मोदीजी, का करताय देशाची आणखी एक फाळणी?
सदर - सडेतोड
निखिल वागळे
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • Thu , 19 July 2018
  • सडेतोड निखिल वागळे Nikhil Wagle नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP हिंदूराष्ट्र Hindu Rashtra राहुल गांधी Rahul Gandhi काँग्रेस Congress शशी थरुर Shashi Tharoor मुस्लीम पक्ष Muslim Party

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा अजेंडा आता चांगलाच स्पष्ट होतो आहे. ही निवडणूक ते विकासाच्या मुद्द्यावर लढवतील असं वाटत नाही. गेल्या चार वर्षांतली मोदी सरकारची कामगिरी पाहून त्यांना तशी खात्री वाटत नसावी. वाजपेयींनी २००४चा निवडणुकीत ‘शायनिंग इंडिया’चा आधार घेतला आणि ते फसलं. कदाचित म्हणूनच मोदी-शहा पुन्हा एकदा हिंदुत्वाकडे वळत आहेत. २०१४ च्या निवडणुकीत हा अजेंडा त्यांनी आपल्या जाहीरनाम्याच्या शेवटच्या पानात ढकलला होता. 

गेल्या आठवड्यातल्या घटना याची साक्ष देतील. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुस्लीम विचारवंतांची एक बैठक बोलावली. या बैठकीत ‘काँग्रेस हा मुसलमानांचा पक्ष आहे’ असं राहुल म्हणाल्याचं ‘इन्किलाब’ या उर्दू वृत्तपत्रात प्रसिद्ध झालं. ते खरं की खोटं याची शहानिशा होण्याआधीच भाजपनं काँग्रेसवर हल्ला चढवला. स्वत: संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन मैदानात उतरल्या. त्यांनी ‘या विधानामुळे देशात दंगली झाल्या तर काँग्रेस पक्ष जबाबदार राहील’ असा थेट इशारा दिला. दुसऱ्या दिवशीच्या जाहीर सभेत याच मुद्द्यावरून राहुल गांधींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न मोदींनी केला. एकूण, काँग्रेस पक्ष मुस्लीमधार्जिणा आहे असं पुन्हा एकदा दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. निवडणूक जसजशी जवळ येईल तसतशी या प्रयत्नातली तीव्रता वाढत जाईल. काँग्रेस पक्ष भाजपच्या या जाळ्यात सापडतो का हे पहावं लागेल.

मुळात राहुल गांधींनी बोलावलेल्या या बैठकीत काय घडलं ते पहा, मग भाजपची चलाखी लक्षात येईल. या बैठकीला उपस्थित असलेले सुप्रसिद्ध इतिहासकार एस. इरफान हबीब यांच्या म्हणण्यानुसार राहुल गांधी असं काही बोललेत नाहीत. काँग्रेस मुस्लीम पक्ष आहे असा दावा त्यांनी केला नाही. पत्रकार शाहीद सिद्दीकी यांच्या मते, ‘काँग्रेस मुसलमानोंकी भी पार्टी है,’ असं राहुल म्हणाले. या बैठकीला हजर नसलेल्या ‘इन्किलाब’च्या वार्ताहराने ‘भी’च्या जागी ‘ही’ टाकल्यानं गडबड झाली.

हे या वृत्तपत्रानं जाणूनबुजून केलं की, अनावधानानं हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण या वृत्तपत्र समुहाचा इतिहास वादग्रस्त आहे. राम मंदिर आंदोलन शीगेला पोहोचलं असताना या ‘जागरण’ समूहानं भावना भडकवणाऱ्या, खोट्या बातम्या दिल्या होत्या. त्याबद्दल प्रेस कौन्सिलनं त्यांच्यावर ताशेरे ओढले होते. हा समूह भाजपचा समर्थक आहे. त्यामुळे ‘इन्किलाब’च्या हेतूवर कुणी शंका घेतली तर त्याला दोष देता येणार नाही.

.............................................................................................................................................

 या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4448

.............................................................................................................................................

काँग्रेसनं या बातमीचा इन्कार केला तरी पंतप्रधान मोदी आणि भाजपने हा वाद चालू ठेवला. काँग्रेस हा एका बाजूला ‘जनुआधारी’ आणि दुसरीकडे ‘मुस्लीमधारी’ असा ढोंगी पक्ष आहे, असा आणखी एक हल्ला भाजप नेत्यांनी केला. काँग्रेस मुसलमानांचं तुष्टीकरण करत असल्याचा आरोप भाजपने रथयात्रेच्या काळापासून सातत्यानं केला आहे. त्याचंच हे नवं रूप आहे. पण हा आरोप झटकून टाकणं काँग्रेसला यावेळीही जमलं नाही.

हे कमी म्हणून की काय, काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या विधानाचा वाद पद्धतशीरपणे निर्माण करण्यात आला. ‘२०१९ ला मोदी पुन्हा निवडून आल्यास भारत ‘हिंदू पाकिस्तान’ बनण्याचा धोका आहे’ असं थरुर जरूर म्हणाले. पण त्यांनी काही सनसनाटी निर्माण करण्यासाठी हे विधान केलं नव्हतं. भारतीय लोकशाहीला असलेल्या धोक्यांबद्दल एका ते परिसंवादात बोलत होते. थरुर यांच्या शैलीतलं ते एक अभ्यासपूर्ण भाषण होतं.

पण काही टीव्ही चॅनल्सनी त्यातलं एक वाक्य उचलून भाजपच्या हातात कोलीत दिलं. हा देशांतल्या लोकशाहीचा आणि हिंदूंचा अपमान असल्याची बोंब त्यांनी मारली. काँग्रेस पक्ष इथंही गडबडला. थरुर यांचं समर्थन करण्याऐवजी ‘नेत्यांनी जपून विधानं करावीत’ असा आदेश पक्षानं काढला. वास्तविक थरुर याचं काहीच चुकलं नव्हतं. आपल्या विधानाचं चोख समर्थन त्यांनी नंतर दिलेल्या मुलाखतीत केलं. ‘भाजपला हिंदू राष्ट्र नको आहे काय?’ असा खणखणीत सवालही त्यांनी विचारला. पण काँग्रेस पक्ष आधीच गर्भगळीत झाल्यामुळे भाजपचा हेतू साध्य झाला.

तिसरी घटना पश्चिम बंगालमधली आहे. मिदनापूरच्या जाहीर सभेत नरेंद्र मोदी यांनी मुस्लीमधार्जिणेपणाचा आरोप ममता बॅनर्जी यांच्यावर केला. ‘ममता बॅनर्जींच्या राज्यात एक दिवस दुर्गा पुजासुद्धा बंद होईल’ असं मोदी म्हणाले. बंगालमधल्या हिंदूंना भडकवण्याचा हा उघड प्रयत्न होता. देशाच्या पंतप्रधानानं इतक्या खालच्या पातळीवर उतरावं या इतकी लाजीरवाणी गोष्ट नाही. पण मोदी कधीच त्याची पर्वा करत नाहीत. आपल्या जाहीर सभातून ते अशी प्रक्षोभक विधानं नेहमीच करत असतात. गुजरात आणि कर्नाटकची निवडणूक याला साक्ष आहे. येत्या निवडणुकीत मोदींचा हा प्रचार अधिक जहरी बनू शकतो.

सध्या सर्वोच्च न्यायालयात मशिद-मंदिराच्या खटल्याची सुनावणी चालू आहे. या खटल्याचा निकाल आपल्या बाजूनं लागेल अशी संघ परिवाराला खात्री आहे. तसं विधान अमित शहा यांनी नुकतंच तेलंगणात केलं. पण नंतर त्याच्या परिणामांची जाणीव झाल्यानं भाजप प्रवक्त्यांनी त्याचा इन्कार केला. मंदिराचा मुद्दा भाजपनं गेल्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात वापरला होता, पण तो स्थानिक पातळीवर. यंदा तो राष्ट्रीय मुद्दा बनण्याची शक्यता आहे.

काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष भाजपच्या या ध्रुवीकरणाच्या रणनीतीला कसं उत्तर देणार हा खरा प्रश्न आहे. धर्मांधतेला तेवढ्याच कडव्या धर्मांधतेनं उत्तर दिल्यानं देशाची आणखी एक फाळणी होईल. मोदी-शहांना तेच घडवायचंय, कारण हिंदू राष्ट्राच्या दिशेनं ते संघ परिवाराचं एक पाऊल असेल. देशाच्या संविधानाला असलेला हा धोका ओळखून विरोधकांनी मोदी सरकारच्या अपयशावर आपलं लक्ष केंद्रीत केलं पाहिजे.

‘अच्छे दिन’चा दावा करणाऱ्या या सरकारची गेल्या चार वर्षांतली कामगिरी निराशाजनक आहे. आर्थिक-सामाजिक-राजकीय अशा सर्व आघाड्यांवर मोदींनी केवळ प्रसिद्धी मिळवण्यापलीकडे काही केलेलं नाही. शेतकरी, कामगार, बेरोजगार तरुण, व्यापारी, परदेशी गुंतवणूकदार अशा सर्व वर्गात तीव्र नाराजी आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव वाढल्याने महागाई हाताबाहेर गेली आहे. मोदींना याच प्रश्नांची चर्चा नको आहे. म्हणून ते आणि भाजप हिंदू-मुसलमानांमध्ये आगी लावण्याचा प्रयत्न करत आहे. मग देश पेटला तरी बेहत्तर!

खरं तर उत्तर प्रदेशातल्या कैराना मतदारसंघात अलिकडेच झालेल्या पोटनिवडणुकीनं विरोधकांना योग्य मार्ग दाखवून दिला आहे. राष्ट्रीय लोकदलाचे तरुण नेते जयंत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निवडणुकीत विरोधकांनी भाजपला धूळ चारली. ‘गन्नेने जिन्ना को हरा दिया’ हे चौधरी यांचं म्हणणं खरंच आहे. ऊस शेतकऱ्यांचे प्रश्न विरोधकांनी लावून धरल्यानं भाजपचा दंगलखोर प्रचार यशस्वी होऊ शकला नाही. हीच रणनीती २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत यशस्वी होऊ शकते.

शेवटी, माझा एकच सवाल आहे. सर्वच राजकीय पक्षांना, पण पंतप्रधान म्हणून मोदीजींना सगळ्यात आधी. केवळ राजकीय स्वार्थासाठी आपण या देशाची किती वेळा फाळणी करणार आहात? या देशांतल्या जनतेला भूक आहे खऱ्याखुऱ्या विकासाची. तो आम्हाला कधी दिसणार आहे? की तुमचं ‘अच्छे दिन’चं स्वप्न फक्त दिवास्वप्नच राहणार आहे काय?

............................................................................................................................................

लेखक निखिल वागळे ‘महानगर’ या दैनिकाचे आणि ‘IBN लोकमत’ या वृत्तवाहिनीचे माजी संपादक आहेत.

nikhil.wagle23@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Pravin Bhikale

Mon , 30 July 2018

वागले सर, लेख उत्तम होता .... मोदी नंतर देशात जातीवाद वाढला आणि अचानक ८०% हिंदू समाजाला हाताच्या बोटावर मोजन्याइतक्या मुस्लीम समाजाकडून धोका असल्याची भावना निर्माण केली गेली ..... मोदींची कॉंग्रेस च्या इतिहासावरची टीका सतत असते कारण स्वतःचा वर्तमान रिकाम आहे


Girish Khare

Sun , 22 July 2018

वागळे, देशातील सगळ्या जिल्ह्यात शरीया न्यायालये स्थापन करायच्या प्रस्तावाविषयी तुमचे आणि तुमच्यासारख्या स्वयंघोषित पुरोगाम्यांचे काय म्हणणे आहे? त्यातून फाळणीची बीजे रोवली जाणार नाहीत वाटते?


vishal pawar

Fri , 20 July 2018


Kalpak Mule

Thu , 19 July 2018

या निखिल वागळेंच महाराष्ट्राने करायचे काय? खरं तर महानगरचे निखिल वागळे हे माझे आणि माझ्या पिढीचे आवडते पत्रकार होते. (मी आता चाळीशीच्या उंबरठ्यावर आहे.) नंतर त्यांचं काय झालं हे त्यांनाच माहिती? पण सद्याचे त्यांचे लिखाण वाचून असंच वाटते की, कुमार केतकर राज्यमंत्री झाल्यानंतर 'आता माझाच नंबर', या थाटातच ते वागत आहेत. एखाद्या पक्षाच्या विचारांशी बांधीलकी असावी पण अशी? म्हणजे 'काँग्रेस मुसलमनो का भी पक्ष है' हे काँग्रेस ने बोललेले त्यांना चालते. पण मग 'भाजप हिंदुचाच पक्ष आहे' हे जर भाजप बोलत असेल तर त्यात काय हरकत आहे. MIM नाही का फक्त मुसलमानांचा पक्ष आहे. पुरोगामीत्वाचा बुरखा कीती वर्ष घालून वावरणार. एक वेळ मुसलमान अभिमानाने बोलू शकतात की मी मुसलमान आहे पण सद्या महाराष्ट्रात तरी मी सोनार, मी भंडारी, मी अमक्या जातीचा हे सांगितले तर चालेल, पण मी हिंदू म्हणून जर तो बोलला तर ते वागळेंच्या दृष्टीने पाप ठरेल.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......