विनय हर्डीकर - मराठीतले जॉर्ज ऑर्वेल!
ग्रंथनामा - झलक
राम जगताप
  • ‘जन ठायीं ठायीं तुंबला’चं मुखपृष्ठ
  • Sun , 09 April 2017
  • ग्रंथनामा Granthnama झलक जन ठायीं ठायीं तुंबला Jan Thayin Thayin Tumbla विनय हर्डीकर Vinay Hardikar जनशक्ती वाचक चळवळ Janshakti Vachak Chalval जॉर्ज ऑर्वेल George Orwell जनांचा प्रवाहो चालिला Janancha Pravaho Chalila श्रद्धांजली Shradhhanjali कारुण्योपनिषद Karunyopnishad विठोबाची आंगी Vithobachi Angi देवाचे लाडके Devache Ladke

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक विनय हर्डीकर यांच्या राजकीय-सामाजिक लेखांचा संग्रह ‘जन ठायीं ठायीं तुंबला’ या नावाने नुकताच प्रसिद्ध झाला आहे. जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद यांनी हा संग्रह प्रकाशित केला आहे. या संग्रहाचे संपादन राम जगताप यांनी केले आहे. या संग्रहाला लिहिलेल्या दीर्घ प्रस्तावनेचा हा संपादित अंश.

-----------------------------------------------------------------------------

१.

पत्रकार, समीक्षक, शास्त्रीय संगीताचे जाणकार, मर्ढेकर-शेक्स्पिअर  यांचे अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते, गिर्यारोहक आणि वक्ते अशा विविध कॅलिडोस्कोपिक रूपांत लीलया वावरणारे विनय हर्डीकर हे काहीसे कलंदर व्यक्तिमत्त्व आहे. काही माणसे विनाकारण स्वतःविषयी गैरसमज निर्माण करून ठेवतात; तर काही माणसांबद्दल इतर लोक गैरसमज निर्माण करून घेतात. हर्डीकर या दोन्ही प्रवादांचे धनी आहेत आणि याची त्यांना स्वतःलाही चांगली जाणीव आहे, पण तरीही ‘आपण बुवा असे आहोत आणि असेच राहू’ हा त्यांचा बाणा आहे. त्यामुळे हर्डीकर अनेकांना हेकेखोर वाटतात. मात्र, तरीही मूळचा सामाजिक कार्यकर्त्याचा पिंड, पत्रकाराची शोधक दृष्टी, चौफेर भ्रमंती आणि जोडीला अनेकविध विषयांचा व्यासंग-अभ्यास आणि प्रत्येक विषयावरची स्वतःची खास ठाम आणि परखड मते, यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची अनेकांना भुरळ पडते. काव्य, चित्रपट, संगीत, खेळ, शेती, सामाजिक चळवळी, राष्ट्रीय राजकारण, कुठलाही विषय काढा त्यात हर्डीकरांचा व्यासंग असतोच असतो. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा आणि त्यांच्या व्यासंगाचा आवाका आता आकळू लागला आहे, असे वाटू लागते न लागते तोच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा नवा पैलू समोर येतो, त्यांच्या व्यासंगाचा नवा विषय समजतो आणि विस्मयचकित व्हायला होते!

हर्डीकरांशी मैत्री असणे हा बौद्धिकदृष्ट्या फार आनंदाचा भाग असला तरी ही गोष्ट सहज परवडणारी नसते. त्यांच्या वागण्या-बोलण्याला एक तीक्ष्ण आणि तिखट धार असते. ‘अघळपघळपणा’ वा ‘शिळोप्याच्या गप्पा’ या गोष्टी त्यांचा शब्दकोशात नाहीत. शिवाय त्यांचे प्रसंगावधान इतके जबरदस्त आहे की, तुम्ही चुकून एखादा उणा-वावगा शब्द बोललात, तरी ते तुमचा खिमा करून टाकतात! चुकलेल्या कुणाचीही ते गय करत नाहीत, अगदी स्वत:चीही. त्यामुळे त्यांचा तिखटपणा साहवतो. कारण त्यात हिशेबीपणा नसतो; आपपरभाव नसतो. ‘सत्याला सत्य म्हणून जाणा आणि असत्याला असत्य म्हणून जाणा’ या गौतम बुद्धाच्या वचनाचा प्रत्यय ते आपल्या वाणी व लेखणीतून सतत करून देतात. म्हणून स्वत:च्या ‘टर्म्स अँड कंडिशन्स’वर जगणारा हा माणूस काहीसा फाटक्या तोंडाचा असला, तरी तितकाच लोभसही आहे! त्यांचा मित्र-स्नेही परिवार अफाट आणि तोही विविध क्षेत्रांमधला आहे. कारण समोरच्या व्यक्तीला आपलेसे करून घेण्याची, खिशात टाकण्याची त्यांची एक तऱ्हेवाईक, पण आत्मीय ट्रिक आहे. तिचा ते खुबीने वापर करतात. एकदा जोडलेला माणूस सहसा तोडला जाऊ नये, याची तापट स्वभाव असूनही ते तितकीच काळजीही घेतात! काही माणसांना फार चांगल्या प्रकारे विचार करता येतो, तो इतरांना तितक्याच चांगल्या प्रकारे सांगताही येतो; पण तो विचार आणि प्रत्यक्षातला व्यवहार यातील विसंगती मात्र त्यांना फारशी कमी करता येत नाही. अनेकदा ते त्यांच्या लक्षातही येत नाही. हर्डीकरांच्या विचार आणि व्यवहारात मात्र कमालीचे साधर्म्य आहे!

माणूस म्हणून विनय हर्डीकर काहीसे तऱ्हेवाईक असले, तरी लेखक म्हणून मात्र अतिशय समतोल, तारतम्यपूर्ण आणि समंजस आहेत. त्यांचे बोलणे आणि लिहिणे यात कमालीचे साम्य आहे. त्यामुळे एकदा कागदावर उतरलेला मजकूर हाच त्यांचा अंतिम खर्डा असतो. त्यात काही बदल करण्याची गरज त्यांना पडत नाही. लेखनाबाबतची त्यांची ही शिस्तबद्धता आणि काटेकोरपणा या दोन्ही गोष्टी वाखाणण्याजोग्या आहेत. त्यामुळे गेल्या सदतीस वर्षांमध्ये त्यांच्या नावावर अवघी पाच पुस्तके आहेत. वयाच्या २९व्या वर्षी लिहिलेले ‘जनांचा प्रवाहो चालिला’ हे त्यांचे पहिलेच पुस्तक बरेच गाजले होते. आणीबाणीच्या विरोधात लिहिलेल्या या पुस्तकाला १९८१मध्ये महाराष्ट्र सरकारने आधी पुरस्कार जाहीर करून नंतर तो नाकारला होता. साहित्य-समाज क्षेत्रातील मान्यवरांविषयीच्या लेखांचे ‘श्रद्धांजली’ (१९९७), बा. सी. मर्ढेकरांच्या कवितांची चरित्रात्मक अंगाने समीक्षा करणारे ‘कारुण्योपनिषद’ (१९९९), राजकीय-सामाजिक लेखांचे ‘विठोबाची आंगी’ (२००५) आणि गतवर्षी प्रकाशित झालेले व ‘श्रद्धांजली’चा पुढचा भाग म्हणता येईल अशा मान्यवरांवरील लेखांचे ‘देवाचे लाडके’ (२०१५), ही त्यांची इतर पुस्तकेही तितकीच तोलामोलाची आणि महत्त्वाची आहेत. प्रस्तुत पुस्तक धरले, तर गेल्या अडतीस वर्षांत हर्डीकरांच्या नावावर सहा पुस्तके जमा होतात. म्हणजे साधारणपणे सहा वर्षाला एक पुस्तक अशी त्यांच्या लेखनाची सरासरी निघते. वर्षाला एखाद-दुसराच लेख लिहिणाऱ्या हर्डीकरांचा लेखनवेग पाहता, ते साहजिकही म्हणावे लागेल. १९७८ ते १९९७ या पहिल्या १९ वर्षांत एकच पुस्तक म्हणजे साठीनंतर त्यांचा लेखनवेग किंचित वाढला आहे.

‘माझं लेखन हे फर्स्ट पर्सन डॉक्युमेंटरी आहे’ असे हर्डीकर स्वतःच्या लेखनाविषयी म्हणतात. कारण स्वतःचे अनुभवसिद्ध विश्व आणि वाचन हा त्यांच्या लेखनाचा गाभा असतो. हर्डीकरांचे अनुभवविश्वही खूपच विस्तृत आणि वैविध्यपूर्ण आहे. साहित्य (मराठी-हिंदी-इंग्रजी), राजकारण, समाजकारण, सामाजिक चळवळी-आंदोलने, शास्त्रीय संगीत अशा क्षेत्रांत त्यांना कमालीचा रस आहे आणि या क्षेत्रांची त्यांना उत्तम जाणही आहे.

ज्ञानप्रबोधिनी, न्यू क्वेस्ट, इंडियन एक्स्प्रेस, ग्रामायण, शेतकरी संघटना, देशमुख आणि कंपनी, रानडे इन्स्टिट्यूट (पुणे विद्यापीठ) आणि फ्लेम हे पुण्यातील खासगी विद्यापीठ असा विनय हर्डीकरांचा वैविध्यपूर्ण प्रवास आहे. या प्रत्येक ठिकाणी ते स्वतःहून गेले आणि मनासारखे काम करता येत नाही हे लक्षात आल्यावर देशमुख आणि कंपनी वगळता त्या-त्या ठिकाणांहून स्वतःहून बाहेर पडले.

२.

हिंदीतील मान्यवर कवी (कै.) गजानन माधव मुक्तिबोध त्यांना भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला, विशेषत: तरुण साहित्यिकांना, ‘पार्टनर, तुम्हारी पॉलिटिक्स क्या है?’ असा प्रश्न विचारत. तो काळ होता साठीचा. त्यानंतर नव्वदोत्तरी काळ आला आणि तोही संपला. सध्या निष्क्रियोत्तरी काळ सुरू झालेला आहे. गेल्या पाच दशकांहून अधिकच्या काळात हिंदीमध्ये मुक्तिबोधांच्या या वाक्याला ‘मोस्ट कोटेबल कोट’चे स्वरूप आले आहे. कुणाच्याही भूमिकेविषयी प्रश्न उपस्थित करायचा झाल्यास, कुणाच्याही भूमिकेची चिकित्सा करायची झाल्यास या विधानाचा संदर्भ दिला जातो. मग, ते राजकारणी असोत वा सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक असोत वा पत्रकार असोत. मुक्तिबोध यांचा हा प्रश्न सूचक आहे आणि तितकाच मर्मभेदक-खोचकही आहे. कारण ‘राजकारण’ या शब्दाविषयी आपल्याकडे भयानक आणि भयंकर असे समज-गैरसमज आहेत. हा शब्द भारतीयांनी इतका बदनाम करून ठेवला आहे की, तो आता जवळपास तुच्छतेनेच वापरला जातो. अर्थात, इथे ‘राजकारण’ या शब्दाचा इतिहास, वर्तमान किंवा त्याची व्युत्पत्ती आणि मूलार्थ हा प्रतिपाद्य विषय नाही. त्यामुळे ती चर्चा इथेच थांबवू आणि मुक्तिबोध ‘पॉलिटिक्स’ हा शब्द कोणत्या अर्थाने वापरतात, ते समजून घेऊ. ते ‘रोल’ वा ‘भूमिका’ या अर्थाने हा शब्द वापरतात. म्हणजे, ‘पार्टनर, तुम्हारी पॉलिटिक्स क्या है?’ याचा अर्थ, ’मित्रा, तुझी नेमकी (राजकीय) भूमिका काय आहे?’

मात्र, बहुतेकांनी (त्यात पत्रकार-लेखक-संपादक-प्राध्यापक-वकील-डॉक्टर-सामाजिक कार्यकर्ते असे सर्व आले) याचा कधी विचारच केलेला नसतो. स्वत:ला सतत प्रश्न विचारण्याची आणि स्वत:ची सतत समीक्षा करण्याची ‘सवय’ अनेकांना नसते, ती त्यांच्या अंगवळणी पडलेली नसते. अशी ‘सवय’ लावून घेतली पाहिजे, याचाही त्यांनी कधी विचार केलेला नसतो. त्यामुळे वरील प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळेलच याची पुरेशी खात्री नसते. कारण विचार आणि व्यवहार यातली तफावत कमीत कमी ठेवण्यासाठी धडपडणारे लोकही कमीच असतात...

पण ‘पॉलिटिक्स’ म्हणजे नेमके काय? जॉर्ज ऑर्वेल हा ब्रिटिश लेखक म्हणतो, ‘राजकारण हा शब्द शक्य तितक्या उदारपणे घ्यावा. जगाला एका विशिष्ट हेतूने ढकलणे, हाही राजकीय हेतूचा/धोरणाचाच भाग असतो.’ हर्डीकर त्यांचे आजवरचे सामाजिक काम आणि लेखन याच धारणेतून करत आले आहेत. आता हर्डीकर सत्तरीच्या आसपास आहेत. वयाच्या २२व्या वर्षापासून ते कुठल्या ना कुठल्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक चळवळीशी संबंधित आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ज्ञानप्रबोधिनी, जनता पक्ष आणि शेतकरी संघटना या संस्थांमध्ये त्यांनी काही काळ पूर्णवेळ काम केले; पण ते करत असतानाच युवक क्रांती दल, राष्ट्र सेवा दल या संघटनांच्याही ते संपर्कात होते. म्हणजे पूर्णवेळ व अर्धवेळ कार्यकर्ता म्हणून काम करणे, तर कधी त्या संस्था वा चळवळीचा अजेंडा ठरवण्याचे वा नवी दिशा शोधण्याचे काम हर्डीकरांनी केले आहे. संघ, ज्ञानप्रबोधिनी, जनता पक्ष, माणूस साप्ताहिक, साधना साप्ताहिक, ग्रामायण, न्यू क्वेस्ट, शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष अशा वेगवेगळ्या संस्था-संघटना-चळवळींमध्ये हर्डीकरांनी काम केले. पहिली दोनेक वर्षे ते त्या संस्थेची कार्यपद्धती समजून घेऊन त्यानुसार काम करतात. त्यानंतर त्या संस्थेची उद्दिष्टे, त्याचे परिणाम आणि संस्थेचे अंतिम ध्येय यांचा विचार करून काही प्रश्‍न उपस्थित करतात, व्यापक विचार करून काय हितावह आहे वा नाही याविषयी सांगायला लागतात. लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य, मूल्ये, नीतिमत्ता, कुटुंबव्यवस्था, राजकारण यांचा विचार करून आपली भूमिका मांडतात. विचारांती स्वीकारलेल्या निष्कर्षांवर ठाम राहतात. केवळ चर्चेच्या पातळीवरच नाही तर दैनंदिन संवादाच्या, प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवरील मतभेद गृहीत धरून किमान समान कार्यक्रम कसा ठरवून राबवता येईल यावर भर देतात. सतत स्वत:ची आणि इतरांची समीक्षा करत राहणे, यातून अंतिमत: फायदाच होतो हे मानणारे, योग्य मुद्द्यांवर केला जाणारा विरोध हा आपला बाणा अधिक धारदार करतो, हे जाणून असलेले हर्डीकर खरे म्हणजे ‘पूर्णतेच्या शोधातले पांथस्थ’ आहेत. गेल्या ४०-४५ वर्षांच्या काळात त्यांनी ज्या ज्या संस्था-संघटना-चळवळींसोबत काम केले, त्यातील कोणत्याच संस्थेने दीर्घकाळ हर्डीकरांना अपेक्षित मार्गावरून वाटचाल केलेली नाही. काहींचे प्रवास तर नंतर नंतर भरकटत गेले. परिणामी हर्डीकरही त्यांच्यासोबत फार काळ राहिले नाहीत.

आपला अजेंडा कुठलीच संस्था-संघटना पूर्णपणे स्वीकारत नाही, याचा इतक्या वर्षांच्या काळात वारंवार अनुभव येऊनही हर्डीकर अजूनही निराश झालेले नाहीत. यापुढे कुठलीच संस्था-संघटना तो स्वीकारणार नाही, यावरचा त्यांचा विश्वासही कमी झालेला नाही आणि काहीतरी करून दाखवण्याची ऊर्मीही निमालेली नाही. कीर्ती आणि मानमान्यता यासाठी प्रसिद्ध संस्कृत नाटककार भवभूतीला त्याच्या आयुष्यात बरेच झगडावे लागले. पण निराश न होता त्याने ‘माझ्या प्रतिभेला न्याय देणारा सहृदय आत्मा कधी तरी, कोठे तरी भेटेलच; काळ अनंत आहे आणि पृथ्वी विपुल आहे,’ असे उद्गार काढल्याचे सांगितले जाते. हर्डीकरांचा आशावादही तितकाच दुर्दम्य आणि बुलंद आहे. शिवाय आजही त्यांच्यातील बंडखोरपणाही तितकाच ज्वलंत आहे. बंडखोरी ही कुठल्याही व्यक्तीच्या मनाची, बुद्धीची युवावस्था असते. हर्डीकरांनी त्यांच्या ‘देवाचे लाडके’ या पुस्तकातील एका लेखात (पृ. १६८) ‘साधना’ साप्ताहिकाचे माजी संपादक यदुनाथ थत्ते यांनी सांगितलेली ‘युवक’ या शब्दाची सहा लक्षणे उदधृत केली आहेत. ती अशी – “युवक साहसाच्या मार्गानं जातात, सुरक्षिततेच्या नाही. आपल्या आधीच्या पिढ्यांचं ढोंग ते उघडकीला आणतात. परिवर्तनाला विरोध करणारी (जुनाट) विचारसरणी युवक नाकारतो. युवकाला आयुष्यासाठी एक उदात्त हेतू हवा असतो. त्याला मुक्कामापेक्षा प्रवास महत्त्वाचा वाटतो. वैफल्याची चैन त्यांना परवडत नाही.’’ ही सहाच्या सहाही लक्षणे हर्डीकर यांना आजही जशीच्या तशी लागू पडतात.

३.

हर्डीकर यांच्यासारखी माणसे राजकारणात असोत किंवा समाजकारणात, अध्यापनात असोत की पत्रकारितेत, ती असतील तिथे ‘करेक्टिव्ह फॅक्टर’ म्हणून काम करतात. जर-तरला एका मर्यादेनंतर काही अर्थ नसतो, पण हर्डीकर सक्रिय राजकारणात सहभागी झाले असते, तर त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, ते ज्या सभागृहात गेले असते, तिथल्या चर्चांची पातळी नक्की उंचावली असती, निदान खाली आली नसती. पण भारतीय लोकशाही राजकारणाचा विशेषत: आणीबाणीनंतर जो झपाट्याने अध:पात होत आला आहे, त्यात एकट्या-दुकट्याच्या तत्त्वनिष्ठ राजकारणाचा फारसा पाडाव लागणे शक्य नाही. शिवाय आणीबाणीसारखे पक्षीय नेत्यांचे राजकारण टोकाला गेल्याशिवाय भारतीय जनता खडबडून जागी होत नाही. त्यामुळे भारतीय राजकारणात जनता पक्षाच्या प्रयोगानंतर काँग्रेस-भाजपव्यतिरिक्त तिसऱ्या आघाडीचे राजकारण यशस्वी होताना दिसत नाही. शिवाय हर्डीकर सुरुवातीपासून काँग्रेसी पद्धतीच्या राजकारणाचे विरोधक राहिले आहेत. भाजपविषयी त्यांना सहानुभूती आहे, पण त्या पक्षासोबत त्यांना जायचे नाही. शिवाय हर्डीकरांच्याच सिद्धान्तानुसार भाजपलाही स्वत:चे काँग्रेसीकरण केल्याशिवाय सत्ता मिळवता येत नाही. त्यामुळे हर्डीकर भाजपमध्ये गेले असते तरी ते तिथे फार काळ राहू शकले नसते. हर्डीकरांचा निर्भीड बाणा, आचार-विचारातील समानता आणि व्यापक समाजहित पाहता ते गेली ४०-४५ वर्षे म्हटले तर प्रचलित राजकारणाला समांतर, म्हटले तर एक दबाव गट म्हणून काम करणाऱ्या संस्था-संघटना, चळवळींचे फ्रेंड-फिलॉसॉफर-गाइड म्हणून काम करत राहिले. तोच त्यांचा स्वभाव आहे, तेच त्यांचे राजकारण आहे. अनेक संस्था-संघटना-चळवळी, त्यांचे नेते यांच्यासोबत हर्डीकरांनी काम केले. आप्पा पेंडसे, बाबा आमटे, शरद जोशी, शंकर नियोगी यांचा त्यांच्यावर त्या-त्या काळात प्रभावही पडला. पण यापैकी कुणाच्याही आहारी हर्डीकर गेले नाहीत. आणीबाणीनंतर त्यांनी काही काळ जनता पक्षासाठी काम केले. शेतकरी संघटनेच्या स्वतंत्र भारत पक्षासाठीही काम केले. दोन्ही ठिकाणचा त्यांचा अनुभव फारसा समाधानकारक नसला तरी लोकशाहीतील संसदीय राजकारणाचा त्यांना तिटकारा आलेला नाही. उलट सक्रिय राजकारणात जाऊन आपल्या परीने काहीतरी ठोस काम करण्याची त्यांची भावना तितकीच प्रबळ आहे. शिवाय आजवरच्या सबंध प्रवासात त्यांनी कुणालाही स्वत:ला गृहीत धरू दिले नाही आणि एका मर्यादेनंतर कुठलीही गोष्ट गृहीत धरली नाही. अशी भूमिका असलेली व्यक्ती राजकारणात असली काय, समाजकारणात असली काय, अध्यापनाच्या क्षेत्रात असली काय, तिचा प्रभाव सारखाच असतो. खऱ्या विचारवंताला आपले प्रभावक्षेत्र चांगल्या प्रकारे माहीत असते आणि आपल्या प्रभावाचा केव्हा पुरेपूर वापर करायचा आणि केव्हा नाही, याची उत्तम जाणही असते.

हर्डीकर जी भूमिका घेऊन जे राजकारण करत आले आहेत, त्याला आजवर कुठेच ठोस यश आलेले नाही, ही गोष्ट खरी असली तरी ते त्याबाबतीत कुठलीही तडजोड करायला आजही तयार नाहीत. ते निराश झालेले नाहीत, त्यांचा भ्रमनिरास झालेला नाही आणि त्यांची उमेदही थकलेली नाही. एकाच वेळी अनेक विषयांवर काम करत असल्याने निराशा येत नाही, असे ते सांगतात. ‘माझ्या कामाला, व्यासंगाला उद्देश आहे, पण टार्गेट नाही,’ असेही त्यांचे म्हणणे आहे. विधायक राजकारण करू पाहणाऱ्या कुठल्याही व्यक्तीचे यश मुक्कामापेक्षा प्रवासात असते.

४.

गेली काही वर्षे हर्डीकर ‘मला कुणी मराठीतला जॉर्ज ऑर्वेल म्हटलं तर आवडेल’ असे जाहीरपणे बोलून दाखवत आहेत. त्यांचा हा दावा कुणी खोडून काढायचा प्रयत्न केला नसला, तरी त्यावर कुणी शिक्कामोर्तबही केलेले नाही. हर्डीकरांचे लेखन पेलवण्याजोगे समीक्षक मराठीत आहेत का, हाही प्रश्नच असल्यामुळे तसे होणे साहजिकच म्हणावे लागेल. जॉर्ज ऑर्वेल आणि विनय हर्डीकर यांच्यात ‘राजकीय बांधिलकी मानून लेखन करणे’ हे अतिशय लक्षणीय साम्य आहे. ‘जनांचा प्रवाहो चालिला’ या हर्डीकरांच्या पहिल्या पुस्तकाचे स्वरूप ऑर्वेलच्या ‘होमेज टू कॅटलोनिआ’वर बेतलेले आहे.

आणीबाणीविषयी हर्डीकरांनी त्यांच्या परीने जो निषेध व्यक्त केला, त्यापायी त्यांना दोन महिन्यांचा कारावास भोगावा लागला. त्या काळातील येरवडा तुरुंगातील अनुभव सांगताना त्यांनी त्याआधीचे देशातील, आजूबाजूच्या समाजातील वातावरण आणि त्यांची मानसिक अवस्था आणि येरवड्यातून बाहेर आल्यानंतर मराठीतल्या वेगवेगळ्या लेखकांच्या भेटीगाठींपासून धुळ्याला जाऊन जनता पक्षाच्या एका उमेदवाराच्या प्रचारासाठी केलेली मेहनत यांचा आढावा घेतला आहे. व्यक्तिस्वातंत्र्य, आविष्कारस्वातंत्र्य, लोकशाही, प्रामाणिकपणा व सहानुभूती या मूल्यांचा निष्ठा म्हणून हर्डीकर कसा कसा स्वीकार करत गेले, याचा अतिशय वेधक आणि प्रांजळ आलेख त्यांनी या पुस्तकातून काढल्यामुळे ‘जनांचा प्रवाहो चालिला’ हे मराठीतील होमेज टू कॅटलोनिआ’ म्हणायला हरकत नाही!

ऑर्वेलप्रमाणेच हर्डीकर यांनीही काही काळ पत्रकार म्हणून काम केले आहे. ऑर्वेलप्रमाणेच हर्डीकरही आपले आयुष्य, त्याभोवतालच्या घडामोडी यांची तटस्थपणे चिकित्सा करतात, स्वत:ला सतत तपासून पाहतात. त्यामुळेच ते ‘स्वप्न नको; सत्य पाहूया’, ‘बहुत पाया, कुछ खोया’ यासारखे आत्मपरीक्षणात्मक लेख लिहू शकतात. ऑर्वेलप्रमाणे हर्डीकरही ध्येयवाद, त्याग आणि व्यवहारवाद या दोन आघाड्यांवर सतत वावरत असतात. ऑर्वेलची मुख्य ओळख ही लोकशाहीचा पुरस्कर्ता  आणि राजकीय-सामाजिक भाष्यकार म्हणून आहे. स्पष्ट विचार, स्वच्छ भाषा हे ऑर्वेलप्रमाणेच हर्डीकर यांच्याही लेखनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. ऑर्वेलप्रमाणेच हर्डीकरांनीही मोजकीच पण साहित्यसमीक्षाही केली आहे. त्यांनी मर्ढेकरांच्या कवितांची केलेली चरित्रात्मक समीक्षा हा त्याचा नमुना आहे. त्याचबरोबर भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू’, मीना देशपांडे यांच्या ‘हुतात्मा’ या कादंबऱ्यांची त्यांनी केलेली समीक्षा उत्तम म्हणावी अशी आहे. ऑर्वेलने चार्ल्स डिकन्सवर, टॉलस्टॉय यांच्यावर लिहिले असले तरी अनेकांना ते माहीत नसते, ज्यांना असते त्यांनी ते वाचलेले नसते. पण ‘अ‍ॅनिमल फार्म’, ‘नाइन्टीन एटीफोर’ या कादंबऱ्या मात्र बहुतेकांना माहीत असतात, अनेकांनी त्या वाचलेल्या असतात, पण त्यांच्या लेख-निबंधांचे चार संग्रह मात्र बहुतेकांनी वाचलेले नसतात. हर्डीकरांबाबतही काहीसा असाच प्रकार झालेला आहे. त्यांची पुस्तके अनेकांना ऐकून माहीत असतात, काहींनी त्यातली काही वाचलेलीही असतात. पण ‘जनांचा प्रवाहो चालिला’ ते ‘देवाचे लाडके’ एकसलग वाचलेली नसतात. त्यामुळे ते हर्डीकरांच्या ‘फस्ट पर्सन डॉक्युमेंटरी’चे क्रमश: भाग आहेत, हे त्यांच्या लक्षात येत नाही.

काहींची अशीही तक्रार असते की, हर्डीकरांच्या लेखनात सतत ‘मी’ येतो, त्यामुळे त्यांचे लेखन त्रासदायक होते. हा आक्षेप घेणाऱ्यांच्या हे लक्षात आलेले नसते की, हर्डीकरांच्या लेखनातील ‘मी’ हा आत्मसमर्थनात्मक नसून तो त्या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून आलेला असतो. ते ज्या विषयावर लिहितात, त्याच्या प्रत्यक्ष अनुभवाचे रूप म्हणून तो आलेला असतो. त्यामुळे त्यांच्या लेखनाला विश्वासार्हता येते. ज्याला आपल्या प्रत्यक्ष सहवासाचा, अनुभवाचा परिसस्पर्श झालेला नसतो, अशा विषयांवर हर्डीकर सहसा लिहीत नाहीत. काल्पनिक, मनोरंजनात्मक, लोकानुनयी किंवा कुणाच्या तरी बाजूचे लेखन करण्यात हर्डीकरांना स्वारस्य नसते. आपला अनुभव, अभ्यास आणि विचार हा त्यांच्या लेखनाचा गाभा असतो. त्यामुळे त्यातून येणारे निष्कर्ष ते निर्भीडपणे मांडण्याचे धाडस दाखवतात. त्यांचे लेख आणि ‘श्रद्धांजली’, ‘देवाचे लाडके’ या संग्रहातील त्यांची व्यक्तिचित्रे पाहिली की, ते कुणाच्याही सहज ध्यानात येईल! हर्डीकर कधी काळी संघात होते, ज्ञानप्रबोधिनीमध्ये त्यांनी दशकभर काम केले, हा त्यांचा इतिहास ते विसरले असले तरी महाराष्ट्रातील अनेक जण मात्र विसरलेले नाहीत. ते त्यांच्या लेखनाकडे त्याच नजरेतून पाहतात. हर्डीकरांनी सात-आठ वर्षे ‘इंडियन एक्स्प्रेस’ या आघाडीच्या इंग्रजी दैनिकात शोध पत्रकारिता केली आहे, वीसेक वर्षे त्यांनी शेतकरी संघटनेमध्ये काम केले आहे, मात्र शरद जोशी भाजपच्या गोटात सामील झाले तेव्हा हर्डीकर त्यांच्यासोबत गेले नाहीत, याकडे मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात असावे! एखाद्या व्यक्तीच्या भूतकाळावरूनच तिच्या वर्तमानातील आचार-विचारांचे विश्लेषण करायचे, हा मराठी समीक्षेला आणि विचारविश्वालाच जडलेला दुर्धर आजार आहे. त्यावर जोवर अक्सीर इलाज केला जाणार नाही तोवर भूतकाळातील लेबलांच्या पगड्यातून मराठी विचारविश्व आणि साहित्यसमीक्षा बाहेर पडणार नाही. आणि हे जोवर होत नाही तोवर हर्डीकरांना मराठीतील ‘जॉर्ज ऑर्वेल’ म्हणायला त्यांचे आणि ऑर्वेलचे लेखन न वाचताच नकार देणारेच जास्त निघण्याची शक्यता आहे.

-----------------------------------------------------------------------------

जन ठायीं ठायीं तुंबला – विनय हर्डीकर,

जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद,

पाने – ३४४, मूल्य – ४०० रुपये.

-----------------------------------------------------------------------------

विनय हर्डीकर यांची पुस्तके खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://goo.gl/x7lErb

Post Comment

Siddharth Naik

Tue , 18 April 2017

स्वभावातील विक्षिप्त पणा हा समजून येतो. परंतु काही लोक जाणून बुजून, ओढून ताणून मी कसा विक्षिप्त आहे हे दाखविण्याचा प्रयत्न करतात. कदाचित हीच आजकालची स्टाईल झाली आहे. त्याशिवाय आपण लेखक किंवा कोणी कलाकार किंवा कार्यकर्ता झाल्याचा फील येत नाही. एखादी व्यक्ती आपल्या सबंध आयुष्यात अस अनुत्पादक वागत राहते आणि त्यासाठी लोकांनी माझे कौतुक करावे अशी मनीषा सतत बाळगत राहते. पण लोक हुशार असतात. त्यांना कोण किती बावळट आहे हे लगेच कळत. म्हणून मग अशा व्यक्ती स्वतःच काहीतरी स्वतःविषयी घोषणा करत बसतात. मुळात प्रश्न हा आहे कि आपण एखादी गोष्ट ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस तिचे नेमके मूल्य काय? याविषयी आपल्याला जर आधी काही माहिती नसेल तर पुढे आत्मपरीक्षण वगैरे फुकाच्या गोष्टी करून काय उपयोग? हे म्हणजे चळवळी च्या नावाखाली स्वतःलाच चुना लावल्यासारख झाल. खरच संबंधित व्यक्तीबद्दल बोलण्यासारख खूप आहे.


vimlesh hamale

Wed , 12 April 2017

'पार्टनर, तुम्हारी पॉलिटिक्स क्या है', असा प्रश्न मुक्तिबोध आलागेल्यांंना विचारीत नसत. ती त्यांच्या कवितेतील ओळ आहे. भवभूतीने जे उद्गार काढल्याचे सांगितले जाते, असे आपण म्हटले आहे, त्या ओळी त्याच्या सुभाषितामधील आहेत. 'ये नाम केचिदिह न:प्रथयन्त्यवज्ञाम्‌ । जानन्तु ते किमपि तान्प्रति नैष: यत्न: ।। उत्पत्स्यते हि मम कोsपि समानधर्मा । कालोह्ययं निरवधि:विपुला च पृथ्वी।।' हे ते सुभाषित होय. हर्डिकरांना भाजप जवळचा वाटतो, तर ऑर्वेल लोकशाही समाजवादाचा पुरस्कर्ता होता. ऑर्वेलने कादंबरी प्रकाराला मूलभूत योगदान दिले, निबंध हा साहित्यप्रकार लक्षणीयरित्या हाताळला, रेडियोवरील त्याची पत्रकारिताही विशेष होती, केवळ 'मी' कुरवाळत बसला नाही. स्वतःची हुशारी दाखवण्यासाठी 'बहुतेकांनी हे वाचलेले नसते, ते वाचलेले नसते' असे उथळ शेरे मारले नाहीत. आपल्याला जे समजते ते मांडावे, आपल्याला दिसले ते सांगावे- ही त्याची पद्धत होती. एक लेखक लिहितो तेव्हा त्यात 'मी' अटळपणे असतोच, परंतु हर्डिकर यांच्या लेखनातील 'मी' स्वतःच्या बडेजावासाठी, आपले स्थान महत्त्वाचे आहे, हे दाखवण्यासाठी येतो. जसे की, 'मला कुणी मराठीतला जॉर्ज ऑर्वेल म्हटलं तर आवडेल' हेच विधान घ्यावे. यातला 'मी' आत्मप्रौढीसाठी आहे. काम करून आपोआप मिळावयाची ती ओळख मिळेल, तेवढा धीर धरावा, भवभूतीसारखा. अन्यथा अशी उथळ विधाने करून केवळ भोंदूगिरीचा प्रकार बोकाळतो. 'बहुतेकांनी वाचलेले नसते' असे म्हणून स्वतःचे महत्त्व वाढवणारे भक्तही मिळतात. मग 'सुमारांची सद्दी' म्हटले की स्वतः त्या सद्दीतून दूर असल्याचा कांगावाही करता येतो. असे करण्याऐवजी ऑर्वेल, मुक्तिबोध, भवभूती यांच्याप्रमाणे स्वतःच्या कामाकडे लक्ष दिले, त्यात उत्तंगतेचा ध्यास ठेवला, तर समाजाचे अधिक भले होईल.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......