‘आय अ‍ॅम बोहरा अँड आय अपोज खतना, बिकॉज नो वन हॅज राईट टू टॅम्पर विथ माय बॉडी’
सदर - रौशनख़याल तरुण
हिनाकौसर खान-पिंजार
  • आरेफा जोहरी
  • Thu , 04 January 2018
  • रोशनख्याल तरुण आरेफा जोहरी Aarefa Johari खतना Khatna सुंता Female genital mutilation

मुस्लिम समाजात काही घडतंच नाही असं हल्ली सरळसोट बोललं जातं. दहशतवादी कारवाया, गुन्हेगारीत मुस्लिम समाज ठळक दिसतो, असाही समाजातील काहीजण आरोप करतात. शिवाय मुस्लिम बायकांचे बुरखा, तोंडी तलाक हेच एकमेव प्रश्न आहेत अशीही अनेकांची धारणा असते. ‘ते आणि आपण’ अशीही एक भावना सध्या जोर धरत आहे. त्याचं कारण सध्याच्या मुस्लिम समाजात काय घडतंय या माहितीचा अभाव. मात्र आज मुस्लिम समाजातील तरुण वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत. हे तरुण सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक प्रश्नांसाठी उभे राहत आहेत. आपापल्या परीनं आपापल्या क्षेत्रात वेगळा ठसा उमटवत आहेत, वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांना हात घालत आहेत. त्याविषयी लिहीत आहेत, मांडत आहेत. मुस्लिम समाजात काहीच घडत नाही या भावनेला छेद देणारी ही बाब आहे. आपल्या बिकट परिस्थितीशी सामना करून, मुस्लिम समाजाचे म्हणून असणाऱ्या ठराविक साच्यातून बाहेर पडून, नवनव्या वाटा शोधणाऱ्या तरुण-तरुणींचं मानस समजून घेण्याचा प्रयत्न ‘रोशनख्याल तरुण’ या साप्ताहिक सदरातून केला जाईल. ‘रोशनख्याल’ म्हणजे सकारात्मक. मुस्लिम समाजातल्या तरुणांची सकारात्मक ऊर्जा समोर आणणं, हा या सदराचा हेतू आहे.

.............................................................................................................................................

‘आय अ‍ॅम बोहरा अँड आय अपोज खतना, बिकॉज नो वन हॅज राईट टू टॅम्पर माय बॉडी,’ असं ठसठशीतपणे एका कार्डावर लिहिलेली आरेफा जोहरी तिच्या फेसबुक वॉलवर दिसते. त्यातही ‘माय’ या शब्दावर जोर आणि ‘नो वन ’ या शब्दाला अधोरेखित. या कार्डवरच्या या छोट्याशा मजकुरातूनच ही तरुणी बोहरा समाजातल्या मुलींची सुंता या अघोरी प्रथेतला दर्द बेखौफ मांडू पाहते.

मुंबईस्थित आरेफा जोहरी तिशीतली पत्रकार तरुणी. आपल्या समाजात सुरू असलेल्या प्रथेविषयी ‘अळीमिळी’ची छुपी सक्ती असताना तिनं मात्र चुप्पी सोडली. एकीकडे या प्रथेला धर्माचं अधिष्ठान देऊन स्त्रीत्वाचं पावित्र्य जपणारी ही गोष्ट असल्याचं ठसवलं जात असताना, आरेफानं ‘माझ्या शरीराचा एक भाग... माझं स्त्रीत्व’ असं म्हणत आपल्या ‘शिवलेल्या ठसठशी’ची जाहीर वाच्यता केली. तिनं स्वत: असं करणं आणि त्याबाबत इतरही महिलांना ‘बोलत्या व्हा’ म्हणणं हे कमालीचं धाडस दाखवणारं आहे. आपल्या देशातून बोहरा समाजातील मुलींची सुंता म्हणजे जननांग कापण्याची प्रथा बंद व्हावी यासाठी आरेफा व तिच्या चार मैत्रिणी एक चळवळ उभी करत आहेत. या पाच जणींनी ‘सहीयो’ या नावानं संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून या तरुणी बोहरा समाजात प्रत्यक्ष जनजागृतीसाठी झटत आहेत. इतकंच नव्हे तर, या प्रथेविरुद्ध जनरेटा तयार करण्यासाठी विविध संस्थांसोबत मिळून ऑनलाईन सह्यांची मोहीमही राबवत आहेत.

मुळात आपल्याकडे, बोहरा समाजात मुलींची सुंता करण्याची अघोरी प्रथा अद्यापही सुरू आहे, याबाबत मुस्लिम समाजही काहीसा अनभिज्ञ आहे. ही प्रथा दाऊदी बोहरा यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसते. अतिशय गुप्तपणे या प्रथेची अंमलबजावणी होत असल्यानं साहजिकच त्याविषयी खुलेपणानं न बोलणं आलंच. पण आज आरेफा स्वत:च्या अनुभवकथनानंच या प्रथेच्या विरोधाला सुरुवात करते. या अघोरी प्रथेची वेदना आरेफानं स्वत: अनुभवली आहे. ही तिची अतिशय खाजगीतील बाब आहे. पण त्या घटनेचे तिच्या मनावर उमटलेले व्रण ती अजूनही विसरू शकलेली नाही. आरेफा सांगते, “मी सात वर्षांची होते. त्या वेळी माझ्या आईनं मला एका अनोखळ्या बाईंकडे खत्ना/सुंता करण्यासाठी नेलं. मला ठाऊक नव्हतं की, तिथं जाऊन काय घडणार आहे. तिथं गेल्यावर मला झोपवण्यात आलं. अन्य काही स्त्रियांनी माझे दंड वगैरे धरून ठेवले. मग माझे पाय फाकवले. पुढे काही तरी घडणार आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती. दिलाशाखातर माझी आई मला म्हणाली, ‘बेटा बस थोडासा दर्द होगा और एक मिनिट में खतम होगा.’ आई सांगेल त्यावर विश्वास ठेवण्याचं ते वय. त्यानंतर त्या अनोळख्या बाईनं ब्लेड हातात घेतला आणि माझ्या शरीराच्या खालच्या भागातलं काहीतरी झपकन कापलं. मला खूप दुखलं होतं. मी खूप रडत राहिल्याचंही मला आठवतंय. माझी आई सांगते की रक्त आलं नव्हतं. पण दुखत होतं. दोन दिवसांत दुखणंही कमी झालं. आपल्यासोबत नेमकं काय झालं हे समजण्याचं माझं वयच नव्हतं.” आरेफा हे सांगत होती तेव्हा अंगावर सर्रकन काटा आला. क्षणभर काय बोलावं हेच सुचेनासं झालं.

मग पुढे तीच सांगू लागली की, “थोडं आणखी मोठं झाल्यावर माहीत झालं की, खत्ना नावाचा प्रकार पुरुषांबरोबर होतो. अर्भकावस्थेतच ही खत्ना केली जाते आणि मुली सात वर्षांच्या झाल्यावर. या माहितीचाही माझ्या जगण्यावर तसा काही परिणाम झाला नाही. पण जेव्हा मी कॉलेजात जाऊ लागले. आसपासच्या गोष्टींकडे संवेदनशीलपणे पाहू लागले, तेव्हा ही प्रथा काय आहे, याचा उलगडा होऊ लागला. स्त्रियांना आयुष्यभर अतोनात त्रास देणाऱ्या या प्रथेची समज वाढायला लागली. अगदी लहान वयात मुलींवर जबरदस्तीनं ही प्रथा थोपवली जाते. का? तर म्हणे त्यांची कामभावना जागी होऊ नये. धर्माच्या नावानं ही प्रथा चालवून महिलांच्या लैंगिक भावनांना कथित शिस्त लावण्यासाठी हा प्रकार केला जातो. असं करण्यामागं कारणं ढीगभर आहेत. वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी, पण बहुतांश स्त्रियांच्या लैगिंक भावनेशी निगडीत. हे सगळं समजू लागल्यावर सुरुवातीला मी घरात, आईजवळ याविषयीची चिडचिड व्यक्त करायचे. माझ्या कुटुंबातच त्यावर बोलायचे, चर्चा करायचे. पण ते सगळं माझ्यापुरतंच होतं.”

आरेफाच्या मनात या प्रथेविषयी घृणा आणि अस्वस्थता दोन्ही एकाच वेळी नांदू लागल्या. परिणामी, सुंता ज्याला इंग्रजीत ‘फिमेल जेनिटल म्युटेशन’ म्हणतात, तो शब्द जरी कानावर पडला की तिचे कान टवकरायचे. तसंच झालं, २०११ मध्ये तिला एका बोहरा अज्ञात स्त्रीनं ‘चेंज डॉट ऑर्ग’ या ऑनलाईन पोर्टलवर एक मोहीम सुरू केली. त्याद्वारे तिनं बोहरा समाजातील धर्मगुरू ‘सय्यदना’ यांना विनंती केली होती की, बोहरा समाजातून या प्रथेला हद्दपार करा. या पोर्टलमुळे याविषयीच्या काही बातम्या माध्यमांत झळकू लागल्या आणि आरेफालाही असं वाटू लागलं की, याविषयी आपल्याला सार्वजनिकरित्या काहीतरी मांडायचं, बोलायचं आहे.

या ऑनलाईन पोर्टलनं तिला एक बळ मिळाले. हा विषय केवळ आपल्यापुरता नसून याविषयी जाहीरपणे मत मांडण्याची गरज आहे. आता बोलायचं म्हटलं तरी कुठं आणि कसं हा प्रश्न तिच्याही समोर होताच. मग तिनं माध्यमातून, सोशल मीडियातून भूमिका घ्यायला सुरुवात केली. या प्रथेनं होणारा त्रास, वेदना मांडता मांडताच ही प्रथा कशी स्त्रीत्वाला काळिमा भासणारी आहे अशी टोकदार मतं ती मांडू लागली.

त्याच सुमारास, प्रिया गोस्वामी ही तरुणी बोहरा समाजातील मुलींच्या सुंता प्रकरणावर शॉर्ट फिल्म बनवत होती. या फिल्ममध्येही आरेफानं प्रत्यक्ष सहभाग नोंदवून या प्रथेविषयी परखडपणे सांगितलं आहे. यानंतर तिला प्रकर्षानं जाणवू लागले की, किमान यापुढे तरी बोहरा समाजातील मुलींची सुंता प्रकाराच्या वेदनांपासून मुक्ती मिळायला हवी यासाठी काम करण्याची गरज आहे. आरेफासारख्याच विचार करणाऱ्या मारिया ताहेर, शाहीदा तवावाला, प्रिया गोस्वामी, इन्सिया दारीवाला या चौघी जणी एकत्र आल्या. या पाच जणींनी ‘सहीयो’ या संस्थेची स्थापना केली. आरेफा म्हणते, “सहीयो या शब्दाचा अर्थ होतो मैत्रिणी. हे नाव आम्ही जाणीवपूर्वक ठेवलेलं आहे. आम्ही आमच्या समाजात मैत्रीपूर्व नात्यानं मिसळून या प्रश्नाला हात घालू इच्छितो. आमचा विरोध प्रथेला आहे, समाजाला नाही. या संस्थेत जनजागृती व माध्यमांशी बोलण्याचं काम मी करते,” असंही ती नमूद करते.

आरेफा व तिच्या मैत्रिणींनी २०१५ मध्ये ही संस्था सुरू केली. मारिया सामाजिक कार्यकर्ती, आरेफा पत्रकार, प्रिया आणि इन्सिया या फिल्ममेकर, शाहीदा ही संशोधक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या या तरुणी एका समान धाग्यात गुंतून बांधल्या गेल्या. आपापली करिअर सांभाळत त्या काम करत आहेत. मुळात या पाचही जणी एकेकट्या, आपापल्या स्तरावर सुंताविरुद्ध बोलत होत्याच. पण त्यांच्या एकत्र येऊन काम करण्यानं त्यांच्या एकेकट्या कामाला बळकटी मिळाली. सुंता प्रथा बंद करून दाऊदी बोहरा आणि आशियातील इतर बोहरा समाजातील स्त्रियांना सक्षम करण्यासाठी ही संस्था काम करत आहे.

संस्थेची स्थापना झाली की काम करण्यासाठी हाती काही मूलभूत माहिती असावी लागते. त्या तथ्याचा वापर करून कार्यक्रमाची दिशा ठरवता येते. इथं मात्र तसं काहीही नव्हतं. मुळात भारतातील मुस्लिम समाजातील बोहरा या एका समूहात अशी काही प्रथा अद्याप सुरू आहे, याची माहितीच इतर भारतीय मुस्लिमांना नव्हती. अशा परिस्थितीत काम सुरू करायला या तरुणी निघाल्या होत्या. म्हणून मग त्यांनी सर्वांत आधी तथ्यसंकलन करता येईल का, या अनुषंगानं कामाला सुरुवात केली. आरेफा सांगते,

“आजतागायत भारतात किती बोहरा मुलींची सुंता झालीये याची काही माहितीच उपलब्ध नाहीये. मग आम्ही ठरवणार तरी कसं की, या प्रथेनं मुली होरपळल्या जात आहेत. म्हणून मग जून २०१५ पासून आम्ही ऑनलाईन पद्धतीनं एक सर्वेक्षण घेण्याचं ठरवलं. आत्तापर्यंत ३८५ बायकांनी यात सहभाग घेतला आणि त्यातील ८० टक्के महिलांची सुंता झालेली आहे. हे संशोधन सुरूच ठेवण्याची गरज आहे. आणखी बायकांनीही मोकळेपणानं बोलण्याचीही गरज आहे. याशिवाय फिल्डवरचे उपक्रमही राबवतो.

२०१६मध्ये ‘इच वन-रिच वन’ ही मोहीम राबवली. यामध्ये आमच्या कामाशी निगडीत प्रत्येकानं किमान एका महिलेशी सुंता या विषयावर बोलायचं. त्यांचं म्हणणे समजून घ्यायचं. याखेरीज एक फोटो कॅम्पेनही घेण्यात आला. यामध्ये लोकांनी एका पोस्टरवर ‘आय अ‍ॅम बोहरा अँड आय अपोज खतना बिकॉज....’ आपलं कारण नमूद करत असा फोटो सोशल मीडियावर टाकावा असा उपक्रम होता. यामागे हेतू हाच की, लोकांनी सार्वजनिकरित्या बोलावं. भीती घालवावी. यात स्त्री-पुरुष दोघांनीही सहभागी व्हावं. अशा विषयांवर न बोलण्याचा जो एक टॅब्यू असतो, तो संपावा असा हेतू होता.

याखेरीज सहीयोच्या वेबसाईटवर, आपली आपबिती गोष्टी, अनुभवाच्या स्वरूपात मुली-महिलांनी सांगण्यासाठी प्रोत्साहन देतो. त्यांच्या गोष्टी साईटवर प्रसिद्ध केल्या जातात. आपलीच गोष्ट एकदा सांगून टाकली की, बायकांना खूप हायसं, मोकळं वाटतं. दुसरं आपण एकटेच ही प्रथा बंद व्हावी म्हणत नाही तर असे अनेक जण आहेत ही गोष्ट उभारी देणारी असते. इथं पुरुषही आपली मतं मांडतात, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. 

वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून आम्ही आमची मोहीम पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. पठडीतल्या भाषणबाजीनं हे प्रश्न सुटणार नसतात. लोकांशी प्रत्यक्ष संवादच समज-गैरसमज कमी करायला मदत करतात. त्याचाच एक भाग म्हणून ‘थाल पे चर्चा’ उपक्रम राबवला. ज्यात काही बायकांसोबत आम्ही बोहरा पद्धतीचं जेवण बनवून, जेवता जेवता विविध विषयांवर चर्चा असं स्वरूप ठेवलं होतं. अशा अनौपचारिक वातावरणामुळे बायकाही मोकळ्या होतात. दडपणाशिवाय बोलतात. सध्या असे विविध उपक्रम राबवण्याचा विचार आहे.”

आरेफा आपल्या संस्थेच्या पसाऱ्याविषयी सांगते की, केवळ भारतापुरतंच काम करायचं डोक्यात नाहीये. सोबत अन्य देशांतील बोहरा स्त्रियांनाही कवेत घेण्याचा विचार आहे. यातील तीन संस्थापक भारतात, एक जण हाँककाँग आणि एकजण अमेरिकेत काम करत आहे. बोहरा समाज हा जगभर पसरलेला असल्यानं सीमारहित काम करण्याचं उद्दिष्ट त्यांच्या संस्थेनं ठेवलं आहे. ऑनलाईन माध्यमातून त्या शक्य तितक्या बोहरा स्त्रिया-मुलींपर्यंत पोहचण्याचं काम करत आहोत.

आरेफा जेव्हा हे सगळं सांगत होती, त्यावेळी ती इतक्या नाजूक विषयावर पहिल्यांदा बोलू लागली, तेव्हा घरच्यांची कशी प्रतिक्रिया उमटली असा विचार डोक्यात येत होता. सर्वांसमक्ष सुंता ही अघोरी प्रथा आहे असं म्हणण्याचं बेअरिंग तिनं कसं सांभाळलं असेल. कारण कितीही नाही म्हटलं तरी या प्रथांना कथित धर्माचं अधिष्ठान दिलेलं असतं, प्रश्नांचा असा गुंताच तिच्यापुढे ठेवल्यावर ती अगदी सहज म्हणाली, “माझ्या कुटुंबाकडून मला पाठबळ मिळाले. मी ती सर्वांत आधी आईशी खुलून संवाद साधू लागले आणि आईनेही मला छान समजून घेतलं. माझ्या कुटुंबानं मी काय करतेय हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून कधीच कुठलीच अडचण नाही आली, मात्र सुरुवातीला नातेवाईंकाकडून नकारात्मक प्रतिक्रिया आल्या, ते साहजिकही होतं. मी हे चुकीचं, धर्मविरोधी करतेय असंही काहींनी मला सुनावलं. पाच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, एका काकूंनी तर सांगितलं की, मुलींची खतना करणं हे प्रेषित मोहम्मद यांचाच आदेश आहे. असं न करणं म्हणजे आपण चूक तर आहोतच पण ज्या मुलींची खतना झालेली नसते, त्यांना वेश्या समजलं जातं. इतक्या तिखट शब्दांत लोक टीका करायचे, पण आम्ही आमची चिकाटी सोडली नाही. हळूहळू त्यांचीही इयत्ता वाढत गेली. आताशा नातेवाईंकातील स्त्रियांना माझ्या कामाचं महत्त्व समजू लागलंय, हे आश्वासक आहे.”

ती हे सगळं स्त्रियांच्या अनुषंगानं सांगत होती, त्याचवेळेस मनात आणखी एक प्रश्न डोकावत होता. मुस्लिम समाजात मुलांचीदेखील सुंता केली जाते. स्त्रियांच्या सुंतेविरोधी इतकं बोललं जात असताना, पुरुषांच्या सुंतेविषयी काहीच बोललं जात नाही. या दोन्हींत नेमका काय फरक असावा, ही भानगड काय आहे. यावर ती तात्काळ म्हणते, “मुलांची सुंता ही कुठल्याही प्रकारे लैगिंक भावभावनांशी, लैगिंक सुखाशी निगडीत बाब नाहीये. शिवाय त्यांच्या कुठल्याच जननअंगावरही याचा परिणाम होत नाही. विविध वैद्यकीय तज्ज्ञ मुलांच्या सुंतामुळे त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत नसल्याचं सांगतात. त्याबाबत मतभेद असू शकतील, मात्र स्त्रियांची सुंता ही प्रथा निव्वळ पुरुषी मानसिकतेतून निपजलेली आहे. सुंता करण्यामागची भूमिकाच स्त्रियांचे लैंगिक भाव नियंत्रित राहावे हा आहे. शिवाय सुंता करताना स्त्रियांचं जननांग जितकं खोल कापलं गेलं असेल तितका जास्त त्यांच्या प्रजनन यंत्रणेवर परिणाम होतो. सुंता झालेल्या स्त्रियांना शरीरसंबंधांच्या वेळेस, प्रसूतीच्या वेळेस असह्य वेदनांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे या दोन्ही प्रकारात खूपच फरक आहे. आपल्याकडे आफ्रिकेप्रमाणे अगदी खोल कापलं जात नाही. केवळ क्लिटोरिस कापलं जातं, पण यालाही सुंताच म्हटले जाते आणि तेही तितकंच वेदनादायी आहे. हे सगळं पाहता केवळ महिलांच्या भावना दडपण्यासाठी ही प्रथा जन्माला घातली गेली आहे, हे स्पष्टच आहे. त्यामुळे आम्ही मुलींच्या सुंता प्रथेचा विरोध करतो.”

वर्षानुवर्ष सुरू असलेल्या प्रथेविरुद्ध बोलायला सुरुवात केल्यावर धर्मगुरूंकडून, मुल्ला मौलवींकडून विरोध होणार हे तर स्पष्टच आहे. पण सध्या अतिशय विपरीत स्थिती आहे. साधारण २०१६पर्यंत बोहरा समाजातील धर्मगुरूंनी मुलींच्या खतनाविषयी जाहिररीत्या कधीही कोणतीही भूमिका घेतलेली दिसत नाही. ती करा व करू नये असं काहीही मांडलेलं दिसत नाही. मात्र आत्ताचे धर्मगुरू सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांनी मुलींच्या सुंताचं समर्थन केलं आहे. धार्मिक शुद्धीसाठी सुंता आवश्यक असल्याचंही त्यांनी नमूद केल्याचं आरेफा सांगते. धर्मगुरूंकडूनच अशी माहिती सांगितली गेली, तर सर्वसामान्य लोक चटकन अशा प्रथांना बळी ठरतात. “त्यामुळे जनजागृतीसाठी आम्हाला अधिक सक्रिय होण्याची गरज आहे,” अशी जबाबदारीची भावनाही आरेफा बोलून दाखवते.

या विषयावरच्या जागरणाचा भाग म्हणून पाकिस्तानला झालेल्या महिला आंतरराष्ट्रीय परिषदेतही ती सहभागी झाली होती. तिथं तिनं पहिल्यांदाच प्रत्यक्ष लोकांसमोर स्वत:च्या सुंताविषयी सांगितलं. त्यावेळेस अगदी पाकिस्तानातील बायकाही आश्चर्यानं विचारत होत्या की, ही अशी सुंता करण्याची पद्धत मुस्लिमांमध्ये खरंच आहे. यावरूनच कळतंय की हा प्रश्न किती दुर्लक्षिला गेला आहे. बोहरा समाजात किती छुप्या पद्धतीनं हे सर्व केलं जातंय. त्यावेळेस हे सांगावं लागत होतं की, होय, आत्ताही अशी सुंता केली जाते. बरं ती करण्यासाठी कुठल्याही ब्लेड किंवा धारदार वस्तू घेतली जाते. कदाचित आत्ता थोडा त्यात बदल झाला असून मुलींना बोहरा डॉक्टरांकडे नेलं जातं आणि ते काही प्रमाणात तथाकथित स्वच्छ उपकरणानं सुंता करतात. हे सगळं अनाकलनीय असलं तरी वास्तव आहे. म्हणूनच मोठ्या संख्येनं लोकसहभागाची गरज आहे.  

अर्थात हे सगळं एकीकडे सुरू असलं तरीही; सध्या त्यांच्या कामामुळे सकारात्मक बदलही घडत आहेत. बहुतांश लोकांना या प्रथेची निरोपयोगिता पटलेली आहे. मात्र ते समोर येऊन या प्रथेचा विरोध करत नाहीयेत. त्यांनी गुप्तपणे या संस्थेला सहकार्य आणि पाठिंबा दिलेला आहे. हा पाठिंबा निव्वळ शब्दांतला नाहीये तर आपल्या मुलींची सुंता आपण करणार नाही ही भूमिकाही त्यांनी घेतलेली आहे. उघडपणे या विषयावर बोलल्यास समाजातून आपली हकालपट्टी होईल अशी भीती या लोकांच्या मनात आहे, पण हरकत नाही, मुलींची सुंता न करण्याचा निर्णय घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे.

“अगदी पुरुष भेटून किंवा ऑनलाईन माध्यमातूनही सांगतात की, त्यांच्या मुलींसोबत असं घडणार नाही. अन्य कुणा मुलीबरोबर होत असेल तरी ते रोखलं जाईल. असा पवित्रा घेताना दिसतात हे सगळं बळ देणारं आहे.” असं आरेफा आवर्जून नमूद करते. तिला मात्र समाजातून बॉयकॉट केलं जाईल याची भीती नाहीये. “माझ्या मनातलं बोलण्यासाठी आणि न्याय्य भूमिका घेण्यासाठी मला कोणाच्याही परवानगीची गरज नाहीये. त्यामुळे मला अगदी एका क्षणासाठीही कधी भीती वाटली नाही,” आरेफाची ही नीडर मांडणी चकित करणारी, सुख देणारी आहे.

तिच्या या जाणिवा वाढण्यामध्ये शिक्षणाचाही वाटा तिला जाणवतो. तिनं ‘इंग्लिश लिटरेचर अअँडकल्चरल स्टडीज’विषयातून पदवी घेतली आहे. यामध्ये काही प्रमाणात स्त्रीवाद शिकायला मिळतो. स्त्रीवाद, स्त्रियांविषयीची संवेदना या सगळ्या गोष्टी नेणीवेत निपजत होत्या. वाढत होत्या. त्याला सुंता या विषयाची जोड मिळाली आणि आपले विचार अधिक पक्के, प्रगल्भ होत गेल्याचं आरेफाला वाटतं. याबरोबरच पत्रकाराची समज, पत्रकाराची नजरही तिला तितकीच महत्त्वाची वाटते. पत्रकारितेत असणारी मूलभूत तथ्य पडताळणी, माहितीची खात्री करून घेणं, खोलात जाऊन विचार करणं आणि त्याची सुसूत्रित मांडणी करणं, ही सर्व कौशल्यं तिला आपल्या संस्थेच्या कामातही उपयोगी ठरतात. अंधपणे कुठलीही माहिती न स्वीकारता संशोधनांतीच लोकांपर्यंत पोहचवल्यानं लोक पाठिंबा देत आहेत. हे सकारात्मक आणि छान वाटणारं आहे आणि तरीही ‘स्टील माईल्स टू गो…’ असं आरेफा मान्य करते, तेव्हा अजून काम करण्याची तळमळ लक्षात आल्याशिवाय राहत नाही.

.............................................................................................................................................

.............................................................................................................................................

लेखिका हिनाकौसर खान-पिंजार या मुक्त पत्रकार आहेत.

greenheena@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 08 January 2018

हिनाताई, मलाही हे वाचून आश्चर्यवच वाटलं. दाऊदी बोहरा तसे पुढारलेले गणले जातात. मात्र त्यांच्यात जागृती होऊ लागलीये हे सुचिन्ह आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे खतना हा प्रकार मूळ इस्लाममध्ये कधीच नव्हता. आफ्रिकेतले काही समूह ही इस्लामपूर्व प्रथा पाळीत. बहुधा तिथूनच ती दाऊदी बोहारांत आली असावी. हिचा त्याग करतांना धार्मिक अडचण बहुधा येऊ नये. आपला नम्र, -गामा पैलवान