“पार्टनर तुम्हारी पॉलिटिक्स क्या है ?”
ग्रंथनामा - जागतिक पुस्तक दिन
आसाराम लोमटे
  •  मसाप, औरंगाबादच्या ‘गजानन माधव मुक्तिबोध विशेष अंका’चं मुखपृष्ठ
  • Sat , 28 April 2018
  • ग्रंथनामा जागतिक पुस्तक दिन World Book Day २३ एप्रिल 23 April आसाराम लोमटे Aasaram Lomte गजानन माधव मुक्तिबोध Gajanan Madhav Muktibodh

२३ एप्रिल हा जगभर ‘जागतिक ग्रंथ दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्तानं हा विशेष लेख.

मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाच्या वतीनं प्रकाशित होणाऱ्या ‘प्रतिष्ठान’ या द्वैमासिकाचा ‘जानेवारी-फेब्रुवारी २०१८’चा अंक ‘गजानन माधव मुक्तिबोध विशेष अंक’ म्हणून प्रकाशित झाला आहे. नुकतंच मुक्तिबोध यांचं जन्मशताब्दी वर्ष संपलं. त्यानिमित्तानं प्रकाशित झालेल्या या विशेषांकाचं हे संपादकीय.

.............................................................................................................................................

मेरी आस्था काँप उठती है।

मैं उसे वापस लेता हूँ।

नहीं चाहिए तुम्हारा यह आश्वासन

जो केवल हिंसा से अपने को

सिद्ध कर सकता है।

नहीं चाहिए वह विश्वास

जिसकी चरम परिणती हत्या हो।

मैं अपनी अनास्था में अधिक

सहिष्णू हूँ,

अपनी नास्तिकता में अधिक धार्मिक

अपने अकेलेपन में अधिक मुक्त अपनी उदासी में

अधिक उदार

हिंदीतले विख्यात कवी कुंवरनारायण यांची ही कविता आहे. ‘आत्मजयी’ या त्यांच्या कवितासंग्रहात समाविष्ट असलेली ही कविता १९६५ साली प्रसिद्ध झाली. म्हणजे आज या कवितेला पन्नास वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. तरीही आजच्या सामाजिक पर्यावरणाला नेमका प्रतिसाद ही कविता देते. वर्तमानाला शब्दात साकारणे ही खरे तर कोणत्याही काळातल्या लेखक-कवीची, कलावंतांची जबाबदारी असते. लोकमानस, एका भल्या जगाची आस आणि विवेकाला साक्षी ठेवून घेतलेला सत्याचा शोध या बळावर तात्कालिकतेच्या मर्यादा ओलांडून ती सार्वकालिक ठरते.

अशा लेखनातून प्रसृत होणारी मूल्ये ही मानवी जगणे उन्नत करण्याच्याच प्रेरणेतून झिरपत असतात. अर्थात हा अशा वाङमयाचा विशेष झाला, पण वस्तुस्थिती इतकी साधी सरळ आणि सोपी असू शकत नाही. साचलेपणाला खरवडून काढणारे, प्रस्थापित चौकटीला खिळखिळे करणारे, अमानुषतेला प्रखर विरोध करणारे आणि सत्याचा आग्रह धरणारे साहित्य सहजासहजी निर्माण होते असे नाही. उलट प्रत्येकच काळात अशा प्रकारच्या साहित्याला मोठी परीक्षा द्यावी लागलेली आहे. धर्म, इतिहास, संस्कृती या क्षेत्रातले ठेकेदार हे नेहमीच नव्या, प्रागतिक आणि क्रांतिकारी मूल्ये घेऊन अवतरणाऱ्या विचारांच्या विरोधात असतात. प्रस्थापित व्यवस्थेचे हे ठेकेदार जुन्या, अनिष्ट आणि प्रतिगामी विचारांनाच कवटाळून बसतात असे नाही तर यापुढे त्यांची मजल असते. जो कोणी नवा विचार घेऊन येईल, व्यवस्थेच्या तटबंदी पुढे प्रश्नचिन्ह उभे करील आणि जाब विचारील अशा विचारांना विरोध करणेच नव्हे, तर अशा विचाराची मुस्कटदाबी करणे हे काम तथाकथित संस्कृतीचे रक्षक करीत असतात.

अशा वेळी समाजातल्या शोषणव्यवस्थांची चिकित्सा करणारे लेखन हे केवळ जोखीम ठरू लागते. अशी जोखीम पार पाडणे ही आपली जबाबदारी आहे, या निष्ठेने लिहिणाऱ्यांसाठी कोणताही काळ हा खडतरच असतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचा इतिहास हा दीर्घ अशा कालखंडाचा आहे. आज तर दिवसेंदिवस अभिव्यक्तीवरील बंधनांचे काच घट्ट आवळत चालले आहेत. संस्कृतीरक्षणाच्या नावाखाली प्रतिगामी शक्तींचा नंगानाच राजरोस सुरू आहे. संस्कृतीतली बहुविधता नष्ट करून ‘आम्ही म्हणू तीच संस्कृती श्रेष्ठ’ किंवा ‘आमचीच संस्कृती श्रेष्ठ’ असे सांगितले जात आहे. वर्चस्ववादी भावनेतून व्यक्त होणाऱ्या अभिनिवेशाला द्वेषाची जोड दिली जात आहे. विरोधी मतांचा आदर केला पाहिजे, भिन्न प्रतिपादनाची जागा मान्य केली पाहिजे, चिकित्सा-चर्चा यातून निर्माण होणाऱ्या अवकाशाची बूज राखली पाहिजे, लोकशाहीचे अभिन्न अंग असणाऱ्या मतभिन्नतेला जपले पाहिजे. या साऱ्या गोष्टींचा विचार होण्याऐवजी नेमके या विरुद्ध वागणाऱ्या फौजा दिवसेंदिवस आक्रमक होत चालल्या आहेत.

निसर्ग, प्राणिमात्र यांच्यासोबत जगणाऱ्या बहुसंख्याक कष्टकरी, आदिवासींना सर्व प्रकारच्या जितराबावर जीव लावायचा माहीत असतो. मात्र आता गोरक्षणाच्या नावाखाली रस्त्यावर उतरलेल्या अनियंत्रित झुंडी आणि त्यांच्यातला विखार हा अनेकांच्या आयुष्याचा कडेलोट करीत आहे. एखाद्याने गोमांस बाळगल्याच्या संशयावरून त्याला आयुष्यातून संपविण्यापर्यंतची क्रूरता या झुंडींमध्ये आली आहे. संस्कृती रक्षणाचा तथाकथित ठेका घेतलेल्यांचा हा उन्माद पाशवी आहे, हे ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे.

अमुक एखादा चित्रपट चालू देणार नाही, तमुक लेखकाचे पुस्तक विकू दिले जाणार नाही, अशा प्रकारची चित्रे आम्ही नष्ट करू, हे सगळे एका सैनिकी मनोवृत्तीतून येते. आज अशा प्रवृत्तीच्या विरोधात सर्वच लिहित्या हातांनी, वेगवेगळी आविष्कार माध्यमे हाताळणाऱ्या कलावंतांनी उभे राहण्याची वेळ आली आहे. एकीकडे धर्माचा अतिरेकी, उग्र आणि हिंसक चेहरा घेऊन वावरणाऱ्या झुंडी आणि दुसऱ्या बाजूला अशा झुंडींना मोकाट रान मिळावे हा इरादा बाळगून असलेली सत्ता या दोन्हीच्या मिलाफातून जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती लोकशाही मूल्यांचा गळा घोटणारी आहे. पेरूमल मुरूगनसारखा तमिळ लेखक आपला मृत्यू घोषित करतो, त्यात केवळ असहायता नाही, तर दमनकारी यंत्रणेच्या विरोधात लढणाऱ्या धर्मश्रद्धांची कठोर चिरफाड करणाऱ्या लेखकाचे स्वातंत्र्य कोणत्या कडेलोटाच्या ठिकाणी येऊन ठाकले आहे याचे ते उदाहरण आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सत्याचा शोध घेण्याच्या प्रक्रियेतून आणि आंतरिक निकडीतून जन्माला येते. गतवर्षीच्या नोव्हेंबर (२०१७) महिन्यात हिंदीतले विख्यात कवी, चिंतक गजानन माधव मुक्तिबोध यांचे जन्मशताब्दी वर्ष संपले. ‘पार्टनर तुम्हारी पॉलिटिक्स क्या है?’ हा त्यांचा प्रसिद्ध जुमला होता. ‘पॉलिटिक्स’ हा शब्द या ठिकाणी व्यापक अर्थाने घ्यायला हवा. तो भूमिका, धारणा, आस्थेचे प्रश्न अशा सगळ्याच गोष्टींना कवेत घेणारा आहे. ‘अभिव्यक्ती के खतरे उठानेही होंगे’ हे गजानन माधव मुक्तिबोधांचे वारंवार अधोरेखित केली जाणारे विधान फक्त एका कवितेची ओळ नाही, ते लिहिणाऱ्या आणि विविध कलाविष्काराच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या सर्वांसाठीच भूमिकाप्रधान जबाबदारीचे भान देणार सत्य आहे.

आजच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहणाऱ्या सर्वांनाच ही एक दीर्घकालीन लढाई आहे याचेही भान असण्याची नितांत गरज आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलताना केवळ तात्कालिक, प्रासंगिक प्रतिक्रिया देणारे, किंवा सोशल मीडियावर एखादी कॉमेंट टाकली की, आपली जबाबदारी संपली असे वाटणारेही अनेक जण आहेत. वस्तुतः ही लढाई इतकी सोपी नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्याबद्दल जेव्हा आपण बोलतो, तेव्हा तसे बोलले की आपले काम संपले असे नाही. प्रस्थापित व्यवस्थेला, धर्मांध शक्तींना, विवेकहीन मनगटशाहीला, अनिर्बंध सत्तेला आव्हान देणारे, सुरुंग पेरणारे आणि श्रेष्ठ मानवी मूल्यांचा आग्रह धरणारे सर्जन ही आजच्या काळाची गरज आहे. सर्व प्रकारच्या कला जेव्हा ठामपणे या प्रकारची अभिव्यक्ती अंगभूत सामर्थ्याने करू लागतील, तेव्हा संत तुकारामांच्या ‘सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता’ या उक्तीचा पडताळा येऊ लागेल. आजच्या खडतर काळाचे भान आणि आपली जबाबदारी हेच अधोरेखित करण्याचा हा एक प्रयत्न आहे.

मराठवाडा साहित्य परिषदेने गजानन माधव मुक्तिबोध यांच्या जन्मशताब्दी वर्षात एकदिवसीय चर्चासत्र घेतले होते. या चर्चासत्रात विख्यात कवी विष्णू खरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. सर्व निबंधवाचकांनी जे निबंध चर्चासत्रात सादर केले, ते संकलित स्वरूपात या ठिकाणी देण्यात आले आहेत. मुक्तिबोधांची कविता, गद्यलेखन, समीक्षा अशा सर्व पैलूंवर प्रकाश टाकणारे हे लेखन आहे. प्रसिद्ध लेखक, कवींवर चर्चासत्र घेऊन त्यांच्या साहित्याची सांगोपांग चिकित्सा करणे, हा मराठवाडा साहित्य परिषदेचा महत्त्वपूर्ण विशेष आहे. यशवंतराव चव्हाण, व्यंकटेश माडगूळकर, शरश्चंद्र मुक्तिबोध, फादर स्टीफन्स, भालचंद्र नेमाडे, चंद्रकांत पाटील, अनुराधा पाटील आदींच्या साहित्यावर परिषदेने यापूर्वी चर्चासत्रे घेतली आहेत. मसापने गजानन माधव मुक्तिबोध यांच्यावर घेतलेले चर्चासत्र याच परंपरेला पुढे नेणारे आहे.

समकालीन स्थितीबद्दलचे विवेचन वर केलेले आहेच. अशा काळात एका प्रागतिक, बंधने झुगारणाऱ्या आणि स्वतंत्र अवकाशात सृजनाची सदैव आकांक्षा बाळगणाऱ्या कवीचा विचार पुन्हा पुन्हा सांगण्याची आवश्यकता आहे. ‘प्रतिष्ठान’चा हा विशेषांक त्या प्रयत्नांचाच एक भाग आहे. या विशेषांकासाठी चंद्रकांत पाटील यांनी केलेले सहकार्य आवर्जून नोंदवावे असेच आहे. त्याचबरोबर मुक्तिबोधांचे हस्ताक्षर ज्येष्ठ चिरंजीव रमेश मुक्तिबोध यांच्याकडून उपलब्ध झाल्याने ते मुखपृष्ठावर घेता आले त्याबद्दल त्यांचेही मनस्वी आभार.

.............................................................................................................................................

या विशेषांकासाठी मराठवाडा साहित्य परिषदेशी संपर्क साधता येईल.

दूरध्वनी - (०२४०) ०२३३३६०७

.............................................................................................................................................

लेखक आसाराम लोमटे हे मसाप, औरंगाबादच्या ‘प्रतिष्ठान’ या द्वैमासिकाचे संपादक आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कथाकार आहेत.

aasaramlomte@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.