गांधींनंतरचे गांधी!
सदर - गांधी @ १५०
आशीष नंदी
  • महात्मा गांधी यांच्या विविध भावमुद्रा
  • Wed , 02 August 2017
  • गांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma gandhi कस्तुरबा गांधी Kasturba Gandhi सेवाग्राम आश्रम Sevagram Aashram गांधींनंतरचे गांधी Gandhi after Gandhi आशीष नंदीAshis Nandy

२ ऑक्टोबर २०१९ रोजी म. गांधी यांची १५०वं जयंती वर्षं साजरं केलं जाईल. त्याचं निमित्त साधून वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमानं २१-२२ फेब्रुवारीपासून ‘गांधी १५० जयंती अभियान’ सुरू केलं आहे. (२२ फेब्रुवारी हा गांधींच्या पत्नी कस्तुरबा यांचा स्मृतिदिन असतो.) या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम केले जाणार आहेत. त्याला प्रतिसाद म्हणून ‘अक्षरनामा’वर दर महिन्याच्या दोन तारखेला गांधींविषयी एक लेख प्रकाशित केला जातो… या मालिकेतला हा सातवा लेख आहे.

.............................................................................................................................................

मराठी अनुवाद - अनुराधा मोहनी

मोहनदास करमचंद गांधी (१८६९-१९४८) यांच्या मृत्यूला साठ वर्षे उलटून गेल्यानंतर चार गांधी आजही जीवित आहेत. या चौघांची ओळख प्रस्थापित करणे आवश्यक ठरते. कारण मायबाप इंग्रज सरकारने त्यांच्या जमान्यात हे काम नक्कीच नेकीने केले असते. हे चारही गांधी त्रासदायक आहेत, पण त्यांचा त्रास वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या वेळी व वेगवेगळ्या प्रकारे होत असतो. समकालीन सार्वजनिक आयुष्यात वेगवेगळ्या कारणांसाठी हे चौघेजण उपयुक्तदेखील आहेत. हे मी दु:खाने बोलत नसून आदराने बोलत आहे. कारण आपल्या जन्मानंतर एकशे पन्नास आणि मृत्यूनंतर साठ वर्षांनंतरही लोकांना त्रासदायक किंवा उपयुक्त ठरणे, ही काही साधीसुधी बाब नव्हे. खरे सांगायचे तर मूळ गांधी कोण होता, याविषयी मला फारसे सोयरसुतक नाही. त्या ऐतिहासिक गोष्टीचा शोध घ्यायला पुस्तकी पंडित आहेतच. पण समकालीन राजकारण हे ऐतिहासिक सत्यांवर आधारित नसून आठवणीतील भूतकाळाशी व त्याच्या आधाराने भविष्य रचताना येणाऱ्या अडचणींशी संबंधित असते. बऱ्या-वाईट कोणत्याही कारणाने असेल, पण गांधी त्या स्मृतींचे एक अभिन्न अंग बनले आहेत, हे निर्विवाद.

सुरुवातीलाच सांगतो की, मी गांधीवादी नाही. माझे मत दखलपात्र नसेलही, पण माझ्या समजानुसार गांधींपेक्षा गांधीवाद श्रेष्ठ आहे. गांधी त्यांचे तत्त्वज्ञान पूर्णपणे आचरणात आणू शकले नाहीत, कारण ते व्यवहारकुशल राजकारणी होते. आणि वैचारिक व नैतिक शुद्धता पातळ करणे हे राजकारणाचे कामच आहे. अर्नोल्ड टॉयनबीने त्यांना वाहिलेल्या श्रद्धांजलीत असे म्हटले आहे की, ‘राजकारणाच्या घाणेरड्या वस्तीत राहायला तयार असणारा तो एक देवदूत होता.’ त्यामुळे शंभर टक्के गांधीवादी होणे खुद्द गांधींनाही परवडण्याजोगे नव्हते. त्यांना ‘अपूर्ण गांधीवादी’ म्हणणे म्हणजे त्यांच्या कार्याला सलाम करणेच होय.

आता हयात गांधींविषयी बोलू या. ते चौघेही आपल्या साऱ्यांच्या परिचयाचे आहेत. मी केवळ नेणिवेच्या पातळीवरील ज्ञात गोष्टी जाणिवेच्या पातळीवर आणण्याचे काम करणार आहे. पण मानसशास्त्रज्ञ या नात्याने मी तुम्हाला इशारा देऊ इच्छितो की, नेणिवेच्या पातळीवर अस्तित्वात असणारे ज्ञान स्वीकारणे हे अनेकदा अतिशय दु:खद व मन:स्तापजनक असते.

पहिला गांधी हा भारतीय राज्यसंस्था व भारतीय राज्यवादाचा गांधी आहे. मला स्वत:ला (व कदाचित गांधींना स्वत:लाही) हा गांधी पचवणे जड जाते. परंतु अनेकदा हा एकच गांधी लोकांना परवडतो, सहन करता येतो आणि म्हणून ते त्याच्यासोबत सुखाने राहू शकतात.

पुढचे सांगण्यापूर्वी थोडे मूळ गांधींबद्दल. राष्ट्रपित्याचे राजकीय अस्तित्व, स्मृती आणि लिखाण या बाबी अतिशय तापदायक आहेत, ही गोष्ट स्वातंत्र्यानंतर लगेचच येथील राज्यव्यवस्थेच्या व तिचे आश्रित बनू पाहणाऱ्या बुद्धिमंतांच्या लक्षात आली. गांधी हा माणूस अराजकवादी होताच; पण खाजगी विरुद्ध सार्वजनिक, धार्मिक विरुद्ध इहवादी, भूत विरुद्ध वर्तमान हे भेद मुळातून अमान्य करण्याची त्यांची वृत्तीही अनेक प्रश्न निर्माण करत होती. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या केंद्रित राज्यव्यवस्था आणि सामाजिक अभियांत्रिकी यांच्या ‘आधुनिक’ व ‘सुरचित’ दुनियेत त्यांच्या भोंगळ, आकारहीन संकल्पना फारच कालबाह्य व बेंगरूळ वाटत होत्या. या सर्वांचा ताप विचारवंतांप्रमाणेच त्यांच्या मारेकऱ्यालाही होत होता. स्वत:ला बुद्धिवादी व आधुनिक म्हणवणाऱ्या नथुराम गोडसेने न्यायालयासमोर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नवजात भारत राष्ट्राला या आधुनिकताविरोधी व राजकीयदृष्ट्या अजाण असलेल्या माथेफिरूपासून वाचवण्यासाठीच त्याने पितृहत्येचे पातक स्वत:च्या माथ्यावर घेतले.

नथुराम गोडसेच्या या एका कृतीमुळे राष्ट्रपित्यावर अकाली हौताम्य लादले गेले आणि उजव्या व डाव्या दोन्ही प्रकारच्या राज्यवाद्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. नथुरामने केलेल्या थोर उपकारांची वाच्यता अर्थातच कुणी केली नाही. खरे तर गांधींना थेट संतपद बहाल करून त्यांचे जिवंत, उपद्रवी राजकीय अस्तित्व संपुष्टात आणणे नथुराममुळेच शक्य झाले होते. पण…त्यातही एक गोची झाली. ती अशी की, गांधी स्वत:च त्यांना निष्प्रभ करण्यासाठी त्यांच्यावर लादलेले संतत्व अधूनमधून झुगारून देतात. त्यांचे उत्तराधिकारी या गोचीसाठी त्यांना कधीच माफ करत नाहीत.

..तर, भारतीय राज्यवादाच्या या गांधींची प्रतिष्ठापना आता इंडिया गेटवरील पंचम जॉर्जच्या पुतळ्याच्या रिकाम्या झालेल्या जागेवर करण्यात येणार आहे, असे आम्हा दिल्लीवासीयांना अधूनमधून सांगण्यात येते. तसे घडले तर तो या सरकारी गांधींचा राज्याभिषेकच ठरेल! यापूर्वी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजेतील एका पलटणीला गांधींचे नाव दिले होते. त्यानंतर गांधींच्या नावाचा विनोदी वापर करणाऱ्या सांस्कृतिक राष्ट्रवादाची अनेक दुकाने कुत्र्याच्या छत्र्यांसारखी फोफावली आहेत. अशात या सरकारी गांधींची प्रकृती तितकीशी चांगली राहत नाही. नथुराम गोडसे जे करू शकला नाही, ते करण्यात हिंदू राष्ट्रवादाचे स्वघोषित प्रणेते बाळ ठाकरे आणि लालकृष्ण अडवाणी हे दोघे मात्र कमालीचे यशस्वी झाले आहेत.

दुसरे गांधी हे ‘गांधीवाद्यांचे गांधी’ आहेत. हे सध्या तीव्र अशा अ‍ॅनिमियाने पीडित आहेत. या गांधींबद्दल लोकांना आपुलकी वाटते. भारतीय जनमानसात त्यांना प्रेमळ आजोबांचे स्थान आहे. पण त्याचबरोबर ते चुकून भारतात जन्म घेतलेले व्हिक्टोरियन काळातील सनातनी, सोवळे (प्यूरिटन) वाटतात आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत कंटाळवाणे आहे. ‘पहिले’ गांधी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी बनवलेला कोकाकोला न पिता, भारतीय कंपनीने बनवलेला कॅम्पा कोला पितात. परंतु हे दुसरे गांधी मात्र लिंबूपाणी पिणे व घरी कातलेल्या सुताची खादी वापरणेच पसंत करतात. ते राजकारणाच्या वाऱ्यालाही उभे राहत नाहीत. खरे तर त्यांना तसे करताच येत नाही. कारण ते जर राजकारणात पडले तर त्यांच्या नावाने उघडलेल्या सर्व आश्रमांना आणि त्यांच्या खादीला शासनाकडून मिळणारे सारे अर्थसाहाय्य व अनुदान बंद नाही का पडणार? शिवाय गांधीवादावर झडणारी चर्चासत्रेही आटून जातील, ते वेगळेच! तसे हे गांधी अधूनमधून ‘देशाच्या राजकारणातील वाढते गुन्हेगारीकरण’, ‘देशातील विषम विकास’, ‘भ्रष्टाचार’ यांसारख्या विषयांवर धिक्कार सभा घेतात म्हणा. पण या बैठकांमध्ये होते एवढेच की, कुणाही व्यक्तीचे वा पक्षाचे नाव न घेता सर्वजण परिस्थितीच्या नावाने भरमसाट अश्रू ढाळतात. सभा संपल्यावर सगळेच मजेत असतात. भ्रष्टाचारी राजकारणीदेखील जोशात टाळ्या वाजवतात.  

‘गांधीवाद्यांचे गांधी’ गांधीविचारावर व्याख्याने देण्यासाठी जगभर भ्रमण करतात. परंतु आपल्या अनुयायांमार्फत भारतातील जनतेशी मात्र ते क्वचितच संवाद साधतात. बरोबरच आहे म्हणा! भारतातला त्यांचा श्रोतृवर्ग तो केवढास्सा! आणि तोही आपला सुस्तावलेला देह घेऊन येणार आणि जडावलेल्या डोळ्यांनी ते प्रवचन ऐकणार! त्यांच्यात काही उत्साह, चैतन्य नावालाही शिल्लक आहे का? ‘आपण गांधीविचारावरील प्रवचनांना गेलो नाही तर वाईट दिसेल बुवा…’ म्हणून ते येणार. अशा गांधीवाद्यांचे सरासरी वय आता असेल सुमारे शंभर वर्षे आणि त्यांना ऐकणाऱ्यांचे वयदेखील त्याहून काही फारसे कमी नसणार!

यावरून गांधीवाद्यांना वाटते की, भारतीय जनतेने गांधींकडे पाठ फिरवली आहे. पण गांधींविषयी थोडा कमी आदर बाळगणाऱ्यांना मात्र मनापासून असे वाटते की, गांधीवाद्यांनी गांधींकडे आणि भारतीय जनतेकडे पाठ फिरवली आहे! त्यांना बिचाऱ्यांना वाटते की, उठसूठ गांधींचे नाव घेणाऱ्या या गांधीवाद्यांना प्रवचने देत फिरण्यापेक्षा बाबा आमटे, अण्णा हजारे किंवा सुंदरलाल बहुगुणा यांच्याप्रमाणे काही वेगळा मार्ग चोखाळता आला नसता का?

आजचे तिसरे गांधी हे लहरी, मनमानी आणि कलंदर व्यक्तींचे गांधी आहेत. त्यांचा स्कॉच-व्हिस्कीपेक्षाही कोका कोलाला तीव्र विरोध आहे. आणि त्यांची स्थानिक रूपे आयात केलेल्यापेक्षा भयानक आहेत, असे त्यांचे मत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा वापर असल्या क्षुद्र गोष्टींसाठी व्हावा, हे त्यांना मान्य नाही. हे ते अनेक प्रकारे बोलूनही दाखवतात. असला खोटा राष्ट्रवाद जोपासण्यापेक्षा ते कोका कोला व पेप्सी-कोलाशिवाय जे लोक राहू शकत नाहीत, त्यांच्यासाठी तो आयातही करतील, पण कॅम्पा कोलाचा आग्रह धरणार नाहीत.

‘हिंदू स्वराज’ला कोळून प्यालेले हे गांधी नाही नाही त्या गोष्टींचा अगदी पिच्छा पुरवतात. सगळे काही अगदी छान चाललेले असताना हे वेगळेच काही टुमणे लावतात. वंदना शिवाने कडुनिंबाच्या काही पेटंट मिळवण्यावरून अमेरिकन न्यायालयात दावा दाखल केला, तेव्हा हेच गांधी - म्हणजे तिने गांधी वाचला आहे की नाही माहीत नाही - तिच्या मनात होते. मेधा पाटकरांच्या ‘कुप्रसिद्ध’ नर्मदा बचाव आंदोलनाला प्रेरणा देणारे हेच आणि ऐंशी पार केलेले लेखक- नर्तक- विचारवंत शिवराम कारंथ यांनी भारतातील अणुऊर्जेच्या प्रतिष्ठापनेतील फसवणूक, मूर्खपणा आणि अपरिहार्य असा विनाश यांच्याविरुद्ध हल्लाबोल केला, तेव्हा त्यांच्या मनात दडून बसले होते तेदेखील हेच गांधी!

या गांधींची त्यांना अगदी आतून विरोध करणाऱ्यांशीही मैत्री आहे. व्ही. एम. तारकुंडे यांच्यासारखे त्यांचे ख्यातनाम टीकाकार, अस्मा जहाँगीर यांच्यासारखे पाकिस्तानी नागरिक यांचा सहवास त्यांना गांधींचे नाव धारण करून जे भारतीय राजकारणात दोन दशकांपासून वावरत आहेत, त्यांच्यापेक्षाही अधिक आवडतो. यांच्या संपर्कात असणाऱ्यांचे सरासरी वय बऱ्यापैकी कमी आहे. तारकुंडे आणि कुलदीप नय्यर यांच्याप्रमाणे मनाने(च) तरुण असलेले लोक जर त्यामध्ये नसते, तर ते आणखीही खाली आले असते.

हे तिसरे गांधी आणि त्यांचे तरुण मित्र मिळून भारतीय राज्यसंस्था, तिचे सुरक्षात्मक हितसंबंध आणि विज्ञान-आस्थापना यांच्यासाठी एक नस्ती डोकेदुखी होऊन बसली आहे. ती डोकेदुखी होऊन बसली आहे- समाजाच्या आकलनशक्तीसाठी- जिला सर्वसाधारणपणे ‘शहाणपण’ असे संबोधले जाते. पण माझे आद्य गुरू सिग्मंड फ्रॉईड याच्या शब्दांत सांगायचे झाले तर याला दैनंदिन जीवनातली विकृतीच म्हणावे लागेल. हे गांधी आणि त्यांचे विलक्षण बेजबाबदार तरुण साथीदार यांच्यामध्ये मला मात्र विशेष स्वारस्य आहे.

कारण माझ्या आयुष्यात मी केलेल्या अनेक गोष्टी आज ही तरुण मंडळी अधिक चांगल्या प्रकारे करतात. कलंदर लोकांचे बळ वाढते आहे. मी तर माझ्या असंख्य शत्रूंना खिजवण्यासाठी असेही म्हणेन की, मी जे काही जीव तोडून सांगतो वा करतो आहे, ते माझ्या मृत्युनंतर त्यांच्याचकडून अधिक आक्रमकपणे, आत्मविश्वासाने व त्याबरोबरच अधिक सुघटितपणे व राजकीय कौशल्य वापरून सांगितले जाईल याबाबत माझी खात्री आहे आणि खुशीही. हो, मृत्युनंतरही मला मागे राहिलेल्या शत्रूंचा पिच्छा पुरवायचा आहे.

या गांधींवर खादी वापरण्याचे किंवा दारूला न शिवण्याचे बंधन नाही. त्यांचा नेहमीचा पेहराव निळी जीन्स, वर खादीचा कुडता आणि खांद्यावर झोळी असा आहे. या गांधींचे त्यांचे जन्मस्थान असलेल्या गुजरातशी तणावपूर्ण संबंध आहेत असे म्हणतात आणि गुजरातने ज्याप्रमाणे त्यांचा परित्याग केला, त्याप्रमाणे तेदेखील गुजरातचा परित्याग करतील, असा लोकांचा कयास आहे.

हां, तर आपण गांधी आणि त्यांचे सवंगडी येत्या काळात शहाण्या, विवेकी व उच्चशिक्षित भारतीयांचे जिणे कसे हराम करणार आहेत, त्याबद्दल बोलत होतो. तैवानचे राजकीय कार्यकर्ते फ्रेड च्यू असे म्हणतात की, ‘वैश्विक भांडवलवाद जिथे जिथे पसरेल, तिथे तिथे तो आपल्याबरोबर राजकीय चळवळी, स्वयंसेवी संस्था व ‘झोळीवाले’ घेऊन जाईल आणि मोठमोठ्या उद्योगपतींची भंबेरी उडवील.’ ही किंमत भांडवलशाहीला चुकवावी लागणारच आहे. मला तर त्यांच्या या धाडसी स्वभावाचे कौतुक वाटते.

चौथे गांधी हे सहसा वाचले जात नाहीत. ते फक्त ऐकले जातात आणि तेही अप्रत्यक्षपणे. मार्टिन ल्युथर किंगसारखा एखादाच माणूस काळजीपूर्वक व साक्षेपाने वाचून त्यांच्या कामाचे मूल्यमापन करतो. बाकीच्यांना त्यांनी काय लिहिले आहे, हेदेखील ठाऊक नसते. गांधींबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन हा ए. के. गोपालनचा  कार्ल मार्क्सविषयी जसा होता, तसाच आहे. हे गोपालन म्हणे एकदा असे म्हणाले होते की, ‘आपण काही मार्क्स वाचला नाही, कारण वाचून तो आपल्याला कळलाच नसता.’ पण असे म्हणणारे गोपालन शेवटपर्यंत मार्क्सवादी राहिले, हेही तेवढेच खरे.

हे गांधी मुख्यत: मिथकांचे गांधी आहेत. ते आपल्या सिद्धांन्तांना घट्ट धरून आहेत. म्हणजे निदान त्यांच्या पर्यावरणीय, अणुऊर्जाविरोधी व स्त्रीवादी चळवळीतल्या चाहत्यांचे तरी तसे म्हणणे आहे. कारण गांधीवादाची तत्त्वे ‘गांधी’ या मिथकाच्या रूपाने जगभर पोहोचली आहेत.

काही वर्षांपूर्वी रिचर्ड ग्रेनियर हा अमेरिकन स्तंभलेखक रिचर्ड अ‍ॅटेनबरोचा ‘गांधी’ पाहून काहीसा खंतावला आणि गांधींचे महत्त्व कमी करण्यासाठी त्याने त्यांचे जीवन आणि त्यांचे सिद्धान्त यांच्यामधील तफावती उघड करण्याचा प्रयत्न केला. (थोर कवी जॉन मिल्टन किंवा संगीतकार बीथोव्हेन यांनी बालकांचा गैरवापर केल्याबद्दल किंवा तत्त्वज्ञ प्लेटो याने समसंभोगाच्या नावाखाली त्याची भलावण केल्याबद्दल ग्रेनियरने कधी नाराजी दाखवल्याचे ऐकिवात नाही.) पण रहस्यभेदाचे असे प्रयत्न फारसे कधी यशस्वी होत नाहीत. कारण जगभरच्या ग्रेनियर्सना कधी ना कधी मानवी क्षमतांवर विश्वास ठेवण्याची गरज भासतेच. पोलंडच्या कामगारांनी १९८० च्या दशकात त्यांच्या देशातील जुलमी राजवटीविरुद्ध लढा केला, तेव्हा ‘लेक वालेसा हे आमचे गांधी आहेत,’ असेच ते म्हणाले. अर्थात व्होडका पिणाऱ्या, रोखठोक बोलणाऱ्या कामगार संघटनेच्या नेत्याला हे शब्द पचवणे जडच गेले असणार. पण पोलंडच्या जनतेला या दोन व्यक्तिमत्त्वांमधील ऐतिहासिक साम्य-भेद पडताळून पाहण्यात काहीच स्वारस्य नव्हते. त्यांना वेगळेच काही म्हणायचे होते. गांधी हे आमच्या काळात राज्यव्यवस्थेचे व आधुनिक तंत्रज्ञानाचे पाठबळ असलेल्या निरंकुश नोकरशाही आणि जुलमी राजवट यांच्याविरोधात बंडखोरी करण्याचे व त्यासाठी आक्रमक अहिंसेचे हत्यार वापरण्याचे प्रतीक बनले होते.

थोडक्यात सांगायचे तर गांधी हे अन्यायाच्या विरोधात करावयाच्या संघर्षाचे नाव आहे. असा संघर्ष- जो पराकोटीच्या अमानुषतेशी सामना करतानाही आपली माणुसकी सोडत नाही! म्हणूनच फिलिपाइन्सच्या बेनिटो अ‍ॅक्विनोची हत्या झाली तेव्हा तेथे रस्त्यावर आलेल्या मोर्चेकऱ्यांनीही तेच केले. ‘आमचा गांधी बेनिटो’ अशाच घोषणा त्यांनी दिल्या. आता हाही जर तुम्हाला योगायोग वाटत असेल तर आणखी एक उदाहरण आहे माझ्या पोतडीत! म्यानमारच्या विद्यार्थ्यांनी तेथील लष्करी राजवटीविरुद्ध उठाव केला, तेव्हा त्यांनीही गांधींचाच धावा केला. फक्त एवढेच की, त्यांच्या नेत्या या खेपेला होत्या आँग सान स्यू की. गंमत अशी की, स्यू की यांच्यावर ‘दुराग्रही गांधीवादी’ असल्याचा दुर्दैवी आरोप झाला, तेव्हा त्यांनी गांधी वाचलाच नव्हता. याशिवाय खान अब्दुल गफारखान (सरहद गांधी) यांच्यापासून तर नेल्सन मंडेलांपर्यंत अनेकांना हे बिरुद बहाल करण्यात आलेले आहे.

जीवनाचे विद्रूप, उघडेनागडे रूप दाखवणाऱ्या गल्लीबोळांमध्ये हा मस्तमौला गांधी परिवर्तनविरोधी, सवंग, धनदांडग्या लोकांच्या स्थानांना धक्के देत मुक्तपणे फिरतो आहे. याला कशाचेच भय नाही. पण त्यांना तरी याच्या शक्तीचा अदमास कुठे आहे? शस्त्रास्त्रांचे पाठबळ नाही म्हणून जुलमी राजवट याला कमी लेखते आणि अहिंसेच्या गोष्टी करतो म्हणून धंदेवाईक क्रांतिकारक याची टर उडवतात. अर्थात दोघांनाही याची भारी किंमत मोजावी लागतेच! या गांधीने केलेला उत्पात पाहून बऱ्याच उशिराने त्यांचे डोळे खाडकन् उघडतात. मग ‘परिवर्तनाची चक्रं कधी कधी उलटीही फिरतात’ किंवा ‘क्रांतीला जबरदस्त यश मिळाल्यानंतरही कधी कधी ती कोलांटउडी खाते व सपशेल शरणागती पत्करते,’ असे काहीबाही बोलून ते स्वत:ची कशीबशी समजूत घालतात. ते खरेही आहे म्हणा! क्रांती आपलीच पिल्ले खाते म्हणतात, ते याच अर्थाने. तर हे झाले जुलमी राजवटीबद्दल.

दुसरा गट असलेल्या क्रांतीच्या दुतांबद्दल काय बोलावे? आजकाल क्रांतिकारक म्हणजे आपली उमेदीची कारकीर्द विद्यापीठांमध्ये घालवलेल्या मध्यमवयीन, सुखवस्तू, विक्षिप्त अशा अठरापगड जमातींच्या लोकांचा जथ्थाच आहे. तेही बिचारे ‘गांधीवादाच्या ऐतिहासिक मर्यादा’ वगैरे विषयांवर आपण गेलाबाजार एखादे चर्चासत्र तरी घेऊ,’ असे म्हणून (खरे तर या मर्यादांमुळे गांधीवाद कधीच संपायला हवा होता.) समाधान मानून घेतात. (शेवटी समाधान ही मानण्याचीच तर गोष्ट आहे!) परंतु हे समाधान मानले व मनवले जात असतानाच हा मिथकातील गांधी जगातल्या दुसऱ्याच कोण्या झोपडपट्ट्यांमध्ये निघून जातो आणि तेथे तो आपल्याच जुन्या, बनचुक्या चेल्यांच्या विरोधात बंडखोरी करण्यासाठी नवीन क्रांतिकारक घडवण्याच्या उद्योगाला लागतो.

मी तुम्हाला चार गांधी दिले आहेत आणि त्यातील माझा प्राधान्यक्रमही स्पष्ट केला आहे; ज्यायोगे तुम्हाला त्यातून ‘निवड’ करता यावी. पण… तेही नकोच. कारण निवड करणे म्हणजे कोणत्या तरी गांधींचा अंगीकार करणे आलेच आणि गांधी कसे धोकादायक असू  शकतात, हे आपण पाहिलेच आहे. त्यापेक्षा असेच करा ना- गांधींची तसबीर तुमच्या घराच्या वा कार्यालयाच्या भिंतीवर टांगून द्या. बस्स! मला वाटतं की, हेच सगळ्यात शहाणपणाचे होईल. तुमचा त्यांच्याविषयीचा आदर जाहीर होईल व भारतीय देवगणात एकाची भर पडेल. शिवाय त्यांच्या जन्मतिथीला- जी शासनाने सार्वजनिक सुटी म्हणून जाहीर केली आहे- आपल्या मुलांना पिकनिकला घेऊन जाण्यासाठी तुम्ही मोकळेच! कसे? 

.............................................................................................................................................  

(या मूळ इंग्रजी लेखाचा मराठी अनुवाद ‘आजचा सुधारक’ या मासिकाच्या एप्रिल २०११च्या अंकात प्रकाशित झाला होता. मूळ इंग्रजी लेख ‘द लिटल मॅगझिन’, मे २०००, खंड १मधून घेतला गेला.)

मूळ इंग्रजी लेख वाचण्यासाठी पहा –

http://www.littlemag.com/nandy.htm

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.