महाराष्ट्राची ‘फाळणी’ झाली आहे. एकाच महाराष्ट्रात ‘दोन महाराष्ट्र’ आहेत. या ‘दोन महाराष्ट्रां’चे एकमेकांशी नाते कसे जोडायचे, हेच आजचे आव्हान आहे!
पडघम - सांस्कृतिक
हेरंब कुलकर्णी
  • हेरंब कुलकर्णी
  • Mon , 21 July 2025
  • पडघम सांस्कृतिक महात्मा गांधी Mahatma Gandhi नरेंद्र दाभोळकर Narendra Dabholkar हेरंब कुलकर्णी Heramba Kulkarni

सी. मो. झाडे फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा ‘गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार’ या वेळी शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांना सेवाग्राम आश्रमात डॉ. अभय बंग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी त्यांनी व्यक्त केलेल्या मनोगताचा हा संपादित अंश…          

.................................................................................................................................................................

गिरीश गांधी हे माझ्यावर अतिशय प्रेम करतात. त्यांच्या नावाचा हा पुरस्कार महात्मा गांधींच्या भूमीत मिळणे हाच एक स्वतंत्र पुरस्कार आहे. डॉ. अभय बंग यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळण्यातही आनंद आहे. आपल्याकडे जे लोक वाचन- लेखन- संशोधन करतात, ते प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन काम करत नाहीत आणि जे लोक काम करतात, ते वाचन-लेखनाकडे फार लक्ष देत नाहीत. दोन्हीही करणाऱ्यांत डॉ. बंग आहेत. त्यामुळे ते मला ‘रोल मॉडेल’ वाटतात.

मी अलीकडेच पूर्णवेळ सामाजिक काम सुरू केले आहे. यापूर्वी नोकरीत असताना शालाबाह्य मुले, बालविवाह, दारूबंदी, एकल महिला अशा विषयांवर थोडेफार काम केले आणि बरेच लेखन केले. खूप फिरून प्रश्न मांडले. नोकरी करत असताना मिळणाऱ्या सर्व सुट्या वापरून हे सारे केले. यात वेगळेपण असेलही, पण तरीही मी स्वत:ला कार्यकर्ता समजत नाही, चळवळींचा मित्र, हितचिंतक समजतो.

महात्मा गांधींमुळे दारिद्र्याचा प्रश्न मला सर्वांत महत्वाचा वाटला. ते म्हणतात, जेव्हा कधी तुम्हाला एखादा निर्णय घ्यायचा असेल, तेव्हा तुम्ही बघितलेल्या सर्वांत दु:खी माणसाचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि माझ्या कृतीने त्या माणसाच्या जगण्यात काही बदल होतो का, हे पाहा. हा सामाजिक कामाचा निकष मला खूप महत्त्वाचा वाटतो. त्याआधारेच मी लेखन करत आलो आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

गरिबीचे पहिले दर्शन मला अकरावीत असताना झाले. गो.नी. दांडेकर यांच्या ‘स्मरणगाथा’ या पुस्तकात दारिद्र्याचे वर्णन वाचले. भूक लागू नये पोटावर झोपणारे आदिवासी. मन पिळवटून गेले. तेव्हापासून एसटी प्रवासात पाले टाकलेले भटके बघून मन उदास व्हायचे. वाटायचे व्यवस्था म्हणून या माणसांना आपण साधे नीट जगणेही देऊ शकत नाही का? का असे होत असेल?

त्यानंतर ‘दारिद्र्याची शोधयात्रा’ या पुस्तकाच्या अभ्यासाच्या निमित्ताने चार महिने संपूर्ण महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांत फिरलो. विदर्भ-मराठवाड्यातील सर्व जिल्हे बघितले. त्या जिल्ह्यांतील दैन्य बघितले. हा अभ्यास केल्यावर माझे असे मत झाले की, या महाराष्ट्राची ‘फाळणी’ झाली आहे. एकाच वेळी एकाच महाराष्ट्रात ‘दोन महाराष्ट्र’ आहेत. पुणे- मुंबई- नाशिक हा ‘एक महाराष्ट्र’ आहे आणि विदर्भ- मराठवाडा- खानदेश हा ‘दुसरा’ महाराष्ट्र आहे. या दोन्ही महाराष्ट्राचे एकमेकांशी काही नातेच नाही.

एकीकडे तथाकथित विकास आणि दुसरीकडे उदास माणसे. पहिल्यातली मुले आयआयटीत शिकतात, दुसऱ्याची आयआयटीमध्येमुळे शिकत नाहीत. त्यांची मुले ‘सिलिकॉन व्हॅली’मध्ये जात आहेत, आदिवासींची मुले ‘मेळघाट व्हॅली’मध्ये पाखरे मारत आहेत. एकीकडे शाळेत एआय शिकवावे की नाही अशी चर्चा सुरू असताना ग्रामीण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी गळती होत आहे. मेळघाटमध्ये २००५ साली दहावीला ३६ टक्के मार्क पडलेल्या विद्यार्थ्याची मिरवणूक काढली होती. हे हास्यास्पद वाटेल, पण त्या भागातील तो पहिला दहावी पास झालेला विद्यार्थी होता. इतकी भीषण स्थिती आहे. मुलांना लिहिता-वाचता येत नाही. त्यामुळे ती शिक्षणात टिकत नाहीत. बालविवाह प्रथेमुळे मुली जास्त शिकू शकत नाहीत. गावात ५० वर्षांपासून शाळा आहे, पण एकही पदवीधर नाही, अशी अनेक गावे आहेत. या ‘दोन महाराष्ट्रां’चे नाते कसे जोडायचे, हेच आजचे आव्हान आहे.

विकासाची भाषा बोलताना आजही अनेकांच्या जगण्याची परवड सुरू आहे. मी जीवतीच्या पहाडावर केवळ दळण करायला पैसे नाहीत म्हणून तीन दिवस केवळ भात खाऊन राहिलेली कुटुंबे बघितली आहे. मटणाच्या दुकानाबाहेर टाकलेले खुर आणि आतडे उकळून खात जगणारे भटके बघितले आहेत. लोकांना आज धान्य मिळते, पण इतर जेवणात दर्जा नाही. असंघटित क्षेत्रात तर विदारक स्थिती आहे.

नागपूर जिल्ह्यात मिरची खुडणारे लोक आहेत. व्यापारी लाल मिरची आणून देतात आणि ती खुडून द्यायची, असे ते काम. वेगाने काम व्हावे म्हणून दोन पायांवर बसून त्या मिरच्या खुडल्या जातात. दर काय? तर एक किलो मिरची खुडण्याला ६ रुपये. एका किलोत ४०० मिरच्या बसतात, म्हणजे एक मिरची खुडण्याची मजुरी आहे फक्त दीड पैसे. तरीही सकाळी ७ वाजल्यापासून महिला तिथे येतात आणि १२ तास काम करून २० किलो मिरची म्हणजे ८००० मिरच्या खुडतात. मिळतात १२० रुपये. किती वाईट आहे हे!

अनेक जण घरातील म्हाताऱ्या माणसांना तिथे आणून सोडतात आणि त्यांना हे काम करायला लावतात. मी त्यातील अनेकांना म्हणालो की, आपण तक्रार करू. किमान वेतनाचे दर द्यावेत म्हणून आग्रह धरू, तेव्हा ते लोक म्हणाले की, “बाबा, मजुरीचे पैसे आज कमी आहेत, तरी रोज मजुरीचे पैसे मिळत आहेत. उद्या ठेकेदार हे काम शेजारच्या गावाला देईल. त्यामुळे चालले आहे ते चालू दे. आमचे आम्ही बघून घेऊ.” मला त्या माणसांच्या न लढण्याच्या वृत्तीचा राग करावा की त्यांची अगतिकता समजून घ्यावी, असा प्रश्न पडला.

एकीकडे मोठ्या पगाराच्या नोकऱ्या आणि दुसरीकडे असे हे रोजगार. शहरी भागातही आज हेच चित्र आहे. १५-२० हजारांत काम करणारे हजारो तरुण आहेत. इतक्या कमी पगारात कसे जगत असतील? ना घर घेऊ शकत, ना नीट जगू शकत, पण पर्याय नाही म्हणून धडपड करत आहेत. तेव्हा मूठभर लोक सोडले तर बहुतेक समाज आज दारिद्र्याच्या वेगवेगळ्या रूपाशी झटापट करतो आहे.

इतके भीषण प्रश्न पोहोचवायचे कसे, हाच आजचा सर्वांत मोठा प्रश्न आहे.

हे प्रश्न विचारीवर्ग आणि राज्यकर्ते यांच्यापर्यंत पोहोचवायचे कसे? ज्या प्रसारमाध्यमांनी हे काम करायचे, ती आज पूर्णवेळ राजकारण हाच एक विषय घेऊन काम करत आहेत. रोज दोन नेत्यांना समोरासमोर आणून त्यांच्या वादावादीत दिवस काढला जातो. राजकीय बातम्या फक्त ‘गाजवल्या’ जातात. परिणामी त्यापलीकडे सामाजिक विषय अपवादानेच मांडले जातात.

त्यामुळे सरकारवर गरिबांच्या जगण्याचा जो दबाब निर्माण व्हायला हवा, तो होत नाही. पूर्वी चित्रपट हे माध्यम गरिबांचे जग दाखवायचे. राज कपूरच्या बहुतेक चित्रपटांचा नायक हा गरीब माणूस असायचा. अमिताभ अनेकदा झोपडपट्टी नायक असायचा. त्यातून समाजातील चित्र समोर आणले जायचे. त्या चित्रपट जगाने किमान संवेदना जाग्या केल्या. नाटक- कादंबरी- कविता- कथा हेही गरिबांचे प्रश्न समोर आणायचे. पण आज बहुसंख्य असलेल्या मध्यमवर्गाने केवळ मनोरंजन हाच आग्रह धरला आहे. त्या दडपणाने चित्रपट, नाटक, कविता या सर्वांनी केवळ मनोरंजन आणि मध्यमवर्गकेंद्री अजेंडा स्वीकारला आहे. त्यामुळे ज्या दूरदर्शनवर ‘बुनियाद’, ‘तमस’सारख्या मालिका असायच्या, तिथे आज निव्वळ उथळ मनोरंजन सुरू आहे.

प्रत्यक्षात गरिबी हटली नसली, तरी आमच्या माध्यमांतून मात्र तिचे पूर्णपणे उच्चाटन झाले आहे. गरिबी आमच्या चित्रपटांतून, नाटकांतून, साहित्यातून हटली आहे. माध्यमांत, साहित्यात आणि चित्रपटांतले आजचे जग श्रीमंत माणसांचे आहे. त्यात ‘इंडिया’ आहे, ‘भारत’ नाही!

मध्यमवर्गाची साथ नसल्याने आज गरिबांच्या चळवळी पुढे नेण्यात अडचणी आहेत. पूर्वी सर्वच चळवळी मध्यमवर्ग चालवायचा किंवा त्यात सहभागी असायचा. संयुक्त महाराष्ट्र ते आणीबाणीपर्यंत मध्यमवर्ग अग्रभागी होता. समाजवादी आणि डाव्या चळवळीत त्याचा सहभाग होता. गरिबांच्या लढाईत मध्यमवर्गाची मोठी साथ होती. ‘नर्मदा जन आंदोलना’त आदिवासी लढले, पण मध्यमवर्ग मोठ्या प्रमाणात हितचिंतक म्हणून त्यांच्या सोबत होता.

पण हळूहळू मध्यमवर्ग दूर गेला. त्याची आर्थिक स्थिरता वाढत गेली, तसे त्याच्या आणि गरिबांच्या जगण्यात अंतर पडले. मध्यमवर्ग आत्मकेंद्रित बेटावर सुखासीन होऊन जगण्यात मश्गुल झाला. शहरी आत्मकेंद्रित मध्यमवर्ग तर हाताबाहेर गेला आहेच, पण जे खेड्यातून, वंचित समूहातून मध्यमवर्गात आले, त्यांनी तरी किमान आपल्या समूहासाठी काम करावे असे वाटत होते, पण दुर्दैवाने ते घडत नाही.

महात्मा फुले यांनी बहुजन समूहाच्या शिक्षणासाठी ब्राह्मण शिक्षक हटवा आणि शेतकऱ्यांची पोरं शिक्षक करावीत अशी भूमिका मांडली होती. पण दुर्दैवाने अपवाद वगळता हे घडताना दिसत नाही. वंचित समूहातून मध्यमवर्गात गेलेल्यांचे ‘रोल मॉडेल’ पुन्हा प्रस्थापित पांढरपेशा मध्यमवर्गच असतो. त्याचे अनुकरण करण्यात त्याला धन्यता वाटते. आपल्या न्यूनगंडातून तो आपली वंचित ओळख पुसून मध्यमवर्गीय ओळख निर्माण करू पाहतो. याला मी ‘बहुजनांचे ब्राह्मणीकरण’ असे म्हणतो.

वंचित आणि बहुजन यांची आपल्या समूहाशी असलेली नाळ घट्ट कशी करायची? त्यांना ज्या समूहातून आले त्याचे नेतृत्व करायला लावून प्रश्न सोडवण्यासाठी कृतिशील कसे करायचे? पांढरपेशा मध्यमवर्ग आत्ममग्नतेच्या बेटावर राहताना आपण ज्यांच्याकडून अपेक्षा करतो. तेही त्याच रस्त्याने निघाले, तर वंचितांना वाली कोण, हा प्रश्न आहे. त्यामुळे केवळ मध्यमवर्गाला न झोडपता त्याला अंतर्मुख कसे करायचे आणि त्याच्यात सामाजिक भावना कशी रुजवायची, हे सामाजिक चळवळीपुढे आव्हान आहे.

महात्मा गांधी आणि विनोबा या माणसांमध्ये असे काय होते की, त्यांच्या नुसत्या अस्तित्वाने समाज सरकार आणि जग हलत होते. गांधी अर्थशास्त्र मांडत होते, पण त्यांच्यापेक्षा कितीतरी अर्थपंडित देशात होते. गांधी शिक्षण मांडत होते, पण त्यांच्यापेक्षा विद्वान शिक्षणतज्ज्ञ देशात होते. गांधी निसर्गोपचार सांगत होते, पण त्यांच्यापेक्षा कितीतरी विद्वान डॉक्टर देशात होते. मग तरीसुद्धा असे गांधींमध्ये काय होते की, ते जगाला हलवत होते?

मला वाटते गांधींची आत्यंतिक शुद्धता आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील पारदर्शक तळमळ काम करत होती. माझे काम पोहोचत का नाही, तर त्याला कदाचित माझ्यात हे कमी आहे, असं मी स्वत:ला बजावतो. साधी मोबाईलची रेंज जरी गेली, तरी जग मला विसरेल की काय असा मला प्रश्न पडतो. या माणसांनी आणि त्या पिढीने जगाकडे पाठ फिरवून वर्षानुवर्षे काम केले. माझी पिढी हे त्यांच्याकडून शिकेल का?

समोर बसलेल्या तरुण मित्रांना मी इतकेच सांगेन की, व्यासंग महत्त्वाचा आहे, पण गांधींकडून कृतिशीलता शिका. सामाजिक विषय निवडताना केवळ प्रश्न न निवडता तो प्रश्न ज्याच्यातून निर्माण झाला, त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. शरद जोशी भारतात आले. दारिद्र्याचे मूळ भारतीय शेतीत आहे, हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी शेतीप्रश्नावर काम सुरू केले. अशी प्रश्नाच्या मुळाकडे जाता येण्याची क्षमता वाढवत न्यायला हवी.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

असाच मी एकदा सातार्‍याला गेलो होतो. देवदत्त दाभोळकर यांनी शिक्षणात प्रेरणा कशी निर्माण करता येईल, यावर एक चर्चासत्र ठेवले होते. मी साताऱ्यात होतो. नरेंद्र दाभोळकरांनी मलाही बोलावले. जेवणाच्या सुट्टीत नरेंद्र दाभोळकर यांनी सर्वांना विचारले की, ‘गांधींचे सर्वांत मोठे सामर्थ्य कशात आहे? वेगवेगळी उत्तरे ऐकल्यावर ते म्हणाले, कोणता नेता जास्त प्रभावी ठरतो? तर नेत्याला जे स्वप्न पडते, त्या स्वप्नाचा भागीदार तो किती लोकांना बनवू शकतो? ते स्वप्न जणू त्यांचेच आहे, अशी भावना त्यांची व्हावी, असे वाटायला लावणे, यात नेत्याचे यश असते. गांधींनी ते केले. त्यांनी स्वातंत्र्य आणि सुराज्य हे स्वप्न पाहिले आणि ही स्वप्ने सगळ्या भारताची आहेत, असे इतरांनाही वाटायला लावले. त्यातून महान आंदोलन उभे राहिले.’

मी ते चर्चासत्र विसरलो, पण नरेंद्र दाभोळकर यांचा हा गांधी मात्र पक्का लक्षात राहिला. जेव्हा केव्हा कामात निराशा येते, तेव्हा स्वप्नांचे भागीदार आपण कमी बनवतो आहोत, असे लक्षात येते आणि पुन्हा कामाला लागतो... तो गांधी मला नेहमी खुणावत राहतो...

आपल्या देशात प्रश्न ‘लहान’ राहतात आणि प्रश्न मांडणारे ‘मोठे’ होतात. माझ्याबाबतीत असे होऊ नये, असे मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने स्वत:ला बजावतो आहे. थांबतो. धन्यवाद!

.................................................................................................................................................................

लेखक हेरंब कुलकर्णी शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.

herambkulkarni1971@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

लोकसंख्येच्या प्रमाणातच जागा द्यायच्या झाल्या, तर महिलांना जवळपास पन्नास टक्क्यांच्या आसपास जागा द्याव्या लागतील. पण तशी मागणी कुणीच, महिला प्रतिनिधीही, करत नाहीत, ही आश्चर्याचीच बाब म्हणायला हवी!

एकीकडे ‘नारीपूजा’ म्हणायचे, तर दुसरीकडे असे वर्तन, हे संघ-भाजपच्या दुतोंडीपणाचेच लक्षण आहे. या विधेयकामुळे त्यांचा मुखवटा गळून पडला असून खरा चेहरा उघड झाला आहे. खरे तर त्यांना हे विधेयक नव्याने आणण्याचीच आवश्यकता नव्हती, कारण २०२३मध्ये संसदेत ते एकमताने मंजूर झाले होते. पण तसे केले असते, तर तेच अडचणीत आले असते. कारण त्यांना महिलांना असे सामर्थ्य मिळायला नको होते.......

बाबाबुवा, गुरू, साधू, संत या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींनी लोकांच्या मानसिक दुर्बलतेचा, अज्ञानाचा आणि भीतीचा गैरफायदा घेत सातत्याने समाजाचे शोषण केले आहे – विशेषत: स्त्रियांच्या

अनेक बाबाबुवांनी ‘आध्यात्मिक साधना’, ‘देवाची कृपा’ किंवा ‘उपचार’ यांच्या नावाखाली स्त्रियांचे लैंगिक शोषण केले आहे. तरीही त्यांच्या अनुयायांनी त्यांना समर्थन दिले, ही गोष्ट समाजाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभे करते. याचा विचार केला, तर एक गोष्ट स्पष्ट होते - अंधश्रद्धा ही केवळ अज्ञानाची समस्या नाही, तर ती एक सामाजिक, मानसिक, आर्थिक आणि राजकीय समस्या आहे.......