गिनती चालू हो गयी?
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार
  • Tue , 12 December 2017
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar नरेंद्र मोदी Narendra Modi अमित शहा Amit Shah राहुल गांधी Rahul Gandhi भाजप BJP काँग्रेस Congress

गेली अनेक वर्षं अपेक्षित असं काँग्रेसचं अध्यक्षपद राहुल गांधी यांनी घ्यावं, त्यांना द्यावं, असा खेळ काँग्रेस पक्षात, माध्यमात चालू होता. अनेक तारखा सांगितल्या गेल्या. पण मधल्या काळात राहुल गांधींच्याच राजकीय व व्यक्तिगत परिपक्वतेबद्दल शंका निर्माण झाल्या. त्यात त्यांनी स्वतःच्या वर्तनानं भर घातली. मनमोहनसिंग यांच्यासारख्या मितभाषी, अंतर्गत सत्ताकारणात पंख कापलेला पंतप्रधान आणि सहकारी पक्षांचे कोट्यवधीचे घोटाळे या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे, केजरीवाल यांच्या गाजलेल्या व गाजवलेल्या पार्श्वभूमीवर, भाजपनं नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करणं, मोदींनी अत्यंत सुनियोजित व आक्रमक प्रचार करणं, घणाघाती भाषणं, यामुळे सगळा मोहोलच बदलला. तीन टर्म गुजरात मुख्यमंत्री, प्रचारक म्हणून कारकीर्द व संघाचा पाठिंबा अशा बलाढ्य मोदींसमोर राहुल गांधी अगदीच ‘शाळकरी’ ठरले. भाजपनं मग त्यांना त्याच उंचीनं मोजलं आणि चेष्टेची एक लाटच निर्माण केली गेली.

यात भरीस भर म्हणजे मोदींची फडकती विजयी पताका, जवळपास निम्मा देश काबीज करत गेली तर, काँग्रेसनं लोकसभेसह अनेक राज्यात मानहानीकारक पराभव पाहिला. ‘नेहरू-गांधी’ घराण्याकडे कायमस्वरूपी नेतृत्वाचं पेटंट दिलेली काँग्रेस मूळापासूनच उखडून मोदींचं ‘काँग्रेसमुक्त भारत’ हे स्वप्न साकार होतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. नेमकी याच दरम्यान सोनिया गांधींची प्रकृती नादुरुस्त राहू लागली आणि त्यांचा सार्वजनिक वावरही कमी झाला. या काळात काँग्रेससाठी आशादायी काहीच होत नव्हतं. ‘प्रियंका लाओ’ची हाळीही उडवून झाली. त्याच काही तरी करू शकतील हे बोललं जाऊ लागलं. परिस्थिती इतकी प्रतिकूल झाली की, सर्वोच्च नेत्याच्या सभेसाठी, ताटकळणारे काँग्रेसवाले राहुल गांधी प्रचाराला नाही आले तर बरं असं मनोमन म्हणू लागले. याच काळात अनेक काँग्रेसवाल्यांनी भाजपचा रस्ता धरला होता.

मोदींच्या सत्तारोहणानंतर देशभर हळूहळू जे एकछत्री अंमलाचं राज्य सुरू झालं, त्यामुळे खुद्द भाजपमध्येही सन्नाटा पसरला. नेहरूंपासून अगदी वाजपेयीपर्यंतच नेतृत्व, कायम सक्षम विरोधी पक्षाची गरज आणि लोकशाही व्यवस्थेत त्यांना उचित स्थान, मान-सन्मान देण्यावर विश्वास ठेवणारं होतं. मात्र मोदी-शहा यांनी मात्र जनमताचा दबाव आणि शासकीय यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्ष, नेतृत्व जमीनदोस्तच करायचा नवा ‘सूडाचा’ प्रघात तयार केला.

मोदी सरकारची सुरुवातीची दोन वर्षं म्हणजे आता पुढची पंचवीस वर्षं फक्त मोदी अशा वातावरणातच सतत रंगवली गेली. गेल्या तीन वर्षांत तीन हजार कोटींच्या जाहिराती, म्हणजे वर्षाला एक हजार कोटी या प्रमाणात अगदी दिवसाचा हिशोब केला तरी डोळे दिपवणारे आकडे समोर येतील!

सरकारनं आपल्या नव्या योजनांची किंवा झालेल्या कामाची माहिती जनतेला जरूर द्यावी. त्यासाठी सरकारकडे माहिती व जनसंपर्क खातं असतं. शिवाय वेळोवेळी पत्रकार परिषदा घेऊन त्याची माहिती द्यायची अशी आजवरची परंपरा. सरकारी योजना म्हणजे ग्राहकोपयोगी वस्तू नव्हे. पण मोदी सरकारनं ती तशी बनवली आणि अत्यंत व्यावसायिक पद्धतीनं जाहिरातींचा इतका भडिमार सर्व माध्यमातून केला की, सरकार ही कुठलीतरी उत्पादन करणारी कंपनी वाटावी!

सुरुवातीला लोकांना हा बदलही आवडला. सरकारी निरस, पिवळ्या रंगातल्या किरट्या जाहिराती गेल्या व एकदम डिझायनर जाहिराती आल्या.

हे सगळं चालू असताना, शंभर वर्षांहून जुन्या व सत्ताकारणाचा अजब अनुभव असलेल्या काँग्रेसला आपण उठून काही करण्यापेक्षा, नव्याची नवलाई संपून लोक पुन्हा आपल्याकडेच येतील, या गृहितकावर अधिक विश्वास असल्यानं ते नाममात्र विरोध करत राहिले. आधीच्या दहा वर्षांच्या सत्तेमुळे, त्यात शेवटच्या पाच वर्षातल्या अत्यंत भ्रष्ट कारभारामुळे तसंही त्यांना तोंड उघडायला जागा नव्हती. शिवाय मोदी-शहांनी सीबीआय, ईडी अशा यंत्रणा सक्रीय करून ‘गप्प रहा, नाहीतर तुरुंगात चला’ असा एक मॅसेजच दिला. अगदी राहुल व सोनिया गांधींनाही ‘चौकशीच्या घेर्‍यात’ घेण्यात आलं. त्यामुळे काँग्रेस छूटपुटा विरोध करतानाच वेट अँड वॉचच्या भूमिकेत शिरली. काही राज्यात दुय्यम भूमिका घेऊन, प्रादेशिक पक्षांना झुकतं माप दिलं. उत्तर प्रदेशात, मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करून नंतर, अखिलेशला पाठिंबा दिला, युती केली. तेच बिहारमध्ये. तरीही सर्वत्र (बिहार वगळता) पराभवच वाट्याला आला. बिहारनं आशा दाखवली, पण पुढे नितीशकुमारांनीच पलटी मारली.

होता होता मोदी सरकारची तीन वर्षं झाली आणि काँग्रेसला अपेक्षित अशी नव्याची नवलाई, त्याची झिलई उतरू लागली. यात नोटबंदी आणि जीएसटीनं काँग्रेससाठी परतीची दारं किलकिली केली.

मोदींच्या फाजील आत्मविश्वासानं नोटबंदी आणि अपूर्ण तयारीनिशी लागू केलेला जीएसटी याचे दुष्परिणाम उमटू लागले. अंकित माध्यमांनी आणि अर्थतज्ज्ञांनी नोटबंदी, कॅशलेश, डिजिटल तंत्रं यांचं कितीही गुणगान गायलं तरी प्रत्यक्षात शेतकरी, छोटा उद्योजक, शेतमजूर, रोजंदारीवरला कामगार, हस्तकारागीर अशा अनेक क्षेत्रांत परिस्थिती वेगानं बिघडली, कोलमडली, ठप्प झाली. पण मोदी-शहा निवडणुकीची गणितं, तर मोदी-जेटली अर्थक्रांतीनं बेभान झाले होते. शेवटी विरोधी सूर उमटू लागला. विशेषतः शेतकरी वर्गातून तो अधिक थेट उमटू लागला. जीएसटीच्या गोंधळात चंगळवादालाही लागलेली ‘झळ’ सामान्य माणसाला जाणवणारी महागाई यातून खदखद वाढू लागली. यावर काही करण्याऐवजी वंदे मातरम, राष्ट्रवाद, गोमाता, अस्मिता, ही बंदी ती बंदी यातून सामाजिक स्वास्थ्य ही बिघडत चाललं. ताजमहाल कि तेजोमहाल, मंदिर, मस्जिद या जुन्याच कढीला पुन्हा उकळ्या काढायला सुरुवात झाल्यावर मोदीप्रेमींमध्येही अस्वस्थता पसरायला लागली.

या बदलत्या परिस्थितीमुळे किंवा राजकारण ही पूर्णवेळ गंभीरतेनं करायची गोष्ट आहे. याची जाणीव झाल्यानं, राहुल गांधींनी आपलं चालचलन, विचार बदलले. त्यांनी पुन्हा एकदा ‘मोदी’ हेच लक्ष्य केलं. पण यावेळी जरा अधिक समजदारीनं, अधिक अचूक व काहीशा प्रगल्भतेनं ते वावरू लागले. मोदींना ज्याप्रमाणे युपीए सरकार, मनमोहनसिंग असं काहीसं आत्मविश्वास हरवलेलं टार्गेट सापडलं होतं, तसंच राहुल गांधींना भ्रमनिरासाच्या सीमेवर, एककल्लीपणाचा अतिरेक केलेलं आणि भाषणापलीकडे व रेटून बोलण्यापलीकडे मोदी काही करत नाहीत, ही जी नाराजी उत्पन्न होत चाललीय, त्याचं. राहुल गांधींनी  त्यावर फुंकर घालताना थोडी आक्रमकतेची जोड दिली. मोदींनी नेहमीप्रमाणे आपल्याच जोशात सगळं चालू ठेवलंही. पण गुजरात निवडणूक आली आणि त्यांना सामना सहज सोपा नाही याची जाणीव होत गेलीय. वरकरणी ते शांत आहेत. पण अंतर्यामी प्रचंड धगधग असावी!

फटके मारणार्‍या फलंदाजाला, थोडे फटके मारू देत मग ऑफ स्टम्पला बॉल टाकून अलगद टिपावा, तसा काँग्रेसला तीन वर्षांनी मोदींनी अलगद झेल काढून दिलाय. आजघडीला ते गुजरात पुन्हा जिंकूही शकतात, पण पप्पू राहुल गांधींनी त्यांना जेरीस आणलंय, हे कुणीही तटस्थ राजकीय विश्लेषक स्पष्ट सांगू शकेल.

जय-पराजयाच्या सीमेवर राहुल गांधीना काँग्रेसच्या अध्यक्षपदी बसवण्यातच काँग्रेसचं टायमिंग, अजूनही ‘राजकारणात’ ते कालबाह्य झाले नाहीत, हे दाखवणारं आहे. भाजप-मोदी पुढच्या दोन वर्षांत जमेल तसा व तितका थयथयाट करतील. राममंदिर पुन्हा बाहेर येईल. कररचनेत बदल करून पुन्हा एकदा अर्थ चक्र फिरवण्याचा प्रयत्न होईल. अस्मितांची हिंसक राजकारणं तेवती ठेवली जातील. जाहिरातींचं बजेट वाढेल. पण म्हणतात ना ‘बुंद से गयी वो हौद से नहीं आती’. याचा अर्थ चित्र ३६० अंशाच्या कोनात पूर्ण बदलेल असं नाही. पण मोदी राजवटीचा पाया खचू लागलाय. नाना पटोले, यशवंत सिन्हा, अरुण शौरी, शत्रुघ्न सिन्हा यांच्यामुळे तडे जाणार नाहीत, पण जमीन भुसभुशीत होऊ शकते.

एक लक्षात घेतलं पाहिजे, मोदी किंवा शहा यांच्याकडे कुठलीही व्हिजन नाही. दूरपल्ल्याचं धोरण नाही. मोदींच्या विकासाच्या कल्पना या, गणेशोत्सव मंडळांप्रमाणे काहीतरी भव्य दिव्य आणि मोठ्या प्रमाणात केलं की, ते ग्रेट इतक्या ढोबळ आहेत. शहांकडे साम-दाम-दंड-भेद हे संघटना वाढीसाठीचे गुण आणि त्याला आवश्यक तो पैसा व सध्या सत्ता असल्यानं त्यांची गणितं चुकत नाहीत. पण जनता एकदा नाराज झाली की, कशालाच जुमानत नाही हा अनुभव इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी व सोनिया गांधी यांनीही घेतलाय. मोदींमागे फरफटत गेलेल्या भाजपला याची जाणीव कदाचित, जेव्हा केव्हा मोदी पराभूत होतील तेव्हाच येईल. आजघडीला तरी भाजप मोदी आणि विजय हे गृहितच धरून आहे. थोडक्यात काँग्रेसला जे नेहरू-गांधी घराण्याबद्दल वाटतं, तेच भाजपला मोदींबद्दल वाटतंय! जिंकून देताहेत ना मग करा नमन!

म्हणजेच आता मोदी आणि राहुल गांधी वेगळ्या अर्थानं एकाच रेषेवर उभे आहेत. जिंकून देण्याची क्षमता!

सध्या जनता नसली तरी माध्यमं मात्र मोदींच्या सावलीतच आहेत. अपवादात्मक बातम्या सोडल्या. (विशेषतः इलेक्ट्रॉनिक मिडिया) तर बाकी मोदी, भाजप प्रतिमा संवर्धन, जपणूक चाललेली दिसते. साहजिकच राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होणार ही बातमी देताना, सव्वाशे वर्षांहून अधिक जुन्या पक्षातील, फक्त नेहरू-गांधी घराण्याची अध्यक्षपदाची वर्षं ठळकपणे दाखवली गेली! आधी त्यांनी एक बातमी अठरा अध्यक्षपदात, पाच नेहरू-गांधी घराण्यातले अशी दिली. (अठरा म्हणजे त्यांनी स्वातंत्र्योत्तर अध्यक्षपद धरली असावीत!) मात्र नंतरच्या बातमीपत्रात फक्त गांधी-नेहरू घराण्यातले लोक दाखवले!!

वृत्तवाहिन्यांना आज पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे सांगावंसं वाटतं- स्थापनेपासूनचे काँग्रेस अध्यक्ष पुढीलप्रमाणे -व्योमेशचंद्र बॅनर्जी, दादाभाई नौरोजी, बद्रुद्दीन तय्यबजी, जॉर्ज येस (George Yule), विल्यम वेडबर्न (William Wedderburn), फिरोजशहा मेहता, आनंद चारु, अल्फ्रेड वेब, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, रहिमततुल्ला सयानी, सी.संकरन नायर, आनंदमोहन बोस, रोमेश चंदर दत्त, एन. जी. चंदावरकर, दिनशा वाच्छा, लालमोहन घोष, हेन्री कॉटन, गोपाळकृष्ण गोखले, रासबिहारी घोष, मदन मोहन मालवीय, बिशन नारायणदार, रघुनाथ मुधोळकर, नवाब सय्यद मुहम्मद बहादूर, भूपेंद्रनाथ बोस, लॉर्ड सत्येंद्र प्रसादसिन्हा, अंबिका चरण मुझुमदार, अॅनी बेझंट, सईद हसन श्याम, मोतीलाल नेहरू, लाला लजपत राय, सी. विजय राघवाचार्य, देशबंधू चित्तरंजन दास, हकीम अजमल खान, महमद अली जोहर, अब्दुल कलाम आझाद, मोहनदास गांधी, सरोजिनी नायडू, एस. श्रीनिवास अय्यंगार, मुख्तार अहमद अन्सारी, जवाहरलाल नेहरू, वल्लभाई पटेल, सेनगुप्ता, राजेंद्र प्रसाद, सुभाषचंद्र बोस (नंतर राजीनामा व पुन्हा राजेंद्रप्रसाद) जे.बी. कृपलानी, पट्टाभी सितारामय्या, पुरुषोत्तमदास टंडन, यु.एन. ढेबर, इंदिरा गांधी, नीलम संजीव रेड्डी, के. कामराज, एस.निजलिंगअप्पा, जगजीवनराम, शंकर दयाळ शर्मा, देवकांत बारूआ, राजीव गांधी, पी.व्ही.नरसिंहराव, सिताराम केसरी, सोनिया गांधी.

या यादीतील काही जण सलग पाच वर्षं, काही तीन वर्षं, काही दोन वर्षं काँग्रेस अध्यक्ष होते. जे नेहरू-गांधी घराण्यातले नव्हते! राहुल गांधींना केवळ आपले जैविक घराणं नाही, तर राजकीय घराणं सांभाळायचं आहे. ते किती मोठे आहे, हे या यादीवरून कळावं! यात ते किती यशस्वी होतात, ते काळच ठरवेल.

भाजपला नेहरू-गांधी घराण्याबद्दल द्वेषच आहे. तो त्यांच्या उक्ती, कृतीतून दिसतो. मात्र नेहरू-गांधी घराण्यावर तोंडसुख घेणारा भाजप, मित्रपक्ष शिवसेनेच्या उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबाबत ‘ब्र’ काढणार नाही आणि गोपीनाथ मुंडेच्या जागेवर संसद सदस्य म्हणून त्यांची जेमतेम वयाची पात्रता सिद्ध केलेली, राजकीय पार्श्वभूमी नसलेली प्रीतम मुंडे कशी काय एकमेव योग्य ठरते, हे सांगणार नाहीत.

घराणी म्हटली तरी बरेचसे संस्थानिक भाजपकडेही आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल आणि महाराष्ट्रातही.

शेवटी सत्तेच्या उन्मादावर वेळीच नियंत्रण केलं नाही तर कालचा पप्पू जनतेला प्रगल्भ वाटू लागतो, लढाईला योग्य वाटू शकतो आणि त्यालाही संधी द्यावी असं तिच्या मनात येऊ शकतं. मोदी-शहांच्या मागे फरफटत जाणार्‍या भाजपला हे लवकर कळेल तेवढं बरं.

जगात तुम्ही काहीही विकत घेऊ शकता. पण सामान्य माणसाचा मताधिकार विकत घेण्याइतकं श्रीमंत कुणीच असू शकत नाही.

काँग्रेसला नवीन अध्यक्ष मिळताना भाजपसाठी या पुढच्या हाका आहेत.

.............................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......