म. गांधी : शाश्वताचा यात्रिक
सदर - गांधी @ १५०
उत्तम कांबळे
  • म. गांधी यांच्या विविध भावमुद्रा
  • Mon , 02 October 2017
  • गांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma Gandhi कस्तुरबा गांधी Kasturba Gandhi सेवाग्राम आश्रम Sevagram Aashram

भारत महासत्ता कधी होईल हे सांगता येत नाही. मात्र कोणत्याही महासत्तेला नम्र होण्यास भाग पाडील अशी महात्मा गांधी यांच्यासारखी व्यक्ती या देशात काम करून गेली, याचे स्मरण त्यांच्या १३६व्या जन्मदिनी (उद्या) ठेवले पाहिजे. काहींना कालबाह्य वाटणारे त्यांचे विचार वस्तुत: कालोचित आहेत. इराक युद्धाच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या सिंडी शिहान यांना गांधींच्या सत्याग्रहाची मदत होते, तर ब्रॅड पिटशी घटस्फोट झाल्यावर जेनिफर अॅनिस्टन या मॉडेललाही गांधींचे पुस्तक आधार देते. ‘वर्ल्ड सोशल फोरम’मध्ये हजारो तरुण गांधी साहित्य विकत घेण्यासाठी गर्दी करतात. ‘गुगल’वर ‘महात्मा गांधी’ या नावाने सर्च केल्यास २१ लाख ३० हजार नोंदी संगणक क्षणार्धात तुमच्यासमोर ठेवतो आणि गांधींच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणाऱ्या अधिकृत संकेतस्थळाला आजपर्यंत ३०, १८, ८३८ व्यक्तींनी भेट दिलेली आढ‌ळते. कोणत्याही राष्ट्राचे वा व्यक्तीचे हक्क उघडपणे हिरावून घेताना राष्ट्रप्रमुखाला, कॉर्पोरेट लीडरना किंवा राज्यकर्त्यांना लाज वाटते, तेव्हा कुठे तरी गांधींचा ‘अहिंसे’चा आदर्श काम करीत असतो. जगातील पिळवणूक संपलेली नाही; पण आता पिळवणुकीचे कुणी जाहीर समर्थन करीत नाही. हाही गांधींच्याच विचाराचा प्रभाव. ‘ब्रह्मचर्य’ ही गांधींची संकल्पना चेष्टेचा विषय झाली असली, तरी एड्ससारख्या रोगाचा प्रतिबंध करायचा असेल, तर औषधे वा कंडोमपेक्षा एकपत्नीव्रत हे अत्यावश्यक आहे, असे जेव्हा डॉक्टर सांगतात, तेव्हा ते ‘ब्रह्मचर्या’च्याच जवळ जात असतात. लहानमोठ्या शहरांतील हॉटेलांमध्ये तुडुंब गर्दी होत असली तरी आरोग्यविषयक प्रकाशनांची होत असलेली विक्री आणि डाएटिंगच्या सूचना या गांधींच्याच ‘अस्वाद’ व्रताची आठवण करून देतात. नेल्सन मंडेलापासून चीन, जपानमधील विविध प्रयोगांचा उल्लेख करीत ही यादी बरीच वाढविता येईल. महाभारतकाळापासून जगावर नेहमीच अर्थ आणि सत्ता यांचा प्रभाव आहे. आता तो ठळकपणे जाणवतो इतकेच. परिस्थितीवश झालेले सर्व जण मार्केट इकॉनॉमीच्या हमरस्त्यावर सुसाट धावत असले तरी बेचैनी आतून पोखरत असते. याला कारण मार्केट हे नेहमीच तात्कालिक असते आणि आपल्या अंतरंगाला कायम शाश्वताची ओढ असते. व्यक्तिमत्त्वाचे पोषण शाश्वत विचारांनीच होते. गांधी ती भूक भागवितात. कारण गांधीजींनी शाश्वताशी असलेले नाते कधीच तुटू दिले नाही.

क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

मात्र, शाश्वताशी असलेले हे नाते गूढ नव्हते, तर प्रयोगशील आणि बुद्धिनिष्ठ होते. जीवनाच्या मूलभूत तत्त्वांवरची त्यांची श्रद्धा ही प्रयोगनिष्ठ होती. प्रयोगातून मिळणारा आत्मविश्वास त्यांच्या लहानसहान कृतीतून आणि वक्तव्यातून सहजी प्रकट होत असे. जीवन सिद्धान्त आमच्याकरिता नाहीत, तर आम्ही त्यांचे पालन करण्यासाठी आहोत, ही बाब मनावर बिंबली की जीवन एकरस आणि अखंड असल्याचा अनुभव येतो, अशी त्यांची श्रद्धा होती. त्यांच्या अंतर्बाह्य एकतेच्या अवस्थेमुळे मी मुग्ध झालो, असे वर्णन विनोबांनी केले आहे. मार्केट इकॉनॉमीमध्ये ही एकरसता आपण गमावतो, कारण आपले व्यक्तिमत्त्व सतत दुभंगत असते. सत्यनिष्ठा यासाठी आवश्यक असते आणि याचीच तरफदारी स्टीफन कोवेसारखे सध्याचे मार्केट गुरू ‘प्रिन्सिपल ओरिएंटेड लिडरशिप’मधून करतात, तेव्हा पुन्हा गांधीच भेटतात. आयुष्यात बॅरिस्टर, विणकर ते भंगीकामापर्यंत २७ प्रकारच्या भूमिका आत्मीयतेने रंगविताना गांधीजींनी असंख्य प्रयोग केले व ते नोंदवून ठेवले. ही प्रयोगनिष्ठा अंगी न मुरविल्यामुळे त्यांच्या पश्चात अनुयायांनी आत्मविश्वास गमाविला. गांधीप्रणीत उपक्रम मग सरकारी कृपेवर अधिकाधिक अवलंबून राहू लागले. भारतीय तत्त्वज्ञानातील ईशावास्योपनिषद आणि गीतेतील स्थितप्रज्ञ दर्शन, रोजच्या प्रार्थनेत समाविष्ट करण्यात त्यांची बुद्धिनिष्ठता दिसते. ‘अंतस्त्यागी बहि:संगी लोके विचर राघव’, या योगवासिष्ठातील उपदेशाप्रमाणे समाजामध्ये सतत राहूनही आतून बुद्धीने त्याग करीत ते विचरत राहिले. लोकमान्यांनी म्हटल्याप्रमाणे, पोचण्याचे ठिकाण कोणतेही असले तरी ध्रुवताऱ्याचा संदर्भ ठेवूनच कोणतेही जहाज मार्गक्रमण करते. गांधींचे विचार हे ध्रुवताऱ्याप्रमाणे आहेत. मार्केट इकॉनॉमी ही आपली सध्याची प्रवृत्ती असली तरी गांधींचे जीवन सिद्धान्त हेच चिरंतर समाधान देणार आहेत. म्हणून त्यांचे स्मरण अनिवार्य आहे.

(हा लेख १ ऑक्टोबर २००५ रोजी दै. सकाळचे संपादकीय म्हणून प्रकाशित झाला होता.)

लेखक उत्तम कांबळे दै. सकाळचे संपादक संचालक आहेत.

tusharmhatre1@gmail.com

.............................................................................................................................................

गांधींविषयीच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_list

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.