छापण्याजोग्या गोष्टी, लिहिण्याजोग्या आणि वाचण्याजोग्याही
ग्रंथनामा - आगामी
विजय तेंडुलकर
  • सुनील कर्णिक आणि त्यांची सहा पुस्तके
  • Fri , 02 February 2018
  • ग्रंथनामा Granthnama आगामी सुनील कर्णिक Sunil Karnik डिंपल पब्लिकेशन्स Dimple Publication

ज्येष्ठ पत्रकार सुनील कर्णिक यांची सहा पुस्तके ९ फेब्रुवारी रोजी डिंपल पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित होत आहेत. हा प्रकाशन सोहळा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर, मुंबई इथे होत आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ही पुस्तके प्रकाशित होत आहेत, ही विशेष आनंदाची बाब आहे. यातील ‘न छापण्याजोग्या गोष्टी’ या पुस्तकाची दुसरी आवृत्ती असून बाकीच्या ‘‘महानगर’चे दिवस’, ‘सोनं आणि माती : म्हणजे गुणवंतांच्या गोष्टी’, ‘मलिक अंबर, माहितीचा कचरा आणि नेमाडे’, ‘महाराष्ट्रातील साहित्यिक संस्थानं’, ‘म्हाताऱ्या बायका काय कामाच्या’ या पाच पुस्तकांची पहिली आवृत्ती आहे. या सर्व पुस्तकातील लेख वेळोवेळी वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेले आहेत. या पुस्तकांपैकी ‘न छापण्याजोग्या गोष्टी’ या पुस्तकाला प्रख्यात नाटककार विजय तेंडुलकर यांनी लिहिलेली प्रस्तावना...

.............................................................................................................................................

कधी कधी लिहिण्या-वाचण्याचाच थकवा येतो. काही करू नये असे वाटते. अशा अवस्थेत सुनील कर्णिकांचे हे लेखन माझ्या बाजूला पडून होते.

ते माझ्या बाजूला होते कारण काही दिवसांपूर्वी कर्णिकांनी ते माझ्याकडे आणून टाकले होते. ते वाचून बरे वाटले तर मी त्याला प्रस्तावना लिहावी अशी त्यांची इच्छा होती. त्याच्या प्रशस्तीपर ते काहीही बोलले नव्हते.

बाड ठेवले आणि इतर गोष्टी करून ते निघून गेले.

लेखन त्यांचे नसते तर मी ठेवून घेतले नसते. माझ्याकडून वाचून होण्याची शक्यताच नव्हती. मध्येच कधी तरी एक क्षण आला. काय वाटले कुणास ठाऊक - खरे तर काहीच न वाटता असावे — मी कर्णिकांचे लेखन हाती घेतले.

कर्णिकांची माझी ओळख जुनी. पुरातन काळी ‘जाहीरनामा’ नावाचा एक दिवाळी अंक माझ्या संपादनाखाली निघाला होता. त्याचे बाळंतपण करण्याचे काम कर्णिकांनी केले होते.

हे काम त्यांनी इतक्या अबोलपणे, मनापासून आणि साहित्याच्या गंभीर समजुतीने केले की, एरवी हाताखालच्या माणसांबद्दल असंतुष्ट रहाणारा मी त्या पहिल्या आणि शेवटच्या अंकानंतर कर्णिकांनी मला, काही काम नसता भेटत रहावे असे मानत राहिलो.

याला त्यांचे संपादकीय गुण कारण नव्हते. व्यक्ती म्हणून त्यांच्यात असे काही होते की - उदाहरणार्थ त्यांचा सर्व व्यवहारातला समोरच्या माणसाला आश्वासक काटणारा संथपणा (जो श्री. पु. भागवत यांच्याकडून ते शिकले असे ते या पुस्तकात त्यांच्याविषयी लिहिताना सांगतात) आणि आयुष्याकडे बघण्याची समजूत (ही केवळ त्यांची स्वत:चीच)- ज्यामुळे मला ते अधूनमधून अकारण भेटावेत असे माझ्या कळत नकळत वाटू लागले होते.

तसे झाले नाही कारण एक तर हातावर पोट म्हणतात तसे कामाचे आयुष्य जगणाऱ्या कर्णिकांमागे त्यांचे व्याप होते आणि कदाचित असेही असेल की, कर्णिकांची प्रेमाची आणि विसाव्याची स्थाने वेगळी होती. या पुस्तकात ही स्थाने कोणती ते आले आहे.

कर्णिकांनी लिहिण्यासाठी निवडलेली माणसे बव्हंशी का, जवळ जवळ सर्वच, पुस्तकांच्या आणि छपाईच्या क्षेत्राशी अशी ना तशी संबंधित आहेत. कर्णिकांचे कर्ते जीवनच या क्षेत्राशी अनेक नात्यांनी निगडित राहिले आहे. स्वत:विषयी ते लिहितात : ‘मी गेली पंचवीस वर्षं साहित्याच्या क्षेत्रात छोटी छोटी कामं करतोय. कधी ग्रंथसेवक तर कधी मुद्रितशोधक, कधी पुस्तक-विक्रेता तर कधी वृत्तपत्र-प्रतिनिधी, कधी संपादक तर कधी प्रकाशक! एखाद्या वेळी अलिबागच्या छापखान्यात मुक्कामाला रहावं, तर मध्येच कधीतरी ताजमहाल हॉटेलच्या हाऊस जर्नलच्या कचेरीत आपल्या मराठमोळ्या इंग्रजीचे अद्भुत प्रयोग करावेत. कधी जुन्या-नव्या पुस्तकांच्या दुकानात नाना तऱ्हेची मासिकं-पुस्तकं धुंडाळत रहावं, तर कधी सभा-संमेलनांना हजेरी लावावी. कधी कविता लिहाव्या, परीक्षणं खरडावीत, मुलाखती घ्याव्या, तर कधी मोठ्या साहित्यिकांच्या संगतीत राहावं. कधी एखाद्या प्रकाशकाच्या बरोबरीने त्याच्या पुस्तकांचे गठ्ठे खांद्यावर घेऊन सांगली-सातारा-मिरज-कोल्हापूर-बेळगाव-सोलापूर असा दौरा करावा. वर्ष-सहा महिन्यांनी धंदा बदलला की नव्या जगाचं दर्शन...’

साहित्याचे - त्यातही मराठी साहित्याचे - एकूण जग तसे मर्यादित असले तरी कर्णिकांचे आयुष्य या मर्यादित जगात हे असे नित्य नवे होत राहिले. या नित्य नव्या निमित्तांनी समोर आलेली लहान-मोठी, खरीखोटी माणसे कर्णिकांनी त्यांच्या लहानसहान सवयींसकट एखाद्या टिपकागदासारखी शोषून घेतली. खालमानेने आपले काम करताना कर्णिकांचा एक डोळा जणू समोरच्या माणसावर रोखलेला होता आणि याचा पत्ता त्या माणसाला नव्हता.

असा डोळा अनेकांना असतो. कर्णिकांचे कैशिष्ट्य हे की त्यांचा हा डोळा उणे बघतो तसे अधिकही तितक्याच साक्षेपाने टिपतो. वर हे सर्व कोणताही कंजूषपणा न करता (जो अनेकांकडे असतो) या लेखनात आपल्याला सांगतात. या लेखनाचे मोठे बळ कोणते असे विचारले तर मी हेच सांगेन. समोरचे बरे-वाईट एकूण एक साक्षेपाने टिपणारी आणि तरी ऋजू, निर्मळ, शिशु साहित्यप्रेमाने भारलेली, पानापानात जाणवणारी निकोप जीवनदृष्टी हे त्याचे बळ आहे.

या लेखनात केवळ साहित्यिक नाहीत. साहित्य-व्यवहाराशी अशी ना तशी संबंधित अशी अनेक छोटीमोठी माणसे इथे कर्णिक आपल्याला भेटवतात. यात श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन यांच्यासारखे संपादन क्षेत्रातले आणि वि. पु. भागवतांसारखे मुद्रण-क्षेत्रात एक कालखंड गाजवणारे बुजुर्ग आहेत, तसे फार कुणाला माहीत नसलेले, अनेक वर्षे मुद्रित तपासनीचा व्यवहार मानेवर खडा ठेकून एका निष्ठेने करून साहित्याची प्रदीर्घ सेवा निरलसपणे बजावीत असलेले मनोहर बोर्डेकर आहेत. ‘ललित’ मासिकाच्या कचेरीतल्या मधू नावाच्या कारकुनाचे एक स्वतंत्र शब्दचित्र कर्णिकांच्या या पुस्तकात आहे. या पुस्तकात कवितेतून आग ओकणारे नामदेव ढसाळ आहेत, शब्द न् शब्द साखरेत घोळून बोलणारे आणि लिहिणारे वामन देशपांडे आहेत, स्वत:ला दलित मानणारे आणि लोकांनीही तसे मानावे असे मानणारे सुर्वे आहेत, आपण जसे आहोत तसेच दिसू मागणारे भाऊ पाध्ये आहेत, कवितेच्या आणि दारूच्या नशेत अखंडितपणे जगलेले कवी मनोहर ओक आहेत आणि साहित्याचे संकुचित जग टाकून आदिवासींच्या लढ्यात स्वत:ला झोकून दिलेले तुलसी परबही आहेत. कर्णिकांच्या आयुष्यात त्यांना हे भेटले एवढेच यांच्यातले साम्य.

कर्णिक या सर्वांना एका अंतरावरून अभ्यासतात, तसे त्यांच्या पोटात प्रसंगाप्रसंगाने शिरून आतल्या गोष्टीही नीट पाहून घेतात. या लेखनात त्या मांडताना ते ज्या सहजपणे यातले उणे-अधिक सर्वच सांगतात. तो सहजपणा फार महत्त्वाचा आहे. त्यामागे माणसाविषयीची आणि त्यांच्या व्यवहारांविषयीची एक स्वच्छ जाण आहे. चांगल्या-वाईटाविषयी न्यायनिवाडा करून वाईट ते लपवण्याची किंवा ते हलकेच सुचवून पुढे सटकण्याची नैतिक घाई इथे मुळीच नाही आणि या गोष्टींना अवास्तव महत्त्वही दिलेले नाही. जगण्याची व्यापक समजूत असलेले, नीतिअनीतीच्या आग्रहापलीकडे गेलेले मनच इतक्या मोकळेपणे, प्रेमाने तरी तटस्थपणे, परिचित-क्कचित् अतिपरिचित किंवा प्रसंगी त्रासदायक - माणसांविषयी लिहू शकते.

कर्णिकांना नैतिकतेची बाधा नसली तरी मते आहेत. क्कचित् व्यक्तीविषयक पूर्वग्रहदेखील आहेत आणि हे ते आपल्यापासून लपवून ठेवीत नाहीत. या पूर्वग्रहांची कारणेही तेच देतात. ओघाने हे सर्व त्यांच्या या पुस्तकातल्या व्यक्तीविषयक लेखनात येते. मते आणि पूर्वग्रह ठेवून हे लेखन ती व्यक्ती आपल्यापर्यंत अव्वल स्करूपात, तिचे बरे-वाईट स्वभाव-विशेष दाखवीत, पोचवते. सुर्वे, गोविंद तळवलकर यांच्या या पुस्तकातल्या आठवणी टीकात्मक आहेत, पण त्यात विखार नाही. केवळ वर्णन आहे.

श्री. पु. भागवत यांच्या कौटुंबिक जीवनाविषयीचा एक भाग या पुस्तकात ‘मौजेचे दिवस’ या प्रकरणात आला आहे. कर्णिकांनी हे जीवन मौज प्रकाशनाचे काम पहात असता स्वभावगत लक्षपूर्वकतेने पाहिले. त्यांच्या मनात ते ठसून गेले. ज्या नाजूक हाताने आणि हळुवारपणे कर्णिक ते या पुस्तकात लिहितात, तो हात मुद्रित तपासनीसाचा किंवा पुस्तके खांद्याकरून वहाणाराचा किंवा पत्रकाराचा वाटत नाही, तो कलावंताचा वाटतो. हे या पुस्तकातले संबंध प्रकरणच नाजूक हाताने आणि प्रचंड समजुतीने लिहिलेले आहे. मी तर म्हणेन की मराठी साहित्य प्रांतांत मौज परिवाराविषयी इतके चांगले (म्हणजे स्तुतीपर नव्हे) आजवर अन्य कुणी लिहिले नसेल.

आपण इतरांविषयी शेरेबाजी केली तर स्वत:ला का वगळले असे वाटून की काय, कर्णिकांनी या पुस्तकाचे अखेरचे प्रकरण स्वत:विषयी लिहिले आहे (माझी गंमत). आपल्याला पानापानावर भेटणारे मोकळेढाकळे, क्कचित् मिष्किल आणि बघता बघता सरळ चेहऱ्याने एखाद्या प्रतिष्ठिताची चड्डी सोडणारे कर्णिक या अखेरच्या पानांत मात्र भरपूर अवघडलेले वाटतात. या पुस्तकातला भिडस्त भाग हा एवढाच. वास्तविक इतरांविषयी बोलणारा नकळत स्वत:विषयीही सांगत असतोच किंवा असे म्हणू की इतरांविषयी बोलताना तो स्वत:लाही दाखवीत असतो. या पुस्तकात कर्णिक असे भरपूर आले आहेत आणि ज्यांना ते बघण्याची इच्छा असेल त्यांना ते पानोपानी दिसतील. तरीही कर्णिकांना स्वत:ला आपल्या लेखनाचा किंवा तपासणीचा विषय या लेखनाअखेरी का करावासे वाटावे याचे उत्तर एकच असू शकते : इतरांविषयी लिहिण्याचा आणि त्यांना ओघाने ‘जज्ज’ करण्याचा अधिकार आपला नाही असे त्यांना मनातून वाटत असले पाहिजे. हे लेखन करून आपण थोडे अधिकच धाष्टर्य दाखवीत आहोत अशीही शंका त्यांना असावी. या पुस्तकाचे त्यांनी ठेवलेले नाव या दृष्टीने अर्थपूर्ण आहे. ‘न छापण्याजोग्या गोष्टी’ शीर्षकाखाली ते टीप जोडतात - ‘न लिहिण्याजोग्या, न वाचण्याजोग्या.’

तरीही या गोष्टी ते प्रसिद्ध करीत आहेत हेही अर्थपूर्ण आहे. लेखक साशंक असला तरी त्यांच्यातला संपादक त्यांना या पुस्तकाच्या वाचनीयतेची खात्री देत असावा.

या लेखनाला घाट नाही. ही आत्मकथा नाही तशी ती रूढार्थाने व्यक्तिचित्रेही नाहीत. मुक्त आठवणींच्या स्वरूपात ते झाले आहे. आठवणी जशा संमिश्र आणि एकमेकीवर चढलेल्या, एकमेकीत गुंतलेल्या असतात तसे ते आहे. व्यक्तीवरून व्यक्तीकडे ते जात रहाते. एका घटनेतून दुसरी घटना निघते. विषयावरून विषयाकडे कर्णिकांची लेखणी उड्या घेते. असे कोणताही निश्चित घाट नसलेले, चौवाटा दाखणारे लेखन आरंभी त्याच्या अनौपचारिक स्वरूपामुळे बरे वाटले तरी पुढे बहुधा चऱ्हाटवजा आणि कंटाळवाणे होते. या पुस्तकातले लेखन वाचून कधी संपले ते मला कळले नाही.

वास्तविक या लेखनात आलेली माणसे, त्यांचे जग मला अपरिचित नव्हते. इतकेच नव्हे तर त्यातले काही अतिपरिचयाचे होते. तरीही या लेखनाने मला रमवले, काही नवे दिले, विचाराला प्रवृत्त केले, हे त्याचे यश म्हटले पाहिजे.

कर्णिक चांगले संपादक आहेत हे माहीत होते. पण ते चांगले लेखक आहेत हे आता कळले.

.............................................................................................................................................

न छापण्याजोग्या गोष्टी - सुनील कर्णिक, डिंपल पब्लिकेशन्स, मुंबई, मूल्य - २२० रुपये. 

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4349

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......