंकले. या वेळी चर्चिल यांनी ‘साम्राज्याचे दिवाळे काढण्यासाठी मी इंग्लंडचा पंतप्रधान झालेलो नाही’ अशी उन्मत्त घोषणा करून महात्मा गांधींना आणि काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांना पकडून तुरुंगात टाकले. देशभरात स्वातंत्र्य चळवळ उसळली तेव्हा अश्रुधूर, लाठीमार, गोळीबार करून चळवळ चिरडण्याचा आदेश चर्चिल यांनी दिला होता.

भारतातील बिटिश राज्यकर्त्यांनी हे सर्व मार्ग अवलंबले. अनेक जण हुतात्मे झाले, हजारो स्वातंत्र्यसैनिक तुरुंगात गेले आणि ही उघड चळवळ चालू असतानाच अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफअली, डॉ. लोहिया आदी समाजवादी नेत्यांनी भूमिगत चळवळ देशभर सुरू केली. पुढे ऑक्टोबर महिन्यात जयप्रकाश नारायण व त्यांचे सहकारी हजारी बाग तुरुंगातून बाहेर पळाले आणि जयप्रकाश नारायण यांनी भूमिगत चळवळीचे नेतृत्व स्वीकारले.

देशभर ब्रिटिश सरकार खिळखिळे करण्यासाठी ‘साबोटेजिंग‘चे (घातपाती कारवायांचे) कार्यक्रम चालवले गेले आणि जेथे शक्य होते तेथे स्वातंत्र्यसैनिकांनी पर्यायी सरकारही स्थापन केले. महाराष्ट्रात क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी सातारा-सांगली भागात प्रतिसरकार स्थापन करून गनिमी काव्याने ब्रिटिशांबरोबर दीर्घकाळ संघर्ष चालवला.

महात्मा गांधींना पुण्याला आगाखान पॅलेसमध्ये स्थानबद्ध करण्यात आले होते. देशभरातील स्वातंत्र्य चळवळ अशी प्रखरपणे चालू असताना, भारतातील व्हाईसरॉय आणि गृहमंत्री यांनी या चळवळीचे खापर गांधीजींच्या डोक्यावर फोडण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी जानेवारी १९४३ मध्ये एक इंग्रजी पुस्तिका प्रसिद्ध केली. या पुस्तिकेत गांधीजी हे अहिंसेची भाषा बोलत असले तरी त्यांच्या प्रेरणेमुळेच देशभरात अनेक हिंसक कृत्ये झाली असे विधान केले होते. ‘चले जाव‘ आंदोलनातील तारा तोडणे, पूल पाडणे इत्यादी भूमिगत कार्यक्रम, मोर्चे काढून स्वातंत्र्यसैनिकांनी सरकारी कचेऱ्यांवर केलेले हल्ले, काही ठिकाणी झालेले बॉम्बस्फोट, सैन्यांच्या दळणवळणात अडथळे आणण्यासाठी रेल्वे रूळांवरील फिश लेट्स काढणे आदी सर्व घटनांची तपशीलवार माहिती या चोपड्यात दिली होती आणि गांधी व काँग्रेस हेच या सर्वाला जबाबदार आहेत असे म्हटले होते.

गांधीजींना ही पुस्तिका मिळाल्यावर त्यांनी व्हाईसरॉय लिनलिथगो यांना सडेतोड उत्तर देणारे पत्र लिहिले. ‘ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी भारतीयांची स्वराज्याची न्याय्य आकांक्षा चिरडून टाकण्यासाठी जुलूम व दडपशाही केल्यावर भारतीय जनता त्याला विरोध करणे, शक्य त्या सर्व मार्गांनी करणे अपरिहार्य होते,’ अशी भूमिका गांधीजींनी पत्रात मांडली आणि चळवळीचे समर्थनच केले.

ब्रिटिश सरकारने गांधीजींवर केलेल्या आरोपाचे खंडन त्यांनी सष्टपणे केले. त्यानंतर गांधीजींनी सरकारने केलेल्या आरोपांचा निषेध म्हणून तीन आठवडे उपोषण करण्याचे ठरवले आणि तो निर्णय जाहीर करून त्यांनी १० फेबुवारी १९४३ ला उपोषणास सुरुवात केली. देशभर यामुळे प्रचंड खळबळ उडाली. मी त्या वेळी येरवडा तुरुंगात होतो.

गांधीजींच्या उपोषणाच्या निर्णयामुळे आम्ही सर्व राजबंदी अत्यंत अस्वस्थ झालो. आमच्यापैकी काहीजण गांधीजी जगावेत यासाठी रोज प्रार्थना करत. आमच्या बराकीतील आम्ही सर्वजणांनी गांधीजींच्या उपोषणाच्या सातव्या आणि चौदाव्या दिवशी उपवास केला. चौदाव्या दिवसानंतर गांधीजींची प्रकृती खालावत चालल्याच्या बातम्या येऊ लागताच माझ्या मनाची तडफड सुरू झाली. आम्ही राजबंदी असहायपणे तुरुंगात बसून होतो. आपापसात बोलत होतो. गांधींजी जगणार की मरणार, या प्रश्नाने सर्वांच्याच मनात काहूर उठवले होते. १९ व्या आणि २० व्या दिवशी गांधीजींच्या मृत्यूची वार्ता येणार, अशा भीतीने आमच्यातील अनेकांना- मलाही अश्रू आवरत नव्हते. त्या वेळीच चर्चिल यांनीही गांधीजी मरणार हे गृहीत धरून काय करावयाचे ते ठरवले होते.

गांधीजींचे निधन झाल्यावर त्यांचे शव कोठे गुप्तपणे न्यावयाचे, त्यांचे दहन कसे करावयाचे याचे निर्णय झाले होते. पोलीस बंदोबस्त कडेकोट करण्यात आला होता. पुण्यात लष्करही तयार ठेवण्यात आले होते. गांधीजींची प्रकृती अत्यवस्थ होती. आमच्या बराकीतील डॉक्टर लोक म्हणत होते, ‘आता ग्लुकोजचे इंजेक्शन दिले तरच गांधीजींचे प्राण वाचू शकतील‘.

गांधीजींच्या प्रकृतीकडे पुण्यातील सिव्हिल सर्जन पाहात होते. उपवासाच्या पंधराव्या दिवसानंतर गांधीजी मधूनमधून बेशुद्ध होऊ लागले. १८ व्या दिवशी त्यांची शुद्ध पूर्ण हरपली. सर्व भारतातील नागरिकांची मन:स्थिती काय असणार हे आम्हाला कळणे शक्य नव्हते. उपोषणाच्या काळात गांधीजींना पाठिंबा देण्यासाठी पुण्यामध्ये मीनू मसानी आणि अन्य अनेकांनी सत्याग्रह केला. त्यांना अटक व शिक्षाही झाली.

गांधीजींच्या उपोषणाचा २१ वा दिवस आला. आम्ही येरवडा तुरुंगात कोणी जेवलो नव्हतो. सामुदायिक प्रार्थना झाल्यावर काहीजण रडू लागले. काकासाहेब गाडगीळांनी सर्वांना शांत राहण्यास सांगितले. अखेर २१ वा दिवस उलटला. गांधीजी अत्यंत क्षीण झाले असले तरी अद्याप जिवंत आहेत आणि त्यांचे उपोषण समाप्त होत आहे, ही बातमी येताच आम्हा सर्वांच्या मनावरील ओझे उतरले. ३ मार्च १९४३ चा तो दिवस होता. आम्ही सुटकेचा नि:श्वास सोडला. आनंदाने हर्षभरित झालो. चर्चिल आणि केंद्रातील गृहमंत्री रेजिनॉल्ड मॅक्स्वेल यांनी केलेली जय्यत तयारी फुकट केली.

१९४२ च्या आंदोलनात असीम त्याग करून भारतातील जनतेने स्वतंत्र होण्याचा जो निर्धार व्यक्त केला, सुभाषबाबूंच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेनेने बिटिश साम्राज्याचा पाया जो उखडला आणि १९४६ सालच्या नाविक बंडात ज्या वेळी भारतीय नागरिक आणि भारतीय नौदलातील जवानांनी एकत्र येऊन बिटिशांच्या लष्कराला, रणगाड्यांना जेव्हा धूळ चारली, तेव्हा भारतावर यापुढे राज्य करता येणार नाही, हे बिटिश राज्यकर्त्यांनी ओळखले.

पंधरा दिवसांनी पंतप्रधान अ‍ॅटली यांनी ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये भारतीय जनतेला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली. रेजिनॉल्ड मॅक्स्वेल यांनी भारतमंत्र्यांना त्यापूर्वी काही महिने पाठविलेल्या गोपनीय अहवालात यापुढे ब्रिटिशांना भारतात राज्य करणे कठीण आहे, हे सष्टपणे लिहिले होते. चर्चिल यांनी दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडचे नेतृत्व करून हिटलरच्या अमानुष फॅसिस्ट शक्तीचा पराभव केला. परंतु कालचक्र वेगाने फिरत होते.

चर्चिलच्या हुजूर (कॉन्झरव्हेटिव्ह) पक्षाचा ब्रिटिश पार्लमेंटच्या निवडणुकीत पराभव झाला. मजूर पक्षाचे नेते पंतप्रधान अ‍ॅटली यांनी पार्लमेंटमध्ये केलेल्या घोषणेप्रमाणे १५ ऑगस्ट १९४७ ला युनियन जॅकखाली उतरवण्यात आला आणि भारताचा राष्ट्रध्वज दिल्लीमध्ये आणि भारतात सर्वत्र डौलाने फडकू लागला. गांधीजींच्या अखेरीची वाट पाहणाऱ्या विन्स्टन चर्चिलला ब्रिटिश साम्राज्याची अखेर पाहावी लागली. साम्राज्यशाहीचा पराभव झाला आणि स्वातंत्र्य संग्रामात भारताने विजय संपादन केला.

.............................................................................................................................................

गांधींविषयीच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_list

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................