गांधी : २१ व्या शतकाच्या संदर्भात
सदर - गांधी @ १५०
भिकू पारेख
  • २ ऑक्टोबर २०१९ रोजी म. गांधी यांची १५०वं जयंती वर्षं साजरं केलं जाईल
  • Mon , 02 July 2018
  • गांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma Gandhi

२ ऑक्टोबर २०१९ रोजी म. गांधी यांची १५०वं जयंती वर्षं साजरं केलं जाईल. त्याचं निमित्त साधून वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमानं २१-२२ फेब्रुवारी २०१७पासून ‘गांधी १५० जयंती अभियान’ सुरू केलं आहे. (२२ फेब्रुवारी हा गांधींच्या पत्नी कस्तुरबा यांचा स्मृतिदिन असतो.) या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम केले जाणार आहेत. त्याला प्रतिसाद म्हणून ‘अक्षरनामा’वर दर महिन्याच्या दोन तारखेला गांधींविषयी एक लेख प्रकाशित केला जातो… या मालिकेतला हा चोविसावा लेख ...

.............................................................................................................................................

गांधींविषयी अगदी थोड्या शब्दांत सांगायचे असेल तर त्यांचेच शब्द वापरून मी म्हणेन, त्यांनी आपलं आयुष्य ‘सत्याकडून सत्याकडे वृद्धिंगत होण्यात’ वेचलं. दुसऱ्या शब्दांत, गांधी असं म्हणत की, मी एक माणूसच असल्याने माझे ‘परमसत्याचे’ किंवा कोणत्याही गोष्टीचे आकलन परिपूर्ण नाही; जीवन म्हणजे आपल्या मर्यादा, आपले पूर्वग्रह यांच्यातून सतत वर उठायचं; नेहमी इतरांच्या संपर्कात रहायचं आणि या वाटचालीत ‘सत्याकडून सत्याकडे’ मोठं होत जायचं.

२१ व्या शतकाच्या संदर्भात महात्मा गांधींचे काय महत्त्व आहे? मला वाटतं, हे समजावून घ्यायचा उत्तम मार्ग म्हणजे २० वे शतक सुरू झाल्यावर आपल्यासमोर कोणते महत्त्वाचे प्रश्न उभे होते (जे अजूनही आपला पिच्छा सोडत नाहीत आणि कदाचित या पुढेही शंभर वर्षे सोडणार नाहीत) याचा ऊहापोह करायचा. अशा अनेक समस्यांचा विचार करताना माझ्यासमोर चार कळीच्या समस्या उभ्या राहतात.

१. विविध संस्कृती आणि सभ्यतांमधील संघर्ष.

२. सामाजिक जीवनातील धर्माची भूमिका.

३. हिंसेला पर्याय आहे का?

४. वैयक्तिक सचोटीला स्थान आहे का?

१. विविध संस्कृती आणि सभ्यतांमधील संघर्ष

सर्वप्रथम संस्कृती-संघर्षाचा विचार करू. जागतिकीकरणाला धन्यवाद दिले पाहिजेत. कारण जागतिकीकरणामुळे वेगवेगळ्या संस्कृती आणि सभ्यता एकत्र येत आहेत. एकत्र येत असताना त्यांना एकमेकांबाबत काही जाण नसते, उलट गैरसमजच असतात. ही परिस्थिती कशी हाताळायची? अनेक लोक म्हणतात की, सभ्यता व संस्कृती यांच्यामध्ये संघर्ष होणं अटळ आहे. पण गांधींचा या परिस्थितीवरील तोडगा वेगळा होता. २००१ सालच्या ११ सप्टेंबरला प्रलयंकारी धमाका झाला, तेव्हा अनेक जण त्याला दोन सभ्यतांमधील संघर्ष समजत होते. त्यानंतरच्या घडामोडींमुळे हा समज आणखी दृढ झाला. आणि आता हे लोक असं म्हणू लागले आहेत की, ‘यापुढे आपण जग कह्यात ठेवू शकू, आपली मूल्ये जतन करू शकू आणि शत्रूला चार हात दूर ठेवून जगात स्थैर्य राखू शकू, अशी केवळ आशाच करू शकतो. त्यामुळे यापुढे वेळोवेळी उद्भवणाऱ्या अशाच संघर्षांना तोंड देण्यास सज्ज राहावे लागणार आहे.’ याउलट, गांधींचा युक्तिवाद होता-

अ) कोणताही संघर्ष अपरिहार्य नसतो.

ब) संघर्ष अटळ आहे असं मानून तुम्ही आपल्या प्रतिस्पर्ध्यांना असुर बनवता; त्यांना अमानुष मानता; त्यांना मानवी समूहातून हद्दपार करता. त्यांना अमानुष ठरवल्यावर तुम्ही असं समजता की ‘ती माणसंच नाहीत, तेव्हा आपण त्यांचं काहीही करायला हरकत नाही’. मग तुम्ही त्यांची ‘शिकार’ करता. मध्यपूर्वेतल्या अनेक देशांमध्ये एखाद्या व्यक्तीला ‘दहशतवादी अल् कायदाचे समर्थक’ ठरवून कैद केलं किंवा मारूनही टाकलं तर मारणाऱ्याला त्याचं श्रेयच मिळतं. याचाच अर्थ असा की एकदा तुम्ही माणसांना अमानुष ठरवलं तर तुम्ही स्वतःला अमानुष करू लागता, कारण त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्याखेरीज दुसरा मार्गच नाही असं तुम्ही समजू लागता. एरवी तुमच्या आचारात दिसणारं नैतिक संयमन आणि विधिनिषेध हे सारं या शत्रूशी वागताना नाहीसं होतं.

गांधींचं हे विश्लेषण आता खरं ठरू लागलं आहे, कारण आपण जर प्रेसिडेंट बुश अल् कायदाबाबत आणि ओसामा बिन लादेन अमेरिकन लोकांबाबत काय बोलत असत हे पाहिलं तर त्यामध्ये खूपच साम्य दिसून येतं. ओसामा म्हणतात, ‘तुम्ही भांडवलवादी पाश्चिमात्त्य अमेरिकन लोक म्हणजे पापी लोकांचा कणा (अ‍ॅक्सिस) आहात. तुमच्या समाजाची अवनती होत आहे.’ बुश ओसामांबाबत हेच म्हणतात. ओसामा म्हणतात, ‘तुमच्यामध्ये कोणीही निष्पाप नाही, कारण आमच्यावर तुम्ही करत असलेल्या जुलुमाच्या पापांचे तुम्ही सर्वच भागीदार आहात.’ बुशसुद्धा असेच म्हणतात, ‘(या बाबतीत) तुम्ही एक तर आमच्या बाजूचे आहात नाही तर आमच्या विरुद्ध (आमचे शत्रू) आहात.’

दक्षिण आफ्रिकेतील वंशवादाविरोधातील त्यांच्या चळवळीमध्ये किंवा भारतातील ब्रिटिशांच्या विरोधातील हक्क नसलेल्या गरीब जनतेच्या चळवळीमध्ये गांधी पुन्हा पुन्हा सांगत असत की, तुम्ही आपल्या शत्रूचीच हुबेहूब प्रतिमा बनत जाता हे मला उत्तरोत्तर स्पष्ट दिसून आले आहे. ही ‘नो विन सिच्युएशन’ आहे. म्हणजे यामध्ये दोन्ही पक्ष अयशस्वीच राहतात. शत्रूला हरवण्याच्या खटाटोपात तुम्ही स्वतःमधलंच काहीतरी अत्यंत महत्त्वाचं हरवून बसता. यावर गांधी म्हणतात, आपल्याला गरज आहे ती संस्कृतींमध्ये सुसंवाद साधण्याची; एकमेकांना समजून घेण्याची; आणि या प्रक्रियेतून हे उमगण्याची की ही इतर माणसं दुसरी किंवा परकी किंवा आपले वैरी नाहीत. ही माणसं म्हणजे आपणच आहोत. केवळ थोडेसे वेगळे दिसणारे आपण आणि आपल्या सर्वांचाच एक सामायिक समाज आहे.

अर्थात हे म्हणणं फार सोपं आहे, पण मला इथे अशा तऱ्हेच्या व्यासपीठांवरून जे विनयशीलतेने व सभ्यतेने वादविवाद होत असतात त्यांचा तपास करायचा आहे. यामध्ये तुमचं म्हणणं मी ऐकतो आणि माझं तुम्ही ऐकता; मग आपण दोघेही आपापल्या घरी निघून जातो; स्वतःमध्ये तसूभरही फरक होऊ न देता! ही बेइमानी आहे. हा संवाद नसून एकामागून एक होणारी स्वगतं आहेत. आपण एक-दुसर्‍याला भला माणूस किंवा भली महिला मानतो, पण एकमेकांच्या श्रद्धा-धारणा यांच्याबाबत अजिबात चिकित्सा करीत नाही. परंतु गांधींची चिंता होती ती- ‘सत्याकडून सत्याकडे जाण्याची!’ त्यांच्या मते प्रामाणिक संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण...

अ) कुठली गोष्ट तुम्हाला उद्युक्त करू शकते हे मला कळायला हवं; ज्यातून तुम्ही जगाकडे पाहता ते तुमच्या आतील विचारविश्व मला समजून घ्यायला हवं.

ब) मी तुमच्याकडून काय शिकू शकतो? खरा संवाद उद्भवतो मोठं होण्याच्या, स्वतःचं विश्व व्यापक करून स्वतःला समृद्ध करण्याच्या उत्कट इच्छेतून. यातून पुढचा प्रश्न उभा राहतो, ही उत्कट इच्छा कुठून निर्माण होते? गांधी म्हणतात, ती येते तुम्ही आपल्या स्वतःच्या मर्यादा ओळखण्यातून, आपल्या मर्यादांच्या जाणिवेतून. याचा अर्थ असा की, खरा संवाद साधायचा आधार आहे आत्मपरीक्षण. मी माझ्या स्वतःबद्दलच सखोल विचार करणं, स्वतःच्या आणि संस्कृतीमध्ये असलेल्या मर्यादा ओळखणं. त्यासाठी मला स्वतःला इतरांसमोर उघड करायचं आहे आणि इतर काय म्हणतात ते ऐकायचं आहे. आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी माझ्या विचारप्रक्रियेत सामावून या सर्व वाटचालीतून मोठं व्हायचं आहे.

गांधी सांगत असलेल्या या क्रियाशील आणि चिकित्सक देवाणघेवाणीचं (एंगेजमेन्ट) मी एक उदाहरण देतो. आयुष्यभर  त्यांनी स्वतःच्या संस्कृतीचा सखोल विचार केला आणि सर्व संस्कृतींमध्ये हिंदू-बौद्ध-जैन ही आपली संस्कृती अहिंसेची फार मोठी पुरस्कर्ती आहे, याचा त्यांना आनंद वाटला. आपल्याच संस्कृतीमधून त्यांनी अहिंसेच्या काही कल्पना उचलल्या. परंतु त्यावर चिंतन केल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की, अहिंसा ही कल्पना काहीशी नकारात्मक आहे. भारतीयांच्या मते अहिंसा म्हणजे दुसऱ्याला इजा न पोचवणं. त्यामध्ये आपण पुढे होऊन गरजूंना मदत करणं आलेलं नाही. अशी अहिंसा क्रियाशून्य असते. तीमध्ये जनतेच्या सेवेचं आणि प्रेमाचं क्रियाशील चैतन्य नाही. म्हणून गांधी ख्रिश्चन धर्माकडे वळले. दक्षिण आफि‘केतल्या उण्यापुऱ्या २१ वर्षांच्या अवधीत त्यांना ख्रिश्चन धर्माबाबत फार आपुलकी वाटत होती. प्रेम ही कल्पना त्यांनी या धर्मामधून घेतली-जागृत, क्रियाशील प्रेम! हिंदू अहिंसेशी ख्रिश्चन क्रियाप्रवण प्रेमाची सांगड घालून त्यांनी ‘मानवतेच्या प्रेमापोटी क्रियाशील सेवा’ ही संकल्पना मांडली. यावरही नंतर विचार केल्यावर प्रेम या कल्पनेमध्ये भावुकता असल्याने त्याबाबत ते समाधानी नव्हते. अंतरंगामध्ये भावनिक अस्वस्थता निर्माण होणार नाही अशा निष्काम प्रेमकल्पनेचा ते शोध घेत होते. हा शोध घेत ते हिंदू धर्मातील विरक्ती या धारणेकडे वळले आणि समस्त मानवजातीच्या प्रेमाप्रीत्यर्थ पण निष्काम राहून जगातील घडामोडींमध्ये सक्रिय सहभाग व योगदान ही कल्पना त्यांनी मांडली. तेव्हा आपल्या समोर आलेले गांधी म्हणजे विविध धर्मांतील कल्पना हाताळणारा, त्यांच्यावर प्रयोग करणारा असा मानव आहे. यामध्ये भर पडली आहे ती त्यांनी वेळोवेळी केलेल्या अन्नसत्याग्रहाची; हे सत्याग्रहसुद्धा दोन परंपरांमधील सृजनशील तणावांमधून उद्भवेलेले होते. विविध संस्कृतींमधल्या संवाद प्रक्रियेबाबत गांधी बोलतात तेव्हा त्यांना हे सारे अभिप्रेत असते. गांधीजी म्हणतात, की याचा अर्थ असा, ‘(संवादामध्ये) इतर संकृती माझ्या प्रतिवादी असतात, त्यामुळे या इतर संस्कृती माझी स्फूर्तिस्थानेही आहेत. त्या सर्वांचं मी अभीष्ट चिंतितो आणि त्या सर्व संस्कृती फळाफुलाव्यात अशीच माझी इच्छा आहे.’ तेव्हा अशा तऱ्हेच्या संवादातून वेगवेगळ्या विचारांच्या दृष्टिकोनांबाबत वैश्विक सहानुभूती आणि त्या सर्वांचा उत्कर्ष व्हावा अशी इच्छा निर्माण होत असते.

२. सार्वजनिक जीवनातील धर्माची भूमिका

सार्वजनिक जीवनात धर्माची भूमिका काय असावी हा दुसरा प्रश्‍न. सार्वजनिक जीवनात धर्माला स्थान द्यायला आपल्यापैकी बरेच जण घाबरतात. कारण धर्म आल्यावर काय होतं हे आपण जाणतो; एक तर त्यातून आयातुल्ला खोमेनी पुढे येतात किंवा भारतातल्यासारखा भारतीय जनता पक्ष किंवा रेगन साहेबांना दुष्ट रशियाशी युद्ध पुकारायला सांगणारे अमेरिकेमधले ‘इव्हँजेलिस्ट’. म्हणून धर्म भयावह आहे. उदारमतवाद्यांना वाटतं की, धर्माला राजकारणाच्या बाहेरच ठेवावं. जेव्हा केव्हा त्यांना एखादी धार्मिक व्यक्ती भेटते किंवा एखादे धार्मिक विधान त्यांच्या कानावर पडते, तेव्हा ते म्हणतात, ‘तुम्ही तुमच्या मतानुसार जरूर वागा, पण राजकारणात धर्म आणू नका, कारण तुम्ही भूतकाळातील उत्कट धार्मिक भावना चेतवाल आणि पराकोटीच्या मागण्या कराल. कारण धर्म केवळ भावनेच्या भाषेतच बोलत असतो. राजकारणात असं चालत नाही. तिथे नेहमी वाटाघाटी करून समझोता करावा लागतो.’

इथे अडचण अशी असते की, धार्मिक मंडळींना धर्माचं खाजगीकरण अशक्य वाटतं. त्यांच्या मते, धर्म म्हणजे केवळ तुम्ही आणि तुमचा देव यांच्यातला संवाद किंवा ध्यानधारणा नाही तर धर्म म्हणजे घट्ट कवटाळलेली मूलभूत मूल्यं. ही मूल्यं तुम्हाला जगायची असतात, ती तुमच्या आचार-विचारांना आशय देतात; आणि म्हणूनच ती तुमचे सार्वजनिक जीवनही घडवतात. धर्माला सार्वजनिक जीवनातून हद्दपार करता येत नाही. पण त्याच वेळी धर्म जेव्हा राष्ट्राचा धर्म बनतो, शासकीय धर्म बनतो तेव्हा शासन त्या धर्माची विशिष्ट मूल्ये लोकांवर लादू पाहते- जसे इराण, अफगाणिस्तान आणि इतर अनेक देशांमध्ये होत आहे. तेव्हा इथे आपल्यापुढे असा प्रश्न आहे- ज्याचं उत्तर आपल्याला गांधींच्या विचारातच मिळू शकतं- की धर्म हा माणसाच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातला महत्त्वाचा घटक आहे हे मान्य करताना दुसऱ्या बाजूला धर्माने शासनच ताब्यात घेणं आणि एक अनुदार अधिकारशाही बनणं टाळायचं कसं?

या बाबतीत गांधींचं मत महत्त्वाचं आहे. ते म्हणतात, सार्वजनिक जीवनात धर्म केंद्रस्थानी आहे, पण त्याचा शासनाशी काहीही संबंध नाही. याचा अर्थ असा की गांधीजींच्या धर्मविचारांमध्ये सार्वजनिक क्षेत्र आणि शासकीय संस्था एकमेकांपासून स्वतंत्र ठेवणं हे तत्त्व केंद्रस्थानी आहे. म्हणून सार्वजनिक जीवनामध्ये धर्माचं स्थान रास्त असलं तरी शासकीय संस्थांचा धर्माशी काहीही संबंध असता कामा नये, त्या धर्मनिरपेक्षच असायला हव्यात. गांधींनी धार्मिक संस्थांना किंवा त्यांच्या शाळांना सरकारी अनुदान देण्यास विरोध केला याचे बरेच जणांना आश्चर्य वाटले. कारण गांधींच्या मते ही शासनाची जबाबदारीच नव्हे. कोणतीही धार्मिक संघटना तिच्या सदस्यांच्या बळावर टिकू शकत नसेल तर ती जिवंतच नसते. तुम्हाला तुमचा धर्म एवढा प्यारा असेल तर तो टिकावा म्हणून लागणारा निधी तुम्ही स्वकष्टाने जमवायला हवा. म्हणून त्यांचा पहिला महत्त्वाचा मुद्दा असा होता की, आपल्या देशाचं शासन धर्मनिरपेक्ष असावं आणि सार्वजनिक जीवनात धर्माला महत्त्वाचं स्थान मिळावं.

गांधींनी मांडलेला दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की कोणताही धर्म परिपूर्ण असू शकत नाही, तसाच कोणताही देशसुद्धा पूर्णपणे निर्दोष असू शकत नाही हे प्रत्येकाने मान्य केलेच पाहिजे. आता या बाबतीमध्ये अत्यंत गुंतागुंतीचा युक्तिवाद असतो ज्यामध्ये इथे आपल्याला शिरता येणार नाही; विशेषतः जेव्हा धर्म त्यांच्या परब्रह्माकडून थेट साक्षात्कार झाल्याचा दावा करतात तेव्हा. उदा. अल्लाने स्वतः कुराण विदीत केले; येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे; इत्यादी. हे धर्म स्वतःला परिपूर्ण, निर्दोष मानतात. त्यामुळे ‘कोणताही धर्म परिपूर्ण असू शकत नाही’ या महात्मा गांधींच्या वचनाला त्यांचा जोरदार आक्षेप असायला हवा. गांधींचा युक्तिवाद काहीसा असा होता. ईश्वर अनंत, असीम आहे; त्यामुळे सान्त, मर्यादित मानवी मन हे अनंत रूप ग्रहण करू शकत नाही, मन:चक्षूंसमोर आणू शकत नाही; म्हणून आपलं आकलन आणि आपल्या जाणीवा मुळातच मर्यादित असतात आणि अगदी थेट ईश्वराच्या तोंडून जरी संदेश मिळाला असला तरी तो मानवी मर्यादा असलेल्या मानवाच्या भाषेतच मिळणार, त्याला त्या विशिष्ट व्यक्तीच्या- तो प्रेषित असो वा आणखी कोणी- मानवी मर्यादाही असणार. म्हणून ते म्हणतात की प्रत्येक धर्म मानवी जीवनाचं काही एक विशिष्ट दर्शन (पर्सेप्शन) अंगिकारतो, हीच त्याची शक्ती असते. आणि मानवी जीवनाचे जे पैलू त्या त्या धर्माच्या दर्शनामधून निसटलेले असतात ते त्या धर्माच्या त्रुटी असतात. म्हणून प्रत्येक धर्माला देवाशी तसाच इतर धर्मांशी चिकित्सक संवाद साधण्यातून लाभ होतो. कारण इतर धर्मांशी साधलेल्या संवादातून तुम्हाला ते धर्म ईश्वराच्या परमसत्तेचे (अल्टिमेट रिअ‍ॅलिटी) आकलन कसे करतात याची जाण येते, इतर धर्माचं आणि ईश्वरी सत्तेचे तुमचे आकलन जास्त सखोल होते.

गांधी नेहमी जैन परंपरेतील सर्वांनाच परिचित असलेले सात आंधळ्यांनी केलेल्या हत्तीच्या आकलनाचे एक उदाहरण देत असत. एकाच्या हाती सोंड येते, तो म्हणतो देव असा असतो; दुसरा पाय पकडतो आणि म्हणतो देव खांबासारखा आहे; इत्यादी. गांधी म्हणतात, प्रत्येक जण काही ना काही ग‘हण करतोच पण प्रत्येक जण मर्यादित आहे. एखादा देखावा आपण सर्वांनी पाहिला असला तरी त्याचं प्रत्येकाने केलेलं वर्णन एकसारखं नसतं. ते असतं प्रत्येकाच्या यथार्थ दर्शनानुसार (पर्स्पेक्टिव्ह) अगदी स्वतंत्र. मग अनंताबाबत आणि ईश्वराबाबत ते एकच कसं असू शकेल?

तेव्हा एका धर्माची दुसऱ्या धर्माप्रती असलेली उचित अभिवृत्ती (अ‍ॅटिट्यूड) म्हणजे इतरांना धर्मान्तर करून आपल्या धर्मात आणायचं ही नव्हे, तर चिकित्सक संवादातून स्वतःचा फायदा करून घेणं ही असायला हवी. या मार्गाने तुम्ही धार्मिकांची मांदियाळी बनवू शकाल; वेगवेगळ्या धर्माच्या श्रद्धाळूंमध्ये वैरभाव नाहीसा करून त्यांच्यात बंधुभाव आणि एकजूट निर्माण करू शकाल.

३. हिंसेला पर्याय

माझा तिसरा प्रश्न होता, महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानात हिंसेला पर्याय आहे का? तत्त्वतः त्यांचा हिंसेला पूर्ण विरोध होता. पण प्रत्यक्षात त्यांनी वेळोवेळी हिंसक कृतींकडे डोळेझाक केली होती. त्यांच्या मते माणसं जेव्हा अगतिक होतात, पराकाष्ठेच्या दबावाखाली असतात तेव्हा त्यांची प्रतिक्रिया हिंसक बनते हे आपण समजू शकतो; परंतु ती स्वाभाविक असली तरी समर्थनीय नसते. आपण अन्यायाविरुद्ध संघर्ष केलाच पाहिजे- तिथे मात्र कुठलीही तडजोड नसावी. तुम्ही शांततावादी असलात तरी तुम्हाला आजूबाजूच्या परिस्थितीशी काहीच देणंघेणं नाही असा त्याचा अर्थ होत नाही. जिथे अन्याय दिसेल तिथे तुम्ही काही तरी केलंच पाहिजे. पण त्यावर हिंसक प्रतिकार हाच उपाय आहे का? गांधींच्या मते हा उपाय नाही, कारण कोणतीही हिंसा म्हणजे अन्यायच आहे. त्यामध्ये द्वेष आहे आणि त्यातून शाश्‍वत असं काही प्राप्त होत नाही. हिंसेतून नेहमी असूया आणि आकस मागे शिल्लक राहतात. पण हिंसा हा उपाय अमान्य केला तरी अन्यायाचा प्रतिकार केलाच पाहिजे.

यावरचा एकच उपाय म्हणजे विवेकपूर्ण विचारविनिमय (रॅशनल डिस्कशन). पण गांधी म्हणतात की ते जीवनात एक अत्यंत महत्त्वाचा धडा शिकले आहेत आणि तो म्हणजे ‘विवेकालाही त्याच्या मर्यादा असतात. विवेक एका विशिष्ट पायरीपर्यंत आपल्याला नेऊ शकतो, पण हृदय कठोर आणि ताठर असेल तेव्हा विवेक निरुपयोगी ठरतो. गरज असते बुद्धी आणि मनाच्या ऐक्याची. विवेक बुद्धीला पटवून देऊ शकतो परंतु माणसाच्या हृदयाला, सदसद्विवेकाला, नैतिकतेला चालना देता आली तरच तुमचा प्रतिवादी तुम्हाला माणूस म्हणून ओळखू शकेल आणि मग विवेकपूर्ण विचारविनिमय सुरू करता येईल. विवेकाला मर्यादा असतात आणि म्हणून एखादा पक्का विवेकवादी हिंसेचा प्रवक्ता झालेला दिसतो. उदा: जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीला एखादी गोष्ट पटवून देऊ शकत नाही अशा वेळी विवेकवादी म्हणेल, ‘ही समोरची माणसं नैतिकतेच्या बाबतीत मठ्ठ आहेत; त्यांच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही, ते विवेकी नाहीत, ती माणसंच नाहीत. यांना हिंसक मार्गाने धडा शिकवणं शहाणपणाचं ठरेल.’ गांधींच्या मते विवेक आणि हिंसा यांच्यातील नातं आपल्याला वाटतं त्यापेक्षा जास्त जवळचं आहे.

मग दुसरे काय पर्याय आहेत? तुमच्या लक्षात येईल सत्याग्रह म्हणजे ‘आत्म्यावरची शस्त्रक्रिया’, विवेकाला मेंदूशी जोडणं आणि अहिंसक प्रतिकाराला हृदयाशी जोडणं. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर ज्या क्षणी अन्याय करणारा अन्यायाचा बळी असलेल्या व्यक्तीला माणूसच समजत नाही, त्या वेळी अन्याय करणाऱ्याच्या सदसद्विवेकबुद्धीला आपण चालना कशी देऊ शकू; अन्याय करणारा आणि त्याचा बळी दोघेही माणसेच आहेत आणि दोघांनाही सारखेच मानवी अधिकार आहेत हे त्याला कसे पटवू शकू असे प्रश्न उभे राहतात. यावर गांधींचं उत्तर असं की, इतर लोकांच्या पापाचं आणि अहिंसक वेदनांचं ओझं तुम्ही उचला. सत्याग्रह किंवा अहिंसेच्या मार्गक‘मणाकडे पहा. त्यात कालानुसार उत्क्रांत झालेल्या तीन पद्धती किंवा आचारमार्ग दिसतील.

१. असहकार : शासन दुष्ट आहे हे लोकांना उमगेल; असे शासन चालू राहण्यामध्ये त्यांची स्वतःची साथ असते याची त्यांना जाणीव होईल आणि अशा शासनाला सहकार देणं ते नाकारतील.

२. बहिष्कार : उदाहरणार्थ- इंग्लंडमधून आयात केलेल्या कपड्यावर बहिष्कार टाकून देशी हातमागावर विणलेला कपडा वापरणे.

३. सविनय कायदेभंग : यामध्ये तुम्ही कायद्याचे उघडपणे उल्लंघन करता, कारण तो विशिष्ट कायदा पाळणं तुमच्या सदसद्विवेकबुद्धीला पटत नाही. कायद्याचा भंग केल्यामुळे त्यासाठी जी शिक्षा सांगितलेली असेल ती भोगायला तुम्ही तयार असता, पण माफी मागण्यास नकार देता.

अशा तऱ्हेचा सविनय कायदेभंग आणि अशा प्रकारचा असहकार आता २१ व्या शतकातसुद्धा खूप व्यापक प्रमाणावर दिसू लागला आहे. हे केवढे आश्चर्य आहे! मीही त्यामध्ये अप्रत्यक्षपणे योगदान देत आहे. अनेक चर्चांच्या वेळी, जेव्हा लोक इराकमधल्या युद्धाबाबत विचारत होते; ब्रिटनमध्ये १० लाखांपेक्षा जास्त लोकांनी आणि जगभरामध्ये काही लाख लोकांनी त्याविरुद्ध निदर्शने केली; जेव्हा धार्मिक लोकही त्याविरुद्ध आवाज उठवत होते आणि तरीही इराकमधली लढाई चालूच राहिली होती. ही लढाई थांबवण्यासाठी आम्ही काय करू शकलो असतो? आणि अशीच लढाई पुन्हा सुरू झाली तर ती थांबवण्यासाठी आपण काय करायला हवं? सविनय कायदेभंग हे त्याचं उत्तर असू शकेल असं आता खूप जणांना वाटू लागलं आहे आणि त्यांची संख्या उत्तरोत्तर वाढतच आहे. कायदेभंग कसा करणार? आपण कर देणार नाही; त्यांच्याशी सहकार्य करणार नाही. आणि निदर्शनं करण्याऐवजी जर करोडो लोकांनी असं केलं तर काय होईल?

हेच व्हायला इथे सुरुवात झाली आहे. मेन विश्वविद्यालयातील तत्त्वज्ञान विषयाचे प्राध्यापक, एक विद्वान गांधीवादी आणि माझे मित्र प्रोफेसर डग्लस अ‍ॅलन यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या सहकारी प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन त्यांच्या सेनेटरच्या (प्रतिनिधी) कार्यालयासमोर शांततापूर्ण निदर्शने केली. त्यांना अटक करून त्यांच्यावर फिर्याद करण्यात आली आणि समाजसेवा करण्याची शिक्षाही ठोठावण्यात आली. डग्लस मला सांगत होते, अमेरिकेतील बर्‍याच लोकांना आता उत्तरोत्तर असं वाटू लागलं आहे की इराकसारखं संकट क्षितिजावर झेपावू लागलं तर आम्हांला आमची प्रत्यक्ष कृती बरीच तीव्र करावी लागेल, तिचा वेग वाढवावा लागेल. गांधीही असंच करीत होते. मला वाटतं, आपण असा प्रश्न विचारला पाहिजे की गांधींनी अंमलात आणलेले हेच मार्ग किंवा याच पद्धती आपल्याला उपलब्ध आहेत, का आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा सदसद्विवेक जागृत करण्यासाठी आणि शासनाला अन्यायापासून परावृत्त करण्यासाठी आपण काही वेगळे मार्ग आखू शकू, अवलंबू शकू? असे आणखी कोणते मार्ग असू शकतात?

नजीकच्या काळातच मी जेव्हा इस्रायलमध्ये होतो तेव्हा माझ्या अनेक अरबी यजमानांना इस्रायलविरुद्ध अहिंसेचा मार्ग अवलंबता येईल का असा प्रश्न विचारत असे. कारण कोणत्याही हिंसक कृतीला इस्रायल जास्त हिंसक प्रत्युत्तर देईल. पण मी असं सुचवलं की समजा तुम्ही गांधीजींसारखा अहिंसक, निःशस्त्र प्रतिकार करायचं ठरवलंत; (सविनय कायदेभंग, असहकार अवलंबिला आणि इस्रायलींना सांगितलंत की, आम्ही तुम्हांला कोणतीही इजा पोचवणार नाही, पण तुम्ही आमच्यावर अन्याय आणि जुलूम करण्याचे बंद करा; तुम्हांला आमच्यावर गोळ्या झाडायच्या असल्या तर खुशाल झाडा.) तर तुम्हांला असं वाटतं का की इस्रायली शासनाने हजारो किंवा त्यापेक्षाही जास्त लोकांचे बळी घेतले असते? तुमच्या अहिंसक चळवळीकडे सगळ्या जगाचे डोळे लागलेले असताना गोळ्या झाडून त्यांना किती यश मिळेल? गांधींचा मार्ग जटिल गुंतागुंतीच्या परिस्थितीतही अवलंबणं शक्य आहे. पण तो यशस्वी होईलच अशी खात्री देता येत नाही. उदा : सोव्हिएत युनियनमध्ये स्टॅलिनच्या विरोधात किंवा हिटलरविरुद्ध जर्मनीमध्ये अहिंसेचा मार्ग उपयोगी ठरला नसता. कारण काय घडतं आहे हे जगाला सांगायला साक्षीदार नव्हते. पण २१व्या शतकात अशी परिस्थिती राहिलेली नाही. इंटरनेटचे जाळे जगाच्या कानाकोपऱ्यात पसरले आहे. कोणीही कुठेही केव्हाही संपर्क साधू शकतो. मला वाटतं या परिस्थितीमध्ये गांधींच्या मार्गाने यश मिळवणं शक्य आहे.

४. वैयक्तिक सचोटीचे स्थान

आता माझ्या चौथ्या प्रश्नाकडे वळू या. वैयक्तिक सचोटीला सध्याच्या परिस्थितीत काही स्थान आहे का? आपल्याला जे अनुभव येतात त्यानुसार आपल्या मूल्यांमध्ये सुधारणा होत असते हे आपण सर्व जाणतो. पण एकदा ही सुधारित मूल्यं योग्य आहेत हे तुमच्या मनात ठसलं म्हणजे मग तुम्ही ईश्‍वरशास्त्रवेत्ता (थिऑलॉजियन) मार्टिन ल्यूथरप्रमाणे म्हणता, ‘यांच्याविपरीत मी काहीच करू शकत नाही. हेच माझं जीवन आहे- ती मूल्यं ज्यांच्या पायावर माझं जीवन रचलं आहे, त्यांना धरूनच मला जगायचं आहे.’

गांधींचा मूल्यांकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन होता. त्यांच्या मते तुम्ही काय आहात, हे तुमची मूल्यं ठरवतात. तुमची मूल्यं हेच तुमचं सत्य. माझ्या जीवनाचं सत्य म्हणजे ज्या मूल्यांनुसार मी जगतो त्या मूल्यांचं सत्य. म्हणून त्यांच्या मते सचोटी म्हणजे ‘माझ्या सत्यानुसार मी कसा जगू शकेन? ते सत्य जे मला दिसतं आहे आणि हे ध्यानात ठेवून की मी सतत सत्याकडून सत्याकडे प्रगती करीत आहे. उदाहरणार्थ- गांधी म्हणतील की भांडवलशाही आणि साम्यवाद दोन्हीही अभद्र आहेत, पण त्यांच्या विरुद्ध केवळ मोहिमा काढीत बसण्यात अर्थ नाही. हे जर अभद्र असतील तर तसे तुमच्या जीवनातून दिसून येते की नाही? मालकीची इच्छा, मालमत्तेची खरेदी इत्यादी भांडवलशाहीतील अभद्र गोष्टी आहेत. म्हणून गांधींची स्वतःची खाजगी मालमत्ता काहीच नव्हती. त्यांच्या निधनानंतर त्यांनी मागे ठेवल्या होत्या त्यांच्या चपला, त्यांची पिकदाणी आणि त्यांची प्रसिद्ध ‘तीन माकडं!’ विमा काढलेला नव्हता की स्वतःच्या लेखनाच्या स्वामित्वशुल्काचा अधिकार (कॉपीराइट) नव्हता. मूल्यं जगण्याचं- वैयक्तिक कसोटीचं आणखी एक उदाहरण- भारतातील अभद्र अस्पृश्यता मानणं. गांधींनी त्याविरुद्ध तक्रार केली, त्याला कडाडून विरोधही केला. पण जेव्हा त्यांनी स्वतःलाच प्रश्‍न विचारला की ते स्वतःसुद्धा अस्पृश्यता जगत आहेत की काय? त्यासाठी ते स्वतःच अस्पृश्यांच्यामध्ये राहायला गेले आणि त्यांनी एका अस्पृश्य मुलीला दत्तकही घेतले.

अत्यंत धार्मिक वृत्तीचे असल्याने गांधींना असे वाटत असे की अखेरीस त्यांची ईश्‍वरावरची श्रद्धा अढळ झाली पाहिजे. म्हणून त्यांनी त्यांच्याभोवती कोणतीही सुरक्षाव्यवस्था ठेवण्यास नकार दिला. कोणीही अंगरक्षक असू दिले नाहीत. त्यांच्यावर वारंवार हल्ले होऊ लागले आणि केंद्र शासनाने त्यांना सुरक्षाव्यवस्था मान्य करण्याचा तगादा लावला तेव्हा ते म्हणाले, ‘ज्या दिवशी मला शारीरिक संरक्षणाची गरज भासेल त्या दिवशी मी जिवंत नसणेच योग्य. एका सार्वजनिक प्रार्थनेमध्ये एकदा कोणीतरी बाँब फेकला.

स्फोट होताच जमलेली मंडळी पांगू लागली. निश्चल बसलेले गांधीजी लोकांना म्हणाले, ‘एका क्षुल्लक बॉम्बची एवढी भीती!’ आणि त्यांनी प्रार्थना चालू ठेवली. अशी होती या माणसाची वैयक्तिक सचोटी. इतकी गाढ की भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा पंतप्रधानांनी गांधींना राष्ट्रपतिपद स्वीकारण्यासाठी गळ घातली. त्यांना वाटलं की ही केवळ थट्टा आहे. ते म्हणाले, ‘माझी जागा आहे हिंदु-मुस्लिम दंग्यांमध्ये सापडलेल्या बळींच्यासोबत.’

हा आहे माझ्या मते गांधींच्या जीवनातून शिकण्याचा धडा. त्यांची वैयक्तिक सचोटी आणि त्यांचा संदेश, ‘माझं जगणं हाच माझा संदेश!’

त्यांचे आयुष्य म्हणजे वैयक्तिक जीवनात कोणतीही तडजोड अमान्य करणारी, निरपेक्ष, सचोटी!

‘ही माझ्या जीवनाची वैचारिक बैठक आहे; असेच जीवन मी जगेन आणि ही बैठक चुकीची आहे याची खात्री पटली नाही (आणि ही बैठक चूक आहे अशी खात्री पटणं शक्य आहे) तर मी असाच जगेन!’

मला वाटतं, या चार प्रश्नांमधून मी तुम्हांला वेगवेगळ्या मार्गांनी नेण्याचा प्रयत्न केला, त्यातून २१व्या शतकातही गांधी आपल्या मनातून हटणार नाहीत असंच दिसतं.

अनुवाद : सुमन ओक

(‘साधना’ साप्ताहिक, दिवाळी २०१२मधून साभार)

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................