दोन्ही काँग्रेस, भाजप आणि काही ‘सनातन’ प्रश्न
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार
  • Wed , 29 August 2018
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar नरेंद्र मोदी Narendra Modi सनातन संस्था Sanatan Sanstha सनातन प्रभात Sanatan Prabhat संघ RSS भाजप BJP

महाराष्ट्राच्या राजकारणात आजघडीला चार प्रमुख पक्ष आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना. या चारही पक्षांची मतं काही प्रमाणात आपल्याकडे खेचून ‘मनसे’नं आश्वासक सुरुवात केली होती. पण १० वर्षांत हा पक्ष मूळ धरण्याऐवजी पानगळीनेच इतका खुरटला की, आजघडीला काँग्रेसपेक्षाही तो अधिक गाळात आहे. पक्ष आणि पक्षनेतृत्वाचं वय बघता त्यांनी अजूनही मुळापासून सुरुवात करायला हरकत नाही.

बाकी शेकाप, कम्युनिस्ट (माकप, भाकप), आरपीआय, भारिप, एमआयएम, सपा, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासप, बसप या सर्वांचं अस्तित्व सध्या तरी ‘इतर’मध्ये गणलं जातं. (यात नारायणेंच्या स्वाभिमानी पक्षाचंही टिंब आहे.)

यातला भाजप आणि शिवसेना वगळता इतर सर्व पक्षांचा तोंडवळा हा धर्मनिपरपेक्षतेकडे झुकणारा किंवा हिंदुत्वाच्या ठाम विरोधातला आहे. शिवसेनावाले स्वत:ला कडवे हिंदुत्ववादी समजतात, तर भाजपवाले स्वत:ला राष्ट्रवादी, देशभक्त आणि भूमीपुत्र हिंदू मानतात. सेनेच्या कडव्या हिंदुत्वात मुसलमान ‘हिरवी पिलावळ’, ‘पाकडे’ वगैरे असले तरी त्यांचा मुस्लिमविरोध हा ‌शिवाजी-औरंगजेब किंवा शिवाजी-अफजलखान लढाईच्या शालेय पाठसाराखा वीरश्री भावनेनं ओथंबलेला आहे. मात्र भाजपचा मुस्लिमविरोध हा मातृपितृ संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सैद्धांतिक पायावर आधारित आहे. त्यातही मुस्लिमविरोधाची पद्धत संघाची वेगळी, भाजपची वेगळी.

भाजप हा अधिकृत राजकीय पक्ष असल्यानं संविधानाच्या चौकटीत त्यांना काम करावं लागतं. संघात मुस्लिम किती, हा नेहमी तावातावानं चर्चेचा विषय ठरतो, तर भाजपमध्ये सिंकदर बख्त ते शाहनवाज हुसैनपर्यंत अनेक मुस्लीम नेते देशभर आहेत. त्यातल्या काहींची आंतरधर्मीय लग्नंही झाली आहेत. आणि ते भाजपमध्ये अस्वस्थ वगैरे नसतात. गंमत बघा, बाबरी विध्वंसानंतर कुख्यात दाऊदची टोळी हिंदू-मुस्लिम अशी दुभंगली, पण भाजपमधल्या कुणाही मुस्लीम नेत्यानं नाराजीचा सूर लावला नाही. ही तुलना नाही. बाबरी पतनानंतर ध्रुवीकरण माफियापर्यंतही पोहचलं होतं हे दर्शवण्यासाठी केवळ.

ही पार्श्वभूमी एवढ्यासाठी मांडली, कारण सध्या केंद्रात व राज्यात भाजपचं सरकार असताना कडव्या हिंदुत्ववाद्यांची जी धरपकड चालली आहे आणि त्यातून हिंदुत्वविरोधी गणल्या गेलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर, कलबुर्गी, कॉ. गोविंद पानसरे आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेणं, संबंध तपासणं, बेकायदा शस्त्रसाठा, शस्त्र प्रशिक्षण, बॉम्ब बनवणं, स्फोटकं जमवणं, व्यापक कटाची आखणी हे सगळं उघड करून एटीएसनं जवळपास या चारही जणांच्या खुनाचे धागेदोरे उलगडून आता पुराव्यानिशी आरोपपत्र दाखल करून खटला सुरू करणं इतपत ही मोहीम (काहीशा) आक्रमक रीतीनं राबवली जातेय. यात सनातून संस्थेचं नाव काही ना काही कारणानं येत आहे. आणि तो धागा पकडून सरकारच्या पवित्र्यानं आजवर गप्प असलेली माध्यमंही सनातनवर कोर्टमार्शल करायला पुढे सरसावलीत!

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

भाजपचं सरकार केंद्रात आणि राज्यात असताना हिंदुत्ववाद्यांना दहशतवादी, देशविरोधी, विघातक शक्ती ठरवण्याचा हा धडाकेबाज कार्यक्रम पाहून हिंदू विधिज्ञ परिषदेचे वकील अॅड. संजीव पुनाळेकरही आश्चर्यचकित झालेले दिसतात. सनातनचा पसारा मोठा आणि त्यांची उपद्रवक्षमता बघता सध्या तरी त्यांनी बचावात्मक पवित्रा घेत पकडलेले हिंदुत्ववादी आमच्या आश्रमात, कार्यक्रमात आले-गेले असतील, पण ते आमचे साधक नाहीत असं म्हटलंय. ज्या संघटनांसाठी हे तरुण अधिकृतपणे काम करत होते, त्या संघटनांचं अस्तित्व सनातनसारखं व्यापक नसल्यानं त्या संघटना नेमक्या कधी स्थापन झाल्या? कुणी स्थापन केल्या? त्यांचं (भौगोलिक) कार्यक्षेत्र कुठलं, हे अजून नीटसं स्पष्ट झालेलं नाही. त्यांच्या बाजूनंही सनातनच व्यापक अर्थानं बोलतेय. भाजप सरकारला यातून सरकार म्हणून आम्ही किती कार्यक्षम आहोत आणि कायम टीकेचं लक्ष्य ठरलेलं गृहखातं किती बारकाईनं निष्पक्ष कारवाई करतंय, हे दाखवायचं असणारच. हा झाला शासनाचा ‘निर्णय’, पण यामागे पक्षाचा ‘अजेंडा’ काय?

या धडक कारवाईनं फडणवीस सरकारनं पुरोगामी, परिवर्तनवादी वर्तुळाबरोबरच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर सेक्युलर पक्षांना बुचकाळ्यात किंवा बॅकफुटवर टाकलंय. या सर्वांची अशी भूमिका\संशय\आरोप होता की, या चौघांचे मारकेरी हिंदुत्ववादीच असावेत. ‘सनातन प्रभात’मधल्या लिखाणामुळे आणि त्याआधी सनातननं केलेले काही (विफल) बॉम्बस्फोट यामुळे संशयाची सुई फिरून फिरून तिथंच येत होती. यापैकी दाभोलकरांची हत्या आघाडी सरकारच्या काळात, तर कलबुर्गी व गौरी लंकेश यांची हत्या काँग्रेस राजवटीत झालेली. महाराष्ट्रात सत्ताबदल झाला आणि फडणवीस सरकार आलं. पुढे कॉ. पानसरेंची हत्या झाली. २०१४नंतर देशात बदललेलं वातावरण, हिंदुत्ववादी गटांची सोशल मीडिया फौज आणि प्रत्यक्ष रस्त्यावरची आक्रमक हिंसक उपस्थिती यामुळे परिवर्तनवादी वर्तुळात चितेंचं वातावरण पसरलं. श्रीपाल सबनीसांनाही ‘मॉर्निंग वॉकला जात जा’ अशी उघड खिल्लीवजा धमकी मिळाल्यानंतर तर वातावरण अधिक गढूळ झालं.

अगदी अलीकडे काश्मीर अभ्यासक\कार्यकर्ते संजय नहार यांना पाठवण्यात आलेलं पार्सल, अशा घटना घडत असतानाच, अचानक सरकारनं जी ही मोहीम हाती घेतली, त्यामुळे निवडणुकीच्या तयारीत असणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला आता नेमकं काय करावं असा प्रश्न पडला.

या सर्व मोहिमेवरील पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, शरद पवार, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड (आणि कालच सरतेशेवटी संजय राऊत!) यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या\वाचल्या की, असं दिसतं की, दहा वर्षांच्या आपल्या राजवटीतील या संघटनांच्या गनिमी हालचालींना रोख न शकल्याची जी निष्क्रियता होती, ती आता सनातन बंदीची मागणी पुढे रेटून झाकू पाहताहेत.

दहा वर्षं आघाडीचं सरकार राज्यात व केंद्रात होतं. २६\११च्या हल्ल्यात शहीद होण्यापूर्वी हेमंत करकरेंनी हे धागेदोरे उलगडून मालेगाव स्फोटाच्या शोधाची दिशाच बदलली. तो संकेत हेरून तेव्हाच धडक मोहीम राबवली असती तर कदाचित या चौघांची हत्या रोखता आली असती. तेव्हाच सनातनवरच्या बंदीसाठी राज्य व केंद्रानं खलित्यांची लढाई न लढता, प्रामाणिक प्रयत्न केले असते, तर गोष्टी आज या थराला गेल्याच नसत्या. पण मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारलाय का, असं मित्रपक्षानं विचारणं आणि स्वपक्षीय गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात अंतर्गत राजकारणासाठी भिडेगुरुजींना मोकळं रान देणं असल्या शह-काटशहाच्या पर्यायानं निव्वळ सत्तेच्याच राजकारणात अडकलेल्या आघाडी सरकारला हे बिघडतं समाजस्वास्थ्य बघायला वेळ कुठे होता? त्यामुळे या हिंदू दहशतवादावर बोलण्याचा नैतिक अधिकार काँग्रेस-राष्ट्रवादीकडे आज नाही. आजही पृथ्वीराज चव्हाण सांगतात, सुशीलकुमार ते नाकारतात!

राष्ट्रवादी आता आक्रमक पवित्रा घेत असली तरी प. महाराष्ट्र या बालेकिल्ल्यात भिडेगुरुजी आणि त्यांचं शिव प्रतिष्ठान यांना मोकळा श्वास कुणी घेऊ दिला? आजही उदयनराजे धमकी देतात की, भिडेगुरुजींच्या केसाला धक्का लावून दाखवा! आणि स्वत: कार्यक्षम गृहमंत्री व मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार म्हणताहेत- कर्नाटक पोलिसांचा तपास पुढे न्या! महाराष्ट्र व मुंबई पोलिस दलाची स्कॉटलंड यार्डशी तुलना केली जायची. त्या महाराष्ट्रानं शेजारच्या राज्याच्या पोलिस दलावर भिस्त ठेवायची? तीही पहिली हत्या महाराष्ट्रात झालेली असताना?

आता उरतो प्रश्न भाजपच्या ‘अजेंड्या’चा. लोकसभा निवडणुका सहा महिन्यांवर आणि विधानसभा निवडणुका दीड वर्षांवर असताना फडणवीस सरकारनं ही शोधमोहीम जवळपास निकाली काढून कुणाकुणाला, काय काय संदेश दिलाय? हा तपास पूर्णत्वाला जाऊन या चारही हत्यांसदर्भात खटले उभे राहिले (महाराष्ट्रापुरते दोन) तर त्याचं श्रेय निर्विवाद भाजप घेणार! यात भाजप व्याख्येनुसार तथाकतित सेक्युलरवाद्यांना ते दाखवून देणार, बघा, आम्ही पक्षपाती नाही.

इतर हिंदुत्ववादी गट, संघटना यांना यातून काय संदेश जातो? तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हाच या देशातला हिंदुत्वाचा चेहरा आहे. संघाचं राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक काम हे संविधानाच्या चौकटीत समरसतेतून ‘हिदू राष्ट्र’ तयार करण्याचं आहे. संघ हा फक्त प्रेरकाचं काम करतो. हिंदुत्वासाठी तुम्ही रचनात्मक सामजिक काम करा, सांस्कृतिक कामातून ‘बलसागर भारत’ मोहीम पुढे न्या किंवा मग कडव्या संघटना स्थापून त्यातून थेट हिंसा पसरवत असाल तर तो तुमचा मार्ग आहे. तुम्हाला जाहीर पाठिंबा देणार नाही, पण जाहीर आडवंही जाणार नाही. कारण संघाची उद्दिष्टं दीर्घ पल्ल्याची असतात. नैमित्तिक यशानं हुरळून जाणं संघाला मान्य नाही. ‘हिंदू राष्ट्र’ संकल्पनेला संविधान हे ढालीसारखं पुढे केलं जात असेल तर संविधानाचा वापर करूनच ‘हिंदू राष्ट्र’निर्मिती होईल!

थोडक्यात संघाला हिंदू महासभा, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सनातन यांसारख्या शंभर संघटना असल्या तरी चालतील, पण हिंदुत्व संघाचंच चालणार. संघानं हिंदू महासभा किंवा अलीकडे विश्व हिंदू परिषदेतून अशोक सिंघल ते प्रवीण तोगडिया कसे निष्प्रभ केले ते आपण पाहिलंच. अडवाणी, गोविंदाचार्य, उभा भारती, कल्याणसिंग आज कुठे आहेत? हे एकेकाळी आजच्या सनातनसारखे झोतात होते!

या मोहिमेतून या छोट्या-मोठ्या संघटनांना ‘संघम शरणम गच्छामि’ म्हणावं लागेल. पुढच्या निवडणुकीत काम करावं लागेल. तुम्ही आवश्यक ती दहशत आणि ध्रुवीकरण केलंय. आता तुम्ही व्यासपीठावरून विंगेत जा! जगात सर्व प्रकारचा ‘दहशतवाद’ वाढल्यापासून विरोधकांना संपवण्यासाठी दहशतवादी ठरवून मग गोळ्या घालायच्या! या संघटनांना जेरबंद करून आपलं वर्चस्व संघ\भाजप प्रस्थापित करतानाच सर्वसामान्य लोकांत पुरोगाम्यांचे मारेकरी आम्ही पकडले हे बिंबवले जाणार! (पुढे तपास, पंचनामा, सीबीआय, एटीएस तपासातील विसंगती यामुळे ते सुटूही शकतील! पण तूर्तास बंदी!!) संघ आणि संघ शिकवणुकीप्रमाणे भाजप या अजेंड्याबद्दल म्हणणार- ‘आमचा अजेंडा दुसरेच ठरवू लागले’. आणि ते प्रथेला धरून होईल.

शिवसेनेची या सगळ्याच प्रकरणावरची (म्हणजे विचारवंतांच्या हत्या ते हिंदुत्ववादी धागेदोरे) भूमिका अजूनही थेट नाही. नेहमीप्रमाणे हिंदुत्वाची बाजू घ्यावी तर पकडणारे हिंदुत्ववादीच. हत्या विचारवंतांची. विचारवंत असे जे रूढार्थानं हिंदूविरोधी! मग शेवटी काल शिवसेनेचे खासादर संजय राऊत आध्यात्मिक वाटावं असं बोलले- ‘या अटका म्हणजे मोदी, फडणवीस, संघाच्या हिंदुत्वाचा पराभव!’ यापेक्षा पेंग्विनच्या मृत्युवर प्रतिक्रिया देणं कदाचित सोपं गेलं असतं!
फडणवीस सरकारनं एक ‘सनातन’ चर्चा सुरू केली आणि काँग्रेस-राष्ट्रवादीत पळापळ सुरू झाली, हे कसं नाकारायचं?

.............................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......