सांता क्लॉजची खरी ओळख समोरच्यांना कळली नाही, तो सस्पेन्स खूप वेळ टिकला तर त्यातली गंमत अधिक वाढते!
पडघम - सांस्कृतिक
कामिल पारखे
  • लेखक कामिल पारखे सांता क्लॉजच्या वेषात
  • Mon , 24 December 2018
  • पडघम सांस्कृतिक नाताळ मेरी ख्रिसमस Merry Christmas

पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी मी १९८५ साली लखनौत होतो. डिसेंबरची अखेर येऊ लागली, तसे मला नाताळाचे वेध लागले. पण लखनौमध्ये गोव्यासारखे ख्रिसमसचे वातावरण नव्हते. लखनौ विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये इंडियन फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नालिस्टस आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ जर्नालिस्टसने आयोजित केलेल्या या अभ्यासक्रमात देशातील विविध राज्यांतील पत्रकार सामील होते. गोव्यातून मी एकटाच होतो. सहभागी पत्रकारांपैकी बहुतेकांनी ख्रिस्तमसचा कधी अनुभव घेतला नव्हता. त्यामुळे लखनौत या पत्रकार मित्रांसह नाताळ साजरा करण्याचे मी ठरवले.

माझ्या पत्रकार सहकाऱ्यांना नाताळचा आनंद देण्याचे, त्यांच्यासाठी सांता क्लॉज बनून त्यांना चकित करण्याचे मी ठरवले. नाताळाचे व कुठल्याही सणाचे, उत्सवाचे त्या काळात आजच्यासारखे बाजारीकरण झाले नव्हते. सांता क्लॉजचा मुखवटा किंवा पोशाख आणि ख्रिसमस ट्री त्या काळात बाजारात विक्रीला नसायचे. नवाबाच्या लखनौत नाताळच्या सजावटीचे सामान मिळणे शक्यच नव्हते. त्या काळी लखनौच्या मुख्यवस्तीपासून लांब अंतरावर असलेल्या उपनगरात बीमा कॉलनीत आम्ही राहत होतो. शहरातील चर्चमध्ये नाताळाच्या मध्यरात्री होणाऱ्या प्रार्थनेला हजर राहणे मला शक्यच नव्हते. त्याऐवजी पत्रकार सहकाऱ्यांबरोबर नाताळ साजरा करण्याचे मी ठरवले. या काळात माझ्याशी गट्टी जमलेल्या दिल्लीचे पत्रकार शर्माजी माझ्या या योजनेत सामील झाले. त्यांच्या मदतीने मी सांता क्लॉजचे रूप घेतले. २४ डिसेंबरच्या रात्री दहाच्या दरम्यान कापसापासून केलेल्या दाढीमिशा तोंडाला लावून, एका मोठा काळ्या गाऊनवर पट्टा चढवून मी रात्री सर्वांसमोर उभा राहिलो, तेव्हा माझ्या सर्व सहकारी मित्रांचे प्रथम चकित आणि नंतर आनंदी झालेले चेहरे पाहण्यासारखे होते. लखनौतील कडाक्याच्या थंडीत शेकोटी पेटून काही काळ गाणी गात आम्ही सर्वांनी नाताळची रात्र साजरी केली.

सांता क्लॉज होण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग. त्यानंतर पांढरी किनार असलेल्या लाल पोषाखातील या गंमतीदार व्यक्तीचे रूप घेण्याची संधी मला अनेक वर्षे मिळाली. माझ्या मुलीच्या लहानग्या मित्र-मैत्रिणींसाठी मी अनेकदा सांता क्लॉज बनलो. पिंपरी चिंचवडला आमच्या इमारतीतील शेजाऱ्यांच्या फ्लॅटच्या दारात जाऊन बेल वाजवल्यानंतर दार उघडल्यानंतर समोर मुखवटाधारी सांता क्लॉज दिसल्यानंतर दार उघडणाऱ्या व्यक्तींची भंबेरीच उडायची. अनेकदा मुलांचे आणि पालकांचेही आनंदाचे तर कधी भयाचे चित्कार कानी पडायचे. आश्चर्याच्या, भीतीच्या धक्क्याने कधी दार धाडकन बंद व्हायचे आणि थोड्या वेळानंतर हास्याच्या कल्लोळात उघडले जायचे. नंतर दरवर्षी ही मुले-मुली डिसेंबरअखेरीस रात्रीच्या वेळी सांता क्लॉजची आणि नंतर ख्रिसमसच्या सकाळी बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये होणाऱ्या पार्टीची वाट पाहायची. काही मुलांचे आई-वडील आणि आजी-आजोबासुद्धा नाताळच्या दिवसांत संध्याकाळी-रात्री सांता क्लॉजची वाट पाहायचे. त्या काळची लहान मुले-मुली आज महाविद्यालयांतून बाहेर पडली आहेत, काहींची लग्नेही झाली आहेत. मात्र आताही ख्रिस्तमसचे वेध लागले की, लहानपणी अनुभवलेल्या सांता क्लॉजची त्यांना नक्कीच आठवण येत असणार!

हल्ली सांता क्लॉजचा पूर्ण पोशाख बाजारात मिळतो. मात्र सांता क्लॉज ही व्यक्ती लठ्ठ दिसायला हवी, तिने गमतीदार वागायला हवे, चिडायला नको उलट चेष्टामस्करी करायला हवी, स्वतः नाचायला हवे आणि इतरांनाही नाचवायला हवे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सुरुवातीला सांता क्लॉजने काहीही बोलणे टाळायला हवे, कारण आवाजातून अनेकदा सांता क्लॉजची खरी ओळख पटते. सांता क्लॉज झालेल्या व्यक्तीने आपले डोके, मान, हाताचे पंजे पूर्णतः टोपी, झगा आणि हातमोज्यांनी झाकले तरी नेहमीच्या बुटांनी त्याची / तिची खरी ओळख इतरांना कळू शकते. सांता क्लॉजची खरी ओळख समोरच्यांना कळली नाही, तो सस्पेन्स खूप वेळ टिकला तर यातली गंमत अधिक वाढते.

हल्ली नाताळानिमित्त अनेक ऑफिसांत ‘सिक्रेट सांता’ हा खेळ खेळला जातो. या खेळात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नाव असलेली चिठ्ठी लिहिली जाते आणि सोडतीमध्ये प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्या कुणा व्यक्तीचे नाव असलेली चिठ्ठी मिळते. नाताळाआधीच या चिठ्ठीचे वाटप होते. चिठ्ठीवर ज्याचे नाव असते त्या व्यक्तीचा ‘सिक्रेट सांता’ बनवण्याची जबाबदारी प्रत्येकाला मिळते आणि त्या व्यक्तीला आवडेल असे गिफ्ट तयार करून, त्यावर दुसऱ्या व्यक्तीचे नाव टाकून आणि आपली स्वतःची ओळख लपवून गुपचूपपणे खेळाच्या आयोजकांकडे द्यायची असते. नाताळाच्या दिवशी या सर्व भेटी प्रत्येकाने जमलेल्या सर्वांच्या समक्ष उघडायच्या असतात. गिफ्ट उघडल्यानंतर त्या व्यक्तीला होणारा आनंद, प्रतिक्रिया प्रत्येक सिक्रेट सांताला पाहता येते. प्रत्येक व्यक्तीने आपला ‘सिक्रेट सांता’ कोण हे ओळखायचे असते. क्वचित ते कुणालाही ओळखता येत नाही. या खेळात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला होणारा आनंद, या खेळातील गंमत औरच असते.

ख्रिसमस वा ख्रिस्तजन्मासाठी असलेला ‘नाताळ’ हा मूळचा लॅटिन शब्द पोर्तुगीजांच्या माध्यमातून मराठीत रूढ झाला आहे. (गोव्यातील साडेचारशे वर्षांच्या पोर्तुगीज राजवटीमुळे पोर्तुगीज भाषेतील पगार(पाग), पाव वगैरे अनेक शब्द मराठीत रूढ झाले आहेत.) नाताळच्या आठ दिवस आधी प्रत्येक चर्चची तरुण मुले-मुली कॅरोल सिंगिंग किंवा नाताळची गाणी घरोघरी गाण्यासाठी बाहेर पडतात. हल्ली प्रत्येक घरी भेट देणे, जिने चढणे शक्य नसल्याने मग मुख्य चौकाचौकात त्या परिसरातील ख्रिस्ती कुटुंबांना बोलावून नाताळची गाणी गायली जातात. विशेष म्हणजे मराठीतही नाताळाच्या गीतांची आणि इतर धार्मिक गीतांची शंभर-सव्वाशे वर्षांची जुनी परंपरा आहे. यासाठी रेव्हरंड नारायण वामन टिळक प्रभुतींना श्रेय द्यावे लागेल. पेटी, तबला आणि टाळाच्या संगीताच्या साथीत ही नाताळ-गाणी गायली जातात. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात विशेषतः मराठवाड्यात, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आणि पुणे परिसरातही ही परंपरा आजही टिकून आहे.

हल्ली ख्रिसमस हा सण केवळ ख्रिस्ती समाजासाठी मर्यादित राहिला नाही. ख्रिस्ती समाजासाठी नाताळ हा येशू ख्रिस्ताचा जन्मसोहळा असला तरी जगभरातील बहुसंख्य समाजानेही या सणास एक आनंद-सोहळा म्हणून स्वीकारले आहे. आपल्या कुटुंबियांसमवेत, मित्रांबरोबर गिफ्ट्सची देवाणघेवाण करून आनंद अनुभवण्याचा, मौजमजा करण्याचा उत्सव म्हणून ख्रिसमसकडे आज पाहिले जाते. त्यामुळे ख्रिस्ती शिक्षणसंस्थाबरोबरच इतरही शाळांत ख्रिसमसच्या सुट्टीआधी विद्यार्थ्यांसाठी ख्रिसमसची पार्टी साजरी केली जाते. 

नाताळापूर्वी एका आठवडाआधी दुकानांत, ऑफिसांत आणि मॉलमध्ये ख्रिस्तमस ट्री सजवला जातो. ख्रिस्ती कुटुंबांत ख्रिसमस ट्री शेजारीच गाईगुरांच्या गोठ्यातील ख्रिस्तजन्माचा देखावा सजवला जातो. या देखाव्यात बाळ येशू, मारिया, जोसेफ, जनावरे, बाळ येशूच्या दर्शनाला आलेले मेंढपाळ, तीन राजे, देवदूत यांचा समावेश असतो. नोकरदार मंडळी वर्षाअखेरीस सुट्टीवर जाण्याआधी अनेक ऑफिसांत पार्ट्या आयोजित केल्या जातात, विविध गेम्स खेळले जातात. ख्रिसमसचा हा सण सर्वांनाच आनंदी करून जातो आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मग सगळे जण तयारीस लागतात.

.............................................................................................................................................

लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.

camilparkhe@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 27 December 2018

कामिल पारखे, सांताची खरी ओळख कोणालाच पटलेली नाहीये. क्लॉज हे आडनाव मध्योत्तर युरोपात (विशेषत: सॅक्सनीत) आढळतं. इतरत्र सापडणारी Closse, Clause, Klass वगैरे आडनावं याच पठडीतली आहेत. तर हा सांता क्लॉज म्हणजे Santa Claus मध्य ते उत्तर युरोपातल्या पट्ट्यांतला इसम आहे. हा लॅपलँड मधून युरोपात अवतीर्ण होतो. लॅपलँड हा आर्क्टिक प्रदेश आहे. क्लॉज हे आडनाव धारण करणारा कोणतरी माणूस उत्तरध्रुवीय प्रांतातनं बर्फाच्या घसरगाडीवरनं युरोपात २४ डिसेंबराच्या रात्रीस येतो. मग याचा मध्यपूर्वेशी काय संबंध? येशूचा जन्म नाझरेथला झाला ना? नाझरेथच्या वाळवंटात ४० अंश सेंटिग्रेड तपमानात बर्फावरची घसरगाडी कोणी चालवू शकेल काय ? एकंदरीत ख्रिसमसाचा येशूजन्माशी फुटक्या कवडीइतकाही संबंध नाही. हा पोपने पेगनांकडून चोरलेला सण आहे. २२ डिसेंबराच्या आसपास सूर्याचं दक्षिणेकडे सरकणं संपतं व तो परत उत्तरेकडे सरकू लागतो. आकाशात या घटनेच्या पार्श्वभूमीवर तेजस्वी तारकांची जी चौकडी असते तिला सदर्न क्रॉस (southern cross) म्हणतात. उत्तरेकडे सरकणारा सूर्य पेगन लोकं नवा मानायचे, व जुना सूर्य दक्षिणेस सरकंत मरून जाई. तर, ख्रिसमस म्हणजे जुना सूर्य सदर्न क्रॉसवर येऊन मरतो तो सण. येशू नावाच्या कुण्या व्यक्तीस सुळावर चढवले वगैरे पोपचा बकवास आहे! येशू गचकल्याखेरीज पोपला चैन पडंत नाही. असो. जमल्यास ख्रिसमसवृक्ष सजवावा. हा प्रकारसुद्धा पेगन असल्याने कॅथलिक चर्चने त्यावर बंदी घातली होती. पोपला खिजवण्यासाठी म्हणून तो मुद्दाम दर्शनी भागांत उभारावा. काय म्हणता? आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......