राजकारण, न्याययंत्रणा आणि कथित नैतिकता!
पडघम - राज्यकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • आरती साठे आणि मुंबई उच्च न्यायालयाची इमारत
  • Sun , 10 August 2025
  • पडघम राज्यकारण आरती साठेमुंबई उच्च न्यायालय Bombay High Court

राजकीय पक्ष आणि बहुसंख्य माध्यमांची टीका बहुतांश वेळा भूतकाळाचा धांडोळा न घेता केलेली असते, हा अनुभव नेहमीच येतो. अशीच टीका सध्या भारतीय जनता पक्षाच्या माजी राज्य प्रवक्त्या आरती साठे यांच्या मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून होणाऱ्या संभाव्य नियुक्तीवरून सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीच्या काळात कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदाचा राजीनामा देऊन सक्रिय राजकारणात येण्याचा अभिजीत गंगोपाध्याय यांचा निर्णयही असाच टीकेचा टीकेचा ठरला होता. त्यांनी हा निर्णय घेतल्यावर केलेल्या काही वक्तव्यांमुळे तर मुद्रित, इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल आणि समाजमाध्यमे अशा सर्व ठिकाणी टीकेची धार जास्तच बोचरी झाली होती.

न्यायमूर्ती म्हणून काम करत असताना कुणी एखाद्या राजकीय पक्षाच्या संपर्कात राहावं का आणि त्या पक्षात जाण्याची प्रक्रिया सुरू असताना न्यायदानाचं काम करावं किंवा नाही, असाही (रास्त) मुद्दा या टीकेत होता आणि आहे. न्यायमूर्ती म्हणून राजकीय व्यक्तींनी घेतलेले निर्णय किंवा दिलेले निवाडे निष्पक्ष असतील का, असाही नैतिक मुद्दा आहे, कारण तसं कुणीच निष्पक्ष राहू शकत नाही. अर्थात मुद्दा नैतिकतेच्या असल्यानं आणि प्रत्येकाची नैतिकतेची कथित धारणा राजकीय रंगात आकंठ बुडालेली असल्यानं या विषयाचा ‘लॉजिकल’ किंवा ‘लीगल एंड’ होणार नाही, हेही स्पष्ट आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आरती साठे यांच्या संभाव्य नियुक्तीवर टीका करण्यात काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि उद्धव  ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आघाडीवर आहेत. या दोघांचं कोणतंही वक्तव्य गंभीरपणे घेण्याची राज्य काय किंवा केंद्रातल्या सत्ताधारी पक्षाची मानसिकता नाही, कारण ‘अभ्यासोनी प्रकटावे’ ही सवय या दोन्ही नेत्यांना नाही. वडेट्टीवार यांनी शाळेत तरी अभ्यास केला की नाही, असा प्रश्न जर कुणी विचारला, तर त्यांची पंचाईत होईल, हे अनुभवाअंती नक्कीच सांगता येईल.

समाजमाध्यमांचं बाजूला ठेवू, कारण त्यांनी काही ‘शहाणे करून सोडावे सकल जन’ हा क्रूस खांद्यावर घेतलेला नसतो. समाजमाध्यमांवर तर साधार व्यक्त झालेल्या पोस्टस फारच अपवादानं दिसतात. मुख्य मुद्दा आहे या गदारोळात मुद्रित, इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल माध्यमांचा. (त्यातही माझी साडेचार दशकांची कारकीर्द मुद्रित माध्यमांत गेलेली असल्यानं या लेखाचा रोख त्याच्यावर जास्त आहे)

एक विसरता कामा नये, मुळात व्यवसाय निवडीचं आणि निवडलेला व्यवसाय बदलण्याचं स्वातंत्र्य या देशातील प्रत्येक नागरिकाला आहे. शिवाय असा बदल करण्यातलं अंतर किती असावं, यासंदर्भात निश्चित असं कोणतंही बंधन घटनेत किंवा कोणत्याही कायद्यात नाही. इथे मुद्दा केवळ तथाकथित नैतिकतेचा आहे, हे लक्षात घ्यायला हवं. सक्रिय राजकारणातून आरती साठे यांचा न्यायव्यवस्थेतील संभाव्य प्रवेश ही जणू काही या देशातील पहिलीच घटना आहे. त्यामुळे भारतीय न्याययंत्रणेवर जणू आभाळ कोसळलं आहे, असं समजून जे काही माध्यमांत व्यक्त  झालेलं आहे, ते पूर्णपणे चुकीचं आहे, हे स्पष्टपणे सांगायला हवं.

आपल्या देशाच्या अजस्त्र न्याययंत्रणेतील कुणा एकानं न्यायमूर्तीपदाचा राजीनामा दिल्यानं, ‘न्यायदेवता बाटली’ असं म्हणणं राजकारण्यांना आणि त्यातही विरोधी पक्षातील राजकारण्यांना शोभेलही, कारण सत्तेत नसताना अशी टीका करणं, हे आपल्या देशातील राजकारण्यांचं व्यवच्छेदक लक्षण झालेलं आहे. प्रत्यक्षात आरती साठे यांची नियुक्ती झालीच, तर ही अशा प्रकारची पहिलीच घटना नसेल. मुख्य म्हणजे त्यामुळे न्याययंत्रणा बाटणारही नाही, म्हणून माध्यमांना ‘बाटगं’ लेखन करणं मुळीच शोभणारं नाही.

वर्तमानाच्या खांद्यावर बसून भूतकाळाचा वेध घेऊन संपादकानं जबाबदारीनं लिहिण्याची परंपरा आपल्या देशाच्या पत्रकारितेची आहे. (अग्रलेख मागे घेण्याचा जागतिक नीचांक करणाऱ्यांनी एक विसरू नये की, त्यांनी अग्रलेख मागे घेतला म्हणून या देशातील सर्व पातळीवरची पत्रकारिता बाटली म्हणा की, कलंकित झालेली नाही. निष्पक्ष, धारदार पत्रकारिता करणारे संपादक व पत्रकार तेव्हाही होते आणि आजही हयात आहेत.)

नाव मुद्दाम टाळतो आहे, कारण त्यांनी राज्यसभा सदस्यपद न्यायमूर्तीपदाचा राजीनामा देऊन स्वीकारलं की, निवृत्तीनंतर याची खातरजमा झालेली नाही. एक लक्षात घ्या, आपल्या महाराष्ट्रातही एका न्यायमूर्तींनी पदाचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेचं सदस्यत्व स्वीकारल्याची घटना घडलेली आहे. ५ जुलै १९८६ ते ४ जुलै  १९९२ या काळात त्यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून काम केलेलं आहे. महाराष्ट्रातले उच्च न्यायालयाचे एक न्यायमूर्ती तर पदाचा राजीनामा देऊन लगेच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी झाल्यावर केंद्रात मंत्रीही झाले होते.

हे केवळ एकच उदाहरण नाही, अशी अनेक उदाहरणे आहेत. राजकारणातून न्याययंत्रणेत आणि न्याययंत्रणेतून राजकारणात असं ‘तळ्यात मळ्यात’ केलेले आजवर अनेक होऊन गेलेले आहेत (उच्च न्यायालयाच्या कामकाजाचं वृत्तसंकलन केलेलं असल्यानं प्रस्तुत पत्रकाराला माहिती आहे. माहितीच्या महाजालातही ही माहिती सहज उपलब्ध होऊ शकते.) न्या. व्ही. आर. कृष्णा अय्यर यांचं एक विधान या निमित्तानं आठवलं. ते म्हणाले होते– “Law without politics is Blind and Politics without law is Deaf.”  (“राजकारणाविना कायदा अंध आहे आणि कायद्याविना राजकारण बहिरे आहे”.)

१९८८ साली काँग्रेसचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आर. वेंकटरमण यांच्याविरुद्ध विरोधी पक्षांचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या न्यायमूर्ती व्ही. आर. कृष्णा अय्यर यांचा राजकीय आणि न्यायिक प्रवास तर अफलातून नाट्यमय आहे. ते अपक्ष म्हणून केरळ विधानसभेवर कम्युनिस्टांच्या पाठिंब्यावर तीन वेळा विजयी झाले. नंबुद्रीपाद मुख्यमंत्री असताना एकदा तर ते चक्क राज्याचे गृह, तुरुंग आणि कायदा खात्याचे मंत्री होते. सक्रिय राजकारण सोडून १९६८मध्ये ते केरळ उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती झाले आणि निवृत्तीनंतर पुन्हा राजकारणात सक्रिय झाले. एवढंच नव्हे, तर त्यांनी  विरोधी पक्षांचे उमेदवार म्हणून राष्ट्रपतीपदाची निवडणूकही लढवली होती.

के. एस. हेगडे यांनी १९३५ साली काँग्रेस पक्षात प्रवेश केला. १९५७ साली पक्षाचा राजीनामा देऊन ते लगेच म्हैसूर उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून रुजू झाले. १९६७ साली त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती  झाली. १९७३ साली त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला. १९७५मध्ये जनता पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली आणि विजयी होऊन लोकसभेचं अध्यक्षपद भूषवलं. जनता पक्ष फुटल्यावर ते भारतीय जनता पक्षात गेले, पण तेव्हा कुणी राजकारण किंवा न्याययंत्रणा किंवा दोन्ही दालनं बाटली, अशी बेताल टीका केली नव्हती किंवा नैतिकतेचाही मुद्दा उपस्थित केल्याचं ऐकिवात नाही.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

काँग्रेसचे बहारुल हसन हे १९६२मध्ये राज्यसभेचे सदस्य होते आणि १९७२ साली सदस्यत्वाचा राजीनामा देऊन ते गुवाहाटी उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून रुजू झाले, पण ‘काँग्रेसचा एजंट उच्च न्यायालयात आला’, अशी टीका तेव्हा कुणी केली नव्हती. आफताब आलम हे आधी कम्युनिस्ट पक्षाचे सक्रिय सदस्य होते, नंतर ते काँग्रेसमधे गेले. काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यावर लगेच ते उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. एफ. रिबेलो नावाचे एक न्यायमूर्ती उच्च न्यायालयात होते आणि न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी ते चक्क गोवा विधानसभेवर जनता पक्षाचे उमेदवार म्हणून विजयी झालेले होते.

तात्पर्य इतकंच की, राजकारणातून न्यायव्यवस्थेत जाणाऱ्या आरती साठे एकमेव नाहीत. न्याययंत्रणा आणि राजकारण अशा ‘तळ्यात मळ्यात’ करणारे आजवर अनेक होऊन गेले. त्या वेळी कुणी नैतिकतेचा मुद्दा काढल्याचे दिसले नाही, पण याआधी काय घडलं हे जाणून न घेता साठे यांच्याबाबतीत राजकारणी आणि माध्यमांच्या टीकेला धार चढली आहे. त्या जर भाजपऐवजी दुसऱ्या राजकीय पक्षात असत्या, तर या संभाव्य नियुक्तीबद्दल टीकेची धार अशीच राहिली असती का?

या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर संजय राऊत किंवा विजय वडेट्टीवार हे दोघेही देणार नाहीत, कारण या विषयाचा त्यांचा अभ्यास कच्चा आहे!

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

प्रिय नरेंद्रभाई, तुम्ही जणू यादवी युद्ध लढत असल्यासारखे देश चालवत आहात! हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही भले कितीही लोकप्रिय असाल, पण तुम्ही संसदेला उत्तरदायी आहात

नेहरूंचे सगळे विरोधकही त्यांचा आदर करायचे. तुमच्या बाबतीतही पहिल्या दिवसापासून विरोधकांमध्ये चर्चा आहे. फक्त एवढाच ‘किरकोळ’ फरक आहे की, मोदी-चर्चेत ‘आदरा’ऐवजी ‘अविश्वास’ आणि ‘अनादर’ भरलेला असतो! नेहरूंवर जनता प्रेम करत होती, पण त्यांच्या पक्षातले राजकारणी त्यांना घाबरत असत. या बाबतीतही तुम्ही त्यांना मागे टाकलं आहे; तुमच्या पक्षातले लोक आणि जनता — दोघंही तुम्हाला घाबरतात!.......

दादा, विद्यापीठांनी काय केले हा प्रश्न योग्य आहे; पण विद्यापीठांना काम करण्यासाठी आवश्यक असलेले वातावरण निर्माण करण्यात सरकार कितपत यशस्वी झाले, याचाही हिशेब कधीतरी मांडावा लागेल

इतिहास विद्यापीठांना त्यांच्या संशोधनासाठी लक्षात ठेवेल; पण सरकारांना त्यांच्या प्राधान्यक्रमांसाठी. विद्यापीठांच्या कामगिरीचे मूल्यमापन होईलच; परंतु त्या कामगिरीसाठी आवश्यक असलेली जमीन तयार करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांच्याही भूमिकेचे मूल्यमापन तितक्याच कठोरपणे होईल. आत्मपरीक्षणाची सुरुवात तिथून झाली, तर कदाचित महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाच्या नव्या पर्वाचीही सुरुवात तिथूनच होईल.......

लोकसंख्येच्या प्रमाणातच जागा द्यायच्या झाल्या, तर महिलांना जवळपास पन्नास टक्क्यांच्या आसपास जागा द्याव्या लागतील. पण तशी मागणी कुणीच, महिला प्रतिनिधीही, करत नाहीत, ही आश्चर्याचीच बाब म्हणायला हवी!

एकीकडे ‘नारीपूजा’ म्हणायचे, तर दुसरीकडे असे वर्तन, हे संघ-भाजपच्या दुतोंडीपणाचेच लक्षण आहे. या विधेयकामुळे त्यांचा मुखवटा गळून पडला असून खरा चेहरा उघड झाला आहे. खरे तर त्यांना हे विधेयक नव्याने आणण्याचीच आवश्यकता नव्हती, कारण २०२३मध्ये संसदेत ते एकमताने मंजूर झाले होते. पण तसे केले असते, तर तेच अडचणीत आले असते. कारण त्यांना महिलांना असे सामर्थ्य मिळायला नको होते.......