भविष्यातील भारत ‘भगव्या राष्ट्रवादा’वर आधारित असेल की, ‘सर्वसमावेशक राज्यघटना आधारित राष्ट्रवादा’वर उभारलेला असेल, याची लढाई २०२० मध्ये लढली जाणार आहे!
सदर - सत्योत्तरी सत्यकाळ
परिमल माया सुधाकर
  • भगवा राष्ट्रवाद, संसद आणि भारतीय राज्यघटना
  • Wed , 01 January 2020
  • सदर सत्योत्तरी सत्यकाळ परिमल माया सुधाकर Parimal Maya Sudhakar नागरिकत्व संशोधन विधेयक Citizenship Amendment Bill कॅब CAB नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स National Register of Citizens एनआरसी NRC नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP अमित शहा Amit Shah हिंदू-मुस्लीम Hindu-Muslim

सरलेल्या वर्षात, म्हणजे २०१९ मध्ये, राजकारणाचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. एक वर्षापूर्वी ज्या प्रकारची परिस्थिती देशात होती, जवळपास तशीच परिस्थिती २०२०मध्ये प्रवेश करताना आहे. फरक एवढाच आहे की, यंदा लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या नाहीत. २०१९च्या एप्रिल-मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीने देश उजव्या विचारसरणीच्या दिशेने ठामपणे झुकला असल्याच्या वस्तुस्थितीवर शिक्कामोर्तब झाले. मात्र, उजव्या बहुसंख्याकवादी हिंदुत्व विचारसरणी पुढे पुरोगामी सर्वसमावेशक लोकशाहीवादी शक्तींनी नांगी टाकल्याचे चित्र ना २०१९च्या सुरुवातीला होते, ना तशी परिस्थिती नव्या वर्षाच्या सुरुवातीला आहे. केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या विरोधात तापत असलेल्या वातावरणात २०१९ची सुरुवात झाली होती. तत्पूर्वी, मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला होता. कर्नाटकात भाजपला सत्ता स्थापनेत अपयश आले होते आणि त्यापूर्वी गुजरातेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांना विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी प्रचंड घाम गाळावा लागला होता. निश्चलीकरण आणि जीएसटीचे फटके व्यापार्‍यांपासून शेतकर्‍यांना देशभर सोसावे लागत होते.

आज देश २०२०मध्ये प्रवेश करत असताना परिस्थिती यापेक्षा फार वेगळी नाही. मागील तीन महिन्यांत भाजपने महाराष्ट्र व झारखंड या दोन राज्यांतील सत्ता गमावली आहे, तर हरियाणात प्रादेशिक पक्षासोबत आघाडीचे सरकार स्थापन करावे लागले आहे. २०१९मधील लोकसभा निवडणुकीनंतर ज्या काँग्रेस पक्षाला श्रद्धांजली वाहणारे आलेख कोरण्यात आले होते, त्या पक्षाने या तिन्ही राज्यांमध्ये अपेक्षेपेक्षा दमदार कामगिरी करत राष्ट्रीय राजकारणात पुनरागमन केले आहे. आज आर्थिक मंदी आणि बेरोजगारीने देशातील संघटित क्षेत्रातील संरक्षित पगारी नोकरदार वर्ग वगळता इतर सर्व घटक बेजार आहेत.

पंतप्रधानांच्या साडेपाच वर्षांच्या प्रचंड गाजावाज्यासह झालेल्या जागतिक भ्रमंतीने कवडीचीही परकीय भांडवली गुंतवणूक वाढलेली नाही. जेवढी परकीय गुंतवणूक मागील साडेपाच वर्षांत भारतात झाली आहे, ती पंतप्रधानांनी विविध देशांना दिलेल्या भेटींशिवायसुद्धा झाली असती. २०१९च्या सुरुवातीला जगभरातील प्रतिष्ठित प्रसारमाध्यमांनी मोदी सरकारच्या कार्यकुशलतेवर प्रश्नचिन्ह लावण्यास सुरुवात केली होती.

२०१४मध्ये ज्या उत्साहाने मोदींच्या विजयाचे या प्रसारमाध्यमांनी कौतुक केले होते, त्या तुलनेत घडलेला हा मोठा बदल होता. आज जग नव्या वर्षांत प्रवेश करत असताना जागतिक प्रसारमाध्यमांमध्ये मोदी सरकारच्या बहुसंख्याकवादी धोरणांच्या विरुद्ध टीकेचा सूर अत्यंत तीव्र झाला आहे. किंबहुना, भारतातील केंद्र सरकारच्या धोरणांमुळे जगभरात देशाची जेवढी नाचक्की होते आहे, तेवढी यापूर्वी कधीही झाली नसावी. काहीच काळापूर्वी जागतिक पातळीवर घडणार्‍या, किंवा घडवून आणण्यात येणार्‍या, मोदींच्या स्वागत-समारंभांनी ज्यांचे ऊर भरून येत होते; त्या जमातीला आज मोदी सरकारच्या धोरणांनी ओढवून घेतलेल्या नाचक्कीबद्दल काहीच वाटत नाही, हे त्यांच्यातील कोडगेपणाचे तरी प्रतीक असावे किंवा फासीवादी प्रवृत्तीचे लक्षण असावे.

२०१९ची सुरुवात आणि शेवट केंद्रातील भाजप सरकार विरूद्धचा रोष जगजाहीर होण्याने झाला असला तरी, हे वर्ष नरेंद्र मोदींच्या देश-पातळीवरची निवडणूक जिंकण्याच्या कौशल्याचे वर्ष होते हे वास्तव आहे. मोदींच्या अट्टाहासाने निर्माण झालेल्या बिकट आर्थिक परिस्थितीत भाजपसाठी निवडणूक दिग्विजयाची वाटसुद्धा मोदींच्या कल्पक नेतृत्वानेच सुकर केली, हे मान्य केले पाहिजे. एकीकडे, अमित शहाने भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे जाळे देशभरात घट्ट केले, तर दुसरीकडे नरेंद्र मोदींनी शेतकर्‍यांच्या खात्यात वार्षिकी सहा हजार रुपये जमा करत व सवर्णांना सरकारी नौकरी व शिक्षणात १० टक्के आरक्षण देऊ केले. मोदी सरकारच्याच धोरणांमुळे अगदीच हातघाईला आलेल्या शेतकरी वर्गाला हा मोठा दिलासा वाटला, तर नौकर्‍यांच्या दुष्काळात आरक्षणाच्या गाजराने सवर्ण सुखावला.

अर्थात, निवडणूक जिंकण्यासाठीच्या योजनेचा कळस होता तो बालाकोट सर्जिकल स्ट्राईकबद्दलचा प्रचार! ‘घर में घुसके मारा है’, ‘काँग्रेसने ७० वर्षांत काय केले?’ आणि ‘मोदी नाही तर मग कोण?’ या त्रिसूत्रीची परिणती ‘आयेगा तो मोदी ही’च्या मंत्रात झाली. निवडणूक प्रचारादरम्यान लोकांच्या मनावर शिंपडलेली मोहिनी फार काळ टिकणार नाही, याची जाणीवसुद्धा मोदी सरकारला होती. त्यामुळेच, पुन्हा सरकार स्थापन केल्यानंतर हिंदुत्वाच्या राजकारणाला मुख्य धारेत स्थान मिळवून देणार्‍या मुद्द्यांना मोदी-शहा यांनी हात घातला. प्रचंड दडपशाहीच्या माध्यमातून जम्मू-काश्मीर राज्याचे विशेष अधिकारच नाहीत, तर भारतीय संघराज्यातील राज्य असण्याचा अधिकारच नष्ट करण्यात आला. लवकरच अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला हवा तसा निर्वाळा दिला. यातून आत्मविश्वास बळावलेल्या मोदी सरकारने नागरिकत्व (संशोधन) विधेयक संसदेत पारित करून घेतले आणि देशभर एनआरसी प्रक्रिया सुरू करण्याची धमकीवजा भाषा वापरण्यास सुरुवात केली. इथेच, द्वितीय मोदी सरकारचा मधुचंद्र संपुष्टात आला.

नागरिकत्व (संशोधन) कायदा, २०१९ विरोधात काही राज्य सरकारांनी घेतलेली भूमिका, आपल्या राज्यात एनआरसी लागू न होऊ देण्याबाबत अनेक राज्य सरकारांनी केलेली घोषणा आणि देशभरात होत असलेल्या विरोध प्रदर्शनांमधील उत्स्फूर्त्तता व सातत्य यामुळे खुद्द पंतप्रधान मोदींना एनआरसी लागू करण्याबाबत अद्याप चर्चा झाली नसल्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले. ‘विरोध करणार्‍यांच्या कपड्यांवरून ते कोण लोक आहेत हे ओळखता येते’ असे विधान करणार्‍या पंतप्रधानांना एनआरसी लागू करण्याच्या मुद्द्यावर जाहीर माघार घ्यावी लागली, हे विशेष महत्त्वाचे आहे. नेमके कोणत्या मुद्द्यांवर माघार नाही घेतली तर आपले अस्तित्व धोक्यात येऊ शकते, याची नीट जाणीव नरेंद्र मोदींना असते. यापूर्वी त्यांनी जमीन अधिग्रहण (संशोधित) कायद्यात दुरुस्ती करणारे तब्बल तीन अध्यादेश काढल्यानंतर याच प्रकारची माघार घेतली होती. अगदी अलीकडेच त्यांच्या सरकारने आरसीईपी या मुक्त व्यापार क्षेत्रात सहभागी होण्याच्या मुद्द्यावर रातोरात घुमजाव केले होते. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात होत असलेल्या फी वाढीच्या आंदोलनात देखील मोदी सरकार बचावात्मक पवित्र्यात गेल्याचे चित्र उभे राहिले आहे. जेएनयूला राष्ट्रद्रोही ठरवत त्या विरुद्ध ध्रुवीकरण करण्यात आनंद मानणार्‍या संघ परिवारातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेलासुद्धा फी-वाढीच्या विरोधात जाहीर भूमिका घ्यावी लागली हे विशेष! लोकांमधून उत्स्फूर्तपणे उभ्या राहणार्‍या आंदोलनांपुढे मोदी सरकारला मान झुकवावी लागते, ही बाब बरेच काही सांगून जाते.

एनआरसीवर अद्याप चर्चा झालेली नाही, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले असले तरी एनआरसी लागू करण्याचा आपल्या सरकारचा कोणताही हेतू नाही, असे ते म्हणालेले नाहीत. आज जर भारतीय जनतेने धार्मिक भेदावर आधारित नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा, २०१९ स्वीकारला तर उद्याला मोदी सरकार एनआरसी लागू करण्याच्या दिशेने पाऊले उचलणार हे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे. नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा, २०१९च्या समर्थनार्थ काढण्यात येणार्‍या मोर्च्यांमधील भगव्या झेंड्यांचे स्थान आणि विरोधातील मोर्च्यांमधील तिरंग्याचे प्राबल्य हे भारतातील दोन विचारधारांमधील संघर्षाचे जिवंत प्रतीक आहे. राज्यघटनेप्रती निष्ठा असलेले सर्व नागरिक ‘भारतीय’ आहेत असा अभिमान बाळगणारे भारतीय आणि भारतातील सर्व १३० कोटी लोकांना हिंदू ठरवण्याचा दुराग्रह असलेले धर्मांध नेतृत्व यांच्यातील हा संघर्ष आहे. भविष्यातील भारत हा धर्म-आधारित भगव्या राष्ट्रावादावर आधारित असेल की, सर्व धर्मांना व निधर्मियांना समान स्थान असलेला सर्वसमावेशक राज्यघटना आधारित राष्ट्रावादावर उभारलेला असेल, याची लढाई २०२० मध्ये लढली जाणार आहे.

.............................................................................................................................................

लेखक परिमल माया सुधाकर एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे इथं अध्यापन करतात.

parimalmayasudhakar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......