दोन परस्परविरोधी व्यक्तिमत्वं : दोन चांगले सिनेमे 
सदर - इनसाइडर
अमोल उदगीरकर 
  • ‘द डार्केस्ट अवर’ आणि ‘डाऊनफॉल’ यांची पोस्टर्स
  • Sat , 24 February 2018
  • इनसायडर Insider अमोल उदगीरकर Amol Udgirkar डार्केस्ट अवर Darkest Hour डाऊनफॉल Downfall

"All war films tell two stories, the story of a war and the story of the men fighting it," - James Meek.

दुसरं महायुद्ध संपून सत्तर वर्षं होऊन गेल्यावरही जनमानसात त्याबद्दल प्रचंड आकर्षण आहे. १९३९ ते १९४५ या कालावधीत घडून गेलेल्या या युद्धानं जगाचा जिओ पॉलिटिकल नकाशा बदलून टाकला. या महत्त्वाच्या घटनेबद्दल हॉलिवुडला आणि इतर देशांमधल्या सिनेमाला आजही तितकंच आकर्षण आहे. दुसऱ्या जागतिक महायुद्धाला इतकी वर्षं उलटून गेल्यावर पण अजूनही मराठी माणसामध्ये त्याचं आकर्षण टिकून आहे, हे विशेष. याला वि. ग. कानिटकरांनी लिहून ठेवलेल्या आणि आजही वाचकांमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’ची पुण्याई कारणीभूत आहे.

माझं अजून एक निरीक्षण असं आहे की, दुसऱ्या महायुद्धावर मराठीमध्ये विपुल साहित्यनिर्मिती झालेली आहे. आणि या विषयावरच्या साहित्याला वाचकांचा प्रतिसादही चांगला असतो. पण याचे काही साईड इफेक्टसही असावेत. हिटलरच्या ‘माईन काम्फ’च्या मराठी अनुवादालाही मराठीत चांगला प्रतिसाद मिळत असावा. कारण कुठल्याही पुस्तकाच्या दुकानात गेलो की, या पुस्तकाच्या आवृत्त्या दिसतातच. मध्यंतरी हिटलर आणि ‘माईन काम्फ’ यांच्याबद्दल भारतीय समाजात वाढत असणाऱ्या आकर्षणाबद्दल चिंता व्यक्त करणारा लेख वाचण्यात आला होता.

दुसऱ्या महायुद्धाची आठवण यायचं कारण म्हणजे अशात काही दुसऱ्या महायुद्धावरचे सिनेमे पाहण्याचा योग योगायोगानं येत गेला. युद्ध, इतिहास, युद्धामागची माणसं यांचा दैवकरणाचं स्तोम माजवण्याऐवजी मानवी दृष्टिकोनातून सिनेमॅटिक विचार करणं पुन्हा एकदा भावलं. 

‘डार्केस्ट अवर’ हा विन्स्टन चर्चिलच्या एका आव्हानात्मक कालखंडाचं चित्रण करणारा सिनेमा यावर्षी ऑस्करच्या स्पर्धेमध्ये आहे. दुसऱ्या महायुद्धात असा एक टप्पा होता की, ग्रेट ब्रिटन एकटं जर्मनीच्या प्रचंड सामर्थ्यासमोर उभं होत. फ्रान्स आणि जवळपास सगळा युरोप हिटलरनं जिंकला होता. आफ्रिकेच्या वाळवंटातून जर्मन सैनिक ब्रिटिशांना मागे रेटत होते. नॉर्वे, बेल्जियम, ग्रीस, क्रीट, फ्रान्स अशा असंख्य आघाड्यांवरून रोज पराभवाच्या वार्ता कानावर येत होत्या. ब्रिटनवर, विशेषतः लंडनवर रोज अनेक अमानुष हवाई हल्ले व्हायचे. शेकडो निष्पाप ब्रिटिश नागरीक या हल्ल्यांना बळी पडायचे. रशियानं जर्मनीशी अनाक्रमणाचा करार केला होता.

हे युद्ध ब्रिटन जिंकेल असं कुणालाच वाटत नव्हतं… एक माणूस सोडून. त्याचं नाव विन्स्टन चर्चिल. या पोलादी माणसानं अतिशय अवघड काळात देशाचं नेतृत्व स्वीकारलं. अतिशय निराशादायी वर्तमानात ब्रिटिशांच मनोधैर्य टिकवून ठेवलं. आणि शेवटी हिटलरचा नाझीवाद गाडण्यात सिंहाची भूमिका बजावली.

चर्चिल हा भारतद्वेष्टा होता, कट्टर साम्राज्यवादी होता हे लक्षात घेऊनही तो शेवटी एक महान युद्धनेता होता असं म्हणावं लागेल. अशा या चर्चिलचं सिनेमातलं व्यक्तिचित्रण कसं आहे? तर ते अतिशय सम्यक आहे. त्याच्या व्यक्तिपूजेचं कुठलंही स्तोम सिनेमात माजवलेलं नाही.

खरं तर चर्चिल या वादळी कालखंडाचा धीरोदत्त नायक होता. ब्रिटन आणि पर्यायानं चर्चिल महायुद्ध सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून युद्धात सामील होते. युद्धाच्या शेवटच्या दिवसापर्यंत ब्रिटन युद्धाच्या अग्निकुंडात समिधा टाकत होते. पण म्हणून चर्चिलचे अंगभूत दोष दाखवायचेच नाहीत, असा पवित्रा काही दिग्दर्शकानं घेतला नाही. चर्चिलचे गुण-दोष सिनेमामध्ये उत्तम प्रकारे दाखवले आहेत.

चर्चिलची ब्रिटिश संसदेसोबत, पर्यायानं लोकशाहीसोबत असणारी बांधिलकी ठायी ठायी दिसते. युद्धात एक काळ असा होता की, रोज नव्या नव्या आघाड्यांवरून पराभवाच्या वार्ता यायच्या. ब्रिटिश सैन्याचा सतत पराभव होत होता. पण त्यामुळे संसदेत विरोधक चर्चिल यांच्यावर टीकेचे आसूड ओढायचे. पण चर्चिल यांनी कधीही या परिस्थितीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला नाही. संसदेत विरोधकांना समोर जाऊन प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. चर्चिल हे आपल्या सेनानींसोबत वाद घालायचे, त्यांच्यावर चिडायचे. पण एका मर्यादेबाहेर त्यांनी कधीही आपल्या सेनानींच्या कार्यक्षेत्रात ढवळाढवळ केली नाही. हे सगळं मुळातूनच सिनेमात पाहण्यासारखं आहे. ब्रिटन महायुद्ध जिंकलं त्यामध्ये त्याच्या संसदीय लोकशाहीचा मोठा वाटा आहे. गॅरी ओल्डमॅन या गुणी अभिनेत्यानं चर्चिल मूर्तिमंत उभा केला आहे. 

योगायोगानं ‘डार्केस्ट अवर’ नंतर बघण्यात आला तो ‘डाऊनफॉल’ हा सिनेमा. हिटलरच्या आयुष्यातल्या शेवटच्या दिवसांवर हा सिनेमा प्रकाशझोत टाकतो. हिटलरच्या आयुष्यातले शेवटचे दिवस एका बंकरमध्ये गेले. बर्लिनला रशियन फौजेचा वेढा पडला होता. एकेकाळी युरोपवर राज्य करणारा नाझी भस्मासुर एका बंकरमध्ये बंदिस्त होऊन पडला होता. हिटलर हा अतिशय करिष्मा असणारा नेता म्हणून ओळखला जातो. पण ‘डाऊनफॉल’मध्ये दाखवलेला हिटलर हा अतिशय थकलेला, काही प्रमाणात मानसिक संतुलन ढासळलेला म्हातारा तापट गृहस्थ आहे. त्याचा उजवा हात सतत थरथरत असतो. लोकांवर प्रभाव टाकण्याच्या त्याच्या क्षमता खूप कमी झालेल्या आहेत. हिमलर व गोअरिंग यांच्यासारख्या जवळच्या साथीदारांनी केलेल्या गद्दारीमुळे आणि सेनानींच्या अकार्यक्षमतेनं तो प्रचंड बिथरलेला आहे.

‘डाऊनफॉल’मधला हिटलर हा मूर्तिमंत खचलेपणाचं प्रतीक आहे. तो फक्त एक हरलेला, कणा मोडलेला माणूस आहे. एरवी माध्यमांमधून त्याचं जे राक्षस म्हणून वर्णन केलं जातं, तसा तर तो मुळीच नाही. आपल्यासोबत काम करणाऱ्या स्त्रियांसोबत तो अतिशय अदबीनं वागतो. अल्बर्ट स्पिअर, गोबेल्ससारख्या जवळच्या मित्रांबद्दल तो अतिशय हळवा आहे. आपल्यासोबत इतक्या कठीण काळात राहणाऱ्या इव्हा ब्राऊनबद्दल त्याचा जीव कळवळतो. पण शेवटी तो हिटलर आहे. वृद्ध, स्त्रिया आणि मुलांचे जीव वाचवण्यासाठी त्याचे सेनानी रशियन सैन्यासमोर विनाशर्त शरणागतीचा प्रस्ताव ठेवतात. हिटलर भडकतो आणि तो नाकारतो.

त्याच्या राजवटीत नंतर नंतर सेनानी फक्त त्याचे आदेश वाहून नेणाऱ्या पोस्टमनच्या भूमिकेत होते. “वृद्ध, स्त्रिया आणि लहान मुलांच्या जीवाचं काय?” असा प्रश्न सेनानी विचारतात, तेव्हा हिटलर थंडपणे म्हणतो,  “ज्या देशाला स्वतःच रक्षण करता येत नाही, त्यांच्या नशिबी असे भोग येणारच.” हिटलरला आपल्या इगो समोर जर्मन देशबांधवांच्या जीवाची तमा नव्हती. हे सगळं हिटलरच्या सेक्रेटरीनं आपल्या डायरीत नोंदलं आहे. या सगळ्याला सत्याचा आधार आहे. हिटलरचा शेवट आणि त्याच्या जर्मन राईशचा शेवट कसा करुणपणे झाला हे सगळ्यांनाच माहीत आहे.

हे दोन सिनेमे बघितल्यावर ब्रिटन का जिंकलं आणि जर्मनी का हरलं याची कारणं स्पष्ट व्हायला लागतात. अर्थातच ब्रिटन ज्या लोकशाहीचा घोष करत होतं, ती त्यांना स्वतःच्या देशापुरतीच अभिप्रेत होती. भारतासारख्या अनेक देशांचं शोषण करणं यातच त्यांचे हितसंबंध होते. पण सगळ्या व्यवस्थेला बरोबर घेऊन चालणारा चर्चिल तरला आणि हिटलर धुळीस मिळाला. लोकशाही जिंकली, हुकूमशाही हरली. यात स्टॅलिनच्या रशियानंही हात धुवून घेतले. भारतीय जनतेसाठी मात्र ही दोन साम्राज्यवादी रेड्यांची झुंज होती. कोण जिंकतंय, कोण हरतंय याचं आपल्याला सोयरसुतक असण्याचं कारण नव्हतं. 

.............................................................................................................................................

‘मध्यमवर्ग- उभा, आडवा, तिरपा’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4299

.............................................................................................................................................

लेखक अमोल उदगीरकर फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.

amoludgirkar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......