कृषिक्रांती ही इतिहासाची फार मोठी फसवणूक होती!
ग्रंथनामा - झलक
युव्हाल नोआ हरारी
  • ‘सेपिअन्स - मानवजातीचा अनोखा इतिहास’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ, उजवीकडे मूळ इंग्रजी पुस्तकाचं
  • Fri , 25 May 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक सेपिअन्स - मानवजातीचा अनोखा इतिहास Sapiens : A Brief History of Humankind युव्हाल नोआ हरारी Yuval Noah Harari

Sapiens: A Brief History of Humankind’ हे युव्हाल नोआ हरारी यांचं जगभरात गाजलेलं पुस्तक. ‘A Brief History of Time’ नंतर सर्वांत जास्त गाजलेलं पॉप्युलर सायन्सचं हे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या जगभरात १५ लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत आणि ३० हून अधिक भाषात अनुवाद झाला आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद वासंती फडके यांनी केला असून तो नुकताच रोजी डायमंड पब्लिकेशन्सच्या वतीनं प्रकाशित झाला आहे. या पुस्तकाच्या एका प्रकरणाचा हा संपादित अंश..

.............................................................................................................................................

‘कृषिक्रांती म्हणजे माणसाने प्रगतीच्या दिशेनं घेतलेली मोठी झेप.’ असं अभ्यासकांनी एके काळी घोषित केलं होतं. मानवानं मेंदूच्या शक्तीच्या जोरावर केलेल्या प्रगतीची कथा त्यांनी सांगितली होती- उत्क्रांतीनं हळूहळू अधिक चलाख लोक निर्माण केले. हे लोक निसर्गाच्या गुपितांची उकल करण्यात पटाईत झाले, त्यामुळे गव्हाची शेती करणं आणि मेंढ्यांचे कळप पाळणं त्यांना शक्य झालं. एकदा हे साध्य झाल्यावर त्यांनी दमछाक करणारं, धोक्याचं आणि अनेकदा गैरसोयीचं ठरणारं, फळं-कंदमुळं गोळा करून व्यतीत करावं लागणारं जगणं सुखानं सोडून दिलं. त्यांनी शेतकऱ्याचं सुखी-समाधानी आयुष्य उपभोगायला सुरुवात केली.

ही सगळी मनगढंत कहाणी आहे. काळाबरोबर लोक अधिक चलाख होत गेले याला काही पुरावा नाही. कृषिक्रांती होण्याच्या आधीही भटक्या लोकांना निसर्गाची गुपितं कळली होती. ते ज्या प्राण्यांची शिकार करत, त्या प्राण्यांबद्दलच्या आणि जी फळं-कंदमुळं गोळा करत त्या वनस्पतींबद्दलच्या इत्थंभूत माहितीवरच त्यांचं जीवन अवलंबून होतं. जीवन सहज-सोपेपणानं जगण्याची आणि नवं युग येण्याची सूचना देणार्‍या कृषिक्रांतीनं शेतकऱ्यांचं जीवन भटक्या लोकांपेक्षा सामान्यतः अधिक अवघड आणि कमी समाधानी केलं. शिकारी-भटके आपला अधिक वेळ अधिक उत्साहानं आणि वेगवेगळ्या प्रकारांनी घालवत असत. या लोकांची उपासमार होण्याचा आणि या लोकांना रोगाची बाधा होण्याचा फारसा धोका नव्हता. कृषिक्रांतीनं मानवाच्या अन्नसाठ्यात नक्कीच भर घातली; पण या अतिरिक्त अन्नाचं रूपांतर अधिक पोषक आहारात किंवा अधिक मोकळा वेळ उपलब्ध करून देण्यात झालं नाही. उलट त्यातून लोकसंख्येचा विस्फोट झाला आणि श्रेष्ठ वर्ग लाडावला गेला. सर्वसामान्य भटक्यापेक्षा सर्वसामान्य शेतकरी अधिक परिश्रम करत होता आणि त्या बदल्यात त्याला अपायकारक आहार मिळत होता. कृषिक्रांती ही इतिहासाची फार मोठी फसवणूक होती!

या फसवणुकीला जबाबदार कोण? राजे नाहीत, धर्मगुरू नाहीत, तसंच व्यापारीही नाहीत. गहू, तांदूळ आणि बटाटे यांच्यासह मूठभर वनस्पतींच्या प्रजाती खर्‍या दोषी आहेत. होमो सेपिअन्सनी वनस्पतींना आपल्या कह्यात आणलं असं म्हणण्याऐवजी या वनस्पतींनीच होमो सेपिअन्सना आपल्याशी बांधून घेतलं असं म्हणावं लागतं.

गव्हानं आपल्या फायद्यासाठी होमो सेपिअन्सना कौशल्यानं स्वतःकडे वळवून घेतलं. हे महावानर सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी शिकार करून आणि फळं-कंदमुळं गोळा करून खूपच आरामदायी आयुष्य जगत होते, पण नंतर ते गव्हाच्या लागवडीसाठी अधिकाधिक प्रयत्न करायला लागले. सुमारे दोन हजार वर्षांच्या आतच जगातल्या वेगवेगळ्या प्रदेशांमधले लोक गव्हाच्या रोपांची निगा राखण्यात संपूर्ण दिवस घालवायला लागले. हे काम सोपं नव्हतं. गव्हाची रोपं तरारून येण्यासाठी सेपिअन्सना खूप काही करावं लागत होतं. खडकाळ आणि गारगोटीचे दगड असलेला प्रदेश गव्हाला रुचत नसे. असा प्रदेश साफ करताना सेपिअन्सच्या पाठीचे कणे मोडले. स्वतःची जागा, पाणी आणि पौष्टिक घटक यांमध्ये कोणत्याही रोपाला सहभागी करून घेण्याची गव्हाला इच्छा नसे, त्यामुळे सेपिअन्स स्त्री-पुरुष तळपत्या उन्हात शेतातलं तण काढण्यात दिवसभर वेळ घालवत. गव्हावर कीड पडत असे, त्यामुळे कीटक आणि धान्यावर पडणारे रोग यांच्यावर डोळ्यांत तेल घालून सेपिअन्सना लक्ष ठेवावं लागत असे. ससे, टोळ शेतातल्या धान्यावर तुटून पडत असत. त्यासाठी शेतकर्‍यांना शेताला कुंपण घालावं लागत असे आणि शेताची राखणही करावी लागत असे. गहू हे खूप पाणी खाणारं पीक आहे, म्हणून माणसानं जलसिंचनासाठी कालवे खणले किंवा पिकाला पाणी देण्यासाठी जड बादल्या खेचून नेणारी व्यवस्था निर्माण केली. गव्हाचं शेत जोमानं वाढावं म्हणून सेपिअन्सनी प्राण्यांची विष्ठा गोळा करून ती शेतात पसरली.

अशा कामांच्या दृष्टीनं सेपिअन्सची शरीरयष्टी उत्क्रांत झालेली नव्हती. त्यामुळे पाठीच्या कण्याला, गुडघ्यांना, मानेला आणि शरीराच्या इतर अवयवांना या कामाची किंमत मोजावी लागली. कृषिक्रांतीकडे जाण्याच्या संक्रमणावस्थेत मणका घसरणं, सांधेदुखी आणि हर्निया यांसारखे बेसुमार आजार सेपिअन्सना भोगावे लागल्याचं प्राचीन सापळ्यांच्या अभ्यासातून समोर आलं आहे. नव्यानं सुरू झालेल्या शेतीच्या कामात लोकांचा अधिक वेळ मोडत होता आणि त्यांना गव्हाच्या शेजारी ठिय्या मारून बसावं लागत होतं, त्यामुळे त्यांची संपूर्ण जीवनशैलीच बदलून गेली.

आपलं सुखी आयुष्य अधिक दुःखदायक स्थितीत घालवण्यासाठी गव्हानं होमो सेपिअन्सना कसं राजी केलं असेल? त्या बदल्यात काय देण्याचं कबूल केलं असेल? त्यानं पोषक आहार नक्कीच दिला नाही.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406

.............................................................................................................................................

गव्हानं लोकांना आर्थिक संरक्षण दिलं नव्हतं. शिकारी-भटक्यांपेक्षा शेतकर्‍याचं आयुष्य कमी सुरक्षित होतं. भटके लोक जगण्यासाठी डझनावारी वनस्पती आणि प्राणी यांच्या जातींवर अवलंबून होते; त्यामुळेच साठवलेलं अन्न खडतर हवामानातही जवळ नसलं, तरीही ते जगू शकत असत. एका प्रकारच्या प्रजातीतल्या प्राण्यांची उपलब्धता कमी झाली, तर हे लोक दुसर्‍या प्रजातीतल्या प्राण्यांची शिकार करत. शरीराला आवश्यक असणार्‍या उष्मांकांच्या मोठ्या हिश्शासाठी कृषी समाज अगदी अलीकडच्या काळापर्यंत मोजक्या शेतीयोग्य वनस्पतींवर अवलंबून होते. अनेक प्रदेशांमध्ये हे समाज गहू, बटाटे, तांदूळ अशा एकाच प्रकारच्या पोटभरीच्या अन्नावर विसंबून असत. पाऊस पडला नाही वा टोळधाडीनं पिकावर हल्ला केला किंवा प्रमुख पिकांच्या प्रजातींना बुरशीचा संसर्ग झाला, तर हजारो-लाखो शेतकरी मरत असत.

मानवी हिंसेपासून संरक्षण देण्यासाठीही गहू कुचकामी ठरत होता. सुरुवातीला शेतकरी किमान आपल्या भटक्या पूर्वजांइतके तरी हिंसक होते. शेतकऱ्यांजवळ स्वतःच्या चीजवस्तू होत्या. शेतीसाठी त्यांना जमिनीची गरज होती. शेजाऱ्यांनी घातलेल्या धाडीत जमीन हातातून जाणं म्हणजे उपासमारीला तोंड देणं होतं, त्यामुळे तिथे तडजोडीला वाव नव्हता. भटक्या टोळीनं वा एखाद्या बलवान प्रतिस्पर्ध्यानं दबाव आणल्यानंतर सामान्यतः दुसरी टोळी आपलं बस्तान हलवत असे. असं स्थलांतर धोक्याचं असलं, तरी ते शक्यतेच्या कोटीतलं होतं; पण जेव्हा एखादा शक्तिशाली शत्रू शेती करणार्‍या खेड्यात येऊन धमकी देत असे; तेव्हा माघार घेऊन तिथून निघून जाणं म्हणजे शेतीवर, घरांवर आणि धान्याच्या कोठारांवर पाणी सोडण्यासारखं होतं. अशा अनेक घटनांमध्ये निर्वासितांच्या नशिबी उपासमारीची वेळ येत असे, म्हणूनच आहे त्याच स्थितीत राहण्याकडे आणि जिवाची बाजी लावून लढण्याकडे शेतकर्‍यांचा कल कायम राहिला.

पहिल्यावहिल्या शेतकर्‍यांना ग्रामजीवनाचा तत्काळ फायदा नक्कीच मिळाला. वन्यप्राणी; तसंच पाऊस, थंडी यांपासून संरक्षण मिळालं. तरीही सर्वसामान्य माणसाला फायद्यापेक्षा तोटेच अधिक सहन करावे लागले. सध्याच्या समृद्ध समाजात राहणार्‍या लोकांना याचं आकलन होणं कठीण आहे. आपण सध्या समृद्धीमध्ये आणि संरक्षणात सुखानं राहत आहोत. आपली समृद्धी आणि आपलं संरक्षण यांचा पाया कृषिक्रांतीनं घातला आहे. साहजिकच कृषिक्रांती ही एक चकित करणारी भन्नाट सुधारणा असल्याचं आपण गृहीत धरतो. तरीही हजारो वर्षांच्या इतिहासाबद्दल आजच्या परिप्रेक्ष्यातून मत बनवणं चुकीचं ठरेल.

मग गव्हाच्या शेतीनं शेतकऱ्यांना काय दिलं? गव्हाच्या शेतीनं लोकांना व्यक्तिगत पातळीवर काहीच दिलं नाही. तरीही एक प्रजाती म्हणून तिनं होमो सेपिअन्सना काही गोष्टी बहाल केल्या होत्या. गव्हाच्या शेतीमुळे भूभागाच्या प्रमाणात अधिक अन्नाचं उत्पादन झालं आणि त्यामुळे सेपिअन्सची संख्या वेगानं वाढली.

उत्क्रांतीचं चलनी नाणं भूकही नाही आणि दुःखही नाही. तर ते आहे डीएनएची नक्कल! एखाद्या प्रजातीतल्या जातीचं उत्क्रांतविषयक यश तिच्या डीएनएच्या नकलांच्या प्रतींवर मोजलं जातं. पैसे नसणारी कंपनी ज्याप्रमाणे दिवाळखोर होते; त्याचप्रमाणे डीएनएच्या आणखी प्रती शिल्लक नसतील, तर ती जाती कायमची नष्ट होते. एखाद्या जातीच्या अनेक प्रती असल्याची बढाई मारली जाते, तेव्हा ते त्या जातीचं यश असतं आणि तेव्हा त्या जातीची भरभराट होते. या परिप्रेक्ष्यातून पाहिलं, तर १०० प्रतींपेक्षा एक हजार प्रती नेहमीच अधिक चांगल्या ठरतात. ‘वाईट परिस्थितीत अधिक लोकांना जिवंत ठेवण्याची क्षमता’ हे कृषिक्रांतीचं सार आहे.

तरीही उत्क्रांतीविषयक गतीवाढीच्या गणिताची इतकी चिंता का केली जाते? फक्त होमो सेपिअन्सच्या डीएनएच्या प्रतींमध्ये वाढ होण्यासाठी कोणतीही समजूतदार व्यक्ती तिचं वा त्याचं जीवनमान निम्न स्तरावर का आणेल? अशा व्यवहाराला कुणीही संमती देणार नाही. कृषिक्रांती हे फसवणूक करणारं एक जाळं होतं.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......